॥ श्री एकनाथी भागवत ॥
अध्याय सहावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा ।
जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥
लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जनाचें अर्दन ।
यालागीं नामें जनार्दन । प्रगट जाण प्रसिद्धी ॥२॥
तुझी ऐशीच करणी । कर्म कर्ता नुरवूनि ।
सुखें नांदविसी जनीं । समाधानीं जनार्दना ॥३॥
सुखेंचि तुझें नाम घेतां । घातु करिसी जीविता ।
जीवु घेऊनि तत्वतां । होसी सर्वथा कृपाळू ॥४॥
तुझे नामाचें प्रबळ बळ । माथा नुधविती कळिकाळ ।
चारी मुक्ति केवळ । होती निश्चळ निजदासी ॥५॥
नामें एवढें ढसाळ देणें । त्या तुझें स्वरूप कवण जाणे ।
सांडूनि जाणणें नेणणें । निवांत राहाणें तत्वतां ॥६॥
तुझा स्तुतिवादु करणें । तंव परतलीं श्रुति पुराणें ।
तेथ माझें आरुष बोलणें । कोठें कोणें सारावें ॥७॥
तुझा स्तुतिवादु तें मौन । तुझा कळवळा तें कीर्तन ।
कांहीं न करणें तें अनुसंधान । साचार जाण श्रीकृष्णा ॥८॥
ऐशियाही तुझे ठायीं । अचाट हांव उठिली पाहीं ।
तेचि अर्थीं चित्त देई । कृपानिर्वाही गुरुराया ॥९॥
खद्योत प्रकाशूं पाहे चांदा । मशक गरुडासी घे खांदां ।
तैसा मी एकादशस्कंधा । मूर्ख नुसधा टीकार्थी ॥१०॥
येचि विषयीं गुरुनाथा । कृपा करावी सर्वथा ।
ग्रंथरचना ग्रंथार्था । सार्थकता करावी ॥११॥
ऐशी विनवणी ऐकतां । कृपापद्मकरु ठेविला माथां ।
तंव उद्योत्कार जाहला ग्रंथा । यथार्थता निजदीपें ॥१२॥
नवल कृपेची करणी । अर्थचिंतामणीची खाणी ।
उघडली तत्क्षणीं । पदार्थश्रेणी कविमुद्रा ॥१३॥
लेतां सिद्ध अलंकारा । कवण सांकडें लेणारा ।
ताल राखतां खांबसूत्रा । लेपाच्या करा प्रयास काय ॥१४॥
बापाचीं पक्वान्नें घेउनी । बाळ घाली बापाचे वदनीं ।
तेणें साचचि तो संतोषोनी । होय मनीं सुखाचा ॥१५॥
तैशीच हेही कथा । तूंचि ग्रंथु तूंचि कविता ।
तेथें कोणीं घ्यावी अहंता । ’मी कर्ता’ म्हणौनी ॥१६॥
गुरूनें सांडविली ’अहंता’ । शेखीं राहों नेदीच ’सोहंता’ ।
तेथ मी एकु कवि-कर्ता । हेंही सर्वथा न सरे पैं ॥१७॥
सूचितां अहंकाराचा झाडा । सूचनाचि होय त्याचा जोडा ।
जो आपणियातें म्हणवी वेडा । तोचि गाढा अतिचतुर ॥१८॥
तैशीच हेही होईल वार्ता । यालागीं श्रीगुरुनाथा ।
चरणीं ठेविला माथा । कर्ता करविता तूंचि तूं ॥१९॥
मागील ग्रंथसंगती । पंचमाध्यायाचे अंतीं ।
नारद वसुदेवाप्रती । बोलिला उपपत्ति ते ऐशी ॥२०॥
हा परमात्मा श्रीहरी । लीलाविग्रहें देहधारी ।
अवतरला तुमचे घरीं । भाग्यें करी नटनाट्य ॥२१॥
हा ईशाचाही निजईशु । वैकुंठींचा निजवासु ।
परमात्मा परेशु । जगदीशु श्रीकृष्णु ॥२२॥
तेंचि नारदवचनप्रमाण । प्रार्थावया श्रीकृष्ण ।
मिळवोनियां देवगण । द्वारकेसी जाण स्वयें आले ॥२३॥
श्रीशुक उवाच ।
अथ ब्रह्मात्मजैः देवैः प्रजेशैरावृतोऽभ्यगात् ।
भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ॥ १ ॥
शुक म्हणे परीक्षिती । पहावया श्रीकृष्णमूर्ती ।
सुरवर द्वारकेसी येती । विचित्र स्तुति तिंहीं केली ॥२४॥
श्रीकृष्णमूर्तीचें कवतिक । पहावया देव सकळिक ।
चतुर्मुख पंचमुख । वेगें षण्मुख पातले ॥२५॥
करावयास प्रजाउत्पत्ती । पूर्वीं नेमिला प्रजापती ।
तोही आला द्वारकेप्रती । कृष्णमूर्ती पहावया ॥२६॥
सनकादिक आत्माराम । अवाप्तसकळकाम ।
तेही होऊनि आले सकाम । मेघश्याम पहावया ॥२७॥
भूतनायक रुद्रगण । आले अकराही जण ।
पहावया श्रीकृष्ण । भूतगणसमवेत ॥२८॥
पहावया श्रीकृष्णरावो । घेऊनि गणांचा समुदावो ।
द्वारके आला महादेवो । भूतभविष्यांचा पहा हो त्रिकाळज्ञाता ॥२९॥
श्रीकृष्णदर्शनाची उत्कंठा । थोर लागली नीलकंठा ।
धांवतां मोकळ्या सुटल्या जटा । कृष्णवरिष्ठा पहावया ॥३०॥
इन्द्रो मरुद्भिर्भगवानादित्या वसवोऽश्विनौ ।
ऋभवोऽङ्गिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवताः ॥ २ ॥
गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धचारणगुह्यकाः ।
ऋषयः पितरश्चैव सविद्याधरकिन्नराः ॥ ३ ॥
द्वारकामुपसञ्जग्मुः सर्वे कृष्णदिदृक्षवः ।
एकुणपन्नास मरुग्दण । तेणेंसीं इंद्र आला आपण ।
पहावया श्रीकृष्ण । स्वयें जाण सादर ॥३१॥
सांडोनियां रविमंडळ । बारा आदित्यांचा मेळा ।
पहावया कृष्णसोहळा । तृषित डोळां होऊनि आले ॥३२॥
सूर्य अधिष्ठिला डोळां । देखे पदार्थां सकळां ।
कृष्ण न देखतां आंधळा । सूर्यो पावला अंधत्व ॥३३॥
पाहतां श्रीकृष्णाचें मुखकमळ । फिटलें सूर्याचें पटळ ।
मग देखणा झाला केवळ । सर्वांगें सकळ स्वयें रवि ॥३४॥
तिन्ही अग्नी तेजाळे । परी ते धूमें झांकोळले ।
कृष्ण देखतांच उजळले । निर्धूम जाहले निजतेजें ॥३५॥
आठां वसूंचा मेळा । पाहों आला कृष्णलीला ।
म्हणे मदनाचा पुतळा । तंव तो खेळे लील कृष्णांकीं ॥३६॥
अश्विनीकुमार धन्वंतरी । तेही भवरोगें पीडिले भारी ।
कृष्णदर्शनामृतकरीं । निरुज क्षणावरी ते जाहले ॥३७॥
ऋषभदेव अंगिरस । रुद्र मीनले असमसाहस ।
विश्वे-साध्यदेव बहुवस । देवीं आकाश दाटलें ॥३८॥
आमुची गायनकळा मोठी । होतें गंधर्वांच्या पोटीं ।
ते कृष्णवेणुगीतासाठीं । जाहली शेवटीं न सरती ॥३९॥
यालागीं दर्शनाची आस । क्षणक्षणां पाहती वास ।
त्यांसी गायनकळा सावकाश । दिधली सुरस कृपामात्रें ॥४०॥
अप्सरा म्हणती आम्ही नाचणी । तंव काळियाच्या फणारंगणीं ।
एकेचि तालें लाजवूनी । तत्क्षणीं सांडिल्या ॥४१॥
त्या दीनवदना कामिनी । आल्या दर्शनालागोनी ।
नाचों शिकविल्या नाचणी । रासरंगणीं भृकुटिमात्रें ॥४२॥
पहावया श्रीरंग । आले पाताळींचे पन्नग ।
सिद्ध चारण अनेग । विद्याधर साङ्ग समुदायें ॥४३॥
कश्यपादि ऋषीश्वर । अर्यमादि पितर ।
गुह्यक आणि किन्नर । आले अपार स्वगणेंसीं ॥४४॥
एवं विमानांचिया पंक्तीं । दाटलिया द्वारकेप्रती ।
पहावया कृष्णमूर्ती । आले सुरपती स्वानंदें ॥४५॥
वपुषा येन भगवान्नरलोकमनोरमः ।
यशो वितेने लोकेषु सर्वलोकमलापहम् ॥ ४ ॥
जेणें शरीरें श्रीहरी । नाना चरित्रांतें करी ।
यश विस्तारिलें संसारीं । दुराचारी तरावया ॥४६॥
ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । चतुर्विध प्रायश्चितांची गती ।
खुंटली जी निश्चितीं । श्रवणार्थीं सादर जाहलिया ॥४७॥
भावें घेतलिया श्रीकृष्णनाम । सकळ पातकां करी भस्म ।
देवीं देखिला पुरुषोत्तम । विश्रामधाम जगाचें ॥४८॥
ठाणठकारें अतिउत्तम । सुरनरांमाजी मनोरम ।
डोळ्यां जाहला विश्राम । मेघश्याम देखोनी ॥४९॥
मुकुटकुंडलें मेखला । कांसे कसिला सोनसळा ।
कंठीं रुळे वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥५०॥
लावण्यगुणनिधान । अवतारमाळे मुख्य रत्न ।
देवीं देखिला श्रीकृष्ण । निवासस्थान द्वारका ॥५१॥
तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्द्धिभिः ।
व्यचक्षतावितृप्ताक्षाः कृष्णमद्भुतदर्शनम् ॥ ५ ॥
कृष्णें अधिष्ठिली पुरी । कनककळसांचिया हारी ।
रत्नें जडिलीं नाना कुसरीं । तेज अंबरीं न समाये ॥५२॥
जे द्वारकेभीतरीं । कामधेनु घरोघरीं ।
कल्पद्रुमांचिया हारी । खेळणीं द्वारीं चिंतामणींचीं ॥५३॥
द्वारकाजननिवासियांसी । घरीं नवरत्नांचिया राशी ।
ऋद्धिसिद्धि करूनि दासी । हृषीकेशी नांदतु ॥५४॥
कृष्णरूपाचिया लालसे । डोळ्यां तेणें लाविलें पिसें ।
आवडी जाहले मोरपिसें । अतिडोळसें हरिअंगीं ॥५५॥
कैसी बरवेपणाची शोभा । पाहतां नयनीं निघती जिभा ।
रसाळपणें तो वालभा । उपनिषद्गाभा साकारला ॥५६॥
कृष्ण पहावया आवडी । होताहे देवांसी वरपडी ।
डोळ्यां थोर लागली गोडी । अर्ध घडी न विसंबती ॥५७॥
कृष्णरूपाचें कवतुक । पाहतां नयनां लागली भूक ।
