गावातील नाथ मंदिर, पैठण
हे श्री एकनाथमहाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत.
श्रीखंड्याने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. प्रत्येक एकादशीस येथे महापूजा (अभिषेक) करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा (कृष्ण जन्माष्टमीचा) उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. मंदिर परिसरात नाथवंशीयांची घरे आहेत.