॥ श्री एकनाथी भागवत ॥

 

अध्याय तेरावा

 

 

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा ।

तूं सद्‍गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥

उभयपक्षेंवीण देख । तुझे शोभती दोनी पांख ।

शुद्धसत्त्वाहोनि चोख । स्वरूप सुरेख सोज्वळ ॥२॥

हंस बोलिजे शुभ्रवर्ण । तुझी हंसता विलक्षण ।

सांडोनियां सकळ वर्ण । हंसपण तुज शोभे ॥३॥

विकासल्या सुवर्णपंकजें । इतर हंसीं तेथें क्रीडिजे ।

प्रेमें उत्फुल्लित कमळ जें । तुवां क्रीडिजे ते ठायीं ॥४॥

मानससरोवरीं वस्ती हंसासी । तूं मानसातीत रहिवासी ।

हंसा उत्पतन आकाशीं । तुझें चिदाकाशीं उड्डाण ॥५॥

विवेकचंचूचिया मुद्रा । स्वभावें निवडिसी क्षीरनीरां ।

मग सांडोनियां असारा । शुद्ध सारा सेविसी ॥६॥

ऐसिया हंसा जी सुकुमारा । मुक्तमोतियांचा तुज चारा ।

जीं कां वैराग्यशुक्तिद्वारा । चित्सागरामाजीं झालीं ॥७॥

सर्वथा नातळोनि क्षिती । निरालंब मार्गाप्रती ।

चालणें चालसी हंसगती । हे गमनशक्ती अभिनव ॥८॥

अभिन्न स्वभावतां निज‍अंशीं । चिन्मात्रवागीश्वरी तूं वाहसी ।

हंसवाहिनी आख्या ऐशी । तुझेनि अंशेंसीं तीस झाली ॥९॥

तुझेनि चालविल्या सरस्वती चाले । तुवां बोलविल्या वेदू बोले ।

तुवां चेतविल्या प्राण हाले । तुझेनि वाचाळें वाग्देवी वदे ॥१०॥

झाली वागीश्वरी वाग्देवता । तियेसी तुझेनि वाचाळता ।

जेवीं कां वेणु वाजे मधुरता । परी वाजविता तो भिन्न ॥११॥

एवं वाच्य वचन वक्ता । तूंचि वागीश्वरी तूंचि वदता ।

आपुल्या हंसरूपाची कथा । स्वभावतां बोलविसी ॥१२॥

बोलावया महाकवीच्या ठायीं । तुंवा वागीश्वरी द्योतिली पाहीं ।

ते हंसरूपाची नवा‌ई । अभिनव कांहीं बोलवी ॥१३॥

तो तूं सर्वभूतीं समान । हंसस्वरूपी श्रीजनार्दन ।

त्याचे वंदितां निजचरण । जन्ममरण पळालें ॥१४॥

आपभयें पळतां त्यासी । लपणी मिळाली भ्रमापाशीं ।

जन्मामागे मरणासी । ठावू वसतीसी दीधला ॥१५॥

यालागीं भ्रमामाजीं जो पडला । तो जन्ममरणांसी आतुडला ।

मग न सुटे कांहीं केल्या । यंत्रीं पडला भ्रमचक्रीं ॥१६॥

तेथ राहाटमाळेच्या परी । जन्ममरणांचे पडे यंत्रीं ।

एकाची सोसी भरोवरी । तंव दुसरें शिरीं आदळे ॥१७॥

तें निस्तरावया जन्ममरण । तुज सोहंहंसाचें स्मरण ।

जैं कां करी सावधान । भ्रममोचन तैं होय ॥१८॥

तो तूं परमात्मा परमहंसू । परब्रह्मैक पूर्ण परेशू ।

ब्रह्मपुत्रांसी उपदेशू । करावया हंसू झालासी ॥१९॥

तें हंसमुखींचें निरूपण । बोलावया बोलका श्रीशुक जाण ।

त्या वचनार्थातें लेवून । परम पावन परीक्षिती ॥२०॥

त्या हंसाचें हंसगीत । कृष्ण उद्धवासी सांगत ।

श्रोतां व्हावें दत्तचित्त । अचुंबित निजबोधू ॥२१॥

तो हा तेरावा अध्यावो । अत्यादरें सांगे देवो ।

तें ऐकतां उद्धवो । विषयविलयो देखेल ॥२२॥

तेरावे अध्यायीं निरूपण । सत्त्ववृद्धीचें कारण ।

विद्या‌उद्‍भवक्रमू जाण । अतिसुलक्षण सोपारा ॥२३॥

हंस‍इतिहासाचा योगू । स्वयें सांगेल श्रीरंगू ।

तेणें चित्तासी विषयवियोगू । सुगम साङ्ग सांगेल ॥२४॥

द्वादशाध्यायाचे अंतीं । करूनि सद्‍गुरूचीं भक्ती ।

पावोनि विद्याकुठारप्राप्ती । छेदावा निश्चितीं जीवाशयो ॥२५॥

छेदिल्या जीवाचें जीवपण । सकळ सांडावें साधन ।

हें उद्धवें ऐकूनि जाण । प्रतिवचन नेदीच ॥२६॥

उद्धवाचे जीवींचा भावो । सखोल हृदयींचा अभिप्रावो ।

सकळ आकळोनियां सद्‍भावो । स्वयें श्रीकृष्णदेवी बोलत ॥२७॥

म्हणसी लागोनि सूत्र त्रिगुण । जीवासी आलें जीवपण ।

ते अंगीं असतां तिनी गुण । सद्विद्या जाण उपजेना ॥२८॥

तोंडींचा खिळू नव्हता दूरी । नारेळजळ न चढे करीं ।

तेवीं गुण न वचतां निर्धारीं । विद्या कैशापरी उपजेल ॥२९॥

ऐसा आशंकेचा भावो । जाणोनियां श्रीवासुदेवो ।

तिहीं श्लोकीं तो पहा हो । गूढाभिप्रावो निरसितू ॥३०॥

 

श्रीभगवानुवाच ।

सत्त्वं रजस्तम इति गुणा बुद्धेर्न चात्मनः ।

सत्त्वेनान्यतमौ हन्यात्‌ सत्त्वं सत्त्वेन चैव हि ॥ १ ॥

 

सत्त्वरजतमादि गुण । निश्चयेंसी मायेचे जाण ।

हें द्वादशाध्यायीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगीतलें ॥३१॥

सच्चिदानंदू जो येथ । आत्म्यासीं अभिन्न नित्य ।

तैसे गुण नव्हती समस्त । ते प्राकृत प्रकृतिकार्यें ॥३२॥

जें सद तेंचि चिद । जें चिद तोचि आनंद ।

स्वरूपीं नाहीं त्रिविध भेद । तें एकवद सच्चिदानंद ॥३३॥

जेवीं श्वेतता मृदु मधुर । त्रिविध भेदें एक साखर ।

तेवीं सच्चिदानंद अविकार । वस्तु साकार एकवद ॥३४॥

प्रकृति गुणांतें उपजविती । गुणांस्तव सबळ प्रकृती ।

गुणांसी आत्म्यासी संगती । न घडे कल्पांतीं उद्धवा ॥३५॥

येथ विद्या‌उत्पत्तिलक्षण । स्वयें सांगे नारायण ।

करूनि गुणें गुणांचें मर्दन । सद्विद्या जाण साधावी ॥३६॥

सत्त्व वाढवून सुरवाडें । जैं रज तम निःशेष झडे ।

तैं सद्विद्या हाता चढे । सत्त्वाची वाढी मोडे निजसत्त्वेकरूनी ॥३७॥

सर्पु लागला होय ज्यासी । विष खादल्या उतार त्यासी ।

तें विष खातां येरे दिशीं । आत्मघातासी वाढवी ॥३८॥

तैसें रजतमलोपें सत्त्व वाढे । वाढलें सत्त्व बाधकत्वें कुडें ।

तेही बाधा मी तुज पुढें । अतिनिवाडें सांगेन ॥३९॥

मी अलिप्त कर्मकार्या । मी ज्ञाता मी महासुखिया ।

ऐशा वाढवूनि अभिप्राया । गुणें गुणकार्या गोंविजे सत्त्वे ॥४०॥

ऐसा वाढला जो सत्त्वगुण । त्यासी उपशमात्मक निजसत्त्वे जाण ।

समूळ करावें निर्दळण । तैं समाधान पाविजे ॥४१॥

उद्धवा तूं ऐसें म्हणसी । समानता तिहीं गुणांसी ।

केवीं वाढी हो‌ईल सत्त्वासी । गुण गुणांसी राखण ॥४२॥

वाढल्या तमोगुण । नावडे तेव्हां ज्ञानध्यान ।

नावडे त्याग भोग चंदन । निद्रा दारुण कां कलहो ॥४३॥

वाढल्या रजोगुण । ऐकतां ज्ञाननिरूपण ।

त्याचें भोगासक्त मन । सदा ध्यान विषयांचे ॥४४॥

धनलोभ सुदल्या दिठी । पांपरा घेतल्या क्रोध नुठी ।

हे रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटीं स्त्रीपुत्रां ॥४५॥

वाढलिया सत्त्वगुण । स्त्रियादिभोगीं उदासीन ।

सदा करी भगवच्चिंतन । कां करी कीर्तन हरीभक्ती ॥४६॥

क्रोधलोभमोहलक्षण । सत्त्वकाळीं नुठे जाण ।

परी एकला केवीं वाढे सत्त्वगुण । गुणांसी राखण गुण होती ॥४७॥

मागें तम पुढें रज पूर्ण । मध्यें अडकला सत्त्वगुण ।

तो कैसेनि वाढेल जाण । अडकलेपण सुबद्ध ॥४८॥

ऐसी आशंका धरूनि जाण । म्हणसी वाढेना सत्त्वगुण ।

तें सत्त्ववृद्धीचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥४९॥

 

सत्त्वाद्‌ धर्मो भवेद्‌ वृद्धात्‌ पुंसो मद्‍भक्तिलक्षणः ।

सात्त्विकोपासया सत्त्वं ततो धर्मः प्रवर्तते ॥ २ ॥

 

ये श्लोकींचें निरूपण । पहिलें उत्तरार्धव्याख्यान ।

तेथें सत्त्ववृद्धीचें कारण । सात्त्विक सेवन करावें ॥५०॥

सात्त्विक पदार्थ सेवितां । सत्त्वबुद्धि होय सर्वथा ।

सत्त्वविजयें वर्ततां । पवित्रता करावें जीवाची ॥५१॥

सत्त्व‍उत्कर्षाचें लक्षण । धर्मनिष्ठ स्वधर्माचरण ।

तैसें तेथील वासनाबंधन । इहामुत्र जाण वांछीना ॥५२॥

झालिया शुद्ध अंतःकरण । तेव्हां निःसीम वाढे सत्त्वगुण ।

पुरुषासी मद्‍भक्तिलक्षण । धर्म जाण उपतिष्ठे ॥५३॥

सत्त्वें वाढल्या धर्मप्रवृत्ती । तैं गुरुभजनीं अतिप्रीती ।

कां सत्त्वविग्रही माझी मूर्ती । ते ठायीं भक्ती उल्हासे ॥५४॥

कायिक वाचिक मानसिक । मदर्पण करी स्वाभाविक ।

मजवेगळा आणिक । भावार्थ देख स्फुरेना ॥५५॥

गुरु भगवंत अभिन्न । हें ते काळीं प्रकटे चिन्ह ।

ते अतिसत्त्वाची वोळखण । हे धर्म पूर्ण सात्त्विक ॥५६॥

 

धर्मो रजस्तमो हन्यात्‌ सत्त्ववृद्धिरनुत्तमः ।

आशु नश्यति तन्मूलो ह्यधर्म उभये हते ॥ ३ ॥

 

ऐसा वाढलिया सात्त्विक धर्म । तैं सत्त्ववृद्धि सर्वोत्तम ।

जे सत्त्वीं प्रकटे पुरुषोत्तम । विश्रामधाम मुमुक्षां ॥५७॥

एवं सत्त्ववृत्तीं वाढला धर्म । तो तत्काळ नाशी अधर्म ।

अधर्माचें मूळ रजतम । त्यांचें रूपनाम उरों नेदी ॥५८॥

सात्त्विकसेवने सत्त्ववृद्धी । तेणें सद्विद्येची उपलब्धी ।

हे उपायाची विधानविघी । कृष्ण कृपानिधी बोलिला ॥५९॥

करावें सात्त्विकसेवन । ते सात्त्विक पदार्थ कोण कोण ।

ऐक त्यांचेंही निरूपण । दशलक्षण सांगेन ॥६०॥

 

आगमोऽपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च ।

ध्यानं मन्त्रोऽथ संस्कारो दशैते गुणहेतवः ॥ ४ ॥

 

गुणवृद्धीचें कारण । आगम म्हणिजे शास्त्र जाण ।

आप म्हणिजे तें जीवन । आवडतें स्थान तो देशू ॥६१॥

ऐक प्रजांचें विंदान । प्रजा म्हणिजे त्रिविध जन ।

जैसी ज्याची संगती जाण । तैसें लक्षण तो पावे ॥६२॥

काळ म्हणिजे दिवसभाग । कर्म म्हणिजे जें जें करी अंग ।

जन्म म्हणिजे दीक्षा सांग । मंत्राचें लिंग यथारुचि ॥६३॥

कर्त्याचा जेथ अत्यादरू । त्या नांव बोलिजे संस्कारू ।

हा दशलक्षणप्रकारू । गुणवृद्धिविचारू तो ऐक ॥६४॥

येथ सत्त्ववृद्धीसी प्रस्तुत । साधकांसी शास्त्र निवृत्त ।

उपनिषद्‍भागेंसीं वेदांत । त्याचा मथितार्थ सेवावा ॥६५॥

आप म्हणिजे जळपवित्रता । गौतमीभागीरथ्यादि पुण्यसरिता ।

ज्यांचा अवचटें शिंतोडा लागतां । पाप सर्वथा उरेना ॥६६॥

कां माझ्या प्रतिमांचें चरणामृत । ज्यालागीं ब्रह्मादिक आर्तभूत ।

किंवा शालिग्रामशिळेचें तीर्थ । सकळ दुरित निवारी ॥६७॥

जेणें सकळ तीर्थें होती पावन । तें ब्राह्मणाचें चरणतीर्थ जाण ।

स्वयें वंदी श्रीनारायण । निजहृदयीं चरण वाहतसे ॥६८॥

भलतैसें हो कां पाणी । जें लागलें सद्‍गुरुचरणीं ।

तें सकळ तीर्थां शिरोमणी । सेवितां तत्क्षणीं उद्धरी ॥६९॥

सत्त्ववृद्धीचें कारण आप । तें इये तीर्थीं जाण पुण्यरूप ।

सेविता सत्त्ववृद्धीचे स्वरूप । आपे‌आप प्रकाशे ॥७०॥

प्रजा म्हणिजे महाजन । सेवावे साधु सज्जन ।

ज्यांचे संगतीस्तव जाण । उद्धरण जडजीवां ॥७१॥

सत्त्ववृद्धीसी कारण । मुख्यत्वें सत्संगतीचि जाण ।

त्या सत्संगाचें महिमान । केलें निरूपण द्वादशीं ॥७२॥

देशू पूण्यभूमिका सिद्धिस्थळ । विजनवासू एकांतशीळ ।

जेथ बैसतांचि तत्काळ । सत्त्वासी बळ चढोवढीं ॥७३॥

एकांतीं स्थिरावल्या आसन । सहजें वाढे सत्त्वगुण ।

मनीं हव्यासू चढता जाण । वस्तु चिद्‍घन साधावया ॥७४॥

साधकांसी काळ यथोचित । अवश्य ब्राह्ममुहूर्त ।

कां जे काळीं उद्वेगरहित । हर्षयुक्त मन होय ॥७५॥

प्रेमयुक्त अंतःकरणें । जो काळ जाय कथाश्रवणें ।

कां जयंत्यादि महापूजा करणें । जागरणें हरिदिनीं ॥७६॥

थोर काळाची सार्थकता । हरिकीर्तनीं गातां नाचतां ।

त्या काळाचा महिमा तत्त्वतां । माझेन सर्वथा न बोलवे ॥७७॥

निरभिमान कीर्तन करणें । निर्लोभ गाणें नाचणें ।

तो काळू वंदिजे म्यां श्रीकृष्णें । महिमा कोणें बोलावा ॥७८॥

कर्म म्हणिजे तें निवृत्त । जें आशापाशफळरहित ।

कां क्रिया जे उपकारार्थ । सात्त्विक निश्चित तें कर्म ॥७९॥

गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण ।

गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥

उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।

जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥

जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।

जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥

यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।

मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥

ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन ।

तो सद्‍गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥

उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता ।

एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥

तैसा सद्‍गुरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां ।

योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥

उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी ।

बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥

यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्‍गुरुचि माता पिता ।

निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥

मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण ।

माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥

यालागीं सद्‍गुरु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू ।

पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥

त्या सद्‍गुरूपासून जाण । शैवीवैष्णवीदीक्षाग्रहण ।

अथवा उपदेशी निर्गुण । चैतन्यघन निजबोधें ॥९१॥

ऐक दीक्षानामाची युक्ती । दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती ।

निःशेष अविद्येची नाशी स्थिती । दीक्षाव्युत्पत्ती त्या नांव ॥९२॥

एवं दीक्षाजन्माची जे कथा । उद्धवा सांगीतली म्यां तत्त्वतां ।

ध्याननिष्ठ जे सात्त्विकता । ऐक आतां सांगेन ॥९३॥

सत्त्वोपाधि शरीर साचें । चैतन्यघन स्वरूप ज्याचें ।

तो श्रीविष्णु ध्येय सात्त्विकांचे । ध्यान त्याचें करावें ॥९४॥

अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र ।

ध्यानीं आणावा शंकर । संसारपार तरावया ॥९५॥

या मूर्तींचें ध्यान करितां । हारपे ध्येय ध्यान ध्याता ।

ठसावे चैतन्यघनता । सात्त्विकता हें ध्यान ॥९६॥

जैसी दीक्षा तैसें ध्यान । हें आगमशास्त्रींचे प्रमाण ।

त्या ध्यानाचें पर्यवसान । चैतन्यघन पावावें ॥९७॥

केवळ जें चैतन्यघन । तें सद्‍गुरुस्वरूप जाण ।

त्याचें करावें नित्य ध्यान । अनुसंधान निजनिष्ठा ॥९८॥

पंचभूतदेहाची मूस । तेथ वोतिला ब्रह्मरस ।

गुरुस्वरूप तें सविलास । ध्यान रात्रंदिवस करावें त्याचें ॥९९॥

सात्त्विकांचें जें कां ध्यान । तें हें तूं उद्धवा जाण ।

आतां मंत्रांचें मंत्रग्रहण । तेंही निरूपण अवधारीं ॥१००॥

सकळ मंत्रांची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणीं ।

गायत्रीच्या मंत्रग्रहणीं । ब्राह्मणपणीं अधिकारू ॥१॥

जे सकळ मंत्रांचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा ।

जिचेनि धाकें द्विजपूजा । मज अधोक्षजा करणें पडे ॥२॥

ते गायत्री स्वभावतां । आली असे ब्राह्मणांच्या हाता ।

तिची उपेक्षा करितां । लौल्यें दरिद्रता पावले ॥३॥

गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकीं मी वंदीं चरण ।

मंत्रीं गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थीं ॥४॥

गायत्री रिघाल्यावीण कांहीं । इतर मंत्रां रिघमू नाहीं ।

मुख्यत्वें गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाहीं सकल मंत्र ॥५॥

नव्हतां गायत्रीसंबंध । मुखीं रिघों न शके वेद ।

इतर मंत्रां केवीं संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥६॥

गायत्रीचें गुह्य परम । चिन्मात्रैक परब्रह्म ।

तो मंत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥७॥

एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धींचें कारण ।

शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणें त्वरित जाण सत्त्वशुद्धी ॥८॥

