॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥   ॥ दत्ताञय जनार्दन श्रीएकनाथ ॥
 
निवडक वाङ्‍मय
 
भारुड
 
जोशी
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥
 
बहिरा
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥ नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥ नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥ माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
 
मुका
मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥
 
दादला
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥
 
वाघ्या
अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी । सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी । बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥
आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी । एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥
 
विंचू
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥
 
एडका
एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥
धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्रचंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥
धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२॥
भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी । विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे ।
तो केवळ पंचानन ॥३॥
शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी । एकाजनार्दनी चरणी । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥
 
नाथाच्या घरची
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥
 
भूत
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
ऊत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥
 
भवानी
सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥
 
जोगवा
अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
 
फकिर
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ल। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥
 
संसार
सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥
संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥
अभंग
 
उपदेशपर
कलिमाजी दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥
लटिका देव लटिका भक्‍त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥
तेल रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकु । फजितखोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकु ॥३॥
 
तीर्थाजाती उदंड । त्याचे पाठीमागे तोंड ॥१॥
मनवासना ठेउनी घरी । तीर्था नेली भांडखोरी ॥२॥
गंगेत मारिता बुडी । मन लागले बिऱ्हाडी ॥३॥
नमस्कार करिता देवासी । मन पायपोसापाशी ॥४॥
लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥
एकाजनार्दनी स्थिर मन । नाही तव काय साधन ॥६॥
 
वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्वता थेंब नाही ॥१॥
वाया तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्‍तिवीण ॥२॥
अरण्यात जैशी सुकरे बैसती । तैसे मठाप्रति करुनी बैसे ॥ ३॥
उदय होताचि लपते उलुक । तैसा तो मुर्ख समाधी बैसे ॥४॥
एकाजनार्दनी वाया गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शुन्य ॥५॥
 
आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । यातीकुळ नाही लहान ॥१॥
आम्हा सोवळे वोवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ॥२॥
आम्हा सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एकाजनार्दनी बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥
 
कामक्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्‍वैरी तत्पर हेचि येथे ॥१॥
क्षुधा तृषा मोद शोक जरा मरण । षड्‍ऊर्मी पूर्ण देहीं हेचि ॥२॥
आशा मनिषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजी ॥३॥
एकाजनार्दनी त्यजोनी अठरा । तोचि संसारामाजी शुद्ध ॥४॥
 
श्‍वानाचा तो धर्म करावी वसवस । भलेबुरे त्यास न कळे काही ॥१॥
वेश्यांचा धर्म द्रव्यते हरावे । भलेबुरे भोगावे न कळे कांही ॥२॥
निंदकाचा धर्म निंदाती करावी । भले बुरे त्यागावी नकळे काही ॥३॥
सज्जनांचा धर्म सर्वाभूती दया । भेदाभेद तया नकळे काही ॥४॥
संतांचा धर्म अंतरी ती शांती । एकाजनार्दनी वस्ती सर्वांठायी ॥५॥
 
पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥१॥
तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥
बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडूनि गेला ॥३॥
एका विनवी जनार्दना । ऐसे करी गा माझ्या मना ॥४॥
 
जया म्हणती नीच वर्ण । स्त्री शुद्रादी हीनजन ॥१॥
सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे? ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥
तया नाही जनन । सवेचि होत पतन ॥४॥
नीच म्हणोनि काय भुलि । एकाजनार्दनी देखिली ॥५॥
 
विषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कल्लोळ प्राप्ती तुज ॥१॥
आशेचे काबाड कल्पना सगळी । उपटोनि मुळी टाकी परती ॥२॥
भेदाचे भांडे वैराग्याचे हातें । धुवोनि सरते करी बापा ॥३॥
शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एकाजनार्दनी पाय पावशील ॥४॥
 
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणे विरक्‍ति अंगी जोडे ॥१॥
हेचि मुख्यवर्म साधता साधन । येणे जनार्दन जवळी असे ॥२॥
उपासना मार्ग हेचि कर्मकांड । हेचि ब्रह्मांड जनीवनी ॥३॥
हेचि देहस्थिती विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥
एकाजनार्दनी शांतीक्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥
 
नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥
सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये । चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥
अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये । बैमान होऊं नये । कोणी एक ॥३॥
सज्जनाशी विंटू नये । नीचासवे बांटू नये । तस्कराशी पुसूं नये । कोणी एक ॥४॥
भक्‍तिमार्ग खंडू नये । कुभांडयासी तंडूं नये । खळासंगे भांडू नये । कोणी एक ॥५॥
सत्पुरुषाशी छळूं नये । शिवेचा गुंडा डाळूं नये । केला नेम टाळू नये । कोणी एक ॥६॥
सद्‍गुरु सेवा सोडूं नये । कुलंधर्मासी मोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥७॥
संपत्‍ति आलिया माजू नये । अभिमाने फुगूं नये । सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥८॥
असत्यवाद करु नये । खोटा संग धरु नये । मोचकाशी मैत्री करु नये । कोणी एक ॥९॥
भलते भरी पडू नये । अनाचार करु नये । कपट मनी धरु नये । कोणी एक ॥१०॥
जन्मा आलिया स्वभावे । काही सार्थक करावे । ऐसे मनी विचारवे । कोणी एक ॥११॥
एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे । सदा हरिनाम उच्चारावे । कोणी एक ॥१२॥
विठ्ठलपर
कैसी समचरणींची शोभा । अवघा जगी विठ्ठल उभा ॥१॥
येणे विठ्ठले लाविले पिसे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥
पाहते पाहणीयामाझारी । पाहते गेले पाहण्यापरि ॥३॥
एकाजनार्दनी एकू । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥
 
