॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥
 
वंशपरंपरा
 
श्रीएकनाथमहाराज आणि गिरिजाबाई यांना तीन अपत्ये झाली. गोदाबाई, हरिपंडीत, गंगाबाई. त्यातील गोदाबाई उर्फ लीला यांचा विवाह पैठण येथिल चिंतामणि मुद्‍गल यांच्याशी झाला. त्यांचा मुलगा म्हणजे श्रेष्ठ कवी मुक्‍तेश्वर होय. गंगाबाईंचा विवाह डंबळ येथिल बाळकृष्णपंत चंद्रकेत यांच्याशी झाला. त्यांचा पणतु म्हणजे कवी शिवराम होय. हरिपंडित उर्फ हरिपंत हे विद्वान पंडित; परंतु नाथांचं वागणं त्यांना आवडत नसे. याकारणानं ते काशीस निघून गेले. पुढे काही कारणाने त्यांना नाथांची महती समजली व ते सपरिवार पैठणास येवून नाथांचा पारमार्थिक वारसा चालवू लागले. त्यांनी नाथांचा अनुग्रह प्राप्त केला. नाथांच्या समाधीनंतर पंढरीची, आळंदिची वारी त्यांनी चालू ठेवली. आषाढीवारीसाठी नाथांच्या चरणपादुका पालखीत पंढरीस नेण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. हरिपंडितांना तीन मुले झाली प्रल्हाद, मेघ:शामबुवा आणि राघोबा.
प्रल्हादांचा वंश पाच पिढ्यांनंतर खुंटला. राघोबा हे बालपणापासूनच पारमार्थिक. आपल्या आजोबांप्रमाणेच त्यांना भजन किर्तन करणे आवडत. पुढे त्यांनीही या दिव्य परंपरेला शोभेल असाच परमार्थ केला. त्यांच्या अकराव्या पिढीत श्रीनारायणमहाराज हे थोर भगवद्‍भक्त होऊन गेले. त्यांनी नाथांच्या पालखी सोहळ्यास वैभव प्राप्त करून दिले. पैठणकर फडाच्या व वारकरी किर्तनाच्याद्वारा त्यांनी संप्रदाय ढवळून काढला. विदर्भात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
मेघ:शामबुवा हे नाथांचे दुसऱ्या क्रमांकाचे नातू. आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून वंशपरंपरेप्रमाणे शिष्यपरंपराही त्यांनी चालू ठेवली. ते नाथांप्रमाणेच महान भगवद्‍भक्त होते. सद्यस्थितीत मेघ:शामबुवा यांचा वंशविस्तार पावला असून पैठण येथिल सर्व नाथवंशीय मंडळी ही मेघ:शामबुवा यांच्या शाखेतील आहेत. नाथांच्या पाचव्या, सहाव्या, सातव्या पिढीत रामचंद्रबुवा, छय्याबुवा, मय्याबुवा, काशीनाथबुवा, विश्वनाथबुवा इ. महान संगीतज्ञ, गायक जन्मास आले. आपल्या स्वर्गीय गायनकलेच्याद्वारा दीपराग गाताच दिवा पेटावा हा अधिकार असल्याने भोसले, पेशवे, शिंदे, होळकर, निंबाळकर आदींकडून त्यांना अनेक जहागिऱ्या मिळाल्या.
नवव्या पिढीत वैजनाथबुवा, भागवतबुवा, बाराव्या पिढीत त्र्यंबकबुवा, तेराव्या पिढीत श्रीचंद्रशेखरबुवा, श्रीगिरिषबुवा, श्रीमिलिंदबुवा आदींनी गानपरंपरा पुढे चालविली आहे. श्री नरहरिबुवा, श्री गणपतबुवा, श्री मधुकरबुवा यांनी ग्रंथप्रकाशन आदींच्या माध्यमातून कार्य केले. वारकरी सांप्रदायिक किर्तनकारांमध्ये श्री दिगंबर महाराज, श्री पांडुरंग महाराज यांनी तर भारुडात श्रीनारायणमहाराज यांनी श्रीविठ्ठलबुवा हे प्रवचनांच्याद्वारा सेवा करतात.
तेराव्या पिढीत श्रीप्रमोदबुवा यांनी अनेक संत चरित्रे लिहिली आहेत. श्री छय्यामहाराज, श्री प्रविण महाराज हे किर्तन करतात.
नाथांच्या अकराव्या पिढीत श्रीमंतराजे श्रीभानुदासमहाराज हे सत्पुरुष होऊन गेले. ते राजयोगी होते. लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच प्रचंड आशा वैभवाचा त्याग करुन नेसल्या वस्त्रानिशी ते हिमालयात निघून गेले. त्यांचे पुत्र बाराव्या पिढीतील श्रीरंगनाथबुवा उर्फ श्रीभय्यासाहेबमहाराज हे एक आदरणीय आध्यात्मिक व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांच्या दारी हत्ती झुलंत एवढं ऐश्वर्य. पैठणच्या श्रीएकनाथमहाराज संस्थानचे ते अधिपती असून दोन्ही मंदिरांसहित हजारो एकर जमिनीचे ते एकमेव विश्वस्त होते. एवढं वैभव असूनही नाथांचा आदर्श समोर ठेवून परंपरेनं चालत आलेली पंढरीची, आळंदीची, दौलताबादची, त्र्यंबकेश्वरची वारी, किर्तनं त्यांनी कधीही चुकविली नाहीत. रोज भजन केल्याशिवाय ते जेवत नसत. त्यांचा शिष्यवर्ग मोठ्याप्रमाणात असून तो पैठणसहित संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. कार्तिक वद्य त्रयोदशीस त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे दुसऱ्या क्रमांकाचे पुत्र श्रीमधुसूदनबुवा उर्फ रावसाहेब महाराज हे परंपरेची किर्तनं करतात. तर तिसऱ्या क्रमांकाचे पुत्र श्रीवेणीमाधवबुवा उर्फ सरदारमहाराज हे भजनाच्या माध्यमातून सेवा करतात. त्यांचे पुत्र चौदाव्या पिढीतील श्रीयोगीराजमहाराज हे नाथांच्या दिव्य पारमार्थिक परंपरेचा वारसा चालवित असून शेकडो वारकरी सांप्रदायिक किर्तनाच्याद्वारा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचाराचं व समाजप्रबोधनाचं कार्य करीत आहेत. व्यवसायानं इंजिनिअर असलेल्या महाराजांनी नाथांची परंपरा वाढविण्यासाठी अनेक सामाजिक, तथा पारमार्थिक उपक्रम हाती घेतले आहेत.
इतर नाथवंशीय मंडळिही आपला व्यवसाय सांभाळून नाथांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करतात. राजकीय क्षेत्रात श्रीहरिपंडितबुवा, शिक्षण क्षेत्रात डॉ. श्री. मेघ:शामबुवा, डॉ. श्री जगदीशबुवा, श्रीचैतन्यबुवा, विधीन्याय क्षेत्रात श्रीशशिकांतबुवा, श्रीवासुदेवबुवा, श्रीश्रीकांतबुवा, श्रीशंतनुबुवा, श्रीशार्दुलबुवा, श्रीविरेंद्रबुवा हे असून अकांऊंट क्षेत्रात श्रीप्रसादबुवा(सी.ए.), श्रीश्रीरंगबुवा (सी.ए.) आहेत. तर श्रीप्रशांतबुवा व श्रीप्रदिपबुवा हे व्यवसाय करतात.
 
 
Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Right Reserved.
Designed & Developed By : Xposure Infotech Pvt. Ltd.