पैठण हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालीवाहन राजाची राजधानी म्हणून यांस महत्व होते. राजा रामदेवराय यादवांच्या काळात पैठणला धार्मिक महत्व प्राप्त झालं. दक्षिण काशी म्हणून पैठणला ओळखलं जाऊ लागलं. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं.
पैठणने जगास अनेक नररत्ने दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो.
सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून याचे महत्व वाढत आहे. प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी असून येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात.
संत ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर, पैठणी साडी केंद्र इ. मुळे शहरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. येथे महाराष्ट्र शासनाने संतपीठाची उभारणी केली असून लवकरच हा प्रकल्प जनतेसमोर येईल अशी आशा आहे.
पैठण हे शहर आज लोकांना परिचित आहे ते मात्र संत एकनाथांमुळे.संत ज्ञानेश्वर उद्यान
नाथसागर
पैठणी साडी
संतपीठ