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरीये ॥१॥
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करिता जाय महत्पाप ॥२॥
सनकसनंदन सम पुंडलिक । शोभा अलोलिक वर्णूं काय ॥३॥
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एकाजनार्दनी पायी लीन झाला ॥४॥
 
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥
जाय नेमें पंढरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥
आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखी ॥३॥
एकाजनार्दनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ॥४॥
 
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक बंधु आहे । त्याची ख्याती सांगू काये ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥
एकाजनार्दनी शरण । करी माहेरींची आठवण ॥५॥
 
माझ्या वडिलांचे दैवत । कृपाळू हा पंढरीनाथ ॥१॥
पंढरीसी जाऊं चला । भेंटू रखुमाई विठ्ठला ॥२॥
पुंडलिके बरवे केले । कैसे भक्‍तिने गोंविले ॥३॥
एकाजनार्दनी नीट । पायी जडलीसे वीट ॥४॥
मिश्र
 
सुखाची विश्रांती सुख समाधान । मनाचे उन्मन नाम गाता ॥१॥
ते हें नाम सोपे रामकृष्णहरि । प्रपंच-बोहरी उच्चारिता ॥२॥
अंहभाव व्देष नुरे ती वासना । व्दैताची भावना दुरी ठाके ॥३॥
एकाजनार्दनी नाम हे सोपारे । येणेचि पै सरे भवसिंधू ॥४॥
 
ॐ नमो सद्‍गुरु निर्गुणा । पारनाही तव गुणा । बसोनी माझिया रसना । हरिगुणा वर्णवी ॥१॥
हरिगुण विशाळ पावन । वदवी तू कृपा करुन । मी मूढमति दीन । म्हणोनि कीव भाकितसे ॥२॥
तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसे चरण । सद्‍गुरुचे आदरे ॥३॥
 
ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी संतसदनी राहिला ॥१॥
धन्य धन्य संतांचे सदन । जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ॥२॥
सर्व सुखांची सुख्रराशी । संतचरणी भुक्‍तिमुक्‍ति दासी ॥३॥
एकाजनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनी देव भुलले देखा ॥४॥
 
वैष्णवाघरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडोनी घातिला ॥१॥
देव म्हणे माझे पुरतसे कोडा । संगती या गोड वैष्णवांची ॥२॥
जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनी पाहे तव घराभीतरी ॥३॥
कीर्तनाची देवा आवडी मोठी । एकाजनार्दनी पडली मिठी ॥४॥
 
संतांच्या विभूती । धर्मलागी अवतरती ॥१॥
धर्मरक्षणाकारणे । साधु होताती अवतीर्णे ॥२॥
जगा लावावे सत्पथी । हेची साधूची पै कृती ॥३॥
एकाजनार्दनी साधु । हृदयी वसे ब्रह्मानंदु ॥४॥
 
देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥
नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥
पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥
आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥
 
भक्‍तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तथा तया माजी ॥१॥
प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमेविण नाही समाधान ॥२॥
रांडवेने जेवी श्रृगांरु केला । प्रेमेवीण जाला ज्ञानी तैसा ॥३॥
एकाजनार्दनी प्रेमे अतिगोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
 
जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परि तो अंतरी स्फटिक शुद्ध ॥१॥
वायांची हांव न धरी काही पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥
स्त्रियापुत्र धन नाही तेथे मन । इष्टमित्र कारण नाही ज्याचे ॥३॥
एकाजनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तया लागी ॥४॥
 
अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥२॥
एकाजनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥
 
पोटींचे बाळ अवगुणी वोखटे । परि मायबापा स्नेहो मोठे ॥१॥
तयापरि उदरा आलो जी स्वामी । अवगुणांच्यापरि नुपेक्षा तुम्ही ॥२॥
गुण नाही तेथे कर्म कैचे धड । परिमायबापा वाटतसे कोड ॥३॥
एकाजनार्दनी उद्‍भव साचे । म्हणोनि हरिदासा कौतुक त्याचे ॥४॥
 
शांतीचेनि मंत्रे मंत्रुनि विभूती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥
तेणे तळमळ हारपली व्यथा । गेली सर्व चिंता पुढीलांची ॥२॥
लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥
एकाजनार्दनी शांत जाहला देह । कामनीक देव प्रगटला ॥४॥
ओव्या
 
