॥ श्री एकनाथी भागवत ॥
अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु सच्चिद्घन । वर्षताहे स्वानंदजीवन ।
मुमुक्षुमयूरकुूळें जाण । हरिखें उड्डाण करिताति ॥१॥
तो सजल देखोनि मेहो । ’सोहंभावें’ फोडिती टाहो ।
रोमांचपिसीं पसरूनि पहा हो । सत्त्वें लवलाहो नृत्याचा ॥२॥
नाचती स्वानंदाचेनि मेळें । तेणें सर्वांगीं निघाले डोळे ।
पिसें देखणीं जाहलीं सकळें । तें शिरीं गोपाळें वाहिलीं ॥३॥
तो मेघ देखोनि संमुख । आर्त चातक पसरिती मुख ।
बिंदुमात्रें पावले सुख । नित्य निर्दोख ते जाहले ॥४॥
आर्ततृषा तत्काळ वोळे । निवाले तेणें स्वानंदजळें ।
मग हरिखाचेनि कल्लोळें । सुखसोहळे भोगिती ॥५॥
सुभूमि देखोनि निर्मळ । जाणोनि वर्षती काळवेळ ।
वर्षों लागले जी प्रबळ । जळकल्लोळ अनिवार ॥६॥
तेणें वोळलेनि कृपाभरें । शिष्यसरितेसी पूरु भरे ।
विकल्पवोसणें एकसुरें । महापूरें वाहविलीं ॥७॥
तेणें प्रवाहनिर्मळजळें । चिदैक्यसागरीं सरिता मिळे ।
मग समरसोनि तेणें जळें । राहे निश्चळें निजरूपें ॥८॥
वैराग्यराबें शुद्ध केली । पृथ्वी निजवोला वोळली ।
कठिणत्वेंवीण मार्दवा आली । नाही अंकुरली बहुबीजें ॥९॥
अखंड वर्षतां जळमेळीं । वासनेचीं ढेपें विरालीं ।
सद्भावाची वोल जाहली । वाफ लागली बोधाची ॥१०॥
तेथें न पेरतांचि जाण । सहज निजबीजें परिपूर्ण ।
अंकुरली आपणिया आपण । सिद्ध संपूर्ण स्वभावें ॥११॥
ते परम कृपेचिये पुष्टीं । स्वानंदें पिकली समदृष्टी ।
परमानंदें कोंदली सृष्टी । ऐक्यें संवसाटी जीवशिवां ॥१२॥
फिटला दुःखदुष्काळु । पाहला सुखाचा सुकाळु ।
वोळळा सद्गुरु कृपाळु । आनंदकल्लोळु सच्छिष्यां ॥१३॥
वर्षतां निजपर्जन्यधारा । वर्षला नाना अवतार-गारा ।
कार्यानुरूपें तदाकारा । विरोनि निराकारा त्या होती ॥१४॥
त्या पर्जन्याचा वोसडा । दैवें लागल्या जडामूढां ।
तो सरता होय संतांपुढां । अवचटें शिंतोडा जैं लागे ॥१५॥
तो महामेघ श्रीहरी । सद्गुरुकृपा वोळे जयावरी ।
तोचि धन्य चराचरीं । पूज्य सुरनरीं तो कीजे ॥१६॥
गुरुनामें अति घनवटु । शिष्य तारूनि अति हळुवटु ।
ज्याचा आदि-मध्य-शेवटु । न कळे स्पष्टु वेदांसी ॥१७॥
तो सद्गुरु श्रीजनार्दनु । वोळलासे आनंदघनु ।
तेणें एका एकु केला पावनु । सांडवोनु एकपण ॥१८॥
एक तेंचि अनेक । अनेक तेंचि एक ।
हेंही केलें निष्टंक । स्वबोधें देख बोधोनि ॥१९॥
बोधोनियां निजऐक्यता । ऐक्यें लाविलें भक्तिपंथा ।
मज प्रवर्तविलें श्रीभागवता । निज कथा गावया ॥२०॥
तेचि श्रीभागवतींची कथा । दशमाध्यावो संपतां ।
ते बद्धमुक्तांची व्यवस्था । उद्धवें कृष्णनाथा पूशिली ॥२१॥
सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनियां श्रीकृष्ण ।
निजहृदयींचें गुह्यज्ञान । उद्धवासी जाण सांगेल ॥२२॥
येणें प्रश्नोत्तरश्रवणें । उठे जन्ममरणांचे धरणें ।
संसाराचें खत फाडणें । फिटलें लाहणें विषयांचें ॥२३॥
मोक्षमार्गींचे कापडी । साधनीं शिणती बापुडीं ।
तिहीं शीघ्र यावें तांतडी । जिणावया वोढी बंधमोक्षांच्या ॥२४॥
जे कष्टती जपतपसाधनें । शिणती ध्येय-ध्यान-अनुष्ठानें ।
ते ते शीघ्र या विंदानें । ज्ञानाज्ञानें जिणावया ॥२५॥
ऐशी कथा आहे गहन । श्रोतीं व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । स्वानंदघन तुष्टला ॥२६॥
अकरावे अध्यायीं जाण । इतुकें सांगेल श्रीकृष्ण ।
बद्धमुक्तांचें वैलक्षण्य । आणिक लक्षण साधूचें ॥२७॥
तेणेंच प्रसंगें जाण । सांगेल भक्तीचें लक्षण ।
अकराही पूजेसी अधिष्ठान । इतुकें निरूपण हरि बोले ॥२८॥
श्रीभगवानुवाच ।
बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ।
गुणस्य मायामूलत्वात् न मे मोक्षो न बन्धनम् ॥ १ ॥
उद्धवा बद्ध-मुक्त-अवस्था । जरी सत्य म्हणसी वस्तुतां ।
तरी न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
बद्ध-मुक्त-अवस्था । माझे स्वरूपीं नाहीं तत्त्वतां ।
हे गुणकार्याची वार्ता । संबंधु तत्त्वतां मज नाहीं ॥३०॥
माझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । बद्धमुक्तता दोनी नाहीं ।
बद्धता मुक्तता गुणांच्या ठायीं । आभासे पाहीं गुणकार्यें ॥३१॥
गुण ते समूळ मायिक । मी गुणातीत अमायिक ।
सत्यासी जैं बाधे लटिक । तैं मृगजळीं लोक बुडाले ॥३२॥
चित्रींचेनि हुताशनें । जैं जाळिजती पुरें पट्टणें ।
कां स्वप्नींचेनि महाधनें । वेव्हारा होणें जागृतीं ॥३३॥
सूर्यासी प्रतिबिंब गिळी । छाया पुरुषातें आकळी ।
समुद्र बुडे मृगजळीं । तैं मज गुणमेळीं बद्धता ॥३४॥
जैं जिभेसी केंसु निघे । जैं तळहातीं वृक्ष लागे ।
डोळ्यांमाजीं पर्वत रिगे । तैं मी गुणसंगें अतिबद्धु ॥३५॥
आकाश खोंचे सांबळीं । काजळ लागे वारया निडळीं ।
कां विजूचे कपाळीं । बाशिंग सबळी बांधावें ॥३६॥
गगन तुटोनि समुद्रीं बुडे । सपर्वत धरा वारेनि उडे ।
सूर्य अडखळोनि अंधारीं पडे । तरी मी सांपडे गुणांत ॥३७॥
अंतरिक्षगगनीं सरोवर । त्यामाजीं कमळें मनोहर ।
तो आमोद सेविती भ्रमर । ऐसें साचार जैं घडे ॥३८॥
तैं मी आत्मा गुणसंगे । नाना विषयभोग संभोगें ।
मग त्या विषयांचेनि पांगे । होईन अंगें गुणबद्धु ॥३९॥
त्रिगुण-अंगीकारें वर्ततां । गुणकार्य-तदात्मता ।
तेणें बद्ध-मुक्त-अवस्था । भासे वृथा भ्रांतासी ॥४०॥
गुणा आत्म्यासी भिन्नता । म्हणसी मानली तत्त्वतां ।
परी गुणसंगें आत्मा असतां । अवश्य विकारिता येईल ॥४१॥
अग्निसंगें पात्र तप्त । पात्रतापें जळ संतप्त ।
जळतापें धान्यपाकु होत । तेवीं विकारवंत नव्हे आत्मा ॥४२॥
अग्नितापाआंत । आकाश नव्हे संतप्त ।
तेवीं गुणसंगा आंत । विकारवंत नव्हे आत्मा ॥४३॥
नट अंधत्वें अवगला । परी तो आंधळा नाहीं जाहला ।
तैसा आत्मा गुणसंगें क्रीडला । तरी असे संचला निर्गुणत्वें ॥४४॥
नटु अंधत्वें नव्हे अंधु । आत्मा गुणसंगें नव्हे बद्धु ।
गुण मायिक आत्मा शुद्धु । या त्या संबंधु असेना ॥४५॥
आत्मा व्यापक गुण परिच्छिन्न । याही हेतु न घडे बंधन ।
सकळ समुद्राचे प्राशन । केवीं रांजण करूं शके ॥४६॥
मोहरीमाजीं मेरु राहे । पशामाजीं पृथ्वी समाये ।
मुंगी गज गिळोनि जाये । खद्योत खाये सूर्यातें ॥४७॥
मशकु ब्रह्मांडातें आकळी । पतंगु प्रळयानळ गिळी ।
तरी आत्मा गुणाचे मेळीं । गुणकल्लोळीं बांधवे ॥४८॥
यापरी न संभवे बद्धता । बद्धतेसवें गेली मुक्तता ।
बद्धमुक्तअवस्थांपरता । जाण तत्त्वतां आत्मा मी ॥४९॥
स्वप्नींचा अत्यंत सुकृती । अथवा महापापी दुष्कृती ।
दोन्ही मिथ्या जेवीं जागृतीं । तेवीं बद्धमुक्ती आत्मत्वीं ॥५०॥
हो कां जीवात्म्यासीची बद्धता । सत्य नाहीं गा तत्त्वतां ।
मा मज परमात्म्यासी अवस्था । बद्धमुक्तता ते कैंची ॥५१॥
बिंबीं प्रतिबिंबी नाहीं । मध्येंचि आरिशाचे टायीं ।
मळ बैसले ते पाहीं । प्रतिबिंबाचे देहीं लागले दिसती ॥५२॥
तो मळु जैं पडे फेडावा । तैं आरिसाची साहणें तोडावा ।
परी प्रतिबिंब त्या साहणे धरावा । हें सद्भावा मिळेना ॥५३॥
तेवीं जीवीं शिवीं दोष नाहीं । दोष अंतःकरणाच्या ठायीं ।
तें चित्त शुद्ध केल्या पाहीं । बंधमोक्षां दोंही बोळवण ॥५४॥
तैसें आविद्यक हें सकळ । गुणकार्य नानामळ ।
जीवा अंगीं प्रबळ । मूढमती स्थूल स्थापिती ॥५५॥
जैं सत्त्वें गुण निरसे सबळ । तैं आविद्यक फिटती मळ ।
तेचि सद्विद्या होय निर्मळ । जीवचि केवळ शिव होये ॥५६॥
तेव्हां जीवशिव हीं नामें दोनी । जातीं मजमाजीं समरसोनी ।
तैं मीच एकवांचूनी । आन जनीं वनीं असेना ॥५७॥
जीवभावनें मीचि जीवु । शिवभावनें मीचि शिवु ।
मी एकला ना नव्हे बहु । माझा अनुभवु मीचि जाणें ॥५८॥
झणीं आशंका धरिशी येथ । ’जरी जीव शिव तूंचि समस्त ।
तरी ते शुकवामदेवचि कां मुक्त । येरां म्हणत जड जीव ॥५९॥
जरी तूंचि जीवरूपें तत्त्वतां । तरी हे ऐशि कां विषमता ।
शुकवामदेवांची अवस्था । वेदशास्त्रार्था सम्मत ॥६०॥
तींही लोकांमाजीं जाण । वेदवचन तंव प्रमाण ।
हें बोलणें विलक्षण । अप्रमाण जैं मानिशी’ ॥६१॥
हो कां वेद म्हणे जें निश्चित । तें बोलणें माझें निःश्वसित ।
तो मी स्वमुखीं जे बोलत । तें तूं अयुक्त म्हणतोसी ॥६२॥
जो मी वेदांचा वेदवक्ता । सकळ शास्त्रांचा मूळकर्ता ।
त्या माझें वचन म्हणसी वृथा । अतियोग्यता तुज आली ॥६३॥
वेदांचें जाण त्रिविध बंड । त्रिकांडीं केला तो त्रिखंड ।
वेदबळें बा पाखंड । वाजवी तोंड अव्हासव्हा ॥६४॥
भासले बहुसाल मतभेद । वेदबळें नाना वाद ।
तो वेद माझा परोक्षवाद । तेणें तत्त्वावबोध केवीं होय ॥६५॥
शब्दज्ञान ब्रह्मज्ञान । बाह्यदृष्टीं समसमान ।
जेवीं वाल आणि वालभर सुवर्ण । तुकितां पूर्ण समता आली ॥६६॥
परी वाला सुवर्णा समता । मोलें कदा नव्हे तत्त्वतां ।
तेवीं वेदवादयोग्यता । ब्रह्मानुभविता सम नव्हे ॥६७॥
जो मी हरिहरां प्रमाण । त्या माझें वचन अप्रमाण ।
तूं म्हणसी हा ज्ञानाभिमान । हेंही जाणपण सांडावें ॥६८॥
माझें वचन सत्याचें सत्य । सत्य मानूनि निश्चित ।
येणें भावें साधे परमार्थ । हें ब्रह्मलिखित मद्वाक्य ॥६९॥
उद्धवा मज पाहतां । वसिष्ठवामदेवादि समस्तां ।
न देखे बद्ध आणि मुक्तता । हा माझा तत्त्वतां निजबोधु ॥७०॥
मुक्तांचिये दृष्टीं । मुक्तच दिसे सकल सृष्टी ।
तेथें शुकवामदेवांची गोष्टी । वेगळी पाठीं केवीं राहे ॥७१॥
बद्धमुक्तांहूनि भिन्न । परमात्मा मी चिद्घन ।
जरी म्हणसी जीवासी बंधन । तेहीं सत्यत्वें जाण घडेना ॥७२॥
शोकमोहौ सुखं दुःखं देहापत्तिश्च मायया ।
स्वप्नो यथात्मनः ख्यातिः संसृतिर्न तु वास्तवी ॥ २ ॥
दोन मुहूर्त स्वप्नवृत्ती । त्यामाजीं देखे जन्मपंक्ती ।
तेथें पावला नाना याती । तेवीं मिथ्या प्रतीती भवभावा ॥७३॥
नसता आभासु मावळे ठायीं । त्यालागीं हाहाकारु उठे देहीं ।
गेले मेले नाहीं नाहीं । ’शोक’ पाहीं त्या नांव ॥७४॥
भग्नपात्रीं भरिलें जळ । तेथें बिंबलें चंद्रमंडळ ।
तें पात्र पोटेंशीं धरी बाळ । रत्न प्रबळ हें माझें ॥७५॥
जळ गळोनि जाय सकळ । चंद्रमा हरपे तत्काळ ।
त्यालागी तळमळी तें बाळ । ’शोकु’ केवळ या नांव ॥७६॥
अथवा घटचंद्र धरूं जातां । तो न ये बालकाचे हाता ।
यालागीं करी जे जे व्यथा । ’शोक’ सर्वथा या नांव ॥७७॥
काढावया आरशांतील धन । करी दर्पणामाजीं खनन ।
फुटल्या नागवलों म्हणे जाण । ’शोक’ दारुण या नांव ॥७८॥
नसते वस्तूच्या ठायीं जाण । मी माझें हा अभिमान ।
तेंचि ’मोहाचें’ लक्षण । ममता दारुण ते संधी ॥७९॥
देखोनि मृगजळाचें तळें । येणें पिकती रायकेळें ।
यालागीं मृगतृष्णेचीं जळें । आठै काळें राखतु ॥८०॥
मृगजळाकडे कोणी भंवे । त्यासी सक्रोधें भांडू धांवे ।
अतिमोहित मोहस्वभावें । विवेकु न करवे सत्याचा ॥८१॥
तेवीं पुत्रापासोन सुखप्राप्ती । माता पिता होईल म्हणती ।
शेखीं पुत्र अंगोठा दाविती । केवळ भ्रांति पुत्रमोहो ॥८२॥
गंधर्वनगरींची रचना । देखोनि अभिलाष होय मना ।
ते घ्यावया मेळवी सेना । नानासूचनाउपायें ॥८३॥
तैसा मिथ्या देहीं अभिमान । देहसंबंधाची ममता गहन ।
हेंचि मोहाचें मूळ लक्षण । ममताभिमान प्राणियां ॥८४॥
एवं अहं आणि ममता । हेचि मोहाची मातापिता ।
त्याचेनि उत्तरोत्तर वाढतां । जनमोहिता व्यामोह ॥८५॥
प्रियविषयीं आसक्ति देख । त्याची नित्यप्राप्ती अनेक ।
त्याचि नांव म्हणती ’सुख’ । जेवीं चाखितां विख अति मधुर ॥८६॥
विषयप्राप्तीं जो हरिख । तया नांव म्हणती ’सुख’ ।
विषयविनाश तेंचि ’दुःख’ । परम असुख त्या नांव ॥८७॥
शोक-मोह-सुख-दुःख । येणेंचि ’देहाची प्राप्ती’ देख ।
देहाभिमानें देह अनेक । दुःखदायक भोगवी ॥८८॥
जे जेणें तीव्रध्यानें मरे । तो तेंचि होऊनि अवतरे ।
कां जो निमे अतिद्वेषाकारें । तो द्वेषानुसारें जन्मतु ॥८९॥
सर्प मुंगुस पूर्ववृत्ती । वैराकारें जन्म पावती ।
जे जे वासना उरे अंतीं । ते ते गती प्राण्यासी ॥९०॥
यालागीं हृदयामाजीं निश्चितीं । जे सबळ वासना उठे अंतीं ।
तो तो प्राणी पावे तिये गती । श्रुति बोलतीं पुराणें ॥९१॥
पुरुषासवें वृथा छाया । तैशी ब्रह्मीं मिथ्या माया ।
ते उपजवी गुणकार्या । देह भासावया मूळ ते ॥९२॥
जेवीं का स्वप्नीं एकलें मन । नानाकार होय आपण ।
तेवीं चैतन्याचें अन्यथाभान । तें हें जाण चराचर ॥९३॥
एवं वस्तुतां संसार नाहीं । तेथें सुखदुःख कैंचें कायी ।
देहेंवीण छाया पाहीं । कोणें ठायीं उपजेल ॥९४॥
जें उपजलेंच नाहीं । तें काळें गोरें सांगों कायी ।
अवघें स्वप्नप्राय पाहीं । वस्तुतां नाहीं संसारु ॥९५॥
इहीं दोहीं श्लोकीं अगाधु । परिहरिला वस्तुविरोधु ।
आतां प्रतीतीनें जो अनुरोधु । तो सत्यासी बाधु करूं न शके ॥९६॥
डोळां अंगुळी लाविती । तेणें दोन चंद्र आभासती ।
गगनीं दों चंद्रा नाहीं वस्ती । मिथ्या प्रतीती निराकारीं ॥९७॥
विद्याविद्ये मम तनू विद्ध्युद्धव शरीरिणाम् ।
मोक्षबंधकरी आद्ये मायया मे विनिर्मिते ॥ ३ ॥
निजबोधें येत बोधा । ’ब्रह्माहमस्मि’ स्फुरे सदा ।
ते जाण शुद्ध ’विद्या’ । जें अविद्याछेदक ॥९८॥
मी पापी मी सदा निर्दैवो । ऐसा नित्य स्फुरे भावो ।
तेचि सबळ ’अविद्या’ पहा हो । जे नाना संदेहो उपजवी ॥९९॥
एकी जीवातें घाली बंदी । एकी जीवाचें बंधन छेदी ।
या दोनी माझ्या शक्ति अनादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥१००॥
’तूं चिन्मात्र चैतन्यघन । चित्स्वरूपें वृत्तिशून्य ।
तुज शक्ती कैंच्या जाण । निर्धर्मकपण सर्वदा ’ ॥१॥
उद्धवा हे आशंका वाया । कारण नाहीं करावया ।
या शक्ती जन्मवी माझी माया । जे न ये आया सुरनरां ॥२॥
’सत्’ म्हणों तरी तत्काळ नासे । ’असत्’ म्हणों तरी आभासे ।
जिणें नामरूपांचें पिसें । लाविलें असे जगासी ॥३॥
नातुडे संतासंतबोली । माया ’अनिर्वचनीय’ झाली ।
तिणें विद्या-अविद्या इये पिलीं । वाढविलीं निजपक्षीं ॥४॥
आजि काळींच्या केल्या नव्हती । विद्या अविद्या अनादि शक्ती ।
बंधमोक्षातें भासविती । या दोनी वृत्ती मायेच्या ॥५॥
ते ’माया’ तूं म्हणसी कोण । तुझी ’कल्पना’ ते माया पूर्ण ।
बद्धमुक्तता-स्फुरण । तीमाजीं जाण स्फुरताति ॥६॥
बंधमोक्षांची राहती स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती ।
ऐक उद्धवा निश्चितीं । यथानिगुतीं निवाडें ॥७॥
स्वप्नीं न देखे आराधन । ज्यासी नाहीं माझें भजन ।
अविद्या त्यामाजीं संपूर्ण । प्रबळ जाण वाढत ॥८॥
तो माझ्या ठायीं अतिसादर । भजनशीळ आठौ प्रहर ।
तेंचि ब्रह्मविद्येचे घर । तेथें निरंतर ते वाढे ॥९॥
जेथ माझ्या भजनाचा उल्हासु । तेथ अविद्येचा निरासु ।
तोचि ब्रह्मविद्येचा प्रवेशु । हा अतिविश्वासु भक्तांचा ॥११०॥
येथ बद्धाचें कारण । आणि मोक्षाचें साधन ।
भक्तीचें दृढ स्थापन-। अर्थास्तव जाण बोलिलों ॥११॥
’ज्या बंधमोक्ष दोनी वृत्ती । त्या तूं मायेच्या म्हणसी शक्ती ।
तेव्हां माया झाली मोक्षदाती । हें केवीं श्रीपति घडेल ॥१२॥
जरी माया झाली मोक्षदाती । तरी कां करावी तुझी भक्ती ।
हेंचि सत्य काय श्रीपती । सांग निश्चितीं निवाडु’ ॥१३॥
कृष्ण म्हणे उद्धवासी । स्वयें चलन नाहीं छायेसी ।
तेवीं सामर्थ्य नाहीं मायेसी । केवीं मोक्षासी ते देईल ॥१४॥
जो मायेचा नियंता । तो विष्णु मोक्षाचा दाता ।
तोडूनि जीवाची बद्धता । सायुज्यता देतसे ॥१५॥
म्हणशी अविद्या-कामकर्मादृष्टें । जीवासी बंधन लागे मोठें ।
तें ब्रह्मविद्या-निष्कर्में तुटे । हा बोध करी नेटें गुरु श्रुतिद्वारा ॥१६॥
’येथ विष्णु काय झाला कर्ता । मा तो होईल मोक्षदाता’ ।
हे विकल्पाची वार्ता । न घडे सर्वथा उद्धवा ॥१७॥
गुरुरूपें विष्णु जाण । श्रुत्यर्थ विष्णुचि आपण ।
शमदमादि साधन । तेंही जाण विष्णुचि ॥१८॥
शिष्यबुद्धीसी बोधकता । विष्णुचि जाण तत्त्वतां ।
यापरी गा निजभक्तां । मोक्षदाता श्रीविष्णु ॥१९॥
त्या मोक्षाचा जो परिपाक । ते समाधि श्रीविष्णुचि देख ।
समाधीचें समाधिसुख । आवश्यक श्रीविष्णु ॥१२०॥
परमात्मा परिपूर्ण । तो मी विष्णु ब्रह्मसनातन ।
भक्तभवपाशमोचन । कृपाळू जाण करीतसें ॥२१॥
गत श्लोकींचेनि अनुवादें । ’शरीरिणाम्’ येणें पदें ।
जीवासी बद्धपण उद्बोधे । तेंही विनोदें निवारितसे ॥२२॥
एकाशीच बद्धमुक्तता । घडे न घडे तत्त्वतां ।
या उद्धवाच्या प्रश्नार्था । विशद आतां करीतसे ॥२३॥
एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते ।
बन्धोऽस्याविद्ययानादिर्विद्यया च तथेतरः ॥ ४ ॥
रितीवाढी असे अग्नीशी । तेथ फुणगे उसळले आकाशीं ।
रितीवाढी नाहीं स्वरूपासी । अंश भासावयासी ठावो कैंचा ॥२४॥
जेणें पाविजे निजबोधातें । ते बुद्धी उद्धवापाशीं वर्ते ।
यालागीं कृष्ण म्हणे ’महामते’ । उद्धवातें अतिप्रीतीं ॥२५॥
अतिप्रीतीं पुरस्करून । उद्धवासी म्हणे सावधान ।
ये श्लोकींचा अर्थ गहन । ते धारणा जाण धरावी ॥२६॥
यालागीं कृष्णजगजेठी । उद्धवाची पाठी थापटी ।
अतिगुह्याची गुह्य गोष्टी । तुझे कृपेसाठीं मी बोलतों ॥२७॥
पाठी थापटावयामिसें जाण । करीत स्वशक्तिसंचरण ।
तेणें अद्वयबोधलक्षण । उद्धवासी जाण प्रकाशी ॥२८॥
जीव एकचि त्रिजगतीं । हें जाण उद्धवा निश्चितीं ।
जेवीं नाना दीपांचिया दीप्ती । तेजाची ज्योति अभिन्न ॥२९॥
दोनी दीप एक होती । तैशी टिवळीं ऐक्या न येती ।
जडत्वापाशीं भेदप्राप्ती । ऐक्यवृत्ती अजडत्वीं ॥१३०॥
चंदनकुटके बहुवस । परी सर्वीं एकुचि सुवास ।
तेवीं जीवरूपें मी अविनाश । परमपरेश आभासे ॥३१॥
’जीवरूपें तूं श्रीकृष्ण । हें सत्य मानावें वचन ।
तैं भवपाशादि बंधन । तुजचि जाण आदळलें ’ ॥३२॥
ऐशी कल्पिशी जरी वार्ता । ते मज न घडे गा सर्वथा ।
जेवीं शरीरासी प्राण चाळिता । शरीरअवस्था त्या नाहीं ॥३३॥
लिंगशरीरीं स्वयंभ । जीव तो मदंशें प्रतिबिंब ।
त्यासी देहादि बंधनभांब । मिथ्या विडंब आभासे ॥३४॥
घटें आवरिला अवकाश । त्या नांव म्हणती ’घटाकाश’ ।
घटभंगें त्या नव्हे नाश । तेवीं मी अविनाश जीवत्वीं ॥३५॥
थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । तो गगन सांडोनि थिल्लराआंतौता ।
नाहीं रिघाला तत्त्वतां । तेवीं मी जीवत्वा अलिप्त ॥३६॥
रवि थिल्लरीं बिंबला दिसे । तेवीं मी लिंगदेहीं आभासें ।
मिथ्या तेथींचें भोगपिसें । तें बंधन कैसें मज लागे ॥३७॥
येथें बोलणें न लगे बहु । प्रतिबिंबा नांव ’जीवु’ ।
मुख्य बिंब तो मी ’शिवु’ । विशद उगवु हा जाण ॥३८॥
तळाव विहिरीं नाना थिल्लरीं । सूर्यु प्रतिबिंबे त्यांमाझारीं ।
तितुकीं रूपें दिवाकरीं । पाहतां अंबरी तंव नाहीं ॥३९॥
तैसें एकासी जें अनेकत्व । तें मिथ्या जाण जीवत्व ।
हें भागवताचें निजतत्त्व । शुद्ध सत्त्व ज्ञानाचें ॥१४०॥
थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । चंचल निश्चल मळिनता ।
हे थिल्लराचे गुण तत्त्वतां । प्रतिबिंबमाथां मानिती ॥४१॥
तेवीं शिवासी बाधकता । पाहतां नाहीं गा सर्वथा ।
हें अविद्याकार्य तत्त्वतां । जीवाचे माथां मानिती ॥४२॥
एवं मिथ्या जीवभेद सर्वथा । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
विद्या अविद्या निजपक्षपाता । दावी तत्त्वतां निजकर्में ॥४३॥
त्या जीवआभासासी प्रस्तुत । नित्यबद्ध नित्यमुक्त ।
एकासी दोनी अवस्था येथ । असे दावित विद्या अविद्या ॥४४॥
जेवीं जळीं बिंबला सविता । त्या जळाची चंचळनिश्चळता ।
या प्रतिबिंबासीच अवस्था । मुख्य सविता ते नेणें ॥४५॥
तेवीं जीवांची बद्धमुक्तता । परमात्म्यासी नलगे सर्वथा ।
जेवीं का अंधारींच्या खद्योता । न देखे सविता कल्पांती ॥४६॥
जळीं आकाश दिसे बुडालें । परी तें कांही नाहीं झालें वोलें ।
तेवीं अविद्येसी अलिप्त ठेलें । असें संचलें निजरूप ॥४७॥
एक बद्ध एक मुक्त । हें जीवामाजीं भासत ।
तेंही मी सांगेन निश्चित । सावचित्त परियेसीं ॥४८॥
सहस्रघटीं जळ भरितां । एकचि सहस्रधा दिसे सविता ।
तेथ ये घटींची जी अवस्था । त्या घटस्था लागेना ॥४९॥
तेथ जो घट होय चंचळु । त्यांतील प्रतिबिंब लागे अंदोळूं ।
परी दुजे घटीं जें निश्चळु । तें नव्हें चंचळु याचेनि ॥१५०॥
तेथ एकें दैवबळें । सूक्ष्म छिद्रें घटजळ गळे ।
तें प्रतिबिंब निजबिंबीं मिळे । येर सकळें तैसींचि ॥५१॥
तेवीं गुरुकृपाउजियेडें । ज्याचें लिंगदेह विघडे ।
त्यासी परमात्म्यासी ऐक्य घडे । येर ते बापुडे देहबंदीं ॥५२॥
हेंचि निरूपण पुढें । श्लोकसंगती सुरवाडें ।
तें मी सांगेन वाडेंकोडें । अतिनिवाडें निश्चित ॥५३॥
अथ बद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्यं वदामि ते ।
विरुद्धधर्मिणोस्तात स्थितयोरेकधर्मिणि ॥ ५ ॥
येणेंचि प्रसंगें जाण । मागील तुझे जे प्रश्न ।
बद्धमुक्तांचे लक्षण । तेहीं निरूपण सांगेन ॥५४॥
दोघांही देहीं असतां । दिसे विरुद्ध धर्म स्वभावतां ।
एक तो सदा सुखी सर्वथा । एक दुःखभोक्ता अहर्निशीं ॥५५॥
येथ विलक्षणता दों प्रकारीं । एक ते जीव-ईश्वरामाझारीं ।
एक ते जीवांसी परस्परी । बद्ध मुक्त निर्धारीं निश्चित ॥५६॥
पहिली जीवेश्वरांची कथा । तुज मी सांगेन विलक्षणता ।
मग जीवाची बद्धमुक्तता । विशद व्यवस्था सांगेन ॥५७॥
जीवेश्वरांचें वैलक्षण्य । अडीच श्लोकीं निरूपण ।
स्वयें सांगताहे नारायण । भाग्य पूर्ण उद्धवाचें ॥५८॥
सुपर्णावेतौ सदृशौ सखायौ यदृच्छयैतौ कृतनीडौ च वृक्षे ।
एकस्तयोः खादति पिप्पलान्नम् अन्यो निरन्नोऽपि बलेन भूयान् ॥ ६ ॥
’सुपर्ण’ म्हणिजे पक्षी । ये वृक्षींचा जाय ते वृक्षीं ।
तैसा देही देहांतरातें लक्षी । यालागीं ’पक्षी’ म्हणिजेत ॥५९॥
पक्ष्यांच्या ऐशी यांची गती । हा देह सांडूनि त्या देहा जाती ।
’पक्षी’ म्हणावया हे उपपत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१६०॥
एवं आत्मा देहाहूनि भिन्न । तें सांगितलें उपलक्षण ।
देहात्मवादाचें खंडन । प्रसंगी जाण दाखविलें ॥६१॥
आत्मा देह सर्वथा न घडे । देहबुद्धी धरणें तें तंव कुडें ।
हें उद्धवासी फाडोवाडें । निजनिवाडें दावित ॥६२॥
देहबुद्धीचिया पोटी । जन्ममरणांचिया कोटी ।
स्वर्गनरकांची आटाटी । देहबुद्धि गांठी जीवशिवपणें ॥६३॥
दोघेही चिद्रूपें सारखे । कधीं न होती आनासारिखे ।
अनादि हे दोघे सखे । अति नेटके जिवलग ॥६४॥
काळें अकाळें सकाळें । नव्हती येरयेरांवेगळे ।
एकत्र वर्तती खेळेमेळें । निजप्रांजळें सख्यत्वें ॥६५॥
प्रभा दीपु दवडिना वेगळा । दीपु प्रभेसी नव्हे निराळा ।
तेवीं जीवशिवांचा मेळा । एकत्र स्वलीळा नांदती स्वयें ॥६६॥
जीवु इच्छी जें जें कांहीं । तें तें वासनेसरिसें पाहीं ।
ईश्वर पुरवी सर्वही । विमुख कांही हों नेणें ॥६७॥
अंतकाळीं जें जीव मागे । तें अलोट ईश्वर देवों लागे ।
आणि ईश्वरआज्ञेचेनि योगें । जीवु सर्वांगें वर्तत ॥६८॥
ईश्वरआज्ञा त्रिशुद्धी । जीवें जीव सर्वस्वें वंदी ।
होय नव्हे न म्हणे कधीं । अभिनव सिद्धी सखेपणाची ॥६९॥
नवल सख्यत्वाची परी । ईश्वरु जैसें जैसें प्रेरी ।
जीवु तैसें तैसें करी । निमेषभरी ढळेना ॥१७०॥
निमेष आरंभोनि जन्मवरी । जीवु ईश्वराची आज्ञा करी ।
ईश्वरु जीवाचा साहाकारी । परस्परीं निजसखे ॥७१॥
जीवु अत्यंत अडलेपणें । ईश्वरासी धांव धांव म्हणे ।
तो तत्काळ पावे धांवणें । करी सोडवणें जीवाचें ॥७२॥
एवं शिवाचे आज्ञे जीवु राहे । जीवपण गेलिया शिवीं समाये ।
जीवालागीं हा शिवपणा वाहे । येरवीं राहे सांडूनि ॥७३॥
ऐसें सखेपण यांचें । केवीं अनुवादवे वाचें ।
उद्धवा हें मीचि जाणें साचें । या सखेपणाचें सौजन्य ॥७४॥
जीव ईश्वराआधीन । हें दृढ केलें संस्थापन ।
अनीश्वरवादाचें खंडण । प्रसंगें जाण दाविलें ॥७५॥
अनीश्वरवादु खंडितां । खंडिली कर्मपाखंडवार्ता ।
कर्मपाखंडाच्या मता । ईश्वरता न मानिती ॥७६॥
म्हणती चित्तधर्म ईश्वरासी । तंव चिद्रूपता स्थापूनि त्यासी ।
निराकरिलें चित्तधर्मासी । अनायासीं चिद्रूपें ॥७७॥
नाना परीचें अतिचिंतन । त्याचि नांव ’चित्त’ जाण ।
चित्तेंवीण निश्चळपण । तेंचि ’चैतन्य’ उद्धवा ॥७८॥
धर्माधर्म न विचारितां । म्हणती ईश्वरु मोक्षदाता ।
हे भक्तपाखंडी कथा । स्थापूनि चिद्रूपता निवारी ॥७९॥
टिळे-माळा-मुद्राधारणें । लावूनि संतांसीं निंदिलें जेणें ।
पाप राहटे भक्तपणें । त्यासी नारायणें नुद्धरिजे ॥१८०॥
अंतरींचें सर्व जाणता मी । यालागीं नांवें ’अंतर्यामी’ ।
तो शाब्दिकवचनधर्मी । चाळविला अधर्मी केवीं जाये ॥८१॥
मी ज्ञानस्वरूप तत्त्वतां । सर्वद्रष्टा सर्वज्ञाता ।
तो मी धर्माधर्म न विचारतां । मोक्षदाता हें न घडे ॥८२॥
धरोनियां भक्तभावो । पाप राहाटे जो स्वयमेवो ।
याचि नामीं ’दांभिक’ पहा हो । त्यातें देवो नुद्धरी ॥८३॥
’सदृशौ’ आणि ’सखायौ’ । धरोनि या पदांचा अन्वयो ।
पाखंडमात्रातें पहा हो । स्वयें देवो उच्छेदी ॥८४॥
निरसोनि नाना मतांतरें । स्वमत करावया खरें ।
श्लोकींचीं पदें अतिगंभीरें । शारङ्गधरें वर्णिलीं ॥८५॥
ते दोनी मिळोनियां पक्षी । नीड केलें देहवृक्षीं ।
वृक्ष म्हणिजे कोणे पक्षीं । तीहीं लक्षीं लक्षणें ॥८६॥
जननीउदर तेंचि आळ । पित्याचें रेत बीज सकळ ।
गर्भाधान पेरणी केवळ । संकल्पजळ वृद्धीसी ॥८७॥
सोहंभावाचा गुप्त अंकुरु । त्रिगुणभूमीं तिवणा डीरु ।
कोहंभावें वाढला थोरु । वृक्ष साकारु तेणें झाला ॥८८॥
करचरणादि नाना शाखा । प्रबळबळें वाढल्या देखा ।
अधऊर्ध्व नखशिखा । वृक्षाचा निका विस्तारु ॥८९॥
तया देहबुद्धीचीं दृढ मूळें । विकल्प-पारंब्या तेणें मेळें ।
भूमी रुतल्या प्रबळबळें । कामाचे कोंवळे फुटती कोंब ॥१९०॥
तेथ कर्मांचीं पानें । निबिड दाटलीं अतिगहनें ।
मोहममतेचे घोंस तेणें । सलोभपणें दाटले ॥९१॥
ज्या उंचावल्या थोर शाखा । त्या फळीं फळोनि सुखदुःखां ।
उतरल्या जी अधोमुखा । अधःपतनें देखा लोळती ॥९२॥
ऐशिया वृक्षामाजीं जाण । अतिगूढ गुप्त गहन ।
नीड केलें हृदयस्थान । जीवशिव आपण बैसावया ॥९३॥
जेथ जीव परमात्मा वसती । तरी देहाची जाहली सत्य प्राप्ती ।
ऐसें कोणी कोणी म्हणती । तें मत श्रीपति निराकरी ॥९४॥
पुरुषासवें लटकी छाया । तोडितां मोडितां नये घाया ।
तैशी अनिर्वचनीय माझी माया । तेणें यदृच्छया नीड केलें ॥९५॥
जेवीं स्वप्नीं गृहाचारु निद्रिता । तेवीं जीवात्मा नीडीं वसता ।
हें मायामय सर्वथा । नव्हे वस्तुतां साचार ॥९६॥
येणें निरूपणें गोविंदु । नैयायिक मताचा कंदु ।
