हे एकनाथ महाराजांचे जलसमाधी स्थान आहे. कृष्णकमलातीर्थावर नाथांनी आत्मा ब्रह्मांडात विलीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तुळस आणि पिंपळाची रोपं उगवली. तेथेच नाथांचे पुत्र हरिपंडीत महाराजांच्या हस्ते पादुकांची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीतील मंदिराचा लाकडी गाभारा हा एकनाथांचे ११ वे वंशज श्रीमंतराजे श्री भानुदास महाराज गोसावी, जहागिरदार यांनी बांधला असून मुख्य तटबंदी ही अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे.
नाथंच्या समाधीच्या उजव्या बाजूला त्यांच्या पूर्वजांच्या समाध्या असून डाव्या बाजूस वंशजांच्या समाध्या आहेत. नाथांच्या समाधीच्या मागे प्रदक्षिणा मार्गावर नाथशिष्य उद्धव यांची समाधी आहे तर उत्तर दरवाज्याजवळ दुसरे शिष्य गावोबा यांची समाधी आहे. समाधीस प्रत्येक द्वादशीस महापूजा करण्यात येते. श्रीएकनाथषष्ठीचा महोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन वारकरी लाखोंच्या संख्येनं हजेरी लावतात.
पंढरीच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायाची दुसऱ्या क्रमांकाची वारी येथे भरते. शिवाय दर शुद्ध एकादशीस येथे वारी भरते त्याहीवेळी हजारो वारकरी नाथसमाधीचं दर्शन घेतात. मंदिरात वीणेचा अखंड पहारा असतो. अखंड हरिनाम सप्ताहाच्या रुपात वारकरी सांप्रदायिक लोक आपली सेवा नाथचरणी रुजू करतात. दररोज हजारो भाविक नाथ समाधीचं दर्शन घेतात.