1) एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, ’माझ्या गळ्यास अजानवृक्षाच्या मुळीने वेढले आहे तु आळंदीस ये आणि मुळ्या काढ’. झोपेतुन जागे झाल्यावर नाथांनी आपल्या भक्तगणंसमवेत आळंदीस प्रस्थान केले. तेथे पोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना दिसली. नाथ एके ठिकाणी बसले, श्री ज्ञानेश्वरांचे ध्यान केल्यानंतर नंदीच्या खालुन आत येण्याचे द्वार आहे असा दृष्टांत त्यांना झाला. सर्व मंडळींनी मिळुन झुडपे तोडली. नाथ नंदीखालील द्वारातून आत प्रवेश करते झाले. समोर प्रत्यक्ष तेज:पुंज मदनाचा पुतळा श्री ज्ञानेश्वर महाराज बसले होते. त्यांनी नाथांना आलिंगन दिले. नाथांनी माऊलीस नमस्कार केला. त्या दोघांचा दिव्य संवाद तीन दिवस चालला. नाथ बाहेर आले. त्यांनी समाधीचे दार बंद केले. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चौथरा बांधला आणि समाधीचा जीर्णोद्धार केला. समवेत आलेल्या काही भाविकांना येथेच कायमस्वरुपी वास्तव्यास राहण्यास सांगितले. कार्तिक वद्य त्रयोदशीस आळंदीची यात्रा सुरु केली. ज्ञानेशांच्या आज्ञेप्रमाणे ज्ञानेश्वरीची शेकडो हस्तलिखिते जमा करुन संशोधन केले. त्यात अनेक अपपाठ घुसविले गेले होते, लोकांनी आपल्या मनाच्या ओव्या अनेक ठिकाणी घातल्या होत्या. त्या सर्व वगळून नाथांनी श्री ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. त्याच्या अनेक हस्तलिखित प्रती तयार करवून सर्वत्र पसरविल्या. याच कारणाने नाथ हेच सर्व मराठी सारस्वतांचे आद्य संपादक ठरतात. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती नाथांनी शुद्ध केली आहे. अशाप्रकारे ज्ञानेश्वरांच्या आळंदी (दे.) येथिल संजीवन समाधीचा जीर्णोद्धार, आळंदीची कार्तिकी यात्रा सुरु करणे आणि ज्ञानेश्वरीचे शुद्धिकरण हे नाथांचे अतिशय महत्वाचे ऐतिहासिक कार्य होय.
2) पैठण येथील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरुन एक यवन (मुसलमान) नाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकला तरीही नाथांना क्रोध आला नाही. उलट पान खाल्यानं तुझं तोंड भाजलं असेल घरी चल तुला मध चाखतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होई असे सांगुन नाथांनी आपल्या आचरणाने शांतीचा संदेश आपणास दिला तसेच सत्याग्रह कसा असावा याचा वस्तुपाठही घालून दिला.
3) काशीहून रामेश्वरास वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात घातले व देव देवळात नसून तो चराचरात आहे हे सांगितले त्याचप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करावी हेही त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले.
4) नाथ वाळवंटातून जात असता हरिजनाचे एक मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यानां दिसले. कोणताही स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार न करता नाथांनी त्या बालकास कडेवर घेतले व त्याच्या घरी जावून त्याच्या आईकडे सुपुर्द केले. या घटनेतून नाथांनी आपल्याला समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिला आहे.
5) सर्वसामान्यांपासून ते मुक्तांपर्यन्त सर्वांसाठी नाथांनी विपुल प्रमाणामध्ये ग्रंथरचना करुन मराठी ग्रंथ भांडारात खुप मोठी भर घातली. तसेच अंधश्रद्धेवर कोरडे ओढुन श्रद्धेला प्रोत्साहन दिलं. वारकरी संप्रदायाचा मोठयाप्रमाणात प्रचार-प्रसार केला.