॥ श्री एकनाथी भागवत ॥

 

अध्याय अठ्ठाविसावा

 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

जय जय सद्‌गुरु परम । जय जय सद्‌गुरु पुरुषोत्तम ।

जय जय सद्‌गुरु परब्रह्म । ब्रह्म ब्रह्मनाम तुझेनी ॥ १ ॥

जय जय सद्‌गुरु चिदैक्यस्फूर्तीं । जय जय सद्‌गुरु चिदात्मज्योति ।

जय जय सद्‌गुरु चिन्मूर्ती । मूर्तामूर्ती चिद्‌रूप ॥ २ ॥

जय जय सद्‌गुरु सत्क्षेत्रा । जय जय सद्‌गुरु सत्पात्रा ।

जय जय सद्‌गुरु सन्मात्रा । सदैकाक्षरा सद्‌रूपा ॥ ३ ॥

जय जय सद्‌गुरु स्वनंदमान । जय जय सद्‌गुरु स्वानंदपूर्ण ।

जय जय सद्‌गुरु स्वानंदघन । आनंदा गोडपण तुझेनी ॥ ४ ॥

जय जय सद्‌गुरु देव‍अग्रणी । जय जय देवशिरोमणी ।

सकळ देव लागती चरणीं । देवचूडामणी गुरुराया ॥ ५ ॥

जय जय जीवादिजीवा । जय जय शिवादिशिवा ।

जय जय देवादिदेवा । जय जय अभिनवा गुरुराया ॥ ६ ॥

जय जय सद्‌गुरु सुखसंपन्ना । जय जय सद्‌गुरु सुखनिधाना ।

जय जय सद्‌गुरु सुखैकघना । सुख सुखपणा तुझेनि ॥ ७ ॥

तुझेनि सुखा निजसुख घडे । तुझेनि बोधा निजबोध आतुडे ।

तुझेनि ब्रह्मा ब्रह्मत्व जोडे । तुझेनि पडिपाडें तूं एक ॥ ८ ॥

ऐसा श्रीगुरु तूं अनंत । तुझ्या स्वरूपासी नाहीं अंत ।

तो तूं हो‍ऊनि कृपायुक्त । निजस्वरूप बोधिल निजभक्तां ॥ ९ ॥

आपुलें निजरूप बोधून । नुरविशी देवभक्तपण ।

त्याहीवरी निजभजन । अद्वयें पूर्ण करविशी ॥ १० ॥

गंगा मिळोनि सागरीं । मीनली तळपे तयावरी ।

तेवीं भक्त मिळोनि तुजमाझारीं । तुझें भजन करी तुझेनि ॥ ११ ॥

अद्वय करितां तुझी भक्ती । तूं संतोषसी यथानिगुती ।

संतोषोनि शिष्याहातीं । निजात्मसंपत्ती अर्पिशी ॥ १२ ॥

अर्पूनि निजात्मभरभार । शिष्य गुरुत्वें करिशी थोर ।

हा अतिलाघवी चमत्कार । अतर्क्य विचार तर्केना ॥ १३ ॥

जें अतर्क्य वेदशास्त्रांसी । ज्यालागीं वेद विवादिती अहर्निशीं ।

तें तूं क्षणार्धें बोधिसी । सच्छिष्यासी निजबोधें ॥ १४ ॥

तुझ्या निजबोधाची हातवटी । पढतां वेदवेदांतकोटी ।

तरी अलक्ष लक्षेना दृष्टीं । सर्वार्थीं गोष्टी अगम्य ॥ १५ ॥

बहुत कळलें कळलें म्हणती । नानापरीच्या युक्ति चाळिती ।

परी ते न कळोनि वोसणती । जेवीं शुक बोलती सुभाषितें ॥ १६ ॥

यालागीं तुझी बोधकशक्ती । अगम्य सर्वाशीं सर्वार्थीं ।

तुझी लाधल्या कृपायुक्ती । अगम्य पावती सुगमत्वें ॥ १७ ॥

जें अगम्य श्रीभागवत । त्याहीमाजींं एकादशार्थ ।

प्राकृत करविला यथार्थ । बाप समर्थ कृपाळू ॥ १८ ॥

दधि मंथूनी समस्त । जेवीं माता काढी नवनीत ।

ते आयितें बाळकाहातीं देत । तैसें केलें येथ जनार्दनें ॥ १९ ॥

वेदशास्त्रांचें निजमथित । व्यासें काढिलें श्रीभागवत ।

त्या भागवताचा मथितार्थ । जाण निश्चित एकादश ॥ २० ॥

त्या एकादशाचें गोडपण । सर्वथा नेणें मी आपण ।

तें जनार्दनें करूनि मथन । सारांश पूर्ण मज दीधला ॥ २१ ॥

तो स्वभावें घालितां तोंडीं । लागली एकाद्शाची गोडी ।

त्या गोडपणाच्या आवडीं । टीका चढोचढीं चालिली ॥ २२ ॥

यालागीं एकादशाची टीका । एकला कर्ता नव्हे एका ।

एकीं एक मिळोनि देखा । ग्रंथ नेटका निर्वाळिला ॥ २३ ॥

मागेंपुढें एक एका । हें एकादशाचें रूप देखा ।

तेणें एकपणें चालिली टीका । साह्य निजसखा जनार्दन ॥ २४ ॥

जनार्दनें पैं आपुलें । एकीं एकपण दृढ केलें ।

तेचि एकादशाचे अर्था आलें । एकीं मीनलें एकत्व ॥ २५ ॥

जेवीं जेवणीं गोड घांस । तेवीं भागवतीं एकादश ।

त्याहीमाजीं अष्टाविंश । अतिसुरस साजिरा ॥ २६ ॥

सर्वांगीं शिर प्रधान । तैसा अठ्ठाविसावा जाण ।

तेथील जें कां निरूपण । तो स्वानंद जाण सोलींव ॥ २७ ॥

तो हा अठ्ठाविसावा अध्यावो । ब्रम्हसुखाचा निजनिर्वाहो ।

उद्धवें न पुसतां पह हो । स्वयें देवाधिदेवो सांगत ॥ २८ ॥

उद्धवें न करितां प्रश्न । कां सांगताहे श्रीकृष्ण ।

येचि अर्थींचें निरूपण । सावधान परिसावें ॥ २९ ॥

उद्धव कृष्णोक्तीं निजज्ञान । पावोनि झाला ज्ञानसंपन्न ।

तेणें ये‌ऊं पाहे ज्ञानाभिमान । जाणपण अनिवार ॥ ३० ॥

जग मूर्ख मी एक ज्ञाता । ऐशी वाढती जे अहंता ।

ते गुणदोषांची कथा । दावील सर्वथा सर्वत्र ॥ ३१ ॥

जेथ गुणदोषांचें दर्शन । तेथ निःशेष मावळे ज्ञान ।

येथवरी ज्ञानाभिमान । बाधक जाण साधकां ॥ ३२ ॥

अभिमान बाधी सदाशिवा । तोही आणिला जीवभावा ।

तेथ मनुष्याचा कोण केवा । अहंत्वें जीवा मुक्तता कैंची ॥ ३३ ॥

गुणदोषांचें दर्शन । जैं ईश्वर देखे आपण ।

तोही नाडूं पवे जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥ ३४ ॥

यापरी गुणदोषदर्शन । साधकां बाधक होय पूर्ण ।

यालागीं त्याचें निवारण । न करितां प्रश्न हरि सांगे ॥ ३५ ॥

बाळक नेणे निजहिता । तेथ साक्षेपें प्रवर्ते माता ।

तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३६ ॥

ज्ञानाभिमानाचें बाधकारण । सर्वथा साधकां न कळे जाण ।

यालागीं न करितांही प्रश्न । त्यांचे निराकरण हरि सांगे ॥ ३७ ॥

उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रम्हशापेंसीं ।

तेथ वांचवावया उद्धवासी । संपूर्ण ब्रह्मज्ञानासी हरि सांगे ॥ ३८ ॥

जेथ देहातीत आत्मज्ञान । तेथ न बाधी शापबंधन ।

हें जाणोनियां श्रीकृष्ण । पूर्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ॥ ३९ ॥

जेवीं साकरेवरी माशी । तेवीं श्रीकृष्णमूर्तीपाशीं ।

प्रीति जडली उद्धवासी । भाव एकदेशी दृढ झाला ॥ ४० ॥

कृष्णापासूनि दुरी जातां । उद्धव प्राण सांडील तत्त्वतां ।

ते मोडावया एकदेशी अवस्था । ब्रह्मसमता हरि सांगे ॥ ४१ ॥

एकदेशी झाला भावो । तो श्रीकृष्ण नावडे पहा हो ।

यालागीं देवाधिदेवो । ब्रह्मसमन्वयो स्वयें सांगे ॥ ४२ ॥

उद्धव असतां कृष्णाजवळी । ब्रह्मशापें हो‌ईल होळी ।

यालागीं त्यासी वनमाळी । सर्वब्रह्मसुकाळीं घालूं पाहे ॥ ४३ ॥

कृष्णावेगळा उद्धव जातां । वियोग बाधीना त्याचिया चित्ता ।

ऐशी पावाया सर्वगतता । उद्धव सर्वथा हरि बोधी ॥ ४४ ॥

 

श्रीभगवानुवाच-परस्वभावकर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत्‌ ।

विश्वमेकात्मकं पश्यन्‌ प्रकृत्या पुरुषेण च ॥ १ ॥

 

जो निःशब्दाचा सोलींव शब्द । ज्याचे निश्वासें जन्मले वेद ।

उद्धवहितार्थ गोविंद । ज्ञान विशुद्ध स्वयें सांगे ॥ ४५ ॥

संसारीं मुख्य तिन्ही गुण । त्रिगुणांस्तव त्रिविध जन ।

त्यांचें स्वाभाविक कर्म जाण । शांत दारुण आणि मिश्र ॥ ४६ ॥

त्य कर्मांचें निंदास्तवन । सर्वथा न करावें आपण ।

एकाचें वानितां भलेपण । इतरां कुडेपण तेणेंचि बोलें ॥ ४७ ॥

पांचांमाजीं भलेपण । एकाचें वानितां आपण ।

इतर जे चौघेजण । ते सहजें जाण निंदिले ॥ ४८ ॥

वामसव्य उभय भाग । दों नांवीं एकचि अंग ।

तेवीं प्रकृतिपुरुषात्मक जग जग । चिद्‌रूपें चांग एकत्वें ॥ ४९ ॥

जग ब्रह्मरूप परिपूर्ण । यालागीं निंदा आणि स्तवन ।

भूतमात्राचें आपण । कदाही काळीं जाण न करावें ॥ ५० ॥

सर्व भूतांच्या ठायीं । आत्माराम असे पाहीं ।

यालागीं निंदास्तुति कांहीं । प्राणांतीं पाहीं न करावी ॥ ५१ ॥

उद्धवा निंदास्तुतीची कथा । सांडी सांडीं गा सर्वथा ।

तरीच पावशी परमार्थ । निजस्वार्था निजबोधें ॥ ५२ ॥

सर्वभूतीं भगवद्भाव । हा ब्रह्मस्थितीचा निज निर्वाह ।

यासी कदा नव्हे अपाव । ऐक तो भाव उद्धवा ॥ ५३ ॥

जेथूनि येवूं पाहे अणाव । तेथें दृढ वाढल्या भगवद्भाव ।

तेव्हां अपावचि होय उपाव । विघ्नासी ठाव असेना ॥ ५४ ॥

हे स्थिती सांडूनियां दूरी । मी ज्ञाता हा गर्व धरी ।

निंदास्तुतीच्या भरोवरी । तो अनर्थामाझारीं निमग्न ॥ ५५ ॥

 

परस्वभावकर्माणि यः प्रशंसति निन्दति ।

स आशु भ्रश्यते स्वार्थादसत्यभिनिवेशतः ॥ २ ॥

 

मी एक सर्वज्ञाता पूर्ण । ऐसा धरोनि ज्ञानाभिमान ।

जगाचे देखे दोषगुण । निंदी ब्राह्मण मुख्यत्वें ॥ ५६ ॥

पराचें स्वाभाविक कर्म । स्वयें निंदणें हा अधर्म ।

हनुमंत ज्ञाता परम । त्यास वानरी कर्म सोडीना ॥ ५७ ॥

नारद ज्ञातेपणें मोठा । सत्य मानला श्रेष्ठश्रेष्ठां ।

तोही कळिलावा कळिकांटा । स्वभावचेष्टा अनिवार ॥ ५८ ॥

गरुड देवाचें वाहन । सदा तिष्ठे हात जोडून ।

तोही करी सर्पभक्षण । ऐसें कर्म जाण स्वाभाविक ॥ ५९ ॥

विचारतां जग त्रिगुण । गुणानुसारें कर्माचरण ।

तेथ पाहतां दोषगुण । दोषी जाण पाहे तो ॥ ६० ॥

जगीं पहावी एकात्मता । हे ब्रह्मस्थिति गा सर्वथा ।

सांडूनि गुणदोष पाहतां । तो निजात्मघात प्रवर्ते ॥ ६१ ॥

स्वभावें भेटल्या सज्जन । शोधूनि पाहे दोषगुण ।

यापरी ज्ञानाभिमान । निंदास्तवन उपजवी ॥ ६२ ॥

अभिमानाची जाती कैशी । अधिक खवळे सज्ञानापाशी ।

तो दाखवी गुणदोषांसी । निंदास्तवनासे उपजवी ॥ ६३ ॥

आपुले वृत्तीसी जो समान । त्याचें अळुमाळ करी स्तवन ।

न मने आपणासी ज्याचा गुण । त्यासी निंदी आपण यथेष्ट ॥ ६४ ॥

निंदास्तुति उपजे जेथ । भेद क्षोभला उठे तेथ ।

निःशेष निर्दाळी परमार्थ । महा अनर्थ अंगीं वाजे ॥ ६५ ॥

निंदेपाठीं अनर्थ । उधार लागों नेदी तेथ ।

रोकडा अंगीं आदळत । निजस्वार्थघातक ॥ ६६ ॥

भेद समूळ मिथ्या येथ । येचि अर्थींचा स्वप्नदृष्टांत ।

स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । दृढ परमार्थ साधावया ॥ ६७ ॥

 

तैजसे निद्रयाऽऽपन्ने पिण्डस्थो नष्टचेतनः ।

मायां प्राप्नोति मृत्युं वा तद्वन्नानार्थदृक्‌ पुमान्‌ ॥ ३ ॥

 

इंद्रियें जन्मलीं रजोगुणीं । तन्मात्रा विषयो तमोगुणीं ।

तीं इंद्रियें विषय सेवुनी । ठेलीं निद्रास्थानीं निश्चळ ॥ ६८ ॥

जागृतीं ‘विश्व’ अभिमानी । दोनी जाती मावळोनी ।

तेव्हां मिथ्या प्रपंच स्वप्नीं । ‘तैजस’ अभिमानी विस्तारी ॥ ६९ ॥

स्थूल देह असे निश्चळ । स्वप्नीं मनचि केवळ ।

विस्तारी गा भवजाळ । लोक सकळ त्रिलोकीं ॥ ७० ॥

त्या स्वप्नामाजिले सृष्टीसी जाण । उत्पत्ति स्थिति आणि निदान ।

स्वयें देखतांही आपण । जन्ममरण तें मिथ्या ॥ ७१ ॥

तेवीं हे अविद्या दीर्घ स्वप्न । वृथा विस्तारी अभिमान ।

तेथील मिथ्या जन्ममरण । तूं ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ७२ ॥

तुझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । भेदाची तंव वार्ताही नाहीं ।

तेथील शुभाशुभ कांहीं । तुज सर्वथा पाहीं स्पर्शेना ॥ ७३ ॥

 

किं भद्रं किमभद्रं वा द्वैतस्यावस्तुनः कियत्‌ ।

वाचोदितं तदनृतं मनसा ध्यातमेव च ॥ ४ ॥

 

जें जन्मलेंचि नाहीं । तें काळें गोरें सांगूं कायी ।

ग्रहणेवीण कांहीं । खग्रास पाहीं दिसेना ॥ ७४ ॥

उखरीं भासलें मृगजळ । तें खोल किंवा उथळ ।

मधुर कीं क्षार केवळ । सांगतां विकळ विवेक ॥ ७५ ॥

तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । तेथील दोष आणि गुण ।

निवडिती जे सज्ञान । ते जाण निमग्न अज्ञानमाजीं ॥ ७६ ॥

जेवीं अवंअसेचिये रातीं । अंधारा जोखूं आंधळे येती ।

त्यांसी जोखितां दोंही हातीं । एकही रती तुकेना ॥ ७७ ॥

तेवीं प्रपंच मिथ्यापणें । तेथ कानीं जें ऐकणें ।

कां डोळां जें देखणें । रसना जें चाखणें स्पर्शणें अंगें ॥ ७८ ॥

हाताचें घेणेंदेणें । पायांचें जें चालणें ।

वाचेचें जें बोलणें । कल्पणें मनें तें मिथ्या ॥ ७९ ॥

अहंकाराचा बडिवार । चित्ताचा चिंतनप्रकार ।

बुद्धीचा विवेकविचार । हा समूळ व्यवहार मिथ्या तेथ ॥ ८० ॥

चित्रीं जळ आणि हुताशन । अंत्यज आणि ब्राह्मण ।

व्याघ्र आणि हरिण । भासतांही जाण भिंतीचि भासे ॥ ८१ ॥

तेवीं हा प्रपंच द्वैतयुक्त । भासतां भासे वस्तु अद्वैत ।

शुभाशुभ कैचें तेथ । ब्रह्म सदोदित परिपूर्ण ॥ ८२ ॥

केळीचा दिंड उकलितां । जो जो पदर तो तो रिता ।

तेवीं देहादि प्रपंच विवंचितां । मिथ्या तत्ततां मायिक ॥ ८३ ॥

मिथ्या प्रपंचाच्या ठायीं । शुभाशुभ तें लटिकें पाहीं ।

सत्य वस्तु ठायींच्या ठायीं । शुभशुभ नाही अणुमात्र ॥ ८४ ॥

जो शुभाशुभ म्हणे आहे । त्याची कल्पना त्यासंमुख होये ।

निजक्ल्पनामहाभयें । जन्ममरण वाहे लटिकेंचि ॥ ८५ ॥

 

छाया प्रत्याह्वयाभासा ह्यसान्तोऽप्यर्थकारिणः ।

एवं देहादयो भावा यच्छन्त्यामृत्युतो भयम्‌ ॥ ५ ॥

 

जळीं प्रतिबिंब साच नसे । जो पाहे तो बिंबला दिसे ।

मिथ्या प्रपंचाचें रूप तैसें । निजकल्पनावशें भासत ॥ ८६ ॥

तें प्रतिबिंब पाहोनि डोळां । मी म्हणोनि लाविजे टिळा ।

तेवीं देहाभिमानाचा सोहळा । जीवाच्या कपाळा आदळे ॥ ८७ ॥

कां आपुलीचि उत्तरें । पडिसादें होतीं प्रत्युत्तरें ।

तें मिथ्याचि परी साचोकारें । श्रवणीं अक्षरें उमटती ॥ ८८ ॥

निश्चळ दोराचें निजरूप । भ्रमें भासल्या प्रचंड सर्प ।

तो मिथ्या परी भयकंप । महाखटाटोप उपजवी ॥ ८९ ॥

यापरी असंत देहादिक । देहाभिमानें जीवासी देख ।

जन्ममरणावर्त अनेक । आकल्प दुःख भोगवी ॥ ९० ॥

‘आत्म्स्यापासोनि देहादि भेद । उपजल हें बोलें वेद ।

वेदरूपें तूं प्रसिद्ध । मिथ्या वेदवाद घडे केवीं’ ॥ ९१ ॥

ऐसा उद्धवाचा आवांका । वेदवादाची आशंका ।

समूळ कळली यदुनायका । तेंचि उत्तर देखा देतसे ॥ ९२ ॥

 

आत्मैव तदिदं मिश्वं सृज्यति प्रभुः ।

त्रा‌अतो त्राति विश्वात्मा ह्रियते हरतीश्वरः ॥ ६ ॥

तस्मान्नह्यात्मनोऽन्यस्मदन्यो भावो निरूपितः ।

निरूपितेयं त्रिविधा निर्मूला भातिरात्मनि ।

 