समूळ केला त्याचा उच्छेदु । देहसंबंधु मिथ्यात्वें ॥९७॥
ऐशियाही या वृक्षासी । जन्मादि निमेषोन्मेषीं ।
काळु छेदीतसे अहर्निशीं । बाळादि वयसांसी छेदकु ॥९८॥
तया वृक्षाचीं फळें । तुरटें निखटें तोडाळें ।
पक्के अपक्के सकळें । ज्यांसी ’पिप्पलें’ म्हणताति ॥९९॥
त्या दों पक्ष्यांमाजीं तत्त्वतां । जो जीवपणें बोलिजेता ।
तो या कर्मफळांचा भोक्ता । जीं नाना व्यथादायकें ॥२००॥
जीं फळें खातां पोट न भरे । खादल्या दारुण दुर्जरें ।
जेणें भवचक्रीं पडोनि फिरे । तरी अत्यादरें सेवितु ॥१॥
दुजा फळें खातां खुणा वारी । जीवासी त्या फळाची गोडी भारी ।
अखंड जाहला फळाहारी । वारिलें न करी शिवाचें ॥२॥
फळें सेविता अहर्निशीं । तिळभरी शक्ति नाहीं जीवासी ।
अशक्त देखोनियां त्यासी । काळ पाशीं बांधितु ॥३॥
जो इयें सेवी कर्मफळें । तो तत्काळ बांधिजे काळें ।
दुजा कर्मफळा नातळे । त्यातें देखोनि पळे कळिकाळु ॥४॥
जो कर्मफळातें न सेवितु । तो ज्ञानशक्तीनें अधिक अनंतु ।
सदा परमानंदें तृप्तु । असे डुल्लतु स्वानंदें ॥५॥
उद्धवासी होय निजबोधु । यालागीं जीवशिवाचा भेदु ।
अत्यादरें सांगें गोविंदु । निजात्मबोधु प्रांजळु ॥६॥
आत्मानमन्यं च स वेद विद्वान् अपिप्पलादो न तु पिप्पलादः ।
योऽविद्यया युक् स तु नित्यबद्धो विद्यामयो यः स तु नित्यमुक्तः ॥ ७ ॥
जो कर्मफळातें न सेविता । जो स्वरूपाचा जाणता ।
द्रष्टा जीव-प्रपंचांचा तत्त्वतां । अलिप्तता निजज्ञानें ॥७॥
जीवु प्रपंचाचा ज्ञाता । परी परमात्मा नेणे तत्त्वतां ।
यालागीं भोगी भवव्यथा । कर्मफळें खातां अतिबद्धु ॥८॥
जो कर्मफळें सेवी बापुडा । तो अंधपंगु झाला वेडा ।
मी कोण हें नेणे फुडा । पडिला खोडां देहाचे ॥९॥
देहसंबंधाआंतु । प्रतिपदीं होय आत्मघातु ।
नाहीं जन्ममरणांसी अंतु । दुःखी होतु अतिदुःखें ॥२१०॥
नश्वर विषयांचा छंदु । तेणें जीवु जाहला अतिबद्धु ।
हा अविद्येचा संबंधु । लागला सुबद्धु देहवंतां ॥११॥
जितुकी विषयाची अवस्था । तितुकी जीवासी ’नित्यबद्धता’ ।
जो विषयातीत सर्वथा । ’नित्यमुक्तता’ ते ठायीं ॥१२॥
जो विद्याप्राधान्यें नित्यमुक्तु । जो ज्ञानशक्तीनें शक्तिमंतु ।
सर्वव्यापकु सर्वीं अलिप्तु । तो ’नित्यमुक्तु’ बोलिजे ॥१३॥
सांगितली जीवाची नित्यबद्धता । प्रगट केली शिवाची मुक्तता ।
जीवाची जे बद्धमुक्तता । तेही आतां सांगतु ॥१४॥
उद्धवाप्रती श्रीकृष्ण । बद्धमुक्तांचें लक्षण ।
दोघांचीही ऊणखूण । विचित्र जाण सांगेल ॥१५॥
देहस्थोऽपि न देहस्थो विद्वान् स्वप्नाद् यथोत्थितः ।
अदेहस्थोऽपि देहस्थः कुमतिः स्वप्नदृग् यथा ॥ ८ ॥
बद्धमुक्तांचें मिश्र लक्षण । तीं श्लोकीं सांगेल जाण ।
केवळ मुक्ताचें सुलक्षण । गोड निरूपण सात श्लोकीं ॥१६॥
देहीं असोनि देहबुद्धि नाहीं । हें मुक्ताचें ’मुक्तलक्षण’ पाहीं ।
यालागीं देहीं असोनि ’विदेही’ । म्हणिपे पाहीं या हेतू ॥१७॥
स्वप्नींचे राज्य आणि भीक । जागृतीं मिथ्या दोन्ही देख ।
तैसें देहादि जें सुखदुःख । तें मिथ्या देख मुक्तासी ॥१८॥
जो स्वप्नी मरोनि जाळिला । तो जागृतीं नाहीं राख जाहला ।
तैसा प्रपंच मिथ्या जाणितला । ’मुक्त’ बोलिला त्या नांव ॥१९॥
स्वप्नींचें साधकबाधक । जागृतीं आठवे सकळिक ।
त्याचें बाधीना सुखदुःख । तैसें संसारिक मुक्तासी ॥२२०॥
आतां ऐक बद्धाची स्थिती । तो वस्तुतां असे देहातीतीं ।
परी ’मी देह’ हें मानी कुमती । दुःखप्राप्ती तेणें त्यासी ॥२१॥
जळीं देखे प्रतिबिंबातें । मी बुडालों म्हणोनि कुंथे ।
कोणी काढा काढा मातें । पुण्य तुमतें लागेल ॥२२॥
स्वप्नीं घाय लागले खड्गाचे । तेणें जागृतीं म्हणे मी न वांचें ।
ऐसें निबिड भरितें भ्रमाचें । तें बद्धतेचें लक्षण ॥२३॥
स्वप्नींचें सुखदुःख नसतें । तें स्वप्नभ्रमें भोगितां कुंथे ।
तेवीं ’देह मी’ म्हणोनि येथें । नाना दुःखांते भोगितु ॥२४॥
स्वस्वरूपाचें विस्मरण । तेणें विषयासक्ति दृढ जाण ।
संकल्प विकल्प अतिगहन । तेंचि लक्षण बद्धाचें ॥२५॥
आणिकें लक्षणें त्याचीं आतां । सांगतु असें तत्त्वतां ।
भोग भोगोनि अभोक्ता । ते ’मुक्तावस्था’ परियेसीं ॥२६॥
इन्द्रियैरिन्द्रियार्थेषु गुणैरपि गुणेषु च ।
गृह्यमाणेष्वहं कुर्यान् न विद्वान् यस्त्वविक्रियः ॥ ९ ॥
अवशेष प्रारब्धस्थितीं । मुक्तांची देहीं दिसे वस्ती ।
परी जागृती स्वप्न-सुषुप्तीं । देहस्थिती नातळे ॥२७॥
छाया पुरुषाचेनि चळे । ते छायेसी पुरुष नातळे ।
तेवीं मिथ्या देह मुक्ताजवळें । कल्पांतकाळें येवों न शके ॥२८॥
आपुले छायेसी जाण । जेवीं बैसों न शके आपण ।
तेवीं मायादि तिन्ही गुण । जवळी असोन स्पर्शेना ॥२९॥
इंद्रियद्वारा यथानिगुतीं । प्राप्त विषयांतें सेविती ।
परी सेविलें ऐसेंही नेणती । विषयस्फूर्ती स्फुरेना ॥२३०॥
गुण पोखिती गुणावस्था । इंद्रियें घेतीं इंद्रियार्था ।
मी उभयसाक्षी अकर्ता । चिन्मात्रतां अलिप्त ॥३१॥
तो इंद्रियाचेनि खेळेमेळें । सुखें विषयामाजीं जरी लोळे ।
तरी विकाराचेनि विटाळें । कदाकाळें मैळेना ॥३२॥
जेथ कामाची अतिप्रीती । तेथ लोभाची दृढ वस्ती ।
अथवा कामाची जेथ अप्राप्ती । तेथ महाख्याती क्रोधाची ॥३३॥
मुक्त जाहला नित्य निष्काम । क्रोधलोभेंसी निमाला काम ।
तो स्वयें जाहला ’आत्माराम’ । विश्रामधाम जगाचें ॥३४॥
एवं मुक्ताच्या ठायीं जाण । उपजों न शके पापपुण्य ।
कामक्रोधादिवृत्तिशून्य । जाहला परिपूर्ण चिद्ब्रह्म ॥३५॥
मुक्ताची विषयस्थिती । विषयीं स्फुरे ब्रह्मस्फूर्ती ।
यालागीं पापपुण्यें नुपजती । नित्यमुक्ति तेणें त्यासी ॥३६॥
ऐशी मुक्ताची हे कथा । ऐक बद्धाचीही वार्ता ।
अकर्ताचि म्हणे मी कर्ता । येणेंचि सर्वथा गुंतला ॥३७॥
दैवाधीने शरीरेऽस्मिन् गुणभाव्येन कर्मणा ।
वर्तमानोऽबुधस्तत्र कर्तास्मीति निबध्यते ॥ १० ॥
अदृष्टाअधीन जें शरीर । तेथ आलियाहि हरिहर ।
अन्यथा न करवे अणुमात्र । हें वेद शास्त्रसंमत ॥३८॥
देहीं ज्या गुणाचें प्राधान्य । तैसेंचि कर्म निपजे जाण ।
इंद्रियें तीं गुणाधीन । तदनुसारें जाण वर्ततीं ॥३९॥
एवं दैवगुणें देहवर्तन । तेथ मी कर्ता म्हणवी आपण ।
तेंचि त्यासी दृढ बंधन । आपणा आपण घातक ॥२४०॥
नळीमाजिल्या चण्यांच्या आशां । वानरें मुठीं धरणें तोचि फांसा ।
तेवीं देहींच्या विषयविलासा । अभिमानें तैसा गुंतला ॥४१॥
जी देहातीत वस्तुतां । जो गुणकर्माचा अकर्ता ।
तो म्हणे ’मी देह’ ’मी कर्मकर्ता’ । अहंममता भूलला ॥४२॥
जो न करितांचि चोरी । मी चोरु म्हणे राजद्वारीं ।
तो मारिजे लहानथोरीं । तैशी परी जडजीवां ॥४३॥
प्रकृतीचें कर्म आपुले माथां । घेऊनि नाचे अहंममता ।
तेणें अभिमानें दृढ बद्धता । आकल्पांता अनिवार ॥४४॥
तळीं मांडूनि काजळा । वरी ठेविला स्फटिकु सोज्ज्वळा ।
श्वेतता लोपूनि दिसे काळा । तेवीं आंधळा जीवु झाला ॥४५॥
कां आंधळें मातलें हातिरूं । नेणे निजपतन निर्धारु ।
तैसा जीवु लागे कर्म करूं । पतनविचारु तो न देख ॥४६॥
’मी देह मी कर्मकर्ता । मी ज्ञाता मी विषयभोक्ता’ ।
ऐशी जे कां देहात्मता । ’दृढबद्धता’ तिये नांव ॥४७॥
एवं बद्ध-मुक्त-वर्तन । विशद केलें निरूपण ।
आतां केवळमुक्ताचें लक्षण । आवडीं श्रीकृष्ण सांगतु ॥४८॥
’ज्ञानिया तो तंव आत्मा माझा’ । हे अतिप्रीती गरुडध्वजा ।
हें गुह्य सांगितलें कपिध्वजा । रणसमाजा रणरंगीं ॥४९॥
तेंचि आतां उद्धवाप्रती । अत्यादरें सांगे श्रीपती ।
ज्ञानियांची मुक्तस्थिती । यथानिगुतीं निजगुह्य ॥२५०॥
ज्ञानलक्षणें सांगतां । धणी नपुरे श्रीकृष्णनाथा ।
निरोपणमिसें ज्ञानकथा । मागुतमागुतां सांगतु ॥५१॥
यालागीं ज्ञानभक्तांची गोडी । श्रीकृष्णाचि जाणे फुडी ।
कृष्णभजनाची आवडी । भक्त ते गोडी जाणती ॥५२॥
आधींच तंव हे मुक्ताची कथा । वरी श्रीकृष्णासारिखा वक्ता ।
उद्धवाचें भाग्य वर्णितां । न वर्णवे सर्वथा शेषादिकां ॥५३॥
उद्धव अर्जुनासमान । त्याहूनि हा दिसे गहन ।
ते परस्परें नरनारायण । गुह्य ज्ञान बोलिले ॥५४॥
तेचि उलथूनि ज्ञानकथा । उद्धवासी होय सांगता ।
उद्धवा ऐसें भाग्य तत्त्वतां । न दिसे सर्वथा आनासी ॥५५॥
जाणें सांडूनि निजधामा । मागें ठेवूनि आपल्या कामा ।
उद्धव आवडला पुरुषोत्तमा । त्याचिया प्रेमा विगुंतला ॥५६॥
यालागीं उद्धवाचें शुद्ध पुण्य । जगीं उद्धवुचि धन्य धन्य ।
जयालागीं स्वयें नारायण । स्वानंदघन वोळला ॥५७॥
जो नातुडे योगयागसंकटीं । तो उद्धवाच्या बोलासाठीं ।
जेवीं व्याली धेनु वत्सा चाटी । तेवीं गुह्य गोठी सांगतु ॥५८॥
जो निजकुळासी काळु । तो उद्धवासी अतिस्नेहाळु ।
बापु भक्तकाजकृपाळु । ज्ञानकल्लोळु तुष्टला ॥५९॥
यालागीं उद्धवाचें नांव घेतां । श्रीकृष्ण निवारी भवव्यथा ।
ऐसी भक्तप्रीती भगवंता । भक्तातें स्मरतां हरि तारी ॥२६०॥
मुक्ताचीं लक्षणें निर्धारितां । लाभे आपुली निजमुक्तता ।
एका जनार्दनु विनवी संतां । मुक्तकथा हरि बोले ॥६१॥
कृष्णु उद्धवासी म्हणे मी तुज । सांगेन आपुलें निजगुज ।
मुक्तलक्षणाचें भोज । नवल चोज परियेसीं ॥६२॥
एवं विरक्तः शयने आसनाटनमज्जने ।
दर्शनस्पर्शनघ्राण भोजनश्रवणादिषु ॥ ११ ॥
ऐकें मुक्ताचें लक्षण । आसन भोजन शयन ।
दर्शन स्पर्शन घ्राण । अटन मज्जन करी कैसें ॥६३॥
मागील श्लोकार्थु संपतां । प्रकृतिकर्म अभिमानता ।
तेणें लागली दृढबद्धता । तो अहंकारु ज्ञाता नातळे ॥६४॥
सर्वकर्मीं स्वभावतां । ज्ञात्याची निरभिमानता ।
ते मी समूळ सांगेन कथा । सावधानता अवधारीं ॥६५॥
जेवीं छायेचा मानापमान । पुरुषा न बाधी अणुप्रमाण ।
तेवीं देहाचें कर्माचरण । निरभिमान मुक्तासी ॥६६॥
स्वाधिष्ठान तेंचि ’आसन’ । अखंड त्यावरी आरोहण ।
तेथें येवोंचि नेणे अभिमान । बैसलें मन उठेना ॥६७॥
नवल आसनाचें महिमान । हारपोनि गेलें विस्मरण ।
कदा एकांतु न मोडे जाण । हें ’सहजासन’ मुक्ताचें ॥६८॥
जें आसनींचें समाधान । समाधि आणि व्युत्थान ।
करी दोंहीची बोळवण । हें चालतें ’आसन’ मुक्ताचें ॥६९॥
जें बैसल्या आसनीं समाधान । त्याचि स्थिति ’गमनागमन’ ।
उठिलों बैसलों नाठवे जाण । चालतेंपण स्फुरेना ॥७०॥
चालतांही चपळ पदीं । मी चालतो हे नाठवे बुद्धी ।
चालतां न मोडे समाधी । हे लक्षणसिद्धी मुक्ताची ॥७१॥
जरी त्रैलोक्य हिंडला । तरी ठायींहूनि नाहीं हालला ।
ऐसा न चलोनि मुक्तु चालला । जेवीं अभ्रें धांवला दिसे चंद्र ॥७२॥
कुलालचक्रीं बैसली माशी । ते न हालतां भंवे चक्रासरसीं ।
मुक्तांची गमनसिद्धी तैशी । देहगमनेंसीं आभासे ॥७३॥
देहो प्रारब्धास्तव हिंडे । बैसका स्वस्वरूपींची न संडे ।
जेवीं रथीं धांवतां सवेग घोडे । निद्रा न मोडे रथस्थाची ॥७४॥
ऐसें न चळतां जें चळण । तें जाण मुक्ताचें ’गमन’ ।
आतां ऐक त्याचें ’स्नान’ । निमज्जन निजरूपीं ॥७५॥
स्नान करी गंगाजळें । परी गंगादकातें नातळे ।
मन ’चित्स्वरूपीं’ केलें सोवळें । तें वोवळें हों नेणे ॥७६॥
त्यासी निजस्वरूपीं नाहतां । जाहली परम पवित्रता ।
तीर्थे मागती चरणतीर्था । ऐशी सुस्नातता मुक्ताची ॥७७॥
तो चिन्मात्रचि देखे जीवन । अखंड चिद्रुपीं अवगाहन ।
इतर म्हणती केलें स्नान । त्यासी निमज्जन निजरूपीं ॥७८॥
त्याचे चरणींचे रजःकण । लाहोनि धरा परम पावन ।
त्याचेनि प्राणसंगें जाण । पवित्रपण वायूसी ॥७९॥
त्याचेनि चरणस्पर्शे तत्त्वतां । पवित्र झाल्या गंगादि सरिता ।
त्याचेनि जठरसंगे सर्वथा । अतिपवित्रता अग्नीसी ॥२८०॥
त्याच्या हृदयावकाशीं आकाश । सगळें राहिलें सावकाश ।
तेणें पवित्र जाहलें आकाश । अलिप्त उदास सर्वत्र ॥८१॥
जे चढोनि बैसले वैकुंठीं । ते सदा वांछिती त्याची भेटी ।
वेदु ऐकों धांवें गोठी । तो पहावया दिठीं देव येती ॥८२॥
एवं चित्स्वरूपीं करूनि स्नान । जाहला सर्ववंद्य अतिपावन ।
हें मुक्ताचें स्नानलक्षण । आतां ’निरीक्षण’ तें ऐक ॥८३॥
अवघें चराचर देखतां । तो देखोनीचि न देखता ।
दृष्टीसी दृश्यासी अलिप्तता । दृश्य देखतां हरि दिसे ॥८४॥
दृश्यें दुमदुमित दिसे सृष्टी । परी दृश्य न पडे त्याचे दृष्टीं ।
होतांही दृश्येंसीं भेटी । पडे मिठी अदृश्यीं ॥८५॥
दृष्टि प्रकाशे देखणेपणीं । तें देखणें देखे दृश्यस्थानीं ।
जेवीं डोळ्यां डोळा दर्पणीं । निज दर्शनीं देखतु ॥८६॥
डोळेनि दर्पणु प्रकाशे । त्यामाजीं डोळेनि डोळा दिसे ।
मुक्ताचें देखणें तैसें । आपणयाऐसें जग देखे ॥८७॥
दृश्य-द्रष्टा-दर्शनीं । त्रिपुटी गेली हारपोनी ।
देखणें देखे देखणेनी । देखणा होउनी सर्वांगें ॥८८॥
होतां नाना पदार्थेंसी भेटी । तें देखणेपणा दृश्य लोटी ।
दृश्यातीत निजदृष्टीं । सुखें सृष्टी देखतु ॥८९॥
मुक्ताची हे देखती स्थिती । देखणेपणें यथानिगुतीं ।
उद्धवा ये दृष्टीची ज्यासी प्राप्ती । तोचि त्रिजगतीं पावन ॥२९०॥
या दृष्टीं जे नित्य वर्तत । ते जाण पां परम मुक्त ।
या दृष्टीं जे मज पाहत । परम भागवत प्रिय माझे ॥९१॥
परादिवाचांमाजीं वचन । उपजे तेथ याचें ’श्रवण’ ।
श्रोता वक्ता कथा कथन । अवघें आपण होऊनि ऐके ॥९२॥
शब्दजातेंसी कान । अखंड जडले सावधान ।
श्रवणामाजीं हारपे गगन । परम समाधान श्रवणाचें ॥९३॥
ऐकतां लौकिक शब्द । कां नारायण-उपनिषद ।
परिसतां नाम हरि-गोविंद । अर्थावबोध समत्वें ॥९४॥
बोलातें जो बोलविता । तोचि श्रवणामाजीं श्रोता ।
येणें अन्वयें श्रवण करितां । शब्दीं निःशब्दता अतिगोड ॥९५॥
जो जो श्रवणीं पडे शब्दु । तो तो होत जाय निःशब्दु ।
यापरी श्रवणीं परमानंदु । स्वानंदबोधु मुक्ताचा ॥९६॥
अकारादि वर्णत्रिपुटी । प्रणवु मूळशब्द सृष्टीं ।
तो ओंकार ब्रह्मरूपें उठी । हे श्रवणसंतुष्टी मुक्ताची ॥९७॥
श्रवणीं पडतां शब्दज्ञान । सहजें शाब्दिक जाय उडोन ।
श्रवणीं ठसावे ब्रह्म पूर्ण । स्वानंदश्रवण मुक्ताचें ॥९८॥
परिसतां उपनिषद । कां लौकिकादि नाना शब्द ।
मुक्ताचा पालटेना बोध । श्रवणीं स्वानंद कोंदला ॥९९॥
एक अद्वितीय ब्रह्म । हें वेदशास्त्राचें गुह्य वर्म ।
तें मुक्तांसी जाहलें सुगम । शब्दी परब्रह्म कोंदलें ॥३००॥
लौकिक वैदिक शब्द जाण । शब्दमात्रीं ब्रह्म पूर्ण ।
ऐसें मुक्ताचें हें श्रवण । ’घ्राणलक्षण’ । परियेसीं ॥१॥
घ्राणासी येतां सुगंधु । मुक्तासी नोहे विषयबोधु ।
गंधमिसें स्वानंदकंदु । परमानंदु उल्लासे ॥२॥
घ्राण-सुमन-चंदन । अवघें तो होय आपण ।
यापरी गंध भोगी जाण । भोक्तेंपण सांडोनी ॥३॥
घ्राणा येतांचि सुवासु । सुवासीं प्रकटे परेशु ।
तेव्हां सुवासु आणि दुर्वासु । हा विषयविलासु स्फुरेना ॥४॥
मलयानिलसंगें जाण । जेथ जेथ गंधाचें गमन ।
तेथ तेथ मुक्ताचें घ्राण । अगम्यपण या भोगा ॥५॥
जितुका चळता वायु जाण । तितुकें मुक्ताचें घ्राण ।
यापरी गंधग्रहण । स्वभावें जाण होतसे ॥६॥
यापरी जाण तत्त्वतां । होय तो गंधाचा भोक्ता ।
हे घ्राणक्रिया जाण मुक्ता । ’रसभोग्यता’ अवधारीं ॥७॥
रस-रसना-भोजन । तो स्वयेंचि आहे आपण ।
हातु न माखितां सर्वापोशन । रसनेविण सेवितु ॥८॥
षड्रसांचा स्वादु जाणे । परी एकीचि चवीं अवघें खाणें ।
भोक्तपणा आतळों नेणे । ऐसेनि भोजनें नित्यतृप्तु ॥९॥
भूक उपजोंचि नेणे । जेवूं बैसल्या पुरे न म्हणे ।
सर्वभक्षी नखातेपणें । उच्छिष्ट होणें त्या नाहीं ॥३१०॥
ताट अन्न आणि आपण । तो न देखे भिन्नपण ।
रसमिसें स्वानंदपूर्ण । सर्वांगें जाण सेवित ॥११॥
जंव रसना घेवों जाय रसस्वादु । तंव तेथें प्रकटे परमानंदु ।
करूनि रसरसने उच्छेदु । निजानंदु सेवितु ॥१२॥
सकळ गोडियांची मूळ गोडी । तेथ बैसली निजआवडी ।
सेवितां नाना परवडी । तेचि गोडी गोडपणें ॥१३॥
सकळ गोडियां जें गोड आहे । ते गोडीच तो झाला स्वयें ।
आतां जो जो रसविषयो खाये । तेथ तेथ आहे ते गोडी ॥१४॥
कैसा मुक्ताचा निजबोधु । घेवों जातां रसस्वादु ।
रसत्व लोपूनि स्वानंदकंदु । परमानंदु वोसंडे ॥१५॥
यालागीं जो जो रस सेवूं जाये । तो तो ब्रह्मरसुच होये ।
मुक्ताची रसना यापरी पाहें । घेत आहे रसातें ॥१६॥
एवं मुक्ताचें जें भोजन । ते करिती क्रिया ऐशी जाण ।
आतां तयाचें जें ’स्पर्शन’ । तेंही लक्षण परियेसीं ॥१७॥
मुक्ता शीत लागतांचि जाण । शीत सांडी शीतळपण ।
स्पर्शे उष्णत्वा मुकलें उष्ण । स्पर्शलक्षण हें त्याचें ॥१८॥
जेवीं कां टेंकितां अग्नीशी । घुरें आणी चंदनाशी ।
जाळूनि त्यांच्या विकाराशी । आपणाऐशीं करी वन्ही ॥१९॥
तेवीं मुक्तासी द्वंद्वें आदळतां । द्वंद्वांची बुडाली द्वंद्वता ।
तो सर्वी सर्वपणें असतां । सहजे द्वंद्वता निमाली ॥३२०॥
तेथ कैंचे मृदु कैंचें कठिण । कैंचें शीत कैंचें उष्ण ।
सर्वीं सर्वात्मा तो जाण । द्वंद्वाचें भान स्पर्शेना ॥२१॥
आगीसी पोळीना उन्हाळा । हींव पीडीना हिमाचळा ।
तैशी द्वंद्वांची हे माळा । मुक्ताचे गळां पडेना ॥२२॥
सुवर्णाचे अलंकार भले । सुवर्णपेटीमाजी झांकिले ।
झांकिले म्हणतां उघडे ठेले । तेवीं द्वंद्वें सकळ परब्रह्म ॥२३॥
अंगीं जें जें आदळें । तें अंगचि होय तत्काळें ।
कांहीं नुरे त्यावेगळें । द्वंद्वे सकळें निमालीं ॥२४॥
त्यासी हातीं लीलाकमळ सांपडे । तंव कमळीं कमळत्वचि उडे ।
कमळजन्मा तोही बुडे । करी रोकडे निजरूप ॥२५॥
स्पर्श-स्पर्शतें-स्पर्शावें । हेही त्रिपुटी न संभवे ।
किंबहुना आपणचि आघवें । निजस्वभावें होऊनि ठेला ॥२६॥
तो देवपूजा हातीं धरी । तरी मीचि ते देवपूजेभीतरीं ।
अथवा खेळों रिघाल्या पाथरीं । त्याहीमाझारीं मी त्यासी ॥२७॥
भिंती नानावर्ण चित्राकृती । तेथें जें जें स्पर्शे तें तें भिंती ।
तेवीं मुक्ताची स्पर्शनस्थिती । पूर्ण अद्वैतीं निजबोधु ॥२८॥
यापरीं गा तत्त्वतां । स्पर्शलक्षण वर्ते मुक्ता ।
त्याचें ’बोलणें’ जें सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥२९॥
सुरस कथा सांगे वाडेंकोडें । अथवा लौकिक बोलणें घडे ।
परी त्याची समाधिमुद्रा न खंडे । मौन न मोडे बोलतां ॥३३०॥
बोलतांही न मोडे मौन । हेचि अनुभवाची आंतुली खूण ।
शब्दामाजीं निःशब्दगुण । सज्ञान जाण जाणती ॥३१॥
स्त्रीपुरुषें अबोला चालती । तो अबोला कीं अतिप्रीती ।
तेवीं मुक्ताची बोलती स्थिति । शब्द शब्दार्थी निःशब्द ॥३२॥
जयाचीं बोलतीं अक्षरें । अक्षररूपेंचि साचारें ।
त्याचीं ऐकतां उत्तरें । चमत्कारें मन निवे ॥३३॥
मी एकु चतुर बोलका । हाही नाहीं आवांका ।
अथवा रंजवावें लोका । हेंही देखा स्मरेना ॥३४॥
निःशब्दीं उठती शब्द । शब्दामाजीं ते निःशब्द ।
यापरी करितांही अनुवाद । बोलोनि शुद्ध अबोलणा ॥३५॥
जळामाजीं उपजे तरंग । जळ तरंगाचें निजांग ।
तेवीं निःशब्दीं शब्द साङ्ग । शब्दाचें सर्वांग निःशब्द ॥३६॥
वाच्य-वाचा-वाचकता त्रिपुटी । लोपूनि सांगे गोड गोठी ।
करितां सैराट चावटी । न सुटे मिठी मौनाची ॥३७॥
म्यां सत्यचि बोलावें । हेंही त्यासी जीवें नाठवे ।
मिथ्या बोलों लोभस्वभावें । हेंही न संभवे मुक्तासी ॥३८॥
सत्य मिथ्या जीं बोलणीं । निःशेष प्राशूनि नेलीं दोनी ।
मूळींच्या मौनें जाहला मौनी । नाना वचनीं बोलतां ॥३९॥
तेथ सैराट हाक देतां । कां सिंहनादें गर्जतां ।
शब्दीं ठसावली निःशब्दता । मौन सर्वथा मोडेना ॥३४०॥
जरी तो माझें स्तवन करी । तरी मी त्याच्या स्तवना माझारीं ।
तो जरी सैरा बडबड करी । त्याही माझारीं मी त्यासी ॥४१॥
जरी त्यासी येऊनि भांडण पडे । तरी भांडणही करणें घडे ।
त्या कळहामाजीं मागेंपुढें । चहूंकडे मज देखे ॥४२॥
त्याचे वांकुडे तिकुडे व्यंग बोल । ते जाण ब्रह्मचि केवळ ।
तया आम्हां अभिन्न मेळ । निजात्मसाल वस्तीसी ॥४३॥
अवचटें ये त्याच्या मुखाबाहेरीं । ज्यासी म्हणे ’तुज देवो तारी’ ।
त्यासी मी वाउनियां शिरीं । ब्रह्मसाक्षात्कारीं पाववीं ॥४४॥
यालागीं त्याच्या वचनाऽधीन । मी सर्वथा असें जाण ।
त्याचें वचन तें प्रमाण । सर्वस्वें जाण मी मानीं ॥४५॥
आतां ’तो’ ’मी’ हे ऐशी बोली । बाहेरसवडी वाढिन्नली ।
’मी तोचि तो’ हे किली । मागीं चोजवली मद्भक्तां ॥४६॥
यालागीं तो माझा जीवप्राण । मी त्याचें निजजीवन ।
तयासीं मज भिन्नपण । कल्पांतीं जाण असेना ॥४७॥
एवं तो सगळा मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरीं ।
ऐसेनि अभिन्नपणेंकरीं । सुखें संसारीं नांदतु ॥४८॥
त्याचे मुखींचे जे जे बोल । ते मीचि बोलता सकळ ।
मुक्ताचें बोलणें केवळ । तुजप्रती विवळ म्यां केलें ॥४९॥
’हातीं’ कांही घेवों जाये । तंव घेणें देवोचि होये ।
देतां कांहीं देवो पाहे । तेंही होये तद्रूप ॥३५०॥
तेव्हां दान आणि देते-घेते । भिन्नपणें न देखे तेथें ।
यालागीं करोनियां अकर्ते । यापरी करांतें वर्तवी ॥५१॥
निजस्वभावें ते कर । जो कांहीं करिती व्यापार ।
तेथ नकेलेपणाचें सूत्र । सहजीं साचार ठसावे ॥५२॥
करीं पडलिया शस्त्र । करूं जाणे तो व्यापार ।
परी ’मी कर्ता’ हा अहंकार । अणुमात्र असेना ॥५३॥
पुढें वोढवलें अवचितें । तरी खेळों जाणे द्यूतकर्मातें ।
हारी जैत नाठवे चित्तें । निजस्वभावें तें खेळतु ॥५४॥
वोडवल्या ब्राह्मणपूजा । करूं जाणे अतिवोजा ।
पूज्यपूजकत्वें भावो दुजा । न मनूनि द्विजां पूजितु ॥५५॥
धनुषीं काढूं जाणे वोढी । अनुसंधानें बाण सोडी ।
अलक्ष्य लक्षूनि भेदी निरवडी । परी न धरी गोडी श्लाघेची ॥५६॥
कैसें कर्म निपजे करीं । जैशा समुद्रामाजीं लहरी ।
तैसा निजस्वरूपामाझारीं । नाना व्यापारीं निश्चळु ॥५७॥
सूर्य मृगजळातें भरी । तैसा व्यापारु निजनिर्विकारीं ।
परी केलेंपण शरीरीं । तिळभरी असेना ॥५८॥
सूर्यकांतीं अग्नि खवळे । तें कर्म म्हणती सूर्यें केलें ।
तैसें हस्तव्यापारें जें जें जाहलें । नाहीं केलें तें त्याणें ॥५९॥
सूर्यकांतीं पाडावा अग्नी । हें नाहीं सूर्याचे मनीं ।
तेवीं मुक्त निरभिमानी । क्रियाकरणीं विचरतु ॥३६०॥
त्यासी चालवूं जातां ’पायें’ । तळीं पृथ्वी नाहीं होये ।
आपण आपणियावरी पाहे । चालतु जाये स्वानंदें ॥६१॥
जळींचा जळावरी तरंग । अभिन्नपणें चाले चांग ।
तैसा तो निजरूपीं साङ्ग । चालवी अंग चिद्रूपें ॥६२॥
तयासी असतांही चरण । आवडीं चाले चरणेंविण ।
करी सर्वांगें गमन । सर्वत्र जाण झालासे ॥६३॥
जेवीं अखंडदंडायमान । पायेंवीण चाले जीवन ।
तेवीं चरणेंवीण गमन । नित्य सावधान मुक्ताचें ॥६४॥
सर्वथा पायेंविण । वायूचें सर्वत्र गमन ।
तैसेंच मुक्ताचें लक्षण । स्वरूपीं जाण सर्वत्र ॥६५॥
यापरी न हालतां जाण । त्याचें सर्वत्र ’गमन’ ।
नाठवे चालतेंपण । ऐसेंच लक्षण मुक्ताचें ॥६६॥
मूळीं आत्मा आत्मी नाहीं जाणा । यालागीं स्त्रीपुरुषभावना ।
त्यासी सर्वथा आठवेना । दैवें ’अंगना’ तो भोगी ॥६७॥
नटु नाटकु अवगमला । पुरुष स्त्रीवेषें दिसों आला ।
स्त्रीपुरुषभावो संपादिला । तेवीं हा जाहला गृहस्थु ॥६८॥
कां अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
मुक्तासी जाण तैशापरी । स्त्रीपुरुषाकारीं निजबोधु ॥६९॥
जेवीं कां आपुली साउली । आवडीं आपण आलिंगिली ।
तेवीं मुक्तें स्त्री भोगिली । द्वैताची भुली सांडोनी ॥३७०॥
छाया कोठें असे कोठें वसे । सरशी असतां ज्याची तो न पुसे ।
मुक्तासी जाण तैसें । लोलुप्य नसे स्त्रियेचें ॥७१॥
एवं स्त्रीपुरुषविकारप्राप्ती । त्याची न मोडे आत्मस्थिती ।
दैवें जाहलिया संतती । आत्मप्रतीति तेथेंही ॥७२॥
’आत्मा वै पुत्रनामासि’ । सत्यत्व आलें ये श्रुतीसी ।
पुत्रत्वें देखे आपणासी । निजरूपेंसीं सर्वदा ॥७३॥
स्वयें जनकु जननी । स्वयें क्रिडे पुत्रपणीं ।
आपणावांचूनि जनींवनीं । आणिक कोणी देखेना ॥७४॥
एवं स्त्रीपुत्रसंतती । जेवीं आकाशी मेघपंक्ती ।
काळें येती काळें जाती । तैशी स्थिती मुक्ताची ॥७५॥
स्त्रीसंभोगीं जें होय सुख । तें सुख मुक्तासी सदा देख ।
यालागी स्त्रीकामअभिलाख । नाही विशेख मुक्तासी ॥७६॥
जैसे राजहंसापाशीं शेण । तैसें मुक्तापाशीं जाण ’धन’ ।
त्यावरी त्याचें नाहीं मन । उदासीन सर्वदा ॥७७॥
व्याघ्रासी वाढिलें मिष्टान्न । तें त्यासी जैसें नावडे जाण ।
तैसें मुक्तासी नावडे धन । धनलोभीपण त्या नाहीं ॥७८॥
पोतास कापुराचा डला । जेवीं नातळे काउळा ।
तेवीं अनर्घ्यरत्नमाळा । मुक्तें सांडिल्या थुंकोनि ॥७९॥
ज्यासी धनलोभाची आस्था । त्यासी कल्पांतीं न घडे मुक्तता ।
तैसें स्त्रीकामिया सर्वथा । नव्हे परमार्थता निजबोधु ॥३८०॥
मुक्ताचिये निद्रेपाशीं । समाधि ये विश्रांतीसी ।
शिणली धांवे माहेरा जैशी । तैसी विसाव्यासी येतसे ॥८१॥
जागृतिस्वप्नसुषुप्तीसी । नातळोनि तींही अवस्थांसी ।
निजीं निजे निजत्वेंसीं । अहर्निशीं निजरूपें ॥८२॥
निजीं निजों जातां निर्धारा । तळीं हरपली धरा ।
वरी ठावो नाहीं अंबरा । ऐशिया सेजारामाजीं निजे ॥८३॥
नवल निजती त्याची वोज । चालतां बोलतां न मोडे नीज ।
खातां जेवितां अखंड नीज । सहजीं सहज निजरूप ॥८४॥
निजवितें कां उठवितें । दोनी तोचि आहे तेथें ।
कोण कोणा जागवितें । निजे सुचित्तें निजरूपें ॥८५॥
जागतां निजेशीं वागे । वागतांही नीज लागे ।
एवं नीजरूप जाहला अंगें । निद्रेचेनि पागें पांगेना ॥८६॥
शय्या-शयन सेजार । अवघे तोचि असे साचार ।
आपुल्या निजाचें आपण घर । नित्य निरंतर निजीं निजे ॥८७॥
ऐसें जें जें करूं जाय कर्म । तेथ तेथ प्रकटे परब्रह्म ।
मुक्तासी एकुही नाहीं नेम । हें मुख्य वर्म मुक्ताचें ॥८८॥
मुक्तासी नेमबंधन । तैं अंगीं लागलें साधन ।
साधन असतां मुक्तपण । न घडे जाण सर्वथा ॥८९॥
मुक्तासी तंव आसक्ती । सर्वदा नाहीं सर्वार्थी ।
शेष प्रारब्धाचे स्थितीं । कर्में निफजतीं निरपेक्ष ॥३९०॥
ज्याचा निमाला अहंकारु । तो माझें स्वरूप साचारु ।
ये अर्थी न लगे विचारु । वेदशास्त्र-संमत ॥९१॥
जो नित्यमुक्त निर्विकारी । तो वर्ततां वर्ते मजमाझारीं ।
मी तया आंतुबाहेरीं । जेवीं सागरीं कल्लोळ ॥९२॥
यापरी झाला जो परब्रह्म । त्यासी स्वप्नप्राय धर्माधर्म ।
बाधूं न शके इंद्रियकर्म । हें त्याचें वर्म तो जाणे ॥९३॥
न तथा बध्यते विद्वान् तत्र तत्रादयन् गुणान् ।
प्रकृतिस्थोऽप्यसंसक्तो यथा खं सवितानिलः ॥ १२ ॥
जिंहीं इंद्रियीं कर्म करितां । मूर्खासी झाली दृढबद्धता ।
तिंहीं इंद्रियीं वर्ततां ज्ञाता । नित्यमुक्तता अनिवार ॥९४॥
मूर्खासी कर्मीं अभिमान । ज्ञाता सर्व कर्मीं निरभिमान ।
बंधमोक्षाचें कारण । अहंकारु जाण जीवांसी ॥९५॥
