॥ श्री एकनाथी भागवत ॥

 

अध्याय तेविसावा

 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‌गुरु विश्वरूप । विश्वा साबाह्य तूं चित्स्वरूप ।

तुझें निर्धारितां रूप । तूं अरूपाव्यय ॥ १ ॥

चराचर जें सावेव । तें तुज अरूपाचे अवेव ।

जीवशीव हे तुझी माव । अद्वयवैभव पै तुझें ॥ २ ॥

घृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार ।

तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥ ३ ॥

ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग ।

अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥ ४ ॥

देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी ।

होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्‌गुरु ॥ ५ ॥

शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्द सबाह्य अंतरीं ।

बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥ ६ ॥

उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे ।

गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥ ७ ॥

वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी ।

शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥ ८ ॥

जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी ।

तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥ ९ ॥

तेवीं तूं वेदाचा वक्ता । सकाळ शास्त्रां युक्तिदाता ।

परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥ १० ॥

म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द ।

हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥ ११ ॥

तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशीया युक्तींचा तूंचि विज्ञाता ।

ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥ १२ ॥

जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचे कायी ।

हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥ १३ ॥

ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता ।

तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥ १४ ॥

तूं जगदाकार निःशब्द निर्विकार । तू निर्गुण निरहंकार ।

हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥ १५ ॥

जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व ।

पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥ १६ ॥

यापरी सद्‌गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता ।

तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभगवता चालविसी ॥ १७ ॥

तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्याया‌अंतीं ।

उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्ति‌उपावो ॥ १८ ॥

उद्धवें प्रश्न केला वाडा । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड ।

तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥ १९ ॥

ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक्र सुखावला आनंदस्फूर्ती ।

तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥ २० ॥

ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती ।

ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥ २१ ॥

तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती ।

ऐक राया परिक्षीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २२ ॥

ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका ।

तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥ २३ ॥

साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं ।

यालागीं शांती आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥ २४ ॥

तेविसावे अध्यायीं निरूपण । दुर्जनीं क्षोभविलें मन ।

त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥ २५ ॥

भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण ।

प्रकृतिजयाचें निरूपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥ २६ ॥

सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण ।

हें गुण्जयाचें निरूपण सुलक्षण पंचविसावा ॥ २७ ॥

सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त ।

सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि सम्स्त विषयत्यागु ॥ २८ ॥

गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान ।चहूंचे समाधान ।

चहूं अध्यायीं विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ २९ ॥

यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान ।

श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरूपी ॥ ३० ॥

 

बादरायणीरुवाच-

स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दाशार्हमुख्य ।

सभाजयन्‌ भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्यः ॥ १ ॥

 

शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती ।

वचनें संतोषला श्रीपती । तो उद्धवाप्रती संबोधी ॥ ३१ ॥

कोटी जन्मांतीं केवळ । द्विजत्वें पाविजे सक्तुळ ।

हें माहापुण्याचें निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणें ॥ ३२ ॥

सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख ।

तो सफळींही निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥ ३३ ॥

ते स्थिति नाहीं उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं ।

सभासदता आल्याही हातासी । श्रीमदासी भुलेचिना ॥ ३४ ॥

झालियाही राज्यसंपत्ती । जो विसंबेना भगवद्भक्ती ।

भागवतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चितीं महाराजा ॥ ३५ ॥

सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूळ मिळालिया कांता ।

जो विसंबेना भगवत्पथा । भागवतमुख्यता त्या नांव ॥ ३६ ॥

इंहीं गुणीं अतियुक्त । विवेकेंसी अतिविरक्त ।

श्रीकृष्णचरणीं अनुरक्त । मुख्य भागवत उद्धवू ॥ ३७ ॥

वयें धनें जें श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण ।

भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणें भाग्यें परिपूर्ण उद्धवू ॥ ३८ ॥

जो श्रीकृष्णचा विश्वासी । श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी ।

गुण ज्ञान सांगे ज्यापाशीं । त्याच्या भाग्यासी केवीं वानूं ॥ ३९ ॥

परब्रह्म जें कां साक्षात । जें उद्धवासी झालें हस्तगत ।

त्याच्या बोलामाजीं वर्तत । भाग्यें भाग्यवंत तो एक ॥ ४० ॥

उद्धवभाग्य वानित वानित । शुक्र झाला सद्गदित ।

स्वानंदें वोसंडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥ ४१ ॥

उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां वोसंडला श्रीशुक्त ।

तें देखोनि करुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥ ४२ ॥

ज्याचें निजभाग्य सांगतां । श्रीशुकासी होतसे अवस्था ।

उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥ ४३ ॥

तंव शुक म्हणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासीं ।

तेणें विनवितां हृषीकेशी । वचनमात्रेंसीं तुष्टला ॥ ४४ ॥

उद्धवासी शांतीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णांसी झाला गोड ।

त्यांचे पुरवावया कोड । निरूपण वाड सांगेल ॥ ४५ ॥

परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं ।

ऐसें उद्धवप्रेमपुरस्करीं । शांति श्रीहरि सांगत ॥ ४६ ॥

 

श्रीभगवानुवाच-

ब्रार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः ।

दुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥ २ ॥

 

उद्धवा तू जें बोलिलासी । मीही सत्य मानीं त्यासी ।

दुर्जनीं केल्या अपमानासी । सहावया कोणासी शांत्ति नाहीं ॥ ४७ ॥

देव पादुका वाहती शिरसीं । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं ।

अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यपाशीं वचनांकित ॥ ४८ ॥

ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती ।

यालागीं शांतीच्या साधक युक्तीं । तूंचि निश्चितीं जाणसी ॥ ४९ ॥

शांति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हृषीकेशी ।

अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥ ५० ॥

निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान ।

हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥ ५१ ॥

ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां ।

तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥ ५२ ॥

जो स्वयें होय अवघें जग । त्यासी लागतां उपद्रव अनेग ।

उठेना क्रोधाची लगबग । साहे अनद्वेग यथासुखें ॥ ५३ ॥

निजांगीं लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषांचा उद्गार ।

निजात्मता जो देखे चराचर । शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥ ५४ ॥

उद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी म्हणिजे सत्य साधू ।

तोचि साहे पराचा अपराधू । शांतिशुद्ध तो एक ॥ ५५ ॥

नेणोनियां निजबोधातें । इतर जे सज्ञान ज्ञाते ।

ते न साहती द्वंद्वातें । एक तूतें सांगेन ॥ ५६ ॥

 

न तथा तप्यते विद्ध पुमान्बाणैः सुमर्मगैः ।

यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ३ ॥

 

तिख्याचे अतितिख बाण । जेणें घायें होती विकळ प्राण ।

त्याहूनि दुर्जनाचे वाग्बाण । अधिक जाण रुपती ॥ ५७ ॥

लोहाचे बाण जेथ लागती । तेचि अंगें व्यथित होती ।

परी वाग्बाणांची अधिक शक्ती । घायें भेदिती पूर्वज ॥ ५८ ॥

लोहबाणाचे लागलिया घाये । ते पानपाल्या व्यथा जाये ।

परी वाग्बाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मांत ॥ ५९ ॥

वर्मस्पर्शाचें बासटें जाण । विंधितां निंदेचे वाग्बाण ।

तेणें भेदितांचि अंतःकरण । सर्वांगीं पूर्ण भडका उठी ॥ ६० ॥

दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती ।

साहावयालागीं शांती । नव्हे निश्चितीं प्राकृतां ॥ ६१ ॥

ऐशिया रीतीं यथोचित । उद्धवाचें मनोगत ।

संलक्षूनि श्रीकृष्णनाथ । शांतीचा निश्चितार्थ सांगों पाहे ॥ ६२ ॥

पूर्वीं सांगीतलें निजशांतीसी । वेगीं साधीं म्हणे उद्धवासी ।

ते अटक वाटेल तयासी । अतिसंकोचासी पावेल ॥ ६३ ॥

होतें उद्धवाचे मानासीं । हे शांति असाध्य सर्वांसी ।

जाणोनियां हृषीकेशी । सांगे इतिहासेंसीं भिक्षुगीत ॥ ६४ ॥

 

कथयन्ति महत्पुण्यमितिहासमिहोद्धव ।

तमहं वर्णयिष्याचि निबोध सुसमाहितः ॥ ४ ॥

 

अशांतिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ ।

इतिहासगंगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ति ॥ ६५ ॥

श्रीकृष्णवदनब्रह्माद्रीं । श्रीभागवत‌औदुंबरीं ।

जन्मली शांतिगोदावरी । निजमूळाकारीं निर्मळ ॥ ६६ ॥

ते गुप्त ओघें नारदगती । उद्धवगंगाद्वारीं व्यासोक्ती ।

तेचि शुकमुखकुशावर्तीं । प्रकटे अवचितीं पवित्रपणें ॥ ६७ ॥

तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाधृती समरसे भक्ती ।

त्याचि अरुणा वरुणा सरस्वती । हे संगमप्राप्ती जेथ होय ॥ ६८ ॥

तेणें सांतिगंगेची स्थिती । भरूनि उथळे अति‌उन्नती ।

तेथ श्रवणार्थी बुडी देती । ते पवित्र होती निजक्षमा ॥ ६९ ॥

ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत ।

प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥ ७० ॥

 

केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः ।

स्मरता धृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम्‌ ॥ ५ ॥

 

उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनैः उपद्रवितां त्यासी ।

म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥ ७१ ॥

आपुलें अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।

जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाते ॥ ७२ ॥

लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन ।

माझे दोषांचें निर्दळण । यांचोनि धर्में जाण होतसे ॥ ७३ ॥

संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं ।

म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥ ७४ ॥

ऐसोनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळो नेदी सर्वथा ।

चढोनि निजधैर्याचे माथां । गातिली गाथा ते ऐक ॥ ७५ ॥

उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथ । ये अर्थीं हो‌ईं सावचित्त ।

अतिलोभी तो अतिविरिक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥ ७६ ॥

 

अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढ्यतमः श्रिया ।

वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥ ६ ॥

 

मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं ।

कृषिवाणिज्यवृत्तिवरी । जीविका करी निंरतर ॥ ७७ ॥

गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी ।

परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥ ७८ ॥

पोटा सदा खाय कदत्र । तेहीं नाहीं उदरपूर्ण ।

तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥ ७९ ॥

न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य ।

देव ब्राह्मण अतिथी येथ । सदा जात पराङ्मुख ॥ ८० ॥

कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे ।

तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥ ८१ ॥

मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण ।

हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥ ८२ ॥

धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख ।

कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥ ८३ ॥

यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट ।

अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥ ८४ ॥

त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू ।

गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्धू स्वयें होय ॥ ८५ ॥

धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती ।

धनलोभीं ज्याची स्थिती । कदर्यवृत्ती त्या नांव ॥ ८६ ॥

ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे ।

तैं प्राणांताचि ये‌ऊनि घडे । विचार पुढें असेना ॥ ८७ ॥

वानराचे गाळींचे चणे । हाता न येती जितां प्राणें ।

तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥ ८८ ॥

 

ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाङ्मात्रेणापि नार्चिताः ।

शुन्यावसथ आत्मापि काले कामैरनर्चितः ॥ ७ ॥

 

घरींचा भात वेंचेल कांहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं ।

तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥ ८९ ॥

अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले आपण ।

जे वचनमात्रें जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक ॥ ९० ॥

देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी ।

आशा त्यजिली संन्यासीं । जेवीं राजहंसीं गोमय ॥ ९१ ॥

भिकारीं सांडिलें त्याचें द्वार । अतिथीं डावलिलें निरंतर ।

पाहुणा दूरी पाहे बिढार । निराशी पितर सर्वदा ॥ ९२ ॥

दारा न ये कोरान्नकर । घर सांडूनि गेले उंदिर ।

का‌उळीं वोसंडिलें तें घर । चिडियां साचार न मिळे दाणा ॥ ९३ ॥

मुंग्यांसी पडे नित्य लंघन । तिंही धरिलें बिढार आन ।

पोटा ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतरांची ॥ ९४ ॥

अत्यंत भूक लगल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी ।

तेथ कायसी सेवकांची गोठी । कावलीं पोटीं स्त्रीपुत्रें ॥ ९५ ॥

जैं वमन घडे त्यासी । तैं न करी फळाहारासी ।

अधिक वेंचू कोण सोशी । यालागीं उपवासी स्वयें पडे ॥ ९६ ॥

तेथ कुळगुरूचा सन्मान । कुळधर्म गोत्रभोजन ।

व्याही जांव‌ई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥ ९७ ॥

ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसी दृष्टिभेटी हाटीं जाण ।

परी जिव्हेसी आलिंगन । प्राणांतीं आपण हों नेदी ॥ ९८ ॥

मातेचें स्तनपान सेविलें । तेंचि क्षीर रसना चाखिलें ।

पुढें दूधचि वर्जिलें । व्रत धरिलें धनलोभें ॥ ९९ ॥

तस रसनेचें माहेर । तेणेंवीण ते गादली थोर ।

धनलोभ अतिनिष्ठुर । करितां करकर भेटों नेदी ॥ १०० ॥

वस्त्रें मळकीं अतिजीर्ण । मस्तक सदा मलिन ।

मुखीं वास निघती जाण । स्वप्नींही पान न खाय ॥ १ ॥

सण वार दिवाळी दसरा । तैं जुने जोंधळे धाडी घरा ।

अन्नेंविण पीडी लेंकुरां । कदर्यु खरा या नांव ॥ २ ॥

धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन ।

विमुख झाले स्वजन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥

 

दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः ।

दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन्‌ प्रियम्‌ ॥ ८ ॥

 

नाहीं स्वधर्मीं निजशीळ । दानधर्म खुडी सकळ ।

अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ बोलिजे ॥ ४ ॥

अन्ना‌आच्छादनेंवीण । कुटुंबेंसहित आपण ।

जो कदर्थवी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नांव ॥ ५ ॥

कदर्यु नरासी तंव देख । मुख स्त्री होय विमुख ।

स्वजन आणि सेवक ।पुत्रही पराङ्मुख होती त्यासी ॥ ६ ॥

आपले जे कां सखे बंधू । तेही करूं लागती विरोधू ।

द्रव्यविभागाचा संबंधू । कलह सुबद्धू आरंभे ॥ ७ ॥

गांठीं असोनि अमित धन । न करी माहेरसणबोळवण ।

कन्या क्षोभोनियां जाण । शाप दारुण त्या देती ॥ ८ ॥

गोत्रज सदा चिंतित । हा मरे तैं जेवूं दूधभात ।

आप्त ते झाले अनाप्त । अवघे अनहित वांछिती ॥ ९ ॥

जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचें संरक्षण ।

तें काळेंचि होय क्षीण । तेंचि लक्षण हरि सांगे ॥ ११० ॥

 

तस्यैंव यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः ।

धर्मकामविहीनस्य चिक्रुधुः पञ्चभागिनः ॥ ९ ॥

 

खाय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशीं जैसें भूत ।

तैंसे याचें यक्षवित्त । असे राखत ग्रहो जैसा ॥ ११ ॥

केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत ।

त्या नांव बोलिजे यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥ १२ ॥

स्वशरीरीं भोग नाहीं जाण । तेणें इहलोक झाला शून्य ।

नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥ १३ ॥

यज्ञाचे पंच विभागी । यज्ञभाग न पवे त्यांलागीं ।

ते कोपोनियां पंचविभागीं । वित्तनाशालागीं उद्यत ॥ १४ ॥

पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभें स्वधर्मनष्ट ।

तो होय उभय लोकीं भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वें ॥ १५ ॥

करितां अति‌आयास । जोडला अर्थ बहुवस ।

त्यासी अधर्में आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥ १६ ॥

 

तदवध्यानविस्त्रस्तपुण्यस्कन्धस्य भूरिद ।

अर्थोऽप्यगच्छन्निधनं बह्वायासपरिश्रमः ॥ १० ॥

 

पंचयज्ञदेवता सकळ । येणें उपेक्षिल्या केवळ ।

तिंहीं द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्त्काळ छेदिलें ॥ १७ ॥

द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर । अस्तमाना गेला तो भास्कर ।

मग द्रव्यलाभाचा अंधकार । अधर्में थोर दाटला ॥ १८ ॥

प्रयासें संचिली संपत्ती । तिसी अधर्मांधराची ये राती ।

क्षोभल्या पंचधा यज्ञमूर्ती । पंचधा पावती महानाश ॥ १९ ॥

जो सुखी न करी कुंटुंबालागीं । जो निजात्मा निववीना नाना भोगीं ।

जो द्रव्य न वेंची धर्मालागीं । त्यसी पंचविभागी ऊठती ॥ १२० ॥

दायाद चोर राजा आगी । अधर्में रोग संचरे अंगीं ।

हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागीं पावती ॥ २१ ॥

नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित ।

नाहीं दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ आवश्यक ॥ २२ ॥

जेथ नाहीं वडिलांसी सन्मान । जेथ नाहीं पंचमहायज्ञ ।

जेथ गुरूसीं करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥ २३ ॥

ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापवादा ।

जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥ २४ ॥

त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारीं निरूपण ।

स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥ २५ ॥

 

ज्ञातयो जगृहुः किश्चित्‌ किश्चिद्दस्यव उद्धव ।

दैवतः कालतः किश्चिद्बह्यबन्धोर्नृपार्थिवात्‌ ॥ ११ ॥

 

स्त्री पुत्र हो‌ऊनि एक । तिंही ठेवा नेला कित्येक ।

गोत्रज मिळोनि सकळिक । बलात्कारें देख वांटा नेला ॥ २६ ॥

चोरीं फोडोनियां घर । काढूनि नेलें भांडार ।

आगी लागोनियां घर । वस्तु अपार जळाल्या ॥ २७ ॥

हिंसाळ्यानें गेलें शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ ।

विश्वासू ठेवा घे‌ऊनि जात । खतखूत हारपलें ॥ २८ ॥

भांडीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ।

पातिकरावरी घाला पडे । चहूंकडे अपावो ॥ २१ ॥

ठक ये‌ऊनि एकांतीं । मुलाम्याचीं नाणीं देती ।

धनलोभाचे काकुळती । हातींची संपत्ती त्यांसी दे ॥ १३० ॥

स्वचक्रपरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी ।

तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥ ३१ ॥

पाणी रिघे पेंवा‌आंत । तेणें धान्य नासे समस्त ।

धटू झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला ॥ ३२ ॥

गोठणीं सेणयां रोगू पडे । निमाले गायीम्हशींचे वाडे ।

उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणीं म्हायुद्धीं ॥ ३३ ॥

भूमिनिक्षेप जे करूं जाती । ते आपणियाकडे धूळी ओढिती ।

तेथ घालूनि निजसंपत्ती । तोंडीं माती स्वयें घाली ॥ ३४ ॥

बुद्धि सांगती वाड । येथूनि तोंडीं घाला दगड ।

ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरूं गेला ॥ ३५ ॥

ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वीनें गिळिले निःशेख ।

भाग्य झालें जैं विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥ ३६ ॥

अधर्में अदृष्ट झालें क्षीण । विपरीत देहींचें चिन्ह ।

पालटला निजवर्ण । ब्राह्मणपण लक्षेना ॥ ३७ ॥

देखे तो पुसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण ।

ऐक त्याचें न मनी मन । वर्णाग्रपण मावळलें ॥ ३८ ॥

एवं निःशेष नासलें धन । ब्रह्मवर्चस्व गेलें जाण ।

म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥ ३९ ॥

 

स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जित ।

उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम्‌ ॥ १२ ॥

 

गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं ।

धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचें जोडी हे दशा ॥ १४० ॥

नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण ।

त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥ ४१ ॥

दैव झालें पराङ्मुख । त्या हतभाग्याची दशा देख ।

स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥ ४२ ॥

ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वींचि नाहीं ।

गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥ ४३ ॥

निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख ।

खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥ ४४ ॥

भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला ।

होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥ ४५ ॥

यापरी धिक्कारिती लोक । धन जा‌ऊनि झाला रंक ।

चिंतावर्तीं पडला देख । द्‌ःखें महादुःख पावला ॥ ४६ ॥

 

तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः ।

खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत्‌ ॥ १३ ॥

 