सत्त्वशुद्धीचे परिपाटीं । शैववैष्णवमंत्रकोटी ।

तेणें सत्त्वशुद्धी उठा‌उठीं । होय निजात्मदृष्टी साधकां ॥९॥

मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार ।

आतां बोलिला जो संस्कार । तोही प्रकार परियेसीं ॥११०॥

मनाचे संकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप ।

येचि अर्थींचा खटाटोप । महासाटोप जो मांडीं ॥११॥

संकल्पु उठूंचि न लाहे । जेथें उठी तेथें ठेंचित जाये ।

विवेकाचेनि बळें पाहे । मोकळु होये मनाचा ॥१२॥

परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी ।

उसंत घेवों नेदी अर्धघडी । स्मरणनिरवडी मन राखे ॥१३॥

वैराग्यबळें दमी मन । तेणें भेणें करी हरिचिंतन ।

दासी नुल्लंघी स्वामीचें वचन । तैसें स्मरणाधीन मन करी ॥१४॥

इंद्रियें पाहती नाना पदार्थां । मन न पाहे आणिका अर्था ।

जागृतीं स्वप्नीं स्वभावतां । अखंडतां हरि स्मरे ॥१५॥

ऐशा संस्कारें संस्कारिलें मन । निमिषोन्मेषीं हरिचिंतन ।

श्वासोच्छ्वासांचे गमनागमन । सोहंध्यान त्या ठायीं ॥१६॥

स्वाभाविक स्मरणादरु । या नांव आत्मसंस्कारु ।

हा सत्त्ववृद्धीचा प्रकारु । शारङ्गधरु बोलिला ॥१७॥

आत्मशुद्धीचें महाकारण । बोलिलों तें हें दशलक्षण ।

साधकीं सेवावया जाण । विशद निरूपण म्यां केलें ॥१८॥

जेणें खवळला वाढे तमोगुण । तें तमोवृद्धीचें दशलक्षण ।

केवळ त्यागावया जाण । तेंही निरूपण सांगेन ॥१९॥

तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देख ।

वारुणी माध्वी मद्योदक । आवश्यक सेविती ॥१२०॥

जे उभयभ्रष्ट पाखंडी । वेषधारी वृथा मुंडी ।

त्याचें संगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदां ॥२१॥

द्वेष चोहटा कां परद्वार । तेथेंचि बैसका निरंतर ।

काळ तों त्यासी मध्यरात्र । तैं व्यापार कर्माचा ॥२२॥

क्रियारंभु जारणमारण । मोहन स्तंभन उच्चाटण ।

कां करावें वशीकरण । हें कर्म जाण तामस ॥२३॥

जन्म म्हणिजे दीक्षाग्रहण । प्रेतभूतपिशाचविद्या जाण ।

करितां प्रेतभूत‌आराधन । प्रेतजन्म जाण तामसां ॥२४॥

जेथ तमोगुण प्रधान । तो क्रोधयुक्त पुरुष जाण ।

सदा शत्रूचें करी ध्यान । करावया हनन उद्यतू ॥२५॥

तामसी मंत्र मुकी मैळी । अथवा उच्छिष्टचांडाळी ।

कां प्रेतदेवता कंकाळी । मंत्रशैली हे तेथें ॥२६॥

संस्कार दगड माती । माझें घर हे माझी क्षिती ।

स्वप्नीं निजेला घाली भिंती । एवढी आसक्ती गृहाची ॥२७॥

घर करावया अशक्त । तरी त्या खिंडोरा‌आंत ।

सदा दगडमाती राखत । नांदतें तेथ येवों नेदी ॥२८॥

देहालागीं गेह करणें घडे । तें देह कष्टवी अतिदुर्वाडें ।

तामससंस्कारें रोकडें । केवळ वेडें गृहासक्तीं ॥२९॥

गृहासक्तीचा व्यापारू । जो मरणान्त न सोडी नरू ।

तो जाण तामस संसारू । त्याचा संस्कारू तो माती ॥१३०॥

जेणें थोरावे तमोगुण । तें हें जाण दशलक्षण ।

ऐक राजसाचें चिन्ह । त्याचें भिन्न स्वरूप ॥३१॥

करावें सत्त्वाच्या अंगीकारा । त्यागावा तमोगुण दुसरा ।

पुढें चाविरा मागें लातिरा । ऐक तिसरा रजोगुण ॥३२॥

हो कां शाहाणी सिंदळी नारी । ते पुरुषाचें मन बरें धरी ।

मग ठकोनि जाय व्यभिचारीं । तैसी परी रजोगुणा ॥३३॥

जैसें कां कुचर घोडें । बरें दिसें परी आडवीं अडे ।

कांहीं केल्या न चले पुढें । मागिलीकडे सरों लागे ॥३४॥

तैसी रजोगुणाची स्थिती । त्यागू न संभवे कल्पांतीं ।

धर्म करितो केवळ स्फीती । मनीं आसक्ती कामाची ॥३५॥

सर्वस्व घ्यावया संवचोरू । सवें धांवे हो‌ऊनि नफरू ।

तैसा रजोगुणाचा विचारू । कामनासंसारू वाढवी ॥३६॥

धर्म करी कामासक्ती । केलें भोगवी निश्चितीं ।

पाडी जन्ममरण‌आवर्तीं । कदा कल्पांतीं सुटेना ॥३७॥

सात्त्विक तरले माझेनि भजनें । तामस तरले मद्विरोधध्यानें ।

राजसाचें जन्ममरणधरणें । रजोगुणें उठीना ॥३८॥

जेणें प्रबळ वाढ रजोगुणा । त्या सांगेन मी दशलक्षणां ।

केवळ त्यागावया काम्यकल्पना । या निरूपणा अवधारीं ॥३९॥

राजसाचें प्रवृत्तिशास्त्र । जें केवळ कामनापर ।

जेणें होय इहामुत्र । तेथें अत्यादर राजसा ॥१४०॥

आप म्हणिजे तें तंव जळ । वेळा वाळा सुपरिमळ ।

कर्पूरयुक्त अतिशीतळ । प्रिय प्रबळ तें राजसा ॥४१॥

प्रजासंगति त्याची ऐक । राजवर्गीं सभानायक ।

व्यवहारीं चतुर अतिरंजक । प्रवृत्तिलोक प्रिय त्यासी ॥४२॥

राजद्वारीं कां सभेमाझारीं । बैसावें पारीं अथवा वेव्हारीं ।

कां मंडपतोरणाभीतरीं । सन्मानें करी उपविष्ट ॥४३॥

वेळु न गमे जैं घरिंच्या घरीं । तैं क्रमी चौहाटा नगरीं ।

कां बैसे बुद्धिबळांवरी । अत्यादरीं सादर ॥४४॥

ऐक रजोगुणाची वेळ । सूर्योदय‍उपरी जो काळ ।

कां राजस जे सांजवेळ । ते ते काळ प्रिय त्यासी ॥४५॥

राजसांचें सकाम कर्म । धनधान्यार्थ करिती धर्म ।

वासना ते पशुपुत्रकाम । स्वप्नीं निष्काम नेणती ॥४६॥

राजसांसी काम गहन । कामासक्ती दीक्षाग्रहण ।

तेंचि त्यांचें जन्म जाण । सदा ध्यान स्त्रियेचें ॥४७॥

मंत्र घ्यावा अभिलाखें । जेणें सन्मान होय लौकिकें ।

ज्याचा सुगरावा थोर देखे । तो मंत्र आवश्यकें आदरी ॥४८॥

संस्कार अतिराजस । शरीरभोगांचे विलास ।

नाना परिमळ बहुवस । उत्तम वास सुधूत ॥४९॥

संस्काराची अंतरनिष्ठा । लौकिकीं व्हावी देहप्रतिष्ठा ।

माझी आज्ञा वंद्य वरिष्ठां । सभेचे चौहाटां मी पूज्य ॥१५०॥

रजोगुण दशलक्षण । उद्धवा त्याची ही वोळखण ।

राजसासी जन्ममरण । सर्वथा जाण सोडीना ॥५१॥

सात्त्विक त्याग करी विवेकनिष्ठें । तामस त्याग करी कडकडाटें ।

राजसासीं त्याग न घडे स्पष्टें । द्रव्यदारालोभिष्टें लोभाळू ॥५२॥

तिहीं गुणांचें लक्षण । म्यां सांगितलें भिन्न भिन्न ।

तिहींचें सर्वसाधारण । सांगेन चिन्ह तें ऐक ॥५३॥

 

तत्तत्सात्त्विकमेवैषां यद्‌ यद्‌ वृद्धाः प्रचक्षते ।

निंदन्ति तामसं तत्तद्‌ राजसं तदुपेक्षितम्‌ ॥ ५ ॥

 

विवेकवृद्ध वृद्धाचारें । ज्यातें स्तविती अत्यादरें ।

तें तें सात्त्विक जाण खरें । निजनिर्धारे निश्चित ॥५४॥

विवेकियाचे अनुवादा । ज्या पदार्थांची करिती निंदा ।

ते ते जाण तामसबाधा । माझ्या निजबोधा मानलें ॥५५॥

ज्यातें स्तवित ना निंदित । जीवें भावें उपेक्षित ।

तें राजस जाण निश्चित । बाधा अद्‍भुत तयाची ॥५६॥

जैसें कां विखें रांधिलें अन्न । वरिवरी गोड अंतरीं मरण ।

तैसा जाण राजस गुण । अतर्क्य बंधन तयाचें ॥५७॥

राजसासी ज्ञानबोधू । करितां थोंटावला वेदू ।

त्याचे उपदेशीं ब्रह्मा मंदू । माझेनेही बोधू न करवे ॥५८॥

याचिलागीं रजोगुण । विवेकी सांडिला उपेक्षून ।

उपेक्षेचें हेंच कारण । तुज म्यां जाण सांगीतलें ॥५९॥

यालागीं सात्त्विक सेवन । साधकीं अवश्य करावें जाण ।

सात्त्विकसेवनाचा गुण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥१६०॥

 

सात्त्विकान्येव सेवेत पुमान्‌ सत्त्वविवृद्धये ।

ततो धर्मस्ततो ज्ञानं यावत्‌ स्मृतिरपोहनम्‌ ॥ ६ ॥

 

सात्त्विक द्रव्यें सेवितां । सत्त्ववृद्धी होय तत्त्वतां ।

सत्त्ववृद्धी पुरुषीं होता । धर्म स्वभावतां प्रवर्ते ॥६१॥

धर्मप्रवृत्ति माझें भजन । माझ्या भक्ति‌उल्हासें जाण ।

भक्तांसी मी होयें प्रसन्न । तैं स्वभावें ज्ञान प्रकाशे ॥६२॥

तत्त्वमस्यादि वाक्यव्युत्पत्ती । ते गुरुद्वारा ज्ञानाची प्राप्ती ।

तरी सत्त्वशुद्धित्वें धर्म भक्ती । कोणे अर्थीं सेवावी ॥६३॥

ऐसा विकल्प जरी तूं धरिसी । उद्धवा ऐक त्याही विचारासी ।

यथार्थ सांगेन तुजपाशीं । सत्त्वशुद्धीसी उपयोगू ॥६४॥

केवळ सत्त्वशुद्धीविण । जाहल्या गुरुवाक्याचें श्रवण ।

तें पां हाटगाण्या‌ऐसें जाण । अनोळखपण स्वस्वरूपा ॥६५॥

आंधळें उपजलें जे कुशीं । स्तनपान करी अहर्निशीं ।

परी तें न देखे मा‌उलीसी । दशा तैशी उपदेशा ॥६६॥

इंद्रियें सचेतनमेळीं । भगवंत सर्वांतें प्रतिपाळी ।

त्यातें न देखती विषयांधळीं । अति‌अंध झालीं चित्तशुद्धीविण ॥६७॥

अजागळां लोंबते जाण । मिथ्या भाषण म्हणती ते स्तन ।

त्यापरी सत्त्वशुद्धीविण । वृथा जाण उपदेश ॥६८॥

वाहते उदकीं लिहले लेख । तळीं अक्षर नुमटे एक ।

तेवीं सत्त्वशुद्धीविण देख । निजज्ञान सुटंक प्रकटेना ॥६९॥

झाल्या आपादतां सत्त्वशुद्धी । जंव प्रकटेना धर्मबुद्धी ।

तंव निजज्ञानाची नव्हे सिद्धी । जेवीं ग्रहणामधीं चंद्रमा ॥१७०॥

ऐकतां हरिकथाश्रवण । बाष्प रोमांच स्वेद रुदन ।

रुका वेंचितां जाय प्राण । तेथेंही ब्रह्मज्ञान प्रकटेना ॥७१॥

हृदयींचा लोभ जंव न तुटे । तंव निश्चयज्ञान कैंचे भेटे ।

सत्त्वशुद्धिधर्मू जैं प्रकटे । तैं निजज्ञाननेटें सुपंथीं लागे ॥७२॥

ते चालतां धर्मपंथीं । जै माझी भक्ति होय सांगाती ।

तैं चोरांची न पडे गुंती । शीघ्रगती मज पावे ॥७३॥

ते भक्तीचा सांडितां सांगातू । पुढील अनोळख महापंथू ।

तेथ कामक्रोध करिती घातू । विकल्प‌आवर्तू बुडविती ॥७४॥

भाग्येंवीण माझी भक्ती । प्राण्यासी नव्हे गा सांगाती ।

जिचे संगें चालतां पंथीं । अल्पही गुंती पडेना ॥७५॥

माझे भक्तीसवें महाशूर । नांवाणिगे नवविध वीर ।

सत्रदबद्ध सदा समोर । महाझुंझार निजबोधें ॥७६॥

यालागीं माझे भक्तीविण । सहस्त्रधा केल्या श्रवण मनन ।

माझी प्राप्ति नव्हे जाण । भजनें पूर्ण मत्प्राप्ती ॥७७॥

सर्व भूतीं भगवद्‍भावो । या नांव मुख्यभक्ति पहा हो ।

ते सांगाती झालिया स्वयमेवो । कामक्रोधमोहो न शकती बाधूं ॥७८॥

साक्षेपें ने‌ऊनि घागरी । पालथी घातल्या गंगासागरीं ।

जळबिंदु रिघेना भीतरीं । तैशी परी महावाक्या ॥७९॥

यालागीं अत्यादरेंसीं जाण । धर्मयुक्त माझें भजन ।

करितां मी होय प्रसन्न । मत्प्रसादें ज्ञान प्रकाशे ॥१८०॥

लोभ ठे‌ऊनि अर्थस्वार्थीं । कोरडी करितां माझी भक्ती ।

मी प्रसन्न नव्हें श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८१॥

जो धनें मनें काया वचनें । वेंचूनि भजे मजकारणें ।

त्यासीच म्यां प्रसन्न होणें । जेवीं चंद्रकिरणें चकोरा ॥८२॥

व्याली धेनु वत्सा वोरसे । तेवीं मी तुष्टें अतिसंतोषें ।

तेवीं माझेनि प्रसादवशें । माझें ज्ञान प्रकाशे मद्‍भक्तां ॥८३॥

सगुण सुंदर आणि पतिव्रता । अतिशयें पढियंती होय कांता ।

तिसी सर्वस्व दे न मागतां भर्ता । तेवीं मी मद्‍भक्तां प्रसन्न ॥८४॥

माझेनि प्रसादें प्रकाशे ज्ञान । श्रुति स्मृती नांव म्हणती जाण ।

सविलास अविद्यानिरसन । ’अपोहन’ या नांव ॥८५॥

गुणास्तव देह जाण । देहास्तव उपजे ज्ञान ।

तेणें ज्ञानें गुणनिर्दळण । देहनिरसन न घडे म्हणसी ॥८६॥

हे गोष्टी तूं म्हणसी कुडी । कीं पक्षी आपुले पांख मोडी ।

नारळ नारळीतें तोडी । स्वमांसाची गोडी व्याघ्र चाखे ॥८७॥

हें न घडतें जैं घडों बैसे । तैं देहींचेनि ज्ञानें गुणदेह नासे ।

हा विकल्पू धरिसी मानसें । ऐक अनायासें तो निरासू ॥८८॥

 

वेणुसङ्घर्षजो वह्निर्दग्ध्वा शाम्यति तद्वनम्‌ ।

एवं गुणव्यत्ययजो देहः शाम्यति तत्क्रियः ॥ ७ ॥

 

दैवें वायूच्या कल्लोळीं । परस्परें वेळूजाळीं ।

स्वजातिकांचणीं इंगळी । पेटली ते होळी वनाची करी ॥८९॥

अग्नि उपजला जे कांडीं । तेंही कांडें जाळूनि सांडी ।

वनीं नुरवूनियां काडी । स्वयें राखोंडी हो‌ऊनि विझे ॥१९०॥

तेवीं वैराग्याभ्यासवायूंनीं । होतां त्रिगुणांची कांचणी ।

तेथें प्रकटला ज्ञानाग्नी । अविद्यावनीं दाहकू ॥९१॥

तो हरिगुरुकृपा खवळला । वृत्तिरूपें प्रज्वळला ।

देहद्वयेंसीं लागला । प्रवर्तला गुणांतें जाळूं ॥९२॥

जळाल्या आषातृष्णेच्या पाळी । जळालीं कामलोभांची कोल्हीं ।

क्रोधव्याघ्राची होळी झाली । आगी लागली मदगजा ॥९३॥

जाळिली स्नेहाची आरांटी । जाळिली असत्याची बोरांटी ।

जाळिला मोह‍अजगरू उठा‌उठी । जाळिला शेवटीं काळविट काळू ॥९४॥

उठिला अहंकाराचा सोरू । धरितां न धरे अनिवारू ।

तोही जाळिला दुर्धरू । वणवा चौफेरू कोंडला ॥९५॥

पळूनि जावयापुरता । अणुभरी ठावो नुरेचि रिता ।

एवं जळाला तो पळतपळतां । अहंसोरु सर्वथा निमाला ॥९६॥

नवल अग्नीचें विंदाण । आपणिया जाळी आपण ।

दाहकशक्तीतें जाळून । स्वस्वरूपीं जाण उपरमे ॥९७॥

ऐसें ऐकोनि निरूपण । उद्धवासी विस्मयो गहन ।

जनास केवढी नागवण । आप आपणिया आपण वोढवली ॥९८॥

नश्वरदेहाचिये साठीं । पाविजे परब्रह्माची पुष्टी ।

ते सांडूनियां करंटीं । विषयनिष्ठीं मरमरों मरती ॥९९॥

सात्त्विकसेवनें सत्त्ववृद्धी । तेणें अलभ्य लाभे सिद्धी ।

ते सांडोनियां दुर्बुद्धी । विषयविधीं रातले ॥२००॥

केवढा नाडू मांडला लोकां । ऐशी जीवींची आशंका ।

यालागीं यदुनायका । आदरें देखा पुसत ॥१॥

 

श्री‌उद्धव उवाच ।

विदन्ति मर्त्याः प्रायेण विषयान्‌ पदमापदाम्‌ ।

तथापि भुञ्जते कृष्ण तत्कथं श्वखराजवत्‌ ॥ ८ ॥

 