प्रपंच प्रत्यक्ष विद्यमान । तेणें भेदयुक्त झालें मन ।

तेथ बोधी माझें वेदवचन । प्रपंच अभिन्न निजात्मता ॥ ९३ ॥

मूळीं ऊंसचि बीजीं विरुढे । तो ऊंसपणें कांडा चढे ।

तेवीं प्रपंच वस्तुयोगें वाढे । वाडेंकोडें तद्‌रूप ॥ ९४ ॥

जैसें सोनियाचें झालें लेणें । तें वर्तत सोनेपणें ।

लेणें मोडलियाही सोनें । सोनेंपणें स्वतःसिद्ध ॥ ९५ ॥

तिळाची पुतळी केली । ते तिळावयवीं शोभे आली ।

ते मोडितां न मोडितां भली । असे संचली तिळरूप ॥ ९६ ॥

तेवीं उत्पत्ति स्थिति निदान । प्रपंचासी होता जाण ।

तेथ आदि मध्य अवसान । वस्तु परिपूर्ण संचली ॥ ९७ ॥

जें एथ भासलें चराचर । तें मी आत्माचि साचार ।

मजवेगळा जगासी थार । अणुमत्र असेना ॥ ९८ ॥

एवं सृज्य आणि सृजिता । पाल्य आणि प्रतिपाळिता ।

संहार आणि संहर्ता । मी एकात्मता भगवंत ॥ ९९ ॥

एथ उत्पत्ति स्थिति निधन । त्रिविधरूपें प्रपंच भिन्न ।

या सर्वांसी मी अधिष्ठान । मजवेगळें जाण असेना ॥ १०० ॥

प्रपंच मजवरी आभासे । परी मी प्रपंचामाजीं नसें ।

जेवीं मृगजळाचेनि रसें । सूर्य काळवशें भिजेना ॥ १ ॥

त्रिविध प्रपंचाचें जाळ । मजवरी दिसे हें निर्मूळ ।

जेवीं गगन भासे सुनीळ । परी तेथ अळुमाळ नीळिमा नाहीं ॥ २ ॥

‘जग प्रत्यक्ष डोळां दिसे । तें निर्मूळ म्हणसी कैसे’ ।

हे आशंका मानिसी मानसें । ऐक अनायासें तो बोध ॥ ३ ॥

 

इदं गुणमयं विद्धि त्रिविधं मायया कृतम्‌ ॥ ७ ॥

एतद्विद्वान्मदुदितं ज्ञानविज्ञाननैपुणम्‌ ।

नचिन्दति न च स्तौति लोके चरति सूर्यवत्‌ ॥ ८ ॥

 

अध्यात्म अधिदैव अधिभूत । हें त्रिविध जग मायाकृत ।

नसतें मजमाजीं आभासत । जाण निश्चित त्रिगुणात्मक ॥ ४ ॥

उद्धवा चिथ्या म्हणोनि तूं एथ । झणें होशी उपेक्षायुक्त ।

येणें मद्वाक्यें साधुसंत । ज्ञानविज्ञानार्थ पावले ॥ ५ ॥

प्रपंचाचें मिथ्या भान । तेंचि ज्ञानांचे मुख्य ज्ञान ।

येणें ज्ञानें जो सज्ञान । तोचि समान सर्वांभूतीं ॥ ६ ॥

यालागीं हूतांचे गुणागुण । कदा न वदे निंदास्तवन ।

सूर्याचे परी जाणा । विचरे आपण समसाम्यें ॥ ७ ॥

बदरिकाश्रम उत्तरदेशीं । सेतुबंध दक्षिणेसी ।

सूर्य संमुख सर्वांसी । विमुखता त्यासी असेना ॥ ८ ॥

सूर्य संमुख पूर्वेच्यांसी । तोचि विमुख पश्चिमेच्यांसी ।

नहीं तेवीं मी सर्वत्र सर्वांसी । विमुखता मजसी असेना ॥ ९ ॥

सामर्थें तम दवडूनि जाण । भूतांसी सूर्य भेटे आपण ।

तेविं जगाचे दवडूनि दोषगुण । साधुसज्जन विचरती ॥ ११० ॥

जें हें बोलिलें ज्ञानलक्षण । तेंचि सिद्धांचें पूर्णपण ।

मुमुक्षीं हें अनुसंधान । सावधान साधावें ॥ ११ ॥

हेंचि पाविजे जिजज्ञान । तेचि अर्थींचें साधन ।

उद्धवालागीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ १२ ॥

 

प्रत्यक्षेणानुमानेन निगमेनात्मसंविदा ।

आद्यन्तवदसञ्ज्ञात्वा निःसङ्गो विचरेदिह ॥ ९ ॥

 

जे जन्मोनि नाशवंत । ते सर्वही जाण असंत ।

आसक्ति सांडोनियां तेथ । उदास विरक्त वर्तावें ॥ १३ ॥

सटावल्याचें बारसें । कोणी न करिती उल्हासें ।

नश्वर देह वाढतां तैसें । मूर्ख मानसे सुखावती ॥ १४ ॥

उत्पत्तिविनाशलक्षण । त्याचें देव सांगतो प्रमाण ।

नित्य भूतांचें जन्ममरण । देखिजे आपण ‘प्रत्यक्ष’ ॥ १५ ॥

‘अनुमान’ करितां साचार । जें जें दिखिजे साकार ।

मेरुपृथ्व्यादि आकार । होती नश्वर प्रळयांतीं ॥ १६ ॥

येचि अर्थीं वेदोक्ती । नाशवंत अष्टधा प्रकृति ।

जीवभाव नासे गा प्रांतीं । गर्जती श्रुती येणें अर्थें ॥ १७ ॥

एथ आपुलाही अनुभव असे । जड विकारी तें तें नासे ।

हें कळत असे गा आपैसें । जग अनायासें नश्वर ॥ १८॥

वडील निमाले देखती । पुत्रपौत्र स्वयें संस्कारिती ।

तरी स्वमृत्यूची चिंता न करिती । पडली भ्रांती देहलोभें ॥ १९ ॥

पुत्र पितरां पिंडदान देती । उत्तम गति त्यांची चिंतिती ।

आपुली गति न विचारितीं । नश्वर आसक्ती देहलोभें ॥ १२० ॥

आत्मा केवल प्रकाशघन । प्रपंच जड मूढ अज्ञान ।

हें ऐकोनि उद्धवें आपण । देवासी प्रश्न पूसतु ॥ २१ ॥

 

उद्धव उवाच-नैवात्मनो न देहस्य संसृतिर्द्रश्ययोः ।

अनात्मस्वदृशोरीश कस्य स्यादुपलभ्यते ॥ १० ॥

 

आत्मा नित्यमुक्त चिद्घन । त्यासी न घडे भवबंधन ।

देह जड मूढ अज्ञान । त्यासी संसार जाण घडेना ॥ २२ ॥

एथ भवबंधन हृषीकेशी । सांग पां बाधक कोणासी ।

जरी तूं संसार नाहीं म्हणसी । तो प्रत्यक्ष जगासी जडलासे ॥ २३ ॥

आत्म्यासी विचारितां जाण । भवबंधा न दिसे स्थान ।

येचि अर्थींचें न घडतेपण । उद्धव आपण सांगत ॥ २४ ॥

 

आत्माव्ययोऽगुणः शुद्धः स्वयंज्योतिनरावृतः ।

अग्निवद्दरुवदचिद्देहः कस्येह संसृतिः ॥ ११ ॥

 

आत्मा चिद्‌रूप अविनाशी । गुण निर्गुण नातळे ज्यासी ।

कर्माकर्मपापपुण्यासी । ठाव त्यापाशीं असेना ॥ २५ ॥

परादिवाचा नव्हे उच्चार । यालागीं म्हणीपें ‘परात्पर’ ।

प्रकृतिगुणीं अविकार । प्रकृतिपर परमात्मा ॥ २६ ॥

जयाच्या स्वप्रकाशदीप्तीं । रविचंद्रादि प्रकाशती ।

प्रकाशे त्रिजगती । तेजोमूर्ती परमात्मा ॥ २७ ॥

ऐशिया आत्म्याच्या ठायीं । भवबंधन न लगे कांहीं ।

सूर्य बुडे मृगजळाच्या डोहीं । तैं आत्म्यासी पाहीं भवबंध ॥ २८ ॥

खद्योततेजें सूर्य जळे । बागुलाभेणें काळ पळे ।

मुंगीचेनि पांखबळें । जैं उडे सगळें आकाश ॥ २९ ॥

वारा आडखुळीला आडीं पडे । जैं थिल्लरामाजीं मेरु बुडे ।

तरी भवबंध आत्म्याकडे । सर्वथा न घडे गोविंदा ॥ १३० ॥

देहाकडे भवबंधन । मूर्खही न मानिति जाण ।

देह जड मूढ अज्ञान । त्यासी भवबंधन कदा न घडे ॥ ३१ ॥

जैं दगडाचें पोट दुखे । कोरडें काष्ठ चरफडी भुकें ।

तैं देहाकडे यथासुखें । भवबंध हरिखे लागता ॥ ३२ ॥

जैं दोगरासी तरळ भरे । मृत्तिका नाहाणालागीं झुरे ।

कोळसेनि काळें होय अंधारें । तैं भवबंधभारें देह दाटे ॥ ३३ ॥

म्हणसी देहात्मसंगतीं । घडे भवबंधाची प्राप्ती ।

विचारितां तेही अर्थीं । न घडे श्रीपति तें ऐक ॥ ३४ ॥

आत्मास्वप्रकाश महावन्ही । देह तो जड मूढ काष्ठस्थानीं ।

तो मिळतां आत्ममिळणीं । सांडी जाळूनि तत्काळ ॥ ३५ ॥

जैं अग्निमाजीं संवादें । कापूर आठ प्रहर नांदे ।

तैं देहात्मनिजसंबंधें । देह भवबंधें नांदता ॥ ३६ ॥

म्हणसी काष्ठामाजीं अग्नि असे । परी तो काष्ठचि हो‍ऊनि नसे ।

मथूनि काढिल्या निजप्रकाशें । जाळी अनायासें काष्ठतें ॥ ३७ ॥

तेवीं आत्मा देहामाजीं असे । परी तो देहचि हो‍ऊनि नसे ।

देहप्रकाशक चिदंशे । भवबंधपिसें त्या न घडे ॥ ३८ ॥ आशंका ॥

म्हणशी ‘आत्म्याचे निजसंगतीं । जैं कळोनि जाय भूतव्यक्ती ।

तैं भूतांची वर्तती स्थिती । कैशा रीतीं’ तें ऐक ॥ ३९ ॥

छायामंडपीं दीप प्रकाशी ॥ नाचवी कागदांच्या बाहुल्यासी ।

तेच लावितां दीपासी । जाळी अनायासीं त्या व्यक्तीं ॥ १४० ॥

तेवीं आत्म्याचे स्वसत्तशक्तीं । भूतें दैवयोगें वर्तती ।

स्वयंभू झाल्या आत्मस्थिती । भूतव्यक्ती उरेना ॥ ४१ ॥

करितां आत्म्याचें अनुसंधान । संसाराचें नुरे भान ।

तेथ भूताकृति भिन्नभिन्न । कैंच्या जाण अतिबद्ध ॥ ४२ ॥

यापरी भवबंधन । मज पाहतां मिथ्या जाण ।

भवबंधालागीं स्थान । नेमस्त जाण असेना ॥ ४३ ॥

आत्म्याच्या ठायीं ना देहीं । उभयसंबंधींही नाहीं ।

भवबंध मिथ्या पाहीं । त्यासी ठावो कोठेंही असेना ॥ ४४ ॥

कोपों नको श्रीकृष्णनाथा । माझेनि निजनिर्धारे पाहतां ।

भवबंध मिथ्या तत्त्वतां । निश्चयें चित्ता मानलें ॥ ४५ ॥

ऐकोनि उद्धवाचें वचन । हरिखें वोसंडला श्रीकृष्ण ।

माझा उद्धव झाला सज्ञान । निजत्मखूण पावला ॥ ४६ ॥

सत्य मिथ्या भवबंधन । ऐकोनि उद्धवाचें वचन ।

परमानंदें डोले श्रीकृष्ण । जीवें निंबलोण करूं पाहे ॥ ४७ ॥

आत्म्यास भवबंध नाहीं । शेखींन दिसे देहाच्या ठायीं ।

हा विवेक नेणिजे जिंहीं । त्यासी भवबंध पाहीं हरि सांगे ॥ ४८ ॥

 

श्रीभगवानुवाच-

यावद्देहेन्द्रियप्राणैः आत्मनः सन्निकर्षणम्‌ ।

संसार फलवांस्तावद्‌ अपार्थोऽप्यविवेकिनः ॥ १२ ॥

 

जो वर्णाश्रमांहीपरता । जो बंधमोक्ष अलिप्तता ।

जो देहद्वंद्वा नातळता । तो उद्धवहितार्था हरि बोले ॥ ४९ ॥

मी कृश स्थूळ गौर श्याम । हे देहाचे ‘देहधर्म’ ।

मी काणा मुका बहिरा परम । हे ‘इंद्रियधर्म’ इंद्रियांचे ॥ १५० ॥

क्षुधातृषादि अनुक्रम । हा प्रणांचा ‘प्राणधर्म’ ।

कामक्रोधलोभादि संभ्रम । हा ‘मनोधर्म’ मनाचा ॥ ५१ ॥

सत्त्वगुणाची ‘जागृती’ । रजोगुणें ‘स्वप्नस्फूर्ती’ ।

तमोगुणें जाड्य ‘सुषुप्ती’ । जाण निश्चितीं देहयोगें ॥ ५२ ॥

देहासी येतां मरण । ‘मी मेलों’ म्हणे तो आपण ।

देहासी जन्म होतां जाण । जन्मलेपण स्वयें मानीं ॥ ५३ ॥

इंद्रिये विषयो सेविती । ते म्यां सेविले मानी निश्चितीं ।

स्वर्गनरकभोगप्राप्ती । सत्य मानिती देहात्मता ॥ ५४ ॥

अन्न आकांक्षी प्राण । त्यातें भक्षी हुताशन ।

तत्साक्षी चिदात्मा आपण । म्हणे म्यां अन्न भक्षीलें ॥ ५५ ॥

हे अवघे माझे धर्मं । ऐसा आत्म्यासी जंव दृढ भ्रम ।

तंव मिथ्याचि अतिदुर्गम । संसार विषम भ्रमें भोगी ॥ ५६ ॥

त्या भोगाचें फळ गहन । अविश्रम जन्ममरण ।

स्वर्गनरक पापपुण्य । भ्रमें आपण सत्य मानी ॥ ५७ ॥

संसार मूळीं निमूळ । तोही भ्रमफळें सदाफळ ।

जो कां अविवेक्यां अतिप्रबळ । सर्वकाळ फळलासे ॥ ५८ ॥

जेथ सत्य अर्थं नाहीं । तो ‘अनर्थ’ म्हणिजे पाहीं ।

त्याचा फळभोग तोही । बाळबागुलन्यायीं भोगावा ॥ ५९ ॥ आशंका ॥

‘गगनकमळांची माळा । जैं वंध्यापुत्र घाली गळां ।

तैं संसारभोगाचा सोहळा । आत्म्याच्या जवळां देखिजे ॥ १६० ॥

ऐसें न घडतें केवीं घडे’ । तेचि अर्थींचें वाडेंकोडें ।

श्रीकृष्ण उद्धवापुढें । निजनिवाडें सांगत ॥ ६१ ॥

 

अर्थे ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते ।

ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ १३ ॥

 

सत्यार्थ नसतांही संसार । निवर्तेना अतिदुर्धर ।

येचि अर्थींचा विचार । निजनिर्धार अवधारीं ॥ ६२ ॥

वंध्यापुत्राचिया ऐसें । संसारा सत्यपण नसे ।

सत्य म्हणों तरी हा नासे । काळवशें सहजेंचि ॥ ६३ ॥

संसार जैं सत्य होता । तैं ब्रह्मज्ञानेंही न नासता ।

हा संतासंत नये म्हणतां । अनिर्वाच्या कथा पैं याची ॥ ६४ ॥

अविचारितां याचें कोड । अविवेकें हा अतिगोड ।

विषयध्यानें वाढे रूढ । संकल्प सदृढ मूळ याचें ॥ ६५ ॥

हा नसतचि परी आभासे । निद्रिता स्वप्नीं अनर्थपिसें ।

तेवीं संसार मायावशें । विषय आभासें भोगवी ॥ ६६ ॥

जंव जंव विषयसेवन । तंव वाढे विषयध्यान ।

विषयध्यासें भवबंधन । सदृढ जाण उद्धवा ॥ ६७ ॥

विषयसेवनें भवबंधन । जीवासी झालें दृढ पूर्ण ।

तैं जीवन्मुक्तासी विषयभान । दैवयोगें जाण दिसताहे ॥ ६८ ॥

‘जीवनमुक्तासी विषयप्राप्ती । तेणें बुडाली त्याची मुक्ती’ ।

ऐशी आशंका न धरीं चित्तीं । तेंचि श्रीपति विशद सांगे ॥ ६९ ॥

 

यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्वनर्थभृत्‌ ।

स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते ॥ १४ ॥

 

सज्ञान आणि अज्ञान । यांसी जें विषयसेवन ।

त्यांचा अनुभव भिन्नभिन्न । तेंही लक्षण अवधारीं ॥ १७० ॥

जेवीं स्वप्नींची विषयप्राप्ती । स्वप्नस्थ साचचि मानती ।

तेचि विषय जागृतीं स्फुरती । परी सत्यप्रतीति त्यां नाहीं ॥ ७१ ॥

तेवीं अज्ञानां विषयसेवन । तेणें विषयासक्त होय मन ।

तेंचि मुक्तांप्रति विषय जाण । मिथ्या दर्शन विषयांचें ॥ ७२ ॥

नटनट्य-लोकाचारीं । संपादी स्त्रीपुरुषव्यवहारीं ।

मुक्तासी तैशी परी । गृहदारीं नांदता ॥ ७३ ॥

कां लेंकरांच्या खेळाप्रती । तुळसीदळें घे‌ऊनि हातीं ।

वडे मांडे क्षीर तूप म्हणती । एकीं कल्पिती अनेकत्व ॥ ७४ ॥

तेवीं जीवन्मुक्तांसी देख । जगीं विषयो अवघा एक ।

त्यासी नानात्वें भाविती लोक । परी तो अनेक देखेना ॥ ७५ ॥

दृढ धरोनि देहाभिमान । ‘मी माझें’ जें विषयस्फुरण ।

तेंच भवबंधाचें कारण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥

 

शोकहर्षभयक्रोधलोभमोहस्पृहादयः ।

अहंकारस्य दृश्यन्ते जन्ममृत्युश्च नात्मनः ॥ १५ ॥

 

देहाभिमानाचें पोटीं । अनेक दुःखांचिया कोटी ।

त्यांची संकळितें गुणगोठी । कृष्ण जगजेठी सांगत ॥ ७७ ॥

देहाभिमानाचें कार्य एथ । अद्वैतीं वाढवी द्वैत ।

इष्टानिष्टीं समस्त । जग व्याप्त तेणें कीजे ॥ ७८ ॥

नश्वरा इष्टाचा नाश देख । तेणें देह‍अहंता मानी दुःख ।

या नांव गा ‘शोक’ । सकळही लोक मानिती ॥ ७९ ॥

नश्वर विषयांची प्राप्ती । तेथें आल्हाद उपजे चित्तीं ।

त्या नांव ‘हर्ष’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १८० ॥

बळी मिळोनि समर्थ । आप्त विषयो विभांडूं पाहात ।

तेणे कासावीस होय चित्त । ‘भय’ निश्चित या नांव ॥ ८१ ॥

आप्तकामाचें अवरोधन । ज्याचेनि अणुमात्र होय जाण ।

त्याचें करूं धांवे हनन । ‘क्रोध’ संपूर्ण त्या नांव ॥ ८२ ॥

गांठी झाल्याही धनकोडी । कवडी वेंचितां प्राण सोडी ।

या नांव ‘लोभाची’ बेडी । कृपण-परवडी पुरुषाची ॥ ८३ ॥

कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त ।

विवेकशून्य स्तब्धता प्राप्त । ‘मोह’ निश्चित या नांव ॥ ८४ ॥

नित्य करितां विषयसेवन । मनीं विषय‍इच्छा गहन ।

अखंड विषयांचें ध्यान । ‘स्पृहा’ जाण ती नांव ॥ ८५ ॥

इत्यादि हे नाना गुण । अथवा कां जन्ममरण ।

आत्म्यासी संबंध नाहीं जाण । हें देहाभिमान स्वयें भोगी ॥ ८६ ॥

जागृति आणि देखिजे स्वप्न । तेथ वसे देहाभिमान ।

ते ठायीं हे दिसती गुण । सुषुप्तीस जाण गुण नाहीं ॥ ८७ ॥

जेथ वृत्ति निरभिमान । तेथ जन्ममरणादि हे गुण ।

सर्वथा नुठती जाण । गुणासी कारण अभिमान ॥ ८८ ॥

जळीं स्थळीं वायु झगटी । जळीं तरंग स्थळीं नुठी ।

तैं तरंगता जळाचे पोटीं । तेंवी शोकादि गुणकोटी अहंतेमाजीं ॥ ८९ ॥

बद्धता झाली अहंकारासी । म्हणसी मुक्ति व्हावी त्यासी ।

ते अहंता लागली जेवासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ १९० ॥

अंत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्न्नानें शुद्धत्व त्यासी ।