धनलोभ्याचें गेलें धन । धनासवें न वचेचि आठवण ।

तें आठवतां फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुःखें ॥ ४७ ॥

कांटा रुतल्या भुजंगकपाळीं । पुच्छ तुटल्या सापसुरळी ।

हो कां जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥ ४८ ॥

मनें आठवितांचि धन । हृदयीं चालिलें स्फुंदन ।

अश्रुधारा स्त्रवती नयन । मूर्च्छापन्न क्षणक्षणां ॥ ४९ ॥

पोटीं दुःखें अति चरफडे । धाय मोकलूनियां रडे ।

उठे बैसे पाहे पडे । लोळे गडबडे आरडत ॥ १५० ॥

मग म्हणे रे कटकटा । झालें एक वेळ करंटा ।

अहा विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलेंसी ॥ ५१ ॥

मज ठावो नाही कोणीकडे । विचार संभवेना पुढें ।

अतिदुःख आलें जी रोकडें । तेणें विचारें रडे महादुःखी ॥ ५२ ॥

हें अल्पदुःख पावलों येथें । पुढें थोर दुःख आहे मातें ।

यम दंडील निष्ठर घातें । कोण तेथें सोडवी ॥ ५३ ॥

म्यां नाहीं दीधलें दान । मी नाहीं स्मरलों नारायण ।

मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥ ५४ ॥

म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न ।

नाहीं केलें पितृतर्पण । माझे दुःख कोण निवारी ॥ ५५ ॥

म्यां नाहीं केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा ।

नाहीं वंदिले वैष्णवरजा । माझे दुःखसमाजा कोण नाशी ॥ ५६ ॥

मी सर्वथा अकर्मकाती । बुडालों अघोरीं ।

धांव पाव गा श्रीहरी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५७ ॥

कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी ।

गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५८ ॥

तुवां रक्षिलें प्रल्हादासी । अंबरीषासी गर्भवासीं ।

उदरीं राखिलें परीक्षितीसी । तैसें मज दीनासी उद्धरीं ॥ ५९ ॥

तुवां तारिलें अहल्येसी । उद्धरिलें नष्टा अजामिळासी ।

उडी घातली गजेंद्रासी । तेणें वेगेंसी मज तारीं ॥ १६० ॥

महादोषांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी ।

तेणें लाघवें चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥ ६१ ॥

जळो जळो हा धनकाम । गेलें वृथा माझें जन्म ।

फुकाचें जें रामनाम । तें मी अधम न म्हणेंचि ॥ ६२ ॥

रामनामाच्या प्रतापासाठीं । जळती म्हापापांच्या कोटी ।

थोर अधम मी एक सृष्टीं । नाम वाक्पुटीं न म्हणेंचि ॥ ६३ ॥

ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद ।

उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥ ६४ ॥

 

स चाहेदमहो कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः ।

न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥ १४ ॥

 

हात चुरूनि म्हणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा ।

तो लाहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥ ६५ ॥

जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधलें दुःख ।

धनलोभी मी परम मूर्ख । मज‌ऐसा आणिक असेना ॥ ६६ ॥

न वेंचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासीं ।

त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसीं मज फळला ॥ ६७ ॥

बाप धनलोभाचें कवतिक । नाही इहलोक ना परलोक ।

थितें अंतरले मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥ ६८ ॥

देखें ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाहीं ।

धनलोभ घाली तैसें ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिलें ॥ ६९ ॥

जो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं ।

मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्यां अभाग्यें तोही नाशिला ॥ १७० ॥

लोभें जें धन संचिलें । तें निःशेष नासोनि गेलें ।

परी मजलागीं अतिदुःखी केलें । बांधोनि दीधलें महानरका ॥ ७१ ॥

उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभें केला व्यर्थ ।

आयुष्य गेलें हातोहात । अतिसंतप्त अनुतापें ॥ ७२ ॥

धनलोभींचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट ।

वैराग्य उपजलें उद्भट । अतिचोखट सविवेक ॥ ७३ ॥

धनलोभी जो कां नर । तो सकल दुःखांचें भांडार ।

धनबद्धक तो पामर । स्वमुखें साचार निंदीत ॥ ७४ ॥

 

प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन ।

इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥

 

प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख ।

धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥ ७५ ॥

धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ ।

धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥ ७७ ॥

जो धर्म करीन स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये ।

त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥ ७८ ॥

लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं ।

लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥ ७९ ॥

 

यशो यशस्विनां शुद्धं श्लाघा ये गुणिनां गुणाः ।

लोभः स्वलोऽपि तान्‌ हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम्‌ ॥ १६ ॥

 

रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणासी ।

खांदीं वा‌ऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥ १८० ॥

लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी ।

तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥ ८१ ॥

त्यासी न मागतां राजा जाण । करूं पाहे आपणासमान ।

त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥ ८२ ॥

स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन ।

तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥ ८३ ॥

दाता दे‌ऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन ।

तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥ ८४ ॥

वेदशास्त्रें करूनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान ।

तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥ ८५ ॥

देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी ।

नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञातें लोभें ॥ ८६ ॥

सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदस्पदासी ।

इतरांची गति का‌इसी । ते लोभाची दासी हो‌ऊनि ठाती ॥ ८७ ॥

लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद ।

तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥ ८८ ॥

कुलशील अतिसुकुमार । रूपें सर्वांगमनोहर ।

नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥ ८९ ॥

तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशः कीर्ती ।

लोभा‌ऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥ १९० ॥

धनलोभीं सदा विरोधू । धनलोभ तोडी सखे बंधू ।

धनलोभा‌ऐसा नाहीं बाधू । अति‌अशुद्धू आणिक असेना ॥ ९१ ॥

 

अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये ।

नाशोपभोग आयासस्त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम्‌ ॥ १७ ॥

 

प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां ।

द्रव्य जरी झालें उत्कर्षतां । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥ ९२ ॥

द्रव्यालागीं भावार्थतां । जैसे कष्टती सर्वथा ।

तैसा जरी कष्टे परमार्था । तैं ब्रह्म तत्त्वतां खेळणें होय ॥ ९३ ॥

एवं कष्टीं जोडल्या द्रव्यासी । रक्षणीं अतिचिंता मानसीं ।

अतिशय लागली जीवासी । अहर्निशीं धुकधुकी ॥ ९४ ॥

स्त्री पुत्र हो माता पिता । त्यांसी पतिजेना सर्वथा ।

आपणाहूनि परता । विश्वासू अर्था मानेना ॥ ९५ ॥

विसरोनियां निजघाता । चोरापासोनि राखे वित्ता ।

वित्तरक्षणीं निजचिंता । तिन्ही अवस्था एकाग्र ॥ १६ ॥

ऐसी एकाग्रता करूनी । जरी लागता भगवद्भजनीं ।

तरी वश्य होता चक्रपाणी । अर्धक्षणीं साधका ॥ ९७ ॥

उचिचानुचित विवाहासी । द्रव्य वेंचितां उदरासी ।

अतिशय होय कासविसी । धनव्ययो त्रासासी उपजवी ॥ ९८ ॥

एवं जोडूनि रक्षीतां द्रव्यासी । अवचटें नाश होय जैं त्यासी ।

तै अतिभ्रम चढे मानसीं । होती धनपिशीं बद्धक ॥ ९९ ॥

द्रव्यार्जनीं वसे प्रयास । द्रव्यरक्षणीं चिंतेचा वास ।

द्रव्यव्ययीं वळसा त्रास । भ्रमाचा रहिवास धननाशीं ॥ २०० ॥

आसिमध्यावसानीं पाहीं । द्रव्य तें समूळ अपायी ।

तेथ सुखाचा लेश नाहीं । हें ऐसें पाहीं मज जाहलें ॥ १ ॥

आयास-त्रास-चिंतेसहित । धनापाशीं भ्रम नांदत ।

अर्थ तितुका अनर्थयुक्त । तोचि अर्थ स्वयें सांगे ॥ २ ॥

 

स्तेयं हिंसानृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः ।

भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥

 

अर्थ सर्वांगे अनर्थभूत । हें माझें वचन त्रिसत्य ।

पृथ्वीमाजीं जे जे अनर्थ । ते ते अर्थांत उपजती ॥ ३ ॥

पुसाल अर्थींचे अनर्थ । ते सांगता असंख्य अनंत ।

संक्षेपें सांगेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥ ४ ॥

प्रथम अनर्थ अर्थासी । चोरी वसे अर्थापासीं ।

अर्थु नाहीं गा जयापाशीं । चोरापासून त्यासी भय नाहीं ॥ ५ ॥

द्रव्य नाहीं ज्याच्या हातीं । त्यातें देखोनि चोर भिती ।

कांहीं मागेल आम्हांप्रती । म्हणोनि लपती त्या भेणें ॥ ६ ॥

अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातुवादें सर्वस्व घेणें ।

परस्व भोळ्यांनीं बुडवणें । कां विजनीं हरणें सर्वस्व ॥ ७ ॥

मार्गीं पडलें धन पराचे । स्वयें जाणोनि अमकियाचें ।

नाही देणें त्यासी साचें । हेंही चोरीचें लक्षण ॥ ८ ॥

स्वर्णस्तेयें नरकप्राप्ती । ऐसे विवेकीही चोरी करिती ।

मा इतरांची कायशी गती । चोरीची वस्ती धनापाशीं ॥ ९ ॥

जंगीं महापापिणी चोरी । तीस कोणी बैसों नेदी द्वारीं ।

ते राहिली सुवर्णामाझारीं । धन तेथ चोरी निश्चित ॥ २१० ॥

देखतांचि त्या धनासी । विकल्पी होती संन्यासी ।

इतरांची कथा का‌इसी । चोरी धनापाशीं स्वयें नांदे ॥ ११ ॥

प्रथम अनर्थलक्षण । धनापाशीं चोरी जाण ।

धन हिंसेचे आयतन । तेंही निरूपण अवधारीं ॥ १२ ॥

धनालागीं द्वंद्व दारुण । पुत्रपौत्र मरिती जाण ।

धनालागीं घेती प्राण । सहृदपण सांडोनी ॥ १३ ॥

धनलोभाचें कवतिक । कन्या बापासी देतसे विख ।

पितृघाताचें न मानी दुःख । निष्ठुर देख धनलोभ ॥ १४ ॥

धनलोभी सांडी बापमाये । स्त्री घे‌ऊनि वेगळा राहे ।

तेथही धनलोभ पाहें । वैर होये स्त्रीपुरुषां ॥ १५ ॥

धनलोभाची नवलपरी । पुत्र पित्यातें जीवें मारी ।

पिता पुत्रातें संहारी । कठिण भारी धनलोभ ॥ १६ ॥

जे नवमास वाहे उदरांत । जे सदा सोशी नरकमूत ।

ते मातेचा करी घात । द्रव्यानिमित्त निजपुत्र ॥ १७ ॥

अभिनव धनलोभाची त्राय । नवल तें मी सांगों काय ।

पोटींचा पुत्र मारी माय । ऐसा अनर्थ होय धनसाठीं ॥ १८ ॥

एवं हिंसा ते हे संपूर्ण । दुसरें अनर्थलक्षण ।

आतां असत्याचें विंदान । तेंही निरूपण स्वयें सांगे ॥ १९ ॥

असत्य जन्मलें अर्थाच्या पोटीं । अर्थबळें तें दाटुगें सृष्टी ।

अर्थासवें असत्य उठी । असत्याची गांठी अर्थेंसीं ॥ २२० ॥

तो अर्थ असे जयापाशीं । कां अर्थ‌अपेक्षा जयासी ।

तेथ असत्य वसे कुटुंबेंसीं । धन तें मिरासी मिथ्यात्वीं ॥ २१ ॥

अर्थबळ थोर असत्यासी । मिथ्या बोलवी बापसी ।

धनलोभें झकवी मातेसी । सत्यत्व धनापाशीं असेना ॥ २२ ॥

क्रयविक्रयीं धनलोभें जाण । मिथ्या बोलती साधरण ।

परी वेदशास्त्रसंपन्न । धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या ॥ २३ ॥