अंतरीं निबिड दाटलें सुख । तरी अधिकाधिक भुकेले ॥५८॥
अवलोकितां श्रीकृष्णासी । दृष्टीसी दाटणी होतसे कैशी ।
मुंडपघसणी न्याहारासी । हृषीकेशी पहावया ॥५९॥
मागें पुढें श्रीकृष्णासी । देखणेनि वेढिलें चौंपाशीं ।
भाग्य उपजलें डोळ्यांसी । पूर्णपुरुषासी देखती ॥६०॥
श्रीकृष्ण घनमेघ सांवळा । निजात्मभावें पाहतां डोळां ।
सहजें श्यामता आली बुबुळा । कृष्णकळा ठसावली ॥६१॥
जो न कळेचि वेदविवंचना । योगियांच्या न ये ध्याना ।
त्या प्रत्यक्ष देखोनि कृष्णा । भाग्यगणना अपूर्व ॥६२॥
ऐसा देखोनियां श्रीहरी । देव सुमनांच्या शतधारीं ।
बहु वरुषले पै अंबरीं । राहोनि वरी विमानीं ॥६३॥
स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैश्छादयन्तो युदूत्तमम् ।
गीर्भिश्चित्रपदार्थाभिस्तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥ ६ ॥
मांदार पारिजात संतान । कल्पद्रुम हरिचंदन ।
ऐशिया वृक्षांचीं सुमनें जाण । कृष्णावरी संपूर्ण वरुषले ॥६४॥
श्रीकृष्णासी चहूंकडां । दिव्य सुमनांचा जाहला सडा ।
समस्त देवीं सन्मुख पुढां । केला पैं गाढा जयजयकारु ॥६५॥
सार्थ पदबंधरचना । नाना गद्यपद्यविवंचना ।
स्तवूं आदरिलें यदुनंदना । अमरसेना मिळोनी ॥६६॥
श्रीदेवा ऊचुः ।
नताः स्म ते नाथ पदारविन्दं बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभिः ।
यच्चिन्त्यतेऽन्तहृदि भावयुक्तैर्मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥ ७ ॥
विवेकयुक्त प्राणधारणा । मनसा वाचा कर्मणा ।
नमस्कारु तुझिया चरणां । सच्चिद्धना श्रीकृष्णा ॥६७॥
इंद्रियउपरमालागीं जाणा । सांडूनि विषयवासना ।
दश इंद्रियीं लागलों चरणां । नमन श्रीकृष्णा निजभावें ॥६८॥
विषयीं होऊनियां उदास । सांडोनि संसाराची आस ।
चरण चिंतिती तापस । कर्मपाश छेदावया ॥६९॥
ऐसे मुक्तीचिया वासना । मुमुक्षु चिंतिती चरणां ।
त्यांसी अर्धक्षण न येसी ध्याना । दृढ भावना करितांही ॥७०॥
ते प्रत्यक्ष तुझे चरण । आम्हांसी झालें जी दरुषण ।
देव आपुल्या भाग्या आपण । अतिस्तवन करिताति ॥७१॥
देखूनि सगुण स्वरूपासी । एवढी श्लाघ्यता कां म्हणसी ।
जें आलें आकारासी । तें निश्चियेंसी मायिक ॥७२॥
जैसे तुम्ही शरीरधारी । तैसाच मीही एकु शरीरी ।
त्या माझेनि दर्शनेंकरीं । तुम्ही कैशापरी तराल ॥७३॥
ऐसें न म्हणावें जी अनंता । तूं मायेचा नियंता ।
हेंही कळलें असे तत्वतां । समूळ कथा परियेसीं ॥७४॥
त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं । व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्गुणस्थः ।
नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै । यत्स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥ ८ ॥
झोंप लागल्या झोंप न दिसे पाहीं । जागें जाहल्या दिसतचि नाहीं ।
तैसी माया अतर्क्य देहीं । न पडे ठायीं सुरनरां ॥७५॥
मूळींच तुझी अतर्क्य माया । तिसी गुणक्षोभु जाहला साह्या ।
ते ब्रह्मादिकां न येचि आया । देवराया श्रीकृष्णा ॥७६॥
तूं धरोनि दैवीमायेसी । ब्रह्मादिकांतें सृजिसी ।
प्रतिपाळोनि संहारिसी । तूं त्या कर्मासी अलिप्त ॥७७॥
स्वप्नीं स्वयें सृष्टि सृजिली । प्रतिपाळूनि संहारिली ।
ते क्रिया कर्त्यासी नाहीं लागली । तेवीं सृष्टि केली त्वां अलिप्तत्वें ॥
७८॥
मृगजळाची भरणी । सूर्य करी निजकिरणीं ।
शोषूनि ने अस्तमानीं । अलिप्तपणीं तैसा तूं ॥७९॥
समूळ धर्माची वाढी मोडे । अधर्माची शीग चढे ।
तैं तुज अवतार धरणें घडे । आमुचें सांकडें फेडावया ॥८०॥
करोनि अधर्माचा घातु । धर्म वाढविशी यथस्थितु ।
देवांसी निजपदीं स्थापितु । कर्मातीतु तूं श्रीकृष्णु ॥८१॥
तुज अखंडदंडायमान । आत्मसुखाचें अनुसंधान ।
तें आम्हांसी नाहीं अर्ध क्षण । दीनवदन यालागीं ॥८२॥
ज्यासी आत्मसुख निरंतर । तो देहधारी परी अवतार ।
त्याचे चरण पवित्रकर । गंगासागर आदि तीर्थांसी ॥८३॥
तो जरी वर्ते गुणांआंतु । तरी तो जाणावा गुणातीतु ।
त्याचा चरणरेणु करी घातु । त्रैलोक्यांतु महापापां ॥८४॥
ऐशी तुझ्या दासांची कथा । त्या तुझे चरण वंदूं माथा ।
असो चरणांची हे कथा । कीर्ति ऐकतां निजलाभु ॥८५॥
चरण देखती ते भाग्याचे । त्यांचें महिमान न वर्णवे वाचे ।
पवित्रपण तुझिये कीर्तीचें । परिस साचें स्वामिया ॥८६॥
अग्निशिखा समसमानीं । इंधन घलितां वाढे अग्नी ।
आशा वाढे देहाभिमानीं । श्रवणकीर्तनीं ते त्यागवी ॥८७॥
शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां । विद्याश्रुताध्ययनदानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषभ ते यशसि प्रवृद्ध । सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥ ९ ॥
कृष्णस्तवनें स्तविता तरे । श्रवणद्वारें ऐकता उद्धरे ।
यालागीं स्तव्य तूंचि निर्धारे । स्तवनद्वारें तारकु ॥८८॥
एवं तुझे कीर्तीचें श्रवण । तेंचि परम शुद्धीसी कारण ।
यावेगळें जें साधन । तें केवळ जाण प्रयास ॥८९॥
ऐकें गा सुरवरिष्ठा । तुझिया श्रवणाची उत्कंठा ।
अंतरीं पापाचा मळकटा । धुवोनि चोखटा करी वृत्ती ॥९०॥
तुझ्या श्रवणीं होऊनि उदास । तपें तपतां तापस ।
नाना साधनीं कर्कश । जाहल्या निरस मती त्यांच्या ॥९१॥
’मंत्रविद्याग्रहण’ । विकळ उच्चारितां वर्ण ।
शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगीं वाजे ॥९२॥
करितां ’शास्त्रश्रवण’ । चौगुणां गर्व चढे पूर्ण ।
तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निघे जाण चतुर्मुखा ॥९३॥
करितां ’वेदाध्ययन’ । विस्वर गेलिया उच्चारण ।
शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुराऐसें ॥९४॥
’दान’ देतां नृग बहुवस । कृपीं जाला कृकलास ।
प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥९५॥
’तप’ करितां ऋष्यशृंगारासी । तो वश जाहला वेश्यांसी ।
श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकांसी पैं नाहीं ॥९६॥
’कर्म’ करावें यथानिगुती । तंव त्या कर्माची गहन गती ।
प्राचीनबर्ह्याची कर्मस्थिती । नारदोक्तीं सांडविली ॥९७॥
कर्मीं आचमन करावें । तेथ माषामात्र जळ घ्यावें ।
न्यूनाधिकत्वासवें । दोष पावे सुरापानसम ॥९८॥
एवं दुष्टहृद्य ज्यासी । तपादिक साधनें त्यासी ।
शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥९९॥
श्रवणें परीक्षिती तरला । श्रवणें क्रौंच उद्धरिला ।
मकरोदरीं श्रवण पावला । सिद्ध जाहला मत्स्येंद्र ॥१००॥
तुझें श्रवण दोपरी । एक तें चित्तशुद्धी करी ।
दुसरें जीवब्रह्मऐक्य करी । दोंहीपरी उद्धारु ॥१॥
प्रत्यक्ष पाहतां वाराणसी । श्रवणीं तारक ब्रह्म उपदेशी ।
मुक्तिक्षेत्र जाहली काशी । श्रवणें जीवासी उद्धारु ॥२॥
तूं अवाप्तसकळकाम । निष्कामाचें निजधाम ।
ऐशिया तुज करणें कर्म । भक्तभ्रम छेदावया ॥३॥
नाना चरित्रांची करणी । करिता झालासी चक्रपाणी ।
मोक्षमार्गाची निजश्रेणी । दिधली रचूनि जनासी ॥४॥
चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तिश्रवण ।
येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥५॥
अपेक्षा जें जें साधन साधिलें । तें तें अपेक्षेनेंचि फोल केलें ।
निरपेक्षाचें हृदय भलें । वेगीं गेलें परमार्थीं ॥६॥
हृदयाचे सखोल आळा । स्वधर्मबीजें अंकुरला ।
श्रद्धेचा वेल उगवला । कोंभ निघाला तरितरितु ॥७॥
सच्छ्रवणप्रबळजळें । रुतलीं वैराग्यदृढमूळें ।
वेगीं गेलीं निजबळें । श्रद्धामेळें चिदाकाशीं ॥८॥
ते चिदाकाशींचा चंद्रमा । स्वप्रकाश तूं पुरुषोत्तमा ।
साधक शिणती मेघश्यामा । तुझी प्रतिमा पहावया ॥९॥