तें गंगास्न्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ॥ ९१ ॥

तेवीं अहंता जडली जीवासी । ते त्यागितां मुक्तत्व त्यासी ।

परी मुक्तत्व अहंकारासी । कल्पांतेंसी घडेना ॥ ९२ ॥

 

देहेन्द्रियप्राणमनोऽभिमानो

जीवोऽन्तरात्मा गुणकर्ममूर्तिः ।

सूत्रं महानित्युरुधेव गीतः

संसार आधावति कालतन्त्र ॥ १६ ॥

 

अनंत अपार ज्ञानघन । मायातीत आत्मा पूर्ण ।

तोचि झाला मायेचें अधिष्ठान । ‘अंतरात्मा’ जाण यालागीं म्हणिपे ॥ ९३ ॥

माया व्यापूनि अपार । यालागीं बोलिजे ‘परमेश्वर’ ।

मायानियंता साचार । यालागी ‘ईश्वर’ म्हणिपे तो ॥ ९४ ॥

तोचि अविद्येमाजीं प्रतिबिंबला । यालागीं ‘जीव’ हें नाम पावला ।

तोचि देहाध्यासें प्रबळला । ‘अहंकार’ झाला या हेतू ॥ ९५ ॥

तो संकल्पविकल्प‍उपाधीनें । स्वयें हो‍ऊनि ठेला ‘मन’ ।

त्यासी मनासी करावया गमन । ‘दशेंद्रियें’ जाण तोचि झाला ॥ ९६ ॥

त्या इंद्रियाचा आधार । सुखदुःखभोगांचा निकर ।

पापपुण्याचा चमत्कार । ‘देहाचा आकार’ तोचि झाला ॥ ९७ ॥

त्या देहाचें जें कारण । ‘सत्व-रजोतमगुण’ ।

ते तीन्ही गुण जाण । तोचि आपण स्वयें झाला ॥ ९८ ॥

गुणक्षोभाचें निजवर्म । झाला ‘पंचविषय’ परम ।

विषयभोगादि क्रिया कर्म । स्वयें ‘स्वधर्म’ हो‍ऊनि ठेला ॥ ९९ ॥

तिनी गुणांचें जन्मकारण । झाला ‘महत्तत्व-सूत्रप्रधान’ ।

एवं संसार अवघा जाण । ईश्वर आपण स्वयें झाला ॥ २०० ॥

त्या संसाराची आधावती । गुणसाम्यें तोचि ‘प्रकृति’ ।

तेथ उत्पत्तिस्थिति-प्रळयार्थी । क्षोभिकाशक्ति ‘काळ’ तो झाला ॥ १ ॥

तो काळ आपल्या सत्ताशक्तीं । उपजवी पाळी संहारी अंतीं ।

ऐशा पुनःपुनः आवृत्ती । जेणें किती करवीत ॥ २ ॥

एवं संसार तो ब्रह्मस्फूर्ति । लीलाविग्रहें साकारस्थिती ।

मी विश्वेश्वर विश्वमूर्ती । बहुधा व्यक्ती मी एक ॥ ३ ॥

यालागीं जो जो पदार्थ दिसे । तेणें तेणें रूपें आत्मा भासे ।

मजवेगळा पदार्थ नसें । हें मानी विश्वासें तो धन्य ॥ ४ ॥

मीचि एक बहुधा व्यक्ती । वेदही साक्षी येचि अर्थीं ।

‘विश्वतश्चक्षु’ या वेदोक्तीं । श्रुति मज गाती सर्वदा ॥ ५ ॥

ऐसें असतां नवल कैसें । जीव भुलला कल्पनावशें ।

अहतां वाढवी देहाध्यासें । तो म्हणे देव न दिसे तिहीं लोकीं ॥ ६ ॥

सत्य मानूनि भेदभान । जीव झाला अति‌अज्ञान ।

भुलला आपण्या आपण । देहाभिमान दृढ झाला ॥ ७ ॥

देहाभिमानाचें दृढपणा । तेंचि ‘बद्धतेचें लक्षण’ ।

देहाभिमानाचें निरसन । ‘मुक्तता’ जाण ती नांव ॥ ८ ॥

समूळ मिथ्या देहाभिमान । मिथ्या भेदाचें भवभान ।

त्याचें आद्यंत निर्दळण । होतें लक्षण हरि सांगे ॥ ९ ॥

 

अमूलमेतद्‌ बहुरूपरूपितं

मनोवचःप्राणशरीरकर्म ।

ज्ञानासिनोपासनया शितेन

च्छित्वा मुनिर्गां विचरत्यतृष्णः ॥ १७ ॥

 

भेदरूपें भवभान । मनसा वाचा कर्म प्राण ।

देहद्वयाचें जें स्फूरण । तें निर्मूळ जाण उद्धवा ॥ २१० ॥

भेदें बहुरूप भवपटळ । विचारितां तें निर्मूळ ।

विचित्र भासावया भवजाळ । आत्म्यावेगळें स्थळ असेना ॥ ११ ॥

आत्म्याहूनि संसार भिन्नं । म्हणती ते केवळ अज्ञान ।

त्यांसी बहुरूपें भवभान । देहभिमान वाढवी ॥ १२ ॥

त्यादेहाभिमानाचे पोटीं । कर्माकर्मांची आटाटी ।

जन्ममरणांचिया कोटी । दुःख संकटीं जीव भोगी ॥ १३ ॥

ऐसा दुःखादाता देहाभिमान । समूळ जाणोनियां आपण ।

त्याचें करावया निर्दळण । अनुतापी पूर्ण जो स्वयें होय ॥ १४ ॥

तेणें आचार्यौपास्ती । लाहोनि ज्ञानखड्‍गाची प्राप्ती ।

गुरुवाक्यसाहणेप्रती । सतेजद्युती खड्‍ग केलें ॥ १५ ॥

भववृक्षाचा समूळ कंद । देहाभिमान अतिसुबद्ध ।

अद्वैतसाधनें साधक शुद्ध । तेणें समूळ छेद करावा ॥ १६ ॥

एवं छेदूनि देहाभिमान । उरलेनि आयुष्यें जाण ।

मही विचरती सज्जन । निरभिमान निजनिष्ठा ॥ १७ ॥

तेथ इच्छा निंदा द्वेष तृष्णा । सर्वथा नातळें पैं जाणा ।

मनचि मुकलें मनपणा । इच्छादि तृष्णा तेथ कैंची ॥ १८ ॥आशंका ॥

समूळ संसारनिर्दळण । करी ऐसें तें ज्ञान कोण ।

त्या ज्ञानासी कोण साधन । साधल्या ज्ञान फल काय ॥ १९ ॥

याचें समूळ श्रवण । उद्धवाचें वांछी मन ।

तें जाणोनियां श्रीकृष्ण । स्वयें निरूपण सांगत ॥ २२० ॥

 

ज्ञानं विवेको निगमस्तपश्च

प्रत्यक्षमैतिह्यमथानुमानम्‌ ।

आद्यन्तयोरस्य यदेव केवलं

कालश्च हेतुश्च तदेव मध्ये ॥ १८ ॥

 

नित्यनित्यविवेक । या नांव ‘ज्ञान’ चोख ।

देहद्वयाचा प्रकाशक । आत्मा सम्यक जाणती ज्ञाते ॥ २१ ॥

सेवावया स्वादरस-नव्हाळी । प्रथम उंसाचीं पानें साळी ।

मग ऊंस तोही बळें पिळी । तोही रस आळीं तैं शर्करा लाभे ॥ २२ ॥

तेहि शर्करा परिपाकबळें । तैं साखरचि केवळें ।

केळें आणि नारेळें । करिती नाना फळें मूळींच्या गोड्या ॥ २३ ॥

तेवीं स्थूळाचें निराकरण । लिंगदेहाचें उपमर्दन ।

अहंकाराचें निर्दळण । करूनि पूर्ण ब्रह्म पावती ज्ञाते ॥ २४ ॥

तें ब्रह्म निर्गुण निराकार । तद्‌रूपें देखती चराचर ।

यापरी विवेकचतुर । वस्तूचा निर्धार जाणती ॥ २५ ॥

यापरी गा विचक्षण । जाणती वस्तूचें लक्षण ।

या नांव पैं ‘विवेकज्ञान’ । उद्धवा जाण निश्चित ॥ २६ ॥

वस्तु निःशब्द निर्गण । तेथ जें श्रतिचें स्फुरण ।

इत्थंभूत शब्दज्ञान । वेद तो जाण निगम माझा ॥ २७ ॥

तो मी वेदरूप नारायण । यालागीं वेदवचन प्रमाण ।

श्रुत्यर्थ शब्दज्ञान । करी पावन पाठकां ॥ २८ ॥

जाणावया निजात्मस्वरूप । देहादि विषयांचा अनुताप ।

जेणें साधक होती निष्पाप । या नांव ‘तप’ उद्धवा ॥ २९ ॥

अनुतापें दमितां मन । होय पापाचें क्षालन ।

तेव्हां श्रुत्यर्थे आपण । कल्पी ‘अनुमान’ वस्तूचें ॥ २३० ॥

देह जड मूढ अचेतन । तेथ चेतनात्मक नारायण ।

देहाचें मानूनि मिथ्यापण । अद्वैतीं मन मुसावे ॥ ३१ ॥

तें अद्वैतप्राप्तीचें लक्षण । अनन्यभावें आपण ।

सद्गुरूसी रिघावें शरण । निरभिमान भावार्थें ॥ ३२ ॥

सद्भावें अनन्यशरण । तो गुरुकृपा पावे आपण ।

पाहोनि अधिकारलक्षण । गुरु गुह्यज्ञान उपदेशी ॥ ३३ ॥

‘सर्वही निष्टंक परब्रह्म’ । हें श्रुतिगुह्य उत्तमोत्तम ।

एथ भाग्यें जो सभाग्य परम । त्यासाचि सुगम ठसावे ॥ ३४ ॥

गुरुवचन पडतां कानीं । वृत्ति निजात्मसमाधानीं ।

विनटोनि ठेली चिद्धनीं । सुखसमाधानीं स्वानंदें ॥ ३५ ॥

तयासी पुढतीं साधन । अथवा कर्माचें कर्माचरण ।

तेथ बोलों शके कोण । वेदीं मौन घेतलें ॥ ३६ ॥

जेथ द्वंद्वाची निमाली निमाली स्फूर्ती । सकळ दुःखांची समाप्ती ।

देहीं विदेहवस्तुप्राप्ती । ‘प्रत्यक्ष’ म्हणती या नांव ॥ ३७ ॥

पुसूनियां विसरावा ठावो ठावो । आठवेंवीण नित्य आठवो ।

अखंड स्यरूपानुभवो । ‘प्रत्यक्ष’ पहा हो या नांव ॥ ३८ ॥

मी आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वें परमानंद ।

‘प्रत्यक्ष’ पदाचा हा निजबोध । स्वयें गोवींद बोलिला ॥ ३९ ॥

हाचि बोध सभाग्याकडे । श्रवणमात्रें त्या आतुडे ।

एका मननें जोडे । एका सांपडे निधिध्यासें ॥ २४० ॥

एकासी तो प्रत्यगावृत्तीं । हा बोध ठसावे चित्तीं ।

एका माझिया अद्वैतभक्तीं । मी सगळा श्रीपति आतुडें ॥ ४१ ॥

निजबोध साधावया पूर्ण । उद्धवा हें तों मुख्य साधन ।

एवं साधलिया निजज्ञान । फळ कोण तें ऐक ॥ ४२ ॥

जो मी सृष्टि‌आदि अनंतु । नित्यमुक्तत्वें अहेतु ।

तो मी भवमूळा मूळहेतु । सृष्टिसृजिता अच्युतु स्वलीला ॥ ४३ ॥

तेथ रजोगुणाचिये स्थिती । स्त्रष्टरूपें मीचि पुढतीं ।

अद्वैतीं दावीं अनेक व्यक्ती । सृष्टि‌उत्पत्तिकर्ता तो मी ॥ ४४ ॥

जैसें मूळेंवीण सफळ झाड । वाढविलें निजांगीं गोड ।

तेवीं सृष्टिसंरक्षणीं कोड । मज निचाडा चाड प्रतिपालनीं ॥ ४५ ॥

बुद्धिबळें एक काष्ठाचे पोटीं । तेथ राजा प्रधान पशु प्यादा उठी ।

त्यांसी पूर्वकर्म नाहीं गांठीं । तेवीं निष्कर्मे सृष्टिप्रकाशिता तो मी ॥ ४६ ॥

निष्कर्मे जग समस्त । सृजिता मीमांसकमत ।

ठकोनि ठेलें निश्चित । जग सदोदित निष्कर्मब्रह्म ॥ ४७ ॥

जेवीं बुद्धिबळांचा खेळ । अचेतनीं युद्ध प्रबळ ।

तेवीं लोकरक्षणीं कळवळ । सृष्टिप्रतिपाळ मी कर्ता ॥ ४८ ॥

प्रकृतीच्या जडमूढ सारी । पुरुषाचेनि सचेतन निर्धारीं ।

काळफांसे घे‌ऊनि करीं । खेळविता चराचरीं मी एक विष्णु ॥ ४९ ॥

तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं ।

एका जैत एक हारी । उभयपक्षांतरीं खेळविता मी ॥ २५० ॥

सोंगटीं निमलियापाठीं । कवण पुण्यात्मा चढे वैकुंठीं ।

कोण पडे नरकसंकटीं । तैसा जाण सृष्टीं बंधमोक्ष ॥ ५१ ॥

तेवीं न मोडतां एकलेपण । त्या खेळाच्या ऐसें जाण ।

जगाचें करीं मी पालन । दुजेंपण नातळतां ॥ ५२ ॥

दोराचा सर्पाकार । सबळ बळें मारी वीर ।

तैसा सृष्टीसी संहार । मी प्रळयरुद्र पैं कर्ता ॥ ५३ ॥

स्वप्नीं भासलें जग संपूर्ण । तेथूनि जागा होतां आपण ।

स्वप्न निर्दळितां कष्ट कोण । तैसा मी जाण प्रळयकर्ता ॥ ५४ ॥

सृष्टिसी उत्पत्ति स्थिति निदान । आत्मा आत्मत्वें अखंड पूर्ण ।

तेंचि स्वरूप सज्ञान । स्वानुभवें आपण हो‍ऊनि ठेलें ॥ ५५ ॥

तें निजरूप झालों म्हणणें । हेंही बोलणें लाजिरवाणें ।

तें स्वयंभ असतां ब्रह्मपणें । होणें न होणें भ्रममात्र ॥ ५६ ॥

मिथ्या दोराचा सर्पाकार । भासतां तो असे दोर ।

निवर्तल्या सर्पभरभार । दोर तो दोर दोररूपें ॥ ५७ ॥

तेवीं सृष्टीसी उत्पत्ति होतां । आत्मा जन्मेना तत्त्वतां ।

सृष्टीचा प्रतिपाळकर्ता । आत्मा सर्वथा वाढेना ॥ ५८ ॥

सृष्टीसी महाप्रळय होतां । आत्मा नायके प्रळयवर्ता ।

उत्पत्तिस्थितिनिदानता । आत्मा तत्त्वतां अविकारी ॥ ५९ ॥

एवं साधनीं सधूनि ज्ञान । साधक झाले सज्ञान ।

तें अबाधित ब्रह्म पूर्ण । स्वयें आपण हो‍ऊनि ठेले ॥ २६० ॥

अज अव्यय स्वानंदघन । साधक झाले ब्रह्म पूर्ण ।

हें ज्ञानाचें फळ संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६१ ॥

हें ज्ञानफळ आलिया हाता । उत्पत्ति स्थिति प्रळय होतां ।

अखंड परिपूर्ण निजात्मता । ते सदृष्टांता हरि सांगे ॥ ६२ ॥

 

यथा हिरण्यं स्वकृतं पुरस्तात्‌

पश्चाच्च सर्वस्य हिरण्मयस्य ।

तदेव मध्ये व्यवहार्यमाणं

नानापदेशैरहमस्य तद्वत्‌ ॥ १९ ॥

 

मुकुट कुंडले करकंकणें । न घडितां सोनें सोनेपणें ।

त्याचीं करितां नाना भूषणे । लेणेंपणें उणें नव्हेचि हेम ॥ ६३ ॥

ते न मोडतां अळंकारठसे । सोनें अविकार संचलें असे ।

तेवीं उत्पत्तिस्थितिविनाशें । माझें स्वरूप चिदंशें अविनाशी ॥ ६४ ॥

माझें स्वरूप शुद्ध परब्रह्म । तेथ नाना रूप नाना नाम ।

भासतांही जग विषम । ब्रह्मरस समसाम्यें ॥ ६५ ॥

जेवीं सूर्याचे किरण । सूर्यावेगळे नव्हती जाण ।

तेवीं जग मजशीं अभिन्न । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ६६ ॥

 

विज्ञानमेतत्‌ त्रियवस्थमङ्ग

गुणत्रयं कारणकार्यकर्तृ ।

समन्वयेन व्यतिरेकतश्च

येनैव तुर्येण तदेव सत्यम्‌ ॥ २० ॥

 

सत्त्वगुणें जागरण । रजोगुणें दिसे स्वप्न ।

तमोगुणें सुषुप्ति जाण । लागे संपूर्ण गाढ मूढ ॥ ६७ ॥

ऐसें तिहीं अवस्थायुक्त मन । कार्य कर्तृत्व कारण ।

त्रिविध जग भासे संपूर्ण । ब्रह्म समन्वयें जाण सदोदित ॥ ६८ ॥

मृत्तिकेवेगळा घट न दिसे । तंतूवेगळा पट न प्रकाशे ।

तेवीं मजवेगळें जग नसें । जें जें भासे तें मद्‌रूप ॥ ६९ ॥

जो मी तिनी गुणांतें नातळता । अवस्थात्रयातें नाकळता ।

तिंही अवस्थांतें प्रकाशिता । तो मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ २७० ॥

तिन्ही अवस्था तिन्ही गुण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन ।

त्रिपुटीप्रकाशिता पूर्ण । ती मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ ७१ ॥