उद्धव म्हणे श्रीमुकुंदा । ऐक सर्वज्ञा गोविंदा ।

विषयांची पदोपदीं आपदा । सर्वीं सर्वदा कळलीसे ॥२॥

जो झाला विषयाधीन । तो सर्वीं सर्वत्र सदा दीन ।

ऐसें जाणतजाणतां जन । आसक्ति गहन विषयांची ॥३॥

जैसें कां श्वान आणि खर अज । तैसे विषयांसी लोक निर्लज्ज ।

सांडूनि स्वहिताचें काज । का विषयांचे भोज नाचती ॥४॥

शुनी वसवसोनि पाठीं लागे । श्वान सवेंच लागे मागें ।

पुच्छ हालवूनि हुंगे । लाज नेघे जनाची ॥५॥

काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठफरा गळां वाहत ।

तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचार ॥६॥

शुनी सक्रोधें वसवसी । तें गोड लागे श्वानासी ।

जीवित बांधलें तिच्या पुंसीं । तीमागमागेंसीं हिंडतू ॥७॥

अंगीं अंगा होतां भेटी । सक्रोध शुनी लागे पाठीं ।

तरी न सोडी पुसांटी । कुंकांत उठी कामासी ॥८॥

ऐशा संकटीं जैं भोग चढे । तैं भोगासवेंचि आडकोनि पडे ।

हड हड करिती चहूंकडे । जगापुढें फजीती ॥९॥

निंदेचे सैंघ वाजती धोंडे । मूर्ख तेही थुंकिती तोंडें ।

ऐंसेंचि पुरुषासही घडे । तरीही आवडे अतिकामू ॥२१०॥

श्वानाचें हेंड तत्काळ सुटे । मनुष्याचें आकल्प न सुटे ।

स्त्रीलोभाळू अतिलोभिष्ठे । तीलागीं संकटें नाना सोशी ॥११॥

नातरी गाढवाच्या परी । दूरी देखोनियां खरी ।

भुंकत धांवे तीवरी । लाज न धरी सर्वथा ॥१२॥

खरी पळे पुढेंपुढें । खरू धांवे वाडेंकोडें ।

लाता हाणोनि फोडी जाभाडें । तरी पुढेंपुढें धसो लागे ॥१३॥

लाता हाणे उरावरी । तरी तिची प्रीती धरी ।

ऐशिया स्त्रियांचे घराचारीं । खराच्यापरी नांदती ॥१४॥

नातरी बोकडाची गति जैशी । तैशी दशा दिसे पुरुषासी ।

मारूं आणिल्या पशुहत्यार्‍यापाशीं । तरी शेळ्यांसी सेवित ॥१५॥

स्वयाती मारितां देखे । अनुताप नेघे तेणें दुःखें ।

मृत्युसमीपही अभिलाखें । कामसुखें वांछिती ॥१६॥

पूर्ण मृत्यूची पायरी । तें वार्धक्य वाजलें उरीं ।

तरी धांवे विषयावरी । आठवू न धरी मरणाचा ॥१७॥

मेष मारूं आणिला घातकें । निजसख्यांतें मारितां देखे ।

तें न मनूनियां यथासुखें । अजीसीं हरिखें रमों धांवे ॥१८॥

मेष श्वान आणि खर । हे ऋतुकाळींचि विषयतत्पर ।

त्याहूनि विशेषेंसीं नर । कामी दुर्धर सर्वदा ॥१९॥

गर्भ संभवल्यापाठीं । श्वानही स्त्रीभोगासी नुठी ।

पुरुषाची अभिनव गोठी । गरोदर गोमटी भोगिती ॥२२०॥

गाढव गाढवीसी बुंथड । न करी अलंकार मोथड ।

मनुष्यासी स्त्रियेचें कोड । तिचें वालभ वाड वाढवी ॥२१॥

दांडा गोंडा मूद वेणी । टिळकुवरी रत्‍नखेवणी ।

नाकींचें हालों दे सुपाणी । हें मनुष्यपणीं वालभ ॥२२॥

जरी प्रसूतिकाळ निकट । गाड्या‌एवढें वाढलें पोट ।

तरी कामचारी विवेकनष्ट । रमताती दुष्ट स्त्रियांसीं ॥२३॥

अस्थि मांस विष्ठा मूत । तेणें कामिनी पूर्ण भरित ।

ते कुश्चळीं जन कामासक्त । जाणोनि होत कां देवा ॥२४॥

या प्रश्नाचें प्रत्युत्तर । तीं श्लोकीं सांगे शार्ग्ङधर ।

कामासक्तीचा विचार । ऐक सादर उद्धवा ॥२५॥

 

श्रीभगवानुवाच ।

अहमित्यन्यथाबुद्धिः प्रमत्तस्य यथा हृदि ।

उत्सर्पति रजो घोरं ततो वैकारिकं मनः ॥ ९ ॥

 

मोहप्रमत्त विवेकशून्य । त्या पुरुषांच्या ठायीं जाण ।

देहात्मवादें अभिमानें । रजोगुणें खवळला ॥२६॥

जैसा मदिरापानें उन्मत्तू । विसरूनि आपुला निजस्वार्थू ।

मग अन्योन्य अनर्थू । आत्मघातू करूं धांवे ॥२७॥

तेवीं शुद्ध बुद्ध नित्यमुक्तु । हा विसरोनि निजस्वार्थु ।

रजोगुणें लोलंगतु । कामासक्तु नरू कीजे ॥२८॥

रजीं रंगल्या अभिमान । दुःखरूप तो दारुण ।

दुर्धर वाढे रजोगुण । विचारी मन तेणें होय ॥२९॥

 

रजोयुक्तस्य मनसः सङ्कल्पः सविकल्पकः ।

ततः कामो गुणध्यानाद्‌ दुःसहः स्याद्धि दुर्मतेः ॥ १० ॥

 

जैं रजोयुक्त झालें मन । तैं संकल्पविकल्प गहन ।

एकांतीं घातल्या आसन । ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥२३०॥

रजोगुणें कामासक्ती । होय दुष्ट वासना दुर्मती ।

कामावांचूनि चित्तीं । आणिक स्फुर्ती स्फुरेना ॥३१॥

जनीं वनीं आणि विजनीं । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ।

ध्यानीं मनीं चिंतनीं । स्त्रीवांचूनी स्मरेना ॥३२॥

कामिनीकामाचा अध्यास । हावभाव अतिविलास ।

गुणलावण्य सुरतरस । आसक्त मानस ते ठायीं ॥३३॥

रतिसुखाचा आराम । कामिनीक्रीडेचा संभ्रम ।

तेणें दुर्धर झाला जो काम । तयासि नियम चालेना ॥३४॥

धनधान्यपुत्रसुख । वांछी इहलोकपरलोक ।

हा रजोगुणाचा देख । अलोलिक अतिकामू ॥३५॥

 

करोति कामवशगः कर्माण्यविजितेन्द्रियः ।

दुःखोदर्काणि सम्पश्यन्‌ रजोवेगविमोहितः ॥ ११ ॥

 

जेथ रजाचा वेग उदित । तेथ कामग्रहो खवळे अद्‍भुत ।

जो पुरुष झाला कामग्रस्त । तो सदा अंकित कामाचा ॥३६॥

ज्यासी विवेक नाहीं मानसीं । तो जाण पां कामाची आंदणी दासी ।

काम नाचवी जैसें त्यासी । तेणें विकारेंसीं नाचत ॥३७॥

कामांकित झालिया पुढें । सकाम कर्म करणें पडे ।

ज्याचें उत्तरोत्तर दुःख वाढे । अतिदुर्वाडें गर्वितु ॥३८॥

रजोगुणें अतिमोहित । यालागीं अजितेंद्रिय अयुक्त ।

जन्ममरणांचा अंकित । कर्में करीत तद्‌रूपें ॥३९॥

रजोगुणाचा अतिबाध । तेणें जन केले विषयांध ।

रजरागी महामंद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥२४०॥

रजें बांधल्यापाठीं जाण । होय महामोहाचें संचरण ।

तेव्हां भ्रमाचें वा‌उधाण । सैरा तमोगुण उल्हासे ॥४१॥

ऐशी प्राणियांची मती । उद्धवा जाण निश्चितीं ।

यालागीं काम ते सेविती । नव्हे विरक्ती विषयांची ॥४२॥

तुज ऐसें वाटेल चित्तीं । बुडाली तरणोपायस्थिती ।

खुंटली प्राण्यांची परम गती । विषयासक्ती अनिवार ॥४३॥

जीवा अविद्याविषयसंबंधू । याचा बाधू अतिसुबद्धू ।

अविद्यायोग अनादिसिद्धू । तेणें दृढ भेदू जीवासी ॥४४॥

अंतःकरणही अनादी । प्रवाहरूपें त्याची सिद्धी ।

तेणें दृढ झाली विषयबुद्धी । त्याग त्रिशुद्धी घडेना ॥४५॥

सत्त्वीं उत्पन्न अंतःकरण । परी तें प्रकृतिकार्य जाण ।

तेथें भोगाध्यासें रजोगुण । खवळला कोण आवरी ॥४६॥

विषयीं बांधिले विवेकी । तो विषयत्याग नव्हे ये लोकीं ।

उद्धवा तुझी आशंका हेच कीं । ऐक तेविखीं उपावो ॥४७॥

विवेकियांच्या ठायीं । विषयबुद्धि नुपजे पाहीं ।

विक्षेपू झाल्या कहींबहीं । अभ्यासू तिंहीं करावा ॥४८॥

 

रजस्तमोभ्यां यदपि विद्वान्‌ विक्षिप्तधीः पुनः ।

अतन्द्रितो मनो युञ्जन्‌ दोषदृष्टिर्न सज्जते ॥ १२ ॥

 

हो कां रजतमांचेनि गुणें । जरी बुद्धि विक्षिप्त केली तेणें ।

तरी आळस सांडूनि सज्ञानें । आवरणें मनातें ॥४९॥

अस्थिमांसाचा घडिला । विष्ठामूत्रांचा कोथळा ।

स्त्री विचारितां कांटाळा । नरकजिव्हाळा तो भोगू ॥२५०॥

भोगीं दावूनि दोषदृष्टी । मनासी विषयांची तुटी ।

करावी गा उठा‌उठी । नेमूनि निहटीं मनातें ॥५१॥

ऐसेनिही मन अतिदुर्धर । नियमासी नावरे अनावर ।

साधकांसी अतिदुस्तर । अशक्त नर ये अर्थीं ॥५२॥

तरी ऐक बापा सावधान । मनोनिग्रहाचें लक्षण ।

तेंही सांगेन साधन । जेणें प्रकारें मन आकळे ॥५३॥

 

अप्रमत्तोऽनुयुञ्जीत मनो मय्यर्पयञ्छनैः ।

अनिर्विण्णो यथाकालं जितश्वासो जितासनः ॥ १३ ॥

 

आळसनिद्रेसी दवडूनि दूरी । जो सावधान निजवृत्ति धरी ।

माझें चिद्‌रूप निर्धारीं । शनैः शनैः करी अभ्यासू ॥५४॥

अभ्यासीं प्रथम भूमिका । शिकावी आसनगाढिका ।

मूळबंध अतिनेटका । आसनजयो देखा शिकावा ॥५५॥

आसनजयो आल्या हाता । सहजें चढे योगपंथा ।

तेथें प्राणापानसमता । अभ्यासितां हों लागे ॥५६॥

विषय ते मना‌आधीन । मन पवनासी वश्य जाण ।

अभ्यासें वश केला पवन । सहजें मन स्थिरावे ॥५७॥

यापरी जो हळू हळू । अभ्यासें सार्थक करी काळू ।

अविरक्त परी प्रबळू । होय भुकाळू परमार्थी ॥५८॥

हरिचिंतनीं एकाग्र मन । तैं एक होती प्राणापान ।

हाचि पवनजयो पूर्ण । योगसाधन सहजेंचि ॥५९॥

तंव प्राणापान सम जोडी । षट्चक्रांचे पदर फोडी ।

तैं विषयांतें चित्त सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२६०॥

यापरी या अभ्यासवाटे । सकाम कामाचा तटका तुटे ।

सनकादिक येणें परिपाठें । म्यां आत्मनिष्ठे लाविले ॥६१॥

 

एतावान्‌ योग आदिष्टो मच्छिष्यैः सनकादिभिः ।

सर्वतो मन आकृष्य मय्यद्धाऽऽवेश्यते यथा ॥ १४ ॥

 

येणेंचि उपदेशें देख । माझे शिष्य सनकादिक ।

अभ्यासबळें अलोकिक । निजात्मसुख पावले ॥६२॥

तो उपदेश कोण म्हणसी । जो वियोग चित्तविषयांसी ।

हें म्यां सांगोनियां त्यांसी । आत्माभ्यासीं लाविलें ॥६३॥

मन जेथें जेथें जाये । तेथें तेथें वस्तूचि आहे ।

येणें अभ्यासें लवलाहें । सनकादिक पाहें सिद्ध झाले ॥६४॥

चित्तासी विषयांचा वियोगू । हा सनकादिकीं साधिला योगू ।

त्यांसी उपदेशावया सांगू । मी स्वयें श्रीरंगू उपदेष्टा ॥६५॥

तें ऐकोनि उद्धव पाहीं । विचारी आपुलिया ठायीं ।

मी श्रीकृष्णावेगळा कंहीं नाहीं । सनकादिक कंहीं उपदेशिले ॥६६॥

सनकादिक ब्रह्मशीळ । पूर्वीं जाहले बहुकाळ ।

कृष्ण ये काळींचें देवकीबाळ गुरुत्व केवळ घडे कैसें ॥६७॥

 

श्री‌उद्धव उवाच ।

यदा त्वं सनकादिभ्यो येन रूपेण केशव ।

योगमादिष्टवानेतद्‌ रूपमिच्छामि वेदितुम्‌ ॥ १५ ॥

 

उद्धव म्हणे गा केशवा । सनकादिकांसी केव्हां ।

उपदेश केला गा तुवां । जवळी तेव्हां मी कां नव्हतों ॥६८॥

येणेंचि रूपें हृषीकेशी । योग सांगीतला तयांसी ।

किंवा रूपांतरें म्हणसी । तें जाणावयासी मज इच्छा ॥६९॥

कोण काळ समयो कोण । कोण योग कैसा प्रश्न ।

तें कृपा करोनि आपण । मज संपूर्ण सांगावें ॥२७०॥

ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । कृपा कळवळला नारायण ।

हंस‍इतिहासनिरूपण । आपुलें आपण सांगत ॥७१॥

 

श्रीभगवानुवाच ।

पुत्रा हिरण्यगर्भस्य मानसाः सनकादयः ।

पप्रच्छुः पितरं सूक्ष्मां योगस्यैकान्तिकीं गतिम्‌ ॥ १६ ॥

 

ब्रह्मयाचे मानसपुत्र । महाप्रसिद्ध सनत्कुमार ।

तिंहीं सत्यलोकीं प्रश्न थोर । अतिदुस्तर पूशिला ॥७२॥

अतिसूक्ष्म योगगती । दुर्ज्ञेय स्वस्वरूपस्थिती ।

परम कठिण प्रश्नोक्ती । पित्याप्रती पूशिली ॥७३॥

 

सनकादय ऊचुः ।

गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रभो ।

कथमन्योन्यसंत्यागो मुमुक्षोरतितितीर्षोः ॥ १७ ॥

 

सनकादिक पुसत । विषयांच्या ठायीं चित्त ।

स्वभावें असे विषयासक्त । तें विषयीं सतत आवेशलें ॥७४॥

तैसेचि विषय पाहीं । प्रवेशले चित्ताच्या ठायीं ।

वासनारूपें जडले तेही । निघों कंहीं नेणती ॥७५॥

फळ काळ दोनी नाहीं । तरी तैंचे आंबे गोड पाहीं ।

ऐसे विषय चित्ताचे ठायीं । रिघाले कंहीं न निघती ॥७६॥

पर्णिली कांता माहेरा जाये । चित्तीं रिघाली दूरी न राहे ।

यापरी विषयो पाहें । जडला ठाये चित्तासी ॥७७॥

चित्त विषयो अन्योन्यत्यागू । मुमुक्षां केवीं घडे चांगू ।

ये उपायीं उपाययोगू । स्वामीनें साङ्गू सांगावा ॥७८॥

 

श्रीभगवानुवाच ।

एवं पृष्टो महादेवः स्वयंभूर्भूतभावनः ।

ध्यायमानः प्रश्नबीजं नाभ्यपद्यत कर्मधीः ॥ १८ ॥

 

ज्यासी अग्रपूजेचा सन्मान । श्रेष्ठ देवांमाजीं महिमान ।

महादेव म्हणावया कारण । ब्रह्मयासी जाण या हेतू ॥७९॥

जो आंगें स्त्रजी चराचर । जो वेदांचें निजमंदिर ।

त्या ब्रह्मयाप्रती अतिगंभीर । प्रश्न महाथोर पुत्रीं केला ॥२८०॥

त्या प्रश्नाची प्रश्नोत्तरविधी । ब्रह्मयासी न कळे त्रिशुद्धी ।

कर्मजड झाली बुद्धी । बोधकसिद्धी स्फुरेना ॥८१॥

प्रश्न अत्यंत सखोल पडिला । तेणें ब्रह्मा वेडावला ठेला ।

कांहीं न बोलवे जी बोला । तो चिंतूं लागला मज तेव्हां ॥८२॥

सनकादिकांची प्रश्नावस्था । सत्यलोकीं समस्तांदेखतां ।

न कळे न म्हणवे सर्वथा । सांगों जातां नव्हे बोध ॥८३॥

ऐसें ब्रह्मयासी दुर्घट । कांहीं न बोलवे स्पष्ट ।

परम देखोनि संकट । मी ज्ञानवरिष्ठ चिंतिलों ॥८४॥

 

स मामचिंतयद्‌ देवः प्रश्नपारतितीर्षया ।

तस्याहं हंसरूपेण सकाशमगमं तदा ॥ १९ ॥

 

निरसावया पुत्राचें अज्ञान । आणि तरावया त्यांचा प्रश्न ।

ब्रह्मा करी माझें चिंतन । तेव्हां माझेंही मन कळवळलें ॥८५॥

ब्रह्मा माझे पोटींचे बाळ । त्यासी कर्मजाड्यें आलें पडळ ।

तें निरसावया तत्काळ । हंस केवळ मी जाहलों ॥८६॥

प्रश्न केला अपरंपार । जो परमहंसाचें परम सार ।

त्याचा पावावया परपार । हंसरूपधर मी जाहलों ॥८७॥

नातळे वर्णव्यक्तिविलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश ।

स्वयें झालों राजहंस । ब्रह्मपुत्रांस उपदेशावया ॥८८॥

सृष्टि स्त्रजावयाचे विधी । विधाता लागला त्रिशुद्धी ।

तेणें कर्मजड झाली बुद्धी । निजज्ञानसिद्धी विसरला ॥८९॥

जो म्हणे मी कर्माधिकारी । तेव्हांचि तो देहधारी ।

तो परमार्थाचे नगरीं । न सरे निर्धारीं बाह्यमुद्रा ॥२९०॥

’न कर्मणा न प्रजया’ ऐसी वेदोक्ति । कर्म निषेधें त्यागवि श्रुती ।

तेणें कर्में ब्रह्मप्राप्ती । जे म्हणती ते अज्ञान ज्ञाते ॥९१॥

म्यां उपदेशिलें ब्रह्मयासी । शेखीं कर्मजाड्य आलें त्यासी ।

केवळ कर्में कर्मठासी । मुक्ति तयासी कैसेनी ॥९२॥

ब्रह्मा अदृष्टद्रष्टा लोकीं तिहीं । तो कर्मजाड्यें झाला विषयी ।

इतरांचा तो पाड कायी । ठकले ये ठायीं सज्ञान ॥९३॥

सांगतां पुत्रांचा प्रश्न । उजळेल ब्रह्मयाचें निजज्ञान ।

ऐसें साधोनियां विंदान । सत्यलोकीं जाण उतरलों ॥९४॥

प्रश्नकर्ते सनकादिक । वक्ता सत्यलोकनायक ।

दोहींसीही पडली अटक । ते काळीं देख मी आलों ॥९५॥

नासों नेदितां साचार । हंस निवडी क्षीरनीर ।

तैसें निवडावया सारासार । ज्ञानचतुर मी राजहंस ॥९६॥

पूर्वपुण्यसंचयेंवीण । विमानेंवीण स्वयें गमन ।

सत्यलोकीं आगमन । कोणाचेंही जाण कदा नव्हे ॥९७॥

मी पापपुण्यातीत पाहीं । यालागीं मज पाप पुण्य नाहीं ।

पाखीं कां चालोनि पायीं । तो मी सर्वां ठायीं सर्वगतू ॥९८॥

त्या सत्यलोका मी अवचितां । हंसस्वरूपें झालों येता ।

त्या मज देखोनियां समस्तां । परमाश्चर्यता वाटली ॥९९॥

 