त्यां तुझे श्रीचरण । प्रत्यक्ष जाहलें दर्शन ।
घालोनियां लोटांगण । चरणस्तवन करिताती ॥११०॥
स्यान्नस्तवाङ्घ्रिरशुभाशयधूमकेतुः । क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः ।
यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्भिः । व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥ १० ॥
आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु ।
तुझाचि जी विख्यातु । त्रैलोक्यांतु श्रीकृष्णा ॥११॥
पापइंधनाचा मेळु । तेथ तुझा चरण वडवानळु ।
लागतां तो अतितेजाळु । तिळेंतिळु जाळितु ॥१२॥
ऐसा पापियांतें कांपविता । प्रेमळांतें अभयदाता ।
तुझा चरण जी अनंता । हृदयीं सर्वथा वाहताति ॥१३॥
तेंचि हृदय जी कैसें । वोळलें भक्तिप्रेमरसें ।
तेथ तुझे चरण सावकाशें । अतिउल्हासें वाहताति ॥१४॥
करितां चरणाचें ध्यान । जे विसरले भूकतहान ।
त्यांसी द्यावया अभयदान । चरणध्वजु जाण पैं तुझा ॥१५॥
तोचि चरण सात्वतीं । पावावया समविभूती ।
पूजिला जी श्रीपती । चतुर्मूती व्यूहरूपें ॥१६॥
’वासुदेव’ ’संकर्षण’ । ’अनिरुद्ध’ आणि ’प्रद्युम्न’ ।
हाचि चतुर्व्यूह जाण । पूजास्थान भक्तांचें ॥१७॥
भिन्न भिन्न चारी व्यक्ती । चहूं रूपीं एक मूर्ती ।
ऐसें जाणोनि पूजिजे भक्तीं । ’व्यूहस्थिति’ त्या नांव ॥१८॥
’सात्वत’ म्हणिपती ते भक्त । भगवत्पदऐश्वर्यातें वांछित ।
चतुर्व्यूहरूपें पूजित । ऐश्वर्यीं चित्त ठेवूनी ॥१९॥
जन्ममरणप्रवाहस्थिती । नासावया एक भक्तीं ।
पूजा कीजे चतुर्मुर्ती । आत्मवंती सज्ञानीं ॥१२०॥
त्रिषवण* त्रिकाळ । पूजा करितां अविकळ । [*तीन सवने]
भजोनि जिंतिला कळिकाळ । जन्ममूळ छेदावया ॥२१॥
आणिकही भक्तजन । तुझें करिताति भजन ।
यज्ञद्वारा होमहवन । विधि विधान वेदोक्त ॥२२॥
यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ । त्रय्या निरुक्तविधिनेश हविर्गृहीत्वा ।
अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां । जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥ ११ ॥
दीक्षाग्रहणीं अतिसादर । यज्ञद्वारा भजनतत्पर ।
क्रियेपासोनि नेमिले कर । हस्तव्यापार न करिती ॥२३॥
तेथ वेदत्रयीची विधानकळा । बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा ।
आंत यज्ञपुरुष आव्हानिला । चैतन्यतेजाळा सर्वात्मा ॥२४॥
तेथ ओंकार वषट्कार । लक्षणोक्त मंत्रउच्चार ।
द्रव्यें अर्पिती अपार । अतिपवित्र अवदानीं ॥२५॥
आणिक एक योगयुक्त । योगधारणा तूतें भजत ।
प्राणापानांची समता देत । आसनस्थ होऊनियां ॥२६॥
वज्रासनीं दृढ बंध । भेदोनि षट्चक्रांचे भेद ।
कुंडलिनीचा स्कंध । अतिसुबद्ध थापटिला ॥२७॥
ते खवळली महाशक्ती । वेगें चालिली ऊर्ध्वगती ।
पवन प्राशूनि ग्रासिती । योगस्थिती गगनातें ॥२८॥
शोषूनि सहस्त्रदळाचे पाट । आटपीठ आणि गोल्हाट ।
क्रमोनियां श्रीहाट । आली अतिउद्भट ब्रह्मस्थाना ॥२९॥
तेथ परमानंदाचा भोग । शिवशक्तींचा संयोग ।
यापरी अभ्यासोनि योग । हा भजनमार्ग योग्यांचा ॥१३०॥
तुझी जाणावया माया । एक भजों लागले तुझिया पाया ।
सर्वथा अतर्क्य तुझी माया । देवराया श्रीकृष्णा ॥३१॥
माया न लक्षेचि लक्षितां । तोचि मायामोह जाहला चित्ता ।
मग ते सिद्धीलागीं तत्वतां । चरण भगवंता पूजिती ॥३२॥
आणिकही एक पक्ष । तुज भजावया मुमुक्ष ।
जाले गा अतिदक्ष । अध्यात्मपक्षनिजयोगें ॥३३॥
आत्ममायेचा नाशु । करावया जिज्ञासु ।
निजात्मबोधें सावकाशु । अतिउल्हासु पूजेचा ॥३४॥
विवेकाचिया भावना । नित्यानित्याची विवंचना ।
करूनि आणितां अनुसंधाना । सर्वत्र जाणा तूंचि तूं ॥३५॥
जें अनित्यपणें वाळिलें । मायिकत्वें मिथ्या जाहलें ।
मग चिन्मात्रैक उरलें । निर्वाळिलें निजरूप ॥३६॥
एवं पाहतां चहूंकडे । तुझेंचि स्वरूप जिकडे तिकडे ।
मग पूजिती वाडेंकोडें । निजसुरवाडें सर्वत्र ॥३७॥
जें जें देखती जे जे ठायीं । तें तें तुजवांचूनि आन नाहीं ।
ऐसा सर्वत्र चरण पाहीं । ठायींचा ठायीं पूजिला ॥३८॥
पर्युंष्टया तव विभो वनमालयेयं । संस्पार्धिनी भगवती प्रतिपत्नीवच्छ्रीः ।
यः सुप्रणीतममुयाहणमाददन्नो । भूयात्सदाङ्घ्रिरशुभाशयधूमकेतुः ॥ १२ ॥
ऐसे सर्वत्र तूतें पूजिती । भक्त पढियंते होती ।
त्यांची पूजा तेही अतिप्रीतीं । स्वयें श्रीपती मानिसी ॥३९॥
रानींची रानवट वनमाळा । भक्तीं आणूनि घातली गळां ।
रमा सांडोनि उताविळा । स्वयें भाळला माळेसी ॥१४०॥
भक्तीं अर्पिली आवडीं । म्हणौनि तियेची अधिक गोडी ।
शिळी जाहली तरी न काढी । अर्धघडी गळांची ॥४१॥
भक्तीं भावार्थें अर्पिली । देवें सर्वांगीं धरिली ।
यालागीं सुकों विसरली । टवटवीत सर्वदा ॥४२॥
तिचा आस्वादितां गंधु । भावें भुलला मुकुंदु ।
श्रियेसी उपजला क्रोधु । सवतीसंबंधु मांडिला ॥४३॥
मज न येतां आधीं । भक्तीं अर्पिली नेणों कधीं ।
मी तरुण सांडोनि त्रिशुद्धी । ते वृद्ध खांदीं वाहातसे ॥४४॥
देव नेणे भोगाची खूण । ती वृद्ध मी तरुण ।
परी तिशींच भुलला निर्गुण । गुणागुण हा नेणे ॥४५॥
मज चरण सेवा एकादे वेळां । हे सर्वकाळ पडली गळां ।
मजहूनि स्नेह आगळा । नेला वनमाळा सर्वथा ॥४६॥
मातें डावलूनि वेगीं । हे बैसली दोहीं अंगीं ।
इसीं बोलतो श्रीशार्ङ्गीं । मजचिलागीं त्यागील ॥४७॥
मज दीधली चरणांची सेवा । इचा मत्सरु किती सहावा ।
आपाद आवरिलें यादवा । माझी सेवा हरितली ॥४८॥
मी कुळात्मजा क्षीराब्धीची । हे रानट रानींची ।
खांदीं बैसली देवाची । भीड भक्तांची म्हणवूनि ॥४९॥
हे भक्तिबळें बैसली खांदीं । कंहीं नुतरेचि त्रिशुद्धी ।
रमा वनमाळेतें वंदी । द्वेषबुद्धी सांडोनी ॥१५०॥
ऐशी भक्तांची पूजा । तुज आवडे गरुडध्वजा ।
सुप्रणीत भावो वोजा । चरणीं तुझ्या अर्पिल्या ॥५१॥
तो चरणधूमकेतु तुझा । आमुच्या पापांतें नाशू वोजा ।
पुनः पुनः गरुडध्वजा । पापसमाजा निर्दळू ॥५२॥
करितां चरणांचें वर्णन । न धाये देवांचें मन ।
पुढपुढतीं चरणस्तवन । ध्वजलक्षण वर्णिती ॥५३॥
केतुस्त्रिविक्रमयुतस्त्रिपतत्पताको । यस्ते भयाभयकरोऽसुरदेवचम्वोः ।
स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन् । पादः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥ १३ ॥
बलिबंधनीं अनंता । त्रिविक्रमचरणु वाढतां ।
सत्यलोकाही वरुता । दिसे झळकता श्रीचरणु ॥५४॥
चरणु वाढला सर्वांवरी । तो ’केतु’ बोलिजे कवीश्वरीं ।
पताका झळकत कवणेपरी । सुरसरी निजगंगा ॥५५॥
बलिबंधनीं आवेश । चरण उचलिला दुराश ।
नखें भेदला आवरणकोश । जळ बहुवस चालिलें ॥५६॥
चरणस्पर्शें भगवंता । जाहली जीवनासी पवित्रता ।
ब्रह्मा कमंडलीं धरितां । शिवें माथां वाहिली ॥५७॥
चरणध्वजीं पताका ते गंगा । त्रिवाहिनी त्रिपथगा ।
चरणशोभा श्रीरंगा । नयनभृंगा उल्हासु ॥५८॥
केतु झळकलिया पाठीं । आसुरी सेनेसी भय उठी ।
दैवी संपत्तीचे पोटीं । अत्यंत उठी आल्हादु ॥५९॥
आणिक चरणाची कथा । देवांसी स्वर्गसुखदाता ।
तोच चरणु अधर्मवंतां । होय तत्वतां नरकहेतु ॥१६०॥
एक तरले चरण पूजितां । एक तरले चरण ध्यातां ।
चरण उपेक्षिती सर्वथा । अधःपाता ते जाती ॥६१॥
चरण वंदिती कां निंदिती । ते निजपदाप्रती जाती ।
सर्वथा जे उपेक्षिती । अधोगती तयांसी ॥६२॥
चरण वंदितां तरली शिळा । निंदितां उद्धरिलें शिशुपाळा ।
जे उपेक्षिती चरणकमळा । तयां खळां रौरव ॥६३॥
ऐकें स्वामिया व्यापका । ऐसा तुझा चरण निका ।
आमुच्या सकळ पातकां । क्षणार्थें देखा उद्धारु ॥६४॥
जेथ पापाचा जाहला उद्धारु । तेथ सहजचि खुंटला दुराचारु ।
ऐसा तरावया संसारु । चरण साचारु पैं तुझा ॥६५॥
नस्योतगाव इव यस्य वशे भवन्ति । ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः ।
कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य । शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥ १४ ॥
निजसुखातें विस्तारिता । तुझा चरण जी अच्युता ।
काळादिकर्माचा शास्ता । आत्मा नियंता देवाचा ॥६६॥
तूं काळाचा निजनियंता । काळासी अकाळें न करवे सत्ता ।
देवांसी अधिकारीं स्थापिता । देवनियंता तूं कृष्णा ॥६७॥
कर्मस्वामी तूं कृष्णनाथा । इंद्रियक्रिया समस्ता ।
कोणा न करवे अन्यथा । कर्मनियंता श्रीकृष्णा ॥६८॥
ब्रह्मादि शरीरधारी । तुज आधीन गा श्रीहरी ।
जैसे नाथिले बैल नांगरीं । कृषीवळू धरी स्वामित्वें ॥६९॥
तेथ जो राहे मागें पुढें । तो झोडिजे आसुडें ।
तुझे आज्ञेवरी रोकडे । वर्तती गाढे कळिकाळादिक ॥१७०॥
संसारलक्षण शेतासी । अधिकारीं जुंपोनि सर्वांसी ।
निजकर्में क्षेत्रासी । तूं वाहविसी निजाज्ञा ॥७१॥
रोंवोनि अहंकाराची मेढी । महत्तत्वांचें खळें झाडी ।
त्रिगुणदोरें बापुडीं । बांधिशी कडोविकडी जीवपशूंतें ॥७२॥
उदोअस्तांचेनि झणत्कारें । देतां निजकर्मांचे फेरे ।
जो खांदा चुकवोनि वोसरे । तोचि मारें मारिजे ॥७३॥
हा बोल जरी म्हणसी वायां । ’सृष्टिकर्त्री धरिती माया ।
मजसी संबंध नाहीं यया ’ । देवराया हें न म्हणें ॥७४॥
मायेसी तूं अधिष्ठान । यालागीं तूं परम कारण ।
तुझिये मांडीवरी जाण । क्रीडास्थान प्रकृतिपुरुषां ॥७५॥
तूं मायेहूनि अपारु । प्रकृतिपुरुषांहूनि परु ।
काळाचा काळ तूं दुर्धरु । सर्वसंहारुकर्ता तूं ॥७६॥
आमुच्या निजसुखा उत्तमा । तुझा चरणविस्तार मेघश्यामा ।
हेंचि मागों पुरुषोत्तमा । कृपा आम्हांवरी कीजे ॥७७॥
अस्यासि हेतुरुदयस्थितिसंयमानाम् । अव्यक्तजीवमहतामपि कालमाहुः ।
सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः । कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥ १५ ॥
जगाची उत्पत्ति स्थिति । तुजचिपासोनि श्रीपति ।
सकळ संहरिता अंतीं । तूंचि निश्चितीं महाकाळु ॥७८॥
क्षोभलिया तामसी शक्ती । सृष्टीचा प्रळय करी अंतीं ।
तेथें बीजरूपीं अव्यक्तीं । जीव राहती सूक्ष्मत्वें ॥७९॥
मग उत्पत्तीचे काळवेळे । तींच बीजें विरूढती सकळें ।
पाल्हेजती स्थितिकाळें । पुष्पफळें सफळित ॥१८०॥
’ हे गुणक्षोभाची अवस्था । तेथ मी नव्हें प्रळयकर्ता ’ ।
ऐसें म्हणसी जरी कृष्णनाथा । तरी हे कथा परियेसीं ॥८१॥
तुझा साचार जाहलिया भावो । माया महत्तत्व आणि जीवो ।
नासोनियां दास पाहा हो । निजपदीं निर्वाहो भोगिती ॥८२॥
त्या तुज सकळ संहारितां । कोण दुर्घटता कृष्णनाथा ।
कारणेंसी प्रळयकर्ता । तूंचि सर्वथा महाकाळु ॥८३॥
कळों नेदिसी संसारस्थिती । अतिसूक्ष्म काळगती ।
नाश करिसी अंतीं । निजप्रकृतिविकार ॥८४॥
प्रळयासी प्रमाण मूळ । लव निमेष घटिका पळ ।
अहोरात्र त्रिकाळ । ’त्रिनाभी’ केवळ जो म्हणिये ॥८५॥
ऐसिये गंभीर गतीसीं । मायामहत्तत्व नाशिसी ।
तो तूं ’महाकाळ’ होसी । हृषीकेशी श्रीकृष्णा ॥८६॥
त्वत्तः पुमान् समधिगम्य यया स्यवीर्यं । धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्यः ।
सोऽयं तयानुगत आत्मन आण्डकोशं । हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतम् ॥ १६ ॥
पुढतीं सृष्टीचा सृजिता । तूंचि होशी गा अनंता ।
ते उत्पत्तीची अवस्था । मूळकर्ता तूंचि तूं ॥८७॥
तुझी लाहोनि वीर्यशक्ती । होये पुरुषासी पुरुषत्वप्राप्ती ।
तेणें अंगीकारूनि प्रकृती । केलें उत्पत्ती गर्भाधान ॥८८॥
तेचि ते वेळीं प्रकृती । महत्तत्वीं होय गर्भवती ।
पंचतत्वेंसी गर्भीं धरिती । हिरण्यवर्ण अंडातें ॥८९॥
तें अमोघ वीर्य प्रबळ । गर्भीं विश्वाकार बाळ ।
धरिती जाहली वेल्हाळ । ब्रह्मांड सकळ अंडामाजीं ॥१९०॥
जैसें गर्भासी उल्ब जाण । तैसें अंडासी बहिरावरण ।
सप्तधा नेमस्त प्रमाण । तूं निर्माण करविता ॥९१॥
पृथ्वी जल अनल अनिल । नभ आणि अहंकार स्थूळ ।
सातवें तें अतिसबळ । जाण केवळ क्रियासूत्र ॥९२॥
त्या गर्भासी जतनेवरी । तूंचि आंतु आणि बाहेरी ।
रिघालासी सूत्रधारी । खांबसूत्र जैसा कां ॥९३॥
ऐसें जग जाहलें दोघांपासूनी । परी तिसरें न देखों कोणी ।
अवघी सृष्टी दोघाजणीं । दुमदुमुनी भरलीसे ॥९४॥
वाती लावूनि पाहतां । तिसरें न लगेचि हाता ।
दुसरी प्रकृती निर्धारितां । तेही सर्वथा टवाळ ॥९५॥
ऐसा दुजेनवीण एकला । एकलाचि विश्व जाहला ।
आकळीत कौशल्यकळा । मल्लमर्दना श्रीकृष्णा ॥९६॥
एवं एकलेपणें तूं कर्ता । त्यालागीं लेपु न लगे सर्वथा ।
कर्म करूनि तूं अकर्ता । तेचि कथा परियेसीं ॥९७॥
तत्तस्थूषश्च जगतश्च भवानधीशो । यन्माययोत्थगुणविक्रिययोपनीतान् ।
अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो । येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥ १७ ॥
चरें आणि अचरें । जंगमें आणि स्थावरें ।
या जगाचा स्वामी तूं निर्धारें । केलें खरें गतश्लोकीं ॥९८॥
तेंचि स्वामित्व कैसें घडे । हें जरी पुससी धडफुडें ।
तरी तेहीविखीं रोकडें । वचन गाढें अवधारीं ॥९९॥
निजमायेचेनि योगें । नाना विषय भोगिसी अंगें ।
तें भोगिलेपण अंगीं न लगे । अकर्तात्मसंगें अलिप्त ॥२००॥
तोचि अकर्तात्मबोधु कैसा । जरी म्हणशी हृषीकेशा ।
ते आगमनिगमां अतर्क्य दशा । परम पुरुषा परियेसीं ॥१॥
भोग्य-भोग-भोक्ता । या तिहींतें तूं प्रकाशिता ।
जेवीं घटीं बिंबोनि सविता । अलिप्तता स्वभावें ॥२॥
घट-जळ-प्रति-बिंबासी । स्वयें सविता प्रकाशी ।
प्रकाशूनि अलिप्त त्यांसी । तेवीं तूं भोगासी श्रीकृष्णा ॥३॥
अथवा कर्म-कार्य-कर्ता । या तिहींमाजीं निजात्मता ।
देखे तो अभोक्ता । भोगोनि तत्वतां निजभोग ॥४॥
दर्पणींच्या प्रतिबिंबासीं । जो प्रवर्तला भोगासी ।
व्यभिचाराचा आळ त्यासी । केवीं अंगासी लागेल ॥५॥
जगचि हें अवघें । जो होऊनि ठाके अंगें ।
त्यासी बाधावें कोणें भोगें । निजात्मयोगें योगिया ॥६॥
ऐशिया बोधाचेनि बळें । तो विषयावरी जरी लोळे ।
तरी विषयाचेनि विटाळें । बोधु न मैळे तयांचा ॥७॥
तो घेणें देणें करी । पाहतां दिसे व्यवहारी ।
नांदतांही घरदारीं । त्यामाझारीं तो नाहीं ॥८॥
नेणोनि बोधाची मागी । भोगत्याग केला योगीं ।
तरी कांपताति सर्वांगीं । वासना अंगीं उरलीसे ॥९॥
स्वप्नीं विषय देखती । जागे जाहल्या प्रायश्चित घेती ।
नाहीं मावळली अहंकृती । यालागीं भीती सर्वदा ॥२१०॥
ऐशिया जी विषयभेडा । नाहीं निजबोधु धडफुडा ।
तैसा नव्हेसी तूं निधडा । दिसे रोकडा निजबोधु ॥११॥
स्मायावलोकलवदर्शितभावहारि । भ्रूमण्डलप्रहितसौरतमन्त्रशौण्डैः ।
पत्न्यस्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैः । यस्येन्द्रियं विमथितुं करणैर्न विभ्व्यः ॥ १८ ॥
मी निधडा निजबोधें संपूर्ण । म्हणशी देखों न शके कवण ।
ये अर्थींचें उपलक्षण । ऐक ते खूण स्वामिया ॥१२॥
सोळा सहस्त्र पत्न्या घरीं । आणि गोकुळींच्या परनारी ।
कुब्जादि मथुरेमाझारीं । कर्णकुमारी भोगिल्या ॥१३॥
मुंजी नव्हतां आधीं । भोगिली त्वां गोंवळी पेंधी ।
धरोनियां सांदीबिदीं । नदोनदीं असंख्य ॥१४॥
अविधी भोगितां नारी । बोध न मैळेचि श्रीहरी ।
अंगें रिघालासी क्षीरसागरीं । अर्जुना करीं धरोनी ॥१५॥
शेषशायी नारायणा । उत्कंठा तुझिया दर्शना ।
तेणें उपावो केला जाणा । हरूनि ब्राह्मणाचीं बाळें ॥१६॥
जेवीं आपुलें स्वरूप आपण । पहावया कीजे दर्पण ।
तेवीं पहावया कृष्णार्जुन । स्वयें नारायण अपत्यें आणी ॥१७॥
’तूं अवतार नर-नारायण । तुझें घ्यावया दरुषण ।
ब्राह्मणअपत्यें जाण । म्यां आपण आणिलीं’ ॥१८॥
ऐसे नारायणाचे बोल । सप्रेम अतिसखोल ।