’अहं कर्ता’ ’अहं भोक्ता’ । हेचि मूर्खाची दृढबद्धता ।
तें प्रकृतिकर्म आपुले माथां । नेघे ज्ञाता अभिमानें ॥९६॥
तेचि ज्ञात्याची निरभिमानता । तुज म्यां सांगितली आतां ।
इंद्रियां विषयो भोगवितां । आपुली अभोक्तृता तो जाणे ॥९७॥
आपुली छाया विष्ठेवरी पडे । अथवा पालखीमाजीं चढे ।
तो भोगु आपणियां न घडे । तैसेंचि देह रोकडें मुक्तासी ॥९८॥
मज होआवी विषयप्राप्ती । हेंही ज्ञाते न वांछिती ।
विषय मिथ्यात्वें देखती । जेवीं कां संपत्ती चित्रींची ॥९९॥
यालागीं असोनियां देहीं । तो नित्यमुक्त विदेही ।
त्यासी प्रकृतिगुणांच्या ठायीं । अभिमानु नाहीं सर्वथा ॥४००॥
म्हणसी ’असोनियां देहीं । कोण्या हेतु तो विदेही’ ।
उद्धवा ऐसें कल्पिशी कांहीं । तो दृष्टांतु पाहीं सांगेन ॥१॥
आकाश सर्वांमाजीं असे । सर्व पदार्थीं लागलें दिसे ।
परी एकेंही पदार्थदोषें । मलिन कैसें हों नेणे ॥२॥
त्या गगनाचेपरी पाहीं । ज्ञाता असोनियां देहीं ।
देहकर्माच्या ठायीं । अलिप्त पाहीं सर्वदा ॥३॥
प्रचंड आणोनि पाषाणीं । आकाश न चेंपे चेंपणीं ।
तेवीं क्षोभलियाही प्रकृतिगुणीं । ज्ञाता जडपणीं न बंधवे ॥४॥
आकाश असोनियां जनीं । कदा रुळेना जनघसणीं ।
तैसा प्रकृतिकर्मी वर्तोनी । प्रकृतिगुणीं अलिप्त ॥५॥
गगन जळीं बुडालें दिसे । परी तें जळामाजीं कोरडें असे ।
तेवीं पुत्रकलत्रीं ज्ञाता वसे । तेणें दोषें अलिप्त ॥६॥
आकाशा मसी लावूं जातां । मसीं माखे तो लाविता ।
तेवीं मुक्तासी दोषी म्हणतां । दोष सर्वथा म्हणत्यासी ॥७॥
शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लागती अंबरा ।
तेवीं नाना द्वंद्वसंभारा । मुक्ताचा उभारा निर्द्वंद्व ॥८॥
येऊनि नाना मेघपटळें । गडगर्जनें गगन झांकोळे ।
त्यामाजीं असोनियाँ वेगळें । गगन नातळे मेघातें ॥९॥
तेवीं मोहममतेच्या कडाडी । मुक्तासी करिती ताडातोडी ।
ते तंव त्यास न लगे वोढी । परापर थडी अलिप्तु ॥४१०॥
गगनासी आगी लावूं जातां । अग्नि विझोनि जाय सर्वथा ।
तेवीं त्रिगुणीं मुक्तासी बांधतां । गुणीं सगुणता निमाली ॥११॥
प्रळयवायूचेनि झडाडें । आकाश निजस्वभावें नुडे ।
सगळा वायु गगनीं बुडे । पाहतां नातुडे गगनींही ॥१२॥
तेवीं अविद्या निजस्वभावतां । मुक्तासी न करवेचि बद्धता ।
’अविद्या’ नांवें मिथ्या वार्ता । मुक्त तत्त्वतां देखेना ॥१३॥
गगनाच्या ऐशी अलिप्तता । सर्व कर्मीं वर्ते ज्ञाता ।
जनीं अलिप्त वर्ते सविता । तेवीं मुक्तता अवधारीं । ।१४॥
घृतमद्यजळां आंतौता । बिंबोनि अलिप्त सविता ।
तेवीं बाल्य-तारुण्य-वृद्धता । वयसा चाळितां अलिप्त ॥१५॥
नातरी सूर्याचेनि प्रकाशें । शुभाशुभ कर्म वाढलें असे ।
सविता अलिप्त तेणें दोषें । निजप्रकाशें प्रकाशकु ॥१६॥
तेवीं आश्रमधर्मीं असतां । नित्यादि कर्में आचरितां ।
मुक्तासी नाहीं कर्मबद्धता । अकर्तात्मता निजबोधें ॥१७॥
सूर्यकांतीं सविता । अग्नि उपजवूनि अकर्ता ।
तैसा निजतत्त्वाचा ज्ञाता । करोनि अकर्ता कर्मांचा ॥१८॥
जळीं सविता प्रतिबिंबला । परी तो नाहीं वोला झाला ।
तैसा स्त्रीसंगें प्रजा व्याला । नाही मुकला ब्रह्मचर्या ॥१९॥
सवित्याचें अलिप्तपण । तें निरूपिलें निरूपण ।
आतां देहीं असोनि अलिप्तपण । तेंही लक्षण अवधारीं ॥४२०॥
जेवीं देहामाजीं असे प्राण । प्राणास्तव देहचलन ।
परी देहदोषा नातळे प्राण । अलिप्त जाण सुखदुःखां ॥२१॥
तैसा मुक्त असोनि संसारी । संसारव्यवहार सर्व करी ।
परी संसारदोषु अंगावरी । तिळहीभरी लागेना ॥२२॥
वायु सर्वांतें स्पर्शतु । परी स्पर्शदोषांसी अलिप्तु ।
तेवीं अहंममता नातळतु । मुक्त वर्ततु देहगेहीं ॥२३॥
वायूसी जेवीं सर्वत्र गमन । परी कोठेंही आसक्त नव्हे जाण ।
तेवीं विषयी नहोनि आपण । विषयसेवन मुक्ताचें ॥२४॥
वायूसी एके ठायीं नाहीं वस्ती । मुक्तासी देहगेहीं नाहीं आसक्ती ।
वायूसी नभामाजीं विश्रांती । मुक्तासी गुणातीतीं विश्राम ॥२५॥
एवढें जें अगाधपण । तें मुक्ताचें मुक्तिकारण ।
उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण । प्रथम जाण विवेकु ॥२६॥
वैशारद्येक्षयासङ्ग शितया छिन्नसंशयः ।
प्रतिबुद्ध इव स्वप्नान् नानात्वाद् विनिवर्तते ॥ १३ ॥
विवेकें बुद्धि अतिसंपन्न । तिसी उपजे नित्यानित्यज्ञान ।
परी तें खिरंगटलें असे जाण । वैराग्येंवीण वाढेना ॥२७॥
विवेकेंवीण वैराग्य गहन । तें केवळ आंधळें जाण ।
नेणें आपुलें निजात्मपतन । अंधकूपीं जाण तें पडे ॥२८॥
मातलें हातिरूं अंध । सैरा धांवे सुबद्ध ।
नेणें निजात्मपतनबाध । तेवीं वैराग्य मंद विवेकेंवीण ॥२९॥
जेथ विवेकवैराग्यसंयोग । तेथ नित्यसंग्रहो अनित्यत्याग ।
तेंचि ’सद्विद्यालक्षण’ खड्ग । झळकत चांग नैराश्यें ॥४३०॥
तेंचि गुरु वचनसहाणेसी । लावूनि अतितीक्ष्ण केलें त्यासी ।
घायें छेदिलें संशयासी । संकल्पविकल्पेंसीं समूळ ॥३१॥
असंभावना विपरीतभावना । निःशेष तुटलिया वासना ।
निजस्वरूपीं तेव्हां जाणा । जागेपणा तो आला ॥३२॥
जो अविद्यालक्षण दीर्घ स्वप्न । नानात्वें भोगिता आपण ।
तो अद्वैतीं जागा झाला जाण । कृपा थापटून गुरुवचनें ॥३३॥
तेव्हां नानात्वासीं नाहीं ठावो । ’मी माझें’ हें झालें वावो ।
फिटला अविद्याभेद संदेहो । आत्मानुभवो तो भोगी ॥३४॥
जागा झाल्या स्वप्न भासे । परी तें मिथ्या झालें अनायासें ।
मुक्तासी जग तैसें दिसे । यालागीं तेणें दोषें अलिप्त ॥३५॥
एवं मुक्ताचें जें जें वर्तन । तें अलिप्तपणें ऐसें जाण ।
’कथं वर्तेत’ हा प्रश्न । प्रसंगें लक्षण सांगितलें ॥३६॥
’कथं विहरेत्’ या प्रश्नाचें । उत्तर ऐकावया साचें ।
उदित मन उद्धवाचें । जाणोनि जीवींचें हरि बोले ॥३७॥
यस्य स्युर्वीतसङ्कल्पाः प्राणेन्द्रियर्ननोधियाम् ।
वृत्तयः स विनिर्मुक्तो देहस्थोऽपि हि तद्गुणैः ॥ १४ ॥
विद्यमान देहीं असतां । देहस्थ गुण नातळती मुक्ता ।
पापपुण्यादि हे कथा । सुखदुःखवार्ता तो नेणे ॥३८॥
सांडिल्या संकल्पविकल्पांसीं । कल्पांतींही नातळे त्यासीं ।
जेवीं कां ओकिल्या ओकासी । परतोनि कोणासी न घेववे ॥३९॥
यालागीं मन बुद्धि इंद्रिय प्राण । मुक्ताचीं जाहलीं संकल्पशून्य ।
याचिलागीं पापपुण्य । न लगे जाण मुक्तासी ॥४४०॥
इंद्रियीं विषयक्रीडन । करितां संकल्पशून्य ।
मुक्तासी मनपणें नाहीं मन । वृत्तिशून्य यालागीं ॥४१॥
बाळक लेणया प्रमाण नेणे । तरी अंगीं शोभे लेइलेपणें ।
तेवीं कर्में विगुंतलीं करणें । मुक्त अकर्तेपणें अलिप्त ॥४२॥
संकल्पविरहित विहार । तोचि मुक्त जाण पां साचार ।
’कथं विहरति’ हें उत्तर । थोडेनि फार सांगितलें ॥४३॥
म्यां सांगितलीं जीं जीं लक्षणें । तीं तीं मुक्ताचीं मुक्तचि जाणे ।
आणिकासी व्युत्पत्तिपणें । मुक्त जाणणें हें न घडे ॥४४॥
सकळ देहशास्त्रसंपन्न । त्यासीही मुक्त न कळे जाण ।
देहीं असे ज्यासी देहाभिमान । त्यासी मुक्तलक्षण कळेना ॥४५॥
म्यां बोलिले लक्षणांची पोथी । साक्षेपें घेऊनि हातीं ।
जर्ही हिंडिन्नला त्रिजगतीं । तर्ही मुक्ताची स्थिति कळेना ॥४६॥
जेणें साचार मुक्त जाणितला । तोही सत्य जाण मुक्त झाला ।
अनुमानयोग्यतेच्या बोला । मुक्त जाणवला हें मिथ्या ॥४७॥
जेणें सूर्य देखिला यथार्थता । तो जग देखे तत्प्रकाशता ।
तेणें मुक्त जाणितला तत्त्वतां । तो नित्यमुक्तता जग देखे ॥४८॥
तेथ हा मुक्त हा बद्ध । देखणें हें अतिअबद्ध ।
ऐसें देखती ते महामंद । अज्ञानांध अज्ञानी ॥४९॥
मुक्त न कळे सर्वथा । ऐसें बोलणें ऐकतां ।
उद्धवासी हो लागली चिंता । तें कृष्णनाथा कळों सरलें ॥४५०॥
मागां सांगितलीं मुक्तलक्षणें । तीं मुक्ताचीं मुक्तचि जाणे ।
लौकिकीं मुक्त कळे जेणें । तींही लक्षणें परियेसीं ॥५१॥
आश्वासावया उद्धवाचें मन । मुक्ताचें जाणतें लक्षण ।
सांगेन म्हणे श्रीकृष्ण । येरू सावधान सर्वस्वें ॥५२॥
कळतीं मुक्ताचीं लक्षणें । उद्धवु ऐकावया उदित मनें ।
तें जाणोनियां श्रीकृष्णें । विचित्र निरूपणें निरूपी ॥५३॥
यस्यात्मा हिंस्यते हिंस्रैः येन किञ्चिद् यदृच्छया ।
अर्च्यते वा क्वचित्तत्र न व्यतिक्रियते बुधः ॥ १५ ॥
ज्याचिया देहासी जाण । हिंसा करिती हिंसक जन ।
छेद भेद दंड मुंडण । गर्जन तर्जन जर्ही केलें ॥५४॥
तर्ही ते देहाची व्यथा । मुक्तासी नाहीं सर्वथा ।
नाना उपचारीं पूजितां । नेघे श्लाघ्यता सन्मानें ॥५५॥
देहीं वर्तमान असतां । देहबुद्धी नाहीं सर्वथा ।
त्यासीच बोलिजे जीवन्मुक्तता । यालागीं देहव्यथा त्या नाहीं ॥५६॥
जैसी पुरुषांसवें छाया असे । पुरुषयोगें चळती दिसे ।
ते छायेची अहंममता नसे । निजमानसें पुरुषासी ॥५७॥
तैसाचि मुक्ताचा देहो । मुक्तासवें वर्ते पहा हो ।
परी त्यासी नाहीं अहंभावो । हा नित्यस्वभावो मुक्ताचा ॥५८॥
त्यासी चोरु हेरु कातरु । म्हणौनि दंडु केला थोरु ।
कां पूजिला ईश्वरु । पुरुष श्रेष्ठतरु म्हणौनि ॥५९॥
परी पूजितां कां गांजितां । त्याची डंडळीना समता ।
जेवीं छायेची मानापमानता । न करी व्यथा पुरुषासी ॥४६०॥
देहो व्याघ्रामुखीं सांपडला । कां दैवें पालखीमाजीं चढला ।
तो हरुषविषादा नाहीं आला । समत्वें झाला निर्द्वंद्व ॥६१॥
देहो द्यावया नेतां सुळीं । मी मरतों ऐसें न कळवळी ।
कां गजस्कंधीं पूजिला सकळीं । तेणें सुखावली वृत्ति नव्हे ॥६२॥
सुखदुःखादि नाना व्यथा । आगमापायी आविद्यकता ।
देहाचें मिथ्यात्व जाणता । यालागीं व्यथा पावेना ॥६३॥
अतिसन्मानु जेथ देखे । तेथ न राहे तेणें सुखें ।
अपमानचिये आडके । देखोनि न फडके भयभीतु ॥६४॥
देहासी नाना विपत्ति होये । तोही त्या देहाचें कौतुक पाहे ।
देह माझें मज व्यथा आहे । हें ठावें नोहे मुक्तासी ॥६५॥
येथवर देहातीतता । दृढ बाणली जीवन्मुक्ता ।
यालागीं देहदुःखाची व्यथा । त्यासी सर्वथा बाधीना ॥६६॥
नाना जनपदवार्ता । अतिस्तवनें स्तुति करितां ।
कां पारुष्यवचनें निंदितां । मुक्तासी व्यथा उपजेना ॥६७॥
न स्तुवीत न निन्देत कुर्वतः साध्वसाधु वा ।
वदतो गुणदोषाभ्यां वर्जितः समदृङ् मुनिः ॥ १६ ॥
निंदेच्या तिखट बाणीं । दृढ विंधिल्या दुर्जनीं ।
हे असाधु हें नुपजे मनीं । न बोले वचनीं ते दोष ॥६८॥
भाविक सात्त्विक साधु । मिळोनि करिती स्तुतिवादु ।
तूं ईश्वरी पुरुष शुद्धु । हा गुणानुवादु ऐकोनि ॥६९॥
मी उत्तम हें नुपजे मनीं । उंच नीच न देखे जनीं ।
हे साधु लोक भले गुणी । हे मुक्ताची वाणी वदेना ॥४७०॥
साधु असाधु पाहतां जनीं । तो ब्रह्मरूप देखे दोनी ।
देखतें देखे तद्रूपपणीं । निजात्मदर्शनीं निजबोधु ॥७१॥
तेथ कोणाची करावी निंदा । कोणाच्या करावें गुणानुवादा ।
मीचि विश्व हें आलें बोधा । स्तुतिनिंदा निमाली ॥७२॥
त्यासी आत्मसाक्षात्कारीं विश्राम । नित्य निजात्मपदीं आराम ।
साधु असाधु हा फिटला भ्रम । स्वयें आत्माराम तो जाहला ॥७३॥
असाधुत्वें निंदावे ज्यासी । तंव आत्मस्वरूपें देखे त्यासी ।
साधु म्हणौनि वर्णितां गुणासी । देखे त्यासी निजरूपें ॥७४॥
उजव्या वंद्यत्वें शुद्धभावो । डाव्या निंद्यत्वें निजनिर्वाहो ।
पुरुषासी दोंहीचा समभावो । वंद्य निंद्य पहा हो समत्वें तैसे ॥७५॥
तेथ साधु असाधु अनुवादा । वर्जिली स्तुति आणि निंदा ।
समत्वें पावला समपदा । सुखस्वानंदाचेनि बोधें ॥७६॥
मुक्ताची हे वोळखण । यापरी उद्धवा तूं जाण ।
आतां आणिकही लक्षण । तुज मी खूण सांगेन ॥७७॥
प्रकट मुक्ताचें लक्षण । म्यां तुज सांगितलें जाण ।
तें लौकिकीं मानी कोण । विकल्प गहन जनाचे ॥७८॥
प्रारब्धवशास्तव जाण । एकादें अवचटे दिसे चिह्न ।
इतुक्यासाठीं मुक्तपण । मानी कोण जगामाजीं ॥७९॥
मुक्त मुक्तपणाची पदवी । सर्वथा जगामाजीं लपवी ।
जो आपुली मुक्तता मिरवी । तो लोभस्वभावी दांभिकु ॥४८०॥
शुक वामदेव मुक्त म्हणतां । सर्वांसी न म्हणवे सर्वथा ।
मा इतरांची काय कथा । माझीही मुक्तता न मानिती ॥८१॥
म्यां गोवर्धनु उचलिला । दावाग्नि प्राशिला ।
अघ बक विदारिला । प्रत्यक्ष नाशिला काळिया ॥८२॥
जों जों हा देहाडा । तों तों नीच नवा पवाडा ।
निजसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळु ॥८३॥
त्या माझें मुक्तपण । न मानिती याज्ञिक ब्राह्मण ।
इतरांची कथा कोण । विकल्प दारुण लौकिकीं ॥८४॥
यालागीं मुक्ताचें मुक्तपण । मुक्तचि जाणे आपण ।
इतरांसी न कळे तें लक्षण । अतिविचक्षण जर्ही झाला ॥८५॥
मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूक-पिशाचवत ।
तींही चिन्हें समस्त । ऐक निश्चित सांगेन ॥८६॥
न कुर्यान्न वदेत् किञ्चिन् न ध्यायेत् साध्वसाधु वा ।
आत्मारामोऽनया वृत्त्या विचरेज्जडवन्मुनिः ॥ १७ ॥
कायिक-वाचिक-मानसिक । उद्देशें कर्म न करी एक ।
जें निफजे तें स्वाभाविक । ’अहेतुक’ त्या नांव ॥८७॥
हेतु ठेवूनि गुणागुणीं । स्तुतिनिंदेचीं बोलणीं ।
सांडोनिया झाला मौनी । परी मौनाभिमानीं हेतु नाहीं ॥८८॥
जरी तो झाला मौनाभिमानी । तरी मुक्त पडला बंधनीं ।
यालागीं बोलणें न बोलणेंं दोन्ही । सांडूनि मौनी तो झाला ॥८९॥
अतद्व्यावृत्तीनें जाण । करावें असंतनिरसन ।
मग सद्वस्तूचें ध्यान । अखंड जाण करावें ॥४९०॥
तंव पावली सद्गुरूची खूण । उडालें ध्येय-ध्याता-ध्यान ।
बुडालें भेदाचें भेदभान । चैतन्यघन कोंदलें ॥९१॥
मेळवूनि शास्त्रसंभारा । बांधला संतासंतबंधारा ।
तो चैतन्याच्या महापुरा- । माजी खरा विराला ॥९२॥
तेव्हां बुडालें संतासंतभान । निबिड दाटलें चैतन्यघन ।
मोडलें मनाचें मनपण । वृत्तिशून्य अवस्था ॥९३॥
मनें ध्यावें चैतन्यघन । तंव चैतन्यचि जाहलें मन ।
सहजेंचि खुंटलें ध्यान । हें मुख्य लक्षण मुक्ताचें ॥९४॥
चैतन्यीं हरपलें चित्त । जड-मूक-पिशाचवत ।
लौकिकीं वर्ततां दिसे मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥९५॥
मुक्त लौकिकीं वर्तत । जड-मूक-पिशाचवत ।
म्हणौनि कळे इत्थंभूत । तेंही चिन्ह यदर्थ सांगेन ॥९६॥
नैष्कर्म्य ब्रह्म पावला दृढु । अंतरीं निजबोधें अतिगोडु ।
बाह्य लौकिकीं दिसे जडु । अचेतन दगडु होऊनि असे ॥९७॥
उठीबैसी करितें मन । तें स्वरूपीं झालें लीन ।
पडलें ठायींहूनि नुठी जाण । यालागीं ’जडपण’ आभासे ॥९८॥
शब्दब्रह्म गिळोनि वेगें । निःशब्द वस्तु झाला अंगें ।
निंदास्तुतीचें नांव नेघे । ’मुका’ सर्वांगें सर्वदा ॥९९॥
ब्रह्म सर्वथा न बोलवे कोणा । जरीं सांगे तरी दावी खुणा ।
यालागीं मुका म्हणती जाणा । अबोलपणा स्तुतिनिंदा ॥५००॥
द्रव्यलोभ नाहीं चित्तीं । कदा द्रव्य नातळती ।
यालागीं लोक ’पिशाच’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१॥
नवल त्याचें पिसेपण । जगास न करवे जें प्राशन ।
ते वस्तूचें करी अपेयपान । अभक्ष्य जाण भक्षितु ॥२॥
जेथ जगासी गमन नव्हे जाण । तेथ हा करी अगम्यागमन ।
जगाचें जेथ न रिघे मन । तेथ सर्वांगें जाण हा वेंघे ॥३॥
न धरी विधिनिषेधविभाग । न करी कर्माकर्मांचा पांग ।
स्वानंदें नाचवी सर्वांग । यालागीं जग ’पिसे’ म्हणे ॥४॥
एवं जड-मूक-पिशाच । समूळ लक्षणीं तोचि साच ।
मिथ्या नव्हे अहाचवहाच । वृथा कचकच तो नेणे ॥५॥
जाण पां मुक्ताच्या ठायीं । कोणे विषयीं आग्रह नाहीं ।
जो अतिशयेंसीं आग्रही । तो बद्ध पाहीं निश्चित ॥६॥
जीं बोलिलीं मुक्ताचीं लक्षणें । तींचि साधकांची साधनें ।
सिद्धासी असती सहजगुणें । साधकें करणें दृढनिष्ठा ॥७॥
बोलिलिया लक्षणां । सिद्धचि भोक्ता जाणा ।
साधकुहि येथ लाहाणा । जो या साधनां साधूं जाणे ॥८॥
इतर जे पंडिताभिमानी । आम्ही शास्त्रज्ञ ज्ञाते म्हणौनी ।
ते वाळिले येथूनि । जेवीं सज्जनीं दुर्बुद्धी ॥९॥
जो न साधी येथींच्या साधना । कोरडा शास्त्राभिमानी जाणा ।
सदा वांच्छिता धनमाना । तो येथींच्या ज्ञाना अलिप्त ॥५१०॥
आम्ही कर्मकुशळ याज्ञिक । शास्त्रसंपन्न वेदपाठक ।
सदा अर्थकामकामुक । त्यांसी हें सुख अप्राप्त ॥११॥
तिहीं जे कष्ट केले सर्वथा । ते समस्त जाण झाले वृथा ।
उद्धवा तेहीविखीं तत्त्वतां । ऐक आतां सांगेन ॥१२॥
शब्दब्रह्मणि निष्णातो न निष्णायात्परे यदि ।
श्रमस्तस्य श्रमफलो ह्यधेनुमिव रक्षतः ॥ १८ ॥
शब्दब्रह्म वेदशास्त्रार्थ । पढोनि वाचोनि अति पंडित ।
चारी वेद मूर्तिमंत । सदा तिष्ठत वाचेसी ॥१३॥
संहिता पद क्रम स्वरयुक्त । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्त ।
जटावळी ध्वज रथ । पढों जाणत वर्णपूर्वक ॥१४॥
आयुर्वेद धनुर्वेद । गांधर्ववेदींचा जाणे भेद ।
काव्यनाटकीं अतिशुद्ध । वेद उपवेद तो जाणे ॥१५॥
व्याकरणीं अतिनेटक । सांख्य पातंजळ जाणे तर्क ।
शास्त्र जाणे वैशेषिक । कर्ममीमांसक यज्ञान्त ॥१६॥
विवर्ण वाचस्पति वेदान्त । शास्त्र जाणे वार्तिकान्त ।
तिन्ही प्रस्थानें मूर्तिमंत । पुढां तिष्ठत योग्यत्वें ॥१७॥
शिल्पशास्त्रीं अतिनिपुण । सुपशास्त्रामाजीं प्रवीण ।
रत्नपरीक्षालक्षण । जाणे आपण वाजिवाह ॥१८॥
आगमीं नेटका मंत्रतंत्री । शैवी वैष्णवी दीक्षेची परी ।
सौर शाक्त अभिचारी । नाना मंत्रीं प्रवीण ॥१९॥
कोकशास्त्रींची अधिष्ठात्री । अतिप्रवीण संगीतशास्त्रीं ।
प्रबंध करूं जाणे कुसरी । राजमंत्रीं राजसु ॥५२०॥
निघंटु वसे प्रज्ञेपुढां । चमत्कारु जाणे गारुडा ।
पंचाक्षरी अतिगाढा । वैद्य धडफुडा रसज्ञ ॥२१॥
रसौषधी साधावी तेणें । भूत भविष्य ज्योतिष जाणे ।
अमरकोश अभिधानें । अठरा पुराणें मुखोद्गत ॥२२॥
प्रश्नावली पाहों जाणे । स्वप्नाध्यावो सांगावा तेणें ।
इतिहासादि प्रकरणें । जाणे लक्षणें गर्भाचीं ॥२३॥
शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । जाणे साधक-बाधक युक्ती ।
समयींची समयीं स्फुरे स्फूर्ती । अपर बृहस्पति बोलावया ॥२४॥
जेवीं तळहातींचा आंवळा । तेवीं ब्रह्मज्ञान बोले प्रांजळा ।
परी अपरोक्षसाक्षात्कारीं आंधळा । नेणे जिव्हाळा तेथींचा ॥२५॥
मोराअंगीं अतिडोळसें । अंगभरी भरलीं पिसें ।
एके दृष्टीवीण आंधळे जैसें । जाहलें तैसें विद्वांसा ॥२६॥
जेथूनि क्षीर स्त्रवती सड । तेथेंचि लागोनि गोचिड ।
अशुद्ध सेविताति मूढ । तेवीं विद्वांस दृढ विषयांसी ॥२७॥
गोचिडाचे मुखीं क्षीर रिघे । तो अशुद्धावांचोनि तें नेघे ।
तेवीं ज्ञान विकूनि अंगें । विद्वांसु मागे विषयांतें ॥२८॥
सांडूनि सुगंधचंदनासी । आवडीं दुर्गंधा धांवे माशी ।
तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी झोंबत ॥ २९ ॥
असोनि कमळ आमोदापाशीं । दर्दुर सेविती कर्दमासी ।
तेवीं सांडूनि निजात्मज्ञानासी । पंडित विषयांसी लोलुप ॥ ५३०॥
करूनि अद्वैतव्युत्पत्ती । तें ज्ञान विकूं देशांतरा जाती ।
मूर्ख ज्ञात्यातें उपहासिती । तर्ही वांछिती सन्मानु ॥३१॥
सांगतां ब्रह्मनिरूपण । सात्त्विकाचें परमार्थीं मन ।
व्याख्याता तो वांछी धन । विपरीत ज्ञान विद्वांसा ॥३२॥
सांगे आन करी आन । तेथें कैंचें ब्रह्मज्ञान ।
जेथ वसे धनमान । तेथ आत्मज्ञान असेना ॥३३॥
दृढ धनमान धरोनि पोटीं । सांगतां ब्रम्हज्ञानगोठी ।
त्यास आत्मसाक्षात्कारभेटी । नव्हे कल्पकोटी गेलिया ॥३४॥
नाना पदव्युत्तिविंदान । एके श्लोकीं दशधा व्याख्यान ।
पोटीं असतां मानाभिमान । ब्रह्मज्ञान त्या कैंचें ॥३५॥
मी पंडितु अतिज्ञाता । ऐशिया नागवले अहंता ।
जेवीं आंधळें नोळखे पिता । नित्य असतां एकत्र ॥३६॥
तैशी गति विद्वांसासी । नित्य असती आत्मसमरसीं ।
तेंचि वाखाणिती अहर्निशीं । परी त्या स्वरूपासी नेणती ॥३७॥
करावया विषयभरण । केलें शास्त्रव्युपत्तिव्याख्यान ।
ते वृथा कष्ट गेले जाण । जेवीं वंध्याधेनु पोशिली ॥३८॥
जे कधीं वोळे ना फळे । सुटली तरी सैरां पळे ।
नित्य वोढाळी राजमळे । तें दुःख आदळे स्वामीसी ॥३९॥
तैशी गति पंडितंमन्यासी । व्युत्पत्तीं पोशिलें वाचेंसी ।
ते वोढाळ झाली विषयांसी । ज्याची त्यासी नावरे ॥५४०॥
जेवीं का निर्दैवाहातीं । कनक पडलें तें होय माती ।
तेवीं पंडितंमन्याची व्युत्पत्ती । विषयासक्तीं नाशिली ॥४१॥
द्विजा दीधला भद्रजाती । त्यासी न पोसवे तो निश्चितीं ।
मग फुकासाठीं विकिती । तेवीं व्युपत्ती विद्वांसा ॥४२॥
अद्वैतशास्त्राची व्युत्पत्ती । हे त्यासी झाली अलभ्यप्राप्ती ।
जे विषयालागीं विकिती । ते मूर्ख निश्चितीं विद्वांस ॥४३॥
मुखीं ऊंस घालिजे घाणा । तो रस पिळूनि भरे भाणा ।
फिका चोपटीं करकरी घाणा । ते गति जाणा विद्वांसा ॥४४॥
विद्वांस करिती ज्ञानकथन । सारांश सात्त्विकीं नेला जाण ।
शब्दसोपटी करकरी वदन । गोडपण तेथें कैंचें ॥४५॥
जेवीं का नपुंसकाच्या करीं । वोपिली पद्मिणी सुंदरी ।
ते अखंड रडे जयापरी । तेवीं विद्वांसाघरीं व्युत्पत्ती ॥४६॥
पाहे पां ब्रह्मज्ञानेंवीण । शब्दज्ञानें संन्यासग्रहण ।
केलें तेंही वृथा जाण । जरी धारणाध्यान करीना ॥४७॥
जैसी जैसी शब्दज्ञानव्युत्पत्ती । तैशी तैशी न करितां स्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्ती । तैं निज मुखीं माती घातली ॥४८॥
वेदशास्त्रसंपन्न झाला । त्यावरी पोट भरूं लागला ।
तरी तो उदमी थोर झाला । परी थित्या मुकला मुदलासी ॥४९॥
रत्न देऊनि कोंडा घेतला । कां अमृत देऊनि कांजी प्याला ।
तैसा परिपाकु पंडितांचा झाला । थित्या नागवला निजज्ञाना ॥५५०॥
शब्दज्ञान जोडिलें कष्टे । तेणेंचि साधनें परब्रह्म भेटे ।
इटेसाठीं परीस पालटे । मूर्ख वोखटें मानिती ॥५१॥
पोट भरावयाचिया युक्ती । आपुली मिरवाया व्युत्पत्ती ।
पत्रावलंबनें करिती । द्वाराप्रती सधनाच्या ॥५२॥
जेवीं पोट भरावया भांड । नानापरी वाजवी तोंड ।
तेवीं नाना व्युत्पत्ती वादवितंड । करिती अखंड उदरार्थ ॥५३॥
करूनि व्युत्पत्ती शब्दब्रह्म । जरी न साधीचि परब्रह्म ।
तरी त्या श्रमाचें फळही श्रम । जेवीं रत्नें उत्तम घाणा गाळी ॥५४॥
तेथें तेल न पेंडी । झाली रत्नांची राखोंडी ।
तैशीं विद्वांसें झाली वेडीं । श्रमें श्रमकोडी भोगिती ॥५५॥
श्रमें श्रमुचि पावती । दुःखें दुःखचि भोगिती ।
हेंचि कथन बहु दृष्टांतीं । उद्धवाप्रती हरि बोले ॥५६॥
गां दुग्धदोहामसतीं च भार्यां देहं पराधीनमसत्प्रजां च ।
वित्तं त्वतीर्थीकृतमङ्ग वाचं हीनां मया रक्षति दुःखदुःखी ॥ १९ ॥
दुग्धाचिया लोलुप्यता । ’भाकड गाय ’ दोहूं जातां ।
शिंपीभरी दूध न ये हाता । हाणे लाता तत्काळ ॥५७॥
जे कुडी कुचर डीवरी । विषयमेळवणा अतिखाइरी ।
अधर्मशीळ लातरी । सर्वांपरी अनाड ॥५८॥
सुटली राजागारीं भरे । धर्मदंडें मागें न सरे ।
सद्बुद्धि धरितां न धरे । सैर चरे सुनाट ॥५९॥
जिचें कधीं नव्हे दुभतें । जे धरूं नेणे गर्भातें ।
पोषितां ऐशा गायीतें । पावे दुःखातें पोषकु ॥५६०॥
गृहिणी लागला गृहाचार । ते स्त्री अनुकूल नसतां नर ।
अतिदुःखें दुःखी थोर । सदा करकर कपाळीं ॥६१॥
निंदा अवज्ञा हेळण । भ्रताराचें करी जाण ।
स्वयें भक्षी मिष्टान्न । हें ’असंतलक्षण स्त्रियांचे’ ॥६२॥
खातां जेवितां द्रव्य देतां । गोड गूळसी बोले सर्वथा ।
धर्म देखोनि फोडी माथा । तेही सर्वथा असतीचि ॥६३॥
जे न विचारी पापपुण्य । कामाचारी धर्मशून्य ।
हें असतीचें लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥६४॥
असतीचिये संगतीं । कैंची होईल सुखप्राप्ती ।
अति दुःखें दुःखी होती । जाण निश्चितीं ते नर ॥६५॥
ज्याचें देह ’पराधीन’ । तो जीवें जितां सदा दीन ।
पराधीना समाधान । नव्हे जाण कल्पांतीं ॥६६॥
सांडोनि आपली निजसत्ता । ज्यासी लागली पराधीनता ।
तो स्वप्नींही सुखाची वार्ता । न देखे सर्वथा निश्चित ॥६७॥
’पर’ म्हणिजे माया जाण । जो झाला तिचे आधीन ।
त्यासी सुखाचें न दिसे स्वप्न । दुःख संपूर्ण सर्वदा ॥६८॥
पराधीनासी सुख । आहे म्हणे तो केवळ मूर्ख ।
सोलीव दुःखाचें दुःख । अवश्य देख पराधीना ॥६९॥
ऐक ’प्रजांचा विवेक’ । एक पुत्र एक लेंक ।
एक ते केवळ मूर्ख । दुःखदायक पितरांसी ॥५७०॥
जो नरकापासोनि तारी । जो पूर्वजांतें उद्धरी ।
जो मातापित्यांची भक्ति करी । अव्यभिचारी हरिरूपें ॥७१॥
जो सांडोनियां मातापिता । जाऊं नेणे आणिके तीर्था ।
त्याचेनि चरणतीर्थें पवित्रता । मानिती सर्वथा अनिवार ॥७२॥
जैशीं रमा आणि नारायण । तैशीं मातापिता मानी जाण ।
चढत्या आवडीं करी भजन । नुबगे मन सेवेसी ॥७३॥
जो अतिसत्त्वें सात्त्विकु । जो पितृवचनपाळकु ।
जाणे धर्माधर्मविवेकु । हा नैसर्गिकु स्वभावो ॥७४॥
जो मातापित्यांचे सेवेवरी । आपआपणियातें तारी ।
सकळ पूर्वजांतें उद्धरी । तो संसारीं सुपुत्र ॥७५॥
ऐशिया पुत्रासी प्रतिपाळितां । सुख पावे मातापिता ।
पूर्वजांतें उद्धरिता । स्वयें तरता पितृभक्तीं ॥७६॥
झालिया सुपुत्रसंतति । एवढी होय सुखप्राप्ती ।
आतां असत्प्रजांची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७७॥
मूळींचें पद ’असत्प्रज’ । त्यांचे वर्तणुकेची वोज ।
सांगतां अत्यंत निर्लज्ज । तेही मी तुज सांगेन ॥७८॥
पोटीं उपजले जे लेंक । त्यांची वर्तणुक ऐशी देख ।
आवडे कांता आणि कनक । उपेक्षिती निःशेख माता-पिता ॥७९॥
जे कुडे कुचर कुलट । जे का अत्यंत शठ नष्ट ।
जे अनाचारी कर्मभ्रष्ट । अति दुष्ट दुर्जन ॥५८०॥
त्यांसी भांडवल लटिक । लटकी द्यावी आणभाक ।
माता पिता ठकावीं देख । सात्त्विक लोक नाडावे ॥८१॥
आपण नरका जावें ते जाती । परी पूर्वज नेले अधोगती ।
ऐशियां प्रजांतें प्रतिपाळिती । ते दुःखी होती अतिदुःखें ॥८२॥
पोटामाजीं उठिला फोडू । त्यासी करितां न ये फाडू ।
तैसा असत्प्रजीं संसार कडू । दुःख दुर्वाडु भोगवी ॥८३॥
ऐशिया पुत्रांचें जितां दुःख । मेल्यापाठीं देती नरक ।
असत्प्रजांचें कवतिक । दुखें दुःख अनिवार ॥८४॥
गांठीं असोनियां ’धन’ । जो सत्पात्रीं न करी दान ।
तें सर्व दुःखाचें मूळ जाण । दुःख दारुण धनलोभ्या ॥८५॥
धन अर्जावया अनेक । उपाय अपाय करिती लोक ।
नाना क्लेश भोगोनि दुःख । द्रव्य देख सांचिलें ॥८६॥
प्रथम दुःख द्रव्य सांचितां । दुसरें दुःख द्रव्य रक्षितां ।
स्त्रीपुत्र प्रवर्ते घाता । इतर कथा ते भिन्न ॥८७॥
सत्पात्रीं न करितां दान । जेणें रक्षिलें यक्षधन ।
तेथें दुःखबाहुल्यें उठी विघ्न । धर्मरक्षण तेथ नाहीं ॥८८॥
ऐसेंही धन गेलियासाठीं । अतिदुःखें भडका उठी ।
धनवंता जन्मसाटी । दुःखकोटी भोगिती ॥८९॥
येवोनियां नरदेहासी । अविकळ वाचा असे ज्यासी ।
जो नुच्चारी हरिनामासी । पाप त्यापाशीं खतेलें ॥५९०॥