वेदींचा आठव न ये पूर्ण । तो संभावनेलागीं जाण ।

म्हणवी मी वेदसंपन्न । करावया यजन नीचाचें ॥ २४ ॥

भाग दे‌ऊनि मध्यस्था । मी चतुःशास्त्रीं । विख्याता ।

ऐसें मिथ्यात्वें छळी पंडिता । राजद्रव्यार्थालागुनी ॥ २५ ॥

विरक्त म्हणविती परमार्थी । तेथही असत्यें घातली वस्ती ।

नाथिल्या सिद्धि दाविती । अर्थप्राप्तीलागोनी ॥ २६ ॥

अर्थीं असत्याचा बडिवारू । सद्भावें केला जो सद्गुरू ।

त्यासी मिथ्या नास्तिक विचारू । एकान्तीं नरू प्रतिपादी ॥ २७ ॥

अर्थ नाहीं जयापाशीं । ना अर्थकल्पना जयासी ।

असत्य स्वर्शेना तयासी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥ २८ ॥

अर्थापाशीं असत्य जाण । त्याचें सांगीतलें लक्षण ।

आतां अर्थापाशीं दंभ संपूर्ण । तेही वोळखण अवधारीं ॥ २९ ।

पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ ।

स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥ २३० ॥

धन जोडावयाकारणें । टिळे माळा मुद्रा धारणें ।

धनेच्छा उपदेश देणें । या नांव जाणणें दीक्षादंभू ॥ ३१ ॥

देखोनि धनवंत थोरू । त्यासी उपदेशीं अत्यादरू ।

नेमूनि गुरुपुजाकरभारू । सांगे मंत्रू दांभिक ॥ ३२ ॥

जयांपासोनि होय अर्थप्राप्ती । ते समर्थ शिष्य आवडती ।

दीन शिष्यातें उपेक्षिती । हे दांभिकस्थिती गुरुत्वा ॥ ३३ ॥

तुरूसी द्यावें तनु मन धन । ऐसें उपदेशूनि जाण ।

जो द्रव्य संग्रही आपण । तें दांभिकपण गुरुत्वा ॥ ३४ ॥

जेथ धनलोभ गुरूपाशीं । तो काय तारील शिष्यासी ।

धनलोभाची जाती ऐसी । करी गुरुत्वासी दांभिक ॥ ३५ ॥

आखाडभूती‌ऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन ।

उपदेश घे हो‌ऊनि दीन । तो दांभिक जाण शठ शिष्य ॥ ३६ ॥

गुरूपदेशें शिकोनि युक्ती । स्वयें ज्ञानाभिमाना येती ।

गुरूतें मानी प्राकृतस्थिती । तोही निश्चितीं दांभिक ॥ ३७ ॥

मी एक सधन सज्ञान । ऐसा सूक्ष्मरूप ज्ञानभिमान ।

करी गुरु‌आज्ञेचें हेळण । हेंही लक्षण दंभाचें ॥ ३८ ॥

अहं ब्रह्म हेही स्फूर्ती । न साहे जेथ स्वरूपस्थिती ।

तेथ मी ज्ञाता हे घोंगडी युक्ती । स्फुरे निश्चितीं सूक्ष्मदंभें ॥ ३९ ॥

जीवासी देहाचें मध्यस्थान । तेथ दंभाचें अधिष्ठान ।

त्यासी मिळोनियां मन । ज्ञानाभिमान उपजवी ॥ २४० ॥

नवल दंभाचें कवतिक । आम्ही अग्निहोत्री याज्ञिक ।

तेचि जीविका करूनि देख । नाडले वेदपाठक धनलोभें ॥ ४१ ॥

सोडोनि परमार्थाची पोथी । ब्रह्मज्ञान सांगे नाना युक्तीं ।

तेही ज्ञाते दंभे नाडिजेती । द्रव्यासक्ती धनलोभें ॥ ४२ ॥

मंत्रतंत्रांची कथा कोण । मुख्य गायत्री वेंचिती ब्राह्मण ।

आम्ही स्वधर्मनिष्ठापावन । म्हणती जाण दांभिक ॥ ४३ ॥

दंभें नाडिले संन्यासी । लौकिक राखणें पडे त्यांसी ।

ज्यालागीं मुंडिले शिसीं । त्या अर्थासी विसरले ॥ ४४ ॥

दृष्टि सूनि अन्नसन्मान । संन्यासी करिती शौच स्न्नान ।

शुद्ध न करवेचि निजमन । वादव्याख्यान अतिदंभें ॥ ४५ ॥

घ्यावया परद्रव्य परान्न । कां देहप्रतिष्ठेलागीं जाण ।

मिथ्या दाखवी सात्त्विकपण । हें दंभलक्षण पैं चौथें ॥ ४६ ॥

द्रव्यापाशीं वसे काम । अतिशयें अतिदुर्बम ।

द्रव्य तेथ कामसंभ्रम । अतिविषम सांगात ॥ ४७ ॥

द्रव्य नसतां अपेक्षाकाम । तो सबाह्य करवी अतिश्रम ।

अनेक कष्टांचें विषम । अतिदुर्गम भोगावी ॥ ४८ ॥

धन झालिया उन्मादकाम । करूं लागे अगम्यागम ।

उपजवी नाना अधर्म । निंद्य कर्म धनवंता ॥ ४९ ॥

कामु जडलासे धनेंसीं । तो सदा छळी धनवंतासी ।

काम खवळे धनापाशीं । अहर्निशीं मुसमुशित ॥ २५० ॥

धनापाशीं अति उद्धतू । काम पांचवा अनर्थू ।

काम तेथ निश्चितू । क्रोध नांदतू सैन्येंसीं ॥ ५१ ॥

कामप्राप्तीसी आडवी काडी । होतां क्रोधाची पडे उडी ।

खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित ॥ ५२ ॥

जप तप निष्ठा नेम । शिणोनि साधलें दुर्गम ।

क्रोध अति खवळल्या परम । ते करी भस्म क्षणार्धें ॥ ५३ ॥

धनाकडे कोणी दावी बोट । तेथ क्रोध उठी अचाट ।

वाढवी प्राणान्त कचाट । क्रोध अतिदुष्ट धनेंसीं ॥ ५४ ॥

धनागमनीं अवरोधू कां धनव्ययाचा संबंधू ।

ते संधीं खवळे क्रोधू । अतिविरोधू उन्मत्त ॥ ५५ ॥

धनापाशीं क्रोध समर्थू । हा सहावा अति‌अनर्थू ।

धनापाशीं गर्व अद्भुतू । तेंचि निश्चितू सांगत ॥ ५६ ॥

धनगर्वाचिये पुष्टी । सखा बाप नाणी दृष्टी ।

मातेतें म्हणे करंटी । इतरांच्या गोष्टी त्या काय ॥ ५७ ॥

सिद्ध साधक तापसी । त्यांतें देखोनि उपहासी ।

म्हणे करंटे ते होती संन्यासी । हरिदासासी विटावी ॥ ५८ ॥

अंगीं धनाचें समर्थपण । त्याहीवरी जैं झालें ज्ञान ।

तैं गर्वाचा ताठा चढे पूर्ण । जेवीं आरें धारणू गिळिला ॥ ५९ ॥

धनज्ञानगर्वाची जाती कैसी । गर्व करी सद्गुरूसी ।

त्याच्या वचनातें हेळसी । शेखीं धिक्कारेंसी निर्भर्त्सी ॥ २६० ॥

धनज्ञानगर्वाचें लक्षण । देखे सद्गुरूचे अवगुण ।

गुरूसी ठेवी मूर्खपण । मी एक सज्ञान हें मानी ॥ ६१ ॥

जो भ्रांत म्हणे सद्गुरूसी । गुरु मानी त्यांते द्वेषी ।

बाप गर्वाची जाती कैशी । देखे गुणदोषांसी सर्वांच्या ॥ ६२ ॥

नवल गर्वाची पैं काहणी । गुणू सर्वथा सत्य न मानी ।

दोष पडतांचि कानीं । सत्य मानी निश्चित ॥ ६३ ॥

सात्त्विक ये गर्वितापुढें । त्यासी सर्वथा मानी कुडें ।

अतिसात्त्विकता दृष्टी पडे । तरी मानी वेडें अर्बुजा ॥ ६४ ॥

अंगीं भवंडी भरे लाठी । तैं भूमी लागे ललाटीं ।

साष्टांग नमावया सृष्टीं । पात्र गर्वदृष्टीं दिसेना ॥ ६५ ॥

तेथें कोण दे सन्मान श्रेष्ठा । कायसी वृद्धाची प्रतिष्ठा ।

धनगर्वे चढला ताठा । मी एक मोठा ब्रह्मांडीं ॥ ६६ ॥

एक गुरुसेवाविश्वासकू । निजसेवा झाला वश्यकू ।

त्यासी गर्व चढे मी सेवकू । तो अतिबाधकू सेवका ॥ ६७ ॥

ऐसा अतिगर्वें उन्नद्ध । हा सातवा गर्वबाध ।

आतां धनापाशीं महामद । तोही संबंध द्विज सांगे ॥ ६८ ॥

ज्यासी चढे धनमदू । तो उघडे डोळां होय अंधू ।

कानीं नायके शब्दबोधू । धनमदें स्तब्धू सर्वदा ॥ ६९ ॥

धनमदें अति‌अंहता । धनमदें उद्धतता ।

धनमदें अद्वातद्वता । करी सर्वथा अधर्म ॥ २७० ॥

धनमद अति अपवित्र । तो चढल्या होय अतिदुस्तर ।

न म्हणे पात्र अपात्र । विचरे विचित्र योनीसी ॥ ७१ ॥

जो धनमदा वश होय । तो न मानी कोणाचेंही भय ।

न जावें तेथ स्वयें जाय । न खावें तें खाय यथेष्ट ॥ ७२ ॥

न धरावा तो संग धरी । न करावें तें कर्म करी ।

न बोलावें तें उच्चारी । जनाभीतरीं उद्भतू ॥ ७३ ॥

न देखे आपुलें केलें । परापवाद स्वयें बोले ।

नायके बापाचें शिकविलें । वेडें केलें धनमदें ॥ ७४ ॥

शिकविलें तें नायके । वरिलें तें करी आवश्यकें ।

साधुनिंदा निजमुखें । यथासुखें जल्पत ॥ ७५ ॥

न मानी स्वयाती स्वाचारू । न मानी दोष अनाचारू ।

न मानी वडीलांचा विचारू । धनमदें थोरू मातला ॥ ७६ ॥

आधींच तारुण्यें अतिलाठा । वरी धनमदें चढला ताठा ।

यापरी मातला मोठा । न चाले वाटा सुपंथीं ॥ ७७ ॥

स्त्रीकामें अतिविव्हळ । न विचारी कुळशीळ ।

न म्हणे सकाळ सांज वेळ । विचरे केवळ खरू जैसा ॥ ७८ ॥

अभिलाषूनि परनारी । दिवसा विचरे दुपारीं ।

गतालकाही अंगीकारी । भय न धरी पापाचें ॥ ७९ ॥

जो मातला करूनि मद्यपान । तो मद तत्काळ उतरे जाण ।

त्याहूनि धनमद दारुण । आल्याही मरण उतरेना ॥ २८० ॥

अकर्म करितां आपण । तेंचि निजघातें घे‌ईल प्राण ।

हेही नाठवे आठवण । धनमदें जाण भुलला ॥ ८१ ॥

महा‌अनर्थी धनमद जाण । हें आठव्या अनर्थाचें लक्षण ।

आतां धनापाशीं भेद पूर्ण । तेंचि निरूपण द्विज सांगे ॥ ८२ ॥

भेद जन्मला धनाचे कुशीं । धन तेथ भेदाची मिराशी ।

भेद सपरिवार धनापाशीं । अहर्निशीं जागत ॥ ८३ ॥

हाता आलिया बहु धन । मातेहूनि राखे भिन्न ।

पित्यासी करी वंचन स्त्रियेसीही जाण कळों नेदी ॥ ८४ ॥

अर्थ पुत्रासी अतर्क्यता । तेथ इतरांची कोण कथा ।

भेदू तो अर्थापरता । जगीं सर्वथा असेना ॥ ८५ ॥

माथां साहोनि शस्त्रघात । बंधु बंधूसी रणीं साह्य होत ।

तेचि बंधू अनास होत । वांटितां अर्थविभाग ॥ ८६ ॥

मित्र मित्रांसी वेंचिती प्राण । तेथें प्रवेशोनियां धन ।

विकल्पा आणी मित्रपण । भेद दारुण धनापाशीं ॥ ८७ ॥

आपणचि गांठीं बांधिलें धन । तें क्षणक्षणां पाहे आपण ।

येथवरी धनापाशीं जाण । विकल्प पूर्ण नांदत ॥ ८८ ॥

ऐसा धनापाशीं भेदू जाण । हें नववें अनर्थलक्षण ।

अतिशयें अतिनिर्वाण । वैर दारुण धनेंसीं ॥ ८९ ॥

धनापाशीं वैर पूर्ण जाण । हें अंगें भोगूनि आपण ।

सांगे कदर्यु ब्राह्मण । वैरलक्षण धनाचें ॥ २९० ॥

पित्यापुत्रांमाजीं विरोधू । पाडितो हा द्रव्यसंबंधू ।

वैरी करी सखे बंधू । तो हा प्रसिद्धू धनलोभ ॥ ९१ ॥

आपुल्या कळवळ्याचे सुहद । त्यांसी धनलोभ पाडी द्वंद्व ।

धनास्तव अतिसुबुद्ध । वैर विरुद्ध सर्वांसी ॥ ९२ ॥

प्राणाहूनि पढिये मित्रू । त्यांसी धनलोभ करी शत्रू ।

धनलोभ अति‌अपवित्रू । वैरी दुस्तरू जगीं हा ॥ ९३ ॥

बंधुकलहें धन वांटितां । अधिक न ये आपुल्या हाता ।

तैं वांटा करिती जे धर्मतां । त्या साधूंसी तत्त्वतां वैर चाळी ॥ ९४ ॥

जिचे उदरीं जन्मला आपण । जिचें सदा केलें स्तनपान ।

ते मातेसी धनलोभें जाण । वैर संपूर्ण चालवी ॥ ९५ ॥

आपली जे कां निजजननी । अर्थ तीतें करी वैरिणी ।

बाहेर घाली घरांतूनी । मुख परतोनी पाहेना ॥ ९६ ॥

ज्याचेनि तुटे भवबंधन । ज्याचेनि बोलें हो‌इजे पावन ।

त्या सद्गुरूसी अबोला जाण । धनाभिमान धरवित ॥ ९७ ॥

धनाभिमानाचा बडिवार । सद्गुरूमाजीं पाडी वैर ।

धनाभिमानी अणुमात्र । नव्हे निर्वैर कोणासी ॥ ९८ ॥

जें हें सांगितलें निरूपण । त्या नांव वैर संपूर्ण ।

हें दहावें अनर्थलक्षण । अविश्वासी धन तें ऐक ॥ ९९ ॥

धनाभिमानाचा विलास । न मानी पित्याचा विश्वास ।

पूर्ण बंधूचा अविश्वास । केवीं सुहदांस पातेजे ॥ ३०० ॥

’आत्मा वै पुतनामासी’ । जो साचार धणी सर्वस्वासी ।

त्या पातेजेना निजपुत्रासी । अति‌अविश्वासी धनलोभ ॥ १ ॥

धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्य हें वचन ।

पूर्वजांची भाक निर्वाण । दे‌ऊनि आपण जे परणी ॥ २ ॥

जिणें जीवू प्राण सर्वस्वेंसीं । साचार अर्पिला भ्रतारासी ।

ऐशियेही धर्मपत्नीसी । अविश्वासी धनलोभ ॥ ३ ॥

जे उदरीं वाहे नवमासीं । जे सर्वदा विष्ठामूत्र सोशी ।

धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥ ४ ॥

धनाभिमान ये जयापाशीं । तो विश्वासेना सद्गुरूसी ।

इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५ ॥

अविश्वासाचें मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण ।

तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥ ६ ॥

जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ ।

त्यातें सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥ ७ ॥

सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास बोलिला पुराणीं ।

जो प्रकटतां अर्धक्षाणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥ ८ ॥

अविश्वासा अभिमान भेटे । तैं मुक्ताची मुक्तता तुटे ।

मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥ ९ ॥

अविश्वासें कवळिल्या चित्ता । अभिमानें म्हणे मी ज्ञाता ।

तेव्हां उभ‌उभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥

अविश्वास येतां पहा हो । सकुटुंब पळे सद्भावो ।

मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरूनी ॥ ११ ॥

वाडेंकोडें अविश्वासी । विकल्पू नांदे अहर्निशी ।

जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥ १२ ॥

अंगोवांगीं अविश्वास । परमार्थराष्ट्र पाडी वोस ।

दद्गुरूचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्मयाचा ॥ १३ ॥

यालागीं सकळ दोषांचा राजा । अविश्वासाहूनि नाहीं दुजा ।

तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥ १४ ॥

जिकडे अविश्वासें चाली केली । तिकडे परमार्था पळणी झाली ।

विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥ १५ ॥

सिद्धाचें गेलें सिद्धिभूषण । साधकें सपा‌ई नागवलीं जाण ।

रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥ १६ ॥

यमनियमांचीं नगरें जाळी । क्रोधू तापसा करी होळी ।

मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥

शमदमाचें घरटें । खाणोनि सांडिलें आव्हाटे ।

वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८ ॥

व्रतोपवास यांचीं साजिरीं । निष्काम उपवनें चौफेरीं ।

तीं जाळिलीं उपरा‌उपरी । नानापरी विकल्पें ॥ १९ ॥

ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आले भेटीसी ।

विकल्पें अभय दे‌ऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥ ३२० ॥

ऐशिया अविश्वासापुढें । परमार्थ का‌इसें बापुडें ।

विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥ २१ ॥

पोटांतून जो अविश्वासी । तो सदा देखे गुणदोषांसी ।

अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥ २२ ॥

यापरी अविश्वासी । बद्धवैर पडे परमार्थासी ।

यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥ २३ ॥

सकळ दोषांमाजीं समर्थ । सकळ दोषंचें राजत्व प्राप्त ।

तो ह आकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥ २४ ॥

अकराहीं इंद्रियांसी । पूर्ण करी अविश्वासेंसी ।

यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥ २५ ॥

मुख्यत्वें स्पर्धेचें आयतन । बहुविद्या का बहुधन ।

हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥ २६ ॥

विद्या झालिया संपन्न । पंडित पंडितां हेळण ।

मुख्य गुरूशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥ २७ ॥

गांठीं झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण ।

कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढ्य ॥ २८ ॥

माझिया निजधनापुढें । गणितां अल्प गंगेचे खडे ।

माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभे राहे ॥ २९ ॥

मग जे जे देखे धनवंत । ते ते हेळूनि सांडी तेथ ।

यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ॥ ३३० ॥

एवं धरूनियां अर्थ । स्पर्धा बारावा अनर्थ ।

सदा नांदे धना‌आंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥ ३१ ॥

आतां तीन अर्थांचा मेळा । एके पदीं झाला गोळा ।

तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥ ३२ ॥

स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन ।

हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥ ३३ ॥

जो कां पुरुष निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान ।

देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥ ३४ ॥

धनहीन पुरुषाचे घरीं । कलहो स्त्री-पुरुषांमाझारीं ।

निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥ ३५ ॥

धनवंता पुरुषासी स्त्री लवोटवो करी कैसी ।

कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥ ३६ ॥

त्या धनाची झालिया तुटी । स्त्री वसवसोनि लागे पाठी ।

आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठे फडफडोनी ॥ ३७ ॥

दिवसा पोरांची तडातोडी । रात्रीं न सोसे तुमची वोढी ।

हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८ ॥

ऐशापरी कडोविकडी । निर्भर्त्सूनि दूरी दवडी ।

निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥

यापरी निर्धन पुरुषासीं । स्वस्त्री वश्य नव्हे त्यासी ।

स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥ ३४० ॥

लक्षूनि धनवंत नर । वेश्या मिरवी श्रृंगार ।

हावभाव चमत्कार । त्यासी धनाढ्य थोर भाळले ॥ ४१ ॥

वेश्याकामसंगें जाण । अखंड लांचावलें मन ।

तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥ ४२ ॥

मद्यापानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा खेळे द्यूत ।

एवं हेही तिव्ही अनर्थ । जाण विश्चित अर्थासी ॥ ४३ ॥

अर्थापाशीं पंधरा अनर्थ । ते सांगीतले इत्थंभूत ।

सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥ ४४ ॥

 

एते पञ्चदशानर्था ह्यर्थमूलामता नृणाम्‌ ।

तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोऽर्थीं दूरतस्त्यजेत्‌ ॥ १९ ॥

 

एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित ।

जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥

त्यासी नाम मात्र हा अर्थ । येर्क्ष्हवीं मूर्तिमंत अनर्थ ।

यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंही निश्चित त्यागावा ॥ ४६ ॥

जेवीं कां बोळ हुंगेना माशी । ढेंकुण न ये तेलापाशीं ।

वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं जो अर्थासी नातळे ॥ ४७ ॥

जेवीं कां अग्नीमाजीं लवण पडे । तें तडफडोनि बाहेर उडे ।

तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥ ४८ ॥

बचनाग मुखीं घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण ।

तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थीं ॥ ४९ ॥

यालागीं जो मिक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हातीं ।

काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥ ३५० ॥

अर्थमूळ सकळ भेद । पूर्वीं बोलिला एवंविध ।

तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सांगत ॥ ५१ ॥

 

भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा ।

एकास्त्रिग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥

 

इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्न्नेह बिघडी ।

सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥

पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व ।

तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥ ५३ ॥

काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्न्नेह तोडी ।

त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४ ॥

 

अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः ।

त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम्‌ ॥ २१ ॥

 

अति‌अल्प अर्थासाठीं । सुहृदता सांडोनि पोटीं ।

कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥ ५५ ॥

तेथें आप्त हो‌ऊनि अनाप्त । परस्परें करिती घात ।

अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥ ५६ ॥

जितां अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारीं ।

उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥

 

लब्ध्वा जन्ममरप्रार्थ्यं मानुष्यं तद्द्विजाग्यताम्‌ ।

तदानादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम्‌ ॥ २२ ॥

 

कोटि जन्माचें शुद्ध सुकृत । तेणें कर्मभूमीं नरदेह प्राप्त ।

तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥ ५८ ॥

ऐसे जन्म पावावया येथ । अमरही मरण मागत ।

इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥ ५९ ॥

जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत ।

तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥ ३६० ॥

येथ करितां भगवद्भक्ती । पायां ल्लगती चारी मुक्ती ।

यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥ ६१ ॥

ऐसें उत्तम जन्म पावोनी । अति‌अभाग्य मी त्रिभुवनीं ।

निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥ ६२ ॥

धनलोभाचिया भ्रांती । कां लोकेषण लौकिकस्थिती ।

जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥ ६३ ॥

तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्यां नरकप्राप्ती ।

चौर्क्ष्यायशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥ ६४ ॥

जया ब्राह्मणजन्मा‌आंत । स्वर्गमोक्ष सहजें प्राप्त ।

तेचि अर्थींचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥ ६५ ॥

 

स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान्‌ ।

द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥

 

ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम ।

तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥ ६६ ॥

ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती ।

एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥

सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी ।

मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥ ६८ ॥

तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी ।

एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥ ६९ ॥

स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञधारी ।

एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥

ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण ।

तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥ ७१ ॥

दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य ।

तेंही पावोनि मे आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥ ७२ ॥

पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर ।

अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥ ७३ ॥

अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन ।

वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥ ७४ ॥

आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । ने‌ऊनि सांडावे बिदीसी ।

कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥ ७५ ॥

तें अर्थत्यागनिरूपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण ।

जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥ ७६ ॥

 

देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः ।

असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥

 

दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ ।

करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥ ७७ ॥

स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण ।

पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥ ७८ ॥

जित्यां पितरां क्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण ।

त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥ ७९ ॥

त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न ।

यथाशक्ती द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥ ३८० ॥

पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ।

ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥ ८१ ॥

व्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार ।

जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥ ८२ ॥

जो पितृवचन अविश्वासे । तेणें केल्या पापराशी ।

जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥ ८३ ॥

जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण ।

या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥ ८४ ॥

सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण ।

चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥ ८५ ॥

धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न ।

यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥ ८६ ॥

ब्राह्मण तेचि ऋषिश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार ।

ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला ढेंकर देतसे ॥ ८७ ॥

बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण ।

निरसावी दे‌ऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥ ८८ ॥

कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन ।

तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥ ८९ ॥

कुटुंबासी यथोवित । सुखी करूनि समस्त ।

याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥ ३९० ॥

अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक ।

तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥ ९१ ॥

सकळ दानांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान ।

दीनास दे‌ऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥

कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन ।

परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥

जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन ।

तेथ न करूनि अधिकन्यून । करावें भोजन समभागें ॥ ९४ ॥

पंक्तीमजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न ।

यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥ ९५ ॥

धनाचा सद्व्ययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा ।

अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥ ९६ ॥

अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण ।

त्याचेंचि सार्धक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥ ९७ ॥

साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी ।

त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥ ९८ ॥

दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत ।

तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ता‌आधीं ॥ ९९ ॥

सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणाचें कल्याण ।

ते हे सद्‌गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥ ४०० ॥

तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण ।

वैकुंठी कैलासी संपूर्ण । भेरीनिशाण त्राहटिलें ॥ १ ॥

स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरूसी अर्पण ।

तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥ २ ॥

जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरूसी अर्पी निजसंपत्ती ।

त्यातें अंगीकारूनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥ ३ ॥

ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती ।

दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥ ४ ॥

ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण ।

त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥ ५ ॥

दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं । अर्थें

परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥ ६ ॥

ऐसें न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण ।

जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥ ७ ॥

एवं कदर्थूनि निजप्राण । जें सांचिलें यक्षधन ।

तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥ ८ ॥

म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा ।

हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥ ९ ॥

सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित ।

ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥ ४१० ॥

 

व्यर्थयार्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम्‌ ।

कुशला येन सिध्यन्ति जरठः किं नु साधवे ॥ २५ ॥

 

निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त ।

कष्टें मिळवावया वित्त । झालों उन्मत्त अविवेकी ॥ ११ ॥

करितां वित्ताचे आयास । गेलें तारुण्य बळ आयुष्य ।

शरीर क्षीण झालें निःशेष । तरी वित्ताचा शोष शमेना ॥ १२ ॥

अर्थें अर्थ वाढवितां । अनिवार वाढली चिंता ।

तेथें विसरलों निजस्वार्था । अर्थलोभता कदर्यु ॥ १३ ॥

जेणें वित्तें जीवितें साचार । भूतदया परोपकार ।

करूनियां विवेकी नर । भवाब्धिपरपार पावले ॥ १४ ॥

मज निर्दैवाचें येथ । वृथा वित्त वृथा जीवित ।

आयुष्यही गेलें व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥ १५ ॥

म्हणाल असतां जीवें जीत । साधूनि घे‌ऊं निजस्वार्थ ।

तें आतां न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेलीं ॥ १६ ॥

अधर्मास्तव गेलें वित्त । जरेनें गिळिलें सामर्थ्य ।

केवळ मी जरठ येथ । दैवहत उरलों असें ॥ १७ ॥

कटकटा जोडितां अर्थ । लोक नाडले समस्त ।

ऐसें जाणोनि प्रस्तुत । स्वयें सांगत कदर्यु ॥ १८ ॥

 

कस्मात्संक्लिश्यते विद्वान्‌ व्यर्थयार्थेहयासकृत्‌ ।

कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥ २६ ॥

 

येथ अज्ञानची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती ।

तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥ १९ ॥

ऐसे भ्रमले से सज्ञान । तेही अर्जावया धन ।

युक्तायुक्त प्रयत्न । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥ ४२० ॥

सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण ।

अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥ २१ ॥

कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ ।

जे जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥ २२ ॥

भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख ।

येथ अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥ २३ ॥

 

किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरूत ।

मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥ २७ ॥

 