आम्हीं ऐकिले गा सकळ । तुझा बोध अकळ श्रीकृष्णा ॥१९॥
तीं ब्राह्मणाचीं अपत्यें । जीं बहु काळ जाहलीं होतीं मृतें ।
तुवां आणोनि दिधिलीं श्रीअनंतें । तीं देखलीं समस्तें चरितें आम्हीं ॥
२२०॥
तुझी नारायणासी आस्था । तेथ आमुची कवण कथा ।
पार न कळे जी अच्युता । गुणातीता श्रीकृष्णा ॥२१॥
मागां अवतार जाहले । परी ऐसें चरित्र नाहीं केलें ।
विधिवेदां लाजविलें । व्यभिचारियां दिधलें निजपद ॥२२॥
जें म्यां भोगिलें स्त्रियांसी । तें तूं उदासीनत्वें म्हणसी ।
तेणें बाध न पवे बोधासी । हृषीकेशी तें न घडे ॥२३॥
हावभावविलासेंसीं । अंगें दाविती चपळतेसी ।
तुज लक्षोनि पुरुषोत्तमासी । कामबाणासी योजिती ॥२४॥
वाऊनि भ्रमंडलाचे वेढे । व्यंकट कटाक्षें बाण गाढे ।
सुरतमंत्रीं रोकडे । केले धडफुडे सतेज ॥२५॥
ज्या बाणांचे घायीं । इंद्र खोंचला सहस्त्रां ठायीं ।
शिव लोळविला पाहीं । मोहिनीव्यामोहीं महाबाणें ॥२६॥
ज्या बाणाचा पिसारा । लागतांचि पैं भेदरा ।
तापसीं घेतला परा । सोडोनि घरदारा पळाले ॥२७॥
ऐसें सोळा सहस्त्र बाण । अखंड तुजचिवरी संधान ।
करितां न मैळे बोधु जाण । अतिविंदान हें तुझें ॥२८॥
घरींच्या स्त्रिया सहस्त्र सोळा । गोकुलादि मथुरेच्या अबळा ।
तुज विषयी करावया गोपाळा । नव्हती सकळा समर्था ॥२९॥
त्यांचेनि तुज न करवे विषयी । परी त्या त्वां केल्या निर्विषयी ।
ऐसा तूं त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी पाहीं श्रीकृष्णा ॥२३०॥
ऐशी तुझी कीर्ति ऐकतां । अथवा चरणतीर्थ घेतां ।
याचि दोंही तीर्थांची समर्थता । पवित्रता जगासी ॥३१॥
विभ्व्यस्तवामृतकथोदवहास्त्रिलोक्याः । पादावनेजसरितः शमलानि हन्तुम् ।
आनुश्रवं श्रुतिभिरङ्घ्रिजमङ्गसङ्गैः । तीर्थद्वयं शुचिषदस्त उपस्पृशन्ति ॥ १९ ॥
तुझिये कीर्तीचें श्रवण । आंतरमलाचें क्षालन ।
करूनियां वृत्ति जाण । परम पावन कीर्तनें ॥३२॥
तुझिया चरणींची गंगा । सकळ पातकें ने भंगा ।
ते पायवणी श्रीरंगा । पवित्र जगातें करी ॥३३॥
या दोंही तीर्थांचें सेवन । अखंड करिती साधुजन ।
तेणें होऊनि परम पावन । समाधान निजवृत्ती ॥३४॥
अवतारांचे अंतीं । ये दोनी तीर्थीं अतिविख्याती ।
प्रगट केली तुवां क्षिती । तारावया श्रीपती निजदासां ॥३५॥
एक श्रवणें एक स्नानें । दोनी तीर्थें परम पावनें ।
प्रगट केलीं जगज्जीवनें । मलिन जनें तरावया ॥३६॥
श्रीबादरायणिरुवाच ।
इत्यभिष्टूय विबुधैः सेशः शतधृतिर्हरिम् ।
अभ्यभाषत गोविन्दं प्रणम्याम्बरमाश्रितः ॥ २० ॥
शुक म्हणे परीक्षिती । यापरी देवीं समस्तीं ।
स्तविला स्वानंदें श्रीपती । परमभक्तिभावार्थें ॥३७॥
ऐसा करूनि स्तुतिवादु । संतोषविला गोविंदु ।
देवांसी होत असे आल्हादु । परम विनोदु सर्वांसी ॥३८॥
स्तुति करावया अग्रणी । ब्रह्मा शिव पुढें येऊनी ।
तिंहीं जय-जयकार करूनी । लोटांगणें घातलीं ॥३९॥
देव राहूनियां गगनीं । हात जोडोनि विमानीं ।
विनंती करावयालागोनी । ब्रह्मा पुढें राहोनी बोलतु ॥२४०॥
श्रीब्रह्मोवाच ।
भूमेर्भारावताराय पुरा विज्ञापितः प्रभो ।
त्वमस्माभिरशेषात्मन्तत्तथैवोपपादितम् ॥ २१ ॥
उतरावया धराभारा । पूर्वीं प्रार्थिलासी यदुवीरा ।
अभय द्यावया सुरवरां । आम्हीं श्रीधरा विनविलें ॥४१॥
आम्हीं विनविलें जैसें । तुवां कार्य केलें म्हणों तैसें ।
त्याहूनियां विशेषें । केली निजविन्यासें धर्मवृद्धी ॥४२॥
तूं सर्वेश्वरु सर्वात्मा । जें कार्य न कळेचि आम्हां ।
तेंही तुवां पुरुषोत्तमा । घनश्यामा संपादिलें ॥४३॥
धर्मश्च स्थापितः सत्सु सत्यसन्धेषु वै त्वया ।
कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्वलोकमलापहा ॥ २२ ॥
सत्यवादी साधु जे कांहीं । ज्यांचा संकल्प तुझ्या पायीं ।
धर्म स्थापिला त्यांच्या ठायीं । तुवां पाहीं यथस्थित ॥४४॥
आणिक दश दिशांप्रती । विस्तारिली उदार कीर्ती ।
तेणें पावन त्रिजगती । होय निश्चितीं श्रवणद्वारें ॥४५॥
अवतीर्य यदोर्वंशे बिभ्रद्रूपमनुत्तमम् ।
कर्माण्युद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथाः ॥ २३ ॥
पूर्णपुरुषा हृषीकेशी । तूं अवतरलासी यदुवंशीं ।
सीमा तुझिया रूपासी । बरवेपणासी न करवे ॥४६॥
तूं सर्वांमाजीं सर्वोत्तम । देखतां वृत्तींसी उपरम ।
लीलाविग्रही पुरुषोत्तम । मनोरम सकळिकां ॥४७॥
कर्में केलीं परमाभ्दुतें । गोवर्धन धरिला वाम हस्तें ।
मुखें प्राशूनि वणव्यातें । गोपाळांतें वांचविलें ॥४८॥
मृता आणिलें गुरुपुत्रासी । गत गर्भ भेटविले देवकीसी ।
गोपालवत्सें तूं जाहलासी । विधात्यासी भुलविलें ॥४९॥
जगाचिया परम हिता-। लागीं नाना चरित्रकथा ।
करिता जालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥२५०॥
यानि ते चरितानीश मनुष्याः साधवः कलौ ।
श्रृण्वन्तः कीर्तयंतश्च तरिष्यन्त्यञ्जसा तमः ॥ २४ ॥
कथाकौतुकें विचित्रें । नाना परींचीं चरित्रें ।
परम पावन पवित्रें । येणें अवतारें त्वां केलीं ॥५१॥
कलियुगीं साधुजन । या चरित्रांचें श्रवण कीर्तन ।
करितां तरले जाण । मायामोह त्रिगुणेंसीं ॥५२॥
यदुवंशेऽवतीर्णस्य भवतः पुरुषोत्तम ।
शरच्छतं व्यतीयाय पञ्चविंशाधिकं प्रभो ॥ २५ ॥
अवतरल्या यदुवंशीं । पुरुषोत्तमा हृषीकेशी ।
संख्या या अवतारांसी । जाहली ते तुजपाशीं सांगेन ॥५३॥
मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शत वर्षें जी गोविंदा ।
ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहलीं ॥५४॥
नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् ।
कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदिदम् ॥ २६ ॥
आतां पुढें येथ कांहीं । देवकार्य उरलें नाहीं ।
यादवकुळ म्हणसी तेंही । नष्टप्राय पाहीं उरलेंसे ॥५५॥
उठवणी आलें हतिरूं । कां पांख उपडिल्या पांखरूं ।
तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥५६॥
निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा ।
वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥५७॥
दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप ।
गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥५८॥
ततः स्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे ।
सलोकाँल्लोकपालान्नः पाहि वैकुण्ठकिङ्करान् ॥ २७ ॥
यालागीं जी यादवराया । आम्ही वांछूं तुझ्या पायां ।
वेगु कीजे स्वधामा यावया । सुरवर्या श्रीकृष्णा ॥५९॥
ऐकें देवकींनंदना । जरी मानेल तुझिया मना ।
तरी निघिजो जी याचि क्षणा । सुरसेना तिष्ठत ॥२६०॥
सलोक लोकपाळ जे जे । त्यांवरी तुवां कृपा कीजे ।
आम्ही किंकर गा तुझे । वचन मानिजे दासांचें ॥६१॥
ऐकें जी वैकुंठनाथा । तुझी थोर आम्हां अवस्था ।
आदिकरूनि उमाकांता । आणि समस्तां देवांसी ॥६२॥
श्रीभगवानुवाच ।
अवधारितमेतन्मे यदात्थ विबुधेश्वर ।
कृतं वः कार्यमखिलं भूमेर्भारोऽवतारितः ॥ २८ ॥
जो योगज्ञाना मुकुटमणी । मेघगंभीरया वाणी ।
ब्रह्मयाप्रती चक्रपाणी । हास्यवदनीं । बोलिला ॥६३॥
नादब्रद्म मुसावलें । कीं निजानंदाचें फळ पिकलें ।
तैसें श्रीमुखें बोलों आदरिलें । भाग्य उदेलें श्रवणांचें ॥६४॥
गौरवें म्हणे ’ब्रह्मदेवा । संतोषलों तुझिया भावा’ ।
पुत्रस्नेहेंकरूनि तेव्हां । उद्यत खेवा हरि जाला ॥६५॥
आवडीं म्हणे विबुधेंद्रा । सत्य तुझी वाङ्मुद्रा ।
तुझेनि वचनें ब्राह्मणेंद्रा । धराभारा उतरिलें ॥६६॥
सकळ कार्य निःशेख । म्यां संपादिलें देख ।
तरी उरलें असे एक । थोर अटक मजलागीं ॥६७॥
तदिदं यादवकुलं वीर्यशौर्यश्रियोद्धतम् ।
लोकं जिघृक्षद्रुद्धं मे वेलयेव महार्णवः ॥ २९ ॥
