कवित्व स्फूर्ती तुकारामांना नामदेवापासून झाली, पण विचारस्फूर्ती त्यानां नाथांपासून लाभलेली आहे.
- आचार्य विनोबा भावे - म. वा. इतिहास पॄ.क्र.२४एकनाथांची समाजाची कान उघडणी करण्याची भाषा आणि शुध्द परमार्थाची तळमळ तुकाराम महाराजांनी स्वीकारली आहे. तर विस्ताराने विवरण करण्याची लेखन पध्दती आणि समाजोन्मुखता रामदासांनी उचलली आहे एकनाथांच्या भागवतातील आत्मोपदेशक कॄष्ण तुकारामांनी आपलासा केला तर भावार्थ रामायणातील असुरसंहारक राम रामदासांनी मस्तकी धरला. एकनाथांच्या निर्याणानंतर पुढे थोडयाच काळाने महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाचा गोंधळ मांडला. त्यासाठी लोकांची मनोभूमिका एकनाथांच्या वाङमयाने तयार केली, असे इतिहासाचे अभ्यासक मानतात. केवढे मोठे देणे एकनाथांनी आपल्याला दिले, याची या सर्वांवरुन कल्पना येईल.
- श्री धुंडामहाराज देगलुरकर. - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन प्रस्तावना पॄ.क्र.११नाथ भागवतात ज्ञानेश्वरीप्रमाणेच साहित्य आणि शांती यांचे मिलन आहे व म्हणुनच ज्ञानेश्वरीच्या खालोखाल नाथ भागवताचा प्रसार महाराष्ट्रात फार मोठा आहे.
- श्री मामासाहेब दांडेकर - एकनाथ दर्शन खंड-२ पृ.क्र-२२श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी जे सूत्र रुपाने सांगितले त्याचा विस्तार नाथभागवतात आहे आणि नाथभागवतात जो भक्तियोग प्रामुख्याने सांगितला त्याचाच श्री तुकोबांनी पुरस्कार केला आहे.
- श्री शंकरमहाराज खंदारकर एकनाथ खंड - खंड-२ पॄ.क्र.२२३अध्यात्म आणि आचार, तसेच तत्वविचार व प्रत्यक्ष व्यवहार यांच्यातील एकात्मतेचे सतत भान ठेवून नाथांनी अनेक अंगांनी जे जनजागरण केले, त्यामुळे ते महाराष्ट्र महोदयाचे अग्रदूत ठरले.
- डॉ. हे. वि. इनामदार - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ. क्र.३३३…या विविधतेमागेही केवळ विविधतेचा ध्यास नसून लोकशिक्षक एकनाथांचे जागरुक जनहितार्थ कळवळणारे मनच असावे असे वाटते. जनसामान्यांच्या आकलन कक्षांचा विचार नाथांच्या मनात कसा सतत तेवत असावा, या जाणिवेने मन भरुन येते.
- डॉ. यु. म. पठाण - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.११४शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ हे तिघेही क्रांतदर्शी युगपुरुष. तिघांनीही राष्ट्रधारणा ही समाजाच्या आध्यात्मिक मनोधारणेतुनच परिणत होते, होऊ शकते हे सिध्द केले. हे कार्य करण्याची शक्ती स्थल काळाचे भान ठेवून, राष्ट्राला वळण लावण्याच्या प्रयत्नातुनच प्राप्त होते.
- श्री भीमराव बळवंत कुलकर्णी - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.३०६‘दुर्जनाने अंगावर थुंकत राहावे आणि नाथांनी पुन:पुन्हा स्नान करीत जावे’ नाथकालीन सत्ताधीश वर्गाच्या मदांधतेची निदर्शक अशी ती ऐतिहासिक घटना आहे, असे मत विनोबाजी भावे यांनी या संदर्भात प्रकट केले आहे. पुढे तर ते म्हणतात, मला वाटते सत्याग्रहाचे याहून चांगले उदाहरण दाखविणे कठीण आहे.
- श्री भा. श्री. परांजपे - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.२४९प्रत्यक्ष भक्तिमंदिराचा कळस ठरलेल्या ब्रह्ममूर्ती तुकाराम महाराजांनी देखील या श्री एकनाथी भागवताची हजारावर पारायणे केली, या घटनेत या लोकोत्तर ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्व दिसून येते.
- श्री दा. वि. कुलकर्णी - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.३१नाथ हे स्वत: भागवत होते त्यांनी ‘चिरंजीवपद’ प्राप्त करुन घेतलेले! ‘स्वात्मसुखाचे’ अनुभवामॄत’ त्यांनी यथेच्छ प्राशन केले असल्यामुळे ‘आनंदानुभवात’ ‘आनंदलहरी’ कशा उचंबळ्त असतात हे स्वत: अनुभवीत होतेच !
- श्री. वि. य. कुलकर्णी - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.१३४पुढील कवि परंपरा नाथांच्या प्रभावाखाली वावरत राहिली. तुकाराम-रामदास आणि मुक्तेश्र्वर-श्रीधर ही नाथांच्या प्रभाव कक्षेतील शिखरे आहेत. एकनाथांचे बीजकवित्व असे युगनिर्माणक ठरले आहे.
- श्री र. बा. मंचरकर - कॉंटिनेन्टल एकनाथ दर्शन पॄ.क्र.२१२