पुरिले लोहा माती खाये । तें उपेगा न ये वायां जाये ।
तैशी नामेंवीण वाचा पाहें । वृथा जाये सर्वथा ॥९१॥
आसनध्यानपरिश्रम । न करूनि म्हणे जो राम राम ।
तेणें कोटि जन्मांचा हरे श्रम । उत्तमोत्तम ते वाणी ॥९२॥
जो नित्य जपे रामनाम । तो जाणावा मजचिसम ।
तेणेंचि केले सकळही नेम । पुरुषीं पुरुषोत्तम तो जाण ॥९३॥
चतुर्वर्णांमाजीं जो कोणी । अविश्रम रामू जपे वाणीं ।
तोचि पढियंता मजलागुनी । आन त्रिभुवनीं नावडे ॥९४॥
ऐसें रामनाम नावडे ज्यासी । तैं पापमुखरोग आला मुखासी ।
तो स्वयें मुकला निजसुखासी । आप आपणासी घातकू ॥९५॥
रामनामेंवीण जें तोंड । तें जाणावें चर्मकुंड ।
भीतरी जिव्हा तें चामखंड । असत्यकांड काटली ॥९६॥
हो कां हरिनामेंवीण जे वाणी । ते गलितकुष्ठे जाली कोढिणी ।
असत्यकुष्ठाचें गळे पाणी । उठी पोहणी निंदेची ॥९७॥
ऐशिये वाचेसी रोकडे । पडती अधर्माचे किडे ।
सुळबुळीत चहूंकडे । मागेंपुढें वळवळित ॥९८॥
ते वाचा होय ज्यासमोर । देखे तो पाठिमोरा ठाके नर ।
नाक झांकूनि म्हणे हरहर । लहान थोर थुंकिती ॥९९॥
ते वाचेची जे दुर्गंधी । मजही न साहवे त्रिशुद्धी ।
हे वाचा वाहे तो दुर्बुद्धी । अनर्थसिद्धि अतिदुःख ॥६००॥
सोलींव दुःखाचें अतिदुःख । त्या नराची वाचा देख ।
केवळ निरय तें त्याचें मुख । नामीं विन्मुख जे वाणी ॥१॥
हो कां वेदशास्त्रसंपन्न वाणी । करूनि निंदकू नामकीर्तनीं ।
तो पापी महापाप्याहूनी । त्याचेनि अवनी अतिदुःखी ॥२॥
नामकीर्तनें धन्य वाणी । येचि अर्थी सारंगपाणी ।
प्रवर्तला निरूपणीं । विशद करूनी सांगावया ॥३॥
यस्यां न मे पावनमङ्ग कर्म स्थित्युद्भवप्राणनिरोधमस्य ।
लीलावतारेप्सितजन्म वा स्याद् वन्ध्यां गिरं तां बिभृयान्न धीरः ॥ २० ॥
जगातें पवित्र करिती । महादोषांतें हरिती ।
माझीं नामकर्में गुणकीर्ती । जड उद्धरती हरिनामें ॥४॥
म्हणसी तूं बोलिलासी निजवर्म । मी विद्याविद्यातीत ब्रह्म ।
त्या तुज कैंचे गुण नाम कर्म । कीर्तनधर्म केवीं घडे ॥५॥
उद्धवा हें मनीं न धरीं । मी स्वलीला स्वमायें करीं ।
नाना अवतारांतें धरीं । न करूनि करीं स्थित्यंतू ॥६॥
त्रिगुणगुणी गुणावतार । ब्रह्मा आणि हरिहर ।
तिहीं रूपीं मीच साचार । चराचर करीं हरीं ॥७॥
स्रष्टारूपें मी स्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता ।
रुद्ररूपें मी संहर्ता । जाण तत्त्वतां मी एकू ॥८॥
बाल्यतारुण्यवार्धक्यांसी । एक पुरुष तिहीं अवस्थांसी ।
तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । गुणकर्मांसी मी कर्ता ॥९॥
मी कर्ताचि अकर्ता । अकर्तेपणे कर्ता ।
हें माझें मीचि जाणें तत्त्वतां । आणिकासी सर्वथा कळेना ॥६१०॥
हींचि माझीं नामकर्में गातां । माझी पदवी लाभे वक्ता ।
माझे लीलावतार कीर्तितां । कीर्तिमंतां निजलाभू ॥११॥
अवतारांमाजीं उत्तमोत्तम । श्रीरामकृष्णादि जन्मकर्म ।
नाना चरित्रें संभ्रम । अविश्रम जे गाती ॥१२॥
सेतु बांधिला अवलीळा । सागरीं तारिल्या शिळा ।
गोवर्धनु उचलिला हेळा । दावानळा प्राशिलें ॥१३॥
ताटिका वधिली एके बाणीं । पूतना शोखिली तानेपणीं ।
अहल्या तारिली चरणीं । यमलार्जुन दोन्ही उद्धरिले ॥१४॥
रावणू आदळला धनुष्य वाहतां । तें भंगोनि पर्णिली सीता ।
मथूनि चैद्यादि समस्तां । भीमकदुहिता आणिली ॥१५॥
मारिला सुबाहु खर दूषणू । अघ बक केशिया मारी श्रीकृष्णू ।
सुग्रीवू स्थापिला राज्य देऊनू । येरें उग्रसेनू स्थापिला ॥१६॥
मेळवूनि वानरांचा पाळा । वधू केला राक्षसकुळा ।
मेळवून बाळां गोपाळां । मल्लां सकळां मर्दिलें ॥१७॥
रावणकुंभकर्णां केला मारू । मारिला कंस चाणूरू ।
रामें ठकिला वाली वानरू । ठकिला महावीरू काळयवनू ॥१८॥
रामें बिभीषण स्थापिला । कृष्णें धर्म संस्थापिला ।
एक पितृवचनें वना गेला । एक घेऊनि आला गतपुत्र ॥१९॥
हीं अवतारचरित्रें वर्णितां । चोरटा वाल्मीकि झाला तत्त्वतां ।
व्यास जारपुत्र सर्वथा । केला सरता तिहीं लोकीं ॥६२०॥
या दोहीं अवतारांची पदवी । वर्णितां दोन्ही झाले महाकवी ।
व्यास वाल्मीकि वंदिजे देवीं । कीर्तिगौरवीं गौरविले ॥२१॥
त्या महाकवींची कवित्वकथा । शेष नेत्रद्वारें श्रवण करितां ।
दोन सहस्र नयनीं आइकतां । धणी सर्वथा बाणेना ॥२२॥
हेचि कथा स्वर्गाच्या ठायीं । श्रवण करावया पाहीं ।
इंद्र लागे बृहस्पतीचे पायीं । कीर्ति लोकत्रयीं वर्णिती ॥२३॥
असो कथेचें महिमान । माझेनि नाममात्रें जाण ।
तारिला अजामिळ ब्राह्मण । गजेंद्रउद्धरण हरिनामें ॥२४॥
पक्ष्याचे मिषेंकरूनी । रामु या दों अक्षरस्मरणीं ।
महादोषांची श्रेणी । तत्काळ कुंटिणी तारिली ॥२५॥
माझिया नामासमान । नव्हे वेदशास्त्रशब्दज्ञान ।
वेदशास्त्रांचा बोधु कठिण । तैसें जाण नाम नव्हे ॥२६॥
पठणमात्रें वेदशास्त्रवक्ता । नव्हे मजमाजीं येणेंचि सरता ।
स्वभावें माझें नाम घेतां । अतिपढियंता मज होये ॥२७॥
वेदशास्त्रीं अधिकारी ब्राह्मण । नामासी अधिकारी चार्ही वर्ण ।
जग उद्धरावया कारण । नाम जाण पैं माझें ॥२८॥
जेथ नित्य नामाचा उच्चार । तेथ मी असें साचार ।
येथ करणें न लगे विचार । नाम सधर तारावया ॥२९॥
ते माझे जन्म नाम कीर्ति गुण । जे वाचेसी नाहीं पठण ।
ते वाचा पिशाचिका जाण । वृथालापन वटवटी ॥६३०॥
माझे कीर्तीवीण जें वदन । तें केवळ मद्याचें भाजन ।
त्या उन्मादविटाळाभेण । नाम जाण तेथ न ये ॥३१॥
जेथ उच्चारु नाहीं नामाचा । ते जाणावी वांझ वाचा ।
गर्भ न धरि हरिकथेचा । निष्फळ तिचा उद्योगू ॥३२॥
उद्धवासी म्हणे श्रीरंगू । आइकें बापा उपावो चांगू ।
माझा नाममार्ग सुगमू सांगू । न पडे पांगू आणिकांचा ॥३३॥
हरिनामेंवीण वाणी । कदा न राखावी सज्जनीं ।
हाचि अभिप्रावो चक्रपाणीं । प्रीतिकरोनि सांगीतला ॥३४॥
करूनियां शब्दज्ञान । अतियोग्यतां पंडितपण ।
तेणें माझी प्राप्ति नव्हे जाण । वैराग्येंवीण सर्वथा ॥३५॥
अथवा वैराग्यही जालें । परी तें विवेकहीन उपजलें ।
जैसें धृतराष्ट्रा ज्येष्ठत्व आलें । नेत्रेंवीण गेलें स्वराज्य ॥३६॥
तैसें वैराग्य विवेकेंवीण । केवळ आंधळें अनधिकारी जाण ।
नाहीं सन्मार्गदेखणेपण । वृथा परिभ्रमण तयाचें ॥३७॥
जो विवेकें पूर्ण भरित । त्यावरी वैराग्य वोसंडत ।
माझी जिज्ञासा अद्भुत । तेंचि निश्चित सांगतू ॥३८॥
एवं जिज्ञासयापोह्य नानात्वभ्रममात्मनि ।
उपारमेत विरजं मनो मय्यर्प्य सर्वगे ॥ २१ ॥
नित्यमुक्त अव्ययो । स्वरूप जाणावया पहा हो ।
ज्याचा लागला दृढ भावो । आन आठवो नाठवे ॥३९॥
ऐशी मज जाणावयाची अवस्था । त्या नांव बोलिजे जिज्ञासता ।
माझे प्राप्तीलागीं सर्वथा । पांडित्य मान्यता ते नेघे ॥६४०॥
देहादि अध्यासू आपुल्या ठायीं । श्रवणें मननें मिथ्या केला पाहीं ।
दृढ विश्वास गुरूच्या पायीं । पूर्णब्रह्माच्या ठायीं निर्धारू ॥४१॥
तेथ पुढारीं चालावया वाट । भगवद्भजनीं अतिउद्भट ।
कां सांडोनि कर्मकचाट । ध्याननिष्ठ तो होय ॥४२॥
तेथ ध्येय ध्याता ध्यान । न दिसे त्रिपुटीचें भान ।
कोंदलें चैतन्यघन । वस्तु सनातन तो पावे ॥४३॥
तेथ कैंचा कर्ता क्रिया कर्म । फिटला नानात्वाचा भ्रम ।
सबाह्य कोंदलें परब्रह्म । जाला उपरम गुरुकृपा ॥४४॥
सर्वगत सर्वकाळ । सर्वदेशीं सर्वीं सकळ ।
वस्तु असे जें केवळ । तेथ निश्चळ निजबोधू ॥४५॥
ऐशिये वस्तूची धारणा । ज्याचेनि न करवे जाणा ।
तरी सुगम उपाया आना । एक विचक्षणा सांगेन ॥४६॥
यद्यनीशो धारयितुं मनो ब्रह्मणि निश्चलम् ।
मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर ॥ २२ ॥
स्वभावतां मन चंचळ । विषयवासना अतिचपळ ।
निर्गुण ब्रह्मीं केवळ । नाहीं बळ प्रवेशावया ॥४७॥
तरी सांख्य योग संन्यासू । हा न करावया आयासू ।
माझिया भक्तीचा विलासू । अतिउल्हासू करावा ॥४८॥
मागें बद्धमुक्तांचें निरूपण । सांगीतलें मुक्तांचें लक्षण ।
वृथा शाब्दिकांचें शब्दज्ञान । तेंही व्याख्यान दाविलें ॥४९॥
आतां आपुली निजभक्ती । सांगावया उद्धवाप्रती ।
अतिआदरें श्रीपती । भक्तीची स्थिति सांगतु ॥६५०॥
उद्धवा चढत्या आवडीं मत्कर्म । जे भक्तीसी विकावा मनोधर्म ।
माझें स्मरावें गुणकीर्तिनाम । नाना संभ्रमविनोदें ॥५१॥
माझेनि भजनें कृतकृत्यता । दृढ विश्वास धरोनि चित्ता ।
भजनीं प्रवर्तावें सर्वथा । अविश्रमता अहर्निशीं ॥५२॥
माझ्या भजनाच्या आवडीं । नुरेचि आराणुकेसी वाडी ।
वायां जावो नेदी अर्धघडी । भजनपरवडी या नांव ॥५३॥
माझ्या भजनीं प्रेम अधिक । न सांडावें नित्यनैमित्तिक ।
वैदिक-लौकिक-दैहिक । भक्तांसी बाधक नव्हे कर्म ॥५४॥
आचरतां सकळ कर्म । न कल्पावा फळसंभ्रम ।
हेंचि भक्तीचें गुह्य वर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥५५॥
उबगू न मनूनि अंतरीं । माझ्या प्रीतीं सर्व कर्मांतें करी ।
जो फळाशेतें कंहीं न धरी । भक्तीचा अधिकारी तो जाणा ॥५६॥
पिंपुरें खावयाचे चाडें । न लाविती पिंपळाचीं झाडें ।
तेंवीं कर्में करितां वाडेंकोडें । फळाशा पुढें उठेना ॥५७॥
माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता ।
माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्भक्तां मद्भावें ॥५८॥
ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें ।
भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥
यालागीं माझें भजन करितां । ज्ञानाचा पांग न पडे भक्तां ।
देहगेहांमाजीं वर्ततां । बंधन मद्भक्तां लागेना ॥६६०॥
ज्याच्या मुखीं माझें नाम । ज्यासी माझा भजनसंभ्रम ।
ज्याच्या मनीं मी आत्माराम । त्याचें दासीकाम मुक्ति करी ॥६१॥
मुक्तीमाजीं विशेष कायी । वृत्ति निर्विषय असे पाहीं ।
भक्तांसी सर्व कर्मांच्या ठायीं । स्फुरण नाहीं विषयांचें ॥६२॥
भक्तांचे विषयीं नाहीं चित्त । त्यांचा विषय तो मी भगवंत ।
ते सदा मजमाजीं लोलुप्त । नित्यमुक्त यालागीं ॥६३॥
भक्त विषयो सेविती । ते ग्रासोग्रासीं मज अर्पिती ।
तेणेंचि त्यांसी वंदी मुक्ती । सर्व भूतीं मद्भावो ॥६४॥
यालागीं कर्मबंधन । मद्भक्तांसी न लगे जाण ।
करितां माझें स्मरण कीर्तन । जगाचें बंधन छेदिती ॥६५॥
माझ्या भक्तांचें वसतें घर । तें जाण माझें निजमंदिर ।
मुक्ति तेथें आठौ प्रहर । वोळगे द्वार तयांचे ॥६६॥
माझें भजन करितां । कोण्या अर्थाची नाहीं दुर्लभता ।
चहूं पुरुषार्थांचे माथां । भक्ति सर्वथा मज पढियंती ॥६७॥
ज्ञान नित्यानित्यविवेक । भक्तीमाजीं माझें प्रेम अधिक ।
तैसें प्रेमळाचे मजलागीं सुख । चढतें देख अहर्निशीं ॥६८॥
जेवीं एकुलतें बाळक । जननीसी आवडे अधिक ।
तैसें प्रेमळाचें कौतुक । चढतें सुख मजलागीं ॥६९॥
यालागीं आपुलिये संवसाटीं । मी प्रेमळ घें उठाउठी ।
वरी निजसुख दें सदेंठीं । न घे तैं शेवटीं सेवकू होयें ॥६७०॥
प्रेमाचिया परम प्रीतीं । जेणें मज अर्पिली चित्तवृत्ती ।
तेव्हांचि त्याचे सेवेची सुती । जाण निश्चितीं म्यां घेतली ॥७१॥
प्रेमळाचें शेष खातां । मज लाज नाहीं घोडीं धुतां ।
शेखीं उच्छिष्ट काढितां । लाज सर्वथा मज नाहीं ॥७२॥
मज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहें माथां ।
ऐशी प्रेमळाची सांगतां कथा । प्रेम कृष्णनाथा चालिलें ॥७३॥
कंठ जाला सद्गदित । अंग झालें रोमांचित ।
धांवोनि उद्धवासी खेंव देत । प्रेम अद्भुत हरीचें ॥७४॥
सजल जाहले लोचन । वरुषताती स्वानंदजीवन ।
भक्तिसाम्राज्यपट्टाभिषिंचन । उद्धवासी जाण हरि करी ॥७५॥
सहजें प्रेमळाची करितां गोठी । संमुख उद्धव देखिला दृष्टीं ।
धांवोनियां घातली मिठी । आवडी मोठी भक्तांची ॥७६॥
आवडीं पडिलें आलिंगन । विसरला कार्यकारण ।
विसरला स्वधामगमन । मीतूंपण नाठवे ॥७७॥
नाठवे देवभक्तपण । नाठवे कथानिरूपण ।
नाठवे उद्धवा उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥७८॥
प्रेमळाचे गोठीसाठीं । परात्पर परतटीं ।
दोघां ऐक्यें पडली मिठी । आवडी मोठी प्रेमाची ॥७९॥
आजि भक्तीचें निजसुख । उद्धवासी फावलें देख ।
भक्तीचें प्रेम अलोलिक । उद्धवें सम्यक विस्तारिलें ॥६८०॥
श्रीकृष्ण निजधामासी जातां । उद्धव जरी हें न पुसता ।
तरी ज्ञानवैराग्यभक्तिकथा । कां सांगता श्रीकृष्ण ॥८१॥
विशेष भक्तिप्रेम अचुंबित । उद्धवें काढिलें निश्चित ।
उद्धवप्रश्नें श्रीभागवत । झालें सनाथ तिहीं लोकीं ॥८२॥
यालागीं तनुमनप्राणें । उद्धवू जीवें ओंवाळणें ।
याहून अधिक वानणें । तें बोलणें न साहे ॥८३॥
जे बोला बुद्धी न ये सहज । तें भक्तिप्रेम निजगुज ।
उद्धवा द्यावया गरुडध्वज । केलें व्याज खेंवाचें ॥८४॥
भक्तीचें शोधित प्रेम । उद्धवासी अतिउत्तम ।
देता झाला पुरुषोत्तम । मेघश्याम तुष्टला ॥८५॥
प्रेमळाची गोठी सांगतां । विसरलों मी श्लोकार्था ।
कृष्णासी आवडली प्रेमकथा । ते आवरितां नावरे ॥८६॥
प्रेमाची तंव जाती ऐशी । आठवू येऊं नेदी आठवणेशीं ।
हा भावो जाणवे सज्जनांसी । ते भक्तिप्रेमासी जाणते ॥८७॥
हो कां ऐसेंही असतां । माझा अपराधू जी सर्वथा ।
चुकोनि फांकलों श्लोकार्था । क्षमा श्रोतां करावी ॥८८॥
तंव श्रोते म्हणती राहें । जेथें निरूपणीं सुख आहे ।
त्यावरी बोलणें हें न साहे । ऐसें रहस्य आहे अतिगोड ॥८९॥
आधींच भागवत उत्तम । तेथें हें वाखाणिले भक्तिप्रेम ।
तेणें उल्हासलें परब्रह्म । आमुचे मनोधर्म निवाले ॥६९०॥
श्लोकसंगतीची भंगी । दूर ठेली कथेची मागी ।
हे प्रार्थना न लगे आम्हांलागीं । आम्ही हरिरंगीं रंगलों ॥९१॥
ऐकतां भक्तिप्रेमाचा जिव्हाळा । श्रवणसुखाचा पूरू आला ।
झाडा न सूची उगला । निरूपण वहिला चालवीं ॥९२॥
सांगतां प्रेमळांची गोठी । कृष्णउद्धवां एक गांठी ।
प्रेमें पडली होती मिठी । ते कृष्ण जगजेठी सोडवी ॥९३॥
म्हणे हें अनुचित सर्वथा । आतांचि उद्धवू ऐक्या येता ।
तरी कथेचा निजभोक्ता । ऐसा श्रोता कैंचा मग ॥९४॥
माझिया भक्तिज्ञानविस्तारा । उद्धवूचि निजांचा सोयरा ।
यालागीं ब्रह्मशापाबाहिरा । काढितू खरा निजबोधें ॥९५॥
जितुकी गुह्यज्ञानगोडी । भक्तिप्रेमाची आवडी ।
ते उद्धवाचिकडे रोकडी । दिसते गाढी कृष्णाची ॥९६॥
भक्तिप्रेमाचा कृष्णचि भोक्ता । कृष्णकृपा कळलीसे भक्तां ।
हे अनिर्वचनीय कथा । न ये बोलतां बोलासी ॥९७॥
कृष्ण उद्धवासी म्हणे आतां । सावधू होईं गा सर्वथा ।
पुढारीं परियेसीं कथा । जे भक्तिपथा उपयोगी ॥९८॥
सर्व कर्में मदर्पण । फळत्यागें न करवे जाण ।
तरी अतिसोपें निरूपण । प्रेमलक्षण सांगेन ॥९९॥
श्रद्धालुर्मे कथाः श्रृण्वन् सुभद्रा लोकपावनीः ।
गायन्ननुस्मरन् कर्म जन्म चाभिनयन् मुहुः ॥ २३ ॥
करितां माझी कथा श्रवण । काळासी रिगमू नाहीं जाण ।
इतरांचा पाडू कोण । कर्मबंधन तेथें कैंचें ॥७००॥
जो हरिकथेनें गेला क्षण । तो काळासी नव्हे प्राशन ।
काळसार्थकता त्या नांव जाण । जैं श्रद्धाश्रवण हरिकथा ॥१॥
परीस कथेचें महिमान । श्रद्धायुक्त करितां श्रवण ।
तिहीं लोकींच दोषदहन । अक्षरें जाण होतसे ॥२॥
ऐक श्रद्धेचें लक्षण । करितां हरिकथाश्रवण ।
ज्याचें अर्थारूढ मन । श्रद्धाश्रवण त्या नांव ॥३॥
श्रवण ऐकोनि नास्तिक । देवोचि नाहीं म्हणती देख ।
आहे म्हणती ते पोटवाईक । आम्हांसी निःशेख ठाकेना ॥४॥
या नास्तिका देवोनि तिळोदक । ज्याचें वाढलें आस्तिक्य देख ।
श्रद्धा त्या नांव अलोलिक । अगाध सुख तीमाजीं ॥५॥
श्रवणीं ध्यानीं अंतराय । लय विक्षेप कषाय ।
कां रसस्वादुही होय । हे चारी अपाय चुकवावे ॥६॥
ऐकतांही हरिकथा । विषयचिंतनीं गोडी चित्ता ।
ते श्रद्धा नव्हे गा सर्वथा । मुख्य विक्षेपता ती नांव ॥७॥
हावभावकटाक्षगुण । सुरतकामनिरूपण ।
तेथ ज्याचें श्रद्धाश्रवण । रसस्वादन त्या नांव ॥८॥
हरिकथेपाशीं बैसला दिसे । परी कथेपाशीं मनही नसे ।
चित्त भंवे पिसें जैसें । तो मर्कटवेषें विक्षेपु ॥९॥
नातरी नाना उद्वेगें । ऐकतां कथा मनीं न लगे ।
कां कथेमाजीं झोंप लागे । तो जाणावा वेगें लयविक्षेपू ॥७१०॥
श्रवणीं ध्यानीं बैसल्यापाठीं । सगुण निर्गुण कांहीं नुठी ।
निळें पिंवळें पडे दिठी । गुणक्षोभ त्रिपुटीं कषाय ॥११॥
श्रवणीं ध्यानीं हे अवगुण । तैसाचि त्रिविध प्रेमा जाण ।
तो वोळखती विचक्षण । ऐक लक्षण सांगेन ॥१२॥
महावीरांचें शौर्यपण । ऐकोनि युद्ध दारुण ।
अत्यंत हरिखें उल्हासे मन । तो प्रेमा जाण राजस ॥१३॥
दुःखशोकांची अवस्था । कां गेल्यामेल्यांची वार्ता ।
अत्यंत विलापाची कथा । ज्यासी ऐकतां न संठे ॥१४॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । स्फुंदनें कांपे थरथरां ।
प्रेमविलाप अवसरां । तो जाण खरा तामसू ॥१५॥
सगुणमूर्तीची संपदा । शंख चक्र पद्म गदा ।
पीतांबरधारी गोविंदा । ऐकोनि आनंदा जो भरे ॥१६॥
नेत्रीं आनंदजीवन । हृदयीं न संठें स्फुंदन ।
कृष्णमय जालें मन । तो प्रेमा जाण सात्त्विक ॥१७॥
यावरी जो प्रेमा चौथा । अतर्क्य तर्केना सर्वथा ।
उद्धवा तूं मजलागीं पढियंता । तोही आतां सांगेन ॥१८॥
तुझ्या भावार्थाची अवस्था मोठी । ते बोलविते गुह्य गोठी ।
तुजवेगळा पाहतां दृष्टी । अधिकारी सृष्टी दिसेना ॥१९॥
श्रीकृष्ण म्हणे सावधान । ऐकोनि निर्गुणश्रवण ।
ज्याचें चिन्मात्रीं बुडे मन । उन्मज्जन होऊं नेणे ॥७२०॥
जेवीं कां सैंधवाचा खडा । पडला सिंधूमाजिवडा ।
तो झाला सिंधूचियेवढा । तेवीं तो धडफुडा ब्रह्म होय ॥२१॥
चित्तचैतन्यां पडतां मिठी । सुटतां लिंगदेहाची गांठी ।
नेत्रीं अश्रूंचा पूर दाटी । रोमांच उठी सर्वांगीं ॥२२॥
जीवभावाची दशा आटे । अनिवार बाष्प कंठीं दाटे ।
कांहीं केल्या शब्द न फुटे । पूरु लोटे स्वेदाचा ॥२३॥
नेत्र झाले उन्मीलित । पुंजाळले जेथींचे तेथ ।
विस्मयाचें भरतें येत । वोसंडत स्वानंदें ॥२४॥
हा जाण पां प्रेमा चौथा । उत्तम भागवत अवस्था ।
तुज म्यां सांगीतली तत्त्वतां । इचा जाणता मी एकू ॥२५॥
निर्गुणीं जो प्रेमा जाण । तें शोधितसत्त्वाचें लक्षण ।
हे मी जाणें उणखूण । कां ब्रह्मसंपन्न जाणती ॥२६॥
उद्धवा श्रद्धायुक्त श्रवण । तेणें येवढी प्राप्ती आहे जाण ।
श्रद्धाश्रवणाचें महिमान । अतिगहन तिहीं लोकीं ॥२७॥
सविवेकनैराश्य वक्ता । जोडल्या श्रद्धेनें ऐकावी कथा ।
कां सज्ञान मीनालिया श्रोता । स्वयें कथा सांगावी ॥२८॥
जैं श्रोता वक्ता दोन्ही नाहीं । तैं रिघावें मनाच्या ठायीं ।
कां माझीं जन्मकर्में जें कांहीं । एकलाही विचारीं ॥२९॥
सांडूनि विषयांची आस । घांलोनि कळिकाळावरी कांस ।
माझ्या कीर्तनीं न होनि उदास । अतिउल्हास करावा ॥७३०॥
त्यजूनियां कामाचें बीज । सांडूनि लौकिकाची लाज ।
कीर्तनीं नाचावें भोज । गरुडध्वज स्मरोनि ॥३१॥
रामकृष्ण हरि गोविंद । ऐशिया नामांचे प्रबंध ।
गातां नाना पदें छंदबंध । करावा विनोद कीर्तनीं ॥३२॥
जेणें आत्मतत्त्व जोडे जोडी । ऐशिया पदांची घडीमोडी ।
कीर्तनीं गावी गा आवडी । संतपरवडी बैसवूनी ॥३३॥
श्रुति मृदंग टाळ घोळ । मेळवूनि वैष्णवांचा मेळ ।
कीर्तनीं करावा गदारोळ । काळवेळ न म्हणावा ॥३४॥
दशमीं दिंडी जागरणें । आळस सांडूनि गावें वाणें ।
हावभावो दाखवणें । कर्मस्मरणें माझेनि ॥३५॥
ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।
मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥
गोवर्धन उचलिला । दावाग्नि प्राशियेला ।
तो तो विन्यासू दाविला । सेतु बांधिला अनुकारू ॥३७॥
आळस दवडूनि दूरी । अभिमान घालोनियां बाहेरी ।
अहर्निशीं कीर्तन करी । गर्व न धरी गाणिवेचा ॥३८॥
गाणीव जाणीव शहाणीव । वोंवाळूनि सांडावें सर्व ।
सप्रेम साबडी कथागौरव । सुख अभिनव तेणें मज ॥३९॥
गर्जत नामाच्या कल्लोळीं । नामासरसी वाजे टाळी ।
महापातकां जाली होळी । ते वैष्णवमेळीं मी उभा ॥७४०॥
जें सुख क्षीरसागरीं नसे । पाहतां वैकुंठींही न दिसे ।
तें सुख मज कीर्तनीं असे । कीर्तनवशें डुल्लतु ॥४१॥
मज सप्रेमाची आवडी भारी । भक्तभावाचिया कुसरी ।
मीही कीर्तनीं नृत्य करीं । छंदतालावरी विनोदें ॥४२॥
ऐशिया कीर्तनपरिपाटीं । बुडाल्या प्रायश्चित्तांच्या कोटी ।
खुंटली यमदूतराहाटी । काढिली कांटी पापाची ॥४३॥
नामस्मरणाच्या आवडीं । लाजल्या मंत्रबीजांच्या कोडी ।
तपादि साधनें बापुडीं । जालीं वेडीं हरिनामें ॥४४॥
ऐकोनि हरिनामाचा घोख । योगयागीं लपविलें मुख ।
धाकें पळालें विषयसुख । विराले देख अधर्म ॥४५॥
हरिनामाच्या कडकडाटीं । दोष रिघाले दिक्पटीं ।
तीर्थांची उतरली उटी । कीर्तनकसवटी हरिप्रिय ॥४६॥
माझेनि प्रेमें उन्मत्त होऊनी । आवडीं कीर्तन अनुदिनीं ।
मनसा वाचा कर्में करूनी । मजवांचूनी नेणती ॥४७॥
मदर्थे धर्मकामार्थान् आचरन् मदपाश्रयः ।
लभते निश्चलां भक्तिं मय्युद्धव सनातने ॥ २४ ॥
माझे भक्त जे उत्तम । त्यांचा धर्म अर्थ मीचि काम ।
मजवेगळा मनोधर्म । अन्यथा कर्म करूं नेणे ॥४८॥
माझें भजन उत्तम कर्म । मज अर्पे तो शुद्ध धर्म ।
मज कामणें हा शुद्धकाम । ज्याचा आराम मजमाजीं ॥४९॥
वेंचूनियां नाना अर्थ । संग्रहो करिती परमार्थ ।
नश्वर अर्थ जें वित्त । तें माझे भक्त न संचिती ॥७५०॥
ज्यांचें धनावरी चित्त । ते केवळ जाण अभक्त ।
ते जें जें कांही भजन करीत । तें द्रव्यार्थ नटनाट्य ॥५१॥
मनसा वाचा कर्में जाण । जेथ नाहीं मदर्पण ।
तें तें दांभिक भजन । केवळ जाण उदरार्थ ॥५२॥
भक्तीमाजीं विरुद्धपण । विरुद्ध धर्माचें लक्षण ।
तेंही करीन निरूपण । सावधान अवधारीं ॥५३॥
माझें भजन करूनि गौण । जो करूं रिघे धनार्जन ।
हें भजनविरुद्ध लक्षण । मुख्य जाण भक्ताचें ॥५४॥
गांठींचें वेंचूं नेणे धन । कोरडें करी माझें भजन ।
मजसी जेणें केलें वंचन । विरुद्धलक्षण मुख्यत्वें ॥५५॥
या नांव अर्थविरुद्धता । आतां दुष्टकामीं जो विचरता ।
मी भजतसें भगवंता । दोष सर्वथा मज न लगे ॥५६॥
ऐसऐसिया भावना । जो दुष्ट कामीं विचरे जाणा ।
हे भजनीं विरुद्धलक्षणा । भक्ता अभक्तपणा आणीत ॥५७॥
मज नार्पितां जें जें श्राद्ध । ते त्याची कल्पना विरुद्ध ।
श्राद्धसंकल्प अविरुद्ध । मदर्पणें वेद गर्जती ॥५८॥
श्राद्धीं मुख्य संकल्प जाण । पितरस्वरूपी जनार्दन ।
ऐसें असोनियां जाण । नैवेद्य मदर्पण न करिती ॥५९॥
’अन्न ब्रह्म अहं ब्रह्म’ । हें श्राद्धीचें गुह्य वर्म ।
ऐसें नेणोनि शुद्ध कर्म । वृथा भ्रम वाढविती ॥७६०॥
मी सकळ जगाचा जनिता । मुख्य पितरांचाही मी पिता ।
त्या मज कर्म नार्पितां । विरुद्ध सर्वथा तें श्राद्ध ॥६१॥
मज नार्पितां जें जें करणें । तें तें उपजे अभक्तपणें ।
विरुद्ध धर्माचीं लक्षणें । दुःख दारुणें अनिवार ॥६२॥
उत्तम भक्तांचें लक्षण । संकल्पेंवीण जाण ।
अन्नपानादि मदर्पण । करिती खूण जाणती ॥६३॥
ध्रुवाच्यापरी अढळ । ते माझ्या ठायीं भजनशीळ ।
ते माझी भक्ति अचंचळ । अतिनिश्चळ पावती ॥६४॥
आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या तिघांसी जी नव्हेचि प्राप्ती ।
ते माझी जे चौथी भक्ती । प्रेमें पावती उद्धवा ॥६५॥
आर्त आर्तिहरणकाजें । जिज्ञासु जाणपणालागीं भजे ।
तिजेनि वांछिजे । अतिवोजें अर्थसिद्धी ॥६६॥
यावरी चौथियाचे ठायीं । या कल्पनांचा मागमोस नाहीं ।
यालागीं चौथी भक्ति पाहीं । त्याच्या ठायीं घर रिघे ॥६७॥
जया भक्तीमाजीं वाडेंकोडें । मीच मी चहूंकडे ।
जेथींच्या तेथें सांपडें । हें भजनें जोडे तयासी ॥६८॥
संकल्प केलियावीण । सहजें होतसे मदर्पण ।
हें चवथे भक्तीचें लक्षण । अतर्क्यभजन पैं माझे ॥६९॥
तेथ जें करणें तेचि पूजा । जें बोलणें तो जपू माझा ।
जें देखणें तें अधोक्षजा । दर्शन वोजा होतसे ॥७७०॥
तेथ चालणें ते यात्रा माझी । जें भक्षी तें मजचि यजी ।
त्याची निद्रा ते समाधि माझी । ऐसा मजमाजीं भजतसे ॥७१॥
यापरी अनायासें जाण । सहजें होतसे मदर्पण ।
हे चौथी भक्ति सनातन । उद्धवा संपूर्ण तो लाभे ॥७२॥
उद्धवा ऐसें मानिसी चित्तीं । जे मुळींहूनि चारी भक्ती ।
पहिली दुजी तिजी चौथी । मिथ्यावदंती कल्पना ॥७३॥
सहज माझी जे प्रकाशस्थिती । ते भक्ति बोलिजे भागवती ।
संविती बोलिजे वेदांतीं । शैवीं शक्ती बोलिजे ॥७४॥
बौद्ध जिनेश नेमिनाथ । जोगी म्हणती आदिनाथ ।
भैरव खंडेराव गाणपत्य । अव्यक्त म्हणत एक पै ॥७५॥
एक म्हणती हे आदिमाता । सौर म्हणती तो हा सविता ।
असो नांवांची बहु कथा । उपासकता विभागें ॥७६॥
ऐशी जे कां प्रकाशस्थिती । त्या नांव बोलिजे भक्ती ।
जेणें प्रकाशें त्रिजगतीं । उत्पत्ति स्थिति लय भासे ॥७७॥
माझ्या नाना अवतारमाळा । येणें प्रकाशें प्रकाशती सोज्ज्वळा ।
देवो देवी सकळा । येणें प्रकाशमेळां भासती ॥७८॥
माझ्या अवतारांची उत्पत्ती । तेणें प्रकाशें असे होती ।
नाना चरित्रें अंतीं । प्रवेशती ते प्रकाशीं ॥७९॥
ऐशिया प्रकाशाची जे प्राप्ती । ते जाण सनातन माझी भक्ती ।
उद्धवा म्यां हे तुजप्रती । यथानिगुती सांगीतली ॥७८०॥
निश्चळभक्ती सनातन । हें मुळींचें पदव्याख्यान ।
यालागीं भक्ति सनातन । समूळ जाण बोलिलों ॥८१॥
सांडूनि पदपदार्था । नाहीं बोलिलों जी वृथा ।
सावधान व्हावें श्रोतां । पुढील कथा अनुपम ॥८२॥
उद्धवा हे ऐशी माझी भक्ती । कैसेनि म्हणसी होये प्राप्ती ।
भावें धरिलिया सत्संगती । माझी भक्ती उद्बोधे ॥८३॥
सत्सङ्गलब्धया भक्त्या मयि मां स उपासिता ।
स वै मे दर्शितं सद्भिः अञ्जसा विन्दते पदम् ॥ २५ ॥
मुख्यत्वें संतांची सेवा । हेंचि साधन आवडे देवा ।
संतवचने निजभावा । देतुसे तेव्हां निजभक्ती ॥८४॥
ज्यासी आवडे संतसंगाचा मेळू । जो साधुवचनीं अतिभुकाळू ।
जो पडिलें वचन नेणें उगळूं । तोचि पायाळू निजभक्ती ॥८५॥
साधुवचनीं श्रद्धा भारी । देखोनियां निजनिर्धारीं ।
त्यावरी सद्गुरु कृपा करी । साधु चराचरीं गुरुरावो ॥८६॥
गुरुवांचोनी तत्त्वतां । नाहीं संसारी तारिता ।
गुरुवचनें निजभक्तिदाता । मीचि सर्वथा भक्तांसी ॥८७॥
सद्गुरु जो संसारी । त्याची आज्ञा मी वाहें शिरीं ।
तो ज्यावरी कृपा करी । तो मी उद्धरीं तात्काळ ॥८८॥
त्या सद्गुरुचें भजन । जो मद्रूपें करी जाण ।
त्याचें मज पढियंतेपण । माझेनिही जाण न बोलवे ॥८९॥
त्याचा इहलोक परलोक । दोन्ही चालविता मीचि देख ।
त्याचे मज अत्यंत सुख । हरिखें हरिख वोसंडे ॥७९०॥
त्यासी गुरूनें जो दाविला मार्ग । चालतां न पडे प्रयासपांग ।
मी सामोरा धांवें श्रीरंग । आपुलें सर्वांग मी वोडवीं ॥९१॥
तेणें जावें ज्या पदासी । तें पदचि मी आणीं त्यापासीं ।