कटकटा वर्णाग्यें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो ।

भोगीं वाढवीजे जो देहो । तोचि पहा हो नश्वर ॥ २४ ॥

त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग ।

धन जोडणें अनेग । तोचि मार्ग निर्धनत्वा ॥ २५ ॥

तें धन मिळे अनायासीं । यालागीं धनवंत उपासी ।

अर्थ जोडोनियां प्रयासें । भोगितां कामासी सुख काय ॥ २६ ॥

कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थ स्त्रियेतें प्रतिपाळी ।

तेचि नानापरी सळी । देतां किंकळी सुटेना ॥ २७ ॥

स्त्रीपुत्रकामभोगादिक । तेणें देहासी द्यावें सुख ।

तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥ २८ ॥

जे जे अतिक्रमे घडी । ते ते काळ वयसा तोडी ।

येथ कोण भोगाची गोडी । धनकामें वेडीं सज्ञानें केलीं ॥ २९ ॥

सर्पमुखीं दुर्दुर जातां । तो दर्दुर होय माशा खाता ।

तेणें न सुटे सर्पग्रासता । जाण तत्त्वतां जयापरी ॥ ४३० ॥

तेवीं नानाभोगमेळें । देहींचा मृत्यु मागें न टळे ।

हें जाणॊनि आंधळे । धनकामें झाले सज्ञान ॥ ३१ ॥

स्वयें कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम ।

हा केवळ मायेचा भ्रम । भ्रमले परम महासिद्ध ॥ ३२ ॥

धनें हो‌ईल परलोक । तोही भोगू दुःखदायक ।

भोगक्षयें कर्ममूर्ख । येती देख अधःपाता ॥ ३३ ॥

करितां भोग्य काम्य कर्म । पुढती मरण पुढती जन्म ।

भोगणें पडे अविश्रम । हें दुःख परम धनकामा ॥ ३४ ॥

धनकामासी निजसुख । सर्वात्मना नाहीं देख ।

मीही ऐसाचि होतों मूर्ख । निजभाग्यें देख धन गेलें ॥ ३५ ॥

 

नूनं में भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः ।

येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥ २८ ॥

 

मी पूर्वी होतों अति‌अभाग्य । आतां झालों अतिसभाग्य ।

मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥ ३६ ॥

मझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान ।

तें हरोनि आपण । कृपा पूर्ण मज केली ॥ ३७ ॥

भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो ’हरी’ ।

तेणें कृपा करून पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥ ३८ ॥

वैराग्य विवेकविण आंधळे । विवेक वैराग्यवीण पांगळें ।

ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥ ३९ ॥

ऐशी हरीनें कृपा करूनी । माझें धनेंसीं अज्ञान हरूनी ।

विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥ ४४० ॥

परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं ।

हरी कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥ ४१ ॥

भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त ।

वित्तत्यागें करूनि सुचित्त । दे विवेकयुक्त वैराग्य ॥ ४२ ॥

ऐसें घेतेंदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।

यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साही गुण वशवर्ती ॥ ४३ ॥

त्याचें अचिंत्यानंतरूप । परी मजलागीं झाला सकृप ।

माझें धनेंसी निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥ ४४ ॥

हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता ।

त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥ ४५ ॥

करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ ।

विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥ ४६ ॥

देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी ।

तो पाठिराखा नरहरी ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥ ४७ ॥

जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी ।

त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥ ४८ ॥

जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां ।

तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥ ४९ ॥

ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव ।

तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥ ४५० ॥

सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररूपें माझा हरी ।

ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥ ५१ ॥

ऐशिये कृपेचे कारण । ये जन्मीं नाहीं साधन ।

हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥ ५२ ॥

पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशी ।

कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥ ५३ ॥

मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण ।

त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥ ५४ ॥

हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख ।

भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारूं ॥ ५५ ॥

हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण ।

वृथा जावों नेदीं अर्थ क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥ ५६ ॥

 

सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङ्गमात्मनः ।

अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥ २९ ॥

 

का‌इसा भवभयाचा पाड । घे‌ईन कोटि जन्मंचा सूड ।

नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥ ५७ ॥

देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता ।

तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥ ५८ ॥

उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत ।

गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥ ५९ ॥

जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त ।

तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥ ४६० ॥

घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी ।

तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥ ६१ ॥

आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थीं सावचित्त ।

जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥ ६२ ॥

मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ ।

जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदण ॥ ६३ ॥

वैराग्यविवेकाचें लक्षण देहगेहस्त्रियदि धन ।

असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥ ६४ ॥

म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो ।

येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥ ६५ ॥

 

तत्र मामनुमोदेरन्‌ देवास्त्रिभुवनेश्वराः ।

मुहूर्तेन ब्रह्मलोकं खट्वाङ्गः समसाधयत्‌ ॥ ३० ॥

 

इंद्रियाधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता ।

सिद्दि पावावया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥ ६६ ॥

जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगवंत ।

देवता साह्य होती समस्त । त्या अंतर्भूत हरिरूपीं ॥ ६७ ॥

देवतारूपें भावूनि हरी । सकळ देवांची सेवा करीं ।

साह्य हो‌ऊनि दीनोद्धारीं । मज भवसागरीं तारावें ॥ ६८ ॥

म्हणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ ।

वार्धकीं हे खटपट । वृथा कष्ट कां करिशी ॥ ६९ ॥

ऐसा न मानावा अर्थ । खट्वांगराजा विख्यात ।

मुहूर्तें साधिला परमार्थ । निजस्वार्थ फावला ॥ ४७० ॥

त्याहूनि माझें तंव येथ । आयुष्य असेल बहुत ।

देव साह्य होत समस्त । निमेषें परमार्थ साधीन ॥ ७१ ॥

आजी विवेकवैराग्य जैसें आहे । हें जैं निर्वाहलें राहे ।

तैं कळिकाळ बापुडें काये । म्यां जितिला होये संसार ॥ ७२ ॥

हा पूर्वी कैसा होता येथ । आतां पालटलें याचें वृत्त ।

झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्यें सांगत श्रीकृष्ण ॥ ७३ ॥

 

श्रीभगवानुवाच-

इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः ।

उन्मुच्य हृदयग्रन्थीन्‌ शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥ ३१ ॥

 

ऐसा तो अवंतीच ब्राह्मण । अतिकदर्यु होता जाण ।

त्याच्या हातींचें गेलिया धन । वैराग्यचिन्ह पालटले ॥ ७४ ॥

यालागीं वैराग्यविविवेक चित्तीं । झाल्या आंदणी ब्रह्मप्राप्ती ।

कृष्ण सांगे उद्धवाप्रती । निजात्मस्थिती साधावया ॥ ७५ ॥

पूर्वीं होता ब्राह्मणाधम । धनलोभी निंद्यकार्म ।

तोचि झाला द्विजोत्तम । विवेकें परम वैरागी ॥ ७६ ॥

पूर्वीं केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा ।

ऐशिया अति‌उल्हासता । निजपरमार्था साधक ॥ ७७ ॥

माझिया दुःखाचें कारण । माझा मीचि झालों जाण ।

धरितां काम लोभ धनाभिमान । दुःख दारुण मज माझें ॥ ७८ ॥

मज दुःख दे‌ऊनि गेलें धन । धन तें दुःखाचें भाजन ।

स्त्रीपुत्रार्थ सलोभी आपण । तिंहीच जाण मज दवडिलें ॥ ७९ ॥

धरावा ज्ञातीचा अभिमान । तंव स्वयातीं सांडिलों जाण ।

मजसी विमुख झाले स्वजन । त्यांचा लोभ कोण मज आतां ॥ ४८० ॥

स्त्री पुत्र स्वजन धन । यांच्या लोभांचें मुख्य कारण ।

माझा मज देहाभिमान । त्यासी माझें नमन साष्टांग ॥ ८१ ॥

नमन स्त्रीपुत्रादि धनांसी । नमन स्वयातिस्वजनांसी ।

नमन देहाभिमानासी । संबंध तुम्हांआम्हांसी असेना ॥ ८२ ॥

जेवीं कां जळा आणि चंद्रबिंबासी । एकत्र वास दिसे दोहींसी ।

परी चंद्र अलिप्त जळेंसीं । तेवीं संबंध तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८३ ॥

जेवीं कां अखंड अहर्निशीं । छाया जडलीसे रूपासी ।

तैं रूप न बैसे निजच्छायेसी । तेवीं संबंधू तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८४ ॥

जेवीं तारुण्य ये देहापाशीं । तेणें तारुण्यें देहो मुसमुशी । शेखीं

तारुण्य सांडी देहासी । तेंवी म्यां तुम्हांसी सांडिलें ॥ ८५ ॥

वनीं वसंताचें रिगवणें । वनश्री शोभा मिरवी तेणें ।

तो वस्तूं जेवीं सांडी वनें । तेवीं म्यां सांडणें अहंममता ॥ ८६ ॥

बाप सवैराग्य विवेक । त्याग करविला अलोलिक ।

देहाभिमाना तिळोदक । दीधलें देख ममतेसी ॥ ८७ ॥

जेवीं भ्रष्टलिया पुत्रासी । पिता घडस्फोटें त्यागी त्यासी ।

तेंवी त्यागूनि देहाभिमानासी । स्वयें संन्यासी तो झाला ॥ ८८ ॥

जेवीं कां ये फळ परिपाकातें । सांडी जन्मला निजदेहातें ।

देंठ न धरी त्या फळातें । फळ देंठातें धरीना ॥ ८९ ॥

तेवीं हा न धरी अहंतेसी । अहंता लाजिली न ये यापाशीं ।

हाही देहाभिमानासी । सद्भावेंसीं नातळे ॥ ४९० ॥

जळीं जेवीं पद्मिनीपान । असोनि जळेंसी अलिप्त जाण ।

तेवीं नातळोनि देहाभिमान । संन्यासग्रहण विध्युक्त ॥ ९१ ॥

अन्य संन्यासी करोनि होम । जाळिला म्हणती क्रोधकाम ।

शेखीं तिळतूप होय भस्म । क्रोधकाम संचले ॥ ९२ ॥

तैशी नव्हेच याची होमस्थिती । जाळिल्या विकल्पाच्या वृत्ती ।

कमक्रोधांची पूर्णाहुती । केली अहंकृतीसमवेत ॥ ९३ ॥

होमूनि निजस्वभावासी । झाला त्रिदंडी संन्यासी ।

आज्ञा घे‌ऊनि गुरूपाशीं । सुखें सुखवासी विचरत ॥ ९४ ॥

 

स चचार महीमेतां संयतात्मेन्द्रियानिलः ।

भिक्षार्थं नगर ग्रामनसङ्गोऽलक्षितोऽविशत्‌ ॥ ३२ ॥

 

जिणॊनियां मनपवन । सांडोनिया मानाभिमान ।

परमानंदें परिपूर्ण । पृथ्वीमाजीं जाण विचरत ॥ ९५ ॥

ज्यासी नावडे देहसंगती । त्यासी कैंचा संगू सांगती ।

एकला विचरे क्षिती । आत्मस्थिती निजभोधें ॥ ९६ ॥

अखंड वसे वनांतरीं । भिक्षेलागीं निघे नगरीं ।

खेट खर्वट ग्रामीं पुरीं । भिक्षा करी यथाप्राप्त ॥ ९७ ॥

मी एक भिक्षेसी येता । हा नेम न करी सर्वथा ।

अलक्ष्य येवोनि अवचितां जें आलें हाता तेणें सुखी ॥ ९८ ॥

पंचागार सप्तागार । हाही नेम नाहीं निर्धार ।

कोणोविखींचा अहंकार । अणुमात्र धरीना ॥ ९९ ॥

 

तं वै प्रवयसं भिक्षुमवधूतमसज्जनाः ।

दृष्टा पर्यभवन्‌ भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥ ३३ ॥

 

न करी देहमळक्षाळण । मुसलवत्‌ करी स्न्नान ।

यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥ ५०० ॥

ऐसा विचरतां पृथ्वीसी अवचटें आला अवंतीसी ।

अतिवृद्ध आणि संन्यासी । अवधूतवेषी देखिला ॥ १ ॥

संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन ।

एक वेळां करावी आपण । पद्धतिलेखन आचार्याचें ॥ २ ॥

ते नगरींचे म्हणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण ।

याचें हारपल्या धन । संन्यासे जाण हा झाला ॥ ३ ॥

हें ऐकोनियां अतिदुर्जन । त्यासभोंवते मीनले जाण ।

परस्परें दावूनि खूण । विरुद्ध छळण मांडिलें ॥ ४ ॥

त्यासी बहुसाल उपद्रवितां । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता ।

क्रोध न येचि सर्वथा । अतिविवेकता महाधीरू ॥ ५ ॥

त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याचि सहनशीलता ।

तुज मी सांगेन तत्त्वतां । सावधानता अवधारीं ॥ ६ ॥

दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता ।

अर्थ धरी भावार्थता । शांति तत्त्वतां तो लाभे ॥ ७ ॥

विवेकचित्तचकोरचंद्रा । भागवतभाग्यें शुद्धमुद्रा ।

शांतिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥ ८ ॥

आकळावया निजशांतीसी । कृष्ण संबोधी उद्धवासी ।

ऐसें सावध करोनि त्यासी । म्हणे दशा ते ऐसी शांतीची ॥ ९ ॥

अवरोधितां जीविकेसी । सन्मान देतां अपमानेंसीं ।

जो सर्वथा न ये क्षोभासी । शांति त्यापाशीं तें ऐक ॥ ५१० ॥

 

केचित्रिवेणुं जगृहुरेके पात्रं कमण्डलुम्‌ ।

पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीरणि केचन ॥ ३४ ॥

 

दुर्जनीं वेढूनि संन्यासी । छळणार्थ लागती पायांसी ।

तेणें नमनप्रसंगेंसीं । करिती स्पर्शासी अवघेही ॥ ११ ॥

एक म्हणती वृद्ध संन्यासी । एक म्हणती किती चातुर्मासी ।

एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरूनें तुम्हांसी मुंडिलें ॥ १२ ॥

एक खुणाविती एकांसी । पूर्वभूमी पुसा यासी ।

एक म्हणती यापाशीं । धनसंग्रहासी पुसा रे ॥ १३ ॥

एक म्हणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी ।

तुम्ही व्यापारी कीं उदिमी । कोणे ग्रामीं निवासू ॥ १४ ॥

एक म्हणती कांहीं आहे धन । एक म्हणती आतां निर्धन ।

एक म्हणती न करा छळण । विरक्त पूर्ण संन्यासी ॥ १५ ॥

ऐसें करितां छळण । संन्यासी अनुद्वेग जाण ।

निःशब्दवादें धरिलें मौन । कांहीं वचन न बोले ॥ १६ ॥

एक म्हणती त्रिदंडा कारण । हा पूर्वीं होता अतिसधन ।

कोरूनि भरिलें असेल धन । हेंचि लक्षण त्रिदंडा ॥ १७ ॥

एक म्हणती सहस्त्रदोरीं । कंथा केली असे अतिथोरी ।

एक म्हणती त्यामाझारीं । धन शिरोवेरीं खिळिलेंसे ॥ १८ ॥

एक म्हणती काय पाहतां तोंड । येणें मांडिलेंसे पाखंड ।

ऐसा निर्भर्त्सिता वितंड । एकें त्रिदंड हरितला ॥ १९ ॥

एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र ।

एकें नेलें अक्षसूत्र । काषायवस्त्र तें एकें ॥ ५२० ॥

एज न्गभे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ ।

म्हणोनि कंथेसी घाली हात । कौपीनयुक्त तेणें नेली ॥ २१ ॥

ऐसें करितांही दुर्जन । त्याचें गजबजीना मन ।

कांहीं न बोले वचन । क्षमेनें पूर्ण निजधैर्य ॥ २२ ॥

तो म्हणे जाणेंयेणें हीं दोनी । केवळ अदृष्टा‌अधीनी ।

यालागीं मागण्याची ग्लानी । न करूनि मुनी निघाला ॥ २३ ॥

संन्यासी जातां देखोनी । सभ्य सभ्य शठ ये‌ऊनी ।

साष्टांग नमस्कार करूनी । अतिविनीतपणीं विनवित ॥ २४ ॥

मग म्हणती हरहर । अपराध घडला थोर ।

मातले हे रांडपोर । पात्रापात्र न म्हणती ॥ २५ ॥

स्वामी कोप न घरावा मनीं । वस्त्रें घ्यावीं कृपा करूनी ।

परतविला पायां लागूनी । पूर्ण छळणीं छळावया ॥ २६ ॥

 

प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः ।

 

संन्यासी आणूनि साधुवृत्ती । दंडकमंडलू पुढें ठेविती ।

एक वस्त्रें आणोनि देती । एक ते नेती हिरोनी ॥ २७ ॥

एक ते म्हणती वृद्ध संन्यासी । याचीं वस्त्रें द्यावी यासी ।

एक म्हणती या शठासी । दंडितां आम्हांसी अतिपुण्य ॥ २८ ॥

वस्त्रें न देती उपहासीं । संन्यासी निघे सावकाशीं ।

एक परतवूनि त्यासी । दे‌ऊनी वस्त्रांसी जा म्हणती ॥ २९ ॥

एक धांवूनि हाणे माथां । वस्त्रें हिरोनि जाय परता ।

एक म्हणती द्या रे आतां । वृद्ध कां वृथा शिणवाल ॥ ५३० ॥

यावरी संन्यासी आपण । गेला वस्त्रें वोसंडून ।

करोनिया संध्यास्न्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥ ३१ ॥

 

अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥

मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि ।

यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत्‌ ॥ ३६ ॥

 

भिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागें विभागून ।

सरितातटीं करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥ ३२ ॥

अरे हा संन्यासी नव्हे साचा । कदर्यु आमुचे गांवींचा ।

होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥ ३३ ॥

यासी बोलविल्यविण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये ।

ऐशी शपथ करूनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥ ३४ ॥

एक म्हणे याचें मौन । उडवीन मी न लागतां क्षण ।

हा जेणें करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणें ॥ ३५ ॥

तो म्हापापी अतिदुर्मती । जेवितां त्याचे मस्तकीं मुती ।

तरी क्रोध न ये त्याचे चित्तीं । निजात्मस्थितीं निवाला ॥ ३६ ॥

जरी अंतरीं क्रोध आला । तरी तो अशांतचि झाला ।

बाहेरी न बोलेचि बोला । लोकलाजे भ्याला पोटास्थे ॥ ३७ ॥

तैसा नव्हे हा संन्यासी । धू‌ओनि सांडिलें निजलाजेसी ।

निजशांतीची दशा कैशी । क्रोध मानसीं वोळेना ॥ ३८ ॥

आंत एक बाह्य एक । या नांव मुख्य दांभिक ।

तैसा संन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशांति ॥ ३९ ॥

तंव ते दूर्जन म्हणती । अरे हा न बोले निश्चितीं ।

संमुख मुखावरी थुंकिती । अतिनिदिती नोकूनी ॥ ५४० ॥

एक हाणीती लात । एक टोले देती माथां ।

एक म्हणती न बोलतां । यासी सर्वथा न सोडा ॥ ४१ ॥

 

तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः ।

बन्धन्ति रज्ज्वा तं केचिद्वध्यतां बध्यतामिति ॥ ३७ ॥

 

आणिक एक दुरूनि जाण । वर्मीं विंधिती वाग्बाण ।

याच्या वेषाचें लक्षण । आम्हीं संपूर्ण जाणीतलें ॥ ४२ ॥

याचे वेषाचा विचारू । शठ नष्ट दांभिक थोरू ।

भिक्षामिसें हिंडे हेरू । धरा चोरू निश्चितीं ॥ ४३ ॥

ऐसे विकल्पवाक्यें गर्जती । एक बांधा बांधा म्हणती ।

एक दृढदोरीं बांधिती । दोहीं हातीं अधोमुख ॥ ४४ ॥

 

क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः ।

क्षीणवित्त इमां वृत्तिमग्रहीत्स्वजनोञ्झितः ॥ ३८ ॥

 

त्याचें पूर्ववृत्त जे जाणते । ते अपमानूनि निंदिती ।

पूर्वीं कदर्यू याची ख्याती । हा आम्हांप्रती संन्यास मिरवी ॥ ४५ ॥

येणें सूक्तासूक्तीं संचिलें धन । अधर्में वित्त झालें क्षीण ।

स्वजनीं सांडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥ ४६ ॥

अन्न मिळावया पोटासी । झाला कपटवेष संन्यासी ।

लाज नाहीं या निर्लज्जासी । योग्यता आम्हांसी दावितां ॥ ४७ ॥

पूर्वींलागूनि हा वंचकू । आतां झाला संन्यासी दांभिकू ।

याचें मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥ ४८ ॥

हो कां बहुरुप्याचीं सोंगें जैसीं । तेवीं हा उत्तमवेषें संन्यासी ।

हो‌ऊनि ठकूं आला आम्हांसी । मारितां यासी दोष नाहीं ॥ ४९ ॥

 

अहो एष महासारो धृतिमान्‌ गिरिराडिव ।

मौनेन साधयत्यर्थं बकवद्दृढनिश्चयः ॥ ३९ ॥

 