जो मी तुरीय सच्चिद्धन । त्या माझ्या ठायीं अवस्थागुण ।

नभीं नीळिमा मिथ्या भान । तैसे नसते जाण भासती ॥ ७२ ॥ आशंका ॥

‘तिंही अवस्थांचें ज्ञान पाहीं । देखिजे समस्तांच्या ठायीं ।

चवथें ज्ञान ‘तुरीय’ कांहीं । ऐकिलें नाहीं गोविंदा’ ॥ ७३ ॥

चौथे ज्ञान तुरीयावस्था । मिथ्या म्हणसी न विचारतां ।

तेचिविखीं विशदार्था । श्रीकृष्ण तत्त्वतां सांगत ॥ ७४ ॥ ‘व्यक्तिरेकतश्च’ ॥

देहादिप्रपंचव्यतिरेकता । भूतीं भूतांचा लयो पाहतां ।

लीन झालिया गुणावस्था । उरे मी चवथा ‘तुरीय’ ॥ ७५ ॥

तें एवंविध बोलों जातां । वेदीं मूग आरोगिले सर्वथा ।

हें अनुबवैकवेद्य तत्त्वतां । शब्दप्रगल्भता सरेना ॥ ७६ ॥

एथ न चले युक्तिप्रयुक्ती । न चले जाणिवेची व्युत्पत्ती ।

न चले लक्ष्यलक्षणस्थिति । गुरुकृपाप्राप्ती ‘तुरीय’ ॥ ७७ ॥

जागृत्यादि सर्वही सत्ता । सुषुप्ति सर्वही असतां ।

याचा ‘तुरीय’ मी प्रकाशिता । मजविण सर्वथा त्या भासती केवीं ॥ ७८ ॥

जो सुषुप्तीं साक्षित्व पावता । तो मी ‘तुरीय’ जाण पां चौथा ।

त्या मज सत्यस्वरूपता । केला निश्चितार्था निश्चयो वेदें ॥ ७९ ॥

त्या स्वरूपावेगळें एथ । जें भासे तें मिथ्याभूत ।

तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ २८० ॥

 

न यत्‌ पुरस्तादुत यन्न पश्चात्‌

मध्ये च तन्न व्यपदेशमात्रम्‌ ।

भूतं प्रसिद्धं च परेण यद्यद्‌

तदेव तत्स्यादिति मे मनीषा ॥ २१ ॥

 

जागृतीमाजीं जें जें दिसे । तें तें जागृतीसवें नासे ।

स्वप्नीं जें जें आभासे । तें स्वप्नासरिसें मावळे ॥ ८१ ॥

जागृती स्वप्न निकार्येंसीं । दोनी हारपती सुषुप्तीपाशीं ।

सुषुप्ती हारपे जागृतीसीं । यापरी प्रपंचासी सत्यत्व नाहीं ॥ ८२ ॥

प्रपंच सृष्टीपूर्वीं नाहीं । प्रळयानंतर नुरेचि कांहीं ।

मध्येंचि आभासे जें कांहीं । तें मिथ्या पाहीं असंत ॥ ८३ ॥

प्रपंचाचें वोडंबर । नामरूपाचे उभारी भार ।

तें प्रयक्ष देखों नश्वर । गंधर्वनगर तत्प्राय ॥ ८४ ॥

पित्यादेखतां पुत्र मरे । पुत्रादेखतां पिता झुरे ।

काळें काळ अवघेंचि सरे । कोणीही नुरे क्रियेसी ॥ ८५ ॥

सागरीं जे लहरी उसासे । उसासली ते स्वयेंचि नासे ।

तेवीं नामरूपा आलें दिसे । तें अनायासें नश्वर ॥ ८६ ॥

प्रपंच हें नाममात्र । येरवीं परमात्मा मी स्वतंत्र ।

एवं संसाराचें जन्मपत्र । नेणोनि दुस्तर मानिती जीव ॥ ८७ ॥

प्रपंच ज्यापासूनि झाला । जेणें सर्वार्थीं प्रकाशिला ।

अंतीं ज्यामाजीं सामावला । तो तद्‌रूप संचला निजात्मा ॥ ८८ ॥

शुक्तिकारजतन्यायें जाण । प्रपंच ब्रह्मेंसीं अभिन्न ।

जें प्रपंचाचे स्फुरे स्फुरण । तें ब्रह्मचि पूर्ण उद्धवा ॥ ८९ ॥

त्या माझेनि सत्य श्रेतिस्मृती । तो मी सत्यपदीज्ञ श्रीपती ।

त्रिसत्य सत्य तुजप्रती । सांगितला निश्चितीं निजभावार्थ ॥ २९० ॥

ऐकोन देवाचें वचन । उद्धव आशंकी आपण ।

एकाचेनि मतें जाण । प्रपंच भिन्न मानिती ॥ ९१ ॥

प्रपंचासी देवो कांहीं । निजांगीं आतळत नाहीं ।

ऐसें तूं कल्पिसी कांहीं । ऐक तेविषयीं सांगेन ॥ ९२ ॥

 

अविद्यमानोऽप्यवभासते यो

वैकारिको राजससर्ग एषः ।

ब्रह्म स्वयंज्योतिरतो विभाति

ब्रह्मेन्द्रियार्थात्मविकारचित्रम्‌ ॥ २२ ॥

 

मुख्यत्वें मन विकारी पूर्ण । त्यासी मिळूनि तिनी गूण ।

नसताचि संसार जाण । विचित्रा भरण दाखवी ॥ ९३ ॥

मन बुद्धि चित्ता अहंकार । आणि अधिष्ठाते सुरवर ।

हे सत्त्वगुणाचे विकार । जाण साचार उद्धवा ॥ ९४ ॥

रजोगुणाचीं दशेंद्रियें । पंचभूतें पंचविषये ।

तमोगुणिया जन्म होये । ते जनासी पाहें भुलविती ॥ ९५ ॥

जेवीं वोडंबरियाचा खेळ । नसताचि भासे प्रबळ ।

तेवीं त्रिगुणांचें विचित्र जाण । मिथ्या निर्मूळ आभासे ॥ ९६ ॥

ब्रह्म स्वयें अकारण । स्वप्रकाशें प्रकाशमान ।

तेंचि प्रपंचाचें महाकारण । प्रकाशक जाण स्वयें झालें ॥ ९७ ॥

जेवीं छायामंडपींच्या नाना व्यक्ती । तद्‌रूप भासे दीपदीप्तीं ।

तेवीं जगदाकारें स्वयंज्योती । भासें मी चिन्मूर्ति परमात्मा ॥ ९८ ॥

एवं प्रपंचाचें जें स्फूरण । तें स्वप्रकाश ब्रह्म पूर्ण ।

हें हातवसूनि ब्रह्मज्ञान । विकल्पच्छेदन हरि सांगे । ९९ ॥

 

एवं स्फुटं ब्रह्म विवेकहेतुभिः

परापवादेन विशारदेन ।

छित्त्वाऽत्मसन्देहमुपारमेत

स्वानन्दतुष्टोऽखिलकामुकेभ्यः ॥ २३ ॥

 

पूर्वीं बोलिलों यथानिगुती । ब्रह्मज्ञान नानायुक्तीं ।

ते करतलामलकस्थिती । प्रकट प्रतीती प्रमाण ॥ ३०० ॥

वेद-विवेक-अनुमान । ब्रह्म‍उपदेशाचें लक्षण ।

ज्ञानाज्ञानाचें फळ पूर्ण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ १ ॥

तेथें देहेंद्रियांचें मिथ्यापण । देहात्मभावाचें निराकरण ।

ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेंहि गुह्य ज्ञान पकाशिलें ॥ २ ॥

म्यां प्रकाशिलें पूर्ण ज्ञान । जें दुर्लभ दुर्गम दुष्प्राप्य जाण ।

हेंचि सिद्धांचें समाधान । हेंचि साधन साधकां ॥ ३ ॥

जें म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । हेंचि उपदेशशस्त्र तीक्षण ।

साधक साधूनियां पूर्ण । संशय जाण छेदिती ॥ ४ ॥

म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । तेथ संदेह मानी मन ।

तेणें संदेहेंसीं देहाभिमन । येणें शस्त्रें जाण्‌ छेदिती ॥ ५ ॥

यापरी संदेहच्छेदन । करूनि द्वैताची बोळवन ।

निर्दाळूनियां मीतूंपण । स्वानंदीं निमग्न साधक ॥ ६ ॥

वर्णाश्रम कुळ जाती । जीवशिवादि पदस्थिती ।

यांची स्फुरेना अहंकृती । या नांव ‘उत्परति’ उद्धवा ॥ ७ ॥

इहमूत्रादि फळें समस्तें । कोण कामी त्या कामातें ।

विषय विषयी विषयभोगातें । सर्वथा तेथें असेना ॥ ८ ।

यापरी नित्य निष्काम । साधक झाले ‘आत्माराम’ ।

परमानंदीं निमग्न परम । पावले ‘उपरम’ येणें योगें ॥ ९ ॥

देहेंद्रियें असतां प्राण । कैसेनि गेला देहाभिमान ।

उद्धवा ऐसें कल्पील मन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३१० ॥

 

नात्मा वपुः पार्थिवमिन्द्रियाणि

देवा ह्यसुर्वायुजलं हुताशः ।

मनोऽन्नमात्रं धिषणा च सत्त्वं

अहङ्कृतिः खं क्षितिरर्थसाम्यम्‌ ॥ २४ ॥

 

देह आत्मा नव्हे पार्थिवपणें । इंद्रियें आत्मा नव्हतीं येणें गुणें ।

तीं तंव देहाचीं उपकरणें । एकदेशीपणें व्यापार ॥ ११ ॥

इंद्रियाधिष्ठाते देव । तेही आत्मा नव्हती सर्व ।

त्यांसी इंद्रियांचा अहंभाव । आत्मपदीं ठाव त्यां कैंचा ॥ १२ ॥

देह चाळिता जो प्राण । तोही आत्मा नव्हे जाण ।

प्राण केवळ अज्ञान । करी गमनागमन देहवशें ॥ १३ ॥

प्राण जरी आत्मा होता । तरी तो देहासवें न वचता ।

यालागीं प्राणासी निजात्मता जाण सर्वथा घडेना ॥ १४ ॥

आत्मा पृथ्वी नव्हे जडपणें । जळ नव्हे द्रवत्वगुणें ।

अग्नि नव्हे दाहकपणें । चंचळपणें नव्हे वायु ॥ १५ ॥

आत्मा नभ नव्हे शून्यपणें । मन नव्हे संकल्पगुणें ।

अंतःकरण नव्हे नश्वरलक्षणें । चित्त चिंतनें नव्हे आत्मा ॥ १६ ॥

आत्मा नव्हे अभिमान । त्यासी सुखदुःखांचें बंधन ।

बुद्धि आत्मा नव्हे जाण । बोधकपण तीमाजीं ॥ १७ ॥

आत्मा नव्हे तिनी गुण । गुणांमाजीं विकार पूर्ण ।

महत्तत्व गुणांचें कारण । तें आत्मा आपण कदा नव्हे ॥ १८ ॥

प्रकृति जे गुणसाम्यावस्था । तेही आत्मा नव्हे तत्त्वतां ।

आत्मदृष्टीं प्रकृति पाहतां । मिथ्या तत्त्वतां ते होय ॥ १९ ॥

जेथ मूळप्रकृतिचा वावो । तेथ प्रकृतिकार्यां कैंचा ठावो ।

यापरी आत्मानुभवो । निःसंदेहो भोगिती ॥ ३२० ॥

यापरी साधूनियां ज्ञान । साधकीं छेदिला देहाभिमान ।

ऐसे हो‍ऊनियां निरभिमान । सदा सुखसंपन्न साधक ॥ २१ ॥

एवं जे नित्य निरभिमान । त्यांसी प्रारब्धें विषयसेवन ।

करितां न बाधी दोषगुण । त्‌ंचि निरूपण हरि सांगे । २२ ॥

 

समाहितैः कः करणैर्गुणात्मभिः

गुणो भ‌एन्मत्सुविविक्तधाम्नः ।

विक्षिप्यमाणैरुत किं न दूषणं

घनैरुपेतैर्विगतै रवेः किम्‌ ॥ २५ ॥

 

देहेंद्रियावेगळा पाहीं । अपरोक्ष आत्मा जाणितला जिंहीं ।

त्यांसी इंद्रियनेमें लाभ कायी । विक्षेपें नाहीं हानी त्यांसी ॥ २३ ॥

दोराचा साप खिळोनि मंत्रीं । मंत्रवादी निःशंक धरी ।

न खिळितां जो धरी करीं । तासीही न करी बाधा तो ॥ २४ ॥

जो मृगजळीं पोहोनि गेला । तो दैवाचा कडे पडिला ।

पोहेचिना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐलतीरा ॥ २५ ॥

तेवीं देहेंद्रियांचें मिथ्याभान । जाणोनि झाले ते सज्ञान ।

त्यांसी इंद्रियांचें बंधन । सर्वथा जाण अनुपेगी ॥ २६ ॥

जयासी माझें अपरोक्ष ज्ञान । तेणें घालोनियां आसन ।

अखंड धरितां ध्यान । अधिक उपेग जाण असेना ॥ २७ ॥

जेवीं मी लीलाविग्रहधारी । तेवीं तेही वर्ततां शरिरीं ।

ते इंद्रियकर्मावारीं । भवसागरीं न बुडती ॥ २८ ॥

अथवा तो इंद्रियसंगतीं । दैवें अनेक विषयप्राप्ती ।

भोगितांही अहोरातीं । ब्रह्मस्थिति भंगेना ॥ २९ ॥

स्थिति न भंगवया हेंचि कारण । माझें स्वप्रकाश स्वानंदघन ।

पावले निजधाम ब्रह्म पूर्ण । तेथ विषयस्फुरण बाधीना ॥ ३३० ॥

जेवीं सूर्य उगवोनि गगनीं । लोक सोडवी निद्रेपासूनी ।

ते कर्मीं प्रवर्तवोनी । अलिप्त दिनमणि जनकर्मा ॥ ३१ ॥

तेवीं मी परमात्मा स्वयंजोती । प्रभा प्रकाशीं त्रिजगतीं ।

त्या जनकर्मांच्या क्रियाशक्ती । मी अलिप्त निश्चितीं निजात्मा ॥ ३२ ॥

मुक्तासी स्त्रीपुत्रगृहसंग । तेणें वेष्टला दिसे चांग ।

म्हणसी केवीं मानूं निःसंग । तें सांगे श्रीरंग रविदृष्टातें ॥ ३३ ॥

 

घनैरुपेतैर्विगतै रवेः किम्‌ ॥

 

उंच लक्षयोजनें रविमंडळ । बारा योजनें मेघपडळ ।

तेणें सूर्य झांकोळिला केवळ । लोक सकळ मानिती ॥ ३४ ॥

परी सूर्य आणि आभाळासी । भेटी नाहीं कल्पांतेंसीं ।

तेवीं इंद्रियकर्म सज्ञानासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ३५ ॥

अभ्र आच्छादी जगाचे डोळे । जग म्हणे सूर्य आच्छादिला आभाळें ।

ऐसेंचि विपरीत ज्ञान कळे । मायामेळें भ्रांतासी ॥ ३६ ॥

तें अभ्र आल्या गेल्यापाठीं । सूर्यासी न पडे आठीवेठी ।

तेवीं गृहदारासंगासाठीं । न पडे संकटीं सज्ञान ॥ ३७ ॥

जेवीं सूर्यातें नातळे आभाळ । तेवीं ज्ञात्यासी संग सकळ ।

इंद्रियकर्मांचा विटाळ । ज्ञात्यासी अळुमाळ लागेना ॥ ३८ ॥

ऐक त्या ज्ञात्याचें रूप परम । तो देहीं असोनि परब्रह्म ।

यालागीं त्यासी इंद्रियकर्म । समविषय बाधीना ॥ ३९ ॥

ज्ञाता सर्वार्थीं अलिप्त । तेंचि करावया सुनिश्चित ।

आकाश दृष्टांतें श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत साक्षेपें ॥ ३४० ॥

 

यथा नभो वाय्वनलाम्बुभूगुणै

गतागतैर्वर्तुगुणौर्न सज्जते ॥

तथाक्षरं सत्तरजस्तमोमलैः

अहंमतेः संसृतिहेतुभिः परम्‌ ॥ २६ ॥

 

पृथ्वी जळ अनळ अनिळ । त्यांसी नभ व्यापक सकळ ।

परी पृथ्व्यादिकांचा मळ । नभासी अळुमाळ लागेना ॥ ४१ ॥

नभ पृथ्वीरजें कदा न मैळे । धुरकटेना धोमकल्लोळें ।

अग्नीचेनि महाज्वाळें । कदाकाळें जळेना ॥ ४२ ॥

वायुचेनि अतिझडाडें । आकाश कदाकाळें न उडे ।

उदकाचेनि अतिचढें । आकाश न बुडे सर्वथा ॥ ४३ ॥

कां सूर्याचे निदाघकिरणीं । नभ घामेजेना उन्हाळेनी ।

अथवा हिमाचिया हिमकणीं । नभ कांकडोनी हिंवेना ॥ ४४ ॥

पर्जन्य वर्षतां प्रबळ । नभ वोलें नव्हे अळुमाळ ।

यापरी नभ निर्मळ । लावितांही मळ लागेना ॥ ४५ ॥

त्या आकाशासी अलिप्त । जें क्षराक्षरही अतीत ।

तें अक्षर परब्रह्म सदोदित । त्रिगुणातीत चिन्मात्र ॥ ४६ ॥

जें अजरामर अविनाशी । जें प्रकाशमान स्वप्रकाशीं ।

ऐसिये वस्तूची प्राप्ती ज्यासी । अद्वयत्वेंसी फावली ॥ ४७ ॥

जेवीं न मोडितां लागवेगें । सोनटका सोनें झाला सर्वांगें ।

तेवीं करणीवीण येणें योगें । जे झाले निजांगें परब्रह्म ॥ ४८ ॥

त्यांसी गुणांची त्रिगुण मागी । लवितांही न ल्गे अंगीं ।

विषयी करितां विषयभोगीं । ते विषयसांगीं निःसंग ॥ ४९ ॥

घटी चंद्रबिंब दिसे । तें घटासी स्पर्शेलें नसे ।

ओलें नव्हें जळरसें । देहीं जीव असे अलिप्त तैसा ॥ ३५० ॥

ते घटी कालविल्या शेण । बिंबप्रतिबिंबां नातळे जाण ।

तेवी देहींचें पापाचरण । जीवशिवस्थान ठाकीना ॥ ५१ ॥

घटीं कालविल्या कस्तूरी । बिंबप्रतिबिंब सुवास न धरी ।

तेवीं देहींच्या पापपुण्याची थोरी । जीवशिवावरी पावेना ॥ ५२ ॥

आकाश जळावयालागीं । घृते पेटविली महा‌आगी ।

आकाश असतां अग्निसंगीं । दाहो अंगीं लागेना ॥ ५३ ॥

आकाश असोनि अग्निमेळें । अग्निज्वाळे कदा न जळे ।

तेवीं ज्ञाता विषयकल्लोळें । कदा काळें विषयी नव्हे ॥ ५४ ॥

गुणांचेनि देहसंगे । योगी वर्तता येणें योगें ।

ते भोगितांही विषयभोगें । अलिप्त सर्वांगें सर्वदा ॥ ५५ ॥

हे कळलें ज्यां भोगवर्म । ते देहीं असोन परब्रह्म ।

त्यांसी बाधीना भोगभ्रम । अक्षर परम स्वयें झाले ॥ ५६ ॥

ते अक्षर झाले आतां । याही बोलासी ये लघुता ।

जन ज्ञानीं अज्ञानीं वर्तता । अक्षरता अभंग ॥ ५७ ॥

ते विसरोनि ब्रह्मरूपता । मी देही म्हणवी देह‍अहंता ।

तेथें वाढली विषयावस्था । दृढ बद्धता तेणें झाली ॥ ५८ ॥

ते निवारावया बद्धता । त्यजावी विषयलोलुपता ।

विषयत्यागेंवीण सर्वथा । नित्यमुक्तता घडे ना ॥ ५९ ॥

न जोडतां नित्यमुक्तता । साधक जरी झाला ज्ञाता ।

तरी तेणें ज्ञातेपणें सर्वथा । विषयासक्तता न करावी ॥ ३६० ॥

 

तथापि सङ्गः परिवर्जनीयो

गुणेषु मायारचितेषु तावत्‌ ।

मद्भक्तियोगेन दृढेन यावत्‌

रजो निरस्येत मनःकषायः ॥ २७ ॥

 