संतभजनीं प्रीति ऐशी । हृषीकेशी सांगतू ॥९२॥
ऐसें ऐकोनियां वचन । उद्धवाचें कळवळलें मन ।
कोण कोण ते साधुजन । त्यांचें निजचिन्ह पुसों पां ॥९३॥
कोण ते भक्तींचें लक्षण । भजती खूण ते कोण कोण ।
तें समूळ जाणावया आपण । उद्धवें प्रश्न मांडिला ॥९४॥
श्रीउद्धव उवाच ।
साधुस्तवोत्तमश्लोक मतः कीदृग्विधः प्रभो ।
भक्तिस्त्वय्युपयुज्येत कीदृशी सद्भिरादृता ॥ २६ ॥
ज्ञाते वक्ते आहेत बहुत । परी ते रजतमगुणयुक्त ।
गुणानुसारें निरूपीत । त्यांसी पुसों चित्त मानीना ॥९५॥
अथवा सात्त्विक केवळ । तो सत्त्वगुणें विव्हळ ।
बोलणें बोलतां जाये बरळ । नव्हे केवळ निजबोधू ॥९६॥
तैसा तूं नव्हेसी कृष्णनाथा । तुजआधीन गुण तत्त्वतां ।
लीलाविग्रहें देहधरिता । निजज्ञानवक्ता तूंचि एक ॥९७॥
यालागीं जी उत्तमश्लोक । तुज म्हणती तीनी लोक ।
तुजवेगळा आणिक । आम्हांसी देख मानेना ॥९८॥
माझिया प्रश्नाचा वक्ता । तूंचि एक कृष्णनाथा ।
तरी साधु कोण तत्त्वतां । तुज सर्वथा मानला ॥९९॥
तुज मानले जे साधुजन । त्यांचें संपूर्ण सांग लक्षण ।
तुज पढियंती भक्ति कोण । तेंही लक्षण सांगावें ॥८००॥
भक्तीमाजीं भक्ति सधर । जे कां तुझी प्राप्तिकर ।
अतिउत्तम परात्पर । संतीं निरंतर आदरिली ॥१॥
संतीं आदरिलें जे भक्तीसी । संतासी पुसूं जाय म्हणसी ।
मज विश्वास तुझिया वचनासी । पुसों आणिकांसी मानेना ॥२॥
जे ज्या देवतांतरा भजती । ते ती उत्तम भक्ति म्हणती ।
तुज मानली जे श्रीपती । ते मजप्रती सांगावी ॥३॥
समान कुळशीळसंवादु । तैसियासीच म्हणती साधु ।
तूं निजमुखें जो म्हणसी शुद्धु । ती मज वंद्यु सर्वथा ॥४॥
तीं संबोधनीं सारंगधरू । उद्धव प्रार्थूनि करी सादरू ।
तीं विशेषणीं निजविचारू । श्रवणाधिकारू सांगतु ॥५॥
एतन्मे पुरुषाध्यक्ष लोकाध्यक्ष जगत्प्रभो ।
प्रणतायानुरक्ताय प्रपन्नाय च कथ्यताम् ॥ २७ ॥
पुरुषीं पुरुषोत्तम तूंचि कीं । कर्मधर्मांचा विवेकी ।
यालागीं बोलिजे पुरुष्याध्यक्षी । सर्वसाक्षी गोविंदा ॥६॥
जैसें कर्म तैसा फळदाता । यालागीं बोलिजे लोकाध्यक्षता ।
तूंचि ब्रह्मादिकांचा नियंता । प्रतिपाळिता जगाचा ॥७॥
हो कां मी जगाचा प्रतिपाळिता । त्या जगामाजीं तूंही असतां ।
तुजचि सांगावी ज्ञानकथा । हे अधिकता कां म्हणसी ॥८॥
जरी तूं सर्वज्ञ सर्वेश्वरू । अंतर्यामी नियंता ईश्वरू ।
जरी देखसी माझा अधिकारू । तरी ज्ञाननिर्धारू सांगावा ॥९॥
हो कां मज अधिकारू नाहीं । तरी शरण आलों तुज पाहीं ।
शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाहीं सर्वथा ॥८१०॥
विषयीं देखोनि थोर दुःख । झालों तुझिया चरणासंमुख ।
अतिदीन मी तुझे रंक । पां आवश्यक तुवां कीजे ॥११॥
माझ्या दुर्जय वासना । अनिवार मज निवारतीना ।
त्या तूं निवारीं श्रीकृष्णा । शरण चरणा यालागीं ॥१२॥
मी एक भक्त अनुरक्तु । ऐसें बोलतां बहु गर्व दिसतु ।
तूं सर्वज्ञ श्रीअनंतु । कृपावंतु दीनाचा ॥१३॥
मी एकु श्रवणाधिकारी । हेंही न म्हणवे गा मुरारी ।
ऐसें बोलोनियां पाय धरी । कृपा करीं कृपानिधि ॥१४॥
आम्ही स्वगोत्र सखे सहज । पाय धरणें न घडें तुज ।
या म्हणणियाचें निजबीज । कळलें मज गोविंदा ॥१५॥
त्वं ब्रह्म परमं व्योम पुरुषः प्रकृतेः परः ।
अवतीर्णोऽसि भगवन् स्वेच्छोपात्तपृथग्वपुः ॥ २८ ॥
तूं निर्गुण निर्विशेष । चिन्मात्रैक चिदाकाश ।
पुरुषांमाजीं उत्तम पुरुष । वंद्य सर्वांस तूं एक ॥१६॥
तूं ब्रह्म गा निर्विकार । प्रकृतिपुरुषांहोनि पर ।
तुझा वेदशास्त्रां न कळे पार । अगोचर इंद्रियां ॥१७॥
ऐक आमुचे भाग्याची कळा । त्या तुज प्रत्यक्ष देखतों डोळां ।
मुकुटकुंडलें वनमाळा । घनसांवळा शोभतु ॥१८॥
सुंदर राजीवलोचन । पीतांबर परिधान ।
देखोनि निवताहे तनुमन । तूं जगज्जीवन जगाचा ॥१९॥
त्या तुझें दर्शन अतिगोड । देखतां पुरे जगाचें कोड ।
त्याही देहाची तुज नाहीं चाड । ऐसा निचाड तूं देवा ॥८२०॥
तरी भक्तकृपेचा कळवळा । धरिसी नानावतारमाळा ।
भक्तइच्छा तूं स्वलीळा । देहाचा सोहळा दाविसी ॥२१॥
भक्तकृपेनें तत्त्वतां । तूं अवतरलासी कृष्णनाथा ।
तरी माझिया प्रश्नाचा वक्ता । न प्रार्थितां जालासी ॥२२॥
जेवीं वत्सहुंकारें गाये । वोरसली धांवताहे ।
तेवीं उद्धवप्रश्नीं देव पाहें । वोळलाहे निजबोधें ॥२३॥
धन्यासी दुभतें दोनी सांजे । तेंही वत्सयोगें पाविजे ।
वत्सासी वोळली सदा सहजें । तेवीं अधोक्षजें उद्धवासी ॥२४॥
उद्धव आवडला आवडीं । त्याच्या प्रश्नाची अतिगोडी ।
बापु भाग्याची परवडी । जोडिल्या जोडी श्रीकृष्णू ॥२५॥
जें जें कांहीं उद्धव पुसतू । त्यासी अंजुळी वोडवीं श्रीकृष्णनाथू ।
आवडी त्यातें चाटूं पाहतू । भावार्था अनंतू भुलला ॥२६॥
जैशी अजातपक्ष पिलीं । त्यांसी पक्षिणी मुखीं चारा घाली ।
तैसी निजज्ञानगुह्यबोली । कृष्ण हृदयीं घाली उद्धवाचे ॥२७॥
उद्धवप्रश्नाचें उत्तर । पांच श्लोकीं शारङ्गधर ।
साधुलक्षणें विचित्र । अतिपवित्र सांगेल ॥२८॥
साधुलक्षणें अपार जाण । त्यांत उत्तमोत्तम तीस गुण ।
निवडोनियां श्रीकृष्ण । उद्धवासी आपण सांगतु ॥२९॥
श्रीभगवानुवाच ।
कृपालुरकृतद्रोहस्तितिक्षुः सर्वदेहिनाम् ।
सत्यसारोऽनवद्यात्मा समः सर्वोपकारकः ॥ २९ ॥
कृपेसी स्वतंत्र जन्म नाहीं । जेथ उपजे तो साधु पाहीं ।
कृपा वसे संतांच्या देही । त्यांचेनि ते पाहीं दाटुगी जगीं ॥८३०॥
कृपा त्यांचेनि महिमे आली । दया त्यांचेनि जीवें ज्याली ।
कठिणत्वाची कांटी काढिली । समूळीं उपटिली निष्ठुरता ॥३१॥
कृपा भूतमात्राच्या ठायीं । सारिखीच सर्व देहीं ।
येथतेथ हें त्या नाहीं । अवकृपा ठायीं निमाली ॥३२॥
नवल कृपाळुत्वाचें चित्त । जीवाचा जीव जीवीं स्यूत ।
दुःख हरोनि सुख देत । कृपा अद्भुत यापरी ॥३३॥
जेणें आपणासी होय दुःख । तें परासी न करी निःशेख ।
जेणें आपणिया होय सुख । तें करी आवश्यक प्राणिमात्रां ॥३४॥
या नांव कृपाळुता । हे पहिलें लक्षण संतां ।
दुसरें तें अद्रोहता । ऐक आतां सांगेन ॥३५॥
लोकीं हिंडतां अद्रोहता । ठावो न लभेचि सर्वथा ।
मग शरण आली साधुसंतां । सावकाशता वस्तीसी ॥३६॥
ते दयाळु शरणागता । तिंहीं प्रतिपाळिली अद्रोहता ।
भूतीं भगवंतू देखतां । द्रोहाची वार्ता निमाली ॥३७॥
व्याघ्रसर्पादि देहांसी । कदा द्वेष नुपजे त्यासी ।
जरी देऊं आलें उपद्रवासी । तरी द्वेषासी करीना ॥३८॥
देहास आलिया आपदा । तेणें झाडिकरी प्रारब्धा ।
द्वेष येऊं नेदी कदा । नातळे क्रोधा निजबोधें ॥३९॥
हे जाण पां अद्रोहता । दुसरें लक्षण तत्त्वतां ।
तितिक्षा ते ऐक आतां । सहनशीलता साधूंची ॥८४०॥
शांति परदेशी झाली होती । जेथें जाये तो दवडी परती ।
मग अतिदीन येतां काकुळती । निजधामा संतीं आणिली ॥४१॥
संतीं वाढविली अतिप्रीतीं । ते भगवंताची झाली पढियंती ।
तेणें आपुली निजसंपत्ती । शांतीच्या हातीं दिधली ॥४२॥
शांती सकळ वैभवेंसीं । अखंड असे संतांपाशीं ।
यालागी सहनशीलता तयांसी । अहर्निशीं अनिवार ॥४३॥
लागतां सकळ भूतांचा झटा । न म्हणे हा भला वोखटा ।
नाचतू निजशांतीचे चोहटा । संत गोमटा त्या नांव ॥४४॥
ऐशी जे सहनशीलता । ते तितिक्षा जाण तत्त्वतां ।
हे तिसरी लक्षणता । सत्याची सत्यता अवधारीं ॥४५॥
सत्य अल्पायुषी झालें येथें । मरे उपजे जेथींच्या तेथें ।
कोठेंही नव्हे वाढतें । तेणें संतांतें ठाकिलें ॥४६॥
सत्यासी संतांसी होतां भेटी । तंव सत्यस्वरूपीं पडली गांठी ।
सत्य संतत्वे उठी । झालें सृष्टीं चिरायु ॥४७॥
यापरी सत्य संतदृष्टीं । सत्य सारें आलें पुष्टी ।
संतबळें वाढलें सृष्टीं । सत्यें भेटी परब्रह्मीं ॥४८॥
संतांसी होआवया उतरायी । सत्य लागलें त्यांचे पायीं ।
संतचरणावेगळा पाहीं । थारा नाहीं सत्यासी ॥४९॥
ऐसे सत्यास आधारभूत । ज्यांचे पाखोवा सत्य जीत ।
ज्यांचेनि बळें सत्य समर्थ । ते शुद्ध संत जाणावे ॥८५०॥
ज्यांसी सबाह्य सत्यत्वें तुष्टी । जे सत्यस्वरूपें आले पुष्टी ।
सत्ये धाली दे ढेकर दृष्टी । ज्यांची वाचा उठी सत्यत्वें ॥५१॥
या नांव जाण सत्याचें सार । हें संतांचें वसते घर ।
हे मज मान्य संत साचार । मी निरंतर त्यांपाशीं ॥५२॥
जिंहीं असत्याची वाहूनि आण । ज्यांमाजी सत्य सप्रमाण ।
जे सदा सत्यत्वें संपन्न । हें मुख्य लक्षण साधूंचें ॥५३॥
या नांव सत्यसार । संतलक्षण साचार ।
हा चौथा गुण सधर । अनवद्य अपार तें ऐका ॥५४॥
निंदा असूयादि दोष समस्त । निजात्मबोधें प्रक्षाळीत ।
अत्यंत पवित्र केलें चित्त । अनिंदित निजबोधें ॥५५॥
गुरुआज्ञातीर्थीं न्हाला । न्हावोनि सर्वांगीं निवाला ।
त्रिविधतापें सांडवला । पवित्र झाला मद्रूपें ॥५६॥
काय सांगूं त्याची पवित्रता । तीर्थें मागती चरणतीर्था ।
मीही पदरज वांछिता । इतरांची कथा कायसी ॥५७॥
कृष्ण म्हणे उद्धवा । हा अनवद्य गुण पांचवा ।
ऐक आतां सहावा । सम सर्वां समभावें ॥५८॥
निजरूपें सर्वसमता । समचि देखे सर्वां भूतां ।
निःशेष निमाली विषमता । जेवीं सैंधवता सागरीं ॥५९॥
नाना अलंकार पदार्था । सोनेंपणें विकत घेतां ।
ते ते पदार्थ न मोडितां । स्वभावतां सम सोनें ॥८६०॥
तैसे नाना आकार नाना नाम । अवघें जग दिसे विषम ।
साधूचि चिद्रूपें सर्व सम । न देखे विषम निजबोधे ॥६१॥
ऐशिया समसाम्यावस्थेसी । दैवें आलिया सुखदुःखांसी ।
तेहीं मुकली द्वंद्वभावासी । सहजें समरसीं निजसाम्यें ॥६२॥
सव्यें मिनल्या महानदीसी । अपसव्यें आल्या गांवरसासी ।
गंगा दोहींतेंही समरसी । गुणदोषांसीं उडवूनी ॥६३॥
तेथ पवित्रअपवित्रता । बोलूंचि न ये सर्वथा ।
गोडकडूपणांची वार्ता । निजांगें समता करी गंगा ॥६४॥
तैसें सुखदुःखांचें भान । साधूंसी समत्वें समान ।
सदा निजबोधें संपन्न । हे अगाध लक्षण संतांचें ॥६५॥
नटिया एकचि एकला । गायव्याघ्रांचें सोंग अवगला ।
भीतरील खेळ्या जैं वोळखिला । तैं फिटला भवभ्रमू ॥६६॥
तैशी भयाभयवार्ता । द्वैतभावें उठी सर्वथा ।
साधु उभयसाम्यें पुरता । भयनिर्भयता तो नेणे ॥६७॥
द्वंद्वसाम्यें परिपूर्ण । साधूचा हा सहावा गुण ।
ऐक सातवें लक्षण । परोपकारीपण तयाचें ॥६८॥
पत्र पुष्प छाया फळ । त्वचा काष्ठ समूळ ।
वृक्ष सर्वांगें सफळ । सर्वांसी केवळ उपकारी ॥६९॥
जो वृक्षा प्रतिपाळी । कां जो घावो घाली मूळीं ।
दोनींतें वृक्ष पुष्पीं फळीं । समानमेळीं संतुष्ट ॥८७०॥
मोडूनि फळें आलिया वृक्षें । वृक्षु एकही स्वयें न चाखे ।
तेवीं कर्मफळा जो न टेकें । तो यथासुखें परब्रह्म ॥७१॥
तैसा कायावाचामनें प्राणें । साधु वाढला उपकाराकारणें ।
आपुलें परावें म्हणों नेणे । उपकारू करणें सर्वांसी ॥७२॥
हो कां चंद्र उगवोनि अंबरीं । जेवीं जगाचें आंधारें निवारी ।
विश्वाचा ताप दूर करी । निववी निजकरीं सर्वांतें ॥७३॥
तेथ चंद्रामृत चकोरीं सेवावें । येरांसी चंद्र न म्हणे न द्यावें ।
जो जो भजे जेणें भावें । तो तो पावे तें सुख ॥७४॥
तैसेंचि जाण साधूपाशीं । जो जो श्रद्धा करी जैशी ।
त्या त्या देतसे सुखासी । होत जगासी उपकारी ॥७५॥
काउळे चंद्रासी हेळसिती । चकोर चंद्रामृत सेविती ।
तेवीं दुष्ट साधूतें धिक्कारिती । भावार्थी पावती निजलाभू ॥७६॥
सातव्या लक्षणाचा उभारा । सांगितलें परोपकारा ।
पुढील श्लोकीं लक्षणें अकरा । साधुनिर्धारा सांगत ॥७७॥
कामैरहतधीर्दान्तो मृदुः शुचिरकिञ्चनः ।
अनीहो मितभुक् शान्तः स्थिरो मच्छरणो मुनिः ॥ ३० ॥
उर्वशी आलिया सेजेसी । कामक्षोभ नुपजे ज्यासी ।
स्वानंद भोगितां अहर्निशीं । विषयकामासी विसरला ॥७८॥
रंकू पालखिये बैसला । तो पूर्वील वाहना विसरला ।
तेवीं हा निजानंदें तृप्त झाला । काम विसरला तुच्छत्वें ॥७९॥
कांहीं अप्राप्त पावावया कामावें । साधूसी अप्राप्तता न संभवे ।
प्राप्तपदीं यथागौरवें । निजानुभवें विराजतू ॥८८०॥
खद्योता सूर्य भेटों जातां । खद्योता न देखे सविता ।
सूर्यासी न भेटवे खद्योता । तेवीं अप्राप्तता साधूसी ॥८१॥
एवं उभय परी पाहतां । कामू निमाला सर्वथा ।
हें आठवें लक्षण तत्त्वतां । अकामता साधूची ॥८२॥
सावधानें अंतर नेमितां । तेचि बाह्येंद्रियां नियामकता ।
जेवीं कां लेंकीसी शिकवण देतां । सून सर्वथा चळीं कांपे ॥८३॥
मुख्य धूर रणीं लागल्या हाता । येर कटक जिंतिलें न जुंझतां ।
कां मूळ छेदिलें असतां । शाखा समस्त छेदिल्या ॥८४॥
एवं अंतरवृत्तीचा जो नेम । तोचि बाह्येंद्रियां उपरम ।
ऐसेनिही जें निपजे कर्म । तें निर्भ्रम अहेतुक ॥८५॥
अंतर जडलें आत्मस्थितीं । बाह्य रंगलें मद्भक्तीं ।
तेथें जीं जीं कर्मे निपजती । तीं तीं होती ब्रह्मरूप ॥८६॥
बाह्येंद्रियें करितां नेम । अंतरीचें कर्मीं प्रकटे ब्रह्म ।
हा बाह्येंद्रियांचा नेम । आत्माराम जाणती ॥८७॥
ऐशी बाह्येंद्रिय नियामकता । हे जाणावी साधूची दांतता ।
हा नववा गुण तत्त्वतां । ऐक आतां दशमातें ॥८८॥
आकाश सर्वांसीही लागे । परी कठिण नव्हे कोणेही भागें ।
तेवीं साधु जाण सर्वांगें । मृदु लागे सर्वांसी ॥८९॥
पिंजल्या कापुसाचा गोळा । फोडूं नेणे कोणाच्या कपाळा ।
तैसाचि साधूचा जिव्हाळा । अतिकोंवळा सर्वांसी ॥८९०॥
पाहें पां जैसें गंगाजळ । गायीव्याघ्रांसी करी शीतळ ।
तैसाचि साधुही केवळ । मृदु मंजुळ सर्वांसी ॥९१॥
साधूची अतिमृदुता । या नांव जाण सर्वथा ।
हे दशमलक्षणयोग्यता । ऐक आतां अकरावें ॥ ९२ ॥
साधूंची जे शुचिष्मंतता । ते भगवद्भजनेंचि तत्त्वतां ।
व्रततपदानादितीर्था । शुचिष्मंतता त्यांचेनी ॥९३॥
परदारा आणि परधन । सर्वथा नातळे ज्याचें मन ।
गंगादि तीर्थे त्यांचे जाण । चरणस्पर्शन वांछिती ॥९४॥
स्वदारास्वधन सलोभता । अवश्य जाणें अधःपाता ।
द्रव्यदारानिरपेक्षता । शुचिष्मंतता साधूची ॥९५॥
ऐशी असोनि शुचिष्मंतता । तो निंदीना व्रततपादितीर्था ।
ते ते विधीतें आचरितां । सदाचारता अतिश्रोत्री ॥९६॥
पडलिया मगरमिठी । ते न सोडी प्राणसंकटी ।
सांपडे तें सगळेंचि घोटी । तैशी पडली मिठी जीवब्रह्मा ॥९७॥
हें पुढेंसूनि परब्रह्म । आश्रमधर्मादि स्वकर्म ।
आचरोनि दावी उत्तमोत्तम । कर्मी ब्रह्मप्रतीती ॥९८॥
कर्म करितो लोक म्हणती । तो वर्तताहे ब्रह्मस्थितीं ।
हें ज्याचें तो जाणे निश्चितीं । लोकां प्रतीती कळेना ॥९९॥
कुलाल भांडें करूनि उतरी । चक्र भोंवे पूर्विला भंवरी ।
तैसा साधू पूर्वसंस्कारी । स्वकर्मे करी वृत्तिशून्य ॥९००॥
हें साधुलक्षण अत्यंत थोर । ऐकतां सुगम करितां दुर्धर ।
हे अकरावें अतिपवित्र । ऐक विचित्र तें बारावें ॥१॥
साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता ।
देहगेहें निःसंगता । अकिंचनता त्यासी नांव ॥२॥
स्फटिकु काजळीं दिसे काळा । आरक्तीं आरक्तकीळा ।
नीळवणीं भासे । निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वें ॥३॥
स्फटिक जपाकुसुमीं ठेविला । पाहतां दिसे तांबडा झाला ।
परी तो अलिप्तपणें संचला । नाहीं माखला तेणें रंगें ॥४॥
तैसा साधु परिग्रहामाजी वसे । परिग्रही झालाही दिसे ।
परी जागृतिस्वप्नसुषुप्तिवषें । परिग्रहो न स्पर्शे निजबोधें ॥५॥
परीस सर्व धातूंसी खेंव देतां । मिळणीं सोनें करी तत्त्वतां ।
तो सुवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥६॥
तैसा साधू म्हणे जें जें माझें । तें तें त्यासी नाठवे दुजें ।
ऐक्यभावाचीं नाचवी भोजें । अधोक्षजें अंकितु ॥७॥
चिन्मात्री जडलें मन । विश्व जाहलें चैतन्यघन ।
बुडालें परिग्रहाचें भान । अकिंचनपण या नांव ॥८॥
सकळ सांडूनि वना गेला । वनीं वनिता चिंतू लागला ।
तो त्यागचि बाधकत्वा आला । उलथोन पडिला परिग्रहीं ॥९॥
उंडणी भिंती चढों लाहे । चढते कष्ट व्यर्थ पाहे ।
ते पूर्विल्यापरीस तळीं जाये । उलंडूनि ठाये अतिदुःखी ॥९१०॥
तैशी मुंगी नव्हे पाहें । उंडणी घेऊनि वृक्षावरी जाये ।
सत्संगती मूर्ख उद्धरों लाहे । परी ते उपाये न करिती ॥११॥
मुंगी लहान उंडणी थोर । ते तिचा करूं शके उद्धार ।
तैसे अकिंचन जे नर । ते करिती उद्धार सकळांचा ॥१२॥
असो मूर्खांची जे त्यागिती गती । ते अत्यंतबाधें बाधका होती ।
जंव धरिली नाहीं सत्संगती । तंव त्यागस्थिती कळेना ॥१३॥
प्रपंच सांडूनी वना गेला । तो देहप्रपंचें दृढ अडकला ।
देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥१४॥
मूर्खासी त्याग तो झाला बाधू । परिग्रहीं असोनि मुक्त साधू ।
सबाह्य त्यागें अतिशुद्धु । शुकनारदू तिहीं लोकीं ॥१५॥
ते दोघेही लागती जनकाच्या पायीं । तो राज्य करितांही विदेही ।
त्यासी मीही मानीतसें पाहीं । अभिनव नवाई साधूची ॥१६॥
या नांव मुख्य अकिंचनता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।
हे बारावी लक्षणता । ऐक आतां अनीहा ॥१७॥
अनीहा झाली बापुडी । जेथ जाय तो दूर दवडी ।
कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रयें ॥१८॥
अनीहा हिंडता लोकीं तिहीं । तिळभरी ठावो बसावया नाहीं ।
ईहा वैरिणी लागली पाहीं । ठायींच्या ठायीं दंडवी ॥१९॥
कोणी येवों नेदी दाराकडे । अतिदीन जाली बापुडें ।
धाया मोकलोनि रडे । गार्हाणें संतांपुढें देवों आली ॥९२०॥
ते कृपाळू दयामेळें । निजकरें पुसोनि डोळे ।
प्रतिपाळिली स्वहितकाळें । संतबळें वाढली ॥२१॥
त्यापूर्वील वैर स्मरोनियां । ईहा वैरिणी साधावया ।
संतांसी पुसोनि उपाया । तिच्या अपाया प्रवर्तली ॥२२॥
ईहेसी नाना चेष्टीं चेष्टवितां । अहं आणि जाण ममता ।
कामें अंगीं घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥२३॥
ईहा कामबळें वाढली थोर । व्यापूनि राहिली घरोघर ।
तिसीं साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥२४॥
असंगशस्त्र मागोनि संतां । ईहेच्या करावया घाता ।
आधीं मारूं धांवे अहंममता । दोघें धाकता निमालीं ॥२५॥
अनीहा पाठीं लागल्या जाण । अहंममतेसी म्हातारपण ।
थरथरां कांपोनि प्राण । घायेंवीण सांडिला ॥२६॥
अनीहा देखोनि दिठीं । काम पळे बारा वाटीं ।
संकल्पाचे शेवटिले गोटीं । उठाउठी पाडिला ॥२७॥
कामू पडतां रणांगणीं । क्रोधादि शूर पडिले रणीं ।
ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधूनी मारिले ॥२८॥
एवं अनीहेसमोर । राही ऐसा नाहीं वीर ।
मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाहीं ॥२९॥
काम निमाल्या सर्वथा । ईहा रांडवली वस्तुतां ।
मुख न दावीच संतां । अधोगमनता पळाली ॥९३०॥
यालागीं ईहेसवें जो लागला । तो जाणावा अधोगती गेला ।
अनीहेचा जो अंकित झाला । तो आवडला गोविंदा ॥३१॥
म्हणसी अनीहा ते कोण । काय ते ईहेचें लक्षण ।
ऐक सांगेन संपूर्ण । जेणें बाणे खूण जिव्हारीं ॥३२॥
काम्यकर्मादि क्रियाजाळ । तेचि ईहा जाणावी अतिचपळ ।
अंतरीं जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥३३॥
अंतरीं कामाची वार्ता । नुपजे कर्माची कर्मावस्था ।
अणुभरी न रिघे उद्वेगता । अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥
ऐशी अनीहा असे ज्यासी । देवो आज्ञाधारकू त्यापाशीं ।
ते अनीहा संतांची दासी । अहर्निशीं जीवेंभावें ॥३५॥
हे अनीहा अतिगौरवें । साधुलक्षण तेरावें ।
मितभोजन तें चौदावें । लक्षण वैभवें अवधारीं ॥३६॥
न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेच्या पांगडा ।
आवडीनावडीचा उपाडा । करूनि निधडा भोजनीं ॥३७॥
प्राणु आकांक्षी अन्नातें । जठराग्नि भक्षी त्यातें ।
उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवी ॥३८॥
जें जें आलें भोजनासी । दृष्टीनें त्याचे दोष निरसी ।
अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसीं सेवितू ॥३९॥
न देखे भोग्य पदार्था । नाठवे मी एक भोक्ता ।
ग्रासीं समरसीं अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥९४०॥
अग्नि आधीं आपणयाऐसें करी । मग त्या आहारातें अंगीकारी ।
साधु आधीं द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥
याचि नांव मितभोजन । साधूचे आहाराचें लक्षण ।
युक्तीवीण अल्प भोजन । तें पथ्य जाण रोगियाचें ॥४२॥
ग्रासोग्रासीं ब्रह्मार्पण । त्या नांव परिमित भोजन ।
हें चौदावें लक्षण । साधूचें जाण उद्धवा ॥४३॥
समळजळसंभारी । सरितामेळू मिळे सागरीं ।
तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू ॥४४॥
तैशा आलिया नाना ऊर्मी । ज्यांसी गजबजु नाहीं मनोधर्मी ।
शांति संतांचि पराक्रमी । उपक्रमी निजशक्ती ॥४५॥
जेवीं कां नागवेलीची वेली । आधारवीण न वचे वेंगली ।
तैसी संतबळें शांती वाढली । मंडपा चढली चिन्मात्र ॥४६॥
झांकळोनि दश दिशांसी । आभाळ दाटल्या आकाशीं ।
गगन अविकारी त्या दोषासी । आभाळासी नातळे ॥४७॥
शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लगती अंबरा ।
तेवीं साधूचा उभारा । द्वंद्वसंभारा निर्द्वंद्व ॥४८॥
तैशा उंच नीच नाना अवस्था । निबिड दाटल्या मोहममता ।
क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नांव तत्त्वतां निजशांती ॥४९॥
संतांचेनि शांति गहन । शांतीचेनि संत पावन ।
हें अनन्य निजलक्षण । पंधरावा गुण संतांचा ॥९५०॥
जैं मीपणें नव्हतें जन्मनाम । तैंच पूर्वजांचें निजधाम ।
आपुली मिरासी जे उत्तम । तेथ मनोधर्म स्थिरु ज्याचा ॥५१॥
मज जन्मचि नाहीं झालें । मरण म्यां नाहीं देखिलें ।
ऐसें मन मूळीं स्थिरावलें । स्थिरता बोलिलें या नांव ॥५२॥
चहूं आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम ।
तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥
चहूं वर्णांमाजीं पवित्रता । जेणें ब्राह्मणांची ब्राह्मणता ।
तेथें स्थिराविलें जेणें चित्ता । जाण स्थिरता ती नांव ॥५४॥
तिहीं लोकीं स्थिरता । मरों टेंकली सर्वथा ।
कोणी नाहीं प्रतिपाळिता । हातीं धरिता न देखे ॥५५॥
दारीं राहों नेदी कोणी । कोण देईल पथ्यपाणी ।
अवघी टाकिली निरंजनीं । ते सज्जनीं प्रतिपाळिली ॥५६॥
स्थिरता वाढली संतबळें । जिणोंनि वर्णाश्रमादि टवाळें ।
भेदोनि अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥५७॥
स्वस्वरूपीं सायुज्यता । पावोनि स्थिरावली स्थिरता ।
तेथ वाट मोकळी संतां । स्वभावतां त्यां केली ॥५८॥
तेथ स्वस्वरूपें स्वकर्म । स्वस्वरूपें वर्णाश्रम ।
स्वस्वरूपें स्वधर्म । स्थिरतासंभ्रम या नांव ॥५९॥
ऐसी स्वधर्मकर्मीं अवस्था । ती नांव उत्तम स्थिरता ।
हे सोळावी लक्षणता । मच्छरणता ते ऐक ॥९६०॥
सरिता सागरा शरण आली । ते समरसोनि सिंधू झाली ।
तैसी शरण जे वृत्ति मज आली । ते पावली दशा माझी ॥६१॥
लवण जीवना आलें शरण । तें तत्काळ जाहलें जीवन ।
तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥६२॥
मज रिघोनियां शरण । जो वांछी महिमा सन्मान ।
तो गुळांतील पाषाण । केवळ जाण गुळदगडू ॥६३॥
जो कां गुळें माखिला दगडू । तो पाहतां दिसे वरिवरी गोडू ।
शेखीं परिपाकीं निवाडू । अतिजडू कठिणत्वें ॥६४॥
तैसें वरिवरी दावी माझें भजन । हृदयीं विषयअभिलाष ।
तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूषण लोभाचें ॥६५॥
सर्वांगीं सुंदर सुरेख । जिच्या नाकावरी पांढरें टीक ।
तिसी वरीना साधु लोक । तैसा विषयलोभु देख मद्भजनीं ॥६६॥
रांडवा केलें काजळकुंकूं । देखोनि जग लागे थुंकूं ।
तैसा विषयांचा अभिलाखू । जेवीं वोकिला वोकू अतिनिंद्य ॥६७॥
त्रैलोक्यसाम्राज्यवैभव जाण । जो थुंकोनि रिघाला मज शरण ।
तो समरसें मीचि जाण । मानापमान त्या कैंचा ॥६८॥
या नांव मच्छरण । हें सतरावें लक्षण ।
उद्धवा जाण संपूर्ण । मननगुण तो ऐक ॥६९॥
श्रुतिगुरुवाक्यनिरूपण । ऐकतां अद्वैतश्रवण ।
युक्तिप्रयुक्तीं पर्यालोचन । मनन गुण त्या नांव ॥९७०॥
अग्निकापुरां भेटी होतां । तो अग्नीचि होय वस्तुतां ।
तेवीं माझे स्वरूपीं मन ठेवितां । मन चित्स्वरूपता पावलें ॥७१॥
मन चिदंशें असे जाण । तें चिन्मात्र जाहलें करितां मनन ।
जेवीं जीवनीं जन्मलें लवण । तें होय जीवन निजमिळणीं ॥७२॥
असो मननाचेनि लवलाहें । मन जेथवरी जावों पाहे ।
तेथवरी तया मीचि आहें । न वचतां राहें तेथही मी ॥७३॥
दीप जेउता जाऊं बैसे । तेउता प्रकाशचि तया असे ।
कोठेंही न वचोनि ठायीं वसे । तेथेंही वसे प्रकाशू ॥७४॥
तैसें माझें करितां मनन । मद्रूपचि जाहलें मन ।
मग करितां गमनागमन । मद्रूपता जाण मोडेना ॥७५॥
एवं माझें स्वरूप जें केवळ । तेथें मद्रूपें मन निश्चळ ।
ध्रुवाचे परी अचंचळ । मननशीळ त्या नांव ॥७६॥
मुनि या पदाचें व्याख्यान । मननशीलता जाण ।
हें अठारावें लक्षण । तें हें निरूपण सांगितलें ॥७७॥
अत्यंत गोड निरूपण । पुढिले श्लोकीं दशलक्षण ।
तें ऐकावया उद्धव सावधान । सर्वांगीं कान होऊनि ठेला ॥७८॥
अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमाञ्जितषड्गुणः ।
अमानी मानदः कल्पो मैत्रः कारुणिकः कविः ॥ ३१ ॥
जंववरी वृत्तिशून्य नव्हे मन । तंववरी विश्वासेना विचक्षण ।
वृत्तिरूपें सिंतरील मन । यालागीं सावधान निजबोधें ॥७९॥
हां हो दुर्वासाऐसा सज्ञान । त्यासी क्षणक्षणा क्षोभवी मन ।
न विचारितां गुणागुण । शाप दारुण देवों धांवे ॥९८०॥
दुर्गंधा जन्मली मत्स्याचे पोटीं । पराशर नाडला तीसाठीं ।
नारद कौतुक पाहतां दिठी । केला गंगातटीं नारदी ॥८१॥
आपुली कन्या देखोनि गोमटी । मनक्षोभें भोगावया उठी ।
ब्रह्मा धांवे सरस्वतीपाठीं । जो कां सृष्टिपितामहो ॥८२॥
या मनाऐसें नाडक । जगामाजीं नाहीं आणिक ।
छळछद्में नाडी ज्ञाते लोक । साधु घातक मनाचे ॥८३॥
म्हणाल मनेंवीण भोग घडे । तरी वृत्तीसी क्षोभु कां पां चढे ।
हे बोल बोलती ते सज्ञान वेडे । साधूसी नावडे हे गोष्टी ॥८४॥
अधिष्ठूनि सत्त्वगुण । सूक्ष्मरूपें वृत्ति जाण ।
ते क्षोभवूनियां मन । मी मुक्त म्हणोन विषयी करी ॥८५॥
मुक्ताभिमानें विषयासक्ती । हेचि मनक्षोभाची प्राप्ती ।
वृत्ति असोनियां मुक्ती । साधु न मानिती सर्वथा ॥८६॥
अतिनाटकी नाटक मन । मुक्तत्वें धरी अभिमान ।
त्याचें करावया निर्दळण । साधु सावधान निजबोधें ॥८७॥
मुखीं धरिल्या कृष्णसर्पासी । ढिलें करितां तो तत्काळ ग्रासी ।
मरे तंववरी आंवळावें त्यासी । तेवीं मनासी निर्दाळिती ॥८८॥
मन निर्दाळावे सावधानता । बोलिली ते हे साधुलक्षणता ।
हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥८९॥