चतु:श्लोकी भागवत
भक्‍तिची लक्षणे (ओ.क्र.४०१-४०३) माझे नाम माझे स्मरण । माझी कथा माझे किर्तन । माझ्या चारित्रांचे पठण । गुणवर्णन नित्य माझे ॥ माझा जप माझे ध्यान । माझी पूजा माझे स्तवन । नित्य करिता माझे चिंतन । विषयध्यान विसरले ॥ भक्‍तांचे विषय सेवन । तेही करिता मदर्पण । या नाव भक्‍तीची अंगे जाण । स्वये नारायण विधीसी सांगे ॥
 
गुरुचे लक्षण (ओ.क्र.६९५-६९७)
शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन ।
तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान ।
ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान ।
सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥
 
शुकाष्टक
नातरी श्वेत कॄष्ण गाई । दोहोनी क्षीर मेळविता एके ठायी ।
केले तेथे भेदू नाही । वर्णावर्णाचा ॥
तैसे अद्वितीयेचा गावी । वर्णावर्ण पदवी ।
नसोनिया अनुभवी । सुखवस्ती वासु ॥
 
आंनदलहरी
सद्‍गुरु भक्‍तास बद्धता नाही (ओ.क्र.३९-४४)
जै पतंग भक्षी वडवानळासी । दर्दुरी गिळिजे शेषासी ।
जै खदयोते गिळिजे रविबिंबासी । तै गुरुभक्‍तांसी बद्धता ॥
जै वायसे युद्ध कीजे खगपतींसी । पिपिलिका सप्तसागर शोषी ।
कीं मुर्कुटे गिळिजे ब्रह्मांडासी । तै गुरुभक्‍तांसी बद्धता ॥
जै चित्रींचिया हुताशने । दग्ध होती महावने ।
कि रज्जूसर्पाचिया पाने । मृत्यु पावे कृतांतू ॥
कि मक्षिकाचेनि थडके । महागिरी पडो शके ।
किंवा प्रेताचेनि धाके । झडपोशके महाकाळ ॥
कि वांझेचेनि सुते । रणीं जिंकीजे इंद्राते ।
 
हस्तामलक
मुक्‍त कोण ? (ओ. क्र. ५१७ - ५२३)
जग भासे जे सकळ । तो जगदात्माचि निखळ ।
ऐसा निश्चयो ज्याचा प्रबळ । मुक्‍त केवळ तो एकु ॥
मी देहो नव्हे निश्चिते । अनात्मा न म्हणे कोणातें ।
विश्व मीचि परमार्थे । मुक्‍ती तया वोळगणी ॥
ज्याची नि:शेष आस तुटली । त्याचीचि अविदया निवटली ।
त्यासीचि शांती नि:शेष जाली । स्थिती वंदिली सदाशिवे ॥
ज्यासी नाठवे जन्मलेपण । देहत्वे देह न भेटे जाण ।
तो स्वप्नीही न देखे निजमरण । हे स्थिती संपूर्ण हरिहरां वंदय ॥
 
स्वात्मसुख
मायेचा उपकार (ओ.क्र.३३३-३४२)
माया अवघे म्हणती कुडी । परि ते मायेची उत्‍तमखोडी ।
स्वरुप आच्छादुनी गाढी । वाढवी श्रद्धा ॥
माया ब्रह्म राखे गुप्तता । यालागी आवडे समस्तां ।
मुमुक्षु अतिअवस्था । वैराग्यता श्रद्धाळू ॥
तेचि ब्रह्म प्रगट असते । तरी कोणीच त्याते न पुसते ।
अवघेचि उपेक्षिते । हेळणा करुनी ॥
सूर्य परब्रह्म प्रत्यक्ष दिसे । त्याते उपेक्षिती लोक जैसे ।
नमस्कारी श्रद्धा नसे । ब्रह्मासि पै तैसे होते ॥
अग्नि देवाचे निजमुख । त्यावरी पाय देऊनि घेती सेक ।
आळशी तेथ थुंकी थुंक । ब्रह्मासिही देख तैसे होते ॥
मनकर्णिका ब्रह्मजळ । तेथे करिती मूत्रमळ ।
एवं प्रत्यक्षासि केवळ । उपेक्षा होतसे ॥
तैसी परब्रह्माच्या अभक्‍ती । अवघ्या होती अधोगती ।
ते चुकविली निश्चिती । मायादेवी ॥
गौळणी
 
फणस जंबीर कर्दळी दाटा । हाती घेउनी नारंगी फाटा ॥१॥
वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥
राधा पाहुन भुलले हरि । बैल दुभे नंदाघरी ॥३॥
हरि पाहुनी भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥
मन मीनलेसे मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
 
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥
 
कशी जाऊं मी वॄंदावना । मुरली वाजवी कान्हा ॥धॄ॥
पैल तीरी हरि वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥
कांसे पितांबर कस्तुरी टीळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करु बाई कोणाला सांगु । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥
एकाजनार्दनी मनीं म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥
 
पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन ॥१॥
मोर मुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥
गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहीभात ॥३॥
एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा । गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
 
 
 
 
Copyright © Shantibrahma Shree Eknath Maharaj Mission, All Right Reserved.
Designed & Developed By : Xposure Infotech Pvt. Ltd.