स्वरवर्णयुक्त संपूर्ण । चहूं वेदीं झाला निपुण ।

तेणें बळें विषयाचरण । करितां दारुण बाधक ॥ ६१ ॥

सकळ शास्त्रांचें श्रवण । करतळामलक झाल्या पूर्ण ।

शब्दज्ञानाचें जें मुक्तपण । तेणेंही विषयाचरण बाधक ॥ ६२ ॥

प्राणापनांचिया समता । जरी काळवंचन आली हाता ।

तरी विषयांची विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥ ६३ ॥

शापानुग्रहसमर्थ नर । आम्ही ज्ञाते मानूनि थोर ।

त्यांसही विषयसंचार । होय अपार बाधक ॥ ६४ ॥

आसन उडविती योगबळें । दाविती नाना सिद्धींचे सोहळे ।

त्यांसही विषयांचे भोगलळे । होती निजबळें बाधक ॥ ६५ ॥

इतरांची कोण कथा । मंत्रें मंत्रमूर्ति प्रसन्न असतां ।

त्यासीही विषयावस्था । जाण सरथा बाधक ॥ ६६ ॥

किंचित्‌ झाल्या स्वरूपप्राप्ती । ‘मी मुक्त’ हे स्फुरे स्फूर्ती ।

तथापि विषयांची संगती । त्यासाही निश्चितीं बाधक ॥ ६७ ॥

अभिमानाचें निर्दळण । स्वयें करूनियां आपण ।

नित्यमुक्त नव्हतां जाण । विषयाचरण बाधक ॥ ६८ ॥

जेवीं चकमकेची आगी । जाळूं न शके नाटॆलागीं ।

तेवीं ब्रह्मप्राप्ती प्रथमरंगीं । प्रपंचसंगीं विनाशे ॥ ६९ ॥

विषय मिथ्या मायिक । ते भोगीं जंव भासे हरिख ।

तंववरी विषय बाधक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ३७० ॥

तें त्यागावया विषयसेवन । निर्दळावा देहाभिमान ।

याचियालागीं माझें भजन । साक्षेपें जाण करावें ॥ ७१ ॥

व्रत तप तीर्थ दान । करितां योग याग यजन ।

वेदशास्त्र पुराणश्रवण । तेणें देहाभिमान ढळेना ॥ ७२ ॥

भावें करितां माझें भजन । समूळ सुटे देहाभिमान ।

भक्ती उत्तमोत्तम साधन । भक्ती‌आधीन परब्रह्म ॥ ७३ ॥

ज्ञान वैराग्य निवृत्ती । धृति शांति ब्रह्मस्थिती ।

यांची जननी माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७४ ॥

चहूं मुक्तींहूनि वरती । उल्हासें नांदे माझी भक्ती ।

माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी मी निश्चितीं आकळलों ॥ ७५ ॥

माझें स्वरूप अनंत अपार । तो मी भक्तीनें आकळलों साचार ।

यालागीं निजभक्तांचें द्वार । मी निरंतर सेवितसें ॥ ७६ ॥

भक्तीनें आकळलों जाण । यालागीं मी भक्ता‌अधीन ।

माझिये भक्तीचें महिमान । मजही संपूर्ण कळेना ॥ ७७ ॥

बहुतीं करूनि माझी भक्ती । मज ते मोक्षचि मागती ।

उपेक्षूनि चारी मुक्ती। करी मद्भक्ती तो धन्य ॥ ७८ ॥

ऐशी जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती ।

त्यासी सर्वस्वें मी श्रीपती । विकिलों निश्चितीं भावार्थें ॥ ७९ ॥

ते भक्तीच मुख्य ज्यास साधन । यालागीं मी त्या भक्ता‌अधीन ।

त्यांचे कदाकाळें वचन । मी अणुप्रमाण नुल्लंघीं ॥ ३८० ॥

ते मज म्हणती हो‌ईं सगुण । तैं मी सिंह सूकर होय आपण ।

त्यांलागीं मी विदेही जाण । होय संपूर्ण देहधारी ॥ ८१ ॥

एका अंबरीषाकारणें । दहा जन्म म्यां सोसणें ।

अजत्वाचा भंग साहणें । परी भक्तांसी उणें ये‌ऊं नेदीं ॥ ८२ ॥

द्रौपदी नग्न करितां तांतडी । तिळभरी हों नेदींच उघडी ।

झालों नेसविता वस्त्रें कोडी । भक्तसांकडीं मी निवारीं ॥ ८३ ॥

तो मी भक्तसाहाकारी । अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं ।

समही वर्ते अरिमित्रीं । भक्तकैवारी हो‍ऊनियां ॥ ८४ ॥

जो माझिया भक्तां हितकारी । तो मज परम मित्र संसारीं ।

जो माझ्या भक्तांसी वैर करी । तो मी नानापरी निर्दळीं ॥ ८५ ॥

ऐसा मी भक्तसाह्य श्रीकृष्ण । त्या माझें निजभजन ।

न करूनियां अभाग्य जन । अधःपतन पावती ॥ ८६ ॥

म्हणशी ‘पाप असतां शरीरीं । तुझें भजन घडे कैशा परी’ ।

सकळ पापांची बोहरी । माझें नाम करी निमेषार्धें ॥ ८७ ॥

ऐकोनि नामाचा गजर । पळे महापातकांचा संभार ।

नामापाशीं महापापासी थार । अणुमात्र असेना ॥ ८८ ॥

माझिया निजनामापुढें । सकळ पाप तत्काळ उडे ।

तें पाप नामस्मरत्याकडे । केवीं बापुडें ये‌ऊं शके ॥ ८९ ॥

अवचटें सूर्य अंधारीं बुडे । तरी पाप न ये भक्तांकडे ।

भक्तचरणरेणु जेथ पडे । तेथ समूळ उडे पापराशी ॥ ३९० ॥

माझें नाम ब्रह्मास्त्र जगीं । महापाप तें बापुडें मुंगी ।

नामापुढे उरावयालागीं । कस त्याचे अंगीं असेना ॥ ९१ ॥

माझे नामाचा प्रताप ऐसा । मा माझे भक्तीची कोण दशा ।

पडलिया मद्भक्तीचा ठसा । तो नागवे सहसा कळिकाळा ॥ ९२ ॥

यालागीं माझे भजन । निर्दळी देहाभिमान ।

माझे निजभजनेंवीण जाण । देहाभिमान तुटेना ॥ ९३ ॥

जेणें तुटे देहाभिमान । तें कैसें म्हणशी तुझें भजन ।

अभेदभावें भक्ती पूर्ण । तेणें तुटे देहाभिमान निर्दळे ॥ ९४ ॥

भगवद्भाव सर्वांभूतीं । या नांव गा ‘अभेदभक्ती’ ।

हे आकळल्या भजनस्थिती । अहंकृती उरेना ॥ ९५ ॥

माझें नाम ज्याचे वदनीं । माझी कीर्ति ज्याचे श्रवणीं ।

माझा भाव ज्याचे मनीं । ज्याचे करदिचरणीं क्रिया माझी ॥ ९६ ॥

जो जागृतीमाजीं पाहे मातें । जो स्वप्नीं देखे मज एकातें ।

जो मजवेगळें चित्त रितें । न राखे निश्चितें निजनिष्ठा ॥ ९७ ॥

यापरी भजनस्थितीं । त्रिगुण विकार मावळती ।

तेणें अहंकाराची निवृत्ती । विषयासक्ति निर्दळे ॥ ९८ ॥

भक्तांसी विषयसेवन । सर्वथा बाधक नव्हे जाण ।

तो विषय करी मदर्पण । तेणें बाधकपण नव्हे त्यासी ॥ ९९ ॥

नाना साधनें विषयो त्यागिती । त्यागितां परम दुःखी होती ।

भक्त विषयो भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥ ४०० ॥

ग्रासोग्रासीं हरिस्मरण । तैं अन्नचि होय परब्रह्म पूर्ण ।

त्यासी नाहीं बाधकपण । ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ १ ॥

भक्तांची भजनस्थिती । विषयीं मद्‌रूपता भाविती ।

तेणें मावळे विषयस्फूर्ती । नव्हे ती या रीतों बाधक ॥ २ ॥

यापरी माझें भजन । करी मनोमळक्षाळण ।

विकारेंसी तिन्ही गुण । करी निर्दळण देहाभिमान ॥ ३ ॥

ऐशी न करितां माझी भक्ती । न निर्दळितां अहंकृती ।

करणें जे विषयासक्ती । ते जाण निश्चितीं बाधक ॥ ४ ॥

नातुडतां अकर्तत्मबोध । आदरूं नये विषयसंबंध ।

विषयसंबंध विषय‍उद्बोध । अतिशुद्ध बाधक ॥ ५ ॥

जरी विषय मिथ्या मायिक । तरी साधकां अतिबाधक ।

येचि अर्थीं यदुनायक । विशदार्थें देख सांगत ॥ ६ ॥

 

यथाऽऽमयोऽसाधिचिकित्सितो नृणां

पुनः पुनः सन्तुदति प्ररोहान्‌ ।

एवं मनोऽपक्क कषायकर्म

कुयोगिनं विध्यति सर्वसङ्गम्‌ ॥ २८ ॥

 

वैद्य नेणे रोगाचें लक्षण । नेणे धातुपुष्ट कीं क्षीण ।

नेणे पथ्य ना अनुताप । नाडीज्ञान कळेना ॥ ७ ॥

त्यापासाव वोखद घेतां । पुनः पुनः वाढे व्यथा ।

तेवीं अवैराग्यें त्याग करितां । साधकां बाधकता अनिवार ॥ ८ ॥

हृदयीं नाहीं विषयनिवृत्ति । बाह्य त्यागें वाढवी विरक्ती ।

ऐशी जे बहिर्मुद्रास्थिती । ते जाण निश्चितीं ‘कुयोग’ ॥ ९ ॥

सांडोनियां भगवद्भजन । वेदविधि मार्गविहीन ।

ऐसें जें कां त्यागलक्षण । ‘कुयोग’ संपूर्ण त्या नांव ॥ ४१० ॥

द्रव्यदाराविषयासक्ती । दृढ वासना असतां चित्तीं ।

बाह्य त्याग मिथ्या विरक्ती । ‘कुयोग’ निश्चितीं या नांव ॥ ११ ॥

आम्ही राजयोगी अतिश्रेष्ठ । म्हणोनि विषय भोगी यथेष्ट ।

वोस पडली वैराग्यपेंठ । ‘कुयोग’ चोखट या नांव ॥ १२ ॥

आपली चोरूनि विषयासक्ती । बाह्य मिरवी मिथ्या विरक्ती ।

हेचि ‘कुयोगाची’ स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥

ऐशिया कुयोगियां जाण । पुढतीं जन्म पुढतीं मरण ।

दुःखावर्तीं पडिले पूर्ण । सोडवी कोण तयांसी ॥ १४ ॥

नव्हेचि इहलोकींचा विषयभोग । नव्हेचि परमार्थीं शुद्ध त्याग ।

अंतरला उभय प्रयोग । दुःखभाग कुयोग्या ॥ १५ ॥

परमार्थें त्यागसाधन । करितां अंतराय आलें विघ्न ।

तयासी अवगती नव्हे जाण । जरी अनुताप पूर्ण स्वयें उपजे ॥ १६ ॥

 

कुयोगिनो ये विहितान्तरायैः

मनुष्यभूतैस्त्रिदशोपसृष्टैः ।

ते प्राक्तनाभ्यासबलेन भूयो

युञ्जन्ति योगं न तु कर्मतन्त्रम्‌ ॥ २९ ॥

 

ब्रह्मज्ञानार्थ केला त्याग । अभ्यासही मांडिला साङ्ग ।

मध्येंचि वोढवला उपसर्ग । विघ्नें अनेग साधकां ॥ १७ ॥

उपजे कामाचा अतिवेग । खवळे क्रोधाची लगबग ।

शिष्यसुहदांचे उद्वेग । मनीं उबग स्वहिताचा ॥ १८ ॥

दारारूपें उपसर्ग । देव देती पैं अनेग ।

ऐसा अंतरायीं योगभंग । होतां अनुराग उद्धरी ॥ १९ ॥

अभ्यास करितां अतिनिगुती । दैवें अंतराय योगा येती ।

तेथ निर्वेद उपजल्या चित्तीं । तोचि अभ्यास पुढतीं करी योगी ॥ ४२० ॥

निजयोग अभ्यासबळें । जाळी अंतरायदोष समूळें ।

परी कर्माचीं कर्मठ जाळें । योगी कदाकाळें स्पर्शेना ॥ २१ ॥

अंतरायीं योग छळितां जाण । जरी योगी पावला मरण ।

तरी तो नव्हे कर्माधीन । हें श्लोकार्धें श्रीकृष्ण बोलिला स्वयें ॥ २२ ॥

पूर्वीं करितां योगसाधन । अदृष्टगतीं अंतराय जाण ।

योगी पावल्याही मरण । गती कोण तयासी ॥ २३ ॥

अंतरायपरतंत्र । झाल्या योगी पावे जन्ममात्र ।

तेथही नादरी कर्मतंत्र । पूर्वाभ्यासें स्वतंत्र प्रवर्ते योगी ॥ २४ ॥

मार्गस्था मार्गी गुंती । पडोनियां लगली वस्ती ।

तो येरे दिवसीं तेचि पंथीं । लागे निश्चितीं निजमार्गा ॥ २५ ॥

यापरी योगिया आपण । प्राक्तनसंस्कारें जाण ।

योगाभ्यास करी पूर्ण । परी कर्माधीन कदा नव्हे ॥ २६ ॥

साधनीं असतां माझी भक्ती । तैं अणुमात्र न पडे गुंती ।

मी भक्तकैवारी श्रीपती । राखें अहोरातीं निजभक्ता ॥ २७ ॥

जेथ माझे भक्तीची आवडी । तेथ विघ्नें केवीं रिघतीं बापुडीं ।

महाविघ्नांचिया कोडी । माझें नाम विभांडी उद्धवा ॥ २८ ॥

भजनहीन योगीश्वर । अंतरायें पावे जन्मांतर ।

तरी तो कर्मीं कर्मपर । नव्हे साचार पूर्वसंस्कारें ॥ २९ ॥

‘जे पावले जीव जीवन्मुक्ती । तेही प्रारब्धकर्में वर्तती ।

मा योगभ्रष्ट कर्म त्यागिती । घडे कैशा रीतीं’ म्हणशील ॥ ४३० ॥

मुक्ताचें जें मोक्षस्थान । तेंचि साधकाचें मुख्य साधन ।

यालागीं त्या दोघांही जाण । कर्मबंधन बाधीना ॥ ३१ ॥

मी एक कर्मकर्ता । ऐशी ज्यास नुपजे अहंता ।

त्यासीही जाण सर्वथा । कर्मबंधकता स्पर्शेना ॥ ३२ ॥

 

करोति कर्म क्रियते च जन्तुः

केनाप्यसौ चोदित आनिपातात्‌ ।

न तत्र विद्वान्‌ प्रकृतौ स्थितोऽपि

निवृत्ततृष्णः स्वसुखानुभूत्या ॥ ३० ॥

 

जन्मापासूनि मरणान्त । प्राणी जें जें कर्म करित ।

तें तें कोणी एक प्राचीन एथ । असे वर्तवीत निजसत्ता ॥ ३३ ॥

तेथ सज्ञान आणि अज्ञान । प्राचीन कर्में कर्माधीन ।

अज्ञानासी अहंकर्तेपण । ज्ञाते निरभिमान वर्तती कर्मीं ॥ ३४ ॥

म्हणसी देहीं असतां प्राण । केवीं नुठी देहाभिमान ।

ज्ञाता स्वसुखानुभवें पूर्ण । अहंकर्तेपण त्या स्फुरेना ॥ ३५ ॥

दोराचे सर्पाचा महाधाक । दोर जाणितल्या नुपजे देख ।

तेवीं अनुभविल्या ब्रह्मसुख । अहंता बाधक स्फुरेना ॥ ३६ ॥

ऐक योगभ्रष्टाचें लक्षण । त्याच्या प्राचीनसंस्कार जाण ।

उपजों नेदी देहाभिमान । योग संपूर्ण सिद्ध्यर्थ ॥ ३७ ॥

जें देहीं नित्य निरभिमान । तेचि ब्रह्मसुखें सदा संपन्न ।

त्यांसी देहींचें कर्माचरण । सर्वथा जाण बाधीना ॥ ३८ ॥

ज्ञाता देहकर्मासी अलिप्त । हेंही अपूर्व नव्हे एथ ।

तो देही असोनि देहातीत । तेंचि श्रीकृष्णनाथ स्वयें सांगे ॥ ३९ ॥

 

तिष्ठन्तमासीनमुत व्रजन्तं

शयानमुक्षन्तमदन्तमन्नम्‌ ।

स्वभावमन्यत्‌ किमपीहमानं

आत्मानमात्मस्थमतिर्न वेद ॥ ३१ ॥

 

देह उभें असतां जाण । ज्ञाता न देखे उभेंपण ।

मा बैसल्या बैसलेंपण । मानी कोण देहाचें ॥ ४४० ॥

परिपूर्ण ब्रह्माच्या ठायीं । उठणें बैसणें दोनी नाहीं ।

ज्ञाता तेंचि झाला पाहीं । उठबैस कांही जाणेना ॥ ४१ ॥

दोराचा सर्प उपजला । भोग भोगूनि स्वयें निमाला ।

सत्यत्व नाहीं या बोला । तैसा देहो झाला मुक्तासी ॥ ४२ ॥

देह दैवें असे एकदेशी । ज्ञाता सर्वीं देखे आपणासी ।

देह जातां परदेशासी । ज्ञाता गमन मानसीं देखेना ॥ ४३ ॥

वस्तु वस्तुत्वें परिपूर्णपणें । तेथ कैंचें असे येणेंजाणें ।

ज्ञाता सदा तद्‌रूपपणें । राहणेंजाणें स्पर्शेना ॥ ४४ ॥

ज्ञाता स्वयें रिघे शयनीं । परी शेजबाज न देखे अवनीं ।

मी निजेलों हेंही न मनी । निजीं निजरूपपणीं सर्वदा ॥ ४५ ॥

ज्ञाता जेवूं बैसे निजसुखें । परी मी भुकेलों हें न देखे ।

रसने नेणतां सर्व रस चाखे । जेवी येणें सुखें निजगोडीं ॥ ४६ ॥

दिसे यावत्तृम जेविला । परी तो धाला ना भुकेला ।

तो उच्छिष्टही नाहीं झाला । शेखीं आंचवला संसारा ॥ ४७ ॥

जरी तो स्वभावें सांगें गोष्टी । तरी अबोलणें घाली शब्दपोटीं ।

बोलीं अतिरसाळ गोडी उठी । तरी न सुटे मिठी मौनाची ॥ ४८ ॥

मे एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका ।

बोल बोलों नेणे फिका । बोलोनि नेटका अबोलपणा ॥ ४९ ॥

ज्ञाता पाहे निजात्मसुखें । माझें तुझें हेंही वोळखे ।

परी तो डोळांचि न देखे । देखे तें आपण्यासारिखें त्रैलोक्य ॥ ४५० ॥

तो जों दृश्य पाहों बैसे । तों दृश्याचा ठावोचि पुसे ।

जें देखे तें आपण्या‌ऐसें । निजात्सौरसें जग देखे ॥ ५१ ॥

करूनि डोळ्यांचा अंत । ज्ञाता देखणेपणें पाहत ।

त्या देखण्याचा निजस्वार्थ । न चढे हात वेदशास्त्रां ॥ ५२ ॥

जाणे शब्दींचें शब्दज्ञान । मी श्रोता हे नुठी आठवण ।

उपेक्षूनियां देहींचे कान । करी श्रवण सर्वांगें ॥ ५३ ॥

यापरी स्वयें सज्ञान । हो‍ऊनियां सावधान ।

सोलूनियां शब्दज्ञान । करी श्रवण स्वभवॆं ॥ ५४ ॥

जाणे सुवास दुर्वास । भोगीं न धरी नाकाची आस ।

सुमना सबाह्य जो सुवास । तो भोगी सावकाश सर्वदा ॥ ५५ ॥

मृदुकठिणादि स्पर्श जाणे । परी मी जाणतों हें स्फूरों नेणे ।

अंगा लागे तें निजांग करणें । हा स्पर्श भोगणें सज्ञानीं ॥ ५६ ॥

ज्ञाता चालता दिसे चरणीं । परी तो चालतां स्वयें अचरणी ।

स्वेच्छा हिंडतांही अवनीं । तो ठायाहूनि ठळेना ॥ ५७ ॥

हस्तवापारीं देतां दान । मी दाता ही नुठी आठवण ।

देतेंघेतें दान होय आपण । यापरी सज्ञान वर्तवी करा ॥ ५८ ॥

कायिक वाचिक मानसिक । कर्म निफजतां स्वाभाविक ।

ज्ञाता ब्रह्मरूपें निर्दोख । देहासी देख स्पर्शेना ॥ ५९ ॥

अकर्तात्मनिजसत्ता । ज्ञाता सर्व कर्मीं वर्ततां ।

न देखे कर्म-क्रिया-कर्तव्यता । निजीं निजात्मता निजबोधें ॥ ४६० ॥

ज्ञाता नित्य निजात्मसुखें । देहीं असोनि देह न देखे ।

तो देहकर्मीं केवीं आडके । पूर्ण परमात्मसुखें संतुष्ट ॥ ६१ ॥

जगासी लागलें कर्मबंधन । तेथें खातां जेवितां सज्ञान ।

केवीं न पवे कर्मबंधन । तेंचि निरूपण हरि सांगें ॥ ६२ ॥

 