वर्षाकाळीं जळबळें सरिता । आल्या समुद्र नुचंबळे श्लाघ्यता ।
उष्णकाळीं त्या न येतां । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥९९०॥
तैसें जाहलिया समृद्धिधन । साधूचें उल्हासेना मन ।
सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हों नेणें ॥९१॥
दिवसराती येतांजातां । प्रकाशें पालटेना सविता ।
तेवीं आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥९२॥
कडकडीत विजेचे कल्लोळ । तेणें गगनासी नव्हे खळबळ ।
तैसा नाना ऊर्मींमाजीं निश्चळ । गांभीर्य केवळ त्या नांव ॥९३॥
हे संताची गंभीरता । विसांवा जीवशिवांसी तत्त्वतां ।
हे विसावी संताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥
मनबुद्ध्यादि इंद्रियें प्राण । निजधैर्यें धरोनि आपण ।
नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनि जाण येवों नेदी ॥९५॥
स्वयंवरीं जिणोनि अरिरायासी । बळें आणिलें नोवरीसी ।
तो जाऊं नेदी आणिकापाशीं । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ॥९६॥
वागुरें बांधिल्या मृगासी । पारधी जाऊं नेदी त्या वनासी ।
तेवीं धैर्यें आकळूनि मनासी । देहापाशीं येऊं नेदी ॥९७॥
देहासी नाना भोगसमृद्धी । वावूनियां गजस्कंधीं ।
ऐसें सुख होतां त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धी धरूं नेदी ॥९८॥
प्रळयकाळाच्या कडकडाटीं । महाभूतां होतां आटाटी ।
तरी मनासी देहाची भेटी । धैर्यें जगजेठी होंचि नेदी ॥९९॥
तेथ काळाचेनि हटतटें । वृत्ति परब्रह्माचिये वाटे ।
लावूनियां नेटेंपाटें । चिन्मात्रपेठे विकिली ॥१०००॥
तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु ।
त्यासी जीवेंसहित विवेकु । घालूनि आंखू संवसाटी केली ॥१॥
या नांव धृतीचें लक्षण । हा एकविसावा साधूचा गुण ।
आतां जिंतले जे षड्गुण । तेंही लक्षण अवधारीं ॥२॥
स्वानंदें तृप्त जाला । यालागीं क्षुधेसी मुकला ।
जगाचे जीवनीं निवाला । तृषा विसरला निःशेष ॥३॥
भोगितां निजात्मसुख । विसरला शोकदुःख ।
चिन्मात्रज्ञानें निष्टंक । त्यासंमुख मोहो न ये ॥४॥
तिहीं अवस्थांबाहिरा । वसिन्नला निजबोधवोंवरा ।
तेथें जरा जाली अतिजर्जरा । कांपत थरथरां पळाली ॥५॥
मिथ्या जाहलें कार्यकारण । देहाचें देहपणें न देखे भान ।
तंव मरणासीचि आलें मरण । काळाचें प्राशन तेणें केलें ॥६॥
यापरी गा हे षड्गुण । अनायासें जिंतोन ।
सुखें वर्तती साधुजन । हें लक्षण बाविसावें ॥७॥
आपुला स्वामी देखे सर्वां भूतीं । तेथें मान इच्छावा कवणाप्रती ।
मानाभिमान सांडिले निश्चितीं । अतिनम्र वृत्तीं वर्तणें ॥८॥
आधीं देहीं धरावा अभिमान । मग इच्छावा अतिसन्मान ।
तंव देहाचें खुंटलें भान । मानाभिमान बुडाले ॥९॥
या नांव गा अमानिता । हे तेविसावी लक्षंणता ।
साधु सन्मानाचा दाता । तेही कथा अवधारीं ॥१०१०॥
ब्रह्मादि मशकवरी । सर्वांतें वंदी शिरीं ।
एकनिष्ठता चराचरीं । बुद्धी दुसरी जाणेना ॥११॥
सर्व भूतीं स्वामी देखे । लोटांगणें घाली हरिखें ।
सुर नर खर हे नोळखे । अतिसंतोखें वंदित ॥१२॥
नाना अलंकार घडिले गुणें । सोनें सोनेपणा नव्हेच उणें ।
तेवीं नामरूपांचे विंदाणें । पालटु मनें घेऊं नेणे ॥१३॥
साकरेची निंबोळी केली । परी ते कडूपणा नाहीं आली ।
तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाहीं भंगली चित्सत्ता ॥१४॥
सागरीं नाना परींचे विक्राळ । जरी उठिले अनंत कल्लोळ ।
ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्रीं ॥१५॥
यापरी सकळ भूतां । साधु सन्मानातें देता ।
हे चोविसावी लक्षणता । परबोधकता ते ऐक ॥१६॥
जैसा भावो जैशी श्रद्धा । तैसतैशा करूं जाणे बोधा ।
ज्ञान पावोनि नव्हे मेधा । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥
एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा ।
नोळखेचि सच्छिष्याची दशा । योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥
एक ज्ञानआश्चर्यें कोंदला । विस्मयें तटस्थ होऊनि ठेला ।
काष्ठलोष्टांचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥१९॥
एक ज्ञान पावोनि अतिकृपण । जीव गेलिया न बोले जाण ।
भेणेंभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥१०२०॥
ज्यासी धनकोडी जोडी जाहली । ते पुरूनि वरी दगड घाली ।
दान न देतां वृथा गेली । संपत्ति केली भूमिसवती ॥२१॥
तैसें कष्टीं जोडूनि निजज्ञान । सत्पात्रीं न करीच दान ।
हें ज्ञात्याचें कृपणलक्षण । वंचकपण स्वभावें ॥२२॥
एक ज्ञान पावोनि सांगों जाये । उपदेशीं शिष्या बोधू नोहे ।
तें ज्ञान अबीज जाहलें पाहें । अंकुरां न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥
सधन शिष्य करावया जाण । स्वयें प्रयत्न करी पूर्ण ।
आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरां घाली ॥२४॥
जैसेनि प्रलोभे त्याचें मन । तैसें निरूपी निरूपण ।
अर्थस्वार्थें उपदेश पूर्ण । धनलोभें ज्ञान निर्वीर्य होये ॥२५॥
पेंवीं रिघालिया पाणी । त्या धान्याची नव्हे पेरणी ।
तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानीं । उपदेशें कोणी सुखी नव्हे ॥२६॥
शिष्य बोधेंवीण झुरे अंतरीं । गुरु गुरुपणें गुरगुरी ।
ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरीं चुकामुकी ॥२७॥
शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत ।
शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥२८॥
हो कां मी जैसा अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी ।
चिद्रत्नाच्या अलंकारी । अलंकारी कुसरीं सच्छिष्यां ॥२९॥
तो मी या शब्दकुसरीं । नांवाचीं अंतरें बाहेरीं ।
आंतुवटें निजनिर्धारीं । एके घरीं नांदत ॥१०३०॥
एकचि बहुतांतें उपदेशी । एकाची प्राप्ती सुटंक कैशी ।
एकें अज्ञानें जैशीं तैशीं । हा बोलू कोणासी म्हणाल ॥३१॥
कृषीवल पेरणी करी । भूमिपाडें पिकती घुमरी ।
अंकुरेना क्षितितळीं उखरीं । तें बीज निर्धारीं अतिशुद्ध ॥३२॥
भूमिचि सखर-निखर । बीज पावन गा साचार ।
भाविकीं उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥३३॥
जो जैसा देखे अर्थ । तोचि बोधूनि करी परमार्थ ।
ऐसा परबोधनीं समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥३४॥
साधुची मैत्री चोखट । वोळखी सर्वांसी जुनाट ।
सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसी सकट सारिखा ॥३५॥
सुहृद सर्वांचा सोयरा । सर्वांचा जिवलगु खरा ।
होऊनि सर्वांहीबाहिरा । मित्राचारा चालवी ॥३६॥
सांगतां आपुली गुह्य गोष्टी । अळोंचावया वेगळा नुठी ।
आप्तभावें देखे सृष्टी । अवंचक पोटीं सर्वांसी ॥३७॥
क्षीरनीरांची मैत्री जैशी । भेद नाहीं मिळणीपाशीं ।
साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेंसीं मित्रत्वें ॥३८॥
परम मैत्रीचा भावो देख । दुःख हिरोनि द्यावें सुख ।
साधू जीवांचें निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥३९॥
नवल मैत्रींचें महिमान । सखा सर्वांचा पुरातन ।
सर्वांसी नीच नवें सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥१०४०॥
बंधूहूनि मित्र अधिकु । पुत्राहूनि विश्वासिकु ।
तो मित्र जैं जाहला वंचकु । तैं केवळ ठकु तो जाणावां ॥४१॥
मनें धनें कर्तव्यता । ज्याची अनन्य अवंचकता ।
त्या नांव परम मित्रता । हे खूण तत्त्वतां जाणावी ॥४२॥
समूळ मैत्रीचें निरूपण । विशद सांगितलें जाण ।
हें सव्विसावें साधुलक्षण । कारुण्यपण तें ऐका ॥४३॥
प्रत्युपकार न वांछितां । मी कारुणिक हे नाहीं अहंता ।
ऐसेनि दीनदुःख निवारितां । कारुण्य सर्वथा त्या नांव ॥४४॥
रसपूजा धरोनि पोटीं । वैद्य वोखदांच्या सोडी गांठी ।
कां संभावना सूनि दिठी । सांगे गोठी पुराणिक ॥४५॥
ऐसी वर्तणूक सर्वथा । ते लागली विषयस्वार्था ।
साधूची नव्हे तैशी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥
दयार्णवें द्रवली दृष्टी । तनु मन धन वेंचूनि गांठी ।
अनाथावरी करुणा मोठी । उद्धरी संकटीं दीनातें ॥४७॥
जैसा कळवळा निजस्वार्था । त्याहून अधिक अनाथभूतां ।
तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४८॥
हें सत्ताविसावें लक्षण । साधूचें जाण संपूर्ण ।
कविपदाचें व्याख्यान । सावधान अवधारीं ॥४९॥
वेदशास्त्रांचा मथितार्थ । जाला करतळामळकवत ।
तैसाच ब्रह्मानंदें डुल्लत । कवि निश्चित या नांव ॥१०५०॥
उपनिषदांचा मथितार्थ । ज्याच्या मुखाची वास पहात ।
परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नांव ॥५१॥
कवि या पदाचे व्याख्यानें । झालीं अठ्ठावीस लक्षणें ।
उरलीं दोनी अतिगहनें । तें दों श्लोकीं श्रीकृष्णें आदरिलें सांगों ॥५२॥
आज्ञायैवं गुणान् दोषान् मयादिष्टानपि स्वकान् ।
धर्मान् सन्त्यज्य यः सर्वान् मां भजेत स तु सत्तमः ॥ ३२ ॥
प्रपंचनगरासभोंवतीं । कर्मनदीची महाख्याती ।
तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्तिस्थिति अरतीरीं ॥५३॥
ते नदीचेनि जीवनमेळें । कर्मासी येती कर्मफळें ।
स्वर्गनरकादि सोहळे । तेणें जळबळें भोगिती ॥५४॥
प्रपंचनगरींहूनि निघतां । वेगें परमार्थासी येतां ।
जो तो कर्मनदीआंतौता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥५५॥
एक तरलों ऐसें ज्ञाते म्हणती । तेही कर्मीं कर्मगुचकिया खाती ।
स्वयें बुडोनि आणिकां बुडविती । तरलों म्हणती तोंडाळ ॥५६॥
ऐसे बुडाले नेणों किती । बुडतां शिकवण तेचि देती ।
कर्मचि उपावो तरणोपायप्राप्ती । म्हणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥
’न कर्मणा’ हें वेदवचन । कर्मे नव्हे ब्रह्मज्ञान ।
तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥५८॥
कर्म देहाचे माथां पूर्ण । तो न सांडितां देहाभिमान ।
कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥५९॥
एक अरतीरीं असती नष्ट । तरलों म्हणती अकर्मनिष्ठ ।
स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषांडी ॥१०६०॥
ये कर्मनदीतें तरला । ऐसा न देखों दादुला ।
बुडाल्या धुराचि मुदला । पाडु केतुला इतरांचा ॥६१॥
ये कर्मनदीची उत्पत्ती । मजचिपासोनि निश्चितीं ।
तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधें ॥६२॥
’आज्ञायैवं’ हें मूळींचें मूळ । श्लोकींचें प्रथम पद केवळ ।
येणेंचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सांगत ॥६३॥
मदाज्ञा मेघगंभीरा । निःश्वसितपवनद्वारा ।
चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥६४॥
तेणें कर्मनदीआंतौतें । अनिवार उलथलें भरतें ।
पूर दाटला जेथींचा तेथें । उतार कोणातें कळेना ॥६५॥
तेथ गुणदोषांचा वळसा । विधिनिषेधांचा धारसा ।
कर्माकर्मांचा आवर्तं कैसा । सबाह्य सरिसा भंवतसे ॥६६॥
संकल्पविकल्पांचे हुडे । नदी दाटली चहूंकडे ।
तरों जाय तो गुंतोनि बुडे । पाऊल पुढें न घालवे ॥६७॥
प्रत्यवायाची मगरमिठी । पडल्या सगळेंचि घाली पोटीं ।
उगळोनि न सोडी संकटी । ने उठाउठीं अधोगती ॥६८॥
अंगविकळतेचे मासे । तळपताती घ्यावया आविसें ।
कर्मठतेचे कमठ कैसे । खडक तैसे निबर ॥६९॥
काळविक्षेपसर्पासी । एक सांपडले विलासआळशीं ।
विकल उच्चार चोंढियेसी । एक व्यग्रतेसीं बुडाले ॥१०७०॥
एक तरावयाच्या आशा । पडिले कर्माच्या धारसां ।
ते विधिनिषेधवळसां । पडिले सहसा नुगंडती ॥७१॥
एक स्वकर्मधारीं । पडोनि वाहावले दूरी ।
ते सत्यलोकमगरीं । आपुल्या विवरीं सूदले ॥७२॥
एकां न वचवेचि परतटीं । माझारींचि फळें गोमटीं ।
देखोनि धांविन्नले अव्हाटीं । ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥
आम्ही तरों युक्तीबळें । म्हणोनि रिघाले एके वेळे ।
ते अहंकारखळाळें । महातिमिंगिळें गिळिले ॥७४॥
एकीं वेदत्रयाची पेटी । दीक्षेची दोरी बांधली पोटीं ।
ते स्वर्गांगनाकुचकपाटीं । गुंतोनि शेवटीं बुडाले ॥७५॥
मंत्रतंत्रादिदीक्षितें । गुंतोनि बुडालीं जेथींच्या तेथें ।
कर्मनदीच्या परपारातें । कोणी पावतें दिसेना ॥७६॥
विरळा कोणीएक सभाग्य येथें । हे सकळ उपाय सांडूनि परते ।
जो अनन्य प्रीतीं भजे मातें । कर्मनदी त्यातें कोरडी ॥७७॥
माझे भक्तीचें तारूं नातुडे । जंव सप्रेमाचें शीड न चढे ।
तंव तरणोपाय बापुडे । वृथा कां वेडे शिणताती ॥७८॥
धरूनि अनन्यभक्तीचा मार्गु । करूनि सर्वधर्मकर्मत्यागु ।
हा तरणोपाय चांगु । येरु तो व्यंगु अधःपाती ॥७९॥
नेणोनि स्वधर्मकर्मांतें । कां नास्तिक्य मानूनि चित्तें ।
किंवा धरोनियां आळसातें । त्यागी कर्मातें तैसा नव्हे ॥१०८०॥
अथवा शरीरक्लेशाभेण । किंवा सर्वथा उबगोन ।
कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण सांडीना ॥८१॥
माझी वेदरूप आज्ञा शुद्ध । ते वेदविवंचना विशद ।
स्वधर्मकर्मांचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ॥८२॥
स्वधर्माचा उत्तम गुण । प्रत्यवायें अधःपतन ।
या दोहींतें जाणोन । मद्भक्तीसी प्राण विकिला ॥८३॥
विसरोनि आन आठवण । अखंडता हरिस्मरण ।
त्या नांव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥८४॥
माझेनि भजनप्रेमेंजाण । विसरला कर्माची आठवण ।
कर्म बापुडें रंक कोण । बाधक जाण नव्हे भक्तां ॥८५॥
सप्रेम करितां भजनविधी । सर्व कर्मांतें विसरली बुद्धी ।
ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म त्रिशुद्धी बाधेना ॥८६॥
ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी ।
ज्याची श्रद्धा श्रीधरीं । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥८७॥
जो जीवेंप्राणें भक्तीसी विकिला । तो तेव्हांचि कर्मावेगळा जाला ।
त्याच्या भावार्था मी विकिला । तो कर्मीं बांधला केवीं जाये ॥८८॥
गुणदोषांची जननी । ते निःशेष अविद्या निरसूनी ।
जो प्रवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानीं मस्तकीं ॥८९॥
निजकल्पना जे देहीं । तेचि मुख्यत्वें अविद्या पाहीं ।
ते कल्पना निमालिया ठायीं । जगीं अविद्या नाहीं निश्चित ॥१०९०॥
अविद्येच्या त्यागासवें । धर्माधर्मादि आघवें ।
न त्यजितांचि स्वभावें । त्याग फावे अनायासें ॥९१॥
शिर तुटलियापाठीं । शरीर निजकर्मासी नुठी ।
तेवीं अविद्या त्यागितां शेवटीं । त्यजिले उठाउठीं सर्व धर्म ॥९२॥
दिवसा चंद्रउदयो पाहे । तो झाला तैसा नाहीं होये ।
तेवीं अविद्येचेनि विलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥९३॥
खद्योत सूर्योदयापाठीं । शोधूनि पाहतां न ये दिठीं ।
तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥९४॥
ग्रहगण नक्षत्रमाळा । खद्योततेजउमाळा ।
रात्रीसकट बोळवण सकळां । तेवीं धर्माधर्मकळा अविद्येसवें ॥९५॥
सर्व धर्मत्यागाची खूण । उद्धवा मुख्यत्वें हेचि जाण ।
याहीवरी माझें भजन । मुख्य भागवतपण या नांव ॥९६॥
म्हणसी अविद्याचि केवीं नासे । मा अधर्म नासती तीसरिसे ।
ते अविद्या नाशे अनायासें । भक्तिउल्हासें माझेनि ॥९७॥
सूर्योदय देखतां दृष्टीं । सचंद्र नक्षत्रांची मावळे सृष्टी ।
तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं । अविद्या उठाउठीं निमाली ॥९८॥
अविद्येच्या नाशासवें । नासती धर्माधर्म आघवे ।
जेवीं गरोदर मारितां जीवें । गर्भही तीसवें निमाला ॥९९॥
जेव्हां माझे भक्तीचा उल्हासू । तेव्हांचि अविद्येचा निरासू ।
अविद्ये सवें होय नाशू । अनायासू सर्व धर्मां ॥११००॥
ते तूं भक्ति म्हणसी कोण । जिचें मागां केलें निरूपण ।
ते माझी चौथी भक्ति जाण । अविद्यानिरसन तिचेनि ॥१॥
येर आर्त जिज्ञासु अर्थार्थी । जे जे भक्तींतें आदरिती ।
ते अविद्यायुक्त निश्चितीं । चौथी भक्ति मुख्यत्वें माझी ॥२॥
जे भक्तीमाजीं कंहीं । अविद्येचा विटाळू नाहीं ।
भजन तरी ठायींच्या ठायीं । अनायासें पाहीं होतसे ॥३॥
ते माझी आवडती भक्ती । उद्धवा जाण निश्चितीं ।
जिसी अविद्या असे धाकती । सर्व धर्म कांपती सर्वदा ॥४॥
ते भक्तीची देखोनि गुढी । अविद्या धाकेंचि प्राण सांडी ।
सर्व धर्मांची आवडी । घायेंवीण बापुडी निमाली ॥५॥
हा मद्भक्तीचा पर्यावो । आवडीच्या गोडिया सांगे देवो ।
ऐक भक्ताचा भजनभावो । जेणें निर्वाहो भक्तीचा ॥६॥
माझेनि अनुसंधानेंवीण । स्नान संध्या जप होम दान ।
ते अवघेचि अधर्म जाण । मद्भजन तें नव्हे ॥७॥
गोडी आवडी ते परपुरुषीं । मिथ्या लुडबुडी निजपतीपाशीं ।
ते पतिव्रता नव्हे जैशी । जाण भक्ति तैशी व्यभिचारी ॥८॥
नाना विषयीं ठेवूनि मन । जो करी ध्यान अनुष्ठान ।
ते जारस्त्रियेच्या ऐसें जाण । नव्हे पावन ते भक्ती ॥९॥
काया वाचा मनसा । माझे भक्तीचा पडला ठसा ।
भजतां नाठवे दिवसनिशा । भक्तीची दशा या नांव ॥१११०॥
जपेंवीण नाम वदनीं । धारणेवीण ध्यान मनीं ।
संकल्पेंवीण मदर्पणीं । सर्व कर्में करूनी सर्वदा ॥११॥
निरोधेंवीण वायुरोधू । मर्यादेवीण स्वरूपबोधू ।
विषयेंवीण सदा स्वानंदू । मद्भक्त शुद्धू या नांव ॥१२॥
भक्त म्हणवितां गोड वाटे । परी भजनमार्गीं हृदय फुटे ।
अकृत्रिम भक्ति जैं उमजे । तैं मी भेटें उद्धवा ॥१३॥
ऐसेनि भजनें जो भजत । तो मजमाजीं मी त्याआंत ।
भक्तांमाजीं जो उत्तम भक्त । साधु निश्चित या नांव ॥१४॥
तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । साधूमाजीं अतिउत्तम ।
तो माझें विश्रामधाम । अकृत्रिम उद्धवा ॥१५॥
तयालागीं मी आपण । करीं सर्वांगाचें आंथरुण ।
जीवें सर्वस्वें निंबलोण । प्रतिपदीं जाण मी करीं ॥१६॥
तो मज आवडे म्हणशी कैसा । जीवासी पढिये प्राण जैसा ।
सांगतां उत्तमभक्तदशा । प्रेमपिसा देवो जाला ॥१७॥
मग न धरतु न सांवरतु । उद्धवासी कडिये घेतु ।
भुलला स्वानंदें नाचतु । विस्मयें स्फुंदतु उद्धवू ॥१८॥
मी एकु देवो हा एकु भक्तु । हेंही विसरला श्रीकृष्णनाथु ।
हा देवो मी एकु भक्तु । तें उद्धवाआंतु नुरेचि ॥१९॥
ऐशा भक्तिसाम्राज्यपटीं । दोघां पडली ऐक्यगांठी ।
तंव देवोचि कळवळला पोटीं । निजभक्तगोठी सांगावया ॥११२०॥
ऐशी उत्तम भक्तांची कथा । अतिशयें आवडे कृष्णनाथा ।
रुचलेपणें तत्त्वतां । मागुतां मागुतां सांगतू ॥२१॥
श्लोकीं प्रमेयें दिसतां अनेगें । तें श्रीकृष्णें सांडूनि मागें ।
हा ग्रंथार्थु श्रीरंगे । साक्षेपें स्वांगें लिहविला ॥२२॥
हे माझे युक्तीची कथा । नव्हे नव्हे जी सर्वथा ।
सत्य मानावें श्रोतां । ये अर्थींचा वक्ता श्रीकृष्ण ॥२३॥
श्रोतां व्हावें सावधान । मागील कथा अनुसंधान ।
दोघां पडिलें होतें आलिंगन । विस्मयें पूर्ण उद्धवू ॥२४॥
चढत प्रेमाचें भरतें । तें आवरोनि कृष्णनाथें ।
थापटूनि उद्धवातें । सावध त्यातें करी हरी ॥२५॥
उद्धवातें म्हणे तत्त्वतां । तुज आवडली भक्तिकथा ।
तेचि मी सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥२६॥
एक जाणोनि भजती मातें । एक ते केवळ भावार्थें ।
मी दोहींच्या भुललों भावातें । दोघे मातें पढियंते ॥२७॥
ज्ञात्वाज्ञात्वाथ ये वै मां यावान् यश्चास्मि यादृशः ।
भजन्ति अनन्यभावेन ते मे भक्ततमा मताः ॥ ३३ ॥
मी स्वस्वरूपी सच्चिदानंद । जगदांदि आनंदकंद ।
नित्य सिद्ध परम शुद्ध । माझें स्वरूप विशद जाणती ॥२८॥
देश काळ वर्तमान । सर्वीं सर्वदा अनवच्छिन्न ।
सर्वात्मा सच्चिदानंदघन । भेदशून्य मी एक ॥२९॥
सत्य ज्ञान अनंत । परब्रह्म मी निश्चित ।
ऐसें जाणूनि मज भजत । उत्तम भागवत ते जाण ॥११३०॥
शुद्ध झालिया स्वरूपप्राप्ती । म्हणशी भजन कैशा रीतीं ।
देवभक्त तेचि ते होती । मी होऊन भजती मजमाजीं ॥३१॥
वाम सव्य दोनी भाग । दों नांवीं एकचि अंग ।
तेवीं देवभक्तविभाग । मद्रूपीं सांग भासती ॥३२॥
पाहें पां लोखंडाचा आरिसा । लोखंडेंचि घडिजे जैसा ।
लोखंडेंचि उजळे कैसा । स्वप्रकाशा निजतेजें ॥३३॥
दर्पण उजळलिया पाही । शशी सूर्य गगन मही ।
बिंबलीं धरी आपुल्या ठायीं । अप्रयासें पाहीं स्वलीला ॥३४॥
तैसें मी होऊनि माझे भक्त । अनन्यभावें मजचि भजत ।
तैं माझें ऐश्वर्य समस्त । प्रतिबिंबत तयांमाजीं ॥३५॥
हो कां तरंगु जैसा सागरीं । त्यासी जळचि तळींवरी ।
तैसा माझा भक्त मजमाझारीं । सबाह्याभ्यंतरीं मद्रूप ॥३६॥
जैसा सुवर्णाचा नरहरी । सुवर्णहिरण्यकशिपूतें विदारी ।
सुवर्णप्रह्लाद पोटींसी धरी । तैशी परी मद्भजना ॥३७॥
तेथें सगुण आणि निर्गुण । उभय रूपें मीचि जाण ।
जैसें सुवर्ण आणि कंकण । तैसें अभिन्न जाण मद्रूप ॥३८॥
तेथ जें जें दृश्य देखे दृष्टीं । तेथ मद्रूपें पडे मिठी ।
दृश्य द्रष्टा लोपूनि त्रिपुटी । उठाउठी मज मिळे ॥३९॥
ऐसें जाणोनियां मज भजत । ते जाण पां उत्तम भक्त ।
ऐसें नेणोनियां मज भजत । भोळे भक्त ते माझे ॥११४०॥
नाहीं श्रुतीचें पठण । नाहीं वेदांतशास्त्रश्रवण ।
नाहीं विकल्पलक्षण । अनन्य जाण भावार्थीं ॥४१॥
सगुण निर्गुण नेणे काहीं । परी देवो आहे म्हणे हृदयीं ।
जडत्व असे देहाच्या ठायीं । तें देवो पाहीं वागवीत ॥४२॥
यालागीं देहाचें जें चळण । तें हृदयस्थ करवी नारायण ।
दृष्टीचें जें देखणेपण । त्याचेनि जाण होतसे ॥४३॥
काढूनि आपुला डोळा । दूरी ठेविला वेगळा ।
तो हृदयस्थेंवीण आंधळा । देखणी कळा देवाची ॥४४॥
रसना केवळ चामडी । ते काय जाणे रसगोडी ।
कापूनि टाकिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥४५॥
रसनाद्वारें रसस्वादू । घेता हृदयस्थ परमानंदू ।
बुद्धीसी करिता उद्बोधू । सत्य गोविंदू हृदयींचा ॥४६॥
मनाचें गमनागमन। दिसे हृदयस्थाआधीन ।
यालागीं दूरी जावोनि परते मन । हृदयासी जाण येतसे ॥४७॥
इंद्रियें प्रेरिता वारिता । हे सत्ता आधीन हृदयस्था ।
यालागीं नांवें हृषीकेशता । त्यासचि तत्त्वतां म्हणताती ॥४८॥
एवं विचाराचा निर्वाहो । करितां निजहृदयीं असे देवो ।
तो पहावया बाहेरी धांवो । तैं मूर्ख पहा हो मी झालों ॥४९॥
तीर्थीं क्षेत्रीं भेटेल देवो । हा आपुले हृदयींचा भावो ।
निजभावेंवीण पहा वो । तीर्थीही देवो असेना ॥११५०॥
एवं देवो तो मजमाजीं आहे । त्याचेनि टवटवती इंद्रियें ।
क्रियाकर्म जें जें होये । तें त्याचेनि पाहें तत्त्वतां ॥५१॥
देह तंव बापुडें । केवळ अचेतन मडें ।
त्याचेनि कर्म नुपजे फुडें । हें तंव कुडें सर्वथा ॥५२॥
इंद्रियांचेनि चेतविता । कर्म क्रिया कर्तव्यता ।
देहाचेनि नोहे तत्त्वतां । मुख्यत्वें कर्ता हृदयस्थु ॥५३॥
यापरी जे कांहीं कर्तव्यता । ते भोळेपणें नेघे माथां ।
सर्व कर्मांचा आत्मा कर्ता । विश्वासें सर्वथा दृढ मानी ॥५४॥
मग अन्नपानादि सेवितां । मानी आत्मारामु भोक्ता ।
सर्वकर्मकर्तव्यता । अहं कर्ता हें म्हणों नेणे ॥५५॥
ऐसे भोळिवेचेनि समजें । माझें भजन निपजे वोजें ।
तें म्या आवडीं सेविजे । जाण तें माझें खाजुकें ॥५६॥
सर्वभावें सर्वथा । बाळकांसी जेवीं माता ।
तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मी सर्वथा सर्वस्वें ॥५७॥
धांवोनि मिठी घालावयासी । हितगुज आलोचासी ।
खाणें जेवणें विश्रांतीसी । जेवीं बाळकासी निजजननी ॥५८॥
तेवीं माझिया भोळ्या भक्तां । मीचि जाण जिवलग माता ।
अर्थ स्वार्थ परमार्थता । जाण तत्त्वतां मी त्यांसी ॥५९॥
तोंडींचें पोटींचें गांठींचें । माता बाळकालागीं वेंचे ।
तेवीं भाविकांलागीं आमुचें । सर्वस्व साचें मी वेंची ॥११६०॥
बाळक न मागतां धांवोनी । कळवळोनि माता लावी स्तनीं ।
तेवी भोळ्या भक्तांलागुनी । मी अनुसंधानी लाविता ॥६१॥
ज्येष्ठ कनिष्ठ पुत्रातें पिता । एकचि जाण प्रतिपाळता ।
ज्येष्ठातें निग्रहो करिता । लळे पुरविता बाळकांचे ॥६२॥
ज्येष्ठ वांकुडें बोलतां । तोंडावरी हाणे पिता ।
बाळक बोबडें बोलतां । संतोषे सर्वथा सर्वस्वें ॥६३॥
सज्ञानासी अबद्ध पडतां । दोष वाजती त्याचे माथां ।
भोळ्या भक्तांची अबद्ध कथा । तेणें देवो तत्त्वतां संतोषे ॥६४॥
कर्माकर्मप्रत्यवायता । हे सज्ञानासीच सर्वथा ।
भोळ्या भक्तांसी कर्मबाधकता । मी सर्वथा येऊं नेदीं ॥६५॥
भोजनीं बैसतां बापासी । दूरी बैसवी ज्येष्ठ पुत्रासी ।
अंकी वाऊनि बाळकासी । तृप्ति निजग्रासीं देतुसे ॥६६॥
तेथें जें जें गोड आपणासी । तें तें दे बाळकासी ।
न घेतां प्रार्थूनि त्यासी । तृप्तीच्या ग्रासीं जेववी ॥६७॥
तेवीं साधनीं शिणतां सज्ञानासी । प्राप्ती होय अतिप्रयासीं ।
माझिया भोळ्या भक्तांसी । मीच अनायासीं उद्धरीं ॥६८॥
वाट चुकल्या भुयाळासी । फेरा पडे चालों जाणत्यासी ।
बाळक बापाचे कडियेसी । श्रमू तयासी येवों न शके ॥६९॥
तेवीं ’साधनी’ अंगविकळता । ते वाजे सज्ञानाचे माथां ।
भोळ्या भक्तातें मी उद्धरिता । प्रयास सर्वथा त्या नाहीं ॥११७०॥
त्यासी वाऊनि आपुल्या खांदीं । मी पाववीं सायुज्यसिद्धी ।
नवल त्याची भोळी बुद्धि । तेथही भजनविधी न सांडी ॥७१॥
हृदयीं कपटाचा थारा । तोचि भजनासी आडवारा ।
करितां युक्तिप्रयुक्ती विचारा । विचाराबाहिरा मी त्यासी ॥७२॥
नेणे आचारा विचारा । केवळ भावार्थी भोळा खरा ।
न धरत न सांवरत एकसरां । मजभीतरां तो पावे ॥७३॥
देखोन भोळिवेच्या भक्तासी । मीचि सामोरा धांवें त्यासी ।
त्यापाशीं मी अहर्निशीं । भुललों भावासी सर्वथा ॥७४॥
केवळ जे भोळे भक्त । ते भगवंतासी आवडत ।
सांगतां कृष्ण मिटकिया देत । लाळ घोटीत उद्धवू ॥७५॥
मज भोळ्या भक्तांची आवडी । काय सांगों त्यांची गोडी ।
त्यावेगळी अर्धघडी । कोडी परवडी नावडती ॥७६॥
यापरीचे जे भोळे भक्त । ते मी मानीं उत्तम भागवत ।
त्यांच्या पायां मी लागें भगवंत । उत्तम निश्चित ते जाण ॥७७॥
त्यांलागीं मी आर्तभूत । त्यांलागीं सदा सावचित्त ।
त्यांलागीं मी दशदिशा धांवत । भोळा भक्त दुर्लभ ॥७८॥
उद्धवा काय सांगों गोठी । भोळा भक्त देखोनि दिठीं ।
मीही आपुलिये सवसाटी । उठाउठी घेतुसें ॥७९॥
येर्हवीं मोल करितां जाण । मजहूनि माझे भक्त गहन ।
यालागीं मी त्यांअधीन । भक्तवचन नुल्लंघीं ॥११८०॥
भोळ्या भक्तांचें वचन । माझेनि नुल्लंघवे जाण ।
देवकीवसुदेवाचीं आण । भावो प्रमाण भजनासी ॥८१॥
वृथा घृतेंवीण भोजन । वृथा वंध्येचें मैथुन ।
वृथा भावेंवीण भजन । सत्य जाण उद्धवा ॥८२॥
भावो तेथ भाग्य पहा हो । भावो तेथ मी निःसंदेहो ।
भावो तेथें प्रकटे देवो । निजस्वभावो स्वानंदें ॥८३॥
भावो तेथ विरक्ती । भावो तेथ प्रकटे शांती ।
