शरण शरण एकनाथा । पायी माथा ठेविला ॥१॥
नका पाहु गुण दोष । झालो दास पायांचा ॥२॥
आता मज उपेक्षिता । नाही सत्ता आपुली ॥३॥
तुका म्हणे भागवत । केले श्रॄत सकळा ॥४॥
द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥
श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥
सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥
निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करितसे ॥४॥
दासोपंतांचा अभिमान । गेला घेताची दर्शन ॥१॥
धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥२॥
दत्तात्रय चोपदार येथे उभे क।ठीकर ॥३॥
यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्त केला ॥४॥
निळा शरण तुमच्या पाया । अनन्यभावे नाथराया ॥५॥
सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥१॥
ज्यांचे घेताचि दरुषण । पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥
ज्यांचे वाचिता भागवत । प्राणी होय जीवन मुक्त ॥३॥
निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥४॥
मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ ॥१॥
काळ रुळतो चरणी । देवा घरी वाहे पाणी ॥२॥
ज्यांचे अनुग्रहे करुन । झालो पतित पावन ॥३॥
जो वसे प्रतिष्ठानी । निळा त्यासी लोटांगणी ॥४॥
धन्य धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥
कॄष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उद्धरी जगाचे कलिदोष ॥२॥
जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन । पूर्वज उद्धरण कुळासहित ॥३॥
निळा म्हणे जया घडो तेथील वारी । तया पुण्यासही न वर्णवे ॥४॥
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार ।
आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥
ओवाळु आरती स्वामी एकनाथा ।
तुमचे नाम घेता हरे भवभयचिंतां ॥२॥
जनार्दनाची कॄपा दत्तात्रयाचा प्रसाद ।
भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥
ब्रह्मा विष्णु महेष ज्यासी छळावया येती ।
नढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्ति ॥४॥
कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणि वाहे ।
अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥
भजा हो भजा माझ्या एकनाथासी ।
त्रिकाळी श्रीदत्तात्रेय दर्शन त्यांसी ।
प्रतिष्ठान अधिष्ठान मान्य सर्वांशी ।
प्रगट परब्रह्म भानुदासाचे वंशी ॥धॄ॥
एकनाथा शरण जाता चुके भवभय ।
एकावांचुनि काही न दिसे अवघे अद्वैय ।
एका भावे भजता त्यासी लाभे निजसोय ।
एवढा ज्याचा महिमा वाचे वर्णिता न ये ॥१॥
करुणेचा अवतार तो हा विश्वतारक ।
कळेना स्वामीचे सहजा सहजी कौतुक ।
कर्ज फेडी त्याच्या घरचे कमलानायक ।
करी देवदास्य ज्याच्या आज्ञाधारक ॥२॥
नाम ऐकोबाचे गोड आवडे मना ।
नामकॄत सेविता भेटी झाली चिद्घना ।
नावडे अधिक काही मज त्या विना ।
नाठवे देहभान प्रेमे करिता कीर्तन ॥३॥
थरथर कापे काळ स्वामी स्मरता समर्थ ।
थकित होवोनि जन हे पाहती हर्ष परमार्थ ।
थकले माझे चित्त पुरले मनीचे मनोरथ ।
थयथय नाचे मुक्तेश्वर म्हणे मी झालो कॄतार्थ ॥४॥