यदि स्म पश्यत्यसदिन्द्रियार्थं

नानानुमनेन विरुद्धमन्यत्‌ ।

न मन्यते वस्तुतया मनीषी

स्वाप्नं यथोत्थाय तिरोदधानम्‌ ॥ ३२ ॥

 

हो कां लौकिकाचे परी । ज्ञाता वर्ते लोकाचारीं ।

तोही प्रपंचामाझारीं । कर्में करी लौकिकें ॥ ६३ ॥

परी कार्य-कर्म-कर्तव्यता । हे ज्ञात्यासी नाहीं अहंता ।

तेणें प्रपंचामाजीं निजात्मता । निश्चयें तत्त्वतां वश्य केली ॥ ६४ ॥

विषयादि प्रपंचभान । सत्य मानिती अज्ञान ।

तो प्रपंच देखती सज्ञान । ब्रह्मपूर्ण पूर्णत्वें ॥ ६५ ॥

साकरेचा इंद्रावणघडू । जाणा गोड नेणा कडू ।

तैसा प्रपंचाचा पडिपाडू । लाभ आणि नाडू ज्ञानज्ञानें ॥ ६६ ॥

सुवर्णाची खोटी । मूर्ख मानिती केवळ गोटी ।

ज्ञाते घालूनियं मिठी । घेती ज्ञानदृष्टीं बहुमोलें ॥ ६७ ॥

तेवीं सांसारिक क्रियाकर्म । मूर्खा मूर्खपणें भासे विषम ।

तेंचि ज्ञात्यासी परब्रह्म । स्वानंदें आराम सर्वदा ॥ ६८ ॥

प्रपंच खाणोनि सांडावा । मग ब्रह्मभाव मांडावा ।

हेंही न लगे त्या सदैव । उखिताचि आघवा परब्रह्म ॥ ६९ ।

मिथ्या दोराचा सर्पाकार । तेथ मिळोनि अज्ञान नर ।

नाना अनुमानीं भयंकर । सत्य साचार मानिती ॥ ४७० ॥

तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । बाधक मानिती अज्ञान ।

तेंचि स्वानुभवें सज्ञान । जाणती पूर्ण परब्रह्म ॥ ७१ ॥

जेवीं स्वप्न साच निद्रिताप्रती । तेवीं प्रपंच साच निज भ्रांती ।

तोचि निजात्मजागृताप्रती । मिथ्या निश्चितीं निजबोधें ॥ ७२ ॥

मिथ्या प्रपंचाचें भान । जाणोनि झाले जे सज्ञान ।

त्यांसी सर्व कर्मीं वर्ततां जाण । देहाभिमान कदा नुपजे ॥ ७३ ॥

साधकांचा साधावया स्वार्थ । पूर्वी सर्वस्वरूपें भगवंत ।

बोलिला तेणें विकारवंत । झाला निश्चित म्हणशील ॥ ७४ ॥

वस्तु नव्हे विकारवंत । ते निजसाम्यें सदोदित ।

तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ ७५ ॥

 

पूर्वं गृहीतं गुणकर्मचित्रं

अज्ञानमात्मन्यविविक्तमङ्ग ।

निवर्तते तत्पुनरीक्षयैव

न गृह्यते नापि विसृज्य आत्मा ॥ ३३ ॥

 

संसार तो पूर्वदशे । अति अतर्क्य मायावशें ।

शुद्ध वस्तु बहुधा भासे । गुणकर्मविन्यासें बहुरूप ॥ ७६ ॥

नाम रूप व्यक्ति वर्ण । कुळ गोत्र क्रियाचरण ।

यापरी प्रपंच भिन्न । सत्य अज्ञान मानिती ॥ ७७ ॥

प्रपंच वस्तूच्या ठायीं अध्यस्त । यालागीं वस्तु तद्‌रूप भासत ।

स्फटिक नानारंगीं अलिप्त । परी संबंधे भासत तद्‌रूप ॥ ७८ ॥

जग पाहतां यापरी । भिन्न भासे अज्ञानेंकरीं ।

तेणें आत्मा म्हणती विकारी । नर अविचारी अज्ञानें ॥ ७९ ॥

त्या अज्ञानाची होय निवृत्ती । तैं साधकां माझी सुलभ प्राप्ती ।

यालागीं माझी निजभक्ती । म्यां यथानिगुतीं प्रकाशिली ॥ ४८० ॥

साधकांचा निजस्वार्थ । जेणें शीघ्र होय हस्तगत ।

यालागीं सर्वभूतीं भगवंत । हा म्यां निजगुह्यार्थ प्रबोधिला ॥ ८१ ॥

हें धरोनियां अनुसंधान । भावें करितां माझें भजन ।

तेथ मावळॆ मीतूंपण । अविद्येसीं अज्ञान समूळ मिथ्या ॥ ८२ ॥

तेथ दृश्य-द्रष्टा-दर्शन । त्रिगुणेंसीं कार्यकारण ।

नुरेचि प्रपंचाचें भान । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ८३ ॥

तेथ नाम रूप गुण जाती । नाहीं महाभूतें भूतव्यक्ती ।

चैतन्य पूर्ण सहजस्थिती । ब्रह्मीं ब्रह्मस्फूर्तीं असेना ॥ ८४ ॥

तें उंच ना ठेंगणें । मोठें ना रोड होणें ।

उजू ना वंकुडेपणें । असों नेणे विकारी ॥ ८५ ॥

तेथ शीत ना उष्ण । मृदु ना कठिण ।

कडू ना गोडपण । सुखदुःखेंवीण निर्द्वंद्व ॥ ८६ ॥

तेथ भेद ना अभेद । बोलतें ना निःशब्द ।

शाहणें ना मुग्ध । देखणें ना अंध दिद्‌रूपपणें ॥ ८७ ॥

तें एथें ना तेथें । येतें ना जातें ।

जवळी ना परतें । सदोदित स्वतःसिद्ध ॥ ८८ ॥

तें खातें ना न खातें । तें घेतें ना देतें ।

जीतें ना मरतें । परादिपर तें परात्पर ॥ ८९ ॥

तें बद्ध ना मुक्त । नित्य ना अनित्य ।

क्षोभे ना प्रसन्न होत । वस्तु सदोदित सद्‌रूपत्वें ॥ ४९० ॥

तेथ पाप ना पुण्य । आकार ना शून्य ।

सगुण ना निर्गुण । स्वानंदें पूर्ण सुखरूप ॥ ९१ ॥

सर्वभूतीं भगवद्भजन । करूनि माझे भक्तजन ।

माझें निजरूप परिपूर्ण । स्वयें आपण हो‍ऊनि ठेले ॥ ९२ ॥

त्यांसी संत म्हणोनि कांहीं घेणें । अथवा असंत म्हणोनि सांडणें ।

हें नुरेचि त्यांसी वेगळेपणें । ब्रह्मीं ब्रह्मपणें परिपूर्ण ॥ ९३ ॥

बद्धकाळीं बद्धता । आत्मेति घेतली नाहीं तत्त्वतां ।

अथवा मुक्तकाळींची मुक्तता । आत्मा सर्वथा स्पर्शेना ॥ ९४ ॥

आत्मा अविकारी पाहीं । येणॆं निरूपणें पडे ठायीं ।

जरी म्हणशी कळलें नाहीं । ऐक तेंही सांगेन ॥ ९५ ॥

आत्मा सर्वदा नित्य पाहीं । यालागीं त्यासी उत्पत्ति नाहीं ।

‘उत्पत्ति’ न लगे ज्याचे ठायीं । तो गर्भासी कंहीं स्पर्शेना ॥ ९६ ॥

गर्भजन्म ज्यासी नाहीं । त्यासी देहाचा अभाव पाहीं ।

देहेंवीण ‘वृद्धी’ कंहीं । त्याचे ठायीं स्पर्शेना ॥ ९७ ॥

जो सर्वदा विदेही । कर्म न रिघे त्याच्या ठायीं ।

कर्मेंवीण बद्धता पाहीं । आत्म्यासी कंहीं लागेना ॥ ९८ ॥

जो निरवयव साचार । त्यासी एकही न घडे संस्कार ।

ज्यासी नाहीं आकार । त्यासी विकार स्पर्शेना ॥ ९९ ॥

जो गर्भजन्मा‌अतीत । मरण रिघों न शके तेथ ।

काळाचहे न लगे घात । क्षयातीत परमात्मा ॥ ५०० ॥

न लगे जन्म कर्म मरण । त्यासी विकारी करी कोण ।

वस्तु अविकारी परिपूर्ण । यापरी जाण उद्धवा ॥ १ ॥

निबिड दाटल्या अज्ञान । आत्मा नाहीं न करवे जाण ।

प्रखर क्षालियाही ज्ञान । आत्मा नवा जाण नुपजवे ॥ २ ॥

ज्ञानाज्ञानीं अलिप्त । आत्मा निर्विकार नित्य ।

येचि अर्थीं सदृष्टांत । असे सांगत श्रीकृष्ण ॥ ३ ॥

 

यथा हि भानोरुदयो नृचक्षुषां

तमो निहन्यान्न तु सद्विधत्ते ।

एवं समीक्षा निपुणा सते मे

हन्यात्तमिस्त्रं पुरुषस्य बुद्धेः ॥ ३४ ॥

 

डोळां नांदते दृष्टीसी । तम अवरोघी तियेसी ।

सूर्य उगवूनि तमातें निरसी । परी नवे दृष्टीसी नुपजवी ॥ ४ ॥

तेवीं अविद्या क्षोभूनि सबळ । आत्मा नाहीं न करवेच केवळ ।

पुरुषबुद्धीस आणोनि पडळ । मिथ्या द्वैतजाळ दाखवी ॥ ५ ॥

तेथ पावल्या शुद्ध ज्ञानासी । अविद्या मळ मात्र निरसी ।

परी नवें उपजवावया आत्म्यासी । सामर्थ्य ज्ञानासी असेना ॥ ६ ॥

आत्मा निजप्रकाशेंसीं । ज्ञानाज्ञानातें प्रकाशी ।

तें ज्ञानज्ञान परमात्म्यासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ७ ॥

ज्ञानज्ञानविकार । अविद्यांतःपाती साचार ।

आत्मा अविद्येहूनि पर । नित्य निर्विकार या हेतू ॥ ८ ॥

रात्री नाहीं सूर्यासी । मा दिवसु काय आहे त्यासी ।

तेवीं ज्ञानज्ञान आत्म्यासी । कदाकाळेंसी स्पर्शेना ॥ ९ ॥

आत्मा निर्विकार स्वयंज्योती । अलिप्त ज्ञानज्ञानस्थिति ।

त्या स्वरूपाची सहज प्राप्ती । उद्धवाप्रती हरी सांगे ॥ ५१० ॥

 

एष स्वयंज्योतिरजोऽप्रमेयो

महानुभूतिः सकलानुभूतिः ।

एकोऽद्वितीयो वचसां विरामे

येनेषिता वागसवश्चरन्ति ॥ ३५ ॥

 

‘एष स्वयंज्योति’ चें व्याख्यान । पामात्मा स्वप्रकाशघन ।

साधक तद्‌रूप आपण । अभिन्नत्वें जाण सर्वदा ॥ ११ ॥

आत्मा परिपूर्ण निजपूर्णता । त्यासी वेगळीं कैंचीं मातापिता ।

यालागीं आत्म्यासी जन्मकथा । जाण सर्वथा असेना ॥ १२ ॥

त्रिगुणांचे त्रिविध मळ । हे मिथ्या मायिक समूळ ।

आत्म्यासी न लागती अळुमाळ । यालागीं ‘निर्मळ’ निजात्मा ॥ १३ ॥

‘अप्रमेय’ म्हणिपे तें ऐका । ऐसा तैसा इतुका तितुका ।

पैल तो अमका । प्रमाण देखा कदा नव्हे ॥ १४ ॥

काळा गोरा सांवळा । निळा धवळा पिंवळा ।

एक तेथ दूरी जवळा । या प्रमाणांवेगळा परमात्मा ॥ १५ ॥

‘महानुभूति’ पदव्याख्यान । आत्मा अखंडदंडायमान ।

निजीं निजरूपें समसमान । स्वानंदघन सर्वदा ॥ १६ ॥

तेथ देश काळ वर्तमान । ध्येय ध्याता अथवा ध्यान ।

ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेंही जाण असेना ॥ १७ ॥

नाम-रूप-जात-गोत । क्रियाकार्मासी अलिप्त ।

जन्ममरण कैंचें तेथ । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ १८ ॥

तेथ वृद्धी आणि ऱ्हास । आदिमध्यान्तविलास ।

परिपाकादि विन्यास । यांचाही प्रवेश असेना ॥ १९ ॥

म्हणशी पूर्वोक्त धर्मस्थिती । तेथ न रिघे कैशा रीतीं ।

‘सकळानुभूति’ या पदोक्तीं । वस्तु सर्वार्थीं अलिप्त ॥ ५२० ॥

या रीतीं धर्म आणि अधर्म । सकळ भूतांचें क्रियाकर्म ।

प्रकाशक मी आत्माराम । त्यासी अलिप्त परम परमात्मा ॥ २१ ॥

गंगाजळा आणि मद्यासी । आकाश व्याप्त असोनि त्यांसी ।

परी तें अलिप्त दोंहीसीं । तेवीं ज्ञानाज्ञानासी परमात्मा ॥ २२ ॥

जेथ ज्ञानाज्ञाचा अभावो । तेथ कर्माकर्मा कैंचा ठावो ।

‘सकळानुभूति’ या नांव पहा हो । अभेदान्वयो स्वानंदें ॥ २३ ॥

ऐसा परमात्मा परमानंद । सजातीय-विजातीय-स्वगतभेद ।

नसोनियां वस्तु शुद्ध । जाण प्रसिद्ध निजबोधें ॥ २४ ॥

‘विजातीय भेद’ मी देह म्हणणें । ‘सजातीय भेद’ मी जीवपणें ।

‘स्वगत भेद’ मी ब्रह्म स्फुरणें । हे तिनी नेणें परमात्मा ॥ २५ ॥

तेथ ऊणखूण लक्ष्यलक्षण । युक्तिप्रयुक्ती प्रमाण ।

हेंही सर्वथा न रिघे जाण । ब्रह्म परिपूर्ण एकाकी ॥ २६ ॥

ऐसें एकाकी परब्रह्म । निजगुह्याचें गुह्य उत्तम ।

हें जाणे तो सभाग्य परम । त्यासी भवभ्रम न बाधी ॥ २७ ॥

तो देहीं असतांचि जाण । त्यासी न बाधी देहगुण ।

कदा न बाधी कर्माचरण । जन्ममरण बाधीना ॥ २८ ॥

ऐकोनि ऐशिया ज्ञानासी । तें स्वरूप स्पष्ट सांग म्हणसी ।

तरी तेथ रिगमु नाहीं वाचेसी । श्रुति शब्देंसीं परतल्या ॥ २९ ॥

जेथ अतिविवेकसंपन्न । बुद्धि प्रवेशेना आपण ।

सवेगपणें न पवे मन । ते वस्तु वाचे‌अधीन सर्वथा नव्हे ॥ ५३० ॥

खुंटली शास्त्रांची व्युत्पत्ती । दर्शनें अद्यापि विवादती ।

श्रुति परतल्या ‘नेति नेति’ । तेथ वचनोक्ती विरामु ॥ ३१ ॥

धरोनि जाणिवेची हांव । शब्दज्ञानें घेतली धाव ।

परी वस्तूचें एकही नांव । घ्यावया जाणीव न सरेचि ॥ ३२ ॥

एवं विचारितां साचार । परादि वाचा नव्हे उच्चार ।

यालागीं वस्तु ‘परात्पर’ । क्षराक्षरा‌अतीत ॥ ३३ ॥

जे सर्वावयवीं सर्वदा शून्य । शेखीं शून्यही नव्हे आपण ।

शून्यप्रकाश चिद्वन । वस्तु परिपूर्ण एकत्वें ॥ ३४ ॥

तेथ रिघावया वचनोक्तीं । शब्दें साधिल्या नाना युक्ती ।

त्या चिदाकाशीं मावळती । जेवीं कां उगवतां गभस्ती खद्योत ॥ ३५ ॥

खद्योत सूर्यासी खेवं देता । तैं वस्तु येती वचनाचे हाता ।

वस्तूपाशीं शब्दाच्या कथा । जाण तत्त्वतां हारपती ॥ ३६ ॥

सूर्योदय झालिया पाहीं । खद्योत शोधितां न पडे ठायीं ।

तेवीं वस्तुप्राप्ति पाविजे जिंहीं । तैं मागमोस नाहीं शब्दांचा ॥ ३७ ॥

हो कां आंधारिये रातीं । ज्यांची दीपें चाले क्रियास्थिती ।

तेथ झालिया सूर्योदयप्राप्ती । तेचि उपेक्षिती दीपातें ॥ ३८ ॥

तेवीं शाब्दिका ज्ञानयुक्तीं । अनुतापें ब्रह्म विवंचिती ।

ज्यासी झाली ब्रह्मप्राप्ती । तेचि उपेक्षिती शब्दातें ॥ ३९ ॥

जंव जंव शब्दाचा अभिमन । तंवतव दूरी ब्रह्मज्ञान ।

तेचि अर्थींचें उपलक्षण । ऐक निजखूण उद्धवा ॥ ५४० ॥

कन्या द्यावया वरासी । माता पिता बन्धु ज्योतिषी ।

मेळवूनियां सुहृदांसी । कन्या वरासी अर्पिती ॥ ४१ ॥

तेथ भर्तारसंभोगसेजेपाशीं । जवळी मातापितासुहृदेंसीं ।

असणें हाचि अवरोध तिसी । पतिसुखाप्ती प्रतिबंध ॥ ४२ ॥

तेवीं योग्यता चातुर्य जाण । शब्दज्ञानें ज्ञातेपण ।

जवळी असतां ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण हों न शके ॥ ४३ ॥

जेवीं डोळां अल्प कण न समाये । तेवीं ब्रह्मीं कल्पना न साहे ।

यालागीं निर्विकल्पें पाहें । ब्रह्मज्ञान होये सुटंक ॥ ४४ ॥

समस्त ज्ञानाचा उपरम । सकळ वचनांचा विराम ।

तैंचि पाविजे परब्रह्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ४५ ॥

जें नाकळे बुद्धीच्या ठायीं । जें मनासी नातुडे कंहीं ।

जें वचनासी विषयो नव्हे पाहीं । प्रमाणाचे पायीं पावलें न वचे ॥ ४६ ॥

यापरी वस्तु न पडे ठायीं । तरी ते वस्तुचि म्हणशी नाहीं ।

ऐसें उद्धवा कल्पिसी कांहीं । ऐक ते विषयीं सांगेन ॥ ४७ ॥

 

( मूळ श्लोकींचें पद ) ‘येनेषिता वागसवश्चरंति ॥’

 

येथें देहेंद्रियाप्राण । हे जडा मूढ अचेतन ।

त्यांसी चेतवी अत्मा चिद्धन । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ४८ ॥