यद्यसंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् ।
गन्तास्म्यनेन लोकोऽयमुद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥ ३० ॥
हें यादवकुळ येथ । वीर्यशौर्यश्रियोद्धत ।
धर्म नाशावया उद्यत । अतिदृप्त निजबळें ॥६८॥
हे छेदूं पाहती धर्ममूळें । म्यां आवरिले असती योगबळें ।
जेवीं समुद्रातें मर्यादवेळें । असे राखिलें नेमूनी ॥६९॥
सांडोनि ऐशियांसी । मज गेलिया निजधामासी ।
हे प्रवर्ततील अधर्मासी । कोण यांसी वारील ॥२७०॥
जैसा निर्मर्याद सागरू । खवळल्या सर्वसंहारकरू ।
त्यासी कोण शकेल आवरूं । तैसा विचारू होईल ॥७१॥
हे अधर्मपर होतील गाढे । तुम्हांसी पडेल सांकडें ।
सांगों धांवाल मजपुढें । यांचें रोकडें गार्हाणें ॥७२॥
हे नाटोपती देवां । नाकळती दैत्यां दानवां ।
हें अधर्म करिती जेव्हां । तुम्हीच मज तेव्हां सांगों याल ॥७३॥
इदानीं नाश आरब्धः कुलस्य द्विजशापतः ।
यास्यामि भवनं ब्रह्मन् नेतदन्ते तवानघ ॥ ३१ ॥
यालागीं कुळनाशासी त्वरित । आजिपासोनि सुमुहूर्त ।
केला असे गा निश्चित । यथोचित यादवां ॥७४॥
ऐकें सखया प्रजापती । या कुळनाशाचिया अंतीं ।
तुझिया भुवनावरूनि निश्चितीं । निजधामाप्रती येईन ॥७५॥
ऐसें बोलिला प्रभू । ऐकोनि शंभु स्वयंभू ।
आनंदला देवकदंबू । समारंभू मांडिला ॥७६॥
जयजयकारु केला सकळीं । परमानंदें पिटिली टाळी ।
चरण वंदूनि वनमाळी । पुष्पांजळी अर्पिल्या ॥७७॥
श्रीशुक उवाच ।
इत्युक्तो लोकनाथेन स्वयम्भूः प्रणिपत्य तम् ।
सह देवगणैर्देवः स्वधाम समपद्यत ॥ ३२ ॥
शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि कृष्णवदंती ।
सुरवर आनंदले चित्तीं । आल्हादें करिती अभिवंदनें ॥७८॥
धाता सविता शूळपाणी । मिळोनियां देवगणीं ।
कृष्णासी घातल्या लोटांगणीं । चरण वंदूनी निघाले ॥७९॥
एवं वंदूनी श्रीपती । आपुलिया स्थानाप्रती ।
निघाल्या जी देवपंक्ती । पवनगती विमानें ॥२८०॥
अथ तस्यां महोत्पातान् द्वारवत्यां समुत्थितान् ।
विलोक्य भगवानाह यदुवृद्धान्समागतान् ॥ ३३ ॥
कुळनाशु करणें रोकडें । ऐसें कृष्णें नेमिलें धडफुडें ।
तंव द्वारकेसी येरीकडे । महोत्पात गाढे उठिले ॥८१॥
गगनीं निघाले त्रिकेतु । धूमकेतु दंडकेतु ।
शिखेसहित शिखाकेतु । गगनाआंतु उगवले ॥८२॥
माध्यान्हीं वाजला आघात । दिवसा उल्कापात होत ।
होत भूतें नागवीं नाचत । गगनाआंतु रुदती ॥८३॥
वृक जंबुक नगराआंत । दिवसा चौबारा कुंकात ।
नगरीं भालुवा भुंकत । जन कांपत देखोनी ॥८४॥
नगरा आंतुबाहेरी । श्वानांची रडणीं भारीं ।
मार्जारकलहो नगरीं । घरोघरीं होतेसे ॥८५॥
गाई आरडती मध्यरात्रीं । लेंकुरें खेळती झुंझारीं ।
माणसांतें झडपिती घारी । घुंघाती घरोघरीं दिवाभीतें ॥८६॥
वागीश्वरी क्षोभली गाढी । बोलीं म्हणती आली यमधाडी ।
कां रे धांवतां तांतडी । आगीं उडी घालूं पाहतां ॥८७॥
भूस्फोट भूमिकंप । अग्निकरणीं तपे आतप ।
वारेनि सोडिला अहा कंप । लागे झडप खरस्पर्शें ॥८८॥
धुळोरा उधळत नगरीं । रज भरे डोळ्यांमाझारीं ।
डोळा नुघडवे नरनारीं । दिशा चारी धुमधुमित ॥८९॥
ऐसे नाना परींचे उत्पात । नगरीं रुधिरवृष्टि होत ।
देखोनि यादव समस्त । भयचकित पैं जाहले ॥२९०॥
यादव मिळोनि थोर थोर । वृद्ध वृद्ध करिती विचार ।
ये चिन्हें अरिष्टकर । विघ्न थोर दिसतसे ॥९१॥
अवघे आले कृष्णापाशीं । वृत्तांत सांगती तयासी ।
उव्दिग्न देखोनि यादवांसी । हृषीकेशी बोलिला ॥९२॥
श्रीभगवानुवाच ।
एते वै सुमहोत्पाता व्युत्तिष्ठन्तीह सर्वतः ।
शापश्च नः कुलस्यासीद्ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः ॥ ३४ ॥
कृष्ण यादवांसी सांगत । दिवि-भू-अंतरिक्षगत ।
उठिले जे महोत्पात । सर्वगत सर्वदा ॥९३॥
देखोनियां चिन्हांसी । मजही आठवलें मानसीं ।
ब्राह्मणशाप यदुकुळासी । चिन्हें त्यासी सूचकें ॥९४॥
ब्राह्मणांचा शापु खरा । नुल्लंघवे हरिहरां ।
तुम्ही आतांचि विचार करा । नगराबाहिरा जनु काढा ॥९५॥
न वस्तव्यमिहास्माभिर्जिजीविषुभिरार्यकाः ।
प्रभासं सुमहत्पुण्यं यास्यामोऽद्यैव मा चिरम् ॥ ३५ ॥
येथोनि द्वारकेची वस्ती । आम्हीं सांडावी समस्तीं ।
जीवें जियावयाची चाड चित्तीं । तरी प्रभासाप्रती निघावें ॥९६॥
वेगीं करा रे तांतडी । आजचि निघा लवडसवडी ।
सांडा घरदारांची गोडी । येथ अर्धघडी न रहावें ॥९७॥
यत्र स्नात्वा दक्षशापाद् गृहीतो यक्ष्मणोदुराट् ।
विमुक्तः किल्बिषात्सद्यो भेजे भूयः कलोदयम् ॥ ३६ ॥
ऐका समस्त यादवश्रेष्ठ । प्रभासतीर्थ महावरिष्ठ ।
जेथिंचेनि स्नानें उडुराट । निस्तरला कष्ट क्षयाचे ॥९८॥
दक्षें निजकन्या चंद्रासी । सत्तावीस दिधल्या त्यासी ।
तो रतला रोहिणीसीं । येरां सर्वांसी उपेक्षुनी ॥९९॥
दक्षें शापिलें चंद्रासी । क्षयरोग लागला त्यासी ।
तेणें येऊनि प्रभासासी । स्नानदानासी पैं केलें ॥३००॥
स्नानमात्रें केवळ । क्षयरोग गेला तत्काळ ।
कळा पावला सकळ । शोभे निर्मळ निजतेजें ॥१॥
वयं च तस्मिन्नाप्लुत्य तर्पयित्वा पितॄन् सुरान् ।
भोजयित्वोशिजो विप्रान्नानागुणवतान्धसा ॥ ३७ ॥
आम्हीही तेथ स्नान दान । पितृतर्पण देवतार्चन ।
करूं ब्राह्मणपूजन । जे संपन्न श्रुति शास्त्रीं ॥२॥
नाना परींचीं पक्वान्ने । गुणाधिक्यें मिष्टान्ने ।
देवां ब्राह्मणांसी भोजनें । नाना दानें विधानोक्त ॥३॥
तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोप्त्वा महान्ति वै ।
वृजिनानि तरिष्यामो दानैर्नौभिरिवार्णवम् ॥ ३८ ॥
श्रद्धेचेनि नेटेंपाटें । पाहूनि दानपात्रें चोखटें ।
दान द्यावें गोमटें । भूमी वोलटे जेवीं बीज ॥४॥
ब्राह्मणाचें मुख तें क्षेत्र । पालवियेपेढीवीण पवित्र ।
ऐसें पाहूनि सुक्षेत्र । दानें विचित्र पेरावीं ॥५॥
विनीततेची सेल वोल । श्रद्धेचें चाडें निर्मळ ।
शमदमादि बैल सबळ । ते तात्काळ जुंपोनी ॥६॥
ऐशिया वोजा परी । बीज पेरिलिया क्षेत्रीं ।
पीक पिकेल घुमरीं । पुरुषार्थ चारी लगटोनी ॥७॥
त्या पिकाचेनि सबळें । पापें तरोनि पैं सकळें ।
जेवीं नावेचेनि बळें । समुद्रजळें तरिजेती ॥८॥
श्रीशुक उवाच ।
एवं भगवतादिष्टा यादवाः कुरुनन्दन ।
गन्तुं कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयूयुजन् ॥ ३९ ॥
शुक म्हणे कौरवनंदना । ऐकें परिक्षिति सज्ञाना ।
कृष्णें दिधली अनुज्ञा । तीर्थविधाना प्रभासा ॥९॥
यादव उठिले गाढे । रथीं जुंपिले जी घोडे ।
येर धांवती येरांपुढें । चहूंकडे लगबग ॥३१०॥
तन्निरीक्ष्योद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितम् ।
दृष्ट्वारिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः ॥ ४० ॥
थोर वीरांचे बोभाट । गजरथांचे घडघडाट ।
द्वारकेमाजीं न फुटे वाट । प्रयाण उभ्दट प्रभासासी ॥११॥
हडबडली देखोनि द्वारावती । ऐक राया परीक्षिती ।
उद्धवास आठवलें चित्तीं । कृष्णवदंती देवांसी ॥१२॥
कुळनाशासी त्वरित । आजीपासूनि सुमुहूर्त ।
तोचि देवें प्रस्तुत । कार्यार्थ निश्चित मांडिला ॥१३॥
उद्धव कृष्णासवें संतत । कृष्णानुमतें तो वर्तत ।
सुरसंवाद निश्चित । होता श्रुत तयासी ॥१४॥
असतां येथ कृष्णनाथ । द्वारकेमाजीं अतिउत्पात ।
उठिले तें मनोगत । जाण निश्चित कृष्णाचें ॥१५॥
यादव नेऊनि प्रभासासी । अर्धक्षणें नाशील यांसी ।
जावया निजधामासी । हृषीकेशी उद्यत ॥१६॥
म्हणाल ’कां नेले इतुके दुरी । नाशु न करीच द्वारकापुरी ’ ।
तरी तो सर्वज्ञ श्रीहरी । सूत्रधारी जाणता ॥१७॥
यादव देवांश निश्चितीं । सातवी पुरी द्वारावती ।
येथ निमाल्या सायुज्यमुक्ती । हें जाणोनि श्रीपति न नाशी ॥१८॥