दृष्ट्वा मां त उपव्रज्य कृत्वा पादाभिवंदनम्‌ ।

ब्रह्माणमग्रतः कृत्वा पप्रच्छुः को भवानिति ॥ २० ॥

 

परब्रह्मैक परम मूर्ती । मज येतां देखोनि हंसस्थितीं ।

उभे ठाकोनि सामोरे येती । चरण वंदिती साष्टांग ॥३००॥

ब्रह्मसदनीं वेद मूर्तिमंत । पुण्यही मूर्तिमंत तेथ ।

सत्यलोकीं मूर्तिमंत सत्य । तपादि समस्त मूर्तिमंतें ॥१॥

त्या समस्तां देखतां जाण । ब्रह्मयानें पुसावें तूं कोण ।

पुसल्या ये‌ईल नेणतेपण । यालागीं मौन धरोनि ठेला ॥२॥

ब्रह्मा पुढें करूनि जाण । सनकादिकीं आपण ।

मज केला गा तिंहीं प्रश्न । तुम्ही कोण कोठील ॥३॥

 

इत्यहं मुनिभिः पृष्टस्तत्त्वजिज्ञासुभिस्तदा ।

यदवोचमहं तेभ्यस्तदुद्धव निबोध मे ॥ २१ ॥

 

ब्रह्मयासी पुसिला जो प्रश्न । त्याचा तत्त्वार्थ जाणावया जाण ।

मज पुशिलें तिंहीं तूं कोण । अतिविचक्षण जिज्ञासू ॥४॥

त्यासी स्थूळ लिंग कारण । यावेगळी वस्तु चिद्धन ।

सांगावया प्रश्नखंडण । तीं श्लोकीं जाण म्यां केलें ॥५॥

करोनियां प्रश्नखंडण । नित्यानित्यविवेकज्ञान ।

त्यांसी म्यां सांगीतलें जाण । तेंचि निरूपण तूं ऐक ॥६॥

सनकादिकांसमान । उद्धवा तुज मी मानीं जाण ।

यालागीं त्यांचें ज्ञानकथन । ऐक सांगेन म्हणतसें ॥७॥

तें अतिश्रेष्ठ जुनाट ज्ञान । उद्धवा परिसें सावधान ।

ऐसें ऐकोनियां वचन । येरें मनाचे कान पसरले ॥८॥

देहद्वय सांडोनि मागें । उद्धव श्रवण झाला सर्वांगें ।

यालागीं स्वयें श्रीरंगें । गुह्य ज्ञान स्वांगें सांगीतलें ॥९॥

देवालयीं लागे रत्‍नखाणी । त्यांमाजीं सांपडला स्पर्शमणी ।

अमृत स्त्रवे त्यापासोनि । तैसा सभाग्यपणीं उद्धवू ॥३१०॥

सांगता श्रीमहाभागवता । श्रीकृष्णासारिखा वक्ता ।

त्याहीमाजी हंसगीतकथा । आदरें सांगता हरि झाला ॥११॥

सनकादिकांची जे प्राप्ती । ते दाटूनि उद्धवाचे हातीं ।

स्वयें देतसे श्रीपती । त्याचें भाग्य किती वर्णावें ॥१२॥

ब्रह्मरूप स्वयें वक्ता । तोही उपदेशी ब्रह्मकथा ।

गुरु ब्रह्मचि स्वभावतां । हे सभाग्यता उद्धवीं ॥१३॥

यालागीं निजभाग्यें भाग्यवंतू । जगीं उद्धवचि अतिविख्यातू ।

ज्यालागीं स्वयें जगन्नाथू । ज्ञानसमर्थू तुष्टला ॥१४॥

 

वस्तुनो यद्यनानात्वं आत्मनः प्रश्न ईदृशः ।

कथं घटेत वो विप्रा वक्तुर्वा मे क आश्रयः ॥ २२ ॥

 

परमात्मा अवघा एक । तेथ ’मी तूं’ हें न रिघे देख ।

’तूं कोण’ हें जें वाचिक । वृथा शाब्दिक वाचाळे ॥१५॥

तुम्हीं केला जो प्रश्न । त्यासी द्यावया प्रतिवचन ।

वक्त्यासी आश्रयो नाहीं जाण । मीतूंपण दिसेना ॥१६॥

तुम्हीं पुसिलें नेणोन । म्यां काय सांगावें जाणोन ।

मूळीं नाहीं मीतूंपण । पुशिला प्रश्न तो मिथ्या ॥१७॥

नामरूपवर्णव्यक्ती । नाहीं स्वजातिविजाती ।

विप्र हो तुमची वचनोक्ती । न घडे निश्चितीं सत्यत्वें ॥१८॥

चारी पुरुषार्थ पूर्ण करिती । हे विप्रनामाची परमख्याती ।

त्या तुम्हां सज्ञानाची प्रश्नोक्ती । न घडे निश्चितीं विप्र हो ॥१९॥

असावें जरी बहुपण । तरी पुसणें घडे तूं कोण ।

आत्म्याचे ठायीं ऐसा प्रश्न । न घडे जाण सर्वथा ॥३२०॥

प्रश्न न घडे आत्म्याच्या ठायीं । जरी म्हणाल देहाविषयीं ।

तेंही न घडे गा पाहीं । तो देहाचे ठायीं योजेना ॥२१॥

 

पञ्चात्मकेषु भूतेषु समानेषु च वस्तुतः ।

को भवानिति वः प्रश्नो वाचारंभो ह्यनर्थकः ॥ २३ ॥

 

आदी ब्रह्मा अंतीं मशक । देह तितुका पांचभौतिक ।

तेथ तूं कोण म्हणावया देख । वेगळीक दिसेना ॥२२॥

कटक कुंडलें मुकुट माळा । करमुद्रिका कटिमेखळा ।

अलंकार पाहातां डोळां । सुवर्णावेगळा अंशु नाहीं ॥२३॥

कां घडा गाडगें वेळणी । परळ रांजण माथणी ।

हें मृत्तिकेवांचुनी । आन कांहीं असेना ॥२४॥

तेवीं सर्व देहीं देहत्वें जाण । पांचभौतिक समसमान ।

तेथ म्हणावया तूं कोण । वेगळेपण असेना ॥२५॥

वस्तु वस्तुत्वें समसमान । भूतें भूतत्वें समान जाण ।

तेथ प्रश्नोक्ति वाचारंभण । ’तूं कोण’ हें अनर्थू ॥२६॥

हो कां आपणिया आपण । जो कोणी पुसेल तूं कोण ।

तो अतिभ्रमें भुलला जाण । निजात्मज्ञान विसरला ॥२७॥

विचारितां प्रश्नाचा अर्थू । एवढा दिसतसे अनर्थू ।

कांहीं भासेना परमार्थू । तूं कोण हा व्यर्थू प्रश्न तुमचा ॥२८॥

देहासी तूं कोण ऐसें । आत्मा जैं स्वयें पुसे ।

तैं आत्मत्वा लागलें पिसें । अतिभ्रंशें भूलला ॥२९॥

दोरा‌अंगीं सर्प नसे । त्यावरी तो भ्रमें भासे ।

त्या सर्पातें दोरू पुसे । तूं कोण ऐसें तें मिथ्या ॥३३०॥

या रीतीं त्यांचें प्रश्नखंडन । उद्धवा तैं म्यां केलें जाण ।

तेणें भेदाचें निरसन । वचनोक्तीं जाण दाविलें ॥३१॥

प्रश्नखंडणाचे अर्थें । कैंचीं करणें कैंचीं भूतें ।

भेद नाहीं जीवशिवांतें । हेंही त्यांतें सूचिलें ॥३२॥

याहीवरी जे कथा गहन । परम कारणेंसीं अभिन्न ।

त्यांसी म्यां सांगीतलें निजज्ञान । ऐक सावधान उद्धवा ॥३३॥

 

मनसा वचसा दृष्ट्या गृह्यतेऽन्यैरपीन्द्रियैः ।

अहमेव न मत्तोऽन्यद्‌ इति बुध्यध्वमञ्जसा ॥ २४ ॥

 

मजवेगळा तिळा‌इतुका । रिता ठावो नाहीं देखा ।

तेथ व्याप्य आणि व्यापका । अभिन्नत्व देखा सहजचि ॥३४॥

मनाच्या संकल्पा आलें जें जाण । त्यासी शाब्दिक म्हणती भिन्न ।

माझ्या स्वरूपाचा विवर्त तें मन । हे अभिन्न खूण कळेना ॥३५॥

मन लक्षितां सावधान । सर्वथा लक्षेना तें जाण ।

परब्रह्मही अलक्ष्य पूर्ण । दोनी समान चिद्‌रूपें ॥३६॥

शिंपीच्या अंगीं रुपें आभासे । तेंचि तेथें साचें नसे ।

माझ्या स्वरूपीं मन तैसें । मिथ्या भासे कल्पनामात्र ॥३७॥

विचारितां शब्दमहिमान । शब्द स्वरूपें ज्ञानघन ।

ज्ञानार्थेंवीण वचन । अल्पही जाण असेना ॥३८॥

वक्ता वाच्य वचन । तीनी मीचि आहें जाण ।

बोलु बोलका मजवीण । दुसरा जगीं कोण असे ॥३९॥

मी वेदू जाण पां वेदांचा । प्रणवरूप मीचि साचा ।

मुख्य वाचेची मीचि वाचा । वेगळा शब्दाचा ठावो नाहीं ॥३४०॥

दृष्टीचें जें देखणेंपण । देखणें तेंचि मुख्य ज्ञान ।

तेंचि जाण ब्रह्म पूर्ण । चैतन्यघन निजदृष्टीं ॥४१॥

मीचि डोळा मीचि देखता । दृश्य द्रष्टा मीचि तत्त्वतां ।

मजवेगळी देखणी अवस्था । नाहीं सर्वथा तिहीं लोकीं ॥४२॥

मीचि डोळियांचा निजडोळा । मी सर्वांगदेखणा सोज्ज्वळा ।

मजवेगळी देखणी कळा । नाहीं जिव्हाळा आणिकांचा ॥४३॥

मीचि शब्दांतें शब्दविता । मीचि श्रवणांमाजीं श्रोता ।

ऐशिया एकात्मता पाहतां । शब्द निःशब्दता परब्रह्म ॥४४॥

कान वचन मीचि श्रोता । मीचि जाणता शब्दार्था ।

ऐकणाही मजपरता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥४५॥

मीचि घ्राण मीचि वास । मीचि जाणता सुवास ।

मजवेगळा रहिवास । परिमळास असेना ॥४६॥

रसना रसज्ञत्वें चोखडी । परी ते केवळ चामडी ।

कापूनि सोडिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४७॥

मीचि रसू मीचि रसना । स्वादु सेविता मीचि जाणा ।

मजवेगळा चवीचाखणा । रसज्ञपणा आन नाहीं ॥४८॥

इतर इंद्रियप्रवृत्ती । त्याही मद्‌रूप जाण निश्चितीं ।

मी सर्वात्मा आत्ममूर्ती । क्रियाशक्ती तेही मीचि ॥४९॥

पांचभौतिक देहाचा गोळा । भ्रांत म्हणती मजवेगळा ।

चुकोनि व्यापका सकळा । तो कोठें निराळा राहों लाहे ॥३५०॥

जैसे जळींचे जळतरंग । जळरूपें जळीं क्रीडती चांग ।

तैसे माझ्या स्वरूपीं साङ्ग । देह अनेग मद्‌रूपे ॥५१॥

हो कां घृताची पुतळी । थिजोनि जाली एके काळीं ।

परी ते नव्हे घृतपणावेगळी । तेवीं भूतें झालीं मजमाजीं ॥५२॥

जळीं जळाची जळसागर । जळामाजीं भासली साकार ।

तैसें मजमाजीं चराचर । अभिन्न साचार मद्‌रूपीं ॥५३॥

जैसा एकला एक तंतू । सुतेंचि विणिला सुता‌आंतू ।

त्यां वेगळाले म्हणती तांतू । तैसें मज‌आंतू जग भासे ॥५४॥

तंतू पाहतां वस्त्र न दिसे । आत्मा लक्षितां जगचि नसे ।

येणें अद्वैततत्त्वसौरसें । आहे अनायासें परब्रह्म ॥५५॥

ऐसा अद्वैतबोधें मी एकू । सर्वात्मा सर्वात्मकू ।

हा निश्चयेंसीं विवेकू । बुद्धिबोधें निष्टंकू जाणावा ॥५६॥

मीचि एक सर्वां ठायीं । हेंचि दृढ धरिल्या पाहीं ।

मग साधनाचें कार्य नाहीं । ठायींच पाहीं नित्यमुक्त ॥५७॥

सर्वात्मा चैतन्यघन । अतिसुलभ हें निजज्ञान ।

उद्धवा म्यां हें सांगोन जाण । भेदखंडण केलें त्यांचें ॥५८॥

सनकादिकांचा पूर्वील प्रश्न । जो ब्रह्मादिकां अटक जाण ।

त्याचेंही म्यां प्रतिवचन । विवंचूनि ज्ञान सांगितलें ॥५९॥

 

गुणेष्वाविशते चेतो गुणाश्चेतसि च प्रजाः ।

जीवस्य देह उभयं गुणाश्चेतो मदात्मनः ॥ २५ ॥

 

तुम्हीं ब्रह्मयासी पुसिलें पाहीं । विषय रिघाले चित्ताच्या ठायीं ।

चित्त जें रिघालें विषयीं । तें वेगळें कांहीं निवडेना ॥३६०॥

विषयत्यागेंविण । कदा नव्हे ब्रह्मज्ञान ।

त्याही त्यागाची त्यागिती खूण । ऐक संपूर्ण सांगेन ॥६१॥

चित्त विषय दोनी पाहें । तें जीवाचें निजस्वरूप नव्हे ।

हे उपाधिवशें दोनी देहें । लागलीं पाहें प्रवाहरूपें ॥६२॥

कर्तृत्वभोक्तृत्वरूपें जाण । विषयी जाहलें अंतःकरण ।

तेणें उभय देहांचें कारण । अंहकारू जाण खवळला ॥६३॥

तेणें भुलविलें चित्त विषयांसी । विसरला निजात्मस्वरूपासी ।

तेणें तदात्मता जीवामनांसी । अतिशयेंसी दृढ झाली ॥६४॥

चित्त जीवाचें स्वरूप होतें । तरी विषयीं लोलुप नव्हतें ।

हा उभय उपाधी जीवातें । अभिमानें येथें वाढविला ॥६५॥

जेवीं कां विसरोनि आपणासी । स्वप्नींचिया स्वप्नदेहासी ।

अतिप्रीति वाढे पुरुषासी । तैसी दशा जीवासी येथ झाली ॥६६॥

नित्य शुद्ध मुक्त जाण । जीवाचें स्वरूप चैतन्यघन ।

त्यासी अभिमानें हें जाण । मिथ्या बंधन लाविलें ॥६७॥

यालागीं सांडावा अभिमान । तैं तुटे सकळ बंधन ।

अभिमान निरसावया जाण । माझें भजन करावें ॥६८॥

परी वैराग्येंवीण माझी भक्ती । पोंचट जाण पां निश्चितीं ।

जैं वैराग्ययुक्त उपजे भक्ती । तैं मद्‌रूपप्राप्ती जीवासी ॥६९॥

हृदयीं विषयांचा अभावो । आणि सर्वांभूतीं भगवद्‍भावो ।

हे वैराग्ययुक्त भक्ति पहा हो । तैं जीवासी निर्वाहो मद्‌रूपीं ॥३७०॥

जीव मद्‌रूपचि तत्त्वतां । त्यासी देहाभिमान जीविता ।

सदा भूतीं मद्‍भावो पाहतां । सिद्ध मद्‌रूपता उद्‍बोधे ॥७१॥

जीवासी जाहल्या मद्‌रूपता । सहजें त्यागू विषयचित्ता ।

देखें उभयांसी मिथ्यात्वता । न त्यागितां हा त्यागू ॥७२॥

चित्तविषयांचा त्यागू । पुत्र हो तुम्हीं पुशिला चांगू ।

तो म्यां सांगितला अव्यंगू । हा ज्ञानमार्गू अतिशुद्ध ॥७३॥

म्हणाल मिथ्या उभयांचें भान । तरी एवढें जीवासी बंधन ।

लागावया कांहीं कारण । ऐसें कांहीं मन कल्पील जरी ॥७४॥

गगनसुमनांची माळा । कधीं कोणी ले‌इली गळां ।

तारूं बुडे मृगजळां । हें कोणी तरी डोळां देखतें काय ॥७५॥

सत्यासी बाधक । कदा बाधूं न शके लटिक ।

ऐसें कल्पाल तुम्हीं कल्पक । तोही परिपाक अवधारा ॥७६॥

तरी परिसा सावधान । तें मी सांगेन निरूपण ।

जेणें जीवासी बंधन । लटिकेंचि जाण दृढ झालें ॥७७॥

 

गुणेषु चाविशच्चित्तं अभीक्ष्णं गुणसेवया ।

गुणाश्च चित्तप्रभवा मद्‌ रूप उभयं त्यजेत्‌ ॥ २६ ॥

 

अनादिसंसारमाळेच्या ठायीं । नित्य विषय भोगिले पाहीं ।

ते ठसावले चित्ताच्या ठायीं । वारंवार देहीं सेवितां ॥७८॥

चित्तासी विषयांची अतिप्रीती । तेणें वाढली विषयासक्ती ।

ते प्रवेशलें विषयांप्रती । न निघे मागुती सर्वथा ॥७९॥

बुद्धीसी विषयांचें ध्यान । चित्तीं विषयांचें चिंतन ।

विषयांलागीं तळमळी मन । विषयाभिमान तेणें झाला ॥३८०॥

विषयीं खवळल्या अभिमान । देहद्वयाचें दृढ बंधन ।

जीवासि लागलें अतिकठिण । परम दारुण दुस्तर ॥८१॥

मग त्या देहाचे विकार । ते आपुले मानी साचार ।

अंध पंगू मी कुष्ठी नर । स्वरूपें सुंदर मी ज्ञाता ॥८२॥

मी देह हें मानोनि चित्तें । निजरूप विसरला भावार्थें ।

हें मिथ्याबंधन जीवातें । सत्यत्वें त्यातें अभिमानू ॥८३॥

मिथ्या बुद्धिबळाचा खेळ । हारी जैती ही निष्फळ ।

तरी खेळत्या अभिमान प्रबळ । तैसें देहबळ जीवासी ॥८४॥

त्या खेळाचे घोडे हस्ती । पहिले काय जीत होती ।

मा मारिले म्हणोनि भांडती । तेवीं जन्मपंक्ती जीवासी ॥८५॥

हें निरसावया जीवबंधन । निःशेष सांडावा देहाभिमान ।

अभिमान सांडितांचि जाण । मद्‌रूपपण सहजेंचि ॥८६॥

जीवें साधिल्या मद्‌रूपता । सहजेंचि त्याग विषयचित्ता ।

माझे स्वरूपीं अहंता । नाहीं वार्ता विषयांची ॥८७॥

जेव्हां बुद्धिबळांचा खेळ मोडे । तेव्हां राजाप्रधानादि लांकुडें ।

तेवीं अहंकारू निमाल्या पुढें । प्रपंच उडे मिथ्यात्वें ॥८८॥

जेवीं स्वप्नींचा स्वप्नाभिमान । दारा पुत्र स्वजन धन ।

स्वदेहेंसी मिथ्या जाण । जागेपण झालिया ॥८९॥

तेवीं पावलिया माझी सरूपता । कैंचा देह कैंची अहंता ।

विषयचित्तांची वार्ता । नाहीं अवस्था गुणत्रया ॥३९०॥

तिहीं अवस्थीं अवस्थाभूत । जागृतिस्वप्नसुषुप्तिमंत ।

तो हो‌ऊनि जीव निरवस्थ । परमात्म्यांत मिळे कैसा ॥९१॥

ऐसा कांहीं कल्पाल भावो । त्या जीवासी अवस्थांचा अभावो ।

त्रिगुण गुणांचा स्वभावो । या वृत्ति पहा हो बुद्धिच्या ॥९२॥

 