हा दांभिकांमाजीं महाबळी । धरिल्या वेषातें प्रतिपाळी ।

आम्हीं पीडितां न डंडळी । जेवीं कां वाहटोळीं महामेरू ॥ ५५० ॥

याच्या धैर्याचें शहाणपण । साधवया अन्न‌आच्छादन ।

बकाच्या ऐसें धरिलें मौन । स्वार्थ पूर्ण लक्षूनी ॥ ५१ ॥

बक गिळावया मासा । मौन धरोनि राहे जैसा ।

हाही जाणावा तैसा । भोळ्या माणसां नाडील ॥ ५२ ॥

आतां हा धनलोभार्थ जाणा पूर्वील उपद्रव नाणी मना ।

तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥ ५३ ॥

एक म्हणती धैर्यमूर्ती । म्हणोनियां लाता हाणिती ।

एक ते नाकीं काड्या खुपसिती । याची निहशांती पाहों पां ॥ ५४ ॥

ऐसे‌ऐसे उपद्रवती । नानापरी उपहासिती ।

तरी द्वेष नुपजे चित्तीं । निजशांती निश्चळू ॥ ५५ ॥

जंव जंव देखती त्याची शांती । तंव तंव दुर्जन क्षोभा येती ।

नाना उपद्रव त्यासी देती । तेंचि श्रीपती सांगत ॥ ५६ ॥

 

इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च ।

तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम्‌ ॥ ४० ॥

 

कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती ।

एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥ ५७ ॥

एक अतिशठ साचोकारे । पुढं ठाकोनि पाठिमोरे ।

शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥ ५८ ॥

तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं ।

तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळॆना शांती क्षोभविल्याही ॥ ५९ ॥

एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन ।

त्यासी गळां श्रृंखला निरोधून । आणिला बांधून चौबारा ॥ ५६० ॥

यासी वोळख रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी ।

तो आजी सांपडविला आम्हीं । अति‌अधर्मी दांभिक ॥ ६१ ॥

जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा ।

मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥ ६२ ॥

एक ओढिती पूर्वेशी । एक ओढिती पश्चिमेसी ।

संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥ ६३ ॥

देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण ।

येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन्‌ दुखवीना ॥ ६४ ॥

जेथ स्वगोत्र सो‌इरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान ।

त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥ ६५ ॥

त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।

ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥ ६६ ॥

ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो ।

त्या सन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवादिदेवो सांगत ॥ ६७ ॥

 

एवं स भोतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत्‌ ।

भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥ ४१ ॥

 

भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक ।

तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥ ६८ ॥

भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक ।

देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥ ६९ ॥

यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक ।

तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥ ५७० ॥

जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथे साह्य केल्या हरिहरांसी ।

भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥ ७१ ॥

कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी ।

तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ७२ ॥

 

परिभूत इमां गाथामगायत नराधर्मैः ।

पात्यद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम्‌ ॥ ४२ ॥

 

दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती ।

धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥ ७३ ॥

तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।

उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥ ७४ ॥

तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती ।

सहजें उल्हासे निजशांती । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥ ७५ ॥

जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान ।

काय बोलिला भिक्षु आपण । तें निरूपण अवधारीं ॥ ७६ ॥

 

द्विज उवाच-

नायं जनो मे सुखदुःखहेतुर्न देवताऽऽत्माग्रहकर्मकालाः ।

मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यत्‌ ॥ ४३ ॥

 

सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जन ।

माझ्या सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥ ७७ ॥

जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख ।

जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशीं ॥ ७८ ॥

देवता सुखदुःखदायक । ऐसें म्हणावें आवश्यक ।

तीं दैवतें मनःकाल्पनिक । त्याचें सुखदुःख मजसी न लगे ॥ ७९ ॥

देवतारूपें मन आपण । मनें कल्पिले देवतागण ।

ते जैं सुखदुःखें देती जाण । तैं मुख्य कारण मन झालें ॥ ५८० ॥

जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवी देवो ।

जेथ मनाचा विकल्प पहा हो । तेथ थिता देवो दिसेना ॥ ८१ ॥

यालागीं सकळ देवता । त्या जाण मनःकल्पिता ।

त्यांपासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥ ८२ ॥

आत्मा सुखदुःखांसी कारण । हें समूळ मिथ्यावचन ।

आत्म्याचे ठायीं द्वैतभान । त्रिशुद्धी जाण असेना ॥ ८३ ॥

मी एक सुखदुःखांचा दाता । हा एक सुखदुःखांचा भोक्ता ।

हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥ ८४ ॥

जन्मकाळींचे ग्रह दारुण । म्हणों सुखदुःखांसी कारण ।

ग्रहांचा ग्रहो मन आपण । जन्ममरण भोगवी ॥ ८५ ॥

ग्रहांची ग्रहगती देहान्तवरी । मनाची ग्रहगती त्याहूनि थोरी ।

दुःख भोगवी नाना प्रकारीं । जन्मजन्मांतरीं सोडीना ॥ ८६ ॥

दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी । मनाची पीडा जन्मकोडी ।

दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी । मन न सोडी कल्पांतीं ॥ ८७ ॥

जैं मन न धरी देहाभिमान । तैं ग्रहांची पीडा मानी कोण ।

यालागीं सुखदुःखां कारण मनचि जाण महाग्रहो ॥ ८८ ॥

येथ निजकर्म दुःखदायक । हेंही म्हणतां न ये देख ।

कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखादायक घडे केवीं ॥ ८९ ॥

स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मनें करूनि स्कामिक ।

नानापरी अतिदुःख । योनि अनेक भोगवी ॥ ५९० ॥

हो कां कर्माचिनि क्रियायोगें ।जैं मनःसंकल्प कर्मी न लगे ।

तैं सुखदुःखांचीं अनेगें । विभांडी वेगें निजक्र्म ॥ ९१ ॥

देह सुखदुःखांसी काय जाणे । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे ।

येथ सुखदुःखांचे गाडे भरणें । मनें भोगवणें निजसत्ता ॥ ९२ ॥

येथ सुखदुःखदायक । मनचि झालें असे एक ।

मना‌अधीन हो‌ऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ॥ ९३ ॥

काळ सुखदुःखांचा दाता । हेंही न घडे गा सर्वथा ।

मनःसंकल्पसंकेता । काळाची सत्ता लागली ॥ ९४ ॥

अजरामर असतां आपण । मनें घेतलें मज आहे मरण ।

तेथचि काळ लागला जाण । क्षणें क्षण निर्दाळित ॥ ९५ ॥

आपुलेनि हातें आपण । पठडे खोंविलें दाभण ।

रात्रीं रुततांचि तें जाण । सर्पभयें प्राण सांडिला ॥ ९६ ॥

त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला ।

परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥ ९७ ॥

एकासी सर्प झोंबला पाठेसी । काय रुतलें म्हणे सांगातियासी ।

तो म्हणे कांटी लागली होती कैसी । ते म्यां अनायासीं उपडिली ॥ ९८ ॥

तो नव्हे सर्पा साशंक । यालागीं त्यासी न चढेचि विख ।

निजव्यापारीं देख । यथासुख वर्तत्‌ ॥ ९९ ॥

त्यासी सांगोनि बहुकाळें खूण । देतां सर्पाची आठवण ।

तत्काळ विषें आरंबळोन । आशंका प्राण सांडिला ॥ ६०० ॥

तेवीं निर्विकल्पपुरुखा । उठी संकल्पाची आशंका ।

ते काळीं काळू देखा । बांधे आवांका‌अ निर्दळणीं ॥ १ ॥

निःशंकपणे साचार । ज्याचें मन म्हणे मी अमर ।

त्यांचे काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥ २ ॥

जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे ।

नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३ ॥

यापरी गा काळ देख । नव्हे सुखदुःखदायक ।

सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥ ४ ॥

मनःकल्पित संसार जाण । मनें कल्पिलें जन्ममरण ।

संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनः पुनः ॥ ५ ॥

हे साही प्रकार जाण । म्हणती सुखदुःखांसी कारण ।

विचारितां हे अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥ ६ ॥

नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण ।

चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥

डोळींचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख ।

तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८ ॥

म्हणाल येथ अविद्या एक । ते होय सुखदुःखदायक ।

अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥ ९ ॥

अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुषुप्तीच्या ठायीं ।

तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥ ६१० ॥

मन दुश्चित जेव्हां पाहीं । तेव्हां जो भोग भोगिजे देहीं ।

तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११ ॥

यालागीं सुखदुःखांचें कारण । मनचि आपण्या आपण ।

तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥ १२ ॥

भवचक्रीं प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन ।

तेचि अर्थींचें निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३ ॥

 

मनो गुणान्वै सृजते बलीयस्ततश्च कर्माणि विलक्षणानि ।

शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥

 

मनो कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तींतें ।

त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणावृत्ती ॥ १४ ॥

सत्त्वरजतमादि गुणीं । सुरनरतिर्यगादि योनी ।

मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥ १५ ॥

त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणें रची क्षणें मोडी ।

मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥ १६ ॥

मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणीं पाडी गुणाच्या फांसा ।

लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्तीं ॥ १७ ॥

केवळ विचारितां मन । तें जड मूढ अचेतन ।

त्याचें केवीं घडे स्त्रजन । तेंचि निरूपण सांगत ॥ १८ ॥

 

अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्यमयो मत्सख उद्विचष्टे ।

मनः स्वलिङ्ग परिगृह कामान्‌ जुषन्निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥

 

आत्मा चित्स्वरूप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण ।

त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥

जो स्वप्रकाशें प्रकाशघन निजतेजें विराजमान ।

जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ ६२० ॥

विचारितां निजनिवाडें । मनाचे जडत्वचि जोडे ।

त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥ २१ ॥

नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण ।

तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥ २२ ॥

मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ ।

लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥ २३ ॥

जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ ।

तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥ २४ ॥

घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान ।

तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥ २५ ॥

आत्मा स्वप्रकाश चित्स्वरूप । मन जड कल्पनारूप ।

तें मानूनि आपुलें स्वरूप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥

जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक ।

तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥ २७ ॥

अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा ।

तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्म ॥ २८ ॥

मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम ।

आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥ २९ ॥

सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता ।

मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥ ६३० ॥

जेवीं अति‌आप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन ।

मग राजा तो होय दीन । तो भोगावी तें आपण सुखदुःख भोगी ॥ ३१ ॥

ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी ।

मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥ ३२ ॥

त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा ।

मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥ ३३ ॥

 

दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि ।

सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥

 

न लक्षितं मनोनियमन । सर्वस्वही दिधल्या दान ।

एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥ ३४ ॥

चुकोनि मनोनिग्रहाचें वर्म । आचरतां वर्णाश्रमधर्म ।

तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥ ३५ ॥

मीचि एक तिहीं लोकीं । स्वचार निष्ठ स्वंयपाकी ।

यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥ ३६ ॥

मनोनियमनीं नाहीं बुद्धी । तैं यमनियम ते उपाधी ।

मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥ ३७ ॥

करितां वेदशास्त्रश्रवण । गर्वाचें भरतें गहन ।

पंडित्यीं अति‌अभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥ ३८ ॥

करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अतिदुर्गम ।

कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥ ३९ ॥

कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं असोनि विदेहता ।

त्यासी कर्मीं कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥ ६४० ॥

अनंतव्रतें झाले व्रती । तेणें धनधान्य वांछिती ।

मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सद्व्रते जाती सुनाट ॥ ४१ ॥

व्रत दान स्वधर्म सकळ । यांसी मनोनिग्रहो मुख्य फळ ।

तेणेंवीण अवघीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥ ४२ ॥

दानादिक सप्त पदार्थ । हे ज्ञानाचे अंगभूत ।

तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥ ४३ ॥

दानादिकें जीं जीं येथें । इहामुत्र फळ ये त्यांतें ।

तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥ ४४ ॥

येथ साधक होय सज्ञान । फळाशा निःशेष त्यागून ।

दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥ ४५ ॥

माझी व्हावी चित्तशुद्धी । ऐशी उपजावया बुद्धी ।

भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥ ४६ ॥

साधनीं माझी मुख्य भक्ती । त्यांत विशेषें नामकीर्ती ।

नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरूपस्थिती साधकां ॥ ४७ ॥

नामापरतें साधन । सर्वथा नाहीं आन ।

नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥ ४८ ॥

स्वरूपस्थित निश्चळ मन । जेथ लाजोनि जाय साधन ।

तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटले ॥ ४९ ॥

 

समाहितं यस्य मनः प्रशान्तं दानादिभिः किं वद तस्य कृत्यम्‌ ।

असंयतं यस्य मनो विनश्यद्दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥

 

येथ ज्या पुरुषाचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान ।

त्यासी दानादिकांचें कोण । पयोजन साधनीं ॥ ६५० ॥

पूर्णतृप्तापाशीं जाण । ओगरलिया सदन्न ।

तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥ ५१ ॥

गंगा उतरावया महापूरीं । अतिप्रयासीं ताफा करी ।

तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥

तेवीं कामक्रोधादिवेगशून्य । ज्याचें निर्विकल्पीं निश्चळ मन ।

त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥

जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी ।

तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥ ५४ ॥

एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन ।

करावया नाहीं प्रयोजन । कल्पनां पूर्ण निमाल्या ॥ ५५ ॥

ज्याचें नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित ।

जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥ ५६ ॥

जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे बारा वाटीं ।

तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी हो‌ऊनि ठाती ॥ ५७ ॥

जो विषयासक्तकामना । तो सर्वथा नातळे साधना ।

करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥ ५८ ॥

स्वयें करितां पै साधना । जें जें फळ वांछी वासना ।

तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९ ।

जेवीं कां पूर्णबळाचा वारू । त्यावरी बैसला निर्बळ नरू ।

तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥

तैसें ज्याचें अतिदुर्मन । सदा कामक्रोधीं परिपूर्ण ।

जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥ ६१ ॥

तेथ साधनचि करी कोण । करी तें मोहास्तव जाण ।

तेणें वाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥

श्रवणादि इंद्रियबंधन । करूनि करितां साधन ।

तेणें वश्य नव्हे मन । मना‌अधीन इंद्रियें ॥ ६३ ॥

 

मनोवशेऽन्ये ह्यभवंस्म देवा मनश्च नान्यस्य वशं समेति ।

भीष्मो हि देवः सहसः सहीयान्‌ युञ्ज्याद्वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥

 

मनें आकळिलें सर्वांसी । परी मन नाकळे कोणासी ।

मनें छळिलें देवांसी । तें केवीं इंद्रियांसी आटोपे ॥ ६४ ॥

चंद्र अधिष्ठाता मनासी । मनें छळिलें चंद्रम्यासी ।

व्यभ्चारोनि गुरुपत्नीसी । क्षयरोगी त्यासी मनें केलें ॥ ६५ ॥

ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीसी । मन ब्रह्मयाची बुद्धि भ्रंशी ।

निजपुत्री वरितां त्यासी । स्वकन्येसी अभिलाषी ॥ ६६ ॥

चित्तीं वासुदेवाचें अधिष्ठान । त्यातेंही हळूच ठकी मन ।

लावूनि वृंदेचें ध्यान । श्मशानीं जाण पाडिला ॥ ६७ ॥

रुद्र अधिष्ठाता अहंकारीं । त्यातेंही मन सिंतरी ।

अभिलाषितां ऋषिनारी । शापिला ऋषीश्वरीं लिंगपातें ॥ ६८ ॥

ऐसें देवां दुर्जय जें मन । त्यासी आवरी इतर कोण ।

म्हणाल इंद्रियें नियमितील मन । तरी मनाधीन इंद्रियें ॥ ६९ ॥

जैं इंद्रियें धरोनि हातीं । मन एकाग्र हो‌इजे अर्थीं ।

तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चितीं सुनाट ॥ ६७० ॥

इंद्रियविषयां होय संगती । ते काळीं जैं दुश्चिती मनोवृत्ती ।

तेव्हां न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फुरेना ॥ ७१ ॥

जेव्हा अनासक्त मनोधर्म । तेव्हां इंद्रियांचें न चले काम ।

मना‌अधीन । इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥ ७२ ॥

इंद्रियांचा राजा मन । इंद्रियें न चालती मनेंवीण ।

पुरुषातेंही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ॥

अतिबळियां बळी मन । तेथ इंद्रियें बापुडिं कोण ।

मनाचें करावया दमन । नव्हे आंगवण वरिष्ठां ॥ ७४ ॥

काळ निजसत्ता सर्व ग्रासी । परी मनाची लोंव नुपडे त्यासी ।

करितां उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥

शस्त्रें न तुटे सर्वथा मन । त्यासी विरवूं न शकेचि जीवन ।

मन जाळूं न शके न शके दहन । मनातें गगन शून्य करूं न शके ॥ ७६ ॥

मनासी लागों न शके व्याधी । मन रोडेजे ऐशी नाहीं आधी ।

मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ॥ ७७ ॥

मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी । मन ब्रह्मांडें घडी मोडी ।

मन निजकल्पनाकडाडीं । नाचवी धांदडी त्रैलोक्या ॥ ७८ ॥

मन कळिकाळातें छळी । मन प्रळयानळातें गिळी ।

मन बळियांमाजीं अतिबळी । मनातें आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥

मन देवांसी दुर्धर । मन भयंकरां भयंकर ।

मनें आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥

मनाचा अनिवार मार । कोण राहे मनासमोर ।

मनास पर्जी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ॥ ८१ ॥

मनासी मेळवी हातोफळी । ऐसा त्रिलोकीं नाहीं बळी ।

मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रातें गिळी न माखतां दाढ ॥ ८२ ॥

ऐसा मनाचा अगाध भावो । यालागीं यातें म्हणिजे देवो ।

मनाचा भयानकां भेवो । यालागीं भीष्मदेवो मनातें म्हणती ॥ ८३ ॥

ऐशी मनाची अनावर स्थिती । यासी आकळावयाची सवर्म युक्ती ।

साचार सांगेन तुम्हांप्रती । सावधानस्थिती अवधारा ॥ ८४ ॥

जेवीं हिरेनि हिरा चिरिजे । तेंवी मनेंचि मन धरिजे ।

हेंही तैंचि गा लाहिजे । जैं गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वयें ॥ ८५ ॥

मन गुरुकृपेची आंदणी दासी । मन सदा भीतसे सद्गुरूसी ।

तें ठेवितां गुरुचरणापाशीं । दे साधकांसी संतोष ॥ ८६ ॥

या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्थीं ।

तरी दासी करी चारी मुक्ती । दे बांधोनि हातीं परब्रह्म ॥ ८७ ॥

मनचि मनाचें द्योतक । मनचि मनाचें साधक ।

मनचि मनाचें बाधक । मनचि द्यातक मनासी ॥ ८८ ॥

जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळुवां कांचणीमेळीं ।

स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें ॥ ८९ ॥

तेवीं मन मनासी चिंती मरण । तैं सद्गुरूसी रिघवी शरण ।

त्याचे वचनीं विश्वासोन । करवी गुरुभजन निरभिमानें ॥ ६९० ॥

सद्‌गुरुकृपा झालियां संपूर्ण । हें मनचि मनासी दावी खूण ।

तेणें निजसुखें सुखावोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ९१ ॥

मन मनासी झालिया प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान ।

ऐसें साधकां निजसमाधान । मनें आपण साधिजे ॥ ९२ ॥

पावोनि गुरुकृपेची गोडी । मनोविजयाची निजगुढी ।

मनें उभवूनि लवडसवडी । दीजे रोकडी साधकांहातीं ॥ ९३ ॥

यापरी साधकांसी संपूर्ण । मन आपला विजयो दे आपण ।

शेखीं सद्‌गुरुनिजबोधीं पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥ ९४ ॥

जेवीं कां सैंधवाचा खडा । रिघोनि सिंधूमाजिवडा ।

स्वयें विरोनियां रोकडा । सिंधू‌एवढा तो होय ॥ ९५ ॥

यापरी साधक जाण । होतांच निरभिमान ।

स्वयें होती ब्रह्म पूर्ण । मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥

मग त्याचिया निजदृष्टी । मीचि एक अवघे सृष्टीं ।

मावळली द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठीं लागेना ॥ ९७ ॥

तेथे कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष ।

कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकलें ॥ ९८ ॥

तेथ कोण देव कोण भक्त । कोण शांत अशांत ।

मावळलें द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ ॥

तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।

कैंचें अधम उत्तम मध्यम । परिपूर्ण ब्रह्म कोंदलें ॥ ७०० ॥

तेथ कैंचा शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धी कैंचा बोध ।

निःशेष निमाला भेद । परमानंद कोंदला ॥ १ ॥

यापरी मनोविजयें पहा हो । ऐशिया स्थिती मावला भावो ।

तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थीं संदेहो असेना ॥ २ ॥

मनोजयाचा सद्भावो । ब्रह्मादिकां अगम्य पहा हो ।

जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निजबोधें ॥ ३ ॥

जो निजमनातें जिंकोनी । जनीं पावला जनार्दनीं ।

तो धन्य धन्य त्रिभुवनीं । त्याचोनि अवनी पवित्र ॥ ४ ॥

तेणेंचि पूर्वज तारिले । तेणें सकळ कुळ उद्धरिलें ।

तेणेंचि परब्रह्म आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें ॥ ५ ॥

मनोजयें जे अतिसमर्थ । शांति सर्वस्वें विकिली तेथ ।

त्यांसी सुखदुःखांचे आवर्त । गेले न लगत निजात्मता ॥ ६ ॥

ऐशी भिक्षूची निजवाणी । उल्हासें सांगे शार्ङ्गपाणी ।

उद्धवास म्हणे संतोषोनी । धन्य त्रिभुवनीं मनोजय ॥ ७ ॥

जेणें निजमनातें जिंकिलें । त्यासी मी किती वानूं बोलें ।

तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेंचि ॥ ८ ॥

मज सुखरूपा त्याचेनि सुखप्राप्ती । मज नित्यतृप्ता त्याचेनि तृप्ती ।

मज अनंता त्यामाजीं वस्ती । मी दाटुगा त्रिजगतीं त्याचेनि ॥ ९ ॥

’मी तो’ या शब्दकुसरी । त्याही जाण आम्हांबाहेरी ।

आंतुवटे निजविचारीं । तोचि मी निर्धरीं निजा‌ऐक्यता ॥ ७१० ॥

मनोजयें हे पदवी प्राप्त । तो मनोजय न करूनि तेथ ।

प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यातें निर्भर्त्सित स्वयें भिक्षुं ॥ ११ ॥

 

तं दुर्जयं शत्रुमसह्यवेगमरुन्तुदं तं न विजित्य केचित्‌ ।

कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैर्मित्रण्युदासीनरिपून्विमूढाः ॥ ४९ ॥

 

पार्थिव शत्रु सबळ येती । तेथ सामदानादिकां स्थिती ।

कारणीं लावोनियां ख्याती । जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥

हे प्रकार मनाच्या ठायीं । करितां न चलती पाहीं ।

मनासी करावी शिष्टा‌ई । तें कोणाचें कांहीं ऐकेना ॥ १३ ॥

मनासी द्यावें विषयदान । परी विषयीं तृप्त नव्हे मन ।

तेणें अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥ १४ ॥

न चले शमदमाचि प्रकारू । तरी मनासी करावा मारू ।

तेथ न चले हातियेरू । मारणीं विचारू स्फुरेना ॥ १५ ॥

यापरी हा मनोवैरी । दुर्जयत्वें कठिण भारी ।

तो सुखदुःखांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणें ॥ १६ ॥

इतर शत्रु नावरती । तरी पळों ये हातोहातीं ।

रिघोनियां गडदुर्गाप्रती । वांचती गती देखिजे ॥ १७ ॥

परी पळावया मनापुढें । पळतां त्रैलोक्य होय थोडें ।

जेथ लपावें अवघडें । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥

मनाचे सेनापति शूर । कामक्रोधादि महावीर ।

त्यांचा मार अतिदुर्धर । घायीं थोरथोर लोळविती ॥ १९ ॥

बाह्य शत्रु ते दूरदेशीं । येतां बहु दिन लागती त्यांसी ।

मनःशत्रु तो अंगेंसीं । अहर्निशीं जडलासे ॥ ७२० ॥

आसनीं भोजनीं एकांतीं । जपीं अथवा घ्यानस्थितीं ।

मनाची उडी पडे अवचितीं । विभांडी सर्वार्थीं वैराकरें ॥ २१ ॥

बाह्य शत्रूचें अल्प दुःख । मनाची पीडा विशेख ।

जन्ममरणांचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥

बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासी अटक ।

हा वैरी न जिंकितां देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥

मनाचे सवेग वेगासी । न साहवे सुरनरांसी ।

कष्टीं न जिंकवे कोणासी । यालागीं मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥

ऐशिया मनातें न जिंकित । बाह्य शत्रु जिणोनि येथ ।

जे होती अतिगर्वित । ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥

मनेंचि जिंकावें मनासी । हें गतशोकीं तुजपाशीं ।

सांगीतलें यथार्थेंसीं । मनोजयासी उपावो ॥ २६ ॥

एवं मनातें ऐशियापरी । न साधवेचि करूनि वैरी ।

तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥

प्राकृत मित्रांची मैत्री । उपकारीं प्रत्युपकारी ।

तेही विषयसुखावरी । येरयेर घरीं उचितानुकाळें ॥ २८ ॥

तैशी नव्हे मनाची मैत्री । उपकारेंवीण प्रत्युपकारी ।

सकळ दुःखातें निवारी । सुखसागरीं नांदवी ॥ २९ ॥

प्राकृतीं अतिमित्रत्व ज्यासी । निजदुःख सांगतां त्यापाशीं ।

सर्वथा निवारेना त्यासी । म्हणे हें आम्हांसी असाध्य ॥ ७३० ॥

तैसें मित्रत्वा नव्हे मन । मना बैसवूनि सावधान ।

करितां निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहाबाधा ॥ ३१ ॥

मरणभय असतां चित्तीं । कनककामिनींची आसक्ती ।

स्त्रिया अतिशयें निर्भर्त्सिती । तरी निर्लज्जवृत्ती लाजेना ॥ ३२ ॥

परदारा परधन । परद्रोहो परनिंदा जाण ।

लागल्या न सांडितां क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥

उसंत नाहीं क्षुधेहातीं । द्वंद्वदुःखांची अतिप्राप्ती ।

नावरे इंद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सांगतां ॥ ३४ ॥

ऐसें ऐकतां स्वयें मन । वैराग्यें खवळे पूर्ण ।

वेंचूनि विवेकाचें धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥

चोर भांडारी करित पूर्ण । चोर चोरातें निवारी जाण ।

तेवीं मनासीं करितां मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ॥ ३६ ॥

अधर्मीं प्रवर्ततां आपण । मनचि मनासी जाण ।

असत्याची वाचेसी आण । आपण्या आपण मन घाली ॥ ३७ ॥

कैशी मनाची मैत्री परम । निःशेष जाळावया कर्माकर्म ।

जोडावया चित्तशुद्धिचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥

श्रीराम जयराम दों अक्षरीं । महापातका होय बोहरी ।

नाम न विसंबे क्षणभरी । अखंडाकारीं हरी स्मरे ॥ ३९ ॥

तेव्हां असत्याचें शीस तोडी । अधर्माची साली काढी ।

कल्पनेचे पाय मोडी । तटका तोडी आशेचा ॥ ७४० ॥

विकल्पाचा घरठाव मोडी । प्रपंचाचे दांत पाडी ।

अविश्वासू तीं ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥ ४१ ॥

ऐसेनि परिपक विश्वासीं । ये‌ऊनि सद्‌गुरुचरणांपाशीं ।

तनु मन धन सर्वस्वेंसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥

पूर्ण विश्वासाचें लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण ।

परीसीं लोह पालटे जाण । तैसें अंतकःरण पालटे ॥ ४३ ॥

गुरुवचन सांगोन राहे । परी मनींचें मनन न राहे ।

कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासें ॥ ४४ ॥

तेव्हां कमनीय कामिनी धन । तें देखे विष्ठेसमान ।

निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशीं ॥ ४५ ॥

धन्य धन्य मनाची मैत्री । विश्वास धरोनि निर्धारीं ।

जन्ममरण जीवें मारी । जीवातें करी अजरामर ॥ ४६ ॥

ऐशी मनाशीं करितां मैत्री । मन परम उपकारी ।

जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरीं बुडी दे ॥ ४७ ॥

तेथ मनाचें मनपण सरे । जीवाचें जीवपण विरे ।

बंधमोक्षांची धांव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥ ४८ ॥

मनाचें मित्रत्व यापरी । आपुलें कुळ स्वयें संहारी ।

आपणही मरे मित्रोपकारीं । मन मित्राचारीं अवंचक ॥ ४९ ॥

ऐसें मैत्रीसी मन सादर । जवळी असतां निरंतर ।

त्यातें वोसंडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥

वैर करोनि मनचि मारावें । मित्रत्वें मनें मन साधावें ।

इयें दोनीं जैं न संभवे । तैं उपेक्षावें मनातें ॥ ५१ ॥

मन म्हणेल तें न करावें । मनातें हातीं न धरावे ।

मनातें कांहीं नातळावें । जीवेंभावें निःशेष ॥ ५२ ॥

मन म्हणेल जें सुख । तें सांडावें आवश्यक ।

मन म्हणेल जें दुःख । तेंही निःशेख त्यजावें ॥ ५३ ॥

ऐसें उदास मन देख । जो करी आवश्यक ।

तरी तो झाला अमनस्क । शांती अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥

शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन ।

जो धरी देहाभिमान । त्याचें भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥

 

देहं मनोमात्रमिप्तं गृहीत्वा ममाहमित्यन्धधियो मनुष्याः ।

एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥

 

आत्मा विदेहो चिद्धन । तेथ मी देही हें मानी मन ।

त्या देहासवें मी-माझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥

आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाच्या एकात्मता पाहीं ।

विदेही तो म्हणवी देही । शेखीं देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥

मी देह हें मानी मन । तेणें दृढ होय देहाभिमान ।

तेव्हां देहचि होय आपण । मी-माझेपण ते ठायीं ॥ ५८ ॥

मी सच्चिदानंद परिपूर्ण । हें आपलें विसरे आपण ।

मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥

मी रोडका बोडका कुब्ज काण । मी धाटामोठा विचक्षण ।

हे नाथिले घे‌ऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥

स्वप्नामाजीं संन्यासी । आपण देखे अंत्यजवंशीं ।

तो आतळों मी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥

स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन ।

स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ ६२ ॥

ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी ।

जीवाची निजात्मबुद्धी । झाली त्रिशुद्धी आंधळी ॥ ६३ ॥

जैसा स्वप्नींचा मिथ्या वेव्हार । तैसा मनःकल्पित संसार ।

तो मानितांचि साचार । देह‌अहंकार द्रुढ झाला ॥ ६४ ॥

दृढ होतां देहाभिमान । पुढती जन्म पुढती ।

भवचक्रीं परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥ ६५ ॥

जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघाय कदा न लागती ।

तेचि लोहाचिया संगतीं । घण वरी घेत सुबद्ध ॥ ६६ ॥

तेवीं नित्यमुक्त परिपूर्ण । तेणों धरितां देहाभिमान ।

अंगीं लागलें जीवपण । जन्ममरण तेथें सोशी ॥ ६७ ॥

जेवीं डोळे बांधोनि व्यापारू । मंवे तेलियाचा ढोरू ।

तेवीं अहंकारें अंध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्रीं ॥ ६८ ॥

तेथ सोशितां जन्ममरण । अतिदुःखी होय आपण ।

तरी न सांडी देहाभिमान । अंधतमीं जाण तो घाली ॥ ६९ ॥

ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर ।

जो भोग भोगवी अघोर । तो संसार मनोजन्य ॥ ७७० ॥

मनचि सुखदुःखांसी कारण । हें आठवे श्लोकीं निरूपण ।

भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वें दावी ॥ ७१ ॥

 

जनस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनश्चात्र ह भौमयोस्तत्‌ ।

जिह्वां क्वचित्संदशाति स्वदद्भिस्तद्वेदनायां कतमाय कुप्येत्‌ ॥ ५१ ॥

 

जननीजठरीं ज्यासी जनन । त्या नांव बोलिजेती जन ।

ते सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण मज नव्हती ॥ ७२ ॥

जन जनासी दे दुःखबाधू । तेथ आत्म्यासी काय संबंधू ।

आत्मा देहातीत शुद्ध । सुखदुःखबाधू त्या न लगे ॥ ७३ ॥

देहें देहासे हो‌ईल दुःख । देहो तितुका पांचभौतिक ।

त्यांसी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखःदुख घडेना ॥ ७४ ॥

जळामाजीं जळ सूतां । जेवीं जळासी नव्हे व्यथा ।

कां दीपू दीपें एकवटतां । दीपासी सर्वथा दुःख न बाधी ॥ ७५ ॥

तेवीं पार्थिवें पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी ।

आत्मा नातळे सुखदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥

म्हणाल जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी ।

दुःखभोक्ता दुजेपणीं । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥

आपुली जिव्हा आपुले दांतीं । रगडिली होय अवचितीं ।

तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ॥ ७८ ॥

तेथील कोपाच्या कडाडीं । दांत पाडी कीं जीभ तोडी ।

तैशी जगीं एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥

जो पुढिलाचे ढक्यांनीं पडे । तो त्यावरी कोपें वावडे ।

स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेंपुढें न कोपतां निघे ॥ ७८० ॥

तेवीं मीचि भूतें मीचि भोक्ता । माझ्या दुःखाचा मी दाता ।

जगीं मीच मी एकात्मता । कोणावरीं आतां कोपावें ॥ ८१ ॥

माझ्या सुखद्‌ःखांसी कारण । यापरी नव्हतीच जन ।

म्हणाल जरी देवतागण । तेंही प्रमाण घडेना ॥ ८२ ॥

 

दुःखस्य हेतुर्यदि देवतास्तु किमात्मनस्तत्र्‌ ।

यदङ्गेन क्वचित्क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥

 

आतां दुसरें कारण मतीं । देवांपासोनि दुःखप्राप्ती ।

देवांची देहामाजीं वस्ती । आत्मा निजस्थितीं विदेही ॥ ८३ ॥

देहींच्या इंद्रियविकारीं । देव झाले अधिष्ठात्री ।

आत्मा अखंड अविकारी । सुखदुःखांमाझारी अलिप्त ॥ ८४ ॥

भूमी सहजें निर्विकार । तिची भिंती तीवरी सविकार ।

तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्रीं देव ॥ ८५ ॥

भिंती पडल्या भूमिवरी । ते मेळवी आपण्यामाझारी ।

तेवीं निर्गुणनिर्विकारी । इंद्रियें अधिष्ठात्री येती ऐक्या ॥ ८६ ॥

स्वदेहीं परदेहीं जाण । इंद्रियें अधिष्ठात्रीं समान ।

इंद्रियांचें सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥

हातें हाणतां तोंडावरी । तेथ इंद्र अग्नि अधिष्ठात्री ।

तेव्हा इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥

हो कां मुखें डसल्या हातासी । अग्नीनें घाय केलें इंद्रासी ।

आत्मा अलिप्त इंद्रादिदेवांसी । सुखदुःख त्यासी स्पर्शेना ॥ ८९ ॥

परमुखें स्वमुखावरी थुंकिजे । दोहीं मुखी अग्नीनें नांदिजे ।

तेथ कोणें कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजें असेना ॥ ७९० ॥

थुंक आणि जें कां मूत । देहीं उपजे तें देहाचें अपत्य ।

तें देहींचें देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥

स्वमुखें परमुखा चुंबन दीजे । तेथ अग्नीनें अग्नीसी चुंबीजे ।

तेणें सुखें कोण फुंजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥ ९२ ॥

स्वदेहें परदेहा आलिंगन । उभयस्पर्शीं वायूचि जाण ।

तेणें सुखें सुखावे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥

यापरी देवतागण । नव्हे सुखदुःखांसी कारण ।

आत्म्याचे ठायीं दैवतें जाण । हारपती पूर्ण अभेदत्वें ॥ ९४ ॥

देवीं देहो पीडितां निःशेख । देहाभिमान्या हो‌ईल दुःख ।

हें मानिती ते अतिमूर्ख । तेंही देख घडेना ॥ ९५ ॥

पुर म्हणिजे देहो देख । ते पुरी जा पुरनिवासक ।

तो सकळ देहीं पुरुष एक । तेथ कोणाचें दुःख कोण मानी ॥ ९६ ॥

जेवीं संभ्रम आवेशवेगीं । निजकर हाणतां निजांगीं ।

तेथील व्यथेचा भागी । कोपवयालागीं आप आपण्या ॥ ९७ ॥

देखतां आपलें एकपण । कोणाची व्यथा मानी कोण ।

कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥ ९८ ॥

तेवीं विश्वात्मा मीचि एक । मीचि दैवतें मीचि लोक ।

तेथ कोण कोणा दुःखदायक । म्यां कोणावरी देख कोपावें ॥ ९९ ॥

यापरी स्वयें विचारितां । देवांपासाव सुखदुःखता ।

समूळ न घडे सर्वथा । दैनिकी व्यथा असेना ॥ ८०० ॥

आत्मा सुखदुःखांसी कारण । मूळीं मजचि हें अप्रमाण ।

आत्म्याच्या ठायीं कार्यकारण । सुखदुःख जाण असेना ॥ १ ॥

 

आत्मा यदि स्यात्सुखदुःखहेतुः किमन्यतस्तत्र निजस्वभावः ।

न ह्यात्मनोऽन्यद्यदि तन्मृषा स्यात्क्रुध्येत कस्मान्न सुखं न दुःखम्‌ ॥ ५३ ॥

 

आत्मा केवळ एकला एक । तेथ कैंचें सुख कैंचें दुःख ।

आत्मा सुखदुःखदायक । म्हणती ते मूर्ख अविवेकी ॥ २ ॥

जेवीं विघुरलें घृत जाण । त्यासी नसे आकार ना वर्ण ।

तेंचि सहजें थिजोनि जाण । दिसे शुभ्रवर्ण कणिकारूपें ॥ ३ ॥

त्या घृतकणिका मिळतां देख । नाहीं परस्परें सुखदुःख ।

तेवीं निजात्मा एकला एक । तोचि अनेक स्वरूपें ॥ ४ ॥

जळीं जळाच्या जळलहरी । आदळतांही परस्परीं ।

सुखदुःख नुमटे त्यांमाझारीं । तेवीं चराचरीं परमात्मा ॥ ५ ॥

परमात्मा एकला एक । एकपणेंचि तो अनेक ।

तेथ विजातीय नाहीं देख । मा सुखदुःख कोणाचें ॥ ६ ॥

आत्मा सुखरूप अवघा एक । तेथ आभासे जें अनेक ।

तें मायामय काल्पनिक । स्वप्नप्राय देख मिथ्यात्वें ॥ ७ ॥

मृगजळीं पाहतां दिसे जळ । परी तें कोरडें देख केवळ ।

तेवीं देसे जें जगड्वाळ । तें मिथ्या समूळ मायिक ॥ ८ ॥

जेथ मिथ्या द्वैत मायिक । तेथ परमात्मा एकला एक ।

तेव्हांचि हारपलें सुखदुःख । कोपावया निःशेख ठावो नाहीं ॥ ९ ॥

जेथ निजात्मता एकपण । तेथ सुखदुःखें नाहीं जाण ।

कोणावरी कोपे कोण । आपल्या आपण एकला ॥ ८१० ॥

जेथ आत्म्याचा निजानुभवो । तेथ द्वैताचा अभावो ।

सुखदुःखें झाली वावो । कोपासी ठावो असेना ॥ ११ ॥

हे निजात्मता नेणोनि देख । सत्य मानिती जे सुखदुःख ।

ते होत कां वेदशास्त्रज्ञ लोक । तयां क्रोध देख विभांडी ॥ १२ ॥

ज्यासी सर्व भूतीं निजात्मता । तेथ कोण कोणा दुःखदाता ।

कोण कोणावरी कोपता । निजात्मता एकली ॥ १३ ॥

आत्मा सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे गा तत्त्वतां ।

आपण्या आपण व्यथा । मूर्खही सर्वथा न देती ॥ १४ ॥

एथिलेनि चौथे मतें । ग्रह मानावे दुःखदाते ।

तेंही न घडे गा येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १५ ॥

 

ग्रहा निमित्तं सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनोऽजस्य जनस्य ते वै ।

ग्रहैर्ग्रहस्यैव वदन्ति पीडां कुध्येत कस्मै पुरुषस्ततोऽन्यः ॥ ५४ ॥

 

