॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥
 
श्रीएकनाथमहाराज पालखी सोहळा
 
शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांचा पालखी सोहळा हा मराठवाडयातून पंढरीस जाणारा एकमेव मोठा पालखी सोहळा आहे. नाथांचे पणजे संत भानुदास महाराजांच्याही आधी पासून पंढरीच्या वारीची परंपरा नाथ घराण्यात चालत आलेली आहे. भानुदास महाराज म्हणतात - आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठ्ठलाचे ॥
तीच परंपरा पुढे चालवत नाथांनी त्याला व्यापक स्वरुप देवून लोकांना आवाहन केले- माझ्या वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥ पंढरीसी जाऊ चला । भेटू रखुमाई विठ्ठला ॥
इ.स.१५९९ साली नाथ समाधिस्थ झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिपंडीत महाराजांनी ही जाज्ज्वल्य परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांनी आषाढी वारीसाठी श्रीनाथांच्या पादुका डोक्यावर घेवून जाण्यास सुरुवात केली. काही वर्षांच्या आतच पादुका पालखी मध्ये घेवून जाण्यात येवू लागल्या. तीच परंपरा नाथांच्या पुढील पिढीतील वंशजांनी आजतागायत टिकवून ठेवली आहे.
प्रस्थान व नित्यनेम - श्रीक्षेत्र पैठण येथुन ज्येष्ठ वदय सप्तमी ह्या तिथीस गावतील नाथ मंदिरातून श्रीएकनाथमहाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरीस होते. रथाच्या पुढे-मागे आपल्या विशिष्ट क्रमावर दिंडया "भानुदास-एकनाथ" भजन करीत मार्गक्रमण करित असतात. रथा पुढील पहिली दिंडी ही नाथवंशजांची असते. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर प्रत्येक दिंडीत काकडा, भजन, गौळणी, भारुडं म्हटली जातात. संध्याकाळी श्रीज्ञानेश्वर महाराज व श्रीएकनाथमहाराजांचा हरिपाठ व ब्रिदावली म्हटली जाते. अनेक छोटी मोठी गावं पार करीत सोहळा मुक्‍कामाच्या गावी येतो. श्रीतुकाराममहाराज कृत - "शरण शरण एकनाथा" हा अभंग म्हणुन समाज आरती होते. पादुकांचे पूजन, नैवेदय झाल्यानंतर किर्तन व जागर करण्यात येते.
संपूर्ण पालखी सोहळयाचे नियोजन हे एकनाथ महाराजांच्या वंशजांकडून केले जाते. नाथ आपल्या गावी येणार म्हणून भाविकांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं नाथ पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. आषाढ शुद्ध दशमीस सोहळा पंढरीत दाखल होतो. श्रीज्ञानेश्वरमहाराज श्रीतुकाराममहाराज पालखीच्या पुढे श्रीएकनाथमहाराजांच्या पालखीचा मानाचा तिसरा क्रमांक असतो. नाथ चौकातील श्रीएकनाथमंदिरात पालखीचा मुक्‍काम पौर्णिमेपर्यन्‍त असतो. तेथे दररोज मानकऱ्यांची कीर्तनं होतात. आ.शु.११ च्या दिवशी नगर प्रदक्षिणा, आ.शु.१४ तथा श्रीभानुदास चतुर्दशीच्या दिवशी गरुड मंडपातील श्रीसंतभानुदासमहाराजांच्या समाधीस अभिषेक व नैवदय असतो. पौर्णिमेच्या दिवशी श्रीविठ्ठल मंदिरातील मुख्य मंडपात काला करण्यात येतो. पौर्णिमेच्या दिवशी दुपारी १२ वा.पालखी पैठणच्या दिशेने मार्गस्थ होते. आ.व.११ दिवशी पालखीचे पैठणकर ग्रामस्थांतर्फे जंगी स्वागत करण्यात येते.
एकंदरीत वारीत येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाची अनुभूती देणारा असतो. ही अनुभूती प्रात्प करण्यासाठी प्रत्येकानं या वाटेवरचं एक पाऊल तरी नक्‍कीच अनुभवावं.
   
जिल्हानिहाय पालखी मुक्‍काम -
१) औरंगाबाद - १ मुक्‍काम
२) अहमदनगर - ३ मुक्‍काम
३) बीड - ४ मुक्‍काम
४) उस्मानाबाद - ४ मुक्‍काम
५) सोलापूर - ६ मुक्‍काम
 
 
 
Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Right Reserved.
Designed & Developed By : Xposure Infotech Pvt. Ltd.