जाग्रत्स्वप्नः सुषुप्तं च गुणतो बुद्धिवृत्तयः ।

तासां विलक्षणो जीवः साक्षित्वेन विनिश्चितः ॥ २७ ॥

 

तिन्ही गुणांच्या तिन्ही वृत्ती । सत्त्वगुणाची जागृती ।

रजोगुणें स्वप्नप्राप्ती । केवळ सुषुप्ती तमाची ॥९३॥

या तिनी अवस्था पाहीं । दृढ जडल्या बुद्धीच्या ठायीं ।

जीवासी यांचा संबंध नाहीं । तो वेगळा पाहीं साक्षित्वें ॥९४॥

जैं जीवा‌अंगीं अवस्था जडे । तैं जो अवस्थेमाजीं बुडे ।

तिहींचें साक्षित्व त्यासी न घडे । ऐक निवाडें अवस्था ॥९५॥

जागृतीमाजीं नाहीं स्वप्न । स्वप्न जागृतीसी नेणे जाण ।

सुषुप्ती नेणे जागृतिस्वप्न । सुषुप्तीचें भान त्या नेणती ॥९६॥

जीवूं अवस्थांचा अभिमानी । हेंही न घडे जीवालागुनी ।

विश्व तैजस प्राज्ञ तिन्ही । अवस्थाभिमानी हे तिहींचे ॥९७॥

जो जे अवस्थेचा अभिमानी । तो ते अवस्थेसवें जाय निमोनी ।

जीव वेगळा साक्षिपणीं । अवस्थाभिमानी तो नव्हे ॥९८॥

देहातीत गुणातीत । तिहीं अवस्थां अतीत ।

द्रष्टा साक्षी निश्चित । जाणता येथ तो जीवू ॥९९॥

अवस्थाभिमान नाहीं जीविता । तरी कवण भोगी तिनी अवस्था ।

मी निजलों मीचि जागता । म्यां स्वप्नावस्था देखिली ॥४००॥

ऐसा प्रत्यक्ष अनुभवू । स्वयें बोलताहे जीवू ।

हा म्हणाल जीवाचा स्वभावू । ऐक अभिप्रावू सांगेन ॥१॥

 

यर्हि संसृतिबंधोऽयं आत्मनो गुणवृत्तिदः ।

मयि तुर्ये स्थितो जह्यात्‌ त्यागस्तद्‌ गुणचेतसाम्‌ ॥ २८ ॥

 

जो डोल्हारां बैसे यथासुखें । तो न हालतां हाले तेणें हरिखें ।

उंच नीच खाय झोंके । निजकौतुकें हिंदोळे ॥२॥

हिंदोळतांही प्रबळ । डोल्हाराचि अतिचंचळ ।

बैसला तो निजनिश्चळ । मानी केवळ मी हालतों ॥३॥

जीवासी झाली तैशी वानी । अहंममतेच्या अभिमानीं ।

तिनी अवस्था स्वयें मानी । जेवीं कां स्वप्नीं गृहदारा ॥४॥

हो कां लोखंडकाम घडतां । लोहाचे घाय अग्नीचे माथां ।

प्रत्यक्ष दिसती वाजतां । लोहतादात्मतासंयोगें ॥५॥

तेणें अग्निसंगें वाडेंकोडें । लोहकामचि घडे मोडे ।

परी अग्नीसी घडमोड न घडे । तेणें पडिपाडें जीवू येथें ॥६॥

जेवीं अग्निवीण लोह न घडे । तेवीं आत्मसंयोगेंवीण पुढें ।

बुद्धि केवळ जड वेडें । कर्मक्रिया नातुडे सर्वथा ॥७॥

लोह घडवूनि अग्नि न घडता । कर्म करवूनि जीव अकर्ता ।

तरी वृत्तिसंगें तदात्मता । अहंकर्ता हें मानी ॥८॥

जीव आपुले प्रकाशता । झाला वृत्तीतें प्रकाश करिता ।

वृत्ति जीवासी नानावस्था । निजस्वभावता देतसे ॥९॥

सूर्यें प्रकाशिलें जळ । जळें केलें प्रतिमंडळ ।

खळाळ चंचळ निश्चळ । कांपे चळचळ जळकंपें ॥४१०॥

सूर्याची गगनीं नित्य वस्ती । तो जळें आणिला अधोगती ।

तेवीं वृत्तीचि या निजख्याती । मुक्तांतें दाविती बद्ध करूनी ॥११॥

आत्म्यानें प्रकाशिली वृत्ती । वृत्तीनें आत्म्यासी जीवप्राप्ती ।

जीवा जीवत्वें देहासक्ती । सुखदुःखप्राप्ती तेणें भोगी ॥१२॥

एवं वृत्तीचिया संगती । वाढली विषयांची आसक्ती ।

तेणें संसारबंधप्राप्ती । झाली निश्चितीं जीवासी ॥१३॥

हो कां गुणचित्त-विषयासक्ती । जरी झाली जीवासी बंधप्राप्ती ।

तरी आवरावी विषयवृत्ती । वैराग्ययुक्तीं गुरुकृपा ॥१४॥

ऐक गुरुकृपेची मातू । तिहीं अवस्थांमाजीं सततू ।

जो मी तुरीय गुणातीतू । ते अभ्यासीं लावितू निजबोधें ॥१५॥

नवल अभ्यासाची गोठी । विषयवृत्तीच्या पाठींपोटीं ।

मज तुरीयातें दावी दिठी । बोधपरिपाटी निजबोधें ॥१६॥

मी तुरीय तंव संततु । सर्वीं असे सर्वगतु ।

शिष्यवृत्तीसी मज‌आंतु । गुरु निजस्वार्थु दाखवी ॥१७॥

सुतावेगळें लुगडें । करूं जातां गा उघडें ।

तेथ क्रियाचि लाजोनि बुडे । मागें पुढें सूतचि ॥१८॥

तेवीं साधकासी जाण । विषयांचें विषयभान ।

माझे स्वरूपीं नव्हेचि भिन्न । चैतन्यघन मीचि मी ॥१९॥

तेथ नामरूपवर्णभेद । नाहीं कर्म कर्ता विधिवाद ।

बुडाले प्रणवेंसीं वेद । केवळ शुद्ध मी एक ॥४२०॥

तेथें भ्रमेंसहित पळाली भ्रांती । क्रियेसहित गळाली प्रवृत्ती ।

लाजा विराली निवृत्ती । स्वस्वरूपीं वृत्ती विनटली ॥२१॥

सूर्योदयो जाहल्यापाठीं । समूळ अंधारातें घोंटी ।

खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ॥२२॥

तेवीं माझी स्वरूपप्राप्ती । मायेची मावळे स्फूर्ती ।

लाजा विसरे प्रवृत्तिनिवृत्ती । नित्यतृप्ती स्वानंदें ॥२३॥

ऐशी माझ्या स्वरूपाची गोडी । जैं साधकां लागे धडफुडी ।

तैं चित्त विषयातें सांडी । विषयो वोसंडी चित्तातें ॥२४॥

जीं देंठीं वाढलीं फळें । तींचि परिपाकाचे वेळे ।

होती देंठावेगळें । देंठू तो फळें धरीना ॥२५॥

कां मंथूनि काढिलें नवनीत । तें परतोनि घातल्या ताका‌आंत ।

तें ताकेंसी होय अलिप्त । तैसें चित्त विषयांसी ॥२६॥

पावल्या माझी स्वरूपता । दैव बळें विषयो देतां ।

चित्तासी नुपजे विषयावस्था । स्वभावतां अलिप्त ॥२७॥

एवं साधिल्या माझा योगू । चित्तविषयांचा वियोगू ।

सहजेंचि होय चांगू । हा सुगम सांगू उपावो ॥२८॥

येथें झणें आशंका धराल देख । स्वरूप शुद्ध अवघें एक ।

तेथें कैंचें बाध्यबाधक । काय साधक साधिती ॥२९॥

ऐशाही संधीमाजीं जाण । अहंता बंधाचें कारण ।

त्याचें सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥४३०॥

 

अहङ्कारकृतं बन्धं आत्मनोऽर्थविपर्ययम्‌ ।

विद्वान्निर्विद्य संसार चिन्तां तुर्ये स्थितस्त्यजेत्‌ ॥ २९ ॥

 

जेथ मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे ।

ऐसें अभिमानाचें सांकडें । पाहें पां रोकडें कौतुक त्याचें ॥३१॥

बुद्धि अहंकार अळुमाळ । उठतां शुद्धासी करी शबळ ।

तेणें देहयोगें धरिल्या बळ । करी तत्काळ विपरीत ॥३२॥

अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचें आच्छादन ।

बुडे परमात्मस्फूर्तीचें स्फुरण । देहाचें मीपण वाढवी ॥३३॥

जेवीं कूर्मीच्या पिलियां । चक्षुरमृतें तृप्ती तयां ।

तेंचि मातेसि चुकलिया । मग भुकेलिया कर्दमू सेवी ॥३४॥

तेवीं खुंटलिया आनंद‍अभिव्यक्ती । जीवासी वाढे विषयासक्ती ।

कामिनीकामा पंगिस्त होती । चिंता चित्तीं विषयांची ॥३५॥

विसरला आपुलें पूर्णपण । धनालागीं अतिहीन दीन ।

मी देहवंत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥

तेणें कर्माकर्मांचे आघात । नाना नरकयातना होत ।

जन्ममरणादि आवर्त । तेणें दुःखी होत अतिदुःखें ॥३७॥

भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना ।

न साहवे भववेदना । तेणें देहाभिमाना सांडावें ॥३८॥

अभिमान सांडितां न संडे । हेंचि दुर्घट थोर मांडे ।

यालागीं साधनाचें सांकडें । सोसणें पडे साधकां ॥३९॥

जें जें करावें साधन । साधनीं रिघे साधनाभिमान ।

धांवणें नागवी संपूर्ण । साधनीं विघ्न होय तैसें ॥४४०॥

ऐक साधकांचें साधन । वेदोक्त स्वधर्माचरण ।

साधावें वैराग्य पूर्ण । माझें भजन अतिप्रीतीं ॥४१॥

तत्काळ जावया देहाभिमान । अखंड माझें नामस्मरण ।

गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूतीं समान मद्‍भावो ॥४२॥

मद्‍भावें भूतें समस्त । सर्वदा पाहतां सतत ।

मी तुरीय जो सर्वगत । ते ठायीं चित्त प्रवेशे ॥४३॥

तिहीं अवस्थांमाजीं मी सतत । तिहीं अवस्थांतें मी प्रकाशित ।

तिहीं अवस्थांहूनि अतीत । तो जाण निश्चित मी तुरीयू ॥४४॥

तिहीं गुणांहूनि परता । चौथेपणेंवीण चौथा ।

तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥

तेथें ठेवितां चित्ता । जीवू पावे मद्‌रूपता ।

निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥

तेव्हां चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान ।

या अवघियांचें होय शून्य । मी स्वानंदघन स्वयें प्रकटें ॥४७॥

न तुटतां भेदाचें भेदभान । जो म्हणवी मी सज्ञान ।

वृथा धरी ज्ञानाभिमान । तोही अज्ञान तें ऐका ॥४८॥

 

यावन्नानार्थधीः पुंसो न निवर्तेत युक्तिभिः ।

जागर्त्यपि स्वपन्नज्ञः स्वप्ने जागरणं यथा ॥ ३० ॥

 

नाना वर्ण नाना व्यक्ती । नाना गोत्रें नाना जाती ।

अधमोत्तमविधानस्थिती । भेदु चित्तीं दृढ भासे ॥४९॥

मी काळा गोरा सांवळा । मी सज्ञानत्वें आगळा ।

माझी उत्तम पवित्र लीळा । मी कुळें आगळा सत्कुलीन ॥४५०॥

ऐशी झाल्या भेदप्राप्ती । पाहतां अभेदपरा श्रुती ।

साधकां शास्त्रार्थयुक्तीं । भेदनिवृत्ती ज्यां नव्हेचि ॥५१॥

त्याचा व्यर्थ ज्ञानाभिमान । त्याचें व्यर्थ कर्माचरण ।

तो जागाचि निजेला जाण । जागेपण त्या नाहीं ॥५२॥

दृढ जो कां देहाभिमान । तेंचि कनकबीजसेवन ।

करूनि थोर भ्रमला जाण । अविद्या दीर्घ स्वप्नभेदु देखे ॥५३॥

वोसणतां बोली न लभे अर्थू । तेवीं पठणमात्रें परमार्थू ।

श्रुतिशास्त्रांचा निजशास्त्रार्थू । नव्हेचि प्राप्तु तयांसी ॥५४॥

वेदाध्ययन नित्य करिती । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्ती ।

नव्हेचि कामक्रोधनिवृत्ती । पठणें परमप्राप्ती कदा न घडे ॥५५॥

देहाभिमानें भेददृष्टी । पढतां श्रुतिशास्त्रांच्या कोटी ।

परमार्थेंसीं नव्हे भेटी । भेददृष्टी न वचतां ॥५६॥

जो कां स्वप्नींचे स्वप्नीं जागा जाहला । स्वप्नीं वेदशास्त्र पढिन्नला ।

जागा म्हणतां असे निजेला । तैसा व्यवहारू झाला शास्त्रज्ञांसी ॥५७॥

देहाभिमानेंसीं भेदभान । निःशेष जंव न वचे जाण ।

तंववरी नव्हे निजज्ञान । अत्यंत बंधन तो भेद ॥५८॥

सनकादिकांची आशंका । घे‌ऊनि देव बोले देखा ।

वेदविभाग नेटका । सकळ लोकां कळे तैसा ॥५९॥

स्वयें प्रकाशोनि सकळ भेदू । गर्जत उठी तुझा वेदू ।

भेद वेदेंचि प्रतिपाद्यू । वेदानुवादू नव्हे मिथ्या ॥४६०॥

वेदवचन तें तात्त्विक । मानावें पैं आवश्यक ।

हे तुझीच शिकवण देख । तो वेद लटिक म्हणावा कैसा ॥६१॥

वेदाज्ञेचा परम नेम । वेदें प्रतिपाद्य क्रियाकर्म ।

वेदबळें वर्णाश्रम । निज स्वधर्म चालविती ॥६२॥

वेद म्हणे जो लटिक । जो वेदबाह्य आवश्यक ।

हें तूंचि बोलिलासी देख । तो वेद लटिक केवीं मानूं ॥६३॥

ऐशी मानाल आशंका । तोहीविषयीं मीचि देखा ।

वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सांगेन ॥६४॥

अविद्याभेद सबळ ज्यासी । भेदू नियामक म्यां केला त्यासी ।

मद्‌रूपीं अभेदता ज्या भक्तासी । मिणधा त्यापाशीं वेदवादु ॥६५॥

वेद तितुकाही त्रिगुण । अभेदजनें भक्त निर्गुण ।

त्यासी वेदाचें नियामकपण । न चले जाण ममाज्ञा ॥६६॥

रायाचा जिवलग सेवकू । त्यासी द्वारपाळ नव्हे नियामकू ।

कां दासीस लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ॥६७॥

निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखतां ।

एकांतीं मीनल्या कांता । लाज सर्वथा सोडावी ॥६८॥

सबळ भेदांचें भेदमान । तंव दुर्लंघ्य वेदवचन ।

अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्यां न बाधी ॥६९॥

आशा तेचि अविद्याबाधू । छेदिल्या बाधीना वेदवादू ।

जेवीं सूर्योदयापुढें चांदू । होय मंदू निजतेजें ॥४७०॥

 

असत्त्वाद्‌ आत्मनोऽन्येषां भावानां तत्कृता भिदा ।

गतयो हेतवश्चास्य मृषा स्वप्नदृशो यथा ॥ ३१ ॥

 

गुरुकृपा जो सज्ञान । त्यासी देहाचें अबाधित भान ।

मिथ्या प्रपंचाचें दर्शन । कर्में कर्तेपण त्या नाहीं ॥७१॥

अविद्या द्योतिले वर्णाश्रम । तेथींचे आविद्यक क्रियाकर्म ।

तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याभ्रम अज्ञाना ॥७२॥

सज्ञान भक्तांच्या ठायीं । ते अविद्या निःशेष नाहीं ।

मा वेदविधान तेथें पाहीं । रिघावया कायी कारण ॥७३॥

आंबा सफळित जव असे । तंव नेटेंपाटें राखण बैसे ।

फळ हाता आल्या आपैसें । राखण वायसें राहेना ॥७४॥

तेवीं अविद्येचें जंव बंधन । तंव वेदाचें वेदविधान ।

अविद्या नाशिलिया जाण । विधीनें तें स्थान सोडिलें ॥७५॥

अविद्या जा‌ऊनि वर्ततां देहीं । देहाचा देहत्वें हेतु नाहीं ।

हें म्हणाल न घडेच कांहीं । ऐक तेंही सांगेन ॥७६॥

स्वप्नींचें देहादि प्रपंचभान । स्वप्नाचमाजीं सत्य जाण ।

जागें होतां तें अकारण । संस्कारें स्वप्न दिसतांही ॥७७॥

स्वप्नीं राज्यपद पावला । कां व्याघ्रमुखीं सांपडला ।

अथवा धनादिलाभ झाला । रत्‍नें पावला अनर्घ्यें ॥७८॥

तेथींचें सुख दुःख हरिख । जागत्यासी नाहीं देख ।

तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे बाधक निजबोधें ॥७९॥

देहीं असोनि विदेहस्थिती । ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती ।

स्वयें सांगेन म्हणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥४८०॥

 

यो जागरे बहिरनुक्षणधर्मिणोऽर्थान्‌ ।

भुङ्क्ते समस्तकरणैहृदि तत्सदृक्षान्‌ ।

स्वप्ने सुषुप्त उपसंहरते स एकः ।

स्मृत्यन्वयात्त्रिगुणवृत्तिदृगिन्द्रियेशः ॥ ३२ ॥

 