जननीजठरीं जन्मे जाण । त्या देहाचें नांव म्हणती जन ।

ते जन्मकाळीं जें होय लग्न । त्या जन्मापासून पूर्ण ग्रहगति लागे ॥ १६ ॥

तेथ द्वादशाष्टमनजन्मस्थ । शुभाशुभ ग्रह जे येत ।

ते सुखदुःखांतें देत । आत्मा अलिप्त ग्रहगतीं ॥ १७ ॥

मुळीं आत्म्यासी जन्म नाहीं । मा ग्रह लागती कवणे ठायीं ।

जेथ शेतचि पेरिलें नाहीं । तेथ उंदिरीं कायी करांडावें ॥ १८ ॥

मुख्यत्वें घर केलें नाहीं । तेथली माडी जळेल कायी ।

आत्म्यासी तंव जन्मचि नाहीं । मा ग्रहगती का‌ई लागेल ॥ १९ ॥

ग्रहांची ग्रहगती देहापासीं । आत्मा अलिप्त देहभावासी ।

जेवीं का‌उळा न चढे कैलासी । तेवीं ग्रह आत्म्यासी न लागती ॥ ८२० ॥

जेवीं कां अग्नीतें न चाखे माशी । घारी झडपीना चंद्रम्यासी ।

तेवीं लागावया । सामर्थ्य ग्रहांसी असेना ॥ २१ ॥

आत्मा सर्वाचा अवघा एक । तैं ग्रहांचा आत्म तोचि देख ।

तया निजात्म्यासी देतां दुःख । ग्रह पीडी आवश्यक आप‌आपण्या ॥ २२ ॥

देह जाड मूढ अज्ञान । तें सुखदुःखांचें नेणे ज्ञान ।

आत्म्यासी सुखदुःख देतां जाण । तैं आपण्या पीडिती ग्रह ॥ २३ ॥

आपणाचि आपणाप्रती । कदा न देववे दुःखप्राप्ती ।

यालागीं आत्म्यासी ग्रहगती । जाण कल्पांतीं बाधीना ॥ २४ ॥

ग्रहग्रहांमाजीं वैरस्थिती । ग्रह ग्रहांतें पीडा देती ।

तेही अर्थींची उपपत्ती । यथानिगुती अवधारा ॥ २५ ॥

ज्योतिषशास्त्रसंमती शनि-भौमसूर्या वैरप्राप्ती ।

गुरु-शुक्र दोनी वैरी होती । बुध-सोमांप्रती महावैर ॥ २६ ॥

तेथ एकांची ते शीघ्रगती । एक ग्रह मंदगामी होती ।

अतिचार कां वक्रगती । मंडळमेदें येती एकत्र ॥ २७ ॥

वैरी मीनल्या एके राशी । एके चरणीं एकत्रवासी ।

तैं राहु गिळी सूर्यासी । सूर्य चंद्रासी कुहू करी ॥ २८ ॥

ऐसे ग्रहाचि ग्रहांसी जाण । परस्परें पीडिती आपण ।

मी आत्मा त्यांहूनि भिन्न । सुखदुःख कोण मज त्यांचे ॥ २९ ॥

अलंकार मोडितां खणाण । सोनें मोडेना आपण ।

तेवीं ग्रह ग्रहांसी पीडितां जाण । मज आत्म्यासी कोण सुखदुःख ॥ ८३० ॥

रणभूमीं युद्धझोटधरणी । होतां घायवट नव्हे धरणी ।

तेवीं ग्रहपीडेपासूनी । मी अलिप्तपणीं निजात्मा ॥ ३१ ॥

रजस्वला चालतां भूमीसी । तो विटाळ बाधीना पृथ्वीसी ।

तेवीं ग्रहीं पीडितां ग्रहांसी । मी सुखदुःखांसी अलिप्त ॥ ३२ ॥

एवं ग्रहांनिमित्त जें कांहीं । सुखदुःख उमटे देहीं ।

तें मज आत्म्यासी न लगे कंहीं । मग कोणें पाहीं कोणा कोपावें ॥ ३३ ॥

सुखदुःख नुमटे ज्याच्या ठायीं । त्यासी क्रोधाचि न ये कंहीं ।

एवं ग्रहनिमित्त दुःख कांहीं । सर्वथा नाहीं या हेतू ॥ ३४ ॥

सुखदुःखदातें निजकर्म । म्हणतां जनांसी पडे भ्रम ।

आत्मा केवळ निष्कर्म । त्यासी जड कर्म केवीं बाधी ॥ ३५ ॥

 

कर्मास्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्किमात्मनस्तद्धि जडाजडत्वे ।

देहस्त्वचित्पुरुषोऽयं सुपर्णः क्रुध्येत कस्मै न हि कर्ममूलम्‌ ॥ ५५ ॥

 

कर्म जडत्वें अतिबद्ध । आत्मा चिद्रूपें परम शुद्ध ।

त्यासी कर्मा‌आ कर्मबाध । सर्वथा संबंध धरीना ॥ ३६ ॥

रवीसी अंधारीं लपवे । वणवा तृणामाजीं बांधवे ।

गोचिडाचेनि मुखलाघवें । जरी लागवे दीपासी ॥ ३७ ॥

चंडवातातें तुष राखे । थिल्लरचिखलें चंद्र माखे ।

तैं कर्मजन्य सुखदुःखें । आत्मा यथासुखें बद्धता भोगी ॥ ३८ ॥

आत्मा कर्माकर्म संहारी । सुख-दुःखांची होळी करी ।

तो कर्मफळांचा फळहारी । मूर्ख गव्हारीं मानिजे ॥ ३९ ॥

स्वप्नींची स्वप्नसंतती । जागृतीं कोणा भेटों येती ।

तरी कर्माची सुखदुःखप्राप्ती । आत्म्याप्रती बाधक ॥ ८४० ॥

जेवीं अग्नीवरी मुंगी न चले । तेवीं आत्मा न माखे कर्ममळें ।

आकाश न खोंचे शस्त्रबळें । तेवीं आत्मा कर्मफळें स्पर्शेना ॥ ४१ ॥

कर्म तितुकें आविद्यक । आत्मा विद्या‌अविद्यातीत चोख ।

त्यासी कर्माचें सुखदुःख । मानिती मूर्ख देहमोहें ॥ ४२ ॥

कर्म अतिजड आत्मा शुद्ध । कर्म परिच्छिन्न आत्मा अगाध ।

कर्म कर्मठतां नित्यबद्ध । आत्मा चिदानंदस्वरूप ॥ ४३ ॥

कर्म मिथ्याभूत मायिक । आत्मा नित्य अमायिक ।

कर्मासी ब्रह्म‌अनोळख । ब्रह्म तेथ देख कर्म नाहीं ॥ ४४ ॥

दोराचे सर्पी सर्पत्व नाहीं । मा तो डसोनि चढेल कायी ।

तेवीं स्वरूपीं कर्म मिथ्या पाहीं । तें आत्म्यासी कायी बाधील ॥ ४५ ॥

वांझ राणीचा लाडका नातू । राजबळें जगा दंडितू ।

तेवीं कर्माची सुखदुःखमातू । कर्मठांतू दाटुगी ॥ ४६ ॥

एवं कर्माचि मिथ्या एथें । तें केवीं दे सुखदुःखांतें ।

हें जाणोनियां निश्चितें । कोणें कोणातें कोपावें ॥ ४७ ॥

कर्म सुखदुःखांचें दातें । यापरी न घडे एथें ।

म्हणाल काळ दे सुखदुःखांतें । तेंही निश्चितें घडेना ॥ ४८ ॥

 

कालस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनस्तत्र तदात्मकोऽसौ ।

नाग्रेर्हि तापो न हिमस्य तत्स्यार्त्क्रुध्येत कस्मै न परस्य द्वन्द्वम्‌ ॥ ५६ ॥

 

काळ शीतकाळीं शीतें पीडी । उष्णकाळीं उबारा सोडी ।

वर्षाकाळीं पर्जन्य धाडी । त्रिमाळिकें पाडी धवळारें ॥ ४९ ॥

बैसवूनि सातवांकडी । अखंडधारा डोळा नुघडी ।

जीवमात्रा तेणें पीडी । पडे सांकडी अन्नाची ॥ ८५० ॥

अनाचिया चिडाणीं । पीडती पशुपक्षिप्राणी ।

ते काळीं सुखदुःख न मानी कोणी । दुखदाता जनीं निजकाळू ॥ ५१ ॥

अतिताप अतिशीत । सोडूनियां अतिवात ।

काळ जगातें खात । जग कांपत काळासी ॥ ५२ ॥

ऐकोनि काळाची गोठी । देव कांपती उठा‌उठी ।

इतरांची कायसी गोठी । धाके पोटीं विधाता ॥ ५३ ॥

अतिवृष्टि अनावृष्टि । जन पीडी नाना संकटीं ।

शेखीं प्रळयो करी उठा‌उठी । दुखदाता सृष्टीं महाकाळ ॥ ५४ ॥

ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते ज्ञातेपणें झाले मूर्ख ।

काळ तोचि ईश्वरू देख । सुखदायक सर्वांसी ॥ ५५ ॥

ईश्वराहूनि काळ भिन्न म्हणे तो जड मूढ अज्ञान ।

काळ तोचि ईश्वर जाण । कृपाळू पूर्ण विश्वात्मा ॥ ५६ ॥

काळ स्वकाळीं वर्षोनि जीवन । सुखी करी संतप्त जन ।

पृथ्वी निववूनियां जाण । नव धान्य वाफवी ॥ ५७ ॥

ते काळीं जैं शीत न वाहे । तैं वाफिलें धान्य राख होये ।

तेव्हां शीतकण वर्षोनि पाहें । करी लवलाहें सफळित धान्यें ॥ ५८ ॥

तीं आर्द्र धान्यें भूतांसी । उपेगा न येती संग्रहासी ।

यालागीं उष्ण काळेंसीं । काळ शोषी आर्द्रता ॥ ५९ ॥

यापरी शीतोष्णपर्जन्यांसी । काळ उत्पादी भूतहितासी ।

तेंचि कठिण वाटे त्यासी । देहभ्रमासी भुलोनि ॥ ८६० ॥

हिरोनि अतिजीर्ण वस्त्रांसी । नवीं नेसवी जो साक्षेपेंसीं ।

ऐशिया हितकारिया काळासी । वैरी पिशीं म्हणताती ॥ ६१ ॥

तेवीं जराजर्जरित विकळ । तें देह निर्दळी सकाळें काळ ।

आणिक नवें दे तत्काळ । ऐसा कृपाळू काळ जनासी ॥ ६२ ॥

जुनें घे‌ऊनि दे नव्यासी । ऐसा उपकारिया काळासी ।

अपकारी म्हणती पिशीं । देहमोहेंसीं लोभिटें ॥ ६३ ॥

जन वैशिया निजभावना । जे जे धरी दृढ वासना ।

काळ कृपाळू तत्क्षणा । ते ते देह जाणा त्या देत ॥ ६४ ॥

महामहोत्साहें पिता पुत्रासी । सांडवूनि जीर्ण वासांसी ।

नवीं वस्त्रें दे तयासी । तेवीं जगासी प्रळयकाळू ॥ ६५ ॥

तेवीं प्रळयकाळीं जगासी । काळ जीर्ण देह नाशी ।

मग नूतन देह सर्वांसी । अतिकृपेंसी गौरवी ॥ ६६ ॥

यापरी काळ कृपाळू । त्यासी वैरी म्हणे जन बरळू ।

जगाचा निजात्मा स्वयें काळू । तो दुःखाचा सळू कोणासी नेदी ॥ ६७ ॥

जनांचा देहीं दृढ भावो । भवनानुसारें काळ पहा हो ।

देहपाठीं उपजवी देहो । जन्ममरणनिर्वाहो तेणें वाढे ॥ ६८ ॥

जो साचार वांछी विदेहभावो । त्याचा काळ निर्दळी अहंभावो ।

निजानंदें निववूनि स्वयमेवो । जन्ममरणांचा ठावो विभांडी ॥ ६९ ॥

जैशी ज्यासी होय बुद्धी । काळ तैशी दे त्यासी सिद्धी ।

हें नेणिजे देहमोहंधीं । काळ त्रिशुद्धी कृपाळू ॥ ८७० ॥

काळ तोचि निजात्मा जनीं ऐसें जाणे जो निजज्ञानी ।

तैं कोणाचें दुःख कोण कां मानी । दुसरें कोणी असेना ॥ ७१ ॥

मी एक एथें दुःखदाता । पैल तो एक दुःखभोक्ता ।

हेही नाहीं द्वैतकथा । जगासी एकुलता निजात्मा काळ ॥ ७२ ॥

काळ निजात्मा दोनी एक । तैं कोणाचें कोणास होय सुख ।

कोण कोणाचा मानी शोक । द्वंद्वदुःख असेना ॥ ७३ ॥

जेवीं नाममात्र मृगजळ । तेथ नाहीं तिळभरी जळ ।

तेवीं आत्मत्वीं जगड्व्याळ । तो भ्रम केवळ मनाचा ॥ ७४ ॥

आत्मा एकत्वें अभेद । काळनामें तोचि प्रसिद्ध ।

जीव तदंशें चिदत्वें शुद्ध । त्यासी काळादि द्वंद्व बाधिना ॥ ७५ ॥

आगीनें काय आगी जळे । कां उन्हाळेनि सूर्य पोळे ।

सागरू बुडे लहरीबळें । कीं अंधारातें काळें काजळें कीजे ॥ ७६ ॥

कीं हिमाचळ हिमकणें कांपे । तुपासी मोडशी होय तुपें ।

तैं काळसत्ता खटाटोपें । आत्मा अमूपें द्वंद्वें भोगी ॥ ७७ ॥

आप आपणियां आपदा । कोणा न करवे विरुद्धा ।

तेवीं आत्म्यासी द्वंद्वबाधा । काळचोनि कदा करवेना ॥ ७८ ॥

एवं एकात्मता अभेद । तेथ काळाचा न चले बाध ।

अभेदीं सर्वथा नाहीं द्वंद्व । कोणावरी क्रोध करावा ॥ ७९ ॥

जीव-शिवत्वें मी केवळ । मीचि आत्मा मीचि काळ ।

मिथ्या द्वंद्वदुःखागोंधळ । क्रोधाचा कल्लोळ कोणावरी करूं ॥ ८८० ॥

काळ सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे विचारितां ।

सुखदुःखांची बाधकता । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ८१ ॥

सुखदुःखादि हेतुषट्क्‌ । ’नायं जनो’ इत्यादिक ।

याचा करितां निजविवेक । नव्हती बाधक आत्म्यासी ॥ ८२ ॥

यांही वेगळीं बाधकपणें । देशवासें त्रिगुणगुणें ।

आत्म्यासी बाधावयाकारणें । कोठे कोणी दिसेना ॥ ८३ ॥

निजात्म्यासी बाधकता । कायसेनि न संभवे सर्वथा ।

जनासी बाधक देह‌अहंता । त्याचि निजार्था भिक्षु बोले ॥ ८४ ॥

 

न केनचित्क्वापि कथञ्चनास्य द्वन्द्वोपरागः परतः परस्य ।

यथाहमः संसृतिरूपिणः स्यादेवं प्रबुद्धो न बिभेति भूतैः ॥ ५७ ॥

 

आत्मा गुणातीत शुद्ध । परात्परतर स्वानंद ।

परिपूर्ण सच्चिदानंद । तेथ द्वंद्वबाध रिघेना ॥ ८५ ॥

द्वंद्व रिघावया आत्मभुवनीं । कैसोनि कायिसेनि कोणाचेनी ।

कर्मकार्यक्रियाकरणी । बाधकपणीं असेना ॥ ८६ ॥

अभेदा नाहीं द्वंद्वबाध । स्वानंदासी दुःखसंबंध ।

पूर्णासी कैंचे विरुद्ध । परमानंद एकला ॥ ८७ ॥ ॥

आशंका ॥ आत्म्यासी न घडे द्वंद्वसंबंध । देहो जडत्वें नेणे द्वंद्वं ।

तरी सुखदुःखांचा महाबाध । कोणासी प्रसिद्ध होतसे ॥ ८८ ॥

सुखदुःखभोगासी जाण । सोसावया जन्ममरण ।

एथ मुख्यत्वें देहाभिमान । तेंही लक्षण अतर्क्य ॥ ८९ ॥

जेवीं असोनि भर्तारापाशीं । व्यभिचार करितां अहेवेसी ।

पोट वाढल्याही परपुरुषीं । तें कोणासी कळेना ॥ ८९० ॥

तैसें अभिमानाचें विंदान । चित्स्वरूपीं जडोनि जाण ।

मिथ्या दावूनि जीवपण । सुखदुःखें आपण स्वेच्छा भोगी ॥ ९१ ॥

जेवीं रायापाशील कुडा मंत्री । राजबळें अधर्म करी ।

प्रजेतें छळी नानापरी । तैसा शरीरीं अभिमान ॥ ९२ ॥

कां अग्नीसंगें लोह जाण । अग्निप्राय होय आपण ।

तया हातीं धरूं शके कोण । पोळी दारुण सर्वांसी ॥ ९३ ॥

तेवीं चिद्रूपाचा अभिमान । देहात्मता खवळोनि पूर्ण ।

सुखदुःखादी जन्ममरण । वाढवितां कोण आवरी ॥ ९४ ॥

स्वप्नींचा देह केवळ मन । त्याही देहासी असे मनपण ।

तैसा हाही देहो मनचि जाण । अभिमानें कठिण स्थूळ केला ॥ ९५ ॥

कार्यकारणरूपें जाण । संसारचि मनोभिमान ।

वाढवूनि सुखदुःख दारुण । जन्ममरण स्वयें भोगी ॥ ९६ ॥

भोगिलेचि भोग भोगितां । नानापरींची पावे व्यथा ।

तरी न सांडी अहंता । देहात्मता वाढवी ॥ ९७ ॥

ब्रह्मप्रळय होतां जाण । देह‌अहंता नव्हे क्षीण ।

प्रणयीं विरेना अभिमान । सुखदुःख जाण तो भोगी ॥ ९८ ॥

यामाजीं जीव असे कैसा । जपाकुसुमीं स्फटिक जैसा ।

दिसोन त्या रंगा‌ऐसा । स्वयें तैसा होयेना ॥ ९९ ॥

आत्मात्वीं सुखदुःख नाहीं । तें प्रत्यक्ष दिसताहे देहीं ।

हें अविचाररमणीय पाहीं । कल्पनेच्या ठायीं आभासे ॥ ९०० ॥

तें देह माझें म्हणोनि तत्त्वतां । अभिमानें घे‌ऊनि माथां ।

जन्ममरणादि आवर्तां । सुखदुःखभोक्ता स्वयें होय ॥ १ ॥

येणेंचि विवेकें निजज्ञानी । प्राप्ततत्त्व गुरुवचनीं ।

ते वर्ततांही जनींवनीं । देहभिमानी कदा नव्हती ॥ २ ॥

ऐसे प्रबुद्ध जे आत्मप्रतीतीं । त्यांसी प्रारब्धाचिये निजगती ।

नाना सुखदुःखें देतां भूतीं । आत्मस्थिती ढळेना ॥ ३ ॥

त्यांसी द्वेष नुपजे भूतीं । कोप सर्वथा न ये चित्तीं ।

मी एक त्रिजगतीं । जाणोनि निश्चितीं निर्द्वंद्व ॥ ४ ॥

तो देखोनियां विषमासी । भय न धरी मानसीं ।

पारकें न म्हणे कोणासी । आप्त सर्वांसी निजात्मा ॥ ५ ॥

समविषमभाव ना भेद । ज्ञाता सर्वरूपें अभेद ।

तो न मानीं कोणाचा भयखेद । सुखस्वानंद सर्वदा ॥ ६ ॥

निंदा‌उपद्रव अनुद्विग्न । साहोनियां सुखसंपन्न ।

हें सिद्धाचें मुख्य लक्षण । तेंचि साधन साधकां ॥ ७ ॥

 

एतां स आस्थाय परात्मनिष्ठामध्यासितां पूर्वतमैर्महर्षिभिः ।

अहं तरिष्यामि दुरन्तपारं तमो मुकुन्दाङ्घ्रिनिषेवयैव ॥ ५८ ॥

 