आत्मप्राभा ‘दृष्टी’ प्रकाशे । परी आत्मा दृष्टीसी न स्पर्शे ।

आत्मा दृष्टीसबाह्य असे । परी दृष्टीसी न दिसे अदृश्यत्वें ॥ ४९ ॥

आत्मसत्ता ऐकती ‘श्रवण’ । श्रवणांसी आत्मा नातळे जाण ।

श्रवणां सबाह्य असोनि पूर्ण । श्रवणविषय जाण नव्हेचि आत्मा ॥ ५५० ॥

‘वाचा’ आत्मसत्ता उठीं । आत्मा नातळे वाचिका गोठी ।

वस्तु शब्दाचे पाठीं पोटीं । तो शब्द शेवटीं नेणें वस्तु ॥ ५१ ॥

‘मन’ आत्मसत्तें चपळ । मना सबाह्य आत्मा केवळ ।

तो मनासी नातळे अळुमाळ । मनासी अकळ निजत्मा ॥ ५२ ॥

‘चित्त’ चेतवी चिद्धन । चित्सत्ता चित्तासी चितन ।

चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण । तरी चित्तासी चैतन्य कळेना ॥ ५३ ॥

आत्मसंयोगें ‘अहं’ उल्हासे । अहंता आत्मा कदा न स्पर्शे ।

अहंतासबाह्य आत्मा असे । परी तो आत्मा न दिसे अहंकारें ॥ ५४ ॥

आत्मप्रभाप्रकशविधीं । प्रकाशिली ‘विवेकबुद्धी’ ।

बुद्धी आत्मा नेणे त्रिशुद्धी । आत्मा बुद्धी-सबाह्य ॥ ५५ ॥

आत्मप्रभा ‘प्राण’ चळे । परी प्राणासी आत्मा नातळे ।

प्राण-सबाह्य आत्ममेळें । तरी प्राणासी न कळे परमात्मा ॥ ५६ ॥

उद्धवा तूं यापरी पाहें । जड जयाचेनि वर्तताहे ।

तो आत्मा स्वतःसिद्ध आहे । नाहीं नोहे कल्पांतीं ॥ ५७ ॥

यापरी आत्मा स्वतःसिद्ध । भेद नांदवूनि अभेद ।

द्वंद्व प्रकाशोनि निर्द्वंद्व । हा निजात्मबोध दृढ केला ॥ ५८ ॥

एवं आत्मा निर्द्वंद्व अद्वैतें । तो आहे नाहीं म्हणावया येथें ।

कोणी नुरेचि गा म्हणतें । आत्मा निजत्मते परिपूर्ण ॥ ५९ ॥

आत्मा निजात्मता सदोदित । संसार तेथ आरोपित ।

येचि श्रीकृष्णनाथ । असे सांगत श्लोकार्थें ॥ ५६० ॥

 

एतावानात्मसम्मोहो यद्विकल्पस्तु केवले ।

आत्मन्नृते स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि ॥ ३६ ॥

 

आत्मा केवळ नित्यमुक्त । त्रिगुण गुणांसी अतीत ।

नभाहूनि अति‌अलिप्त । सदोदित पूर्णत्वें ॥ ६१ ॥

ब्रह्म अखंडदंडायमान । सर्वदा स्वानंघन ।

ऐसें अलिप्तीं प्रपंचभान । तो मिथ्या जाण आरोपु ॥ ६२ ॥

आरोपासी अधिष्टान । स्वयें परमात्मा आपण ।

यालागीं प्रपंचाचें भान । तेथेंचि जाण आभासे ॥ ६३ ॥

परमात्म्याहूनि भिन्न । प्रपंचासी नाहीं स्थान ।

यालागीं उत्पत्ति स्थिति निदान । तेथेंचि जाण आभासे ॥ ६४ ॥

जेवीं दोराचा सर्प पाहीं । दोरावेगळा न दिसे कंहीं ।

दोर सर्प झालाचि नाहीं । तरी त्याच्या आभासे ॥ ६५ ॥

तेवीं निर्विकल्प पूर्ण ब्रह्म । नातळे रूप नाम गुण कर्म ।

तरी त्याच्या ठायीं मनोभ्रम । प्रपंच विषम परिकल्पी ॥ ६६ ॥

जेवीं दोरीं भासे मिथ्य सर्प । तेवीं ब्रहीं मिथ्या भवारोप ।

तेथ सुखदुःख भयकंप । तोही खटाटोप मायिक ॥ ६७ ॥

एवं प्रपंचाचें मिथ्या भान । वस्तु शुद्धत्वें स्वानंदघन ।

हें निर्दुष्ट केलें निरूपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥ ६८ ॥

एवं नाना युक्ती सुनिश्चित । ब्रह्म साधिलें अबाधित ।

हें न मानिती जे पंडित । तें मत खंडित श्रीकृष्ण ॥ ६९ ॥

 

यन्नामाकृतिभिर्ग्राह्यं पञ्जवर्णमबाधितम्‌ ।

व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं द्वयं पण्डितमानिनाम्‌ ॥ ३७ ॥

 

वेदवेदांप्रतिपाद्य एथ । सकळ शस्त्रार्थाचें निजमथित ।

ब्रह्म अद्वय सदोदित । म्यां सुनिश्चित नेमिलें ॥ ५७० ॥

तें हें माझें निजमत । उपेक्षूनियां जे पंडित ।

ज्ञातेपणें अति‌उन्मत्त । अभिमानयुक्त पांडित्यें ॥ ७१ ॥

त्या पंडितांचें पांडित्यमत । प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत ।

तो मिथ्या मानोर्नियां एथ । कैंचें अद्वैत काढिलें ॥ ७२ ॥

अद्वैतासी नाहीं गांवो । जेथ तेथ जरी पाहों जावों ।

अद्वैता नाहीं नेमस्त ठावो । यालागीं पहा हो तें मिथ्या ॥ ७३ ॥

रूप नाम गुण कर्म । पंचभूतें भौतिकें विषम ।

चतुर्वर्ण चारी आश्रम । सत्य परम मानिती ॥ ७४ ॥

सत्य मानावयां हेंचि कारण । मनोभ्रमें भ्रमलें जाण ।

ज्ञानाभिमानें छळिले पूर्ण । आपण्या आपण विसरले ॥ ७५ ॥

मुख्य मानिती विषयसुख । विषयार्थ पुण्य करावें चोख ।

स्वर्ग भोगावा आवश्यक । हें सत्य देख मानिती ॥ ७६ ॥

विषय सत्य मानिती परम । हें देहाभिमानाचें निजवर्म ।

तेणें सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगवी ॥ ७७ ॥

पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननीजठर देख ।

यापरी पंडित लोक । केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥ ७८ ॥

त्यांचे ज्ञान तें वेदबाह्य । सर्वथा नव्हे तें ग्राह्य ।

जैसें अंत्यजाचें अन्न अग्राह्य । तैसे तें होय अतित्याज्य ॥ ७९ ॥

ज्ञानाभिमानियाचा विचार । तें अज्ञानाचें सोलींव सार ।

तयाचा जो निजनिर्धार । तो जाण साचार महामोहो ॥ ५८० ॥

तयाचा जो निजविवेक । इंद्रावणफळा‌ऐसा देख ।

वरी साजिरें आंत विख । तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥ ८१ ॥

नामरूपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वें आहाच ।

ज्ञानाभिमानी मानूनि साच । वृथा कचकच वाढविती ॥ ८२ ॥

प्रपंचरचनेची कुसरी । आपण जैं मानावी खरी ।

तैं देहबुद्धि वाजलीं शिरीं । दुःखदरिद्रीं निमग्न ॥ ८३ ॥

त्यांची योग्यता पाहतां जाण । गायत्रीतुल्य वेदपठण ।

सकळ शास्त्रें जाणे पूर्ण । श्रुति पुराण इतिहास ॥ ८४ ॥

अतिनिःसीम वक्तेपण । समयींचें समयीं स्फुरे स्फुरण ।

तेणें वाढला देहाभिमान । पंडितंमन्य अतिगर्वीं ॥ ८५ ॥

नेणे अद्वैतसमाधान । तरी योग्यतागर्व गहन ।

निजमताचा मताभिमान । प्राणान्तें जाण सांडीना ॥ ८६ ॥

पंडितंमन्यांचे बोलणें । अवचटें नायकावें दीनें ।

जे नागवले देहाभिमानें । त्यांचेनि सौजन्यें अघःपात ॥ ८७ ॥

विषभक्षित्याचा पांतीकर । अत्याग्रहें झाला जो नर ।

त्यासी अप्रार्थितां मरणादर । अतिदुर्धर जीवीं वाजे ॥ ८८ ॥

यालागीं न धरावी ते संगती । त्यांसी न करावी वदंती ।

कदा नव जावें त्यांप्रती । ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥ ८९ ॥

त्यांचे न लागावें बोलीं । त्यांचे न चालावें चालीं ।

जे ज्ञानाभिमानभुली । मुकले आपुली हितवार्ता ॥ ५९० ॥

ते नाणावे निजमंदिरा । स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा ।

त्यांसी न पुसावें विचारा । जे अभिमानद्वारा नाडले ॥ ९१ ॥

त्यांसी न ह्वावी हाटभेटी । कदा न देखावे निजदृष्टीं ।

ते त्याज्य गा उठा‌उठीं । जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥ ९२ ॥

वेदशास्त्रांचा मथितार्थ । जो कां अद्वैत परमार्थः ।

तो ज्यांसी नावडे निजस्वार्थ । चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥ ९३ ॥

यालागीं त्यांची संगती । साक्षेपें सांडावी निश्चितीं ।

साधकाचे योगस्थिति । अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥ ९४ ॥

 

योगिनोऽपक्क योगस्य युञ्जतः काय उत्थितैः ।

उपसर्गेर्विहन्येत तत्रायं विहितो विधिः ॥ ३८ ॥

 

योगी प्रवर्तल्या योगभ्यासीं । योग संपूर्ण नव्हतां त्यासी ।

उपसर्ग येती छळावयासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ९५ ॥

शरीरीं एखादा उठे रोग । कां खवळे विषयाची लगबग ।

अथवा सभ्रांत उपसर्ग । कां योगभंग विकल्पें ॥ ९६ ॥

ज्ञानाभिमान सबळ उठी । तेणें गुणदोषीं बैसे दिठी ।

परापवादाची चावटी । त्याची एकांतगोष्टी निजगुज ॥ ९७ ॥

देहीं शीतळता उभडे । कां उष्णता अत्यंत चढे ।

किंवा वायु अव्हाटीं पडे । कां क्षुधा वाढे अनिवार ॥ ९८ ॥

विक्षेप कषाय वोढवती । परदारप्रद्रव्यासक्ती ।

इत्यादि उपसर्ग येती । उपाय श्रीपति तदर्थ सांगे ॥ ९९ ॥

 

योगधारणया कांश्चित्दासनैर्धारणान्वितैः ।

तपोमन्त्रौषधेः कांश्चिदुपसर्गान्विनिर्दहेत्‌ ॥ ३९ ॥

 

देहीं शीतळता वाढल्या जाण । तीस निवारी अग्निधारण ।

देहीं उष्मा चढल्या पूर्ण । सोमधारण उच्छेदी ॥ ६०० ॥

वायु अव्हाटल्या अवचितां । तैं देहीं वायु भरावा पुरता ।

वायु मेळवुनि वायु‌आंतौता । अणिती निजपंथा अभ्यासबळें ॥ १ ॥

वायु क्षोभोनि सकोप । जैं जठरावरी पडे झडप ।

तैं क्षुधा खवळे अमूप । तृप्तीचें रूप उठीना ॥ २ ॥

तेथ मोकळा सांडूनि प्राण । अपान वाढवावा आपण ।

तो जठरा आलिया जाण । तेथ क्षोभला प्राण सहजिचि ये ॥ ३ ॥

तेथ प्राणापान‍ऐक्यता । सहजें ये साधकांच्या हाता ।

मग षट्‌चक्रें भेदितां । क्षणही सर्वथा लागेना ॥ ४ ॥

तेव्हां सतरावियेचें अमृतपान । साधकांसी फावे संपूर्ण ।

यापरी क्षुधानिर्दळण । येणें जाण साधिती ॥ ५ ॥

परदारा परद्रव्यासक्ती । हे पापकर्माची फळप्राप्ती ।

याची करावया निवृत्ती । तपश्चर्या निश्चितीं उद्धवा ॥ ६ ॥

भावें करितां मंत्रानुष्ठान । तेणे वैराग्य उपजे जाण ।

वैराग्यें निषयनिर्दळण । सहजें जाण साधकां ॥ ७ ॥

शुद्ध मंत्राचें पुरश्चरण । करी विघ्नांचें निर्दळण ।

तेथ पिशाचबाधासंचरण । घे‌ऊनि प्राण स्वयें पळे ॥ ८ ॥

शरीरीं संचरल्या व्याधी । त्यातें निर्दळी दिव्य औषधी ।

मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुद्धीं साधवा ॥ ९ ॥

तेथ साधल्या योगसिद्धी । समूल निर्दळी आधिव्याधी ।

सकळ विघ्नांतेंही छेदी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६१० ॥

हें किती सांगूं भिन्न । भावें करितां माझें ध्यान ।

सकळ उपसर्गां निर्दळण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ११ ॥

 

कांश्चिन्ममानुध्यानेन नामसंकीर्तनादिभिः ।

योगेश्वरानुवृत्त्या वा हन्यादशुभदाञ्छनैः ॥ ४० ॥

 

आधिव्याधींसीं सकळ विघ्न । विकल्प विकर्म देहाभिमान ।

ज्ञानाभिमानेंसीं दहन । करी ध्यानलक्षण उद्धवा ॥ १२ ॥

माझिया ध्यानाचे परिपाठीं । उपसर्ग पळती उठा‌उठी ।

शोधितां विघ्न न पडे दृष्टी । निर्द्वंद्व सृष्टी साधकां ॥ १३ ॥

माझा लागल्या ध्यानभावो । उपसर्गाचा नुरेचि ठावो ।

सकळ विघ्नांचा अभावो । विकल्प वावो स्वयें होती ॥ १४ ॥

म्हणशी ‘घालोनि आसन । एकाग्र करोनियां मन ।

कैं ठसावेल तुझें ध्यान । तैं साधकां विघ्न बाधीना’ ॥ १५ ॥

असो न टके माझें ध्यान । तैं सोपा उपाव आहे आन ।

माझें करितां नामकीर्तन । विघ्ननिर्दळण हरिनामें ॥ १६ ॥

जेथ नामाचा घडघडाट । तेथ उपसर्गा न चले वाट ।

महाविघ्नांचा कडकडाट । करी सपाट हरिनामें ॥ १७ ॥

अखंड माझी नामकीर्ती । ज्याच्या मुखास आली वस्ती ।

त्या देखोनि विघ्नें पळती । उपसर्गां शांती निःशेष ॥ १८ ॥

माझ्या नामाचा निजगजर । पळवी महापापसंभार ।

उपसर्गां नुरवी थार । नाम सधर हरीचें ॥ १९ ॥

अवचटें घेतां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म ।

जेथ अखंड माझें गुणनामकर्म । तेथ विघ्नसंभ्रम स्पर्शेना ॥ ६२० ॥

माझे नामकीर्तीचे पवाडे । ज्याची वाचा अखंड पढे ।

विघ्नें न येती तयाकडे । जेवीं सूर्यापुढें आंधार ॥ २१ ॥

माझे नामकीर्तीवीण येथें । ज्याचें तोंड न राहे रितें ।

तो नागवे महाविघ्नांतें । जेवीं पतंगातें हुताशु ॥ २२ ॥

नामकीर्ती दाटुगी होये । हें विश्वासें मानलें आहे ।

ते नाम सुखीं केवीं राहे । करावें काये म्हणशील ॥ २३ ॥

मुखीं नामनिर्वाह व्हावा । यालागीं करावी साधुसेवा ।

संतसेवनीं सद्भावो जीवा । तेथ नव्हे रिघावा विघ्नांसी ॥ २४ ॥

सद्भावें धरिल्या सत्संगती । त्या संगचिये निजस्थिती ।

मुखीं ठसावे नामकीर्ती । विकल्प चित्तीं स्फुरेना ॥ २५ ॥

मुखीं हरिनामाची गोडी । संतसेवेची अति‌आवडी ।

तयाची गा प्रतापप्रौढी । उपसर्गकोडी निर्दळी ॥ २६ ॥

सधकांसी पाठिराखा । संत झालिया निजसखा ।

तैं महाविघ्नांचिया मुखा । विभांडी देखा क्षणार्धें ॥ २७ ॥

सेवितां साधूचें चरणोदक । अतिशुद्ध होती साधक ।

तेणें शुद्धत्वें महादोख । समूळ देख निर्दळी ॥ २८ ॥

साधूंच्या चरणतीर्थापाशीं । सकल तीर्थें येती धुद्धत्वासी ।

भावें सेविती त्या तीर्थासी । ते उपसर्गांसी नागवती ॥ २९ ॥

वंदितां साधुचरणरज । साधकांचें सिद्ध होय काज ।

निर्दळूनि विघ्नांचें बीज । स्वानंद निज स्वयें भोगिती ॥ ६३० ॥

निजभाग्यगतीं अवचितां । संतचरणरेणु पडल्या माथां ।

तो कळिकाळातें हाणे लाथा । तेथ विघ्नांची कथा ते कोण ॥ ३१ ॥

निधडा शूर निजबळेंसीं । धुरां निजशस्त्र दे‌ऊनि त्यासी ।

युद्धीं थापटिलिया पाठीसी । तो विभांडी परांसी तेणें उल्हासें ॥ ३२ ॥

तेवीं सद्भावें सत्संगती । मुखीं अखंड नामकीर्ती ।

भावें करितां संतांची भक्ती । महाबाधा निर्दळिती साधक ॥ ३३ ॥

कीर्ति भक्ती सत्संगती । हे त्रिवेणी लाभे ज्याप्रती ।

त्यासी उपसर्ग नातळती । पावन त्रिजगती त्याचेनी ॥ ३४ ॥

माझी भक्ती आणि नामकीर्ती । यांची जननी सत्संगती ।

तो सत्संग जोडल्या हातीं । विघ्नें न बाधिती साधकां ॥ ३५ ॥

योग याग आसन ध्यान । तप मंत्र औषधी जाण ।

साधितां न तुटे देहाभिमन । तो सत्संग जाण निर्दळी ॥ ३६ ॥

योगादि सर्व उपायीं जाण । निवारिती अल्पविघ्न ।

विघ्नांचा राजा देहाभिमान । तो त्यांचेनि जाण ढळेना ॥ ३७ ॥

तो दुर्धर देहाभिमान । ज्ञातेपणीं अतिदारुण ।

याचे समूळ निर्दहण । सत्संग जाण स्वयें करी ॥ ३८ ॥

नेणपणाचा अभिमान । तत्काळ जाय निघोन ।

तैसा नव्हे ज्ञानाभिमान । चाविरा जाण जाणिवा ॥ ३९ ॥

त्याही अभिमनाचें निर्दळण । सत्संग निजांगें करी आपण ।

यालागीं सत्संगासमान । आन साधन असेना ॥ ६४० ॥

एकाचेनि निजमतें । अजरामर करावें देहातें ।

तेहीं योगादि साधनांतें । मूर्खमतें साधिती ॥ ४१ ।

 

केचिदेहमिमं धीराः सुकल्पं वयसि स्थिरम्‌ ।

विधाय विविधोपायैरथ युञ्जन्ति सिद्धये ॥ ४१ ॥

 