तिहीं अवस्थांच्या ठायीं । आत्मा एकचि असे देहीं ।

तोचि देहाच्या ठायीं विदेही । साक्षी पाहीं सर्वांचा ॥८१॥

मी बाळ तोचि झालों तरणा । आतां आलों म्हातारपणा ।

ऐशा वयसांचे साक्षीपणा । आपण आपणा देखतू ॥८२॥

जागृतीसी नाना भोग । सविस्तर भोगी अनेक ।

तेचि स्वप्नामाजीं साङ्ग । निजहृदयीं चांग विस्तारी ॥८३॥

जागृतिभोगाचा संस्कारू । तोचि स्वप्नामाजीं विस्तारू ।

मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ॥८४॥

गज तुरंग खर नर । गिरी दुर्ग पुर नगर ।

विशाळ सरिता समुद्र । वासनेचें वैचित्र्य स्वप्नीं देखे ॥८५॥

नाहीं जागृती नाहीं स्वप्न । अंतःकरणही करोनि लीन ।

सुषुप्तिकाळीं तोचि जाण । अहंकारेंवीण उरलासे ॥८६॥

विश्वाभिमानी इंद्रियवृत्ती । तेणें तो देखतसे जागृतीं ।

तैजस अभिमानी अविद्यावृत्ती । स्वप्नस्थिती तो देखे ॥८७॥

प्राज्ञ अभिमानी मूढवृत्ती । तो देखतसे सुषुप्ती ।

एक आत्मा तिहींप्रती । न घडे निश्चितीं म्हणाल ॥८८॥

तिहीं अवस्थांचे अभिमानी । म्हणाल देखणे भिन्न तिनी ।

तरी एक आत्मा द्रष्टेपणीं । उरला निदानीं तें ऐका ॥८९॥

पहिला जो कां मी जागता । तेणें म्यां देखिली स्वप्नावस्था ।

तोचि मी सुखें निजेला होता । या तिनी अवस्था स्वयें मी जाणें ॥४९०॥

जेणें जे देखिली नाहीं । तो ते अवस्था सांगेल कायी ।

यालागीं तिहीं अवस्थांचे ठायीं । आत्मा पाहीं अनुस्यूत ॥९१॥

जागृतीं इंद्रियां देखणेपण । स्वप्नीं देखणें तें तंव मन ।

सुषुप्ति गाढ मूढ अज्ञान । कैंचें देखणेपण आत्म्यासी ॥९२॥

येही आशंकेचें वचन । ऐका द्विज हो सावधान ।

मन इंद्रियें जडें जाण । देखणेपण त्यां कैंचें ॥९३॥

जो मनाचा चाळकू । जो इंद्रियांचा प्रकाशकू ।

जो सुषुप्तीचा द्योतकू । साक्षित्वें एकू तो आत्मा ॥९४॥

म्हणाल सुषुप्ती आत्मा नाहीं । बोलणें न घडे कांहीं ।

मी सुखें निजेलों होतों पाहीं । हें कोणाचे ठायीं जाणवे ॥९५॥

प्रकृतिकार्याहूनि परता । देहादि अवस्थांतें प्रकाशिता ।

गुण‍इंद्रियांचा नियंता । जाण तत्त्वतां तो आत्मा ॥९६॥

इंद्रियें आत्मा नव्हती हा नेम । त्यांचें सदा एकदेशी कर्म ।

आत्मा सर्वकर्ता सर्वोत्तम । करोनि निष्कर्म सर्वदा ॥९७॥

मन आत्मा नव्हे तें ऐक वर्म । संकल्पविकल्प त्याचें कर्म ।

आत्मा निर्विकल्प निरुपम । विश्रामधाम जगाचें ॥९८॥

जो सुषुप्तिसुखभोगसाक्षी । जो देखणेपणें तिहीं लोकीं ।

तो मी आत्मा गा एकाकी । जाण निष्टंकीं निश्चित ॥९९॥

एवं युक्तीचिया विभागलीला । परमात्मा जो एकू साधिला ।

तो साधकांसी उपयोगा आला । योग सिद्धी नेला तेणें बळें ॥५००॥

 

एवं विमृश्य गुणतो मनसस्त्र्यवस्था ।

मन्मायया मयि कृता इति निश्चितार्थाः ।

सञ्छिद्य हार्दमनुमानसदुक्तितीक्ष्ण ।

ज्ञानासिना भजत माखिलसंशयाधिम्‌ ॥ ३३ ॥

 

म्यां सांगीतल्या ज्या युक्ती । ज्या कां श्रुतिशास्त्रार्थसंमती ।

त्या विचारोनि परमार्थगतीं । संसारगुंतीं उगवावी ॥१॥

संसारगुंतीसी कारण गुण । गुणावस्थीं व्यापिलें मन ।

त्यासी माझी माया मूळ जाण । जिया केलें आवरण माझेंचि ॥२॥

माझी माया माझेनि सबळ । त्या मजचि आवरिलें तत्काळ ।

जैसें डोळ्याचें डोळां जळ । गोठूनि पडळ हो‌ऊनि ठाके ॥३॥

कां पूर्णचंद्र अतिनिर्मळ । तेथ पृथ्वी बिंबली सकळ ।

तेणें सलांछन चंद्रमंडळ । लोक सकळ देखती ॥४॥

पृथ्वीचंद्रासी अंतर । विचारितां दूरांतर ।

मिथ्या बाधिला रजनीकर । ते लोक साचार मानिती ॥५॥

यापरी माया माझ्या ठायीं । आतळली नाहीं कंहीं ।

मिथ्याभासें लोक पाहीं । तिच्याठायीं भूलले ॥६॥

तेणें नाथिली गुणावस्था । अहंकर्तृत्वें घेतली माथां ।

तेणें विषयभोग‍अवस्था । वासनायुक्ता वाढविल्या ॥७॥

एवं उभय देहबंधन । मिथ्या जीवत्वें लागलें जाण ।

त्याचें करावया छेदन । माझ्या युक्ती जाण विवराव्या ॥८॥

करितां युक्तींचें अनुमान । तेणें अनुमानिक होय ज्ञान ।

न तुटे अविद्याबंधन । यालागीं साधुसज्जन सेवावे ॥९॥

साधूंमाजीं साधुत्व पूर्ण । सेवावे सद्‍गुरुचरण ।

तेणें निरसे भवबंधन । साधुसज्जन सद्‍गुरु ॥५१०॥

त्या साधूंचिया सदुक्ती । श्रुत्यर्थें उपदेश करिती ।

तेणें होय ज्ञानखड्ग प्राप्ती । जे बुद्धीच्या हातीं हातवशी ॥११॥

तेंही वैराग्यनैराश्यसाहाणे । लावूनि सतेज शस्त्र करणें ।

धृतीच्या धारणा दृढ धरणें । सावधपणें निःशंक ॥१२॥

शस्त्रासी आणि आपणा । एकपणाची धारणा ।

दृढ साधूनि साधना । देहाभिमाना छेदावें ॥१३॥

जो सकळ संशयाचा कंदू । जेणें देहदुःखाचा उद्‍बोधू ।

ज्याचेनि सदा विषयसंदू । जो कामक्रोधपोषकू ॥१४॥

जो वाढवी तिनी गुण । जो शुद्धासी आणी जीवपण ।

ज्याचेनि जीव जन्ममरण । दुर्निवार जाण लागलें ॥१५॥

जो सकळ अनर्थांचा दाता । ज्याची लडिवाळ कन्या ममता ।

तियेसी वाढवी माया माता । तिच्या सत्ता हा दाटुगा ॥१६॥

तेथें शस्त्राचेनि लखलखाटें । राहोनियां नेटेंपाटें ।

समरांगणीं सुभटें । घावो येणें नेटें हाणावा ॥१७॥

एकेचि घायें जाण । माया ममता अभिमान ।

त्रिपुटीचें होय छेदन । येणें बळें जाण छेदावा ॥१८॥

भोग्य भोगू भोक्ता । कर्म कार्य कर्ता ।

ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी तत्त्वतां छेदावी ॥१९॥

अहं कोहं सोहं स्वभावो । हाही छेदूनि अहंभावो ।

साधकां निजपदीं ठावो । ब्रह्म स्वयमेवो हो‌ऊनि ठेले ॥५२०॥

म्हणाल सांगतां जो प्रकारू । तो शब्दज्ञान वेव्हारू ।

बोलाचा कडकडाट थोरू । कैसेनि अहंकारू मारवे ॥२१॥

शब्दमात्रें अभिमान । जरी पावता निर्दळण ।

तरी कां पां विद्वज्जन । अभिमानमग्न होताती ॥२२॥

अभिमान संमुख दिसता । तरी धांवोनि करूं ये घाता ।

तो अतर्क्य जी सर्वथा । शब्दें अहंता मरेना ॥२३॥

घडे अपरोक्षसाक्षात्कारू । तो शब्दमात्रें नव्हे प्रकारू ।

ऐसा आशंकेचा विचारू । ऐक निर्धारू सांगेन ॥२४॥

जो अनन्यभावें माझें भजन । सर्वदा करी सावधान ।

कां सद्‍गुरूचे श्रीचरण । मद्‍भावें जाण जो सेवी ॥२५॥

मज आणि सद्‍गुरुमूर्ती । भेद नाहीं गा कल्पांतीं ।

येणें अभेदभावें जे भजती । ते ज्ञान पावती सहजचि ॥२६॥

त्यांसी स्वभावें भजनस्थिती । ज्ञानखड्गाची होय प्राप्ती ।

सहजेंचि सांपडे हातीं । ज्या शस्त्रदीप्ति काळू कांपे ॥२७॥

ज्या शस्त्राच्या धाकाभेण । माया ममता अभिमान ।

सांडूनियां जीवपण । समूळ जाण पळालीं ॥२८॥

हाणावया पुरता घावो । अहंममतेसी नाहीं ठावो ।

अविद्येचाही अभावो । आपभयें पहा हो आपणचि ॥२९॥

सद्‍भावें जें माझें भजन । करितां एवढें होय ज्ञान ।

येथ आशंका करील मन । कोठें भजन करावें ॥५३०॥

तुझें स्वरूप अतर्क्य जाण । अतिसूक्ष्म आणि निर्गुण ।

तुज भजावया कवण स्थान । आम्हांसी जाण कळेना ॥३१॥

ऐसें कल्पील जरी मन । तरी ऐक सावधान ।

अतिसुगम भजनस्थान । मी सांगेन तें ऐक ॥३२॥

नुल्लंघितां पर्वतकोटी । न रिघतां गिरिकपाटीं ।

दूरी न करितां आटाटी । जे स्थानीं भेटी सदा माझी ॥३३॥

भजनस्थान निरुपम । जेथ मी वसें पुरुषोत्तम ।

प्राप्तीलागीं अतिसुगम । विश्रामधाम भक्तांचें ॥३४॥

सर्व सुखांचा आराम । निजहृदयीं आत्माराम ।

सर्वदा असे सम । भजावें सप्रेम ते ठायीं ॥३५॥

आदि ब्रह्मा अंतीं मशक । सर्वांचे हृदयीं मीचि एक ।

ऐसें पाहे तो सभाग्य देख । हें भजन चोख मत्प्राप्ती ॥३६॥

ज्या मज हृदयस्थाचे दीप्ति । मनबुद्ध्यादिकें वर्तती ।

ज्या माझिये स्फुरणस्फूर्ती । ज्ञानव्युत्पत्ती पायां लागे ॥३७॥

त्या मज हृदयस्थाच्या ठायीं । भजनशीळ कोणीच नाहीं ।

शिणतां बाह्य उपायीं । जन अपायीं पडताती ॥३८॥

ऐशांत सदैव कोणी एक । निजभाग्यें अत्यंत चोख ।

मज हृदयस्थाचा विवेक । करूनि निष्ठंक मद्‍भजनीं ॥३९॥

करितां हृदयस्थाचें भजन । माझें पावे तो निजज्ञान ।

वैराग्ययुक्त संपूर्ण । जे ज्ञानीं पतन रिघेना ॥५४०॥

ज्या ज्ञानाभेणें जाण । धाकेंचि पळे अभिमान ।

तें मी आपुलें त्यांसी दें ज्ञान । जे हृदयस्थाचें भजन करिती सदा ॥४१॥

ज्या ज्ञानाचिये ज्ञानसिद्धी । अखिल जाती आधिव्याधी ।

संशय पळती त्रिशुद्धी । भक्त निजपदीं पावती ॥४२॥

सबळ बळें सुभटें । शस्त्राचेनि लखलखाटें ।

संशयो छेदावा कडकडाटें । हें म्यां नेटेंपाटें सांगीतलें ॥४३॥

यावरी ऐसें गमेल चित्तीं । संसाराची सत्यप्राप्ती ।

त्यासी शस्त्र घे‌ऊनि हातीं । कोणे युक्तीं छेदावा ॥४४॥

तरी संसार तितुकी भ्रांती । हेंचि सांगावया दृष्टांतीं ।

पुढील श्लोकाची श्लोकोक्ती । स्वयें श्रीपती सांगतू ॥४५॥

 

ईक्षेत विभ्रममिदं मनसो विलासं ।

दृष्टं विनष्टमतिलोलमलातचक्रम्‌ ।

विज्ञानमेकमुरुधेव विभाति माया ।

स्वप्नस्त्रिधा गुणविसर्गकृतो विकल्पः ॥ ३४ ॥

 

देहादि अहंकारपर्यंत । पिंड ब्रह्मांड जें भासत ।

तें मनोमात्र विलसत । मिथ्याभूत संसारु ॥४६॥

जैसें स्वप्नीं निद्रेमाजीं मन । स्वयें देखे त्रिभुवन ।

तैसेंचि हें दीर्घस्वप्न । अविद्या जाण विकाशी ॥४७॥

आन असूनि आन देखती । त्या नांव आभास म्हणती ।

शुक्तिकेमाजीं रजतभ्रांती । दोरातें म्हणती महासर्पू ॥४८॥

सूर्याचे किरण निखळ । ते ठायीं देखती मृगजळ ।

तैशी शुद्ध वस्तू जे केवळ । तो संसार बरळ म्हणताती ॥४९॥

तया आरोपासी अधिष्ठान । मीचि साचार असें आपण ।

जेवीं कां कोलिताचें कांकण । अग्नितेजें जाण आभासे ॥५५०॥

अलातचक्रींचा निर्धार । अग्नि सत्य मिथ्या चक्र ।

तेवीं निर्धारितां संसार । ब्रह्म साचार संसार मिथ्या ॥५१॥

तेथ आधिदैव आधिभौतिक । आध्यात्मादि सकळिक ।

अलातचक्राच्या‌ऐसे देख । त्रिगुणमायिक परिणाम ॥५२॥

कोलिताचेनि भ्रमभासें । भ्रमणबळें तें चक्र दिसे ।

क्षणां दिसे क्षणां नासे । तैसा असे हा संसारू ॥५३॥

जंव भ्रमणाचें दृढपण । तंव कोलिताचें कांकण ।

भ्रम गेलिया जाण । कांकणपण असेना ॥५४॥

तेवीं जंव जंव भ्रम असे । तंव तंव दृढ संसार भासे ।

भ्रम गेलिया अनायासें । संसार नसे पाहतांही ॥५५॥

मी देहो माझें कलत्र पुत्र । हें भ्रमाचें मुख्य सूत्र ।

तें न छेदितां पामर । मुक्ताहंकार मिरविती ॥५६॥

एवं मायामय संसारू । ऐसा जाणोनि निर्धारू ।

तेथील सांडूनि अत्यादरू । उपरमप्रकारू सांगत ॥५७॥

 

दृष्टिं ततः प्रतिनिवर्त्य निवृत्ततृष्णः ।

तूष्णीं भवेन्निजसुखानुभवो निरीहः ।

संदृश्यते क्व च यदीदमवस्तुबुद्ध्या ।

त्यक्तं भ्रमाय न भवेत्‌ स्मृतिरानिपातात्‌ ॥ ३५ ॥

 

पूर्विल्या भजनपरिपाटीं । सहजें निर्मळ झाली दृष्टी ।

मिथ्या सांसारिक त्रिपुटी । हा निर्धार पोटीं दृढ झाला ॥५८॥

तेथें सांसारिक त्रिपुटी । सांडूनि उपरमवितां दृष्टी ।

मज हृदयस्थासी होय भेटी । जेवीं सुवर्णदृष्टीं अळंकारू ॥५९॥

तेथ दृष्य द्रष्टा दर्शन । मोडूनि त्रिपुटीचें भान ।

तेचि धारणा तेंचि ध्यान । तेथ समाधान धरावें ॥५६०॥

तेंचि अंगें व्हावया आपणा । सांडावी सकळ तृष्णा ।

वाचेसी धरावें महामौना । देहचेष्टा जाणा आवराव्या ॥६१॥

सांडावी वेदशास्त्रव्युत्पत्ति वाड । सांडावी वाग्वादबडबड ।

भगवद्‍भावो धरावा दृढ । जेणें आशेचें बूड समूळ छेदे ॥६२॥

काया वाचा आणि मन । दृढ आवरावें आपण ।

तुटों नेदावें अनुसंधान । सदा सावधान निजरूपीं ॥६३॥

ते स्वरूपसुखीं लोधल्या जाण । देहाचें स्फुरेना देहपण ।

अहंकारेंसीं मावळे मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥६४॥

तेथ संमुख ना पाठिमोरें । एकपण ना दुसरें ।

देवो भक्त हेंही नुरे । सुखें सुखभरें सुखरूप ॥६५॥

मी एक सुखरूप आहें । वेगळेपणें ठावें नोहे ।

येणे आत्मानुभवें राहे । एवढी प्राप्ती होये मद्‍भक्तां ॥६६॥

म्हणाल काष्ठाच्या परी त्यासी । पडला असेल अहर्निशीं ।

हेंही न घडे गा तयासी । सांडूनि हेतूसी देहीं वर्ते ॥६७॥

तोही प्रारब्धाचेनि बळें । आहारनिद्रादि खेळेंमेळें ।

देहींचीं कर्में करितां सकळें । सर्वथा नातळे देहबुद्धी ॥६८॥

दंड काढोनि नेलिया कुंभारें । पहिले भवंडीं चक्र फिरे ।

तेवीं प्रारब्धाचेनि संस्कारें । कर्मानुसारें देह वर्ते ॥६९॥

कुलालचक्रीं बैसली माशी । न हालतां भोंवे चक्रासरसी ।

कोटी फेरे म्हणती तिसी । तेवीं मुक्तासी देहकर्में ॥५७०॥

यापरी देहकर्मीं वर्ततां । ज्ञाता न म्हणे अहं कर्ता ।

जेवीं वार्‍याचिया स्वभावता । दिसे चपळता गलितपत्रीं ॥७१॥

जेवीं कां पुरुषासवें छाया असे । परी ते छायेसी पुरुष न बैसे ।

तेवीं ज्ञात्यासवेंही देह दिसे । परी तो देहदोषें मैळेना ॥७२॥

निजछायेसी बैसों जातां । छायाचि पळे तत्त्वतां ।

तेवीं मद्‍भक्तीं माया पाहतां । माया स्वभावतां मिथ्यात्वें पळे ॥७३॥

हो कां मुक्ताफळांची माळा । भ्रमें सर्परूप भासे डोळां ।

तेचि भ्रमांतीं घालितां गळां । नुपजे कंटाळा सर्पभयाचा ॥७४॥

तेवीं अधमोत्तम योनी । कां वंद्यनिंद्य जे जनीं ।

ते मी म्हणतां ज्ञानी । शंका न मानी देहमिथ्यात्वें ॥७५॥

यापरी ते अतिसज्ञान । जाणोनि देहाचें मिथ्याभान ।

देहकर्मीं वर्ततां जाण । देहाचें देहपण स्फुरेना ॥७६॥

तो देहो सर्वांगीं तोडितां । कां वृकव्याघ्रादिकीं फाडितां ।

कां अग्निमाजीं धडाडितां । त्यासी देह‍अहंता स्फुरेना ॥७७॥

आपुली छाया देखिली शूळीं । तीलागीं पुरुष न तळमळी ।

तेवीं देहाची होत होळी । ज्ञाता न डंडळी निजबोधें ॥७८॥

म्हणाल देहसंगें वर्ततां । केवीं बाधीना देह‍अहंता ।

सांडूनि अंगींची क्षारता । लवण वर्ततां उरे कैसें ॥७९॥

हिंग सांडूनि आपुली घाणी । केवीं राहेल सुगंधपणीं ।

निःशेष सांडोनि अंगींचें पाणी । केळी केळीपणें उरे कैंची ॥५८०॥

न झुंझें म्हणोनि रणीं रिघतां । जेवीं कां घाय वाजती माथां ।

तेवीं देहसंगें वर्तता । देह‍अहंता सोडीना ॥८१॥

येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासी देहाचें बाधीना भान ।

तेथें स्फुरे जो अभिमान । तो भर्जित जाण बीज जैसें ॥८२॥

भर्जित बीजें जाण । हों शके क्षुधाहरण ।

परी करितां बीजारोपण । अंकुर जाण त्या नाहीं ॥८३॥

चित्रामाजीं व्याघ्र दिसे । परी बाधकत्व त्यासी नसे ।

तेवीं भर्जित अभिमानशेषें । बाधा नसे ज्ञात्यासी ॥८४॥

चित्रींच्या वाघासी जाण । निःशेष नाहीं व्याघ्रपण ।

तेवीं मुक्तांच्या देहासी जाण । देहपण असेना ॥८५॥

दृढ ठसावल्या चैतन्यघन । स्वरूपीं वृत्ति होय निमग्न ।

तेव्हां दिसे तेंही भर्जित भान । तेंही स्फुरण निमालें ॥८६॥

ऐशी मावळल्या स्मृती । ज्ञात्याची वर्तती स्थिती ।

स्वयें सांगतु श्रीपती । यथानिगुती निजबोधें ॥८७॥

सर्व कर्मी वर्ततां जाण । देहाचें स्फुरेना देहपण ।

तें मुख्य समाधिलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥८८॥

 