यांसी आहे पदाभिमान । द्वारकेमाजीं न घडे निधन ।
हें जाणोनि जगज्जीवन । करवी प्रयाण प्रभासासी ॥१९॥
ब्रह्मशापाचें मूळ देखा । प्रभासासी निघाली ते येरिका ।
हें कळलेंसे यदुनायका । तेथ सकळिकां धाडिलें ॥३२०॥
स्वकुळ ग्रासोनि श्रीपती । निघेल निजधामाप्रती ।
हें जाणोनि उद्धव चित्तीं । बहुतां रीतीं कळवळला ॥२१॥
बाष्पें कंठ निरोधला । नेत्रीं अश्रूंचा पूर लोटला ।
स्वेदु सर्वांगीं चालिला । हृदयीं दाटला हुंदका ॥२२॥
कृष्णवियोग अर्ध क्षण । तेणें निघों पाहे प्राण ।
विसरला कार्य आठवण । कृष्णवदन निरीक्षी ॥२३॥
वियोगप्राप्तीचे बाण प्रबळ । हृदयीं रुतले अतिसबळ ।
बुद्धि धैर्येंसीं होती विकळ । जीवीं तळमळ लागली ॥२४॥
एकांत देखोनि श्रीकृष्णासी । धांवोनि लागला पायांसी ।
मिठी घालोनि चरणेंसीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥२५॥
विविक्त उपसङ्गम्य जगतामीश्वरेश्वरम् ।
प्रणम्य शिरसा पादौ प्राञ्जलिस्तमभाषत ॥ ४१ ॥
जो जगाचा नियंता । त्या काळाचा कृष्ण कळिता ।
त्याचे चरणीं ठेवूनि माथा । विनीतता बोलतु ॥२६॥
श्रीउद्धव उवाच ।
देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन ।
संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं सन्त्यक्ष्यते ।
भवान् विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन्न यदीश्वरः ॥ ४२ ॥
उद्धव म्हणे यादवेंद्रा । देवेंद्राच्या आदिइंद्रा ।
योगियांच्या प्रबोधचंद्रा । अकळ मुद्रा पैं तुझी ॥२७॥
देवांमाजीं इंद्र ईशु । त्या इंद्राचा तूं जगदीशु ।
योगियांमाजीं श्रेष्ठ महेशु । त्याचाही ईशु तूं श्रीकृष्णा ॥२८॥
तुझें जें श्रवणकीर्तन । तें पुण्यासी करी पावन ।
छेदी संसारबंधन । समाधान कीर्तनें ॥२९॥
संहारूनि निजकुळासी । सांडोनियां या लोकासी ।
निजधामा जावों पाहसी । हृषीकेशी निश्चित ॥३३०॥
नाहं तवाङ्घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव ।
त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि ॥ ४३ ॥
अन्यथा विप्रशापासी । करावया समर्थ होसी ।
तें न करूनि कुळ संहारिसी । निजधामासी जावया ॥३१॥
ऐसें बोलतां आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन ।
आसुवीं पूर्ण झाले नयन । धांवोनि चरण धरियेले ॥३२॥
माथा ठेविला चरणांवरी । सखा स्वामी तूं श्रीहरी ।
आम्हांसी सांडूनियां दुरी । कैशापरी जासील ॥३३॥
तुझिया प्रयाणाची वार्ता । ऐकतांचि गा अच्युता ।
उभड सांठवेना चित्ता । वियोग सर्वथा न व्हावा ॥३४॥
जळावेगळी मासोळी । तैसा जीवु तळमळी ।
निष्ठुर जाहलासी अंतकाळीं । वनमाळी मजलागीं ॥३५॥
तुज गेलियापाठीं । मी दीनवदन ये सृष्टीं ।
कोणासी सांगों गोड गोष्टी । श्वासु पोटीं न समाये ॥३६॥
निघोनि गोलिया आत्मा । प्रेतरूप उरे प्रतिमा ।
तुवां गेलियां निजधामा । तैसें आम्हां होईल ॥३७॥
तूंचि आम्हां जनक जननी । हा दृढ विश्वास आमुचे मनीं ।
केवीं जातोसी सांडोनि । म्हणोनि लोळणी घातली ॥३८॥
तूं निघालासी निजधामा । कोणासी निरविलें जी आम्हां ।
कां रुसलासी पुरुषोत्तमा । बोलु निजकर्मा आमुच्या ॥३९॥
मुकें बाळ सांडोनि क्षितीं । माता रिघों पाहे सती ।
तें जेवीं ये काकुळती । तैसी गती उद्धवा ॥३४०॥
गोडु गिळी आमिषकवळु । सवेंचि पारधी आंसुडी गळु ।
त्या मीनाऐसा विकळु । होय प्रेमळु उद्धव ॥४१॥
तुजगेलियावरी देवा । म्यां कोणाची करावी सेवा ।
कां रुसलासी गा यादवा । आमच्या दैवा निश्चित ॥४२॥
कांटवणे आड क्षितीं । आंधळें सांडूनि जाये सांगाती ।
तें ग्लानी करी वनांतीं । तैसी गती उद्धवा ॥४३॥
धांवधावों पायां पडे । धाय मोकलोनि रडे ।
मज सांडोनि तूंचि पुढें । कोणीकडे जातोसी ॥४४॥
मी नव्हें पायांवेगळा । क्षण नोसंडीं चरणकमळा ।
तुझें प्रयाण जी गोपाळा । अंतकाळा मज काळु ॥४५॥
तुझी थोर लागली सवे । मज न्यावें आपणासवें ।
हेंचि प्रार्थीतसे जीवेंभावें । कृपा यादवें मज कीजे ॥४६॥
तूं गरुडारूढ होसी । तेव्हां कृपेनें बैसवीं पाठीसीं ।
सांडों नको हृषीकेशी । निजधामासी मज नेईं ॥४७॥
सलगी दिधली जन्मवरी । अंतीं का त्यागिसी दुरी ।
कृपाळुवा श्रीहरी । कृपा करीं सर्वथा ॥४८॥
म्हणसी मी निजकुळासी काळु । तो तुज केवीं होईन कृपाळु ।
हें न म्हणें तूं दीनदयाळु । अतिस्नेहाळु भक्तासी ॥४९॥
तुझी कृपा भक्तांवरी । यालागीं मी सलगी करीं ।
मातें उद्धरीं श्रीहरी । झणें संसारीं सांडिसी ॥३५०॥
तव विक्रीडितं कृष्ण नृणां परममङ्गलम् ।
कर्णपीयूषमासाद्य त्यजन्त्यन्यस्पृहां जनः ॥ ४४ ॥
तुझी क्रीडा नाना खेळ । प्राणियांसी परम मंगळ ।
कर्णद्वारें वेल्हाळ । निजनिर्मळ सेविती ॥५१॥
तुझे कीर्तिश्रवणाचे आवडीं । लागली कर्णपीयूषीं गोडी ।
तेथ अमृताची चवी थोडी । होय अर्ध घडी न लागतां ॥५२॥
ऐशी ऐकतां तुझी कीर्ती । सवासना स्पृहा नासती ।
ते भक्तु तुज न विसंबती । हृदयीं वाहती सर्वदा ॥५३॥
त्या तुज प्रत्यक्ष श्रीकृष्णासीं । मज न साहवे वियोगासी ।
सवे लाविली आम्हांसी । सौजन्येंसीं स्वामित्वें ॥५४॥
शय्यासनाटनस्थान स्नानक्रीडाशनादिषु ।
कथं त्वां प्रियमात्मानं वयं भक्तास्त्यजेम हि ॥ ४५ ॥
तूं तंव आमुचा स्वामी होसी । मज अर्धांसनीं बैसविसी ।
मजवेगळें हृषीकेशी । निजगुजासी तुज नाहीं ॥५५॥
अचाट कार्य पडे थोर । तेव्हां मज पुससी विचार ।
मी सांगें जो जो मंत्र । तो साचार मानिसी ॥५६॥
जेव्हां भोजन करूं रिघसी । माझें ताट ताटेंसीं मांडिसी ।
जेवितां नाना विनोद करिसी । निजशेष देसी मजलागीं ॥५७॥
ब्रह्मादिकां न लभे पंक्ती । तो मी जेवीं तुझिया पांतीं ।
शेषविभागी जी श्रीपती । केलें निश्चितीं त्वां मज ॥५८॥
मातें धरोनियां हातीं । एकला बैससी एकांतीं ।
ब्रह्मादिकांची विनंती । तुजप्रती मी सांगें ॥५९॥
कळों नेदितां कोणासी । तुवां केलें रासक्रीडेसी ।
तें गुह्य सांगोनि मजपाशी । गोकुळासी धाडिलें ॥३६०॥
सेजेचे उठवूनि भीमकीसी । मज आपणाजवळ निजविशी ।
ते निद्रेचिया सुखासी । समाधि कायसी बापुडी ॥६१॥
ऐशिया तुझे संगतीं । रात्री भोगिल्या नेणों कितीं ।
त्या मज सांडोनि श्रीपती । जाणें निश्चितीं करितोसी ॥६२॥
वेळु न गमे चक्रपाणी । मज बोलवूं धाडिसी रुक्मिणी ।
सारीपाटु आम्हीं दोघीं जणीं । एकासनीं खेळिजे ॥६३॥
जेव्हां व्याहाळिये निघसी । मज आपुले रथीं बैसविशी ।
दोघां गमन एके रथेंसीं । आजि उबलासी सांघाता ॥६४॥
जळक्रीडा करितां जळीं । करितां गोपिकांसी रांडोळी ।
तेव्हांही मी तुजजवळी । स्नानकाळीं सर्वदा ॥६५॥
ऐसें सांगों मी किती । तुजगेवळा श्रीपती ।
नाहीं झालों अहोरातीं । केवीं म्यां अंतीं सांडावें ॥६६॥
तूं स्वामी सखा सर्वात्मा । जीवाचा जीव पुरुषोत्तमा ।
तुझा वियोगु मेघश्यामा । केवीं आम्हां साहवेल ॥६७॥
आमुचा जीवु आणि प्राण । ते तुझे गा श्रीचरण ।
ते वियोगदुःख साहावया जाण । समर्थपण मज नाहीं ॥६८॥
आमुचा हाचि लाभु अव्यंग । जे तुझिया पायांचा संयोग ।
त्यांचा न साहवे वियोग । देहभंग झालिया ॥६९॥
देह राहेल तरी राहो । अथवा जाईल तरी जावो ।
तुझ्या चरणांचा वियोग पहा हो । न शके साहों सर्वथा ॥३७०॥
थोर दुस्तर तुझी माया । ब्रह्मादिकां न ये आया ।
मज सुगम जाली तरावया । यादवराया निजशेषें ॥७१॥
त्वयोपभुक्तस्रग्गन्ध वासोऽलङ्कारचर्चिताः ।
उच्छिष्टभोजिनो दासास्तव मायां जयेम हि ॥ ४६ ॥
तुझें गंधशेष आणि माळा । धरितां कपाळीं आणि गळां ।
मी नागवें कळिकाळा । दास गोपाळ पैं तुझा ॥७२॥
तुझे कांसेचा पिंवळा । येऊनि माझे कांसे लागला ।
तैंचि कामु म्यां जिंतिला । दृढ जाहला निजकांसे ॥७३॥
तुवां आपुले हृदयींचें पदक । जेव्हां मज दिधलें देख ।