देहो तितुका प्रारब्धाधीन । त्यासी प्रारब्धें जन्ममरण ।

त्या देहासी अजरामरपण । पामर जन करूँ पाहती ॥ ४२ ॥

त्या प्रारब्धाचें सूत्र पूर्ण । सर्वदा असे काळाधीन ।

यालागीं काळकृत जन्ममरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥ ४३ ॥

चौदा कल्प आयुष्य जोडी । त्या मार्कंडेयासी काळ झोडी ।

युगांतीं लोम झडे परवडी । त्या लोमहर्षाची नरडी मुरडिजे काळें ॥ ४४ ॥

चतुर्युगसहस्त्र संख्येसी । तो दिवस गणिजे ब्रह्मयासी ।

जो स्त्रजिता सकळ सृष्टीसी । त्यासी काळ ग्रासी स्वबळें ॥ ४५ ॥

स्त्रजित्या ब्रह्मयासी काळ पिळी । पाळित्या विष्णूतें काळ गिळी ।

क्प्रलयरिद्राचीही होळी । काळ महाबळी स्वयें करी ॥ ४६ ॥

यापरी कळ अति दुर्धर । नेणोनि अविवेकी नर ।

वांछिती काळजयो पामर । देह अजरामर करावया ॥ ४७ ॥

जें जें दिसे तें ते नासे । हे काळसत्ता जगासी भासे ।

तरी अजरामरत्वाचें पिसें । मूर्ख अतिप्रयासें वांछिती ॥ ४८ ॥

थिल्लरींचा तरंग जाण । वांच्छी अजरामरण ।

तंव थिल्लरासचि ये मरण । तेथ वांचवी कोण तरंग ॥ ४९ ॥

तेवी संसारचि नश्वर । त्यांतील देह अजरामर ।

करूं वाछिती पामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ६५० ॥

देह जा‌ईल तरी जावो । परी जीव हा चिरंजीव राहो ।

तदर्थ कीजे उपावो । तैसें अमरत्व पहा हो नरदेहा ॥ ५१ ॥

देह केवळ नश्वर । त्यातें अविवेकी महाधीर ।

करूं म्हणती अजरामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ५२ ॥

केवळ काळाचें खाजें देहो । तो अमर करावया पहा हो ।

जो जो कीजे उपावो । तो तो अपावो । तो तो अपावो साधकां ॥ ५३ ॥

एवं मोढतेचे भागीं । देहाच्या अमरत्वालागीं ।

शिणोनि उपायीं अनेगीं । हठयोगी नागवले ॥ ५४ ॥

परकायाप्रवेशार्थ जाण । शिणले साधितां प्राणधारण ।

एवं धरितां देहाभिमान । योगीजन नाडले ॥ ५५ ॥

देहाचें नश्वरपण । जाणोनियां जे सज्ञान ।

ते न धरिती देहाभिमान्‌ । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ५६ ॥

 

न हि तत्कुशलादृत्यं तदायासो ह्यपार्थक ।

अन्तवत्त्वाच्छरीरस्य फलस्येव वनस्पतेः ॥ ४२ ॥

 

विचरिता हा संसार । समूळ अवघा नश्वर ।

तेथ देहाचा अजरामर । ज्ञाते आदर न करिती ॥ ५७ ॥

देह‍अजरामरविधीं । ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी ।

देहीं साधिल्या ज्या सिद्धी । त्याही त्रिशुद्धी बाधिका ॥ ५८ ॥

देह तापल्या ज्वरादि तापें । तदर्थ मरणभयें कांपे ।

तेथ शीतळ आणिल्याही साक्षेपें । तेणेंही रूपें मरणचि ॥ ५९ ॥

मिथ्या देहींचा देहाभिमान । सदा भोगवी जन्ममरण ।

तो अजरामर करितां जाण । देहबधन दृढ झालें ॥ ६६० ॥

साधोनियां योगसाधन । दृढ केलें देहबंधन ।

देहींच्या सिद्धी भोगितां जाण । अधःपतन चुकेना ॥ ६१ ॥

हो कां ज्ञानार्थ योग साधितां । प्रसंगें सिद्धी आलिया हाता ।

त्याही त्यागाव्या तत्त्वतां । जिनस्वार्थालागूनि ॥ ६२ ॥

ज्याची चाल रायापाशीं । लांच हाता ये तयासी ।

तेणेंचि पावे अपमानासी । तेवीं साधकासी घातका सिद्धि ॥ ६३ ॥

वृक्षासी मोडूनि आलिया फळें । त्या फळासी वृक्ष नातळे ।

तेवीं आलिया सिद्धीचे सोहळे । वैराग्यबळें त्यागावे ॥ ६४ ॥

कोरडेनि वैराग्यबळें । त्याग कीजे तो आडखळे ।

त्याग विवेकवैराग्यमेळें । तैं सिद्धीचे सोहळे तृणप्राय ॥ ६५ ॥

आंधळें हातिरूं मातले । पतन न देखे आपुले ।

तेवीं अविवेकें त्याग केले । ते ते गेले अघःपाता ॥ ६६ ॥

मूळीं देहचि नश्वर एथ । तेथींच्या सिद्धी काय शाश्वत ।

ऐसे विवेकवैराग्ययुक्त । होती अलिप्त देहभोगा ॥ ६७ ॥

एथ देह तितुका अनित्य । आत्मा एक नित्य सत्य ।

हें जाणोनि विवेकयुक्त । जडले निश्चित आत्माभ्यासीं ॥ ६८ ॥

 

योगं निषेवतो नित्यं कायश्चेत्कल्पतामियात्‌ ।

तच्छ्‍द्दध्यान्न मतिमान्योगम्रुत्सृज्य मत्परः ॥ ४३ ॥

 

योग साधितां परमार्थ । सिद्धी वश्य झालिया हाता ।

त्या त्यागाव्या तत्त्वतां । निजहितार्था लागूनी ॥ ६९ ॥

सिद्धी त्यागितां न वचती । भोगबळें गळां पडती ।

तरी ते सांडूनि योगस्थिती । माझे भजनपंथीं लागावें ॥ ६७० ॥

माझिये भ्क्तीच्या निजमार्गीं । रिगमु नाहीं विघ्नांलागीं ।

मी भक्तांच्या प्रेमभागीं । रंगलों रंगीं श्रीरंग ॥ ७१॥

सद्भावें करितां माझी भक्ती । भक्तांसी नव्हे विघ्नप्राप्ती ।

भक्त-सबाह्य मी श्रीपती । अहोरातीं संरक्षीं ॥ ७२ ॥

करितां भगवद्भजन । भक्तांसी बाधीना विघ्न ।

ते भक्तीचें महिमान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ७३ ॥

 

योगचर्यामिमां योगी विचरन्‌ मदपाश्रयः ।

नान्तरायौर्विहन्येत निस्पृहः स्वसुखानुभूः ॥ ४४ ॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥

 

अनन्यप्रीतीं मज शरण । सर्वभूतीं मद्भावन ।

अभेदबुद्धीं माझें भजन । त्यासी सर्वथा विघ्न बाधीना ॥ ७४ ॥

माझ्या भक्ताचे उपसर्ग । सकळ निर्दळीं मी श्रीरंग ।

ज्यासी अनन्य भजनयोग । त्यासी माझें निजांग वस्तीसी ॥ ७५ ॥

जेथ विघ्न धांवे भक्तांकडे । तेथ तत्काळ माझी उडी पडे ।

निवारीं निजभक्तांचें सांकडे । तीं लळिवाडें पैं माझीं ॥ ७६ ॥

तीं लळीवाडें म्हणशी कैसीं । त्यांचे सांकडें मी सदा सोशीं ।

राजा दंडितां प्रल्हादासी । म्यां सर्वथा त्यासी रक्षिलें ॥ ७७ ॥

संकट मांडिलें अंबरीषासी । तैं म्यां अपामानिलें दुर्वासासीं ।

दाही गर्भवास मी स्वयें सोशीं । उणें भक्तांसी ये‌ऊं नेदीं ॥ ७८ ॥

बाधा होतां गजेंद्रासी । म्यां हातीं वसवूनि सुदर्शनासी ।

उडी घालूनि त्यापाशीं । निमिषार्धेंसीं सोडविला ॥ ७९ ॥

द्रौपदीचिये अतिसांकडीं । सभेसी करितां ते उघडी ।

म्यां निजांगें घालूनि उडी । वस्त्रांच्या कोडी पुरविल्या ॥ ६८० ॥

द्रौपदीचिया हातीं देतां घडी । नेसतां नेसतां दिसेल ते उघडी ।

यालागीं मे लवडसवडीं । नेसतीं लुगडीं स्वयें झालों ॥ ८१ ॥

दावाग्नीं पीडितां गोपाळ । निजमुखीं म्यां गिळिली ज्वाळ ।

एथवरी भक्तांची कळवळ । मज सर्वकाळ उद्धवा ॥ ८२ ॥

द्रौण्यस्त्राचे बाधेहातीं । म्यां गर्भीं रक्षिला परीक्षिती ।

गोकुळ पीडितां सुरपती । म्यां धरिला हातीं गोवर्धन ॥ ८३ ॥

वांचवावया अर्जुनासी । दिवसा लपविलें सूर्यासी ।

हरी पतकरूनि रणभूमीसी । सत्य भीष्पासी म्यां केलें ॥ ८४ ॥

ऐसा मी भक्तसहाकारी । नित्य असतां शिरावरी ।

भक्तांसी विघ्न कोण करी । मी श्रीहरि रक्षिता ॥ ८५ ॥

जे अनुसरले मद्भक्तीसी । मी विघ्न लागों नेदें त्या भक्तांसी ।

निजांग अर्पोनियां त्यांसी । निजीं निजसुखेंसीं नांदवीं ॥ ८६ ॥

भावें करितां माझी भक्ती । साधकां स्वसुखाची प्राप्ती ।

तेथें इच्छेंसीं कामलोभ जाती । माझी सुखस्थिति मद्भक्तां ॥ ८७ ॥

म्हणसी भक्तांसी देहांतीं । हो‌ईल निजसुखाची प्राप्ती ।

तैशी नव्हे चौथी भक्ती । देहीं वर्तती स्थिति सुखरूप ॥ ८८ ॥

देह राहो अथवा जावो । परी सुखासी नाहीं अभावो ।

यापरी मद्भक्त पहा हो । सुखें सुखनिर्वाहो भोगिती ॥ ८९ ॥

भक्त वर्ततां दिसती देहीं । परी ते वर्तती ठायीं ।

मी अवघाचि त्यांच्या हृदयीं । सर्वदा पाहीं नांदत ॥ ६९० ॥

भक्त निजबोधें मजभीतरी । मी निजांगें त्यां आंतबाहेरी ।

एवं निजसुखाच्या माजघरीं । परस्परीं नांदत ॥ ९१ ॥

मी देव तो एक भक्त । हेही बाहेरसवडी मात ।

विचारितां आंतुवटा अर्थ । मी आणि भक्त एकचि ॥ ९२ ॥

तूप थिजलें विघुरलें देख । तेवीं मी आणि भक्त दोनी एक ।

मज भक्तासी वेगळिक । कल्पांतीं देख असेना ॥ ९३ ॥

मी तो एकचि एथें । हेंही म्हणावया नाहीं म्हणतें ।

यापरी मिळोनि मातें । भक्त निजसुखातें पावले ॥ ९४ ॥

तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसु । अध्याय जाण अठ्ठावीसु ।

बाप विंदानी हृषीकेशु । तेणें दे‌उळासी कळसु मेळविला ॥ ९५ ॥

जेवीं अळंकारी मुकुटमणी । तेवीं अठ्ठावीस ब्रह्मज्ञानीं ।

श्रीकृष्ण भक्तांची निजजननी । तो उद्धवालागोनी शृंगारी ॥ ९६ ॥

माता उत्तम अलंकारकोडीं । अपत्य शृंगारी अति‌आवडीं ।

तेवीं उत्तमोत्तम ज्ञाननिरवडी । उद्धव कडोविकडीं शृंगारिला ॥ ९७ ॥

मातेसी आवडे निपटणें । तेवीं उद्धव वृद्धपणींचें तानें ।

श्रीकृष्ण त्याकारणें । गुह्यज्ञानें शृंगारी ॥ ९८ ॥

माता बाळकातें शृगारी । तें लेणें मागुतें उतरी ।

उद्धव शृंगारिला श्रीहरी । तें अंगाबाहेरी निघेना ॥ ९९ ॥

अंगीं लेणें जडलें अलोलिक । तेणें उद्धव झाला अमोलिक ।

पायां लागती तिनी लोक । ब्रह्मादिक पूजिती ॥ ७०० ॥

निजात्म‍अळंकारें श्रीपती । उद्धव शृंगारिला ब्रह्मस्थितीं ।

तेणें वंद्य झाला त्रिजगतीं । त्यातें पुराणीं पढती महाकवी ॥ १ ॥

गोडीमाजीं श्रेष्ठ अमृत । तेंही फिकें करूनि एथ ।

उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥ २ ॥

अमर अमृतपान करिती । तेही फिकें करूनि एथ ।

उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥ २ ॥

अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवीं बुडती ।

उद्धव अक्षयीं केल श्रीपती । कथामृतीं निववूनि ॥ ३ ॥

तेणें तो सर्वांगीं निवाला । परमानंदीं तृप्त झाला ।

तेणें उद्धवत्वा विसरला । डोलों लागला स्वानंदें ॥ ४ ॥

तेव्हां स्वानंद‍उन्मत्तता । दुजें निर्दळी देखतां ।

संसार हाणोनि लाता । चढे माथा देवांच्या ॥ ५ ॥

चढोनि देवांचिया माथां । शेखीं गिळी देवभक्तता ।

मम सच्चिदानंदस्वानंदता । निजात्मता स्वयें झाला ॥ ६ ॥

तेथ सत्‌-चित्‌-आनंद । हाही नाहीं त्रिविध भेद ।

सदोदित परमानंद । स्वानंद शुद्ध कोंदला ॥ ७ ॥

नश्वर त्यागाचिये स्थिती । अनश्वरातें ‘संत’ म्हणती ।

जडाची करितां निवृत्ती । ‘चिद्‌रूप’ म्हणती वस्तुतें ॥ ८ ॥

जेथ दुःखाचा नाहीं बाधु । त्यातें म्हणती ‘आनंदु’ ।

एवं सच्चिदानंद शब्दु । ज्ञानसंबंधु मायिक ॥ ९ ॥

वस्तु संत ना असंत । चित्‌ नव्हे अचित्‌ ।

ते सुखदुःखातीत । जाण निश्चित सन्मात्र ॥ ७१० ॥

हा अठ्ठाविशींचा निजबोध । उद्धवासी तुष्टोनि गोविंद ।

देता झाला स्वनंदकंद । भाग्यें अगाध तो एक ॥ ११ ॥

सांडोनि निजधामा जाणें । स्वयें श्रीकृष्ण ज्याकारणें ।

देता झाला निजगुह्यठेवणें । त्याचें भाग्य वानणें तें किती ॥ १२ ॥

जें नेदीच पित्या वसुदेवासी । जें नेदीच बंधु बळभद्रासी ।

जें नेदीच पुन्ना प्रद्युम्नासी । तें उद्धवासी दीधलें ॥ १३ ॥

जें नेदीच देवकीमातेसी । जें नेदीच कुंती आतेसी ।

शेखीं नेदीच यशोदेसी । तें उद्धवासी दीधलें ॥ १४ ॥

म्हणाल संगितलें अर्जुनासी । तोही अत्यंत पढियंता त्यासी ।

त्याहातीं उतरावया धराभारासी । युद्धीं त्त्वरेंसी उपदेशिला ॥ १५ ॥

तैसें नव्हे उद्धवाकडे । सावकाश निजनिवाडे ।

गुप्त ठेवणें फाडोवाडें । अवघे त्यापुढें अर्पिलें ॥ १६ ॥

पित्याचिया निजधनासी । स्वामित्व लाभे निजपुत्रासी ।

तेवीं श्रीकृष्णाचिया गुह्यज्ञानासी । झाला मिराशी उद्धव ॥ १७ ॥

पांडवांमाजीं धन्य अर्जुन । यादवांमाजीं उद्धव धन्य ।

या दोघांच्या भाग्यासमान । न दिसे आन त्रिजगतीं ॥ १८ ॥

सकळ साराचा निजसारंश । तो हा एकादशीं अठ्ठवीस ।

जेवीं यतींमाजीं परमहंस । तेवीं अष्टावश भागवतीं ॥ १९ ॥

जेवीं क्षीराब्धीमाजीं शेषशयन । त्यावरी जैसा नारायण ।

तेवीं भागवतामाजीं जाण । ब्रह्मपरिपूर्ण अष्टाविंश ॥ ७२० ॥

जेवीं वैकुंठ परम पावन । त्यावरी विराजे श्रीभगवान ।

तेवीं भागवतामाजीं जाण । विराजमान अष्टविंश ॥ २१ ॥

एवढ्या महत्त्वाचें वैभव । कृष्णकृपेनें पावला उद्धव ।

बाप निजभाग्याची धांव । ब्रह्म स्वयमेव स्वयें झाला ॥ २२ ॥

उद्धव झाला ब्रह्मपूर्ण । त्यासी कृष्णकृपा प्रमाण ।

तें मी वाखाणीं अज्ञान । देशभाषेने प्राकृत ॥ २३ ॥

अंधासी सूर्य प्रसन्न । झालिया देखे तो निधान ।

तेवीं प्रकटोनि जनार्दन । हें गुह्यज्ञान बोलवी ॥ २४ ॥

जनार्दन प्रकटला आतां । हें बोलणें माझी मूर्खता ।

तो स्वतःसिद्ध सदा असतां । हेंही झालों मी जाणता त्याचिया कृपा ॥ २५ ॥

त्याचिया कृपें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें ।

नेलेंपण देखों नाहीं दीधलें । जेवीं सूर्ये केलें अंधारा ॥ २६ ॥

मज कृपा करील जनार्दन । हेंही नेणें मी अज्ञान ।

तेणें दयाळुवें कृपा करून । हें गुह्यज्ञान बोलविलें ॥ २७ ॥

निकट असतां जनार्दन । मी नेणें त्याचें महिमान ।

तेणें आपला महिमा आपण । मज मुखें जाण बोलविला ॥ २८ ॥

मी जें म्हणे माझें मुख । तेंही जनार्दन झाला देख ।

तेणें मुखें निजात्मसुख । बोलवी निष्टंक निजात्मसत्ता ॥ २९ ॥

एवं माझेनि नांवें कविता । परी जनार्दनची झाला वक्ता ।

तेणें वक्तेपणें तत्त्वतां । रसाळ कथा चालविली ॥ ७३० ॥

ब्रह्मरसें रसाळ कथा । निरूपिलें श्रीभागवता ।

त्यामाजीं ब्रह्मतल्लीनता । जाण तत्त्वतां अष्टविंश ॥ ३१ ॥

अठ्ठाविसाव्याचें निरूपण । तें तत्त्वतां ब्रह्म परिपूर्ण ।

श्रद्धेनें करितां श्रवण । उद्धव संपूर्ण निवाला ॥ ३२ ॥

उद्धव निवोनियां आपण । स्वयें विचारित झाला जाण ।

म्हणे हें शुद्ध आत्मज्ञान । परी प्राप्ती कठिण अबळांसी ॥ ३३ ॥

या चित्स्वरूपाची प्राप्ती । सुगम होय साधकांप्रती ।

पुढील अध्यायीं येचि अर्थीं । उद्धव विनंती करील ॥ ३४ ॥

कडा फोडोनि मार्ग कीजे । कां उंचीं फरस बांधिजे ।

तेवीं सुगमें निर्गुण पाविजे । तो उपाव पुसिजे उद्धवें ॥ ३५ ॥

ब्रह्मप्राप्तीचा सुगम उपावो । स्वयें सांगेल देवाधिदेवो ।

तो सुरस पुढील अध्यावो । साधकां पहा हो परमार्थसिद्धि ॥ ३६ ॥

पव्हणियापरिस पाय‍उतारा । अबळीं उतरिजे भवसागरा ।

तैसा साधकांलागीं सोपारा । उपाव पुढारा हरि सांगे ॥ ३७ ॥

सीतेचेनि कृपा पडिभारें । सेतु बांधिजे रामचंद्रे ।

तेथ समुद्र तरतीं वानरें । जीं वनचरें अतिमंदें ॥ ३८ ॥

तेवीं उद्धवप्रश्नप्रीतीसीं । भवाब्धिसेतु ह्रुषीकेशीं ।

बांधिला निजभक्ति‌उपायेंसीं । तेथ तरती आपैसीं भाविकें अबळें ॥ ३९ ॥

कृष्णभक्ति सेतुद्वारें । तरलीं जड मूढ पामरें ।

ते भक्ती सांगिजेल यादवेंद्रें । श्रोतां सादरें परिसावी ॥ ७४० ॥

एका जनार्दना शरण । तेणें श्रोते सुप्रसन्न ।

पुढील अध्यायाचें कथन । तेणें साधक जन तरतील ॥ ४१ ॥

सांडूनियां एकपण । एका जनार्दना शरण ।

सुगम साधे आत्मज्ञान । तें भक्तिसाधन हरि सांगे ॥ ७४२ ॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे परमहंससंहितायां

एकाकारटीकायां ‘परमार्थनिर्णयो’ नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ४४ ॥ ओव्या ॥ ७४२ ॥