देहं च नश्वरमवस्थितमुत्थितं वा ।

सिद्धो न पश्यति यतोऽध्यगमत्‌ स्वरूपम्‌ ।

दैवादपेतमुत दैववशादुपेतं ।

वासो यथा परिकृतं मदिरामदांधः ॥ ३६ ॥

 

जया देहाचेनि मद्‍भजनें । माझें शुद्ध स्वरूप पावणें ।

त्या देहासी विसरिजे तेणें । मी माझेपणें देखेना ॥८९॥

जेवीं कां भाडियाचें घोडें । जेणें आणिलें निजधामा रोकडें ।

तें आहे कीं गेलें कोणीकडे । हें स्मरेना पुढें तो जैसा ॥५९०॥

हो कां भेटावया भ्रतारासी । सवें मजुर आणी विश्वासी ।

ते पतीसीं पहुडल्या राणिवसीं । त्या मजुरासी विसरली ॥९१॥

कां जो दैवयोगें पालखीं चढे । तो पूर्वील तुटके मोचडे ।

आहेत कीं गेले कोणीकडे । हें स्मरेना पुढें तेणें हरिखें ॥९२॥

हो कां बहुकाळें पत्‍नी जैसी । भर्तारू मीनल्या निजसेजेसी ।

ते निःशेष विसरे लाजेसी । देहाची तैसी दशा जाहली ॥९३॥

त्या दांपत्याचे सुखभेटी । पारकें देखतां लाज उठी ।

तेवीं देहाचें भान द्वैतदृष्टीं । मदैक्यपुष्टीं देह कैंचें ॥९४॥

एवं पावोनि माझ्या स्वरूपासी । स्वानंदपूर्ण साधकासी ।

सुखें सुखरूपता जाहली त्यासी । निजदेहासी विसरोनी ॥९५॥

मग उठलें कीं बसलें । चालतें कीं राहिलें ।

जागतें कीं निजलें । हें स्मरण ठेलें देहाचें ॥९६॥

हें धालें कीं भुकेलें । हिंवले कीं तापलें ।

प्यालें कीं तान्हलें । राहिलें उगलें स्मरेना तो ॥९७॥

हें येथें कीं तेथें । मुकें कीं बोलतें ।

होतें कीं नव्हतें । स्मरणसहितें स्मरेना तो ॥९८॥

हें ओंवळें कीं सोंवळें । चोखट कीं मैळें ।

डोळस कीं आंधळें । अंगीं पांगुळलें स्मरेना तो ॥९९॥

हें आलें कीं गेलें । होतें कीं केलें ।

जाहलें कीं मेलें । तटस्थ राहिलें स्मरेना तो ॥६००॥

हें बाळ कीं प्रौढ । मोठें कीं रोड ।

हळू कीं जड । कांहीं सदृढ स्मरेना तो ॥१॥

हें खोटे कीं भुयीं । ठायीं कीं कुठायीं ।

आहे कीं नाहीं । हेंही पाहीं स्मरेना तो ॥२॥

हें मंत्रीं कीं तंत्रीं । तीर्थीं कीं क्षेत्रीं ।

विष्ठीं कीं मूत्रीं । आहे पवित्रीं स्मरेना तो ॥३॥

जनीं कीं वनीं । अथवा निरंजनीं ।

जपीं कीं ध्यानीं । हेंही मनीं स्मरेना तो ॥४॥

हें सुजनीं कीं दुर्जनीं । बंदी कीं विमानीं ।

मंदिरीं कीं मसणीं । पाहती कोणी स्मरेना तो ॥५॥

हें गजीं कीं तुरगीं । कीं अंगनासंभोगीं ।

खरीं कीं उरगीं । अंगीच्या अंगीं स्मरेना तो ॥६॥

हें काशीं कीं कैकटीं । नरकीं कीं वैकुंठीं ।

घरी कीं कपाटीं । राहिलें नेहटी स्मरेना तो ॥७॥

हें पूजिलें कीं गांजिलें । धरिलें कीं मारिलें ।

देहाचें येकही केलें । अथवा काय झालें स्मरेना तो ॥८॥

मी शेषशयनावरी । कीं मातंगाच्या घरीं ।

कीं बैसलों शूळावरी । हेंही न स्मरी सहसा तो ॥९॥

ऐशी ज्ञात्याची निरभिमानता । माझेनि न सांगवे तत्त्वतां ।

जे पावले माझी सायुज्यता । त्यांची कथा न बोलवे ॥६१०॥

जेथ वेदां मौन पडे । स्वरवर्णेंसीं वाचा बुडे ।

त्या संतांचे पवाडे । माझेनिही निवाडे न सांगवती ॥११॥

ऐकोनि सज्ञानाची स्थिती । तुम्हांसी गमेल ऐसें चित्तीं ।

केवळ जड मूढ झाली प्राप्ती । एकही स्फूर्ती स्फुरेना ॥१२॥

जेवीं कां केवळ पाषाण । तैसें झालें अंतःकरण ।

एकही स्फुरेना स्फुरण । ज्ञातेपण घडे कैसें ॥१३॥

ऐशी धरिल्या आशंका । तेविषयीं सावध ऐका ।

ज्ञान‍अज्ञानभूमिका । अतर्क्य लोकां निश्चित ॥१४॥

केवळ जें शुद्ध ज्ञान । आणि जडमूढ अज्ञान ।

दोहींची दशा समान । तेथीलही खूण मी जाणें ॥१५॥

निबिड दाटला अंधकारू । त्यामाजीं काजळाचा डोंगरू ।

तेथ आंधळा आला विभाग करूं । तैसा व्यवहारू अज्ञाना ॥१६॥

शोधावया अध्यात्मग्रंथ भले । अंधमूकाहातीं दीधले ।

तें ऐके देखे ना बोले । तैसें जडत्वें झालें अज्ञान ॥१७॥

ऐशी अज्ञानाची गती । ऐका सज्ञानाची स्थिती ।

अपरोक्षसाक्षात्कारप्रतीती । देहीं वर्तती विदेहत्वें ॥१८॥

जेवीं कां रत्‍नें आणि गारा । दोहींचा सारिखा उभारा ।

मोल वेंचूनि नेती हिरा । फुकट गारा न घेती ॥१९॥

जैसें कण आणि फलकट । दोहींसी वाढी एकवाट ।

तैसें ज्ञानाज्ञान निकट । दिसे समसकट सारिखें ॥६२०॥

जेवीं कां खरें कुडें नाणें । पाहतां दिसे सारिखेपणें ।

खरें पारखोनि घेती देखणे । मूर्खीं नाडणें ते ठायीं ॥२१॥

तेवीं ज्ञानाज्ञानाची पेंठ । भेसळली दिसे एकवट ।

तेथ अणुभरी चुकल्या वाट । पाखंड उद्‍भट अंगीं वाजे ॥२२॥

यालागीं मद्‍भक्तीपाशीं आले । जे माझ्या विश्वासा टेंकले ।

त्यांसी म्यां निजरूप आपुलें । खरें दीधलें अतिशुद्ध ॥२३॥

माझ्या नामविश्वासासाठी । प्रल्हाद द्वंद्वें पायें पिटी ।

न घेतां मुक्ती लागे पाठीं । विश्वासें भेटी माझ्या रूपीं ॥२४॥

पावोनि माझ्या निजस्वरूपेसी । तेंचि ते झालें मद्‍भवेंसीं ।

जेवीं लवण मीनल्या जळासी । लवणपणासी मूकलें ॥२५॥

तेथ मी एक लवण । हेही विराली आठवण ।

स्वयें समुद्र झालें जाण । तेवीं सज्ञान मद्‌रूपें ॥२६॥

ऐसें पावोनि माझ्या स्वरूपासी । विसरले देह‍अभिमानासी ।

झाले चैतन्यघन सर्वांशीं । आनंदसमरसीं निमग्न ॥२७॥

जेवीं दोरीं सर्पू उपजला । नांदोनि स्वयें निमाला ।

तो दोरें नाहीं देखिला । तैसा झाला देहभावो मुक्तां ॥२८॥

तेव्हां मी तूं हे आठवण । आठवितें आहे कोण ।

विसरोनि गेलें अंतःकरण । आपण्या आपण विसरला ॥२९॥

तेथ कैंचा स्वर्ग कैंचा नरक । कैंचें चोख कैंचें वोख ।

कैंचे चतुर्दश लोक । ब्रह्म एक एकलें ॥६३०॥

कैंचें पवित्र कैंचें अपवित्र । कैचें तीर्थ कैंचें क्षेत्र ।

कैचा वेदू कैंचें शास्त्र । ब्रह्म स्वतंत्र अद्वय ॥३१॥

तेथ कैंचा उत्पत्तिविनाशू । कैंचा वैकुंठ कैलासू ।

कैंचा ब्रह्मा विष्णु महेशू । एक अविनाशू उरलासे ॥३२॥

तेथ कैंचा बोधू कैंची बुद्धी । देवपण बुडालें त्रिशुद्धी ।

लाजा निमाली मोक्षसिद्धी । कैंचा क्षीराब्धिशेषशायी ॥३३॥

तेथ माझीही भगवंतता । हारपोनि जाय तत्त्वतां ।

प्रणवाचा बुडाला माथा । ऐशी सायुज्यता पावले ॥३४॥

यालागीं देहाचें केलें ठेलें । अथवा आलें कां गेलें ।

हें स्फुरेना जें बोलिलें । ते विशद केलें या रीती ॥३५॥

अविद्या कारण देह कार्य । ते अविद्या नासोनि जाये ।

कारण नासल्या कार्य राहे । हें न घडे पाहें म्हणाल ॥३६॥

वृक्ष समूळीं उपडिला जाये । सार्द्रता तत्काळ न जाये ।

पत्र पुष्प फळ सार्द्र राहे । शुष्क होये अतिकाळें ॥३७॥

तेवीं अविद्या नासोनि जाये । भोगानुरूप दैव जें राहे ।

तेणें ज्ञाता वर्तताहे । निजदेहीं पाहे विदेहत्वें ॥३८॥

म्हणाल वाढवितां वाडेंकोडें । प्रतिपाळितां सुरवाडें ।

राखतराखतां देह पडे । प्रत्यक्ष रोकडें दिसताहे ॥३९॥

ज्याचें देह त्यासी दृढ नव्हे । तरी तें तत्काळचि पडावें ।

वांचलें असे कोणे भावें । ऐसें कांहीं जीवें कल्पाल ॥६४०॥

ज्याचें देह तो न पुसे त्यातें । तरी तें देह केवीं कर्मीं वर्ते ।

ऐशी आशंका तुम्हांतें । ऐका सावचित्तें सांगेन ॥४१॥

देहाचें उत्पत्तिस्थितिनिदान । पुरुषासी वश्य नव्हे जाण ।

त्यासी अदृष्टचि प्रमाण । दैवयोगें चळण देहाचें ॥४२॥

उठणें कां बैसणें । तें देहासी दैवगुणें ।

अदृष्टगतीं देणें घेणें । खाणें जेवणें अदृष्टें ॥४३॥

स्वदेशीं कां परदेशीं । अदृष्ट नेतसे देहासी ।

स्वर्गनरकभोगासी । अदृष्ट देहासी उपजवी ॥४४॥

यश लाभ हानि मृत्यु । देहासी अदृष्टें असे होतू ।

ज्ञाता देहासी अलिप्तू । जैसा घटांतू चंद्रमा ॥४५॥

जैशी छाया पुरुषासरसी । तैशी काया सज्ञानासी ।

ते राहिली अदृष्टापाशीं । निजकर्मासी भोगावया ॥४६॥

जन्मोनि छाया सरसी वाढे । माझी ऐशी अहंता न चढे ।

तैसेंच देह ज्ञात्याकडे । मी म्हणोनि पुढें येवों न शके ॥४७॥

सदा छाया सरिसी असे । परी कोठें असे कोठें नसे ।

हें ज्याची तो न पुसे । देहाचें तैसें वर्तन झालें ॥४८॥

छाया विष्ठेवरी पडे । कां पालखीमाजीं चढे ।

पुरुषासी सुखदुःख न जोडे । ज्ञात्यासी तेणें पाडें देहभोग ॥४९॥

येथवरी निजदेहासी । कैसेन विसर पडिला त्यासी ।

ऐक त्याही अभिप्रायासी । दृष्टांतेंसीं सांगेन ॥६५०॥

जो मोलें मदिरा पिवोनि ठाये । तो तेणें मदें नाचे गाये ।

देहवंत देह विसरोनि जाये । वस्त्र नाहीं आहे स्मरेना ॥५१॥

हा तंव ब्रह्मरस प्याला । परमानंदें तृप्त झाला ।

देहो झाला कीं मेला । आठवू ठेला तेणें मदें ॥५२॥

एवं देहाचें भरण पोषण । जन्म अथवा मरण ।

तें दैवयोगें जाण । तेंचि निरूपण हंस बोले ॥५३॥

 

देहोऽपि दैववशगः खलु कर्म यावत्‌ ।

स्वारंभकं प्रतिसमीक्षत एव सासुः ।

तं सप्रपञ्चमधिरूढसमाधियोगः ।

स्वाप्नं पुनर्न भजते प्रतिबुद्धवस्तुः ॥ ३७ ॥

 