तेव्हांचि माया जाहली विमुख । दासां सन्मुख न राहे ॥७४॥
मायेसी असतें मुख । तरी हों लाहती सन्मुख ।
ते मिथ्या गा निःशेख । वृथा लोक भ्रमले पैं ॥७५॥
तुझें उच्छिष्ट सेवितां देख । लाजोनि जाये समाधिसुख ।
निडारला निजात्मतोख । शेषें प्रत्यक्ष निजलाभु ॥७६॥
ऐसा तुझेनि दास्यें सरता जाहला । तुझेनि निजशेषें चर्चिला ।
तुझी माया मी तरला । जिया धाकु लाविला योगियां ॥७७॥
वातवसना य ऋषयः श्रमणा ऊर्ध्वमन्थिनः ।
ब्रह्माख्यं धाम ते यान्ति शान्ताः सन्न्यासीनोऽमलाः ॥ ४७ ॥
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिघाले कपाटीं ।
जरी सांडिली लंगोटी । तरी पोटीं धाकती ॥७८॥
आसनस्थ होऊनि जाणा । आकळावया प्राणापाना ।
मूळबंधें आकोचना । दृढ धारणा ते करिती ॥७९॥
अंगुलें बारा बारा । जिणावया जी वारा ।
रात्रंदिवस शरीरा । अभ्यासद्वारा आटिती ॥३८०॥
क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ।
जिणोनियां सुखदुःख । अतिनेटक निधीं ॥८१॥
सुबुद्धि धरूनिया हातीं । आकळूनि इंद्रियवृत्ती ।
वैराग्यें करित ख्याती । ऊर्ध्वगती निघाले ॥८२॥
भेदोनि मणिकर्णिका वोवरी । उसळले जी ब्रह्मरंध्रीं ।
जिणोनियां ब्रह्मगिरी । निशाणभेरी लाविल्या ॥८३॥
तेथ शांतीचेनि योगें । विलसत सर्वांगें ।
संकल्पत्यागवेगें । जाहले अंगें चिद्ब्रह्म ॥८४॥
ऐसे योगबळें योगी । माया जिणती अंगोअंगीं ।
त्याहोनि अतिसुगम मार्गीं । आम्हांलागीं त्वां केली ॥८५॥
वयं त्विह महायोगिन् भ्रमन्तः कर्मवर्त्मसु ।
त्वद्वार्तया तरिष्यामस्तावकैर्दुस्तरं तमः ॥ ४८ ॥
भजावें तुझिया निजभक्तां । ऐकावी तुझी कथावार्ता ।
इतुकेनि तरलों जी सर्वथा । कृष्णनाथा निजमाया ॥८६॥
आम्हां कर्ममार्गींचिया कर्मठां । तुवां उपकारु केला मोठा ।
तुझ्या कथेचा श्रवणपाठा । मुक्त दारवंठा मोक्षाचा ॥८७॥
असो मोक्षाची कथा । चाड नाहीं गा सर्वथा ।
तुझ्या भक्तांसी तुझी कथा । करितां भवव्यथा न बाधीचि ॥८८॥
तुझे अभेद भक्तीचें कोड । आम्हां संसारुचि गोड ।
ठेंचूनि त्रिगुणांचें तोंड । भक्त प्रचंड भजताति ॥८९॥
स्मरन्तः कीर्तयन्तस्ते कृतानि गदितानि च ।
गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि यन्नृलोकविडम्बनम् ॥ ४९ ॥
तुझ्या चरित्राचें श्रवण । आवडीं करितां कीर्तन ।
त्यांचा भवबंध च्छेदन । बळेंचि जाण तूं करिशी ॥३९०॥
पुसोनिया संसारभावो । निजपदीं देसी ठावो ।
हा श्रवणकीर्तनलाभ पाहा हो । आम्ही सहजें लाहों निजभक्त ॥९१॥
स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभु होये तत्वतां ।
या तुझिये मुखींच्या कथा गातां । आपणियां देता तूं होशी ॥९२॥
तुझीं गोकुळींचीं गमनपदें । आवडीं वर्णिती जे आनंदें ।
त्यांसी खांदीं वाऊनि निजबोधें । कीर्तनच्छंदें नाचशी ॥९३॥
तुवां जे केली लीला । ते आवडी गातां जी गोपाळा ।
नित्य त्या सेवकांजवळा । अंगें अंगवळा तूं होशी ॥९४॥
तुझें वर्णिती जे हास्यवदन । त्या भक्ताचें तूं करिशी ध्यान ।
त्यांचेनि बोलें समाधान । स्त्रीशूद्रां जाण तूं देशी ॥९५॥
तुझें दृष्टीचें दर्शन । दृश्यातीत निरीक्षण ।
सर्वत्र देखणेंपण । कीर्तनीं गान जे गाती ॥९६॥
त्यांच्या पाउलांपाउलांसी । आपुलें सर्वांग तूं वोवाळिसी ।
अंग टाकूनि तिष्ठसी । त्यांपाशीं सर्वदा ॥९७॥
आपुली गुह्य ज्ञानमुद्रा । त्यांसी अर्पिसी तूं ज्ञानीनरेंद्रा ।
निजबोधें प्रबोधचंद्रा । त्यांच्या निजभद्रा तूं करिशी ॥९८॥
रासक्रीडादि नाना छंद । अंगनामंगनादि प्रबंध ।
कीर्ति अतिशयें विशद । भावार्थें शुद्ध जे गाती ॥९९॥
कां ठकूनियां ब्रह्मयासी । गोपाळवत्सें तूं जाहलासी ।
ऐसऐसिया विनोदांसी । हृषीकेशी जे गाती ॥४००॥
त्यांसी सर्वांभूतीं निजात्मता । देशी तूं आपुली सत्ता ।
त्यांच्या बोलांमाजी वर्तता । कृष्णनाथा तूं होशी ॥१॥
मनुष्यनाट्याचेनि योगें । जें जें केलें तुवां अंगें ।
तें गातां ऐकतां अनुरागें । तरले वेगें निजभक्त ॥२॥
म्यांचि केली जे जे आळी । ते त्वां पुरविली सर्व काळीं ।
त्या मज उपेक्षूनि वनमाळी । अंतकाळीं कां जाशी ॥३॥
श्रीशुक उवाच ।
एवं विज्ञापितो राजन्भगवान्देवकीसुतः ।
एकान्तिनं प्रियं भृत्यमुद्धवं समभाषत ॥ ५० ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
एवं यापरी देवकीसुत । पूर्ण पूर्णाशें भगवंत ।
विनविला श्रीकृष्णनाथ । निजभृत्य-उद्धवें ॥४॥
’निजभृत्य’ म्हणणें । उद्धवासी याकारणें ।
निजगुज श्रीकृष्णें । त्यासीं बोलणें सर्वदा ॥५॥
जेथ रिगमु नाहीं रुक्मिणीसी । ठावो नाहीं वसुदेवदेवकीसी ।
बळिभद्रा प्रद्युम्नासी । अनिरुद्धासी जे ठायीं ॥६॥
ते ठायीं कृष्णाप्रती । उद्धव असे अहोरातीं ।
यालागीं पैं ’एकांती’ । ज्ञाते म्हणती तयासी ॥७॥
श्रीकृष्णासी वाडेंकोडें । जीवापरीस जें जें आवडे ।
तें उद्धवासी देणें घडे । प्रेम गाढें भक्तांचें ॥८॥
देतां तो जरी नेघे । तरी धांवोनि आलिंगी वेगें ।
न घेतां देवो पायां लागे । भक्तपांगें पांगिला ॥९॥
यालागीं कृष्णासी प्रियकर । उद्धवुचि साचार ।
याहूनि प्रेम थोर । नाहीं सधर आनाचें ॥४१०॥
यालागीं ’प्रिय-भृत्य-एकांती’ । ये बिरुदें उद्धवासी साजती ।
तेणें निजस्वामीस विनंती । निजप्रीतीं पैं केली ॥११॥
ऐकोनि उद्धवाचें वचन । चातकांलागीं जेवीं घन ।
तेवीं वोळला जगज्जीवन । स्वानंदघन निजबोधें ॥१२॥
चातकाची तहान किती । तृप्त करूनि निववी क्षिती ।
उद्धवउद्देशें श्रीपती । त्रिजगती निववील ॥१३॥
ऐकतां उद्धवाचे बोल । येताति श्रीकृष्णासी डोल ।
भक्तभाग्य जी सखोल । जाहली वोल प्रेमाची ॥१४॥
ते वोळले भक्तभूमीसी । निजबीज पेरील हृषीकेशी ।
तें पीक पुरेल जगासी । मुक्तराशी मुमुक्षां ॥१५॥
धेनु वत्साचेनि वोरसें । घरा दुभतें पुरवी जैसें ।
तेवीं उद्धवाचेनि उद्देशें । जग हृषीकेशें निवविजे ॥१६॥
घरीं पाहुणयालागीं । कीजती परवडी अनेगी ।
तेथ बालकें जेवीं विभागी । होतीं वेगीं न मागतां ॥१७॥
पक्वान्न सेवूं नेणतीं बाळें । तरी माता मुखीं घाली बळें ।
तैसें जनार्दनें आम्हां केलें । स्वयें दिधलें निजशेष ॥१८॥
नवल कृपा केली कैशी । कृष्ण उद्धवातें उपदेशी ।
तोचि अर्थ दिधला आम्हांसी । देशभाषीं अर्थितां ॥१९॥
एका जनार्दनु म्हणे । श्रोतां सावधान होणें ।
हें मी तोंडें बोलों कवणें । तिंहीं मज करणें सावध ॥४२०॥
निजभक्तें केली विनंती । निजज्ञान बोलेल भक्तपती ।
श्रवणाची सावध पंक्ती । बैसवा वृत्ति तद्बोधें ॥२१॥
येथ मुक्तांचें कोड । पुरे मुमुक्षांची चाड ।
येचिविषयीं कथा गोड । श्रवणकवाड उघडेल ॥२२॥
उद्धवें श्रीकृष्ण विनविला । ना तो श्रवणीं डांगोरा पिटिला ।
मुमुक्षां म्हणे चला चला । कृष्ण वोळला निजबोधें ॥२३॥
मोक्षमार्गींचे कापडी । अर्थतृषातृषितें बापुडीं ।
प्रबोधबोधाची पव्हे गाढी । उद्धवें रोकडी घालविली ॥२४॥
भक्तिजननी माझी तेथ । कडे घेवोनि होती नेत ।
जनार्दन परमामृत । जाहलें प्राप्त तिचेनीं ॥२५॥
ते तुझी भक्ति तत्वतां । आम्हांसी असावी सर्वथा ।
तुज मागावी मुक्तता । तंव ते मूर्खता भक्तांची ॥२६॥
साच असावी बद्धता । तरी म्यां मागावी मुक्तता ।
तेचि नाहीं गा तत्वतां । मिथ्या मागतां मूर्खता ॥२७॥
मीतूंपणेंवीण सहजस्थिती । तुझी असो अभेद-भक्ती ।
हेचि मागणें पुढपुढतीं । संतांप्रती सर्वदा ॥२८॥
उद्धवासी ज्ञान गुप्त । उपदेशील कृष्णनाथ ।
एका जनार्दन विनवित । दत्तचित्त तुम्ही दीजे ॥४२९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां
देवस्तुत्युद्धवविज्ञापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥ ५० ॥ ओव्या ॥४२९॥