माझ्या पूर्वापरभाग्योदयें । अद्वैतात्मनिष्ठा उपजलीं पाहें ।

जे निष्ठेचेनि समवायें । नाना दुःखें साहें निर्द्वंद्व ॥ ८ ॥

द्वंद्वसुखदुःखसहिष्णुपण । हें सिद्धाचें सहज लक्षण ।

माझें मुख्यत्वें हेंचि साधन । मनोजयो जाण येणें होये ॥ ९ ॥

हेंचि परमार्थसाधन वरिष्ठा । हेचि महा‌ऋषींची निजनिष्ठा ।

हेंचि निजभजन वैकुंठा । निजात्मनिष्ठा येणें साधे ॥ ९१० ॥

येणीं न बाधे द्वंद्वदुःख । येणें पाविजे नित्यसुख ।

दुस्तर संसारतारक । हा निजविवेक आम्हांसी ॥ ११ ॥

दुस्तर तरावया भवसागरू । हा विवेकू सुकल्प तारूं ।

एथ सद्गुरू कर्णधारू । परात्परपारू पाववी ॥ १२ ॥

हा विवेक कैसोनि ये हाता । हेही करणें न लगे चिंता ।

निजभावें एकाग्रता । शरण भगवंता रिघावें ॥ १३ ॥

सांडोनि लौकिकाचे लाजे । सांडोनि अभिमानाचें ओझें ।

भगवंता शरण रिघिजे । तैं लाहिजे विवेक ॥ १४ ॥

तानें बाळ जेवीं जननीसी । अनन्य शरण सर्वभावेंसीं ।

ऐशिया अनन्यता अहर्निशीं । शरण हरिसी रिघावें ॥ १५ ॥

हरीसी रिघालिया शरण । मुख न दाखवी जन्ममरण ।

तेथ बाधूं शके द्वंद्व कोण । हरी रक्षण निजभक्तां ॥ १६ ॥

मोक्षदाता मुकुंद पूर्ण । त्यासी कैसें रिघावें शरण ।

तो अनंतत्वें निजनिर्गुण । तेथ कोण पावेल ॥ १७ ॥

असो हरिरूप अतिनिर्गुण । त्याची मूर्ति चिंतितां सगुण ।

ध्यानीं स्थिरावल्या संपूर्ण । द्वंद्वदुःखें जाण हारपती ॥ १८ ॥

ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तैं दृढ धरावे हरीचे चरण ।

तेणें उठोनि पळे जन्ममरण । आपभावें आपण पळती द्वंद्वें ॥ १९ ॥

जैं न धरवती दृढ चरण । तैं करावें नामस्मरण ।

ज्याचेनि नाममात्रें जाण । यम काळ पूर्ण कांपती ॥ ९२० ॥

जेथ हरिनामाचा नित्य घोख । तेथ मरणा मरण आलें देख ।

जन्माचें होय काळें मुख । लाजोनि निःशेख तें पळे ॥ २१ ॥

रामनामाच्या गजरापुढें । का‌इसें द्वंद्वदुःख बापुडें ।

अवघें भवभयचि उडे । नामपवाडे गर्जतां ॥ २२ ॥

अखंड नामें गर्जे वाणी । त्याचे बोलांमाजीं चक्रपाणी ।

तेथ ऋद्धिसिद्धि वाहे पाणी । मुक्ती आंदणी तयाची ॥ २३ ॥

निर्विकल्प भावार्थें आपण । सगुण निर्गुण कां नामस्मरण ।

भक्त भावार्थें आदरी जाण । तें तें होय पूर्ण सद्भावेंचि ॥ २४ ॥

भावार्थें जे भगवत्प्रीती । तेचि जाणावी साचार भक्ती ।

भावें तुष्टला श्रीपती । दे निजशांती साधकां ॥ २५ ॥

ते निजशांतीच्या पोटीं । हरपती द्वंद्वतुःखकोटी ।

परमानंदें कोंदे सृष्टी । मी तूं दृष्टीं दिसेना ॥ २६ ॥

ऐसेनि अभेदभावें जाण । सेवितां मुकुंदश्रीचरण ।

मी आपणिया आपण । तारीन जाण निश्चित ॥ २७ ॥

तारीन म्हणतां उधारू । बोलीं दिसताहे उशिरू ।

जो झाला हरिचा डिंगरू । त्यासी संसारू असेना ॥ २८ ॥

ऐशी भिक्षूनें गा‌इली गाथा । ते अत्यंत रुचली श्रीकृष्णनाथा ।

हरिखे ओसंडोनि चित्ता । उद्धवाचा माथा थापटी ॥ २९ ॥

ऐशी जे हे निजशांती । माझ्या उद्धवासी व्हावी प्राप्ती ।

ऐसा कळवळोनि श्रीपती । काय उद्धवाप्रती बोलिला ॥ ९३० ॥

 

श्रीभगवानुवाच-

निर्विद्य नष्टद्रविणो गतक्लमः

प्रव्रज्य गां पर्यटमान इत्थम्‌ ।

निराकृतोऽसद्भिरपि स्वधर्माद्‌

अकम्पितोऽमुं मुनिराह गाथाम्‌ ॥ ५९ ॥

 

ज्याचे निःश्वासीं जन्मले वेद । ज्याचेनि चरणीं गंगा प्रसिद्ध ।

ज्याचें नाम छेदी भवबंध । तो उद्धवासी गोविंद स्वमुखें बोले ॥ ३१ ॥

यालागीं उद्धवाचे भाग्य थोर । ज्यासी तुष्टोनि शार्ङ्गधर ।

दाखवी निजशांतीचें घर । निरंतर वस्तीसी ॥ ३२ ॥

उद्धवा ऐक सावधान । धनलोभ्याचें नासोनि धन ।

तो धननाशु झाला प्रसन्न । केला विवेकसंपन्न वैरगी ॥ ३३ ॥

जो धनलोभी न खाता । ज्याचें नांव न घेती सर्वथा ।

तोचि वैराग्यें केला सरता । माझे मुखीं कथा तयाची ॥ ३४ ॥

त्याचें नाम माझे मुखीं जाण । त्याचें कर्म वर्णी मी आपण ।

तो मज पढियंता जाण । जो विवेकसंपन्न वैरागी ॥ ३५ ॥

वैराग्यपरतें भाग्य थोर । जगीं नाहीं आन सधर ।

विवेकवैराग्यें जो साचार । तो माझें जिव्हार उद्धवा ॥ ३६ ॥

जो विवेकवैराग्यें आथिला । तो जाण मजमाजीं आला ।

मी अधीन त्याचिय बोला । तो मज विकला । सर्वस्वें ॥ ३७ ॥

लोभ्याचें निःशेष गेलें धन । धनासवें गेले मानाभिमान ।

अभिमानासवें जाण । गेलें द्वंद्र दारुण सुखदुःख ॥ ३८ ॥

धन जातां झाली विरक्ती । तेणें नेमस्त झाला यती ।

भिक्षार्थ हिंडता क्षितीं । दुर्जनीं दुरुक्तीं निर्भर्त्सिला ॥ ३९ ॥

पीडितां नाना विकारीं । उपद्रवितां नानापरी ।

न डंडळीच निज निर्धारीं । स्वधर्मधैर्य करी निर्द्वंद्व ॥ ९४० ॥

संन्याशाचा स्वधर्म पूर्ण । मी देहातीत नारायण ।

साचार हरविला देहाभिमान । यालागीं जाण न डंडळी ॥ ४१ ॥

जेवीं छायेसी लागतां घावो । पुरुषासी नाहीं भयसंदेहो ।

तेवीं दुर्जनीं दंडिता देहो । नाहीं दुःखभेवो निरहंकार ॥ ४२ ॥

देहासी होतां नाना व्यथा । आपुली जे देहातीतता ।

तेचि भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज म्यां आतां निरूपिली ॥ ४३ ॥

येथ सुखदुःखांसी कारण । आपला भ्रम आपणा जाण ।

येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥

 

सुखदुःखप्रदो नान्यःपुरुषस्यात्मविभ्रमः ।

मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ॥ ६० ॥

 

आविद्यक जें निज‌अज्ञान । तेथें मनपणें उठी मन ।

मनें भेद करूनियां पूर्ण । सुखदुःखें जाण भोगावी ॥ ४५ ॥

आत्मा केवळ भेदशून्य । तेथ शत्रु मित्र उदासीन ।

मनें कल्पूनियां जाण । मन संपूर्ण स्वयें चाळी ॥ ४६ ॥

ऐसें भेदीं ठसावलें मन । तेंचि पुरुषाचें अज्ञान ।

तेणें द्वंद्वदुःखेंसीं जाण । संसार दारुण सभ्रांता ॥ ४७ ॥

मन सुखदुःखांसी कारण । मनःकल्पित संसार जाण ।

त्या मनाचें निग्रहण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४८ ॥

 

तस्मात्सर्वात्मना तात निगृहाण मनो धिया ।

मय्यावेशितया युक्त एतवान्‌ योगसंग्रहः ॥ ६१ ॥

 

जो नासूं पाहे संसारदुःख । तेणें मन नेमावें आवश्यक ।

मनावेगळें दुःखदायक । नाहीं आणिक त्रिलोकीं ॥ ४९ ॥

मन अतिशयें चंचळ । तें सहसा नव्हे निश्चळ ।

त्यासी विवेक द्यावा मोकळ । अभेदशील अहर्निशीं ॥ ९५० ॥

मन सिंतरील वीवेकासी । यालागीं हातकडिया दोहींसी ।

करूनियां अहर्निशीं । येरयेरांपाशीं राखावीं ॥ ५१ ॥

मन जेथ विकल्पूं धांवे । तेथ महामारी वीवेकू पावे ।

मन जेथ अधर्में संभवे । तेथ विवेक धांवे हांकित ॥ ५२ ॥

मन जाय कामक्रोधांपाशीं । विवेक ओढी धरोनि केशीं ।

मन रिघतां निंदेपाशीं । विवेक त्यासी बुकाली ॥ ५३ ॥

मन म्हणे विषय सुटी । विवेक हाणे वैराग्यकाठी ।

मन विवेक पावोन । रणकंदन आरंभी ॥ ५५ ॥

ऐसा मनां विवेकांचा झगडा । गार्क्ष्हाणें आलें सद्गुरूपुढां ।

तेणें करावया निवाडा । अद्वैतवाडां कोंडिलीं ॥ ५६ ॥

तो दृष्टी देखतांचि ठावो । मनाचा मोडला स्वभावो ।

देहींचा सांडोनि अहंभावो । विवेकेंसीं पहा हो ऐक्य केलें ॥ ५७ ॥

तेथ मनाचें गेलें मनपण । विवेक विसरला आकळण ।

जीवाचें विरालें जीवपण । वस्तु संपूर्ण अद्वयें ॥ ५८ ॥

जेवीं सुवर्णाचीं नागभूषणें । फडा पुच्छ मिरवी नागपणें ।

तें न मोडितां नागत्वाचें लेणें । सोनें सोनेपणें नागत्व विसरे ॥ ५९ ॥

तेवीं जाणोनि वस्तु पूर्ण । न मोडितां जग जाण ।

जीव विसरला जीवपण । मनत्वा मन मन मूकलें ॥ ९६० ॥

ऐशिया विवेकयुक्ती जाण । माझे स्वरूपीं प्रवेशे मन ।

जेथ मनपणें नुठी मन । मनोनिग्रहण या नांव ॥ ६१ ॥

ऐक चतुरचित्तचिंतामणी । विवेकचक्रवर्तिचूडामणी ।

उद्धवा भक्तशिरोमणी । मनोनिग्रहणीं प्रवर्त ॥ ६२ ॥

आवडीं भुलला कृष्णनाथ । तो उद्धवासी म्हणे तात ।

मनोनिग्रही तूं एथ । हो‌ईं साक्षेपयुक्त सादर ॥ ६३ ॥

साक्षेपें निग्रहूनि मनासी । जो सांडवी मनोजन्य भेदासी ।

शांती सांडूं नेणे त्यासी । जेवीं तान्हयासी मा‌उली ॥ ६४ ॥

निजशांति बाणल्या शुद्ध । त्यासी न बाधी न कोण द्वंद्व ।

होचि योगसंग्रहो प्रसिद्ध । बोलिले सिद्ध महायोगी ॥ ६५ ॥

सांडूनि संसाररस्फुर्ती । चित्स्वरूपीं जडे वृत्ती ।

जीव शीव एकत्व येती । योगसंग्रहस्थिती या नांव ॥ ६६ ॥

ऐशिया योगसंग्रहशांती । साधका द्वंद्वें न बाधीती ।

हें असो जया भिक्षुगीतभक्ती । द्वंद्वनिर्मुक्ति तया लाभे ॥ ६७ ॥

 

य एतां भिक्षुणा गीतं ब्रह्मनिष्ठां समाहितः ।

धारयञ्छ्रावयञ्छ्र्ण्वन्‌ द्वन्द्वैर्नैवभिभूयते ॥ ६२ ॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां श्रीकृष्णोद्धवसंवादे

एकादसस्कन्धे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥

 

साधावया शांतीची प्राप्ती । कोटिसाधनें न लभे शांती ।

हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधकां ॥ ६८ ॥

योगनिष्ठां ब्रह्मज्ञान । तें हें भिक्षुगीतनिरूपण ।

जो हृदयीं धरी सावधान । शांति आंदण तयाची ॥ ६९ ॥

ये भिक्षुगीतेचा गीतार्थू । जो जीवीं धरी समाहितू ।

त्यासी द्वंद्वांचा न बाधी घातू । अतिशांतू निजबोधें ॥ ९७० ॥

भिक्षूगीतार्थें समाधान । हें सांगतां नवल कोण ।

जो सादरें करी श्रवण । त्यासी द्वंद्वें जाण न बाधिती ॥ ७१ ॥

परदेशा गेला बहुतकाळ भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता ।

तैशिया अति‌एकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ॥ ७२ ॥

निघोनि गेलिया पुत्रासी । त्याची शुद्धि ये मातेपाशीं ।

ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ ॥ ७३ ॥

तीजवळ ज्या सोयर्क्ष्या असती । त्याही स्त्रेहें कळवळती

परी माता जैसी तळमळी चित्तीं । तें आणिकाप्रती असेना ॥ ७४ ॥

तैसें भिक्षुगीतश्रवण । करितां द्रवे ज्याचें मन ।

जो सात्त्विकें वोसंडे पूर्ण । तो द्वंद्वांसी जाण नाटोपे ॥ ७५ ॥

असो नव्हे सादरें श्रवण । तरी करितां याचें नित्य पठण ।

भिक्षुगीतप्रतापेंकरून । द्वंद्वें जाण नातळती ॥ ७६ ॥

पडतां पंचाननाची घाणी । मदगजां होय महापळणी ।

तेवीं भिक्षुगीतपठणीं । होय भंगणी द्वंद्वांची ॥ ७७ ॥

निर्लोभ हो‌ऊनि मानसीं । बैसोनि साधुसज्जनांपाशीं ।

जो निरूपी भिक्षुगीतासी । द्वंद्वें त्यासी नातळती ॥ ७८ ॥

अर्थे पाठें श्रवण करितां । द्वद्वें निवारी भिक्षुगीता ।

हे वर्म कळलेंसे श्रीकृष्णनाथा । तो सांगे हितार्था उद्धवा ॥ ७९ ॥

ज्या भिक्षुगीताची फळश्रुती । स्वमुखें सांगताहे श्रीपती ।

त्या भिक्षूचें भाग्य वानूं किती । धन्य त्रिजगतीं तो एक ॥ ९८० ॥

विवेकवैराग्यसमरसीं । जो साहे अतिद्वंद्वांसी ।

तोचि पढियंता हृषीकेशीं । हें उद्धवासी दाविलें ॥ ८१ ॥

जगासी उद्धवाचा उपकार। गुह्य ज्ञान परात्पर ।

उघडूनि श्रीकृष्णें भांडार । भिक्षुगीतसार प्रकटिलें ॥ ८२ ॥

उद्धव न पुसता जैं शांती । तैं हें कां सांगता श्रीपती ।

कृष्णासी उद्धवाची प्रीती । त्यासी नाना उपपत्ती उपदेशी ॥ ८३ ॥

हेंचि जडजीवां उद्धरण । येणें उपायें तरती दीन ।

जग तारावया जगज्जीवन । उद्धवमीषें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८४ ॥

श्रीकृष्ण बोलिला भिक्षुगीत । जें वेदशास्त्रार्थमथित ।

उपनिषदांचें सारभूत । वर्तिकांतर्गत रहस्य ॥ ८५ ॥

येणें आप‌आपणीयां आपण । लागताहे निजात्मलग्न ।

हें ज्ञानचेंही गुह्य ज्ञान । भक्तकृपें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८६ ॥

येणें जीवाचें जीवत्व उडे । शिवायें शिवत्वही बुडे ।

द्वंद्वाचें बाधकत्व मोडे । स्वानंदाचें उघडे भांडार ॥ ८७ ॥

वेदें मौन धरिलें जेथ । सशब्द शास्त्रें लाजलीं तेथ ।

ऐसें अतिरहस्य भिक्षुगीत । तें मी प्राकृत बोलिलों ॥ ८८ ॥

जेवीं जडी बुडते पाषाण । श्रीरामें तारिले आपण ।

तेवीं मी जड मूढ अज्ञान । बोलवी ब्रह्मज्ञान जनार्दनकृपा ॥ ८९ ॥

अहल्या जे व्यभिचारिणी । ते लागतां श्रीरामचरणीं ।

तिचेनि नामें पापा धुणी । प्रातःस्मरणीं पढविली ॥ ९९० ॥

तेवीं सद्‌गुरुकृपेची करणी । माझी प्राकृत जड मूढ वाणी ।

मानिजें साधुसज्ञानीं । तैशीं बोलणीं बोलविलीं ॥ ९१ ॥

सरस्वती ज्यासी वोळे । तो मुकाही वेदशास्त्र बोले ।

तैसें जनार्दनें आम्हां केलें । भिक्षुगीत बोलविलें प्राकृत ॥ ९२ ॥

राजमुद्रा चढे ज्याचे हातीं । त्यातें समस्त सन्मानिती सन्मानिती ।

तेवीं माझी वाणि सरती । केली निश्चितीं जनार्दनें ॥ ९३ ॥

बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी संतोषे निजजननी ।

तेवीं माझी आरिख वाणी । संतसज्जनीं प्रियकर ॥ ९४ ॥

मी माझें उंच नीच बोलणें । हेहीं माथां घ्यावें कोणें ।

मीपण ने‌ऊनि जनार्दनें । ग्रंथकथनें कथवित ॥ ९५ ॥

आधींच हें श्रीभागवत । त्यामाजीं गूढ एकादशार्थ ।

त्याहीमाजीं भिक्षुगीत । अतिगुह्यार्थ निर्द्वंद्व ॥ ९६ ॥

त्या भिक्षुगीताची टीका । एकला कर्ता नव्हे एका ।

तें एकपण हिरोनि देखा । ग्रंथार्थलेखा जनार्दन वदवी ॥ ९७ ॥

तेथ एक ना अनेक । ऐसें जनार्दनें केलें देख ।

त्यावरी द्वंद्वसाम्य-कवतिक । ग्रंथ सम्यक वाखाणवी ॥ ९८ ॥

एका जनार्दना शरण । जनार्दनू झाला एकपण ।

ऐसोनि‌एकत्वें जाण । केलें संपूर्ण भिक्षुगीत ॥ ९९ ॥

माझे निजगुरूचाही गुरू । श्रीदत्त परमगुरू ।

तो भिक्षुगीतार्थें साचारू । योग्यां योगेश्वरू तुष्टला ॥ १००० ॥

तेणें तोखलेनि अद्भुतें । आदरें अश्वासूनी मातें ।

अभय दे‌ऊनि निजहस्तें । पूर्ण ग्रंथार्थें डुल्लतू ॥ १ ॥

एका जनार्दना शरण । श्रोतां व्हावें सावधान ।

पुढील अध्यायीं श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषलक्षण सांगेल ॥ २ ॥

ते प्रकृति-पुरुषांची कथा । विवंचना हृदयीं धरितां ।

मी सुखदुःखद्वंद्वांपरता । निजात्मता निजबोधू ॥ ३ ॥

संतसज्जनां साष्टांग नमन । श्रोतजनांसी लोटांगण ।

एका विनवी जनार्दन । अतिगोड निरूपण पुढें आहे ॥ ४ ॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे

एकाकारटीकायां भिक्षुगीतनिरूपणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६२ ॥ ओंव्या ॥ १००४ ॥