भावो तेथ माझी भक्ती । उल्हासती निजबोधें ॥८४॥
एवं भाविकांमाजीं माझी भक्ति । मजसहित स्वानंदें नाचती ।
यालागीं भोळे जे भावार्थी । ते उत्तम होती भागवत ॥८५॥
नेणते भक्त जे मातें भजती । ते मज पावले या रीतीं ।
सांगीतली ते म्यां व्युत्पत्ती । आतां उत्तम भक्ती अवधारीं ॥८६॥
मल्लिङ्ग मद्भक्तजन दर्शनस्पर्शनार्चनम् ।
परिचर्या स्तुतिः प्रह्व गुणकर्मानुकीर्तनम् ॥ ३४ ॥
नाना अवतारअनुक्रमा । शैवी वैष्णवी अतिउत्तमा ।
शास्त्रोक्त माझ्या प्रतिमा । तीर्थक्षेत्रीं महिमा विशेष ज्यांचा ॥ ८७॥
ज्या प्रतिमा देवीं प्रतिष्ठिलिया । ज्या नरकिन्नरीं संस्थापिलिया ।
ज्या स्वयें स्वयंभ प्रकटलिया । शास्त्रीं बोलिलिया गंडकी ॥८८॥
एकी भक्तअनुग्रहें आल्या । आसुरी निशाचरीं ज्या केल्या ।
आपुलाल्या घरीं पूजिल्या । भक्तीं करविल्या त्रैवर्णिकीं ॥८९॥
ऐशा माझ्या प्रतिमांची भेटी । पाहों धांवे उठाउठी ।
पूजा करावया पोटीं । आवडी मोठी उल्हासे ॥११९०॥
माझें स्वरूप ते माझे भक्त । मी तेचि ते माझे संत ।
त्यांचे भेटीलागी आर्तभूत । जैसें कृपणाचें चित्त धनालागीं ॥९१॥
माझ्या प्रतिमांहूनि अधिक । संतभजनीं अत्यंत हरिख ।
साधुसंगतीचें अतिसुख । सांडूनि देख घरदारां ॥९२॥
चिंतामणीसी कीजे जतन । तैसी मर्यादा राखे सज्जन ।
नीच नवें अधिक भजन । न धाये मन पूजितां ॥९३॥
सिद्ध करूनि पूजासंभार । माझे पूजेचा अत्यादर ।
पूजा करितां एकाग्र । जैं साधु नर घरा येती ॥९४॥
त्या साधूंची पूजा न करितां । जो माझी पूजा करी सर्वथा ।
तेणें मज हाणितल्या लाता । कीं तो माझ्या घाता प्रवर्तला ॥९५॥
बाळक एक एकुलता । त्यासी माथां हणितल्या लाता ।
मग पाटोळाही नेसवितां । क्षोभली माता समजेना ॥९६॥
तेवीं अवगणुनी माझिया संतां । मीचि क्षोभें मज पूजितां ।
ते सेवा नव्हे सर्वथा । अतिक्षोभकता मज केली ॥९७॥
संत माझे लळेवाड । त्यांची पूजा मज लागे गोड ।
संतसेवकांचें मी पुरवीं कोड । मज निचाडा चाड संतांची ॥९८॥
सांडूनि माझें पूजाध्यान । जो संतांसी घाली लोटांगण ।
कोटि यज्ञांचें फळ जाण । मदर्पण तेणें केलें ॥९९॥
सकळ तीर्थी तोचि न्हाला । जपतपादिफळें तोचि लाहिला ।
सर्व पूजांचें सार तो पावला । जेणें साधू वंदिला सन्मानें ॥१२००॥
प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । संत सचेतन माझ्या मूर्ती ।
दृढ भावें केल्या त्यांची भक्ती । ते मज निश्चितीं पावली ॥१॥
प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ।
चालतें बोलतें परब्रह्म । अतिउत्तम साधुसेवा ॥२॥
माझ्या प्रतिमा आणि साधुनर । तेथें या रीतीं भजती तत्पर ।
हा तंव सांगीतला निर्धार । भजनप्रकार तो ऐक ॥३॥
प्रतिमा आणि साधु सोज्ज्वळे । आवडीं न पाहती ज्यांचे डोळे ।
दृष्टि असोनि ते आंधळे । जाण केवळें मोरपिसें ॥४॥
जेवीं कां प्रिया पुत्र धन । देखोनियां सुखावती नयन ।
तैसें संतप्रतिमांचें दर्शन । आवडीं जाण जो करी ॥५॥
अतिउल्हासें जें दर्शन । या नांव गा देखणेपण ।
तेणें सार्थक नयन जाण । दृष्टीचें भजन या रीतीं ॥६॥
देखोनि संत माझीं रूपडीं । जो धांवोनियां लवडसवडी ।
खेंव देऊनियां आवडीं । मिठी न सोडी विस्मयें ॥७॥
ऐसें संतांचें आलिंगन । तेणें सर्वांग होय पावन ।
कां मूर्तिस्पर्शें जाण । शरीर पावन होतसे ॥८॥
तीर्थयात्रे न चालतां । संतांसमीप न वचतां ।
हरिरंगणीं न नाचतां । चरण सर्वथा निरर्थक ॥९॥
जो कां नाना विषयस्वार्था । न लाजे नीचापुढें पिलंगतां ।
तो हरिरंगणीं नाच म्हणतां । आला सर्वथा उठवण्या ॥१२१०॥
तीर्थयात्रा क्षेत्रगमनता । हरिकीर्तना जागरणा जातां ।
संतसमागमें चालतां । कां नृत्य करितां हरिरंगीं ॥११॥
या नांव गा सार्थक चरण । इतर संचार अधोगमन ।
चरणाचें पावनपण । या नांव जाण उद्धवा ॥१२॥
सर्वभावें अवंचन । कवडी धरूनि कोटी धन ।
जेणें केलें मदर्पण । माझें अर्चन या नांव ॥१३॥
धनधान्य वंचूनि गांठीं । माझी पूजा आहाच दृष्टीं ।
ते नव्हे अर्चनहातवटी । तो जाण कपटी मजसी पैं ॥१४॥
लोभें खावया आपण । ठेवी प्रतिमेपुढें पक्कान्न ।
अतीत आलिया न घाली अन्न । मदर्चन तें नव्हे ॥१५॥
कर पवित्र करितां पूजा । ते आवडती अधोक्षजा ।
जे न पूजिती गरुडध्वजा । त्या जाण भुजा प्रेताच्या ॥१६॥
न करितां हरिपूजनें । न देतां सत्पात्रीं दानें ।
जडित मुद्रा बाहुभूषणें । तें प्रेतासी लेणें लेवविलें ॥१७॥
वाचा सार्थक हरिकीर्तनें । कां अनिवार नामस्मरणें ।
जयजयकाराचेनि गर्जनें । केलीं त्रिभुवनें पावन ॥१८॥
रामनामाच्या गजरीं । सदा गर्जे ज्याची वैखरी ।
तेथ कळिकाळाची नुरे उरी । दुरितें दूरी पळाली ॥१९॥
हरिनाम सांडूनि करंटीं । मिथ्या करिताती चावटी ।
जेवीं हागवणी पिटपिटी । तैशा गोठी जल्पती ॥१२२०॥
हरिनामाचा सुखसुरवाड । ज्याचे मुखीं लागला गोड ।
त्याचें मजपाशीं सरतें तोंड । मी अखंड त्याजवळी ॥२१॥
गद्यपद्यें स्तवनमाळा । नाना पदबंधाची कळा ।
छंदें कुसरीं विचित्र लीळा । स्तुति गोपाळा अर्पावी ॥२२॥
धैर्य स्थैर्य औदार्य । घनश्याम अतिसौंदर्य ।
शौर्य वीर्य अतिमाधुर्य । गुणगांभीर्य गोविंदू ॥२३॥
त्रिविक्रम उभा बळीच्या द्वारीं । द्वार न सांडूनि द्वारकरी ।
तेणें द्वारें द्वारकेभीतरीं । येऊनि उद्धरी कुशातें ॥२४॥
तो अद्यपि श्रीहरि । स्वयें उभा समुद्रतीरीं ।
शोभा विराजमान साजिरी । असुरसुरनरीं वंदिजे ॥२५॥
मत्स्य झाला तो सागरीं । वराह झाला नासिकद्वारीं ।
उपजला खांबा माझारीं । यशोदेघरीं पोसणा ॥२६॥
जरठपाठी झाला कमठू । बळिच्छळणीं तो खुजटू ।
वेदवादें अतिवाजटू । फुरफुराटू निःश्वासें ॥२७॥
बाईल चोरीं नेली परदेशीं । तीलागीं रडे पडे वनवासीं ।
एकही गुण नाहीं त्यापाशीं । शेखीं दासी कुब्जेसीं रातला ॥२८॥
’स्तुतिगुणकर्मानुकीर्तन’ । तें या नांव गा तूं जाण ।
’प्रह्व’ म्हणिजे तें नमन । तेंही व्याख्यान अवधारीं ॥२९॥
माझे प्रतिमांचें दर्शन । कां देखोनि संतजन ।
जो भावें घाली लोटांगण । देहाभिमान सांडूनि ॥१२३०॥
साधुजनांसी वंदितां । धणी न मनी जो चित्ता ।
पुनःपुन्हा चरणीं माथा । विनीततां अतिनम्र ॥३१॥
भागवताचें रजःकण । जो मस्तकीं वंदीना आपण ।
तो जीवें जीतां प्रेत जाण । अपवित्रपण तैसें तया ॥३२॥
सांडूनि लौकिकाच्या लाजा । जो वैष्णवांच्या चरणरजा ।
गडबडां लोळे वोजा । हा भक्तीचा माझा उल्हास ॥३३॥
या आवडीं करितां नमन । सहजें जाती मानाभिमान ।
हें मुख्य भक्तीचें लक्षण । जे मानाभिमान सांडावे ॥३४॥
त्यजावया मानाभिमान । करावें मत्कीर्तनश्रवण ।
श्रवणादि भक्तीचें लक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥३५॥
मत्कथाश्रवणे श्रद्धा मदनुध्यानमुद्धव ।
सर्वलाभोपहरणं दास्येनात्मनिवेदनम् ॥ ३५ ॥
दृढ आस्तिक्यें समाधान । शुद्ध श्रद्धा त्या नांव जाण ।
भावार्थें न डंडळी मन । कथाश्रवण सादरें ॥३६॥
वक्त्याच्या वचनापाशीं । जडूनि घाली कानामनासी ।
श्रवणार्थ वाढवी बुद्धीसी । विकिला कथेसी भावार्थें ॥३७॥
जेवीं दुधालागीं मांजर । संधी पहावया सादर ।
तेवीं सेवावया कथासार । निरंतर उल्हासु ॥३८॥
जडित कुंडलेंमंडित कान । तें श्रवणासी नोहे मंडण ।
श्रवणासी श्रवण भूषण । श्रवणें श्रवण सार्थक ॥३९॥
जरी स्वयें झाला व्याख्याता । पुराणपठणें पुरता ।
तरी साधुमुखें हरिकथा । ऐके सादरता अतिप्रीतीं ॥१२४०॥
श्रवणें श्रवणार्थीं सावधान । तोचि अर्थ करी मनन ।
संपल्या कथाव्याख्यान । मनीं मनन संपेना ॥४१॥
ऐसें ठसावल्या मनन । सहजेंचि लागे माझें ध्यान ।
सगुण अथवा निर्गुण । आवडी प्रमाण ध्यानासी ॥४२॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता । तिहींसी एकी गांठी नसतां ।
तंवचिवरी ध्यानावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥४३॥
ज्याच्या जीवीं ध्यानाची आवडी । ज्याच्या मनासी माझी गोडी ।
उद्धवा हे तैंचि जोडे जोडी । जैं जन्मकोडी निजभाग्यें ॥४४॥
निष्काम करोनियां मन । जन्मजन्मांतरीं साधन ।
केलें असेल तैं माझे ध्यान । विश्वासें जाण दृढ लागे ॥४५॥
दृढ लागल्या माझें ध्यान । अनन्यभावें माझें भजन ।
सर्व पदार्थेंसीं जाण । आत्मसमर्पण मज करी ॥४६॥
वैदिक लौकिक दैहिक । या क्रियांचे लाभ देख ।
जरी झाल्या अलोकिक । भक्त भाविक तैं नेघे ॥४७॥
वैदिक लाभ दिव्य सामग्री । स्वर्गादि सत्यलोकवरी ।
भक्त तेंही हातीं न धरी । भजन सुखें करी संतुष्ट ॥४८॥
लौकिक लाभाची श्रेणी । कल्पतरु कामधेनु चिंतामणी ।
भक्त अर्पीं कृष्णार्पणीं । हरिभजनीं संतुष्ट ॥४९॥
दैहिक लाभाची थोरी । गजान्तलक्ष्मी आल्या घरीं ।
भक्त कृष्णार्पण करी । भजन सुखें करी संतुष्ट ॥१२५०॥
आविरिंच्यादि लाभ जाण । सर्वही मानोनियां गौण ।
माझे भक्तीसी विकिला प्राण । सर्व समर्पण मज करी ॥५१॥
जेणें सेवेसी विकिला प्राण । तो वृथा जावों नेदी अर्ध क्षण ।
माझी कथा माझें ध्यान । महोत्साहो जाण माझाचि ॥५२॥
मज्जन्मकर्मकथनं मम पर्वानुमोदनम् ।
गीतताण्डववादित्र गोष्ठीभिर्मद्गृहोत्सवः ॥ ३६ ॥
ध्यानावस्थें करी ध्यान । नातरी कथानिरूपण ।
अनुसंधानीं सावधान । रितें मन राहूं नेदी ॥५३॥
माझीं जन्मकर्में निरूपितां । आवडी उल्हास थोर चित्ता ।
स्वेद रोमांच द्रवतां । सप्रेम कथा उल्हासे ॥५४॥
ऐकूनि रहस्य हरिकथा । द्रव नुपजे ज्याचिया चित्ता ।
तो पाषाण जाण सर्वथा । जळीं असतां कोरडा ॥ ५५ ॥
ऐक माझे भक्तीचें चिन्ह । माझ्या पर्वाचें अनुमोदन ।
करी करवी आपण । दीनोद्धरणउपावो ॥५६॥
पर्वविशेष भागवतधर्मीं । नृसिंहजयंती रामनवमी ।
वामनजयंती जन्माष्टमी । उत्तमोत्तमीं शिवरात्र ॥५७॥
वैष्णवांसी शिवरात्री विरुद्ध । हें बोलणें अतिअबद्ध ।
सकळ पुराणीं अविरुद्ध । व्यास विशुद्ध बोलिला ॥५८॥
शिव श्याम तमोगुणी । तो शुद्ध झाला विष्णूच्या ध्यानीं ।
विष्णु श्याम शिवचिंतनीं । विनटले गुणीं येरयेरां ॥५९॥
शिव धवळधाम गोक्षीरू । विष्णु घनश्याम अतिसुंदरु ।
बाप ध्यानाचा बडिवारू । येरें येरू व्यापिला ॥१२६०॥
मुदला दोहींसी ऐक्य शुद्ध । मा उपासकांसी का विरुद्ध ।
शिवरात्री वैष्णवांसी अविरुद्ध । व्रत विशुद्ध सर्वांसी ॥६१॥
जे पर्वणी प्रिय चक्रपाणी । जे सकळ कल्याणाची श्रेणी ।
उभय पक्षां तारिणी । वैष्णवजननी एकादशी ॥६२॥
जे शुक्लकृष्णपक्षविधी भक्त वाऊनियां खांदी ।
नेऊनियां सायुज्यसिद्धी । मोक्षपदीं बैसवी ॥६३॥
करावी शुक्ल एकादशी । त्यजावें कृष्णपक्षासी ।
उपडलिया एका पक्षासी । सायुज्यासी केवीं पावे ॥६४॥
दों पांखीं उड्डाण पक्ष्यासी । एकु उपडिल्या नुडवे त्यासी ।
तेवीं पां त्यजितां कृष्णपक्षासी । सायुज्यासी न पविजे ॥६५॥
तेवीं एकादशी पाहीं । जो जो उत्सवो जे जे समयीं ।
तो तो उपतिष्ठे माझ्या ठायीं । संदेहो नाहीं सर्वथा ॥६६॥
जो एकादशीचा व्रतधारी । मी नित्य नांदें त्याच्या घरीं ।
सर्व पर्वकाळांच्या शिरीं । एकादशी खरी पैं माझी ॥६७॥
जो एकादशीचा व्रती माझा । तो व्रततपतीर्थांचा राजा ।
मज आवडे तो गरुडध्वजा । परिग्रहो माझा तो एकु ॥६८॥
जैं माझे भक्त आले घरा । तैं सर्व पर्वकाळ येती दारा ।
वैष्णवां तो दिवाळी दसरा । तीर्थें घरा तैं येती ॥६९॥
चंद्रसूर्यग्रहणांसी । वोवाळूनि सांडी ते दिवसीं ।
कपिलाषष्ठी ते याची दासी । मा अर्धोदयासी कोण पुसे ॥१२७०॥
ऐसें मद्भक्तांचें आगमन । तेणें उल्हासें न संटे मन ।
सर्वस्व वेंचितां धनधान्य । हरिखें जाण नाचतु ॥७१॥
ऐशीं माझ्या भक्तांची आवडी । त्यांचे संगतीची अतिगोडी ।
त्या नांव भक्तीची कुळवाडी । पर्वकोडी ते दिवसीं ॥७२॥
पर्वविशेष आदरें । संत आलेनि अवसरें ।
श्रृंगारी हरिमंदिरें । गुढिया मखरें महोत्साह ॥७३॥
संत बैसवूनि परवडीं । कीर्तन मांडिती निरवडी ।
हरिखें नाचती आवडी । धरिती बागडी विन्यासें ॥७४॥
टाळ घोळ मृदंग कुसरीं । नाना चरित्रें गाती गजरीं ।
गर्जती स्वानंद अवसरी । जयजयकारी हरिनामें ॥७५॥
यात्रा बलिविधानं च सर्ववार्षिकपर्वसु ।
वैदिकी तांत्रिकी दीक्षा मदीयव्रतधारणम् ॥ ३७ ॥
ऐक दीक्षेचें लक्षण । वैदिकी तांत्रिकी दोन्ही जाण ।
वैदिकी वेदोक्तग्रहण । तांत्रिकी जाण । आगमोक्त ॥७६॥
वैष्णवी दीक्षा व्रतग्रहण । पांचरात्रिक मंत्रानुष्ठान ।
हें आगमोक्त शुद्ध लक्षण । व्रतधारण तें माझें ॥७७॥
वैष्णवव्रतधर्मासी । पर्वें करावीं वार्षिकेंसी ।
जे बोलिलीं चातुर्मासीं । एकादश्यादि जयंत्या ॥७८॥
शयनी कटिनी प्रबोधिनी । पवित्रारोपणी नीराजनी ।
वसंतदमनकारोपणी । जन्मदिनीं जयंत्या ॥७९॥
इत्यादि नाना पर्वकाळीं । महामहोत्साहो पूजावळी ।
नीराजनें दीपावळी । मृदंगटाळीं गर्जत ॥१२८०॥
उचंबळोनि अतिसुखें । यात्रे निघावें येणें हरिखें ।
दिंडी पताका गरुडटके । नामघोषें गर्जत ॥८१॥
यात्रे जावें ज्या देवासी । तो देवो आणी निजगृहासी ।
आपली आवडी जे मूर्तीसी । ते प्रतिमेसी प्रतिष्ठी ॥८२॥
ममार्चास्थापने श्रद्धा स्वतः संहत्य चोद्यमः ।
उद्यानोपवनाक्रीड पुरमंदिरकर्मणि ॥ ३८ ॥
मूर्ति निपजवावी वरिष्ठ । नेटुगी देटुगी चोखट ।
साधुमुखें अतिनिर्दुष्ट । घवघवीत साजिरी ॥८३॥
मूर्ति करावी अतिसुरेख । कृष न करावी अधोमुख ।
स्थूल न करावी ऊर्ध्वमुख । रडकी दुर्मुख न करावी ॥८४॥
अंग स्थूल वदन हीन । मूर्ति न करावी अतिदीन ।
खेचरी भूचरी जिचे नयन । विक्राळ वदन न करावी ॥८५॥
अंग साजिरें नाक हीन । वरदळ चांग चरण क्षीण ।
मोदळी बुदगुली ठेंगणें ठाण । अतिदीर्घ जाण न करावी ॥८६॥
मूर्ति साजिरी सुनयन । सम सपोष सुप्रसन्न ।
अंगीं प्रत्यंगीं नव्हे न्यून । सुचिन्ह सुलक्षण सायुध ॥८७॥
पाहतां निवे तनमन । देखतां जाय भूकतहान ।
घवघवीत प्रसन्नवदन । कृपालक्षण सुकुमार ॥८८॥
जे देखतांचि जीवीं जडे । अतिशयें सर्वांसी आवडे ।
पाहों जातां निजनिवाडें । पूरु चढे प्रेमाचा ॥८९॥
ईषत् दिसे हास्यवदन । अतिशयेंसी सुप्रसन्न ।
जिचेनि घवघवाटें निवे मन । प्रतिमा संपूर्ण ती नांव ॥१२९०॥
तेथें मेळवूनि साधुश्रेष्ठां । अग्न्युत्तारण करावें निष्ठा ।
चक्षून्मीलन प्राणप्रतिष्ठा । करावी वरिष्ठाचेनि हातें ॥९१॥
देवालय करावें गहन । वन उद्यान उपवन ।
खेंडकुलिया विश्रामस्थान । आराम जाण करावे ॥९२॥
नाना जातींचे वृक्ष तें वन । फळभक्षी वृक्ष तें उपवन ।
पुष्पवाटिका तें उद्यान । कृष्णार्पण पूजेसी ॥९३॥
हाट हाटवटिया चौपासी । नगर वसवावें देवापाशीं ।
वेदाध्ययन शास्त्रश्रवणेंसी । अहर्निशीं कीर्तनें ॥९४॥
इतुकें करावया असमर्थ । श्रद्धा आहे परी नसे वित्त ।
तरी साह्य मेळवूनि समर्थ । मद्भावयुक्त करावें ॥९५॥
कां मेळवूनि भगवद्भक्त । त्यांत श्रद्धाळू जे वित्तवंत ।
भावपूर्वक दिधल्या वित्त । तेणें हें समस्त करावें ॥९६॥
देउळीं करूनि मूर्तिप्रतिष्ठा । परतोनि न वचे जो त्या वाटा ।
तो आळशी जाण पां करंटा । नव्हेचि चोखटा भावाचा ॥९७॥
जो करूं जाणे मूर्तिप्रतिष्ठा । धन वेंचून भावार्थी मोठा ।
नीचसेवा तो माझा वांटा । झाडितां खरांटा न संडी ॥९८॥
सम्मार्जनोपलेपाभ्यां सेकमण्डलवर्तनैः ।
गृहशुश्रूषणं मह्यं दासवद् यदमायया ॥ ३९ ॥
असतां शिष्य सेवकजन । ते प्रतिष्ठा सांडूनि सन्मान ।
स्वयें करी सडासंमार्जन । देवालयीं जाण निर्दंभ ॥९९॥
रंगमाळा घाली कुसरीं । नाना यंत्रेम् नानाकारीं ।
नाना परीचे रंग भरी । आवडी भारी मद्भजनीं ॥१३००॥
जैसे कां नीच रंक । तैसी सेवा करी देख ।
नीच सेवेचें अतिसुख । निर्मायिक मद्भजनीं ॥१॥
अमानित्वं अदम्भित्वं कृतस्यापरिकीर्तनम् ।
अपि दीपावलोकं मे नोपयुञ्ज्यान्निवेदितम् ॥ ४० ॥
अपार वेंचूनि नाना अर्थ । प्रासादप्रतिष्ठा म्यां केली येथ ।
मी एक देवाचा मोठा भक्त । न धरी पोटांत अभिमान ॥२॥
शुद्ध भावो नाहीं चित्तीं । खटाटोपें अहाच भक्ती ।
ऐशी जे दांभिक स्थिती । भक्त नातळती भाविक ॥३॥
भक्तें न धरावा अभिमान । नापेक्षावा मानसन्मान ।
न करावें दांभिक भजन । अभिलाष जाण न धरावा ॥४॥
अनुभव जाला तो आपण । कां देवालयीं वेंचिलें धन ।
अथवा जें दिधलें दान । तें वाच्य जाण न करावें ॥५॥
यजमान जैं केलें बोले । तैं जें केलें तें निर्वीर्य जालें ।
प्राणेंवीण प्रेत उरलें । तैसे झाले ते धर्म ॥६॥
कृषीवळू पेरूनियां धान्य । सवेंचि आच्छादी आपण ।
तैं पीक लगडूनि ये जाण । तैसें सफळ दान न बोलतां ॥७॥
देवासी समर्पिलें आपण । कां आणिकीं केलें निवेदन ।
तें घेऊं नये आपण । देवलकपण तो दोषु ॥८॥
देवाचा प्रसाद घेतां । लोभें न घ्यावा सर्वथा ।
आधीं वांटावा समस्ता । अल्पमात्रतां स्वयें घ्यावा ॥९॥
दीपु समर्पिला श्रीहरि । तेणें न वर्तावें गृहव्यापारीं ।
हें बोलिलें आगमशास्त्री । स्मृतिकारीं सज्ञानीं ॥१३१०॥
हे तंव अवघी साधारण बाह्य पूजा । परी दृढविश्वासें भावो माझा ।
ते भक्ति आवडे अधोक्षजा । भाविकांची पूजा भावार्थें ॥११॥
ऐक पां भक्तीचा इत्यर्थु । जेणें भजनें म्हणिजे भक्तु ।
तरी जें जें उत्तम या लोकांतु । आवडता पदार्थु मज अर्पी ॥१२॥
यद्यदिष्टतमं लोके यच्चातिप्रियमात्मनः ।
तत्तन्निवेदयेन्मह्यं तदानन्त्याय कल्पते ॥ ४१ ॥
हो कां चंद्रामृत तत्त्वतां । अवचटें आलें भक्ताचे हातां ।
तें अवघेंचि अर्पी भगवंता । देहलोभता न सेवी ॥१३॥
देहासी यावया अमरता । तेणें लोभें सेवावें अमृता ।
अमर अमृतपान करितां । मरती सर्वथा सकाळें ॥१४॥
नश्वर देहाचिया ममता । भक्त सेवीना अमृता ।
तेंचि भगवंतासी अर्पितां । अक्षयता अनश्वर ॥१५॥
परिस चिंतामणि न प्रार्थितां । दैवें आलिया भक्ताच्या हातां ।
तो लोभें न ठेवी सर्वथा । अर्पी भगवंता तत्काळ ॥१६॥
लोभें कल्पतरु राखतां । कल्पना वाढे अकल्पिता ।
तोचि भगवंती अर्पितां । निर्विकल्पता स्वयें लाभे ॥१७॥
स्वार्थें चिंतामणि राखितां । अत्यंत हृदयीं वाढवी चिंता ।
तोचि भगवंती अर्पितां । निश्चिंतता चित्तासी ॥१८॥
कामधेनु राखतां आपण । अनिवार कामना वाढवी जाण ।
तेचि करितां कृष्णार्पण । निरपेक्षता पूर्ण अंगीं बाणे ॥१९॥
लोभें स्पर्शमणि राखतां । तो वाढवी धनलोभता ।
तोचि भगवंतीं अर्पितां । अर्थस्वार्थतानिर्मुक्त ॥१३२०॥
हो कां देशकाळऋतुमेळें । उत्तम पदार्थ अथवा फळें ।
नवधान्यादिकें सकळें । अर्पी भावबळें मजलागीं ॥२१॥
पोटांतूनि आवडता । प्राप्त झालिया पदार्था ।
मजचि अर्पिती सर्वथा । लोलिंगता सांडूनी ॥२२॥
आपुले हृदयींची आवडी । हरिचरणीं फुडी ।
आतां नाना पदार्थांची जे गोडी । ते मजचि रोकडी अर्पिती ॥२३॥
मज अनंताच्या हातीं । आवडीं अर्पिलें मद्भक्ती ।
त्याचीं फळें सांगतां श्रुती । मुक्या होती सर्वथा ॥२४॥
मी वेदांचा वेदवक्ता । मजही न बोलवे सर्वथा ।
त्याचें फळ तें मीचि आतां । जाण तत्त्वतां उद्धवा ॥२५॥
जीवाहिहोनि वरौती । माझ्या ठायीं अत्यंत प्रीती ।
तिये नांव गा माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥२६॥
तत्काळ मज पाविजे जेणें । ते माझे पूजेचीं स्थाने ।
अतिपवित्र जें कल्याणें । तुजकारणें सांगेन ॥२७॥
सूर्योऽग्निर्ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्जलम् ।
भूरात्मा सर्वभूतानि भद्र पूजापदानि मे ॥ ४२ ॥
एकादशीं एकादशाध्यायीं । एकादश पूजास्थानें पाहीं ।
एका जनार्दनु तेंही । एकरूप सर्वही वर्णील ॥२८॥
सूर्य अग्नि आणि ब्राह्मण । गायी वैष्णव आणि गगन ।
अनिळ जळ मही जाण । पूज्य आपण आपणासी ॥२९॥
अकरावें पूजा स्थान । सर्व भूतें पूज्य जाण ।
ऐक पूजेचें विधान । यथायोग्य लक्षण अवधारीं ॥१३३०॥
सूर्ये तु विद्यया त्रय्या हविषाग्नौ यजेत माम् ।
आतिथ्येन तु विप्राग्र्ये गोष्वङ्ग यवसादिना ॥ ४३ ॥
सविता माझें अधिष्ठान । माझेनि तेजें विराजमान ।
जेणें तेजें जगाचे नयन । देखणे जाण होताती ॥३१॥
दीपु लाविल्या गृहाभीतरीं । तो प्रकाशु दिसे गवाक्षद्वारीं ।
तैसें माझें निजतेज अंतरीं । तें सूर्यद्वारीं प्रकाशे ॥३२॥
तो सविता मण्डळमध्यवर्ती । जाण नारायण मी निश्चितीं ।
त्या मज सूर्याची उपास्ती । सौर सूक्ति त्रैविद्या ॥३३॥
ऋग्वेदादि वेद तीनी । साङ्ग सौरमंत्र जाणोनी ।
सूर्यसूक्तें संमुख पठणीं । पूजा सज्ञानीं करावी ॥३४॥
हे वैदिकी उपासकता । वेदज्ञांसीचि तत्त्वतां ।
नेणत्या योग्य नव्हे सविता । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥३५॥
तत्काळ प्रसन्न होय सविता । ऐसी सुगम उपासकता ।
तुज सांगेन आतां । सावधानता अवधारीं ॥३६॥
सकळ वेदांची जननी । सकळ मंत्रांचा मुकुटमणी ।
ते गायत्री उत्तमवर्णी । सकळ ब्राह्मणीं जाणिजे ॥३७॥
तिचा अर्थ विचारितां । तीअधीन असे सविता ।
त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्य देतां । त्रैविद्या तत्त्वतां त्या नांव ॥३८॥
अर्धमात्रा अर्धबिंबध्यान । त्रिपदा त्रिकाळीं अर्घ्यदान ।
तेणें संतोषे चिद्घन । आपणासमान भक्त करी ॥३९॥
हें प्रथम माझें अधिष्ठान । सूर्यपूजा याचि नांव जाण ।
आतां अग्निपूजेचें लक्षण । साङ्ग संपूर्ण तें ऐक ॥१३४०॥
सर्वांगां मुख प्रधान । तें माझें मुख अग्नि जाण ।
ये अर्थी वेदशास्त्रपुराण । साक्षी संपूर्ण गर्जती ॥४१॥
ब्राह्मण माझे आवडते । माझे मुखीं होआवया सरते ।
म्यां लाविले अग्निसेवेतें । तेही तेथें चूकले ॥४२॥
घालूनि मजमुखीं अवदान । ’इंद्राय स्वाहा’ म्हणती जाण ।
कर्मकांडें ठकिले ब्राह्मण । शुद्ध मदर्पण चूकले ॥४३॥
केवळ मजमुखीं अर्पितां । आड आली त्यांची योग्यता ।
इंद्र यम वरुण सविता । नाना विकल्पता अवदानीं ॥४४॥
देवो देवी मीचि आहें । हेंही सत्य न मानिती पाहें ।
मजवेगळा विनियोग होये । नवल काये सांगावें ॥४५॥
जें जें सेविजे तिहीं लोकीं । तें तें अर्पे माझ्या मुखीं ।
हें न मनिजे याज्ञिकीं । कर्माविखीं । विकल्पू ॥४६॥
विकल्पबुद्धि ब्राह्मण । अद्यापि संशयीं पडिले जाण ।
करूनि वेदशास्त्रपठण । शुद्ध मदर्पण न बोलती ॥४७॥
माझें मुख वैश्वानर । येणें भावें विनटले नर ।
सांडूनि भेद देवतांतर । मजचि साचार अर्पिती ॥४८॥
त्याचें समिधेनीं मन तृप्त झालें । तेथही जरी हविर्द्रव्य आलें ।
तरी माझें निजमुख सुखावलें । सर्वस्व आपुलें त्यांसी मी दें ॥४९॥
मज नैराश्यतेची आस । त्यांच्या हाताची मी पाहें वास ।
त्यांलागीं सदा सावकाश । अल्पही ग्रास जैं देती ॥१३५०॥
त्यांचेनि हातें निर्विकल्पें । मद्भावें जें अग्नीस अर्पे ।
तृण काष्ठ तिळ तुपें । तें म्यां चिद्रूपें सेविजे ॥५१॥
यापरी अग्नीची उपास्ती । जे दुजे स्थानींची पूजास्थिती ।
सांगीतली म्यां तुजप्रती । ब्राह्मणभक्ती अवधारीं ॥५२॥
पूजेमाजीं अतिश्रेष्ठ जाण । शीघ्र मत्प्राप्तीचें कारण ।
ब्राह्मण माझें पूजास्थान । अतिगहन उद्धवा ॥५३॥
त्यांचिया भजनाची नवलपरी । आड पडावें देखोनि दूरी ।
मस्तक ठेवावा चरणावरी । चरणरज शिरीं वंदावे ॥५४॥
आवाहनविसर्जनेंवीण । शालिग्रामीं माझें अधिष्ठान ।
परी तें केवळ अचेतन । ब्राह्मण सचेतन मद्रूपें ॥५५॥
मी अव्यक्तरूप जनार्दन । तो मी व्यक्त ब्राह्मणरूपें जाण ।
धरातळीं असें मी नारायण । धरामर ब्राह्मण यालागीं ॥५६॥
ब्राह्मणमुखें वेदांसी महिमा । ब्राह्मणें यज्ञदानतपतीर्थगरिमा ।
ब्राह्मणें देवासी परम प्रेमा । ब्रह्मत्व ब्रह्मा ब्राह्मणमुखें ॥५७॥
त्या ब्राह्मणांसी अपमानितां । अपमानिल्या यज्ञदेवता ।
वेदादि तपदानतीर्था । परब्रह्म तत्त्वतां अपमानिलें ॥५८॥
मज त्रिलोकीं नाहीं सांठवण । मजहूनि अधिक माझे ब्राह्मण ।
त्यामाजीं मी वेदरूप नारायण । सगळा जाण सांठवलों ॥५९॥
ब्राह्मणपद हृदयीं धरितां । मज आली परम पवित्रता ।
लक्ष्मी पायां लागे उपेक्षितां । चरणतीर्थ माथां शिवू धरी ॥१३६०॥
यालागीं ब्राह्मण पूज्य जाण । अंगें मी करीं चरणक्षालन ।
त्यांचें उच्छिष्ट मी काढीं आपण । पाडू कोण इतरांचा ॥६१॥
मुख्य माझें अधिष्ठान । सर्वोपचारपूजास्थान ।
दान मान मिष्ठान्न । विधिपूजन विप्रांचें ॥६२॥
एका नेमू शालिग्रामाचा । एका स्थावर लिंगाचा ।
एका नेमू गणेषाचा । एका सूर्याचा दर्शननेमू ॥६३॥
एका नेमू तुळाषीचा । एका बांधिल्या अनंताचा ।
नित्य नेम ब्राह्मणाचा । सभाग्य तो भाग्याचा दुर्लभ ॥६४॥
नित्य नेमस्त द्विजपूजा । षोडशोपचार करी वोजा ।
माझे भक्तीचा तो राजा । आत्मा माझा तो एकू ॥६५॥
जो देवतांतरा नुपासित । जीवेंभावें ब्राह्मणभक्त ।
त्याचा चुकवूनियां अनर्थ । निजस्वार्थ मी कर्ता ॥६६॥
ऐसे जे ब्राह्मणभक्त । त्यांच्या पायीं पृथ्वी पुनीत ।
गंगा चरणतीर्थ वांछित । शिरीं वंदीत मी त्यांसी ॥६७॥
त्यांचे सेवेचा सेवक । मोलेंवीण मी झालों देख ।
ब्राह्मणसेवेचें मज सुख । अलोकिक अनिवार ॥६८॥
नित्यनेम द्विजपूजा । करी तो आवडे अधोक्षजा ।
त्यालागीं पसरूनि चारी भुजा । आलिंगनीं माझा जीवू निवे ॥६९॥
ब्राह्मणांच्या स्नानप्रवाहतळीं । जेणें भावार्थें केली आंघोळी ।
कोटि अवभृथें पायांतळीं । तेणें तत्काळीं घातलीं ॥१३७०॥
ब्राह्मणचरणतीर्थ देखतां । पळ सुटे दोषदुरिता ।
तें भावार्थें तीर्थ घेतां । दोष सर्वथा निमाले ॥७१॥
जो कोणी नित्य नेमस्त । सेवी ब्राह्मणाचें चरणतीर्थ ।
तो स्वयें झाला तीर्थभूत । त्याचेनि पुनीत जड जीव ॥७२॥
त्या ब्राह्मणाचे ठायीं जाण । अभ्यंगादि सुमन चंदन ।
आसन भोजन धन धान्य । शक्तिप्रमाण पूजेसी ॥७३॥
ब्राह्मणासी प्रिय भोजन । दानीं श्रेष्ठ अन्नदान ।
निपजवूनियां मिष्टान्न । द्यावें भोजन मद्भावें ॥७४॥
एक हेळसूनि देती अन्न । एक उबगल्यासाठीं जाण ।
एक देती निर्भर्त्सून । एक वसवसोन घालिती ॥७५॥
तैसें न करावें आपण । ब्राह्मण माझें स्वरूप जाण ।
त्यांसी देऊनियां सन्मान । द्यावें भोजन यथाशक्ति ॥७६॥
अज्ञान अतिथि आल्या समयीं । खोडी काढूं नये त्याच्या ठायीं ।
तोही माझें स्वरूप पाहीं । अन्न ते समयीं अर्पावें ॥७७॥
अतिथि जातां पराङ्मुख । त्यासवें जाय पुण्य निःशेख ।
अन्न द्यावें समयीं आवश्यक । नातरी उदक तरी द्यावें ॥७८॥
ब्राह्मण बैसवूनि पंक्ती । जे कोणी पंक्तिभेद करिती ।
ते मोलें पाप विकत घेती । त्यांसी अधोगती निश्चितीं ॥७९॥
ब्राह्मणसेवेलागीं जाण । काया वाचा मन धन ।
यथासामर्थ्यें अवंचन । अतिथिपूजन त्या नांव ॥१३८०॥
त्रिपदाजपें पवित्र पूर्ण । यालागीं वेदांचें निवासस्थान ।
ब्राह्मण माझें स्वरूप जाण । श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचें ॥८१॥
ब्राह्मणआज्ञेलागीं जाण । अतिसादर ज्याचें मन ।
देणें देववणें दान । श्रद्धा संपूर्ण या नांव ॥८२॥
ब्राह्मणसेवा धनेंवीण । सर्वथा न घडे ऐसें न म्हण ।
सेवेसी श्रद्धा प्रमाण । उल्हास पूर्ण भजनाचा ॥८३॥
एकाची शरीरसेवा जाण । एकाचे वाचिक पूजन ।
एकाचें मानसिक भजन । दया पूर्ण द्विजाची ॥८४॥
ब्राह्मणभक्तिलागीं जाण । हर्षनिर्भर अंतःकरण ।
श्रद्धायुक्त उल्हासपूर्ण । आतिथ्य जाण या नांव ॥८५॥
यापरी ब्राह्मणभजन । तिसरे पूजेचें अधिष्ठान ।
हें सांगितलें जाण । गोशुश्रूषण तें ऐक ॥८६॥
जे गायीच्या कैवारा । घायें सहस्रबाहो केला पुरा ।
तीन सप्तकें वसुंधरा । मुख्य धुरा म्यां मारिल्या ॥८७॥
रामावतारीं अतिमहिमान । तैं न घडेचि गोषुश्रूषण ।
यालागीं गोकुळीं जाण । गायींचें सेवन म्यां केलें ॥८८॥
गायीचे सेवें झाली पुष्टी । बाळपणीं मारिले जेठी ।
कंस चाणूर मारिले हटी । बैसविला राज्यपटीं उग्रसेन ॥८९॥
गायीचे सेवेची अतिगोडी । तेणें माझी कीर्ति झाली चोखडी ।
फोडली कंसाची बांदवडी । तोडिली बेडी पितरांची ॥१३९०॥
यालागीं गायीं आणि ब्राह्मण । माझा जाण जीवप्राण ।
माझे पूजेचें अधिष्ठान । सुलभ जाण इयें दोन्ही ॥९१॥
आपत्काळीं गोरक्षण । करी तो पढियंता मज जाण ।
त्यासवें मी आपण । गोरक्षण करीतसें ॥९२॥
गायीचे सेवेचें विधान । गोग्रास द्यावा जे तृण ।
करावें अंगकुरवाळण । इतुकेनि प्रसन्न मी होयें ॥९३॥
निर्लोभ गायीची सेवा । करितां माझी प्राप्ति उद्धवा ।
ऐक वैष्णवाची सेवा । पूजा सद्भावा विभागू ॥९४॥
वैष्णवे बंधुसत्कृत्या हृदि खे ध्याननिष्ठया ।
वायौ मुख्यधिया तोये द्रव्यैस्तोयपुरःस्कृतैः ॥ ४४ ॥
वैष्णवसेवा अत्यंत कठिण । तेथें जाती नाहीं गा प्रमाण ।
न म्हणावा शूद्र ब्राह्मण । भक्तिप्राधान्यभावार्थे ॥९५॥
विदुर दासीपुत्र प्रसिद्धु । त्यासी आवडला गोविंदु ।
झाला वैष्णवांमाजीं अतिशुद्धु । कैसेनि निंद्यु म्हणावा ॥९६॥
योनि जन्मला मर्कट । तो वैष्णवांमाजीं अतिश्रेष्ठ ।
हनुमंत म्हणावया कनिष्ठ । ऐसा पापिष्ठ कोण आहे ॥९७॥
राक्षसांमाजीं बिभीषण । दैत्यांमाजीं प्रह्लाद जाण ।
भगवंतासी अनन्यशरण । वैष्णवपण तेणें त्यांसी ॥९८॥
जाती उत्तम भक्तिहीन । तो वैष्णव नव्हे जाण ।
अथवा करी दांभिक भजन । वैष्णवपण त्या नाहीं ॥९९॥
वैष्णवीं मानी जातिप्रमाण । शालिग्राम मानी पाषाण ।
गुरूसी मानी माणुसपण । तो पापिष्ठ जाण सर्वथा ॥१४००॥
जाणीव शाहणीव ज्ञातेपण । सांडूनि जातीचा अभिमान ।
जो मज होय अनन्यशरण । वैष्णव जाण तो माझा ॥१॥
त्या वैष्णवाचें पूजन । बाह्य उपचारें नव्हें जाण ।
बंधुस्नेहें कळवळी मन । साचार पूजन त्या नांव ॥२॥
ऐक सख्या बंधूचा स्नेहो । बंधूसी रणीं लागतां घावो ।
घायाआड स्वयें रिघोनि पहा हो । शत्रुसमुदावो विभांडी ॥३॥
तैसा पोटाआंतुला कळवळा । तोचि वैष्णवपूजेचा सोहळा ।
स्नेहेंवीण टिळे माळा । सुख गोपाळा तेणें नव्हे ॥४॥
एका पितयाचे पुत्र साधू । अकृत्रिम होती बंधू ।
माजीं सापत्नविरोधू । स्नेह शुद्धू तो नव्हे ॥५॥
भक्ताअभक्तांची उत्पत्ती । मजपासूनि गा निश्चिती ।
भावाभावसापत्नप्राप्ती । विरुद्ध स्थिती परस्परें ॥६॥
वैष्णव विष्णूचे उदरीं जाण । ते उदरीं उदरस्थ व्हावें आपण ।
तैं सहजें झाले सखेपण । अकृत्रिम जाण कळवळा ॥७॥
ऐसा बंधुस्नेहें जो कळवळा । तेचि पूजा वैष्णवकुळा ।
वैष्णवपूजकाजवळा । भावें भुलला मी तिष्ठें ॥८॥
वैष्णवपूजेचें लक्षण । तें पांचवें माझें पूजास्थान ।
ऐक आकाशाचें पूजन । केवळ माझें ध्यान ते ठायीं ॥९॥
आकाश निर्लेप निर्विकार । अतिसूक्ष्म निराकार ।
तैसें माझें ध्यान निरंतर । हृदयीं साचार करावें ॥१४१०॥
ध्यानीं बैसोनि सावकाश । सगळें सर्व महदाकाश ।
जो आपुलें करी हृदयाकाश । तेणें मी परेश पूजिला ॥११॥
अतिसूक्ष्म निर्विकार । हृदयीं माझें ध्यान सधर ।
तेचि पूजा गा साचार । अपरंपार मी पूजिलों ॥१२॥
आकाशा लेप लावूं जातां । लावितां न लागे सर्वथा ।
तेवीं सर्व कर्मीं वर्तता । आपुली मुक्तता जो देखे ॥१३॥
आकाश सर्व पदार्थीं व्याप्त । व्याप्त असोनि अतिअलिप्त ।
तेवी सर्व कर्मीं वर्तत । कर्मातीत नभनिष्ठा ॥१४॥
आकाश माझें पूजास्थान । तेथील पूजेचें हें विधान ।
हें सहावें पूजाअधिष्ठान । वायूचें अर्चन तें ऐक ॥१५॥
वायूच्या ठायीं भगवद्बुद्धी । ज्याची ढळों नेणें कधीं ।
वायूचेनि भूतां चेतनसिद्धी । जगातें त्रिशुद्धी धरिता तो ॥१६॥
वायुरूपें मीचि जाण । जालों सर्व भूतांचा प्राण ।
प्राणाचा मी मुख्य प्राण । मद्रूपें पवन या हेतु ॥१७॥
वायू व्योमीं जन्म पावें । जन्मोनि व्योमावेगळा नव्हे ।
सर्व कर्मीं तेथेंचि संभवे । अंती स्थिरावे निजव्योमीं ॥१८॥
तेवीं जन्मकर्मनिदान । पावोनि न सांडी अधिष्ठान ।
प्राणाचा जो होय प्राण । हेंचि पूजन वायूचें ॥१९॥
प्राणाचें गमनागमन । तेथ सोहंहंसाचें नित्य ध्यान ।
तेंचि करितां नित्य सावधान । हेंचि पूजन वायूचें ॥१४२०॥
मद्रूपें दृढभावन । वायूचें जो करी आपण ।
तें पवनाचें पूजन । पूजास्थान सातवें ॥२१॥
जीवनें जीवनाची पूजा । जीवनेंचि निपजे वोजा ।
ते पूजा पावे अधोक्षजा । तो भक्त माझा पढियंता ॥२२॥
’आपो नारायणः साक्षात्’ । या मंत्राचा जो मंत्रार्थ ।
देवें देवोचि पूजिजेत । जाण निश्चित उद्धवा ॥२३॥
क्षीरें पूजिला क्षीरसागरू । तेवीं द्रव्यें द्रव्योपचारू ।
हा जीवनपूजाप्रकारू । जाण निर्धारू उद्धवा ॥२४॥
जीवा जीववी जीवन । त्या जीवना मी निजजीवन ।
जीवनें पूजिजे जीवन । जेवीं समुद्रपूजन तरंगीं ॥२५॥
’नद्यस्तृप्यंतु समुद्रास्तृप्यंतु’ । हें जळेंचि जळ पूजिजेतू ।
पूज्यपूजकां एकत्व येथू । हेचि वेदोक्तू विधिपूजा ॥२६॥
जीवनें पूजिजे जीवन । हें आठवें पूजास्थान ।
ऐक पृथ्वीचें पूजन । श्लोकार्धे संपूर्ण सांगेन ॥२७॥
स्थण्डिले मंत्रहृदयैर्भोगैरात्मानमात्मनि ।
क्षेत्रज्ञं सर्वभूतेषु समत्वेन यजेत माम् ॥ ४५ ॥
जळामाजीं धरा अधर । विरोनि हों पाहे तें नीर ।
तीमाजीं मी प्रवेशलों धराधर । अधर ते सधर तेणें झाली ॥२८॥
यालागीं पृथ्वी माझें पूजास्थान । ऐक पूजेचें विधान ।
गोसदृश स्थंडिलीं जाण । आवाहन पैं माझें ॥२९॥
गोसदृश स्थंडिलीं कां म्हणसी । पृथ्वी आहे गायीच्या ऐशी ।
जैं पूजा करावी पडे तिसी । तैं तदाकारेंसी स्थंडिल ॥१४३०॥
ते स्थंडिलीं पूजावया धरा । आवाहन करावें धराधरा ।
तल्लिंग हृदयमंत्रा । मंत्रद्वारा पूजावी ॥३१॥
हृदय कवच शिखा नेत्र । शक्तिबीज मंत्रास्त्र ।
स्थंडिलीं रेखूनियां यंत्र । धराधरमहापूजा ॥३२॥
यापरी पृथ्वीपूजन । साङ्ग सांगीतलें जाण ।
आपुलें आपण पूजास्थान । दहावें लक्षण तें ऐक ॥३३॥
आधीं एक पुढें पूर्ण । त्या नांव दहावें लक्षण ।
आपलें आपण पूजास्थान । विचित्र विंदान पूजेचें ॥३४॥
पूज्यापुढें पूज्यकोटी । केल्या गणितासी पडे तुटी ।
पहिल्या पूज्यासी जैं फांटा उठी । तैं गणितसृष्टि असंख्य ॥३५॥
पूर्णासी फांटा काढिजे । त्या नांव एक म्हणिजे ।
एकपणेंही पूर्ण असिजे । सहज निजें परिपूर्ण ॥३६॥
पूर्णापुढें पूर्ण पडे । तैं गणित काय आतुडे ।
जैं निचाडा चाड वाढे । तैं निजनिवाडें निजपूजा ॥३७॥
एकासी एक मेळविजे । तैं दोनीपणें होय दुजें ।
जैं एकें एक भोगिजे । तैं देखिजे निजपूज्यत्व ॥३८॥
आपणचि आपला देवो । आपुला पूजक आपण पहा हो ।
आपुला आपणचि भावो । नवल नवलावो पूजेचा ॥३९॥
हृदयीं भावूनि चैतन्यघन । स्वयें तद्रूप होऊनि जाण ।
मग जे जे भोग भोगी आपण । ब्राह्मार्पण सहजेंचि ॥१४४०॥
तो ग्रास घाली स्वमुखीं । तेणें मुखें मी होय सुखी ।
तृप्ति उपजे परमपुरुखीं । पूजा नेटकी हे माझी ॥४१॥
तो जे जे कांहीं भोग भोगी । ते अर्पती मजचिलागीं ।
मी रंगलों त्याचे रंगीं । पावे श्रीरंगीं ते पूजा ॥४२॥
मुख्य पूजेमाजीं हे माझी पूजा । तेणेंचि पूजिलें मज अतिवोजा ।
पूजामिसें गरुडध्वजा । वश अधोक्षजा तेणें केलें ॥४३॥
हे आवडती माझी पूजा । अत्यंत प्रिय अधोक्षजा ।
हे भक्ति पढिये गरुडध्वजा । जाण तो माझा प्रिय भक्त ॥४४॥
हो कां सगुण अथवा निर्गुण । दोहीं रूपें मीचि जाण ।
तेथ जो करी निजभोग अर्पण । शुद्ध पूजन तें माझें ॥४५॥
निजात्मभोगीं अधोक्षजा । पूजिजे ते हे जाण पूजा ।
सर्व भूतांतें पूजिजे वोजा । समसाम्य समजा समभावें ॥४६॥
अकरावे पूजेचा विवेक । मागां पुढां एकएक ।
अकरा इंद्रियां पडे आंख । तोचि पूजक सर्व भूतां ॥४७॥
मागां पुढां एकएक कीजे । त्या नांव एकादश म्हणिजे ।
हाचि विवेक जेणें जाणिजे । तेणें पूजिजे सर्व भूतां ॥४८॥
आत्मभोगसमर्पणें पाहीं । वस्तू जाणितली स्वदेहीं ।
तेचि सर्व भूतांच्या ठायीं । देहींविदेहीं समसाम्यें ॥४९॥
सर्व क्षेत्रांतें वागविता । मी क्षेत्रज्ञु जाण तत्त्वतां ।
देखतांही विषम भूतां । ज्यासी माझी ममता मोडेना ॥१४५०॥
उंच नीच विषमता भूतां । वस्तूसी न देखे विषमता ।
समसाम्यें समान समता । सर्व भूतां समत्वें ॥५१॥
माझिया साम्यें सर्वसमता । तेचि पूजा सर्व भूतां ।
तोचि पूजक तत्त्वतां । ज्यासी विषमता बाधीना ॥५२॥
जो भावार्थें मजमाजीं आला । तैं सर्व भूतें तोचि झाला ।
सहजे समत्व पावला । पूजूं लागला आत्मत्वें ॥५३॥
पूजूं जावो रंक रावो । परी पालटेना समभावो ।
न खंडितां समतेचा ठावो । यथायोग्य पहा हो पूजित ॥५४॥
ऐक यदुवंषध्वजा । सर्व भूतीं माझी पूजा ।
माझेनि समत्वें निपजे वोजा । या अकराही पूजा समत्वें ॥५५॥
इयें अकराही अधिष्ठानें । मत्प्राप्तिकरें अतिपावनें ।
म्यां सांगीतलेनि अनुसंधानें । पूजा करणें यथाविधि ॥५६॥
म्यां सांगीतलें ज्या निगुतीं । पूजा करावी त्याचि स्थिती ।
न कळे तरी माझी मूर्ती । सर्वांहीप्रती चिंतावी ॥५७॥
धिष्ण्येष्वेष्विति मद्रूपं शङ्खचक्रगदाम्बुजैः ।
युक्तं चतुर्भुजं शान्तं ध्यायन्नर्चेत् समाहितः ॥ ४६ ॥
निर्गुणाहूनि सगुण न्यून । म्हणे तो केवळ मूर्ख जाण ।
सगुण निर्गुण दोनी समान । न्यून पूर्ण असेना ॥५८॥
विघुरलें तें तूप होये । थिजलें त्यापरीस गोड आहे ।
निर्गुणापरिस सगुणीं पाहें । अतिलवलाहें स्वानंदू ॥५९॥
निर्गुणाचा बोध कठिण । मनबुद्धिवाचे अगम्य जाण ।
शास्त्रांसी न कळे उणखूण । वेदीं मौन धरियेलें ॥१४६०॥
वारा उमाणावा वावें । आकाश आकळावें खेंवें ।
भावना भांबावली धांवे । काय करावें स्फुरेना ॥६१॥
तैशी सगुण मूर्ति नव्हे जाण । सुलभ आणि सुलक्षण ।
देखतां जाय भूकतहान । निवताहे मन सप्रेमें ॥६२॥
जो नित्यसिद्ध सच्चिदानंदू । प्रकृतिपरू परमानंदू ।
सगुण जाला जी गोविंदू । स्वानंदकंदू स्वलीळा ॥६३॥
साखरेची गोडी वाखाणिली । तिची नाबदेची भेली केली ।
गोडिये अधिक शोभा आली । तैशी मूर्ति झाली साकार ॥६४॥
लावूनियां कसवटी । उत्तम सुवर्णाची खोटी ।
बांधल्या नववधूच्या कंठीं । तेणें ते गोमटी दिसे काय ॥६५॥
त्याचींच करूनियां भूषणें । अंगीं प्रत्यंगीं लेवितां लेणें ।
नववधू अत्यंत शोभली तेणें । निंबलोणें उतरिती ॥६६॥
तैसें जें निर्गुण निर्विकार । त्याची सगुणमूर्ति सुकुमार ।
चिन्मात्रैक अतिसुंदर । मनोहर स्वलीला ॥६७॥
घवघवित घनसांवळा । मुकुट कुंडलें मेखळा ।
कंठीं कौस्तुभ वनमाळा । सोनसळा झळकत ॥६८॥
आधींच तो अतिसांवळा । वरी टिळक रेखिला पिंवळा ।
आरक्तप्रांत दोहीं डोळां । कमळदळां लाजवी ॥६९॥
चिन्मात्रींचें देखणेपण । त्या डोळ्यां आलें शरण ।
सैराट हिंडतां शिणला पवन । हरीचें घ्राण ठाकिलें ॥१४७०॥
जैशा ओंकारामाजीं श्रुती । तैशा मुखामाजीं दंतपंक्ती ।
चौकीचे चारी झळकती । सच्चिद्दीप्तीं सोलींव ॥७१॥
जेवीं जीव शिव भिन्नपणीं । तेवीं अध ऊर्ध्व अधर दोन्ही ।
हरिअंगीं मिनले मिळणीं । समानपणीं समत्वें ॥७२॥
देखोनियां कृष्णवदन । चंद्रमा कृष्णपक्षीं क्षीण ।
तो तंव पूर्णिमेसी पूर्ण । हा सदा संपूर्ण वदनेंदू ॥७३॥
दिवसा चंद्राची क्षीण प्रभा । वदनेंदूची नवलशोभा ।
लोपोनि चंद्रसूर्यप्रभा । स्वयें स्वयंभा प्रकाश ॥७४॥
तो आर्तचकोरा अमृतपान । मुमुक्षुचातका स्वानंदघन ।
सगुणपणें नारायण । भूषणां भूषण तो झाला ॥७५॥
चहूं खाणींच्या क्रिया विविधा । तैशा चहूभुजिंच्या चारी आयुधां ।
सगुण देखोनि गोविंदा । वेद निजबोधा आयुधें झाले ॥७६॥
देवो न कळे श्रुतींसी । लाज आली होती वेदांसी ।
जगीं मिरवावया प्रतापासी । आयुधें हरीपासीं ते झाले ॥७७॥
सामवेद झाला शंख । यजुर्वेद चक्र देख ।
अथर्वण गदा तिख । कमळ साजुक ऋग्वेदू ॥७८॥
साकारपणें सच्चिदानंदा । शंख चक्र पद्म गदा ।
चहूं करीं चहूं वेदां । निववी सदा निजांगें ॥७९॥
जगीं मिरवावया उपनिषदें । झालीं बाहुभूषणें अंगदें ।
करीं कंकणें अतिशुद्धें । सोहं शब्दें रुणझुणती ॥१४८०॥
नख केश अंगुलिका । कराग्रीं जडित मुद्रिका ।
त्रिकोण षट्कोणिया देखा । उपासकां विधिपीठ ॥८१॥
अगम्य तेज हृदयींच्या पदका । गुणत्रिवळी उदरीं देखा ।
मध्यें कळसू नेटका । क्षुद्रघंटिका मेखळे ॥८२॥
कांतीव मरकतस्तंभ जाण । तैसे शोभताती दोन्ही चरण ।
ते केवळ अचेतन । हे सचेतन हरिअंगीं ॥८३॥
ध्वज वज्र अंकुश ऊर्ध्वरेखा । दोन्ही पायीं पद्में देखा ।
यवांकित सामुद्रिका । अतिनेटका पदबंधू ॥८४॥
आरक्त रंग चरणतळां । वरील घनसांवळी कळा ।
नभीं इंद्रधनुष्यमेळा । तैसी लीळा हरिचरणीं ॥८५॥
सगुण देखोनियां जगन्नायका । दशदिशांसी चरणीं आवांका ।
पावावया निजसुखा । दशांगुलिका होऊनि ठेल्या ॥८६॥
चंद्र कृष्णपक्षीं क्षीण । तेणें ठाकिले हरिचरण ।
नखीं चंद्र जडोनियां जाण । परम पावन तो झाला ॥८७॥
हें जाणोनि त्रिनयनें । चंद्रमा मस्तकीं धरणें ।
पायवणी माथां वाहणें । जग उद्धरणें तेणें जळें ॥८८॥
सगुण देवो देखोनि पाहीं । चारी मुक्ति लागल्या पायीं ।
यालागीं संत चरणांच्या ठायीं । तत्पर पाहीं सर्वदा ॥८९॥
सलोकता समीपता । दोहीं पायीं वांकी गर्जतां ।
अंदू झाली स्वरूपता । सायुज्यता तोडरू ॥१४९०॥
ज्या तोडराचा धाक पाहीं । अहंगर्वित असुर वाहती देहीं ।
सर्व सुख तें हरीच्या ठायीं । त्यांच्या पायीं समाधी ॥९१॥
धैर्य वीर्य उदारकीर्ती । गुणगांभीर्य शौर्य ख्याती ।
यांसी कारण माझी सगुण मूर्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९२॥
माझे ये मुर्तीचेनि दर्शनें । होत डोळ्यां पारणें ।
जन्ममरणांचें उठवी धरणें । खत फाडणें विषयांचे ॥९३॥
माझी मूर्ति देखिल्यापाठीं । न लगे योगयाग आटाआटी ।
न लगे रिघावें । गिरिकपाटीं । नाना संकटीं न पडावें ॥९४॥
न लगे आसन भोजन । न लगे समाधिसाधन ।
माझिये प्राप्तीसी कारण । माझी भक्ति जाण उद्धवा ॥९५॥
एकादश पूजाअधिष्ठान । तेथें माझें करोनि आव्हान ।
म्यां सांगीतलें मूर्तीचें ध्यान । सावधान करावें ॥९६॥
माझें अर्चन माझें ध्यान । माझें करावें कीर्तन ।
माझ्या नामाचे स्मरण । माझे गुण वर्णावे ॥९७॥
अहर्निशीं माझी कथा । अहर्निशीं माझी वार्ता ।
अहर्निशीं मातें ध्यातां भक्ति तत्त्वतां ती नांव ॥९८॥
दीपकळिका हातीं चढे । तैं घरभरी प्रकाशू सांपडे ।
माझी मूर्ती जैं ध्यानी जडे । तैं चैतन्य आतुडे अवघेंचि ॥९९॥
या उपपत्ति उद्धवा देख । सगुण निर्गुण दोन्ही एक ।
जाण पां निश्चयो निष्टंक । सच्चिदानंदसुख समत्वें ॥१५००॥
जो कसू सुवर्णाचिये खोटीं । तोचि वाला एका कसवटीं ।
सगुणनिर्गुणपरिपाटीं । नाहीं तुटी चित्सुखा ॥१॥
तेवीं सगुण निर्गुण निःशेष । जाण निश्चयें दोन्ही एक ।
सगळें साखरेचें टेंक । ना नवटांक सम गोडी ॥२॥
हें अंतरंग माझें ध्यान । तेथें मन करोनि सावधान ।
अतिहर्षें मदर्चन । मद्भक्तीं जाण करावें ॥३॥
उद्धवा ऐसें म्हणसी मनीं । हे भक्ति पाविजे कैसेनि ।
हें साध्य होय जिंहीं साधनीं । तें तुजलागोनी सांगेन ॥४॥
इष्टापूर्तेन मामेवं यो यजेत समाहितः ।
लभते मयि सद्भक्तिं मत्स्मृतिः साधुसेवया ॥ ४७ ॥
करितां नाना योगयाग । वापी कूप वन तडाग ।
श्रौतस्मार्त कर्में चांग । मदर्पणें साङ्ग जिंहीं केलीं ॥५॥
श्रौत अग्निहोत्र सोमयाग । स्मार्त वापी कूप तडाग ।
मज नार्पितां दोन्ही व्यंग सत्कर्म साङ्ग मदर्पणें ॥६॥
कर्म करितां मदर्पण । अवचटें फळ वांच्छी मन ।
इतुकियासाठी भक्तासी विघ्न । सर्वथा मी जाण येवों नेदीं ॥७॥
सकाम कर्मकर्त्यासी । जे प्राप्ति नव्हे अतिप्रयासीं ।
त्या उत्तमलोकगतिभोगांसी । मद्भक्तांसी मी देता ॥८॥
पोटांतूनि माझा भक्तू । दिव्य भोगांसी विरक्तू ।
ते भोग भोगितां मातें स्मरतू । भोगासक्तू तो नव्हे ॥९॥
साधु देवालया जातां । पर्जन्यें पीडिला धारावर्तां ।
वेश्यागृहासी नेणतां । आला अवचितां वोसरिया ॥१५१०॥
तो बसोनि वेश्येसी नातळे । तेवीं भक्त दिव्य भोगांसी कांटाळे ।
ठकलों म्हणे अनुतापबळें । पिटूनि कपाळें हरि स्मरे ॥११॥
ऐशिया अनुतापस्थितीं । तत्काळ भोग क्षया जाती ।
तो जन्म पावे महामती । माझी भक्ती जिये गृहीं ॥१२॥
त्यासी पूर्वसंस्कारस्थितीं । सकळ विषयांची विरक्ती ।
उपजतचि लागे भक्तिपंथीं । भक्त आवडती जीवेंप्राणें ॥१३॥
तो मुक्तीतें हाणोनि लातें । निजसर्वस्वें भजे मातें ।
यापरी मी निजभक्तातें । नेदीं विघ्नातें आतळूं ॥१४॥
यापरी ज्यांस विषयविरक्ती । तेही इष्टापूर्त जैं करिती ।
योग याग त्याग जैं साधिती । माझी भक्ती तैं उपजे ॥१५॥
समाहित करोनि मन । श्रौतस्मार्तकर्मानुष्ठान ।
योग याग त्याग साधन । निष्ठेनें जाण जैं करिती ॥१६॥
तेणें शोधित होय चितवृत्ती । झालिया चित्तशुद्धीची प्राप्ती ।
तैं उपजे माझी सद्भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१७॥
इतुकी न करितां आटाटी । माझे सद्भक्तीची होय भेटी ।
हें अतिगुह्य आहे माझे पोटीं । ते तुज मी गोठी सांगेन ॥१८॥
सांडोनि सकळ साधन । जो करी साधुभजन ।
तेव्हांचि त्याचे शुद्ध मन । सत्य जाण उद्धवा ॥१९॥
म्हणसी साधु तो कैसा कोण । मागां सांगीतलें लक्षण ।
बहु बोलावया नाहीं कारण । साधु तो जाण सद्गुरु ॥१५२२॥
त्या सद्गुरूचें भजन । जो भावार्थें करी आपण ।
सर्व शुद्धीचें कारण । सद्गुरु जाण सर्वांषीं ॥२१॥
ज्याचे मुखींचें वचन । ब्रह्मसाक्षात्कारा पाववी जाण ।
त्याचे सेवितां श्रीचरण । शुद्ध कोण होईना ॥२०॥
गुरुनाम घेतां मुखें । कळिकाळ पाहूं न शके ।
त्याची सेवा करितां हरिखें । पायां मोक्षसुखें लागती ॥२३॥
ज्यासी सद्गुरूची आवडी चित्तीं । ज्याची सद्गुरुभजनीं अतिप्रीती ।
त्यासी भाळली माझी सद्भक्ती । पाठीं लागे निश्चितीं वरावया ॥२४॥
जो गुरुभजनीं भावार्थी । जगामाजीं तोचि स्वार्थी ।
त्यापाशीं माझी सद्भक्ती । असे तिष्ठती आंखिली ॥२५॥
सद्भक्ति बापुडी कायसी । अंगें मीही अहर्निशीं ।
तिष्ठतसें स्वानंदेंसीं । गुरुप्रेमासी भूललों ॥२६॥
मज माझ्या भक्तांची थोडी गोडी । परी गुरु भक्तांची अतिआवडी ।
सत्संगेंवीण रोकडी । सद्भक्ति चोखडी न पविजे ॥२७॥
प्रायेण भक्तियोगेन सत्सङ्गेन विनोद्धव ।
नोपायो विद्यते सम्यक् प्रायणं हि सतामहम् ॥ ४८ ॥
माझिये प्राप्तीलागुनी । भक्ति-ज्ञानमार्ग दोन्ही ।
ज्ञान अत्यंत कठिणपणीं । भक्ति निर्विघ्नीं पाववी मज ॥२८॥
संसार तरावयालागीं । अनेक साधनें अनेगीं ।
बोलिलीं तीं जाण वाउगीं । उत्तम प्रयोगीं मद्भक्ती ॥२९॥
उपायांमाजीं अतिप्रांजळ । निर्विघ्न आणि नित्य निर्मळ ।
माझा भक्तिमार्ग केवळ । ज्ञान तें विकळ मध्यपाती ॥१५३०॥
मळा शिंपावयालागुनी । मोट पाट उपाय दोन्ही ।
मोटां काढिजे विहीरवणी । बहुत कष्टोनी अतिअल्प ॥३१॥
मोट नाडा बैलजोडीं । अखंड झोडितां आसुडीं ।
येतां जातां वोढावोढी । भोय भिजे थोडी भाग एक ॥३२॥
तेथही मोट फुटे कां नाडा तुटे । वोडव पडे बैल अवचटे ।
तरी हातां येतां पीक आटे । वोल तुटे तत्काळ ॥३३॥
तैसा नव्हे सरितेचा पाट । एक वेळ केल्या वाट ।
अहर्निशीं घडघडाट । चालती लोट जीवनाचे ॥३४॥
मोटेचें पाणी तैसें ज्ञान । करूनि वेदशास्त्रपठण ।
नित्यानित्य विवेकासी जाण । पंडित विचक्षण बैसती ॥३५॥
एक कर्माकडे वोढी । एक संन्यासाकडे बोडी ।
एक म्हणती हे गोष्टी कुडी । देहो वोढावोढीं न घालावा ॥३६॥
एक म्हणती प्रारब्ध प्रमाण । एक म्हणती सत्य शब्दज्ञान ।
एक म्हणती धरावें मौन । अतिजल्पन न करावें ॥३७॥
एक म्हणती सांडावी व्युत्पत्ती । ज्याची चढे अधिक युक्ती ।
तोचि ज्ञाता निश्चितीं । सांगों किती मूर्खांसी ॥३८॥
एक म्हणती तप प्रमाण । एक म्हणती पुरश्चरण ।
एक म्हणती वेदाध्ययन । द्यावें दान एक म्हणती ॥३९॥
एक तो हें अवघेंचि मोडी । घाली योगाचिये कडाडीं ।
लावी आसनमुद्रेची वोढी । बैसवी रोकडी वारयावरी ॥१५४०॥
ऐसे नाना वाद करितां । एक निश्चयो नव्हे सर्वथा ।
ज्ञानाभिमान अतिपंडितां । ज्ञान तत्त्वतां कळेना ॥४१॥
ऐसी ज्ञानमार्गींची गती । नाना परींचीं विघ्नें येती ।
विकल्पें नासल्या व्युत्पत्ती । माझी निजप्राप्ती तेथें नाहीं ॥४२॥
तैसी नव्हे माझी भक्ती । नाममात्रें मज पावती ।
नामें उद्धरले नेणों किती । हेंचि भागवतीं बोलिलें ॥४३॥
माझें करितां गुणवर्णन । कां हरिकथा नामसंकीर्तन ।
तेथें रिघों न शके विघ्न । गडगर्जन हरिनामें ॥४४॥
जेथें हरिनामाचे पवाडे । तेथें विघ्न कैंचें बापुडे ।
विघ्न पळे मद्भक्तांपुढें । उघडती कवाडें मोक्षाचीं ॥४५॥
माझे भक्त अतिनिराश । न धरिती मोक्षाची आस ।
यालागीं मी हृषीकेश । त्यांच्या भावार्थास भूललों ॥४६॥
एवं निर्विघ्न मजमाजीं सरता । मार्ग नाहीं भक्तिपरता ।
त्रिसत्य सत्य गा सर्वथा । भक्ति तत्त्वतां मज पढिये ॥४७॥
ऐशी निजभक्ति सुलभ फुडी । देवो सांगे अतिआवडीं ।
उद्धवासी हरिभक्तीची गोडी । हर्षाची गुढी उभारिली तेणें ॥४८॥
जें उद्धवाच्या जीवीं होतें । तेंचि निरूपिलें श्रीअनंतें ।
हरिखें नाचों लागला तेथें । जीवें श्रीकृष्णातें वोवाळी ॥४९॥
ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती ।
देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥१५५०॥
कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती ।
तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे ॥५१॥
सत्संगें भक्तीची प्राप्ती । उद्धवा जाण तू निश्चितीं ।
संतांपाशीं माझी भक्ती । वास पाहती उभी असे ॥५२॥
हो कां तूं संत माझे म्हणसी । येर लोक सांडिले कोणापाशीं ।
तुझी भक्ति अहर्निशीं । संतांपाशीं कां असे ॥५३॥
उद्धवा ऐसा विकल्पभावो । येथें धरावया नाहीं ठावो ।
संतभजनीं माझा सद्भावो । केवा कोण पाहावो भक्तीचा ॥५४॥
संतसेवा करावयासी । कोण कारण तूं मज म्हणसी ।
अनावरा मज अनंतासी । तिंहीं निजभावेंसी आकळिलें ॥५५॥
मज आकळिलें ज्या हेतू । तेही सांगेन तुज मातू ।
मजवांचूनि जगाआंतू । दुसरा अर्थू नेणती ॥५६॥
आपुलें जें स्वकर्म । मज अर्पिले सर्व धर्म ।
देह गेह रूप नाम । आश्रमधर्म मदर्पण ॥५७॥
कल्पांतींचेनि कडकडाटें । जैं धाके धाके विराट आटे ।
ऐसीं वोढवल्या अचाटें । मजवेगळे नेटें न ढळ्ती ॥५८॥
तुटोनि पडतां आकाश । आणिकाची ते न पाहती वास ।
यालागीं मी हृषीकेश । त्यांचा दास झालों असें ॥५९॥
नवल भावार्थाचा महिमा । मज विश्वात्म्याचे झाले ते आत्मा ।
ऐसें लाहाणें तयां आम्हां । मज पुरुषोत्तमा वश केलें ॥१५६०॥
संतांसीं मज भिन्नपण । कल्पांतींही नाहीं जाण ।
तुज जिव्हारींची उणखूण । तुज संपूर्ण सांगीतली ॥६१॥
संत माझे झाले माझ्या भक्तीं । येर लोक मज न भजती ।
ते म्यां दिधले काळाच्या हातीं । अदृष्टगतीं बांधोनी ॥६२॥
माझिया संतांपाशीं । यावया प्राप्ती नाहीं काळासी ।
मी सदा संरक्षिता त्यांसी । ते कळिकाळासी नागवती ॥६३॥
यापरी संतांचें सर्व काज । करितां मज नाहीं लाज ।
उद्धवा माझें अत्यंत निजगुज । तें मी तुज सांगेन ॥६४॥
अथैतत् परमं गुह्यं श्रृण्वतो यदुनन्दन ।
सुगोप्यमपि वक्ष्यामि त्वं मे भृत्यः सुहृत् सखा ॥ ४९ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
ऐकें यदुवंशकुळटिळका । तूं स्वगोत्र भृत्य सुहृद सखा ।
तुज न सांगिजे हा आवांका । सर्वथा देखा न धरवे ॥६५॥
मज गुप्ताचें गुप्त सार । साराचें गुप्त भांडार ।
ते भांडारींचें निज सार । तुज मी साचार सांगेन ॥६६॥
ऐसें गुह्याचें गुह्य निश्चितीं । नाहीं सांगीतलें कोणाप्रती ।
तूं सखा जिवलग सांगाती । अनन्य प्रीती मजलागीं ॥६७॥
केवळ कोरडी नव्हे प्रीती । तैसीच माझी अनन्यभक्ती ।
भक्तीसारिखी विरक्ती । अवंचक स्थिती तुजपाशीं ॥६८॥
यादववंषीं पाहतां देख । मजसमान तूंचि एक ।
समान सगोत्र आणि सेवक । हें अलोकिक उद्धवा ॥६९॥
नव्हेसी कार्यार्थी सेवक । सर्वभावें विश्वासुक ।
किती वाणूं गुण एकएक । परम हरिख मज झाला ॥१५७०॥
यालागीं गुह्य तेंही तुझ्या ठायीं । वंचावया मज धीरु नाहीं ।
हृदय आलिंगलें हृदयीं । चिदानंदू पाहीं तुष्टला ॥७१॥
मग म्हणे सावधान । सादर आइक माझें वचन ।
तुज फावल्या माझें गुह्य ज्ञान । वंशउद्धरण तुझेनि ॥७२॥
जे वंशी होय ब्रह्मज्ञानी । तो वंष पवित्र त्याचेनी ।
हे सत्य जाण माझी वाणी । विकल्प मनीं न धरावा ॥७३॥
म्हणसी स्वयें तूं ब्रह्म पूर्ण । वंशीं अवतरलासी नारायण ।
तेणें वंश उद्धरला जाण । माझें ज्ञान तें किती ॥७४॥
तरी नाम रूप जाति गोत । या अवघ्यांसी मी अलिप्त ।
सकळ कुळेंसी मी कुळवंत । गोत समस्त जग माझें ॥७५॥
ऐसें म्हणोनि निजगुह्यसार । तुज मी सांगेन साचार ।
तेणें होईल जगाचा उद्धार । ऐसें शारङ्गधर बोलिला ॥७६॥
तें ऐकावया गुह्य ज्ञान । उद्धवें मनाचे उघडिले कान ।
सावध पाहतां हरीचें वदन । नयनीं नयन विगुंतले ॥७७॥
यापरी उद्धव सावधान । त्यासी कृष्ण सांगेल गुह्य ज्ञान ।
पुढीले अध्यायीं अतिगहन । रसाळ निरूपण हरीचें ॥७८॥
एका विनवी जनार्दन । संतीं मज द्यावें अवधान ।
श्रोतीं व्हावें सावधान । मस्तकीं चरण वंदिले ॥७९॥
तुमचेनि पदप्रसादें । श्रीभागवतींचीं श्लोकपदें ।
वाखाणीन अर्थावबोधें । संत स्वानंदें तुष्टलिया ॥१५८०॥
यालागीं एका शरण जनार्दनीं । तंव जनार्दनचि एकपणीं ।
जेवीं कां सागरींचें पाणी । तरंगपणीं विराजे ॥१५८१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे एकाकारटीकायां
श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादशपूजाविधानयोगो नाम एकादशोऽध्यायः ॥११॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४९॥ ओव्या १५८१॥