जितुकें देहाचें वर्तन । तितुकें अदृष्टास्तव जाण ।

अज्ञानासी देहाभिमान । त्यातें सज्ञान न धरिती ॥५४॥

जैसें अदृष्ट पूर्वस्थित । तैसा देह उपजे येथ ।

सावेव प्राणेंसहित । ऐसें वर्तत जंव दैवें ॥५५॥

म्हणाल दैवयोगें देहीं असतां । अवश्य वाढेल देह‍अहंता ।

जेवीं एकत्र गमनें मार्गस्थां । येरयेरांच्या व्यथा भोगिती ॥५६॥

लवणाच्या मिळणीं पाणी । हो‌ऊनि ठाके खारवणी ।

तेवीं ज्ञाताही देहाचे मिळणीं । देहाभिमानी हो‌ईल ॥५७॥

जेवीं लोहसंगाचिये प्राप्ती । दुर्धर अग्नि घण वरी घेती ।

तेवीं देहाचिया संगती । ज्ञाते भोगिती सुखदुःखें ॥५८॥

ऐसा कल्पाल अभिप्रावो । तो सज्ञानासी न घडे भावो ।

तिंहीं निवटूनियां अहंभावो । चिदानंदें पहा हो समाधिस्थ ॥५९॥

’अधिरूढसमाधियोग’ । हें मूळींचें पद अभंग ।

येणें समाधि अतिनिर्व्यंग । साधिली चांग निजबोधें ॥६६०॥

तरी समाधी ते कैशी असे । तटस्थ काष्ठाचेपरी दिसे ।

कां समाधिस्थ केवळ पिसें । अथवा असे सज्ञान ॥६१॥

ते सामाधीचीं लक्षणें । ऐक सांगेन संपूर्णें ।

देहीं असोनि देहबंधनें । नाहीं अडकणें सज्ञाना ॥६२॥

केवळ ताटस्था नांव समाधी । म्हणतां ज्ञात्याची ठकली बुद्धी ।

ते समाधि नव्हे त्रिशुद्धी । मूर्च्छित ते संधी असे वृत्ती ॥६३॥

निरभिमान निरवधी । त्या नांव अखंडसमाधी ।

परी काष्ठांतें त्रिशुद्धी । नव्हे समाधी सर्वथा ॥६४॥

ताटस्थ्यचि समाधि साचें । जे मानिती त्यांसी स्वरूपाचें ।

ज्ञान नाहीं निश्चयाचें । अनुमानाचें बोलणें ॥६५॥

प्रचंड आघाताच्या भुली । तत्काळ तटस्थता बाणली ।

तरी काय तेणें झाली । सत्यचि भली समाधि त्यासी ॥६६॥

ओंवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादितां ।

वायु स्तंभविला अवचितां । तेणें तटस्थता बहुकाळ ॥६७॥

परी वासना जंव उरली आहे । तंव समाधि कैसेनि हों लाहे ।

सावध होतांचि म्हणे काये । ये दात्याचे रायें उचित द्यावें ॥६८॥

सर्व संकल्पांची अवधी । त्या नांव निर्विकल्प समाधी ।

सकळ शास्त्र हेंचि प्रतिपादी । समाधि त्रिशुद्धी त्या नांव ॥६९॥

सापु आल्या शेळीप्रती । तटस्थ होय सकळवृत्ती ।

तैशी झालिया ताटस्थस्थिती । नव्हे निश्चितीं ते समाधी ॥६७०॥

अकस्मात अवचितां । दिव्य स्वरूप देखतां ।

आश्चर्यें झाली तटस्थता । तेथ जाणावी तत्त्वतां वृत्ति आहे ॥७१॥

स्वस्वरूप देखतां प्रथमदृष्टीं । न संवरतु विस्मयो उठी ।

तोही जिरवूनियां पोटीं । दशा जे उठी ते समाधी ॥७२॥

निःशेष कल्पना जेथ विरे । तेथ विस्मयो कोठें स्फुरे ।

सूक्ष्म कल्पना थावरे । तेणें वोसरे विस्मयो ॥७३॥

जेथ साचार ब्रह्मप्राप्ती होये । तेथें देहचि स्फुरों न लाहे ।

तेव्हां तटस्थ कीं चालताहे । हें देखणें होये पुढिलांचें ॥७४॥

एवं देहचि जेथ मिथ्यापणें । त्याचीं कवण लक्षी लक्षणें ।

हो कां मृगजळींचेनि नाहाणें । जेवीं कां निवणें सज्ञानीं ॥७५॥

मिथ्यादेहासी तटस्थता । झाल्या मानावी समाध्यवस्था ।

ऐशीं लक्षणें सत्य मानितां । ठकले तत्त्वतां परीक्षक ॥७६॥

हो कां स्वप्नींचे सज्ञानासी । ताटस्थ्यमुद्रा लागल्या त्यासी ।

जरी मान्य झाल्या स्वप्नींच्यासी । तरी जागृतीसी नाहीं आला ॥७७॥

हो कां स्वप्नींच्या लोकांप्रती । थोर झाली समाधीची ख्याती ।

तरी नाहीं आला तो जागृती । जाणावा निश्चितीं निद्रितू ॥७८॥

तेवीं ताटस्थ्या नांव समाधी । ते अविद्या स्वप्नमूर्च्छासिद्धी ।

परी स्वस्वरूपप्रबोधीं । जागा त्रिशुद्धी नाहीं झाला ॥७९॥

तो जागा हो‌ऊनि स्वप्न पाहे । तें मिथ्यात्वें देखताहे ।

त्यांतु आपुला देहो सत्य काये । मा ताटस्थ्य राहे ते ठायीं ॥६८०॥

जो जागा हो‌ऊनि तत्त्वतां । स्वप्नदेहासी तटस्थता ।

साक्षेपपूर्वक लावूं जातां । लाजे परी अधिकता दशा न मनीं ॥८१॥

जो जागा हो‌ऊनि स्वप्न सांगे । तें मिथ्यापणेंचि अवघें ।

परी सत्यसत्त्वाचेनि पांगें । कदा निजांगें नातळे ॥८२॥

तैशी साचार वस्तुप्राप्ती । तो नातळे देहस्थिती ।

तरी देह वर्ते कोणे रीती । तो प्रारब्धगतीचेनि शेषें ॥८३॥

स्थंडिलीं अग्नि विझोनि जाये । तरी भूमिये उष्णता राहे ।

कर्पूर सरल्याही पाहें । सुवासु आहे ते देशीं ॥८४॥

पाळणा हालवितां वोसरे । तरी तो हाले पूर्वसंस्कारे ।

तेवीं अविधानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८५॥

लक्ष्य भेदोनियां तीरें । बळें चालिजे पुढारें ।

तेवीं अविद्यानाशें प्रारब्ध उरे । तेणें देहो वावरे मुक्तांचा ॥८६॥

शरीराचेनि छाया चळे । परी शरीर छायेवेगळें ।

तेवीं देह मिथ्या मुक्ताजवळें । चळे वळे प्रारब्धें ॥८७॥

हेतुवीण अनायासें । पुरुषासवें छाया असे ।

तेवीं सज्ञानासरिसें । देह दिसे मिथ्यात्वें ॥८८॥

जैसें गलित पत्र वारेनि चळे । तैसें देह वर्ते प्राचीन मेळें ।

परी देहकर्माचेनि विटाळें । ज्ञाता न मैळे निजबोधें ॥८९॥

त्या प्रारब्धाच्या पोटीं । सांगो सकळ जगेंसीं गोठी ।

कां धरोनि मौनाची मिठी । गिरिकपाटीं पडो सुखें ॥६९०॥

तो आचरो सकळ कर्में । अथवा पिसा हो कां निजभ्रमें ।

तेणें तेणें अनुक्रमे । जाण परिणामें प्रारब्धें ॥९१॥

तो चढो पालखीं गजस्कंधीं । कां पडो विष्ठामूत्रसंधीं ।

ते ते प्रारब्धाची सिद्धी । जाण त्रिशुद्धी ज्ञात्यासी ॥९२॥

जेथ बाध्यबाधकता फिटली । सकळ अहं अविद्या तुटली ।

सहज समाधी त्या नांव झाली । हे संख्या केली सिद्धांतीं ॥९३॥

ऐशी जे सैर समाधि‌अवस्था । तोचि भोग भोगोनि अभोक्ता ।

कर्में करोनि अकर्ता । जाण तत्त्वतां तो एक ॥९४॥

तो क्रियाकारणसंयोगें । डुलत देखिजे विषयभोगें ।

परी समाधिमुद्रा न भंगे । भोगसंगें अलिप्त ॥९५॥

त्यासी स्त्री म्हणे माझा भर्ता । पुत्र म्हणे माझा पिता ।

शिष्य म्हणे स्वामी तत्त्वतां । त्यांहूनि परता त्यांमाजीं वर्ते ॥९६॥

हो कां काष्ठास्तव उत्पत्ती । काष्ठावरी ज्याची स्थिती ।

तो आकळितां काष्ठीं बहुतीं । नावरे निश्चितीं अग्नि जैसा ॥९७॥

फुंकितां लखलखिला । जो फुंकास्तव प्रकटला ।

तो फुंक न साहतां ठेला । निर्वातींचा संचला दीप जैसा ॥९८॥

तेवीं कर्मास्तव उत्पत्ती । कर्मेंचि झाली परब्रह्मप्राप्ती ।

त्या कर्मामाजीं वर्तती । निष्कर्मस्थिती महायोगी ॥९९॥

तो व्यवहारी दिसो जनीं । कीं पिसेपणीं नाचो वनीं ।

अथवा तटस्थ राहो विजनीं । दशा अधिक‍उणी बोलूं नये ॥७००॥

जें सिंहासनीं राजत्व जोडे । तें वनांत खेळतां न मोडे ।

कीं धांवतां व्याहाळीपुढें । राजपद चोखडें ढळूं नेणे ॥१॥

रावो रानीं वसिन्नला । त्या रानासी राजभोग आला ।

रावो राजत्वा मुकला । मूर्खही या बोला न बोलती ॥२॥

तेवीं पावोनि स्वरूपप्राप्ती । योगी प्रारब्धाच्या स्थिती ।

नाना कर्में करितां दिसती । परी निजात्मस्थिती भंगेना ॥३॥

यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोहीं अवस्थांचें लक्षण ।

अपक्वासीचि घडे जाण । परिपूर्णासी लक्षण तें कैंचें ॥४॥

स्वरूपावेगळें कांहीं एक । पूर्णासी उरलें नाहीं देख ।

समाधिव्युत्थानाचें मुख । त्यासंमुख येवों लाजे ॥५॥

अर्जुना देवोनि समाधि । सवेंचि घातला महायुद्धीं ।

परी कृष्ण कृपानिधी । तटस्थ त्रिशुद्धी न करीच ॥६॥

यालागीं समाधिव्युत्थानविधी । ताटस्थ्येंसहित निरवधी ।

गिळूनि झाली सैर समाधी । पूर्ण निजपदीं विलसतां ॥७॥

एवं प्रारब्ध जंव असे । तंव मुक्ताचें देह वर्ते ऐसें ।

परी अहंममतेचें पिसें । पूर्विल्या‌ऐसें बाधीना ॥८॥

जेवीं स्वप्नदेहाच्या नाना अवस्था । जागृतीं आलिया तत्त्वतां ।

पुरुष नेघे आपुले माथां । तेवीं समाधिस्था देहकर्में ॥९॥

हेचि परमार्थता ब्रह्मस्थिती । नाना परींच्या उपपत्ती ।

म्यां सांगीतल्या तुम्हांप्रती । ज्ञानसंपत्ती निजगुह्य ॥७१०॥

तूं कोण हें पुसिलें होतें । सांगावया तें सनकादिकांतें ।

सांगतसें निजरूपातें । विश्वास त्यातें दृढ व्हावया ॥११॥

 

मयैतदुक्तं वो विप्रा गुह्यं यत्‌ साङ्ख्ययोगयोः ।

जानीत माऽऽगतं यज्ञं युष्मद्‌ धर्मविवक्षया ॥ ३८ ॥

 

अतिगुह्य ज्ञान परात्पर । जें उपनिषदांचें भांडार ।

म्यां सांगितलें साचार । योगसार योग्यांचें ॥१२॥

ज्या ज्ञानालागीं साधनकोटी । मुमुक्षु करिती हटतटीं ।

योगी रिघोनि गिरिकपाटीं । महामुद्रा नेहटीं साधिती ॥१३॥

वेदशास्त्रांचिया युक्ती । थोंटावल्या जिये अर्थीं ।

तें निजज्ञान म्यां तुम्हांप्रती । यथानिगुती सांगीतलें ॥१४॥

एवढिया ज्ञानाचा ज्ञानवक्ता । मी कोण हें न कळेल सर्वथा ।

तरी यज्ञाचा यज्ञभोक्ता । जाण तत्त्वतां मी विष्णू ॥१५॥

मज यावया हेंचि कारण । तुम्हीं ब्रह्मयाप्रती केला प्रश्न ।

तें उपदेशावया ब्रह्मज्ञान । स्वयें आपण येथें आलों ॥१६॥

ज्या उपदेशाच्या पोटीं । वर्णाश्रमपरिपाटी ।

न सांडितां होय माझी भेटी । तेही गोष्टी ध्वनिलीसे ॥१७॥

सांडावें ब्राह्मणपण । मग मांडावें संन्यासग्रहण ।

हे दोनी धर्म देहींचे जाण । उपदेशीं देहपण मुख्यत्वें मिथ्या ॥१८॥

उपदेशू करूनि प्रमाण । सनकादिकीं ब्राह्मणपण ।

अद्यापि सांडिलें नाहीं जाण । माझें गुह्य ज्ञान पावले ॥१९॥

तेणेंचि उपदेशें निश्चित । नारद ब्राह्मणपणें वर्तत ।

ब्रह्मानंदें डुल्लत । गात नाचत निजबोधें ॥७२०॥

ऐसें जें चैतन्यघन । आपुलें स्वरूप आपण ।

स्वयें करिताहे स्तवन । निजमहिमान द्योतावया ॥२१॥

 

अहं योगस्य साङ्ख्यस्य सत्यस्यर्तस्य तेजसः ।

परायणं द्विजश्रेष्ठाः श्रियः कीर्तेर्दमस्य च ॥ ३९ ॥

 

सांख्य जें परम ज्ञान । योग अष्टांगादिसाधन ।

सत्याचें सत्यपण । सत्यस्वरूप जाण मी एक ॥२२॥

पहां पां ज्या सत्याच्या ठायीं । संत सद्धर्में राहिले पाहीं ।

सूनृत जे वाचा तेही । मजवेगळी कांहीं हों नेणे ॥२३॥

तेजाची जे प्रगल्भता । ते माझेनि तेजें सतेजता ।

श्रियेची जे ऐश्वर्यता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२४॥

कीर्ति माझेनि कीर्तनें । सदा वंदिजे साधुजनें ।

मजवेगळें कीर्तीचें जिणें । कोणी पोसणें न घेती ॥२५॥

माझेनि तेजें निग्रहता । निग्रहो करी समस्तां ।

अदम्या दमू दमिता । जाण तत्त्वतां माझेनि ॥२६॥

येथ ध्येय आणि ध्यान । कां साध्य आणि साधन ।

या अवघियां मी अधिष्ठान । मजवेगळें भान यां कैंचें ॥२७॥

तुम्ही ब्राह्मण अतिश्रेष्ठ । मजही पूज्यपणें वरिष्ठ ।

यालागीं निजज्ञान चोखट । तुम्हांसी म्यां प्रकट सांगीतलें ॥२८॥

 

मां भजन्ति गुणाः सर्वे निर्गुणं निरपेक्षकम्‌ ।

सुहृदं प्रियमात्मानं साम्यासङ्गादयोऽगुणाः ॥ ४० ॥

 

मी वस्तुतां निरपेक्ष निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण ।

सहृद आत्मा प्रिय जाण । ऐसें लक्षण मज करिती ॥२९॥

समता आणि असंगता । याही गुणांच्या अवस्था ।

आणूनि ठेविती माझ्या माथां । गुणस्वभावतां लक्षणें ॥७३०॥

हो कां सबळ बळें अंधकार । कैं युद्धा आला सूर्यासमोर ।

तरी तमारी हा बडिवार । सूर्या आंधार जेवीं देत ॥३१॥

कोणें धरोनियां आकाश । घटीं घातलें सावकाश ।

तरी घटयोगें घटाकाश । मिथ्या गगनास नांव आलें ॥३२॥

नाहीं घटासी आतळला । गगनींचा गगनींच संचला ।

तो घटें घटचंद्रमा केला । मूर्खासी मानला सत्यत्वें ॥३३॥

तेवीं मी केवळ निर्गुण । त्या माझ्या ठायीं भजोनि गुण ।

सुहृद आत्मा इत्यादि जाण । असंगादि लक्षण मज देती ॥३४॥

गुणासी मी नातळें जरी । तरी मज म्हणती लीलाधारी ।

एवं गुणचि गुणांमाझारीं । मिथ्या मजवरी आळ हा ॥३५॥

तेथ मी घेता ना देता । कर्ता ना करविता ।

हे माझी निजस्वभावता । येर ते अवस्था गुणांची ॥३६॥

एवं पूर्वापर अतिविचित्र । सांगोनि ज्ञानविज्ञाननिर्धार ।

त्या इतिहासाचा उपसंहार । स्वयें सारंगधर करीतसे ॥३७॥

 

इति मे छिन्नसंदेहा मुनयः सनकादयः ।

सभाजयित्वा परया भक्त्यागृणत संस्तवैः ॥ ४१ ॥

 

आत्मज्ञानी परम दक्ष । मुमुक्षुंमाजीं अतिनेटक ।

संदेहापन्न सनकादिक । म्यां यापरी देख निःसंदेह केले ॥३८॥

सदा सावधानें निर्मळ । माझ्या भजनीं अतिप्रेमळ ।

सदा मद्‌रूपें मननशीळ । अव्याकुळ श्रवणार्थी ॥३९॥

उद्धवा तिंहीं ऐकतां माझी गोष्टी । माझ्या स्वरूपीं घातली मिठी ।

मद्‌रूप झाले उठा‌उठी । बाप जगजेठी ब्रह्मपुत्र ॥७४०॥

तिंहीं दृश्य द्रष्टा दर्शन । त्रिपटीचें केलें शून्य ।

परब्रह्मचि झाले पूर्ण । माझेनि जाण उपदेशें ॥४१॥

परम पावले समाधान । गद्यपद्यादि सुलक्षण ।

माझें करोनियां स्तवन । पूजाविधान मांडिलें ॥४२॥

 

तैरहं पूजितः सम्यक्‌ संस्तुतः परमर्षिभिः ।

प्रत्येयाय स्वकं धाम पश्यतः परमेष्ठिनः ॥ ४२ ॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥

 

जरी पूज्यपूजकता गेली । तरी तिंहीं गुरूची पूजा केली ।

सांडूनि द्वैताची भुली । पूजा मांडिली अतिप्रीतीं ॥४३॥

शिष्य झालियाही ब्रह्मसंपन्न । त्याहीवरी त्यासी गुरु पूज्य जाण ।

सद्‍गुरु तोचि ब्रह्म पूर्ण । हे पावली खूण सनकादिकां ॥४४॥

ज्याच्या बोलासरिसेंचि पाहें । अवघें ब्रह्मचि हो‌ऊनि ठाये ।

त्या सद्‍गुरूचे पूज्य पायें । सांगूं काये बोलवरी ॥४५॥

ज्यासी परब्रह्म आलें हाता । तोचि जाणे सद्‍गुरूची पूज्यता ।

इतरांसी हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी ॥४६॥

ते सनकादिक समस्त । माझी पूजा करोनि यथोक्त ।

वारंवार स्तवन करीत । चरणा लागत पुनःपुनः ॥४७॥

माझ्या भजनीं एकमुख । माझिया निजभावें अतिभाविक ।

मज अवाप्तकामासी सुख । त्यांचे पूजनीं देख उथळलें ॥४८॥

मग करूनि प्रदक्षिणा । ते लागले माझिया चरणा ।

परम सुख झालें ब्राह्मणां । वचनार्थें जाणा माझेनी ॥४९॥

पहात असतां प्रजापती । सनकादिक उभे असती ।

त्यांदेखतां निजधामाप्रती । शीघ्रगती मी आलों ॥७५०॥

माझे शिष्य सनकादिक । उद्धवा या रीतीं झाले देख ।

तो इतिहास अलोलिक । तुज म्यां सम्यक सांगीतला ॥५१॥

ते योगियांमाजीं अति‌उद्‍भट । भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ ।

ज्ञानियांमाजीं अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक ॥५२॥

हंसगीतनिरूपण । पुरातन जें ब्रह्मज्ञान ।

तें उद्धवासी श्रीकृष्ण । प्रसन्न हो‌ऊन दीधलें ॥५३॥

भागवतपंथें चालतां । हे पुरातन ब्रह्मकथा ।

एका एकादशू पाहतां । स्वभावें हाता पैं आली ॥५४॥

जीं हंसमुखींचीं चिद्रत्‍नें । जीं सनकादिकां झालीं भूषणें ।

उद्धवा अळंकारिला श्रीकृष्णें । तें शेष जनार्दनें मज दीधलें ॥५५॥

सनकादिक-उद्धवाचें शेष । हाता आलें हा बोल वोस ।

ते गोष्टीसी जाहले बहु दिवस । म्हणाल वायस हा जल्पू ॥५६॥

कृतयुगीं शंखासुरासी । देवें मर्दिलें होतें त्यासी ।

ते ठायीं अद्यापि सभाग्यासी । अव्हाशंखासी पावती ॥५७॥

रामें पूर्वीं अयोध्येसी । केलें होतें महायागासी ।

तेथें हविःशेष लोकांसी । अद्याप हातासी येतसे ॥५८॥

तैसेंचि येथें भागवतीं । जनार्दनकृपापद्धतीं ।

सनकादिकांची शेषप्राप्ती । एकादशार्थीं आम्हां झाली ॥५९॥

मागेंपुढें अवघें एक । हा एकादशाचा विवेक ।

तेणें सनकादिक -उद्धवशेख । आम्हांम्ही देख प्राप्त झालें ॥७६०॥

करूं नेदितां गयावर्जनीं । न रिघवे समर्थजनीं ।

ते पदीं माशीलालागुनी । निवारण कोणी करीना ॥६१॥

तेवीं नाना शास्त्रार्थयुक्तींसी । शिणतां समर्थ साधकांसी ।

प्राप्ती नव्हे ज्ञानशेषासी । ते झाली आम्हांसी एकादशें ॥६२॥

हंसकृष्ण जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न ।

तेणें घालूनि बोधांजन । जुना ठेवा जाण दाखविला ॥६३॥

तेथ मी एका एकू देखता । आणि तो एकू मातें दाखविता ।

हेही नुरेचि बोध्यबोधकता । पाहता पाहविता तोचि तो ॥६४॥

आरसा आलिया मुख दिसे । तो गेलिया तें न दिसे ।

परी येणें जाणें मुखासी नसे । ते सहजेंचि असे संचलें ॥६५॥

आरिशाचें मुख आरिसें नेलें । परी पाहातया नाहीं ऐसें झालें ।

जें कटकटा माझें मुख गेलें । तें असे संचलें तो जाणे ॥६६॥

तेवीं अज्ञानें न्यावें । कां ज्ञान झालिया यावें ।

तैसें वस्तूसी न संभवे । तें असे स्वभावें संचलें ॥६७॥

तैसें देखतें आणि दाखवितें । दोनी जा‌ऊनियां तेथें ।

माझें मीपण जें जुनें होतें । तें दाविलें मातें जनार्दनें ॥६८॥

जेवीं सूर्याचेनि प्रकाशें । सूर्येंचि कीं सूर्यो दिसे ।

तेवीं माझेनि निजप्रकाशें । मज मीचि असें देखत ॥६९॥

ऐशियाही ठायीं जाण । कैंचें नवें जुनें ज्ञान ।

बहु काळ ठेविलें सुवर्ण । त्यासी म्हणे कोण कुहजकू ॥७७०॥

कालचाचि आजि उगवला । तो सूर्य काय म्हणावा शिळा ।

कीं आजिचा अग्नि सोंवळा । कालचा काय वोंवळा म्हणों ये ॥७१॥

तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान । तेंचि मराठीभाषेमाजीं जाण ।

येथें ठेवूं जातां दूषण । दोषी आपण हो‌इजे ॥७२॥

कां सुवर्णाचें केलें सुणें । परी तें मोलें नव्हेचि उणें ।

तेवीं सनकादिकांचीं ज्ञानें । देशभाषा हीनें नव्हतीच ॥७३॥

जेवीं कां गुळाचें कारलें केलें । परी तें कडूपणा नाहीं आलें ।

तेवीं हंसगीत मराठें झालें । नाहीं पालटलें चिन्मात्र ॥७४॥

जें मोल मुकुटींच्या हेमासी । तेंचि मोल सुवर्णश्वानासी ।

जो कां ग्राहिक सुवर्णासी । तो घे दोघांसी समत्वें ॥७५॥

तैसें आत्मानुभवी जे येथें । ते मानितील या ग्रंथातें ।

येर ते हेळसितील यातें । निजभावार्थें न घेती ॥७६॥

जे वंदिती कां निंदिती । ते दोघे आम्हां ब्रह्ममूर्ती ।

हे निजात्मभावाची प्रतीती । केली निश्चितीं जनार्दनें ॥७७॥

एका जनार्दना शरण । रिघतां विरालें एकपण ।

जेवीं कां समरसोनि लवण । स्वयें जाण समुद्र झालें ॥७८॥

तेथे एका आणि जनार्दन । एक झाले हें म्हणे कोण ।

जेवीं डोळ्यांचें देखणेपण । डोळाचि आपण स्वयें जाणे ॥७९॥

डोळ्यांनी आरिसा प्रकाशिजे । तेथें डोळेनि डोळा पाहिजे ।

तेवीं हें ज्ञान जाणिजे । देखणें देखिजे देखणेनी ॥७८०॥

सांडोनियां एकपण । एका जनार्दना शरण ।

हेंचि हंसगीतनिरूपण । झालें परिपूर्ण पूर्णत्वें ॥७८१॥

इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां

श्रीकृष्णोद्धवसंवादे हंसगीतनिरूपणं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ मूळ श्लोक ॥४२॥ ओंव्